Home Blog Page 1529

भूमि अभिलेख विभागाची २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान परीक्षा

0

पुणे, दि. १८: भूमि अभिलेख विभागाकडील गट क पदसमूह ४ (भूकरमापक व लिपीक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा २८ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे असे भूमि अभिलेख विभागाचे उपसंचालक किशोर तवरेज यांनी कळविले आहे.

परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाचे अधिकृत संकेतस्थळ http://mahabhumi.gov.in वर लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराने संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन त्यावरील नमूद परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेत उपस्थित रहावे. परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहितीपुस्तिका विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

एसटीच्या ताफ्यात येणार पाच हजार इलेक्ट्रिक आणि दोन हजार डिझेल बसगाड्या;पाच हजार डिझेल बसगाड्यांचे होणार एलएनजीमध्ये रुपांतर

0

मुंबई, दि.१८ – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर पाच हजार इलेक्ट्रिक तसेच दोन हजार डिझेल बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. त्याशिवाय डिझेलवरील पाच हजार बसगाड्यांचे टप्प्या-टप्प्याने ‘एलएनजी’ मध्ये रुपांतर करण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचा चेहरामोहरा बदलणे आवश्यक असून स्वच्छता-टापटीपपणा ठेवून गाड्यांची निगा राखा आणि राज्यातील जनतेला दर्जेदार सेवा पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आज दिले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची ३०२ वी बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन- नैनोटिया, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चेन्ने, कामगार आयुक्त सुरेश जाधव, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांचेसह एसटी महामंडळ, परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ५ हजार १५० इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत, यापूर्वीच्या बैठकीत मान्यता मिळालेल्या दोन हजार बसेस घेण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यामध्ये वाढ करून ५ हजार१५० इलेक्ट्रिक बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावेळी मान्यता दिली. या बसगाड्या घेण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बॅंकेकडून कर्ज घेण्यासही मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. इलेक्ट्रिक बसेस या वातानुकुलित असल्याने त्याचे सध्याच्या वातानुकूलित बसेस पेक्षा तिकिटदर कमी ठेवून सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

सीएनजी बसेससाठी चेसिस उपलब्ध होत नसल्याने आणि सीएनजी पंपांची कमी संख्या पाहता सीएनजीऐवजी दोन हजार डिझेल बसगाड्या वाहने एसटीच्या ताफ्यात घेण्यास आणि पुणे व सांगली विभागाकरिता १८० बसगाड्या भाडेतत्वावर घेण्यासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

डिझेलवरील पाच हजार बसगाड्यांचे ‘एलएनजी’ मध्ये रुपांतरण होणार
डिझेलवर धावणाऱ्या पाच हजार बसगाड्यांचे लिक्विफाईड नॅचरल गॅस (एलएनजी) इंधनामध्ये रुपांतरण करण्यात येणार आहे. यामुळे डिझेलच्या प्रचलित दरापेक्षा २० ते २५ टक्के कमी दराने एलएनजीचा पुरवठा होणार आहे. शिवाय संपूर्ण बस वातानुकुलित असल्याने कमी पैशांमध्ये प्रवाशांना प्रवास करता येईल. हे काम पुरवठादार कंपनीकडून करण्यात येणार असून सुरुवातीला यात महामंडळाला कोणतीही गुंतवणूक करावी लागणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

एसटी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात वाढ
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात वाढ करण्यास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मान्यता दिली आहे. महामंडळाचे सुमारे ९२ हजार अधिकारी-कर्मचारी असून त्यांना पूर्वी मिळणारा २८ टक्के महागाई भत्ता आता ३४ टक्के दराने मिळणार आहे. सुमारे १५ कोटी रुपयांची मासिक वाढ वेतनखर्चात होणार आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या सन २०१६-१७ ते २०२१-२२ या सहा वर्षांसाठीच्या वेतनसुधारणेच्या प्रस्तावास देखील यावेळी मंजुरी देण्यात आली.

सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणाऱ्या अतिरिक्त उपदान मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. अतिरिक्त उपदान तथा कर्मचारी ठेव निगडित विमा योजनेंतर्गत आर्थिक लाभाची मर्यादा ६ लाख १५ हजारांवरुन ७ लाख ५ हजार करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली.

ॲंड्राईडवर आधारित यंत्रातून मिळणार तिकिटे
ॲंड्राईडवर आधारित ईटीआय यंत्राद्वारे प्रवाशांना एसटी बसची तिकीटे मिळणार आहेत. डेबिट, क्रेडिट कार्ड, गुगल पे आदी ऑनलाईन पेमेंटद्वारे प्रवाशांना आता तिकिटे मिळणार आहेत. त्याशिवाय मोबाईल ॲप-संकेतस्थळाद्वारे आगाऊ आरक्षण सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच महामंडळाचे आंतरसंवादी नवीन संकेतस्थळ करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली. नवीन संकेतस्थळ तयार झाल्यानंतर चॅट बॉट, तक्रार निवारण सुविधा, बसेसचे अद्ययावत वेळापत्रक आदी सुविधा देखील प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.

१ कोटी ९५ लाख ज्येष्ठ नागरिकांचा एसटीतून प्रवास
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ वर्षांवरील ज्येष्ठांसाठी मोफत एसटी प्रवासाची सवलत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली होती, त्या सवलतीचा आजपर्यंत सुमारे १ कोटी ९५ लाख ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला आहे, मोफत प्रवास सवलतीची ही योजना अधिकाधिक ज्येष्ठांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

टाळेबंदी काळातील परवाना शुल्कात एसटी स्टॉल्सला सवलत
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात झालेल्या टाळेबंदीमुळे आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात बसस्थानकांवरील परवानाधारक वाणिज्य आस्थापनांना परवाना शुल्कात सवलत देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. टाळेबंदीच्या मार्च ते ऑगस्ट २०२० या काळासाठी १०० टक्के, एप्रिल ते जून २०२१ साठी ५० टक्के आणि नोव्हेंबर २१ ते एप्रिल २०२२ या संप कालावधीत परवाना शुल्कात ७५ टक्के सवलत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. या सवलतीचा सुमारे ३२०० परवानाधारक दुकानदारांना लाभ होणार आहे.
नाशिक महानगरपालिकेला शहर बस वाहतूक सुरु करण्याकरिता निमाणी, भगूर, नाशिकरोड, सातपूर येथे एसटी महामंडळाची आस्थापना आणि मोकळ्या जागा रेडीरेकनरप्रमाणे दर आकारुन भाडेतत्त्वावर देण्यासही यावेळी मंजुरी देण्यात आली.

एसटीचे पहिले वाहक लक्ष्मणराव केवटे यांना सहप्रवाशी सुविधा
एसटी महामंडळाचे पहिले वाहक लक्ष्मणराव केवटे यांना वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचा लाभ देण्यास तसेच त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशास मोफत प्रवासाची सवलत देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. श्री. केवटे यांचे वय ९८ वर्षे असून विशेष बाब म्हणून वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचा लाभ देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

अपघातप्रवण जागांजवळील अतिक्रमणे काढा- मुख्यमंत्री
राज्यातील एक हजारपेक्षा अधिक अपघातप्रवण जागा असून अपघात टाळण्यासाठी त्या भागात असलेले अतिक्रमणे काढण्याबरोबरच चालकांना स्पष्ट दिसतील असे फलक लावण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

एसटीच्या पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना
एसटी बसेसची रंगरंगोटी करुन स्वच्छता ठेवा, फाटलेली आसने बदला, बसगळती रोखण्यासह फुटलेल्या काचा बदलून नव्याने लावा आणि एसटीच्या या पंचसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

ठराविक उद्योजकांचे अब्जावधींचे कर्ज होते माफ आणि गरिबांना मात्र नाममात्र कर्जासाठी पत्करावा लागतो आत्महत्येचा मार्ग – राहुल गांधी म्हणाले, जनतेचे दुखः पाहिले जवळून .

जिजामतेने घडविले शिवाजी महाराज

शेगाव-भाजपने देशात भय, तिरस्कार आणि हिंसा पसरवली आहे. याविरोधात माझी भारत जोडो यात्रा आहे. या देशाला हिंसेने आणि तिरस्काराने फायदा होणार नाही. रस्त्यावर चालणाऱ्यांनाही पाच मिनिटांत लक्षात येईल की, हिंसा कोण पसरवित आहेत, असा जोरदार घणाघात काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज शेगाव येथे केली. विशेषतः याआधीच्या सभेत त्यांनी सावरकरांविरोधात वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर टीकाही झाली. या सभेत मात्र, त्यांनी सावरकरांवर बोलणे टाळले.राहुल गांधींची भारत जोडो यात्रा शेगावमध्ये असून आज त्यांची सभा झाली. यावेळी त्यांनी जनतेसह काॅंग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले.

राहुल गांधी म्हणाले, भारत जोडो यात्रा केरळमधून महाराष्ट्रात सुरू झाली. विरोधकांनी सवाल केला होता की, यात्रेची काय गरज? या यात्रेचा काय फायदा होणार? मी म्हणतो देशातील कोनाकोपऱ्यात आज भाजपने हिंसा आणि भय उत्पन्न केले आहे. शेतकरी म्हणतात की आम्हाला मालाचा मोबदला योग्य मिळत नाही हे मला असंख्य शेतकऱ्यांनी सांगितले हे ऐकून मला त्रास होत आहे. शेतकरी म्हणतात आम्ही काय चुक केली. आमचे कर्ज माफ होत नाही पण देशातील धनाड्यांची, अब्जाधिशांची कर्ज माफ होतात.

राहुल गांधी म्हणाले, आपआपसांत भांडणे करुन कुणाचा फायदा झाला. महाराष्ट्रातील संतांनी कधी सांगितले का की, आपसांत भांडणे करा नाही ना..मग आपण का भांडतो? भाजपने कुटुंबात भांडणे लावली पण या भांडणांनी कुटुंबाचे नुकसान होत आहे. देशही एक कुटुंब आहे, या भांडणांनी देशाचा फायदा झाला का? भाजपने माणसे तोडण्याचे काम केले आम्ही ते जोडू.

राहुल गांधी म्हणाले, शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आणि महाराष्ट्राचा आवाज आहे. त्यांना घडवण्याचे काम राष्ट्रमाता जिजाऊंनी केले. आपण मला प्रेम आणि सहकार्य केले, आपण आम्हाला खूप काही शिकवले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी खूप काही शिकवले. मी जीवनभर विसरणार नाही की, महाराष्ट्रातील जनतेने मला शक्ती, ज्ञान आणि प्रेम दिले.​

शेतकरी आत्महत्या का करतो. पन्नास हजार, एक लाखांचे कर्ज त्यांच्या डोक्यावर असते. परंतु ते आज वाऱ्यावर आहेत. या देशातील पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी जर मनात आणले आणि शेतकऱ्यांना हृदयाशी घेतले आणि त्यांची हाक ऐकली आणि थोडी जरी शेतकऱ्यांची मदत केली तर त्यांचे भले होईल.

राहुल गांधी म्हणाले, देशातील युवक बेरोजगार आहेत. महाराष्ट्रात फुकत शिक्षण मिळत नाही. मुलांचे पालक लाखो रुपये शिक्षणासाठी देतात पण पुढे काय होते? काय ऐकायला मिळते? काय काम करतात काहीच नाही. बेरोजगार आहे. उद्योगपती देशाची संपत्ती मिळवतील आणि युवक बेरोजगार होतील युवकांचे स्वप्न पूर्ण न होणारा भारत आम्हाला नको. स्वप्न पूर्ण करणारा भारत आम्हाला हवा आहे.

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी ,अशोक चव्हाण , यशोमती ठाकूर, नाना पटोले , बाळासाहेब थोरात यांची यावेळी भाषणे झाली ,पुण्याचे मोहन जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

कोकणातील सर्व रेल्वेस्थानकांचा कायापालट करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

0

मुंबई, दि. 18 : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या सर्व प्रमुख स्थानकांच्या सुशोभीकरणाची प्रक्रिया येत्या सात दिवसांत सुरु करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज दिले.

कोकण रेल्वे स्थानक ते मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण, नूतनीकरण, स्थानकांचे सुशोभीकरण आदी विविध विषयासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे पोलीस अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांच्या बाहेरील सर्व प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करा. त्याचप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी व कणकवली येथे सुसज्ज रेल्वे पोलीस ठाणे उभारण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याच्या सूचनाही मंत्री श्री. चव्हाण यांनी दिल्या. या निर्णयामुळे कोकणवासियांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असून लवकरच कोकण रेल्वेची स्थानके व परिसराचा कायापालट होणार आहे. मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांचे उत्कृष्टरित्या सुशोभीकरण व अत्याधुनिकीकरण करण्यात आल्यामुळे प्रवाशांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध होतात. याच धर्तीवर कोकण रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकांचे सुशोभीकरण व आधुनिकीकरण करण्याच्या सूचना यावेळी मंत्री श्री. चव्हाण यांनी दिल्या. तसेच, कोकण रेल्वे प्रशासनाने सुशोभीकरणासंदर्भात पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे, असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मुंबई- कोकणातून दरदिवशी हजारो प्रवासी कोकण रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे ही सर्व रेल्वे स्थानके सुसज्ज करावीत. विनाविलंब येत्या सात दिवसांत याबाबत कार्यवाही सुरु करण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले.

कोकण रेल्वे स्थानकांकडे जाणारे रस्ते काँक्रिटीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची तयारी असून या प्रमुख रस्त्यांच्या क्रॉकिटीकरणासाठी सुमारे १०० कोटी खर्च अपेक्षित आहे. कोकणवासी व मुंबईच्या चाकरमान्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे रस्ते तयार करण्याची पूर्ण तयारी असून यादृष्टीने कोकण रेल्वे प्रशासनाकडे तत्परतेने ना हरकत प्रमाणपत्र आल्यावर रस्त्यांचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात येईल, असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.

कोकण रेल्वे मार्गावर वारंवार अनेक अपघात होतात. तसेच, दरडी कोसळण्याच्या अनेक दुर्घटनाही होतात. त्यामुळे अशा आणीबाणीच्या परिस्थितीत अपघातग्रस्तांना तातडीने उपाययोजना व मदत करण्याच्या दृष्टीने रत्नागिरी व कणकवली येथे दोन स्वतंत्र व सुसज्ज पोलीस ठाणे बनविण्यात यावीत, तसेच याच परिसरात आठ पोलीस चौक्या नव्याने तयार करण्याबाबात कोकण रेल्वे प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने योग्य जागा उपलब्ध करुन द्याव्यात व त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री श्री.चव्हाण यांनी यावेळी उपस्थित कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.

राजापूर रोड, सौंदळ, रत्नागिरी, भोके, आडवली, विलवडे, सावर्डा, चिपळूण, कामथे, दिवाणखवटी, कळंबणी, खेड, आयनी, मडुरा, सावंतवाडी, झाराप, कुडाळ, कणकवली, नांदगाव, खारेपाटण रोड, वैभववाडी रोड, आचिर्णे, सिंधुदूर्गनगरी या कोकण रेल्वे मार्गावरील प्रमुख स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम लवकरात लवकर हाती घेण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी दिल्या.

त्याचप्रमाणे रत्नागिरी – दादर पॅसेंजर गाडी दिवा जंक्शनच्या ऐवजी दादर रेल्वे स्थानकापर्यंत करण्याबाबत तसेच सावंतवाडी – तुतारी एक्सप्रेसला नांदगाव स्थानकावर थांबा देण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन कोकण रेल्वेच्या अधिका-यांनी दिले. कोरोनाच्या काळात बंद पडलेली नांदगाव रेल्वे स्थानकावरील रो-रो सुविधा पुन्हा सुरु करण्याबाबत सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील असेही कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला कोकण रेल्वेचे मुख्य अभियंता नागदत्त राव, वरिष्ठ अभियंता जे.एस.थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस.एन.राजभोज, एस.एन.गायकवाड, ए.ए.ओटवणेकर, ए.एम.रमेश, अजयकुमार सर्वगोड, अनामिका जाधव, मध्य रेल्वेचे डिसीपी मनोज पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगत, कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य विजय केनवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

वीजबिल भरण्याबाबत बनावट संदेशाद्वारे आर्थिक फसवणूकीचे प्रकार; सतर्क राहा

वैयक्तिक स्त्रोतांच्या ‘एसएमएस’, ‘व्हॉटस् ॲप’ व कॉलला प्रतिसाद देऊ नका

पुणे, दि. १८ नोव्हेंबर २०२२: वैयक्तिक स्त्रोतांद्वारे वीजबिल भरण्याबाबत बनावट ‘एसएमएस’, ‘व्हॉटस् ॲप’ संदेश पाठवून तसेच मोबाईल कॉलद्वारे नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार सुरु आहेत. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक क्रमांकावरून आलेल्या बनावट संदेश किंवा कॉलवर विश्वास ठेऊ नये. तसेच पाठवलेली लिंक ओपन किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. वीजबिलांचा सुरक्षित भरणा करण्यासाठी ग्राहकांसाठी महावितरणचे मोबाईल ॲप व www.mahadiscom.in ही वेबसाईट उपलब्ध आहे.  

‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’, असे बनावट ‘एसएमएस’ किंवा ‘व्हॉटस् ॲप’ संदेश पाठविण्यात येत आहेत. मोबाईल कॉल देखील करण्यात येत आहेत. यामध्ये ज्यांचा वीजबिलांशी काहीही संबंध नाही अशा नागरिकांना किंवा वीजबिल पूर्वीच भरलेले आहे अशा वीजग्राहकांना देखील बनावट संदेश पाठविण्यात येत आहे. सावधगिरी न बाळगता नागरिकांनी या बनावट संदेशांना किंवा कॉलला प्रतिसाद दिल्यानंतर फक्त ऑनलाईनद्वारेच वीजबिल भरण्यास सांगणे, त्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून ऑनलाईन पेमेंटची लिंक पाठविणे किंवा सॉफ्टवेअर (जे मोबाईल किंवा संगणक हॅक करतात) डाऊनलोड करण्यास सांगितले जात आहे. नागरिकांनी या बनावट संदेशांना प्रतिसाद दिल्यास मोबाईल किंवा संगणक हॅक करून संबंधित बॅक खात्यातील शिल्लक रक्कम लंपास करण्यात येत आहे.

महावितरणकडून कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून अशा प्रकारचे ‘एसएमएस’ व ‘व्हॉटस् ॲप’ मेसेज पाठविण्यात येत नाही. तर ज्या ग्राहकांनी ग्राहक क्रमांकासोबत त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे केवळ त्याच वीजग्राहकांना संगणकीय प्रणालीद्वारे ‘एसएमएस’ पाठविण्यात येतात. या संदेशाचे सेंडर आयडी (Sender ID) हे VM-MSEDCL, VK-MSEDCL, AM-MSEDCL, JM-MSEDCL असे आहेत. तसेच या अधिकृत संदेशाद्वारे वीजग्राहकांना कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याबाबत कळविले जात नाही. बँकेचा ओटीपी शेअर करण्याबाबत किंवा कोणत्याही प्रकारचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जात नाही. सोबतच वैयक्तिक क्रमांकावरून ‘व्हॉटस् ॲप’ संदेश पाठविले जात नाही असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महावितरणकडून अधिकृत सेंडर आयडीद्वारे फक्त ‘एसएमएस’ पाठविले जातात. यामध्ये पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीतांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कमस्वत:हून मीटर रिडींग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहनमीटर रिडींग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्यावीजबिलाची रक्कमदेय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची रीतसर नोटीस आदींची माहिती पाठविण्यात येते.

परंतु, सध्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येणारे ‘एसएमएस’, ‘व्हॉटस् ॲप’ संदेश तसेच मोबाईल कॉल बनावट आहेत. त्यास कोणताही प्रतिसाद देऊ नये. बिलाच्या पेमेंटसाठी लिंक ओपन किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नये. बनावट संदेशामध्ये नमूद केलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नये. काही शंका व तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी चोवीस तास सुरु असलेल्या १९१२, १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

आर्थिक समावेशनासाठी १९ नोव्हेंबर रोजी २१३ गावांमध्ये शिबिरे

भारत सरकारच्या योजनांचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे नागरिकांना आवाहन

पुणे, दि. १८: भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाद्वारे १५ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर २०२२ पर्यंत राबविण्यात येणाऱ्या ‘आर्थिक समावेशनातून सशक्तिकरण’ या प्रायोगिक प्रकल्पाअंतर्गत १९ नोव्हेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील २१३ ग्रामपंचायतींमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या शिबीरात उपस्थित राहून विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज भरुन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

जिल्ह्यातील २१ बँकांचा यात सहभाग आहे. राज्य शासनाचे महसूल, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग व मत्स्य विभाग तसेच गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, आशा कार्यकर्त्या, कृषी सहाय्यक या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व गट विकास अधिकारी यासाठी सहकार्य करतील.

या मोहिमेअंतर्गत प्रधानमंत्री जनधन बचत खाते, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व अटल पेन्शन योजना या सामाजिक सुरक्षा योजनांसाठी पात्र असलेल्या परंतू अद्याप त्यामध्ये सहभाग नोंदवलेला नाही अशा सर्व ग्रामस्थांना या योजनेचा लाभ देण्यासाठी सहभागी करून घेतले जाणार आहे. या मेळाव्यांमध्ये किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत पीक कर्जबरोबरच दुग्ध, पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन व मत्स्यव्यवसाय इत्यादी या व्यवसायांसाठी खेळते भांडवल मिळण्यासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मुद्रा योजनेअंतर्गत व बचत गटांना खेळते भांडवल व व्यवसायासाठी कर्जाचे अर्ज स्वीकारले जातील.

येत्या १९ नोव्हेंबर रोजी जिल्हा अग्रणी बँक व जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, सहकारी व ग्रामीण बँकांच्या सहकार्यातून शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक श्रीकांत कारेगांवकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी त्यांच्या गावातील आयोजित शिबिराच्या दिवशी या योजनांमध्ये अर्ज करून सहभाग नोंदवावा. या शिबीराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आत्मा नियामक मंडळाची बैठक संपन्न

लम्पी प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी स्वच्छ गोठाविषयक प्रशिक्षण द्या- जिल्हाधिकारी

पुणे, दि. १८: कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेच्या नियामक मंडळाची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (१७ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आली होती. लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या ठिकाणी आत्माच्या माध्यमातून स्वच्छ गोठा विषयावरील प्रशिक्षणाचे आयोजन करावे अशा सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

बैठकीस आत्माच्या प्रकल्प संचालक पूनम खटावकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुभाष काटकर आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आत्माच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. रेशीम विभागाच्या सहाय्याने जिल्ह्यात रेशीम उत्पादनवाढीसाठी तुती लागवडीचे क्षेत्र वाढवावे, याअनुषंगाने रेशीम उत्पादनाचे समुह तयार झालेल्या गांवामध्ये शैक्षणिक सहलीचे आयोजन करावे. सोयाबीन पिक वाढीसाठी पाणी फौंडेशनच्या मदतीने सोयाबीन पीक प्रात्यक्षिकांचे आयोजन करावे. कृषि विभाग, साखर कारखाने व आत्माच्या संयुक्त विद्यमाने ऊस पाचट व्यवस्थापन प्रशिक्षणांचे आयोजन करावे, आदी सूचना डॉ. देशमुख यांनी केल्या.

आत्माने बारामती, इंदापुर तालुक्यामध्ये ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने ऊस सुपरकेन नर्सरी विषयक प्रशिक्षण आयोजित करावे, डाळिंब पिकाच्या संरक्षणासाठी डाळिंब नेटचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती साठी प्रात्यक्षिके व प्रशिक्षणे आयोजित करावे, आदी सूचनाही बैठकीत करण्यात आल्या.

या सभेमध्ये प्रकल्प संचालक श्रीमती खटावकर यांनी आत्मा अंतर्गत खरीप हंगामामध्ये पूर्ण झालेले तसेच रब्बी हंगामातील नियोजित प्रशिक्षणे, प्रात्यक्षिके, शेतीशाळा आदींबाबत माहिती दिली.

बैठकीस जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक, सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, कृषि विज्ञान केंद्र, पणन विभाग, रेशीम विकास विभाग, पशुसंवर्धन विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात १८ वाहनांचा जाहीर ई-लिलाव

0

पुणे दि.१८ : मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या १८ वाहनांचा जाहीर ई-लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे ७ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मोशी प्राधिकरण पिंपरी चिंचवड येथील आवारात ६ डिसेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत वाहने पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत.

जाहीर ई-लिलावात एकुण १८ वाहने आहेत. यामध्ये बस, एचजीव्ही, एक्सकॅवेट, एलजीव्ही, टुरिस्ट टॅक्सी व रिक्षा या वाहनांचा समावेश आहे. ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहणार आहे.

ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, तहसिलदार, पुणे शहर व हवेली, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगांव व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड यांच्या सूचनाफलकांवर माहितीसाठी लावण्यात आली आहे.

जाहीर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी २४ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत https://eauction.gov.in/eauction/#/ या संकेतस्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असणार आहे.

ऑनलाईन नाव नोंदणी झाल्यानंतर २४ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे खटला विभागात सकाळी १० ते सायंकाळी ६ प्रत्येक वाहनासाठी ५० हजार रकमेचा धनाकर्ष ‘डीवाय आरटीओ पिंपरी चिंचवड’ या नावे सादर करावा. सोबत ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती, नाव नोंदणी व कागदपत्रे पडताळणी व मंजुरीसाठी सादर करणे गरजेचे आहे.

लिलावाचे अटी व नियम १८ नोव्हेंबरपासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड येथील सूचना फलकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाहण्यासाठी उपलब्ध असतील. ही वाहने ‘जशी आहेत तशी’ या तत्वावर जाहीर ई-लिलावाद्वारे विकली जातील, असे कराधान प्राधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळवले आहे.

वन विभागाकडून सिंहगडावर अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई

0

पुणे दि. १८: किल्ले सिंहगडाचे ऐतिहासिक महत्व व गडाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी सकाळी ६ वाजता सिंहगडाच्या पायथ्यापासून ते किल्ल्याच्या माथ्यापर्यंत विखुरलेल्या खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांचे अतिक्रमण पुणे वन विभागाच्यावतीने निष्कासित करण्यात आले.

किल्ले सिंहगडावर गेल्या काही वर्षापासून गडाच्या पार्किंगपासून ते माथ्यापर्यंत खाद्यपदार्थ स्टॉल धारकांनी विविध ठिकाणी प्लास्टिक कागद वापरुन अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले होते. या अतिक्रमणधारकांना कायदेशीर पद्धतीने नोटीस देऊन पुणे वनविभागाने अवैध झोपड्या हटविल्या आहेत.

अतिक्रमणधारक स्टॉल धारकांची निसर्ग पर्यटन योजनेअंतर्गत सोय करण्याचे वनविभागाच्या विचाराधीन आहे. अतिक्रमणधारकांच्या रोजगार निर्मितीचा प्रश्न संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकामार्फच सोडविण्यात आला आहे, अशी माहिती पुणे वन विभागाने दिली आहे.

अतिक्रमण हटवल्यानंतर वाहनतळाची जागा विस्तारली आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी करण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध होणार असून सुट्टीच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार आहे, असे उपवनसंरक्षक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

सचिन वाझेला मुंबई सत्र न्यायालयाकडून मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर,पण जेलमधून सुटका नाही.

0

मुंबई-बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने वाझेला मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. मात्र, वाझेला जामीन मंजूर झाला असला तरी त्यांना इतर प्रकरणांमुळे जेलमधून सुटका होणार नाही.

ईडीने वाझेला जामीन देण्यास नकार दिला होता. मात्र न्यायलयाने हा विरोध फेटाळला आणि वाझेला जामीन दिला आहे. वाझेच्या जामीनावर 15 नोव्हेंबरला सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानुसार आज 18 नोव्हेंबरला निकाल लागणार होता. ईडीने वाझेवर गुन्हा दाखल केला होता.

वाझेने सीआरपीसी सीआरपीसी कलम 88 नुसार जामीन मिळावा, यासाठी अर्ज केला होता. मात्र ईडीने या जामीनासाठी विरोध केला. मात्र आज अखेर न्यायालयाने वाझेच्या बाजूने निर्णय देत त्याला मोठा दिलासा दिला.

सहा महिन्यांपूर्वी 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला विशेष सीबीआय न्यायालयाने सरकारी साक्षीदार होण्यास परवानगी दिली होती. अटकेपूर्वी आणि नंतरही आपण सीबीआयला सहकार्य केल्याचे वाझे याने न्यायालयाला सांगितले होते. त्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर त्याचा जबाब नोंदवला आणि बीआय न्यायालयाने काही अटींसह वाझेला दिलासा दिला. याबाबत सचिन वाझे याने मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाला मंजुरी देण्यात आली होती. आपल्याला माफीचा साक्षीदार बनवावे असा अर्ज वाझेंनी मुंबई सत्र न्यायालयात केला होता.

काय आहे प्रकरण?

सचिन वाझेला गेल्या वर्षी मार्चमध्ये मनसुख हिरेन खून प्रकरण आणि दक्षिण मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेले वाहन याप्रकरणी अटक करण्यात आली होती. वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

गेल्या वर्षी मार्चमध्ये मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केला होता की, महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस अधिकाऱ्यांना महानगरातील रेस्टॉरंट आणि बारमधून दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने गेल्या एप्रिलमध्ये देशमुख, वाझे आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे नेते देशमुख यांनी राज्य मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता.

कोण आहेत सचिन वाझे?

सचिन वाझे हे 1990 च्या बॅचमधील पीएसआय आहेत. वाझेंच्या नावावर 63 एन्काउंटर आहेत. बॉम्ब स्फोट आरोपी ख्वाजा युनूसचा मृत्युमुळे वादात अडकले. युनूसचा 2004 मध्ये कोठडीत मृत्यू झाला. त्यामुळे वाझे यांना निलंबित करण्यात आलं. सरकारने वाझेंचा 2007 मध्ये नोकरीचा राजनीमा नाकारला. त्यानंतर वाझे यांनी 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. वाझे जून 2020 मध्ये पुन्हा पोलीस सेवेत रुजु झाले.

महात्माजींचे पणतू तुषार ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी-गांधी-नेहरू पुन्हा साथ साथ

राहुल गांधी यांच्यासमवेत आज महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यात्रेत सहभागी झाले.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज बुलढाणा जिल्ह्यात आहे. शेगाव येथे राहुल यांची आज दुपारी साडेचारच्या सुमारास सभा होणार आहे. त्यापूर्वीच राहुल गांधी आणि तुषार गांधी एकत्र आलेत.

तुषार गांधी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. त्यानंतर काँग्रेसच्या वतीने भारत जोडो या ट्विटर हँडलवरून त्यांचे काही फोटो ट्विट करण्यात आले. तसेच एक संदेश देण्यात आला. त्यात म्हटले आहे की, आम्ही योग्य मार्गावर चाललो आहोत, हा त्याचाच संकेत आहे. भारत जोडो यात्रेत आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू सहभागी झाले. राहुल गांधी यांची भेट घेत त्यांनी भारत जोडो यात्रेला आपले समर्थन असल्याचे सांगितले.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात गांधी-नेहरू परिवाराचे मोठे योगदान आहे. पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्यात अपार स्नेह होता. दोघांनीही हातात हात घालून काम केले. राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेत आज तोच योग जुळून आला. गांधीजींचे पणतू तुषार गांधी या यात्रेत सहभागी झाले. त्यांनी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला. तसेच ते त्यांच्या हातात हात घालून चालले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाली.

पुण्यातील कॉंग्रेस भवनावर हल्ल्याचा प्रयत्न पोलिसांनी रोखला .

पुणे-राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आक्रमक झालेल्या भाजयुमो च्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला पण काहींनी कॉंग्रेस भवनात घुसून राहुल गांधींच्या फोटोला काळे फासले , गांधींच्या विरोधात कॉंग्रेस भवनात घुसून घोषणाबाजी केली .परंतु वेळीच सुरुवातच पोलिसांनी अत्यंत दक्षतेने रोखली आणि पुढील घुसखोरी, मोडतोड ,नुकसान टाळण्यात यश मिळविले.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेक शहरात त्यांच्या यात्रेत अनेक लोक सहभागी होत आहेत. त्यामुळे भाजपच्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेलं वक्तव्य आताचं नाही आहे. हा वाद फार आधीचा आहे. मात्र भारत जोडो यात्रेत बाधा आणण्यासाठी भाजपतर्फे असं कृत्य करण्यात येत आहे, असा आरोप कॉंग्रेसने भाजपवर केला आहे. यापूर्वीही  छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान झाला त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते झोपले होते का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. भारत जोडो यात्रेत अनेक लोक सहभागी होत आहेत. हे त्यांच्या डोळ्यात येत आहे. केवळ राजकारण करायचं म्हणून भाजपने हे कृत्य केलं आहे. भारत जोडो यात्रेचं हे यश आहे. त्याची भीती भाजपला आहे. त्यामुळे घाबरुन त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 

कॉंग्रेसची दारं ही कायम सर्वसामान्यांसाठी आणि सगळ्यांसाठीचं उघडे असतात. आज राहुल गांधींची विदर्भातील शेगावमध्ये सभा आहे. हा कॉंग्रेस भवनावर झालेला भ्याड हल्ला आहे. त्यांच्यात हिंमत असतील तर त्यांनी मागून हल्ला केला नसता. कॉंग्रेसचे 1000 नेते पुण्यातून शेगावला गेले आहेत. हे भाजपवाल्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी हा हल्ला केला आहे. नाहीतर त्यांची कॉंग्रेस भवनावर हल्ला करण्याची हिंमत केली नसती, असा हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला आहे. भारत जोडो यात्रेतून राहुल गांधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आहेत. त्यात प्रत्येक वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. याचीच भीती भाजपला वाटत आहे आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे त्यांना असे हल्ले करण्याची बुद्धी सुचत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. 

देशभरात फिरणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बॉम्बने उडवू अशी धमकी

–भारत जोडो यात्रेसाठी देशभरात फिरणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इंदौरमध्ये बॉम्बने उडवू अशी धमकी देण्यात आली आहे. इंदौरमधल्या एका दुकानात हे पत्र आलं आहे.

इंदूर स्थित एका दुकानात सनसनाटी पत्र आढळले आहे. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खालसा महाविद्यालयात होणाऱ्या सभेत हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच संपूर्ण इंदूर शहरातही स्फोट घडवण्याचा इशारा देण्यात आला आहे. लिफाफ्यावर पत्र पाठवणाऱ्याच्या जागी रतलामचे भाजप आमदार चेतन कश्यप यांचे नाव लिहिण्यात आले आहे.

पोलिस या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 23 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात प्रवेश करत आहे. त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी त्यांची इंदूरमध्ये सभा होईल.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 23 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात पोहोचणार आहे. तेथून ती उज्जैन व इंदूरमार्गे राजस्थानात जाईल. त्यातच आता राहुल यांची बॉम्बस्फोटाद्वारे हत्या करण्याची धमकी देण्यात आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. हे पत्र इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानात आढळले. पोलिसांनी हे पत्र जप्त करून तपास सुरू केला आहे. दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही तपासले जात आहे.

पत्रात सर्वात वर वाहेगुरु लिहिले आहे. त्याखाली लिहिले आहे… 1984 साली संपूर्ण देशात भयंकर दंगली झाल्या. शिखांची हत्या करण्यात आली. कोणत्याही पक्षाने या अत्याचाराविरोधात आवाज उंचावला नाही. (त्यानंतर येथे काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द आहेत.)

पत्रात पुढे लिहिले आहे की, नोव्हेंबरच्या शेवटी इंदूरमध्ये जागोजागी भयावह स्फोट होतील. बॉम्बस्फोटांनी संपूर्ण शहर उद्ध्वस्त होईल. राहुल गांधींच्या यात्रेत कमलनाथ यांनाही गोळ्या घातल्या जातील. राहुल गांधींनाही राजीव गांधींकडे पाठवले जाईल.

अन्य एका पानावर लिहिले आहे… नोव्हेंबर 2022 च्या शेवटच्या आठवड्यात इंदूर स्फोटांनी हादरेल. राजबाडाला विशेष लक्ष्य केले जाईल. पत्रात सर्वात खाली कुणीतरी ज्ञानसिंग यांचे नाव आहे. तसेच लेटरमध्ये अनेक मोबाइल क्रमांकही नमूद आहेत. पत्रासोबत एका आधार कार्डाची फोटोकॉपीही पाठवण्यात आली आहे.

बदला घेण्याची राजनीती राज्याला आणि देशाला मानवणारी नाही – खासदार सुप्रिया सुळे यांची फडणवीसांवर टिका

पुणे- बदल घडविण्याची राजनीती ठीक आहे पण होय मी बदला घेतला , असे बिनदिक्कत पणे माध्यमांना सांगत बदल घेण्याची राजनीती महाराष्ट्राला आणि देशाला मानविणारी निश्चित नाही, बदला घेण्याचे राजकारण सुरु झाले कि त्याला अंत राहत नाही हे लक्षात घेणाऱ्या महाराष्ट्रात हि बाब अजिबात भूषणावह नाही असे मत असे मत राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केले.

एखाद्या राजकीय कटुतेतून भारतीय जनता पक्षाचे नेते (उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता) ‘हाेय, मी बदला घेतला’ म्हणणे धक्कादायक हाेते. ज्या संस्कृतीत मी वाढले, जे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार माझ्यावर झाले, त्यानुसार विराेध हा वैचारिक असला पाहिजे. त्यात बदल्याची भाषा कधी नसते. राज्याच्या राजकारणात प्रथमच बदल्याची भाषा मी ऐकली व प्रसारमाध्यमात पाहिली अशा प्रकारे गाेष्टी करणे दुर्दैवी आहे, असे सुळे म्हणाल्या . त्या बारामती लाेकसभा मतदारसंघाचा दाैरा करताना पत्रकारांशी बाेलत होत्या.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नवाब मलिक, खासदार संजय राऊत यांच्यावर आतापर्यंत माेठा अन्याय झालेला आहे. त्यांचे कुटुंबीय कशाप्रकारे त्रासातून गेलेले आहे, हे मी जवळून पाहिलेले असल्याचे सुळे म्हणाल्या.

एखाद्या राजकीय कटुतेतून भारतीय जनता पक्षाचे एक माेठे नेते (उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता) ‘हाेय मी बदला घेतला’ म्हणणे धक्कादायक हाेते. ज्या संस्कृतीत मी वाढले, जे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार माझ्यावर झाले त्यानुसार विराेध हा वैचारिक असला पाहिजे. त्यात बदल्याची भाषा कधी नसते; राज्याच्या राजकारणात प्रथमच बदल्याची भाषा मी ऐकली आणि प्रसारमाध्यमात पाहिली. अशाप्रकारे गाेष्टी करणे दुर्देवी आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लाेकसभा मतदारसंघाचा दाैरा करताना पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले.

सुळे म्हणाल्या, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संर्दभात जी कारवाई करण्यात आली त्यातून राज्यातील राजकारण किती खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ झाले आहे, हे दिसून आले. अशाप्रकारे हीन दर्जाचे राजकारण मला कधी अपेक्षित नव्हते. परंतु दुर्देवाने तसे आपल्याकडे घडते.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल त्या म्हणाल्या, विराेधकांना आमच्या संर्दभात बाेलण्यासाठी काेणती गाेष्ट नसल्याने जुन्या गाेष्टी पुन्हा बाहेर काढून त्या उगळत बसल्या जातात. अनेकवेळा यासंर्दभात चर्चा झाली. परंतु निष्पन्न काही झाले नाही. खासदार संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेली कारवाई चुकीची हाेती.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसाठी पुण्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते शेगाव कडे रवाना.

पुणे-भारत जोडो यात्रेसाठी निघालेले काँग्रेस नेते खा. राहुल गांधी महाराष्ट्रात असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुणे शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होणार आहेत. सुमारे १००० पदाधिकारी व कार्यकर्ते आज काँग्रेस भवन येथून रवाना झाले. शेगाव येथील जिल्हा परिषदेच्या ग्राऊंडवर खा. राहुल गांधी यांची सभा होणार असून त्याच ठिकाणी पुण्याच्या ऐतिहासिक व स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित शक्ती स्थळांवरून गोळा केलेली माती व बोधीवृक्ष यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे हे राहुल गांधी व प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्त करून राहुल गांधी यांच्या हस्ते वृक्षारोपण करणार आहेत.यावेळी नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, संगीता तिवारी, सुजित यादव, राजेंद्र भुतडा, द. स. पोळेकर, उमेश कंधारे, संदिप मोकाटे, चैतन्य पुरंदरे, सेल्वराज ॲन्थोनी, भरत सुराणा, विश्वास दिघे, ॲड. भिवसेन रोकडे, गुलाम खान, फैय्याज शेख, स्वाती शिंदे, रेखा घलोत, वैशाली रेड्डी, प्राची दुधाने, पपिता सोनावणे, शिवानी माने, ज्योती चंदवेळ, इंद्रजीत भालेराव आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की,‘‘काँग्रेस नेते राहुल गांधी हे या देशातील धर्मभेद, जातीभेद व तिरस्कार मिटविण्यासाठी भारत जोडो यात्रा करीत आहेत. भाजपाने गेल्या आठ वर्षात देशामध्ये जे तोडण्याचे राजकारण केले आहे. त्यासाठीचे ही भारत जोडो यात्रा करीत आहेत. आम्ही देखील खारीचा वाटा म्हणून या यात्रेत सहभागी होत आहे.’’