पुणे दि.१७: शहरातील मेट्रोच्या कामाला गती देऊन गरवारे महाविद्यालय ते न्यायालय आणि फुगेवाडी ते न्यायालय या मेट्रोमार्गाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दिक्षीत, संचालक अतुल गाडगीळ, कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे उपस्थित होते.
श्री.पाटील म्हणाले, मार्च अखेरपर्यंत शहरात सुरू असलेल्या ३३ किलोमीटरच्या मेट्रो लाईनचे काम पूर्ण होईल असे नियोजन करण्यात यावे. महामेट्रोला कामाची गती वाढविण्यासाठी शासनातर्फे आवश्यक सहकार्य करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प अहवालाला शासनाची मंजूरी मिळावी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा आढावा
पालकमंत्री श्री.पाटील यांनी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा आढावा घेतला. यावेळी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, अपर जिल्हाधिकारी वैशाली इंदानी उपस्थित होते. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. श्री.गटणे यांनी शहरातील प्रकल्पांच्या सद्यस्थितीविषयी यावेळी माहिती दिली.
स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचाही आढावा
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कार्पोरेशनच्या प्रकल्पांचाही आढावा घेतला. यावेळी कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, मुख्य ज्ञान अधिकारी दिनेश वीरकर, मुख्य अभियंता अरुण गोडबोले, कंपनी सचिव स्वानंद शेडे उपस्थित होते.
स्मार्ट सिटीचे प्रकल्प नागरिकांच्या जीवनशैलीत अधिक चांगले बदल होण्याच्यादृष्टीने उपयुक्त असून या थीमबेस्ड प्रकल्पांना अधिक गती द्यावी, असे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.
यावेळी श्री. कोलते यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. कॉर्पोरेशनच्या प्रकल्पांची सद्यस्थिती, निधीची आवश्यकता आदींविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.