लम्पी प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी स्वच्छ गोठाविषयक प्रशिक्षण द्या- जिल्हाधिकारी
पुणे, दि. १८: कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेच्या नियामक मंडळाची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (१७ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आली होती. लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या ठिकाणी आत्माच्या माध्यमातून स्वच्छ गोठा विषयावरील प्रशिक्षणाचे आयोजन करावे अशा सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
बैठकीस आत्माच्या प्रकल्प संचालक पूनम खटावकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुभाष काटकर आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आत्माच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. रेशीम विभागाच्या सहाय्याने जिल्ह्यात रेशीम उत्पादनवाढीसाठी तुती लागवडीचे क्षेत्र वाढवावे, याअनुषंगाने रेशीम उत्पादनाचे समुह तयार झालेल्या गांवामध्ये शैक्षणिक सहलीचे आयोजन करावे. सोयाबीन पिक वाढीसाठी पाणी फौंडेशनच्या मदतीने सोयाबीन पीक प्रात्यक्षिकांचे आयोजन करावे. कृषि विभाग, साखर कारखाने व आत्माच्या संयुक्त विद्यमाने ऊस पाचट व्यवस्थापन प्रशिक्षणांचे आयोजन करावे, आदी सूचना डॉ. देशमुख यांनी केल्या.
आत्माने बारामती, इंदापुर तालुक्यामध्ये ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने ऊस सुपरकेन नर्सरी विषयक प्रशिक्षण आयोजित करावे, डाळिंब पिकाच्या संरक्षणासाठी डाळिंब नेटचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती साठी प्रात्यक्षिके व प्रशिक्षणे आयोजित करावे, आदी सूचनाही बैठकीत करण्यात आल्या.
या सभेमध्ये प्रकल्प संचालक श्रीमती खटावकर यांनी आत्मा अंतर्गत खरीप हंगामामध्ये पूर्ण झालेले तसेच रब्बी हंगामातील नियोजित प्रशिक्षणे, प्रात्यक्षिके, शेतीशाळा आदींबाबत माहिती दिली.
बैठकीस जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक, सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, कृषि विज्ञान केंद्र, पणन विभाग, रेशीम विकास विभाग, पशुसंवर्धन विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.