पुणे-भारताच्या महिला माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांच्या १०५ व्या जयंती निमित्त आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास माजी नगरसेविका नीता रजपूत व ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना नीता रजपूत म्हणाल्या की, ‘‘एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या. १९६६ मध्ये त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत. इंदिरा गांधी सुरुवातीपासूनच स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय होत्या. बालपणी त्यांनी ‘बाल चरखा संघ’ स्थापन केला आणि असहकार चळवळी दरम्यान कॉंग्रेस पक्षाच्या मदतीकरिता १९३० मध्ये लहान मुलांच्या साथीने ‘वानर सेना’ देखील उभी केली होती. १९४७ साली इंदिरा गांधी यांनी महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतील दंगलग्रस्त भागात काम केले. इंधिरा गांधींनी आपल्या जीवनात अनेक क्षेत्रात लौकिक प्राप्त केला. त्यांना १९७२ मध्ये भारतरत्न पुरस्कार, १९७२ मध्ये बांगलादेश मुक्तीकरिता मेक्सिकन अकादमी पुरस्कार, १९७३ मध्ये एफएओ चे दुसरे वार्षिक पदक व १९७६ मध्ये नागरी प्रचारिणी सभेकडून साहित्य वाचस्पती (हिंदी) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. १९५३ साली इंदिरा गांधीं यांना अमेरिकेच्या ‘मदर’ पुरस्काराने, मुसद्देगिरीतील उत्कृष्ट कार्याबद्दल इटलीने ‘इसाबेला डी’इस्टे’ पुरस्कार व येल विद्यापीठाने हाउलंड मेमोरियल पुरस्कार देऊन गौरविले. अशा या आर्यन लेडी म्हणून कायम जगामध्ये व विशेषत: भारतीयांच्या मनामध्ये सदैव राहतील.’’
यावेळी शेखर कपोते, लतेंद्र भिंगारे, अनिस खान, मनोहर गाडेकर, हमीद इनामदार, संजय नांगरे, चंद्रकांत नार्वेकर, भारत इंगुले, संगीता शिरसाट, भास्कर कांबळे, आप्पा गायकवाड आदी उपस्थित होते.
इंदिरा गांधी यांच्या १०५ व्या जयंती निमित्त अभिवादन.
ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन….
मुंबई-सत्तरच्या दशकात दूरदर्शनवर गोड हसरा चेहरा आणि आपल्या मधाळ आवाजातील निवेदनाने फुल खिले है गुलशन गुलशन हा कार्यक्रम गाजवणाऱ्या अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबियांनाही धक्का बसला आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल या ७८ वर्षांच्या होत्या. ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या शोमधून तबस्सुम विशेष लोकप्रिय झाल्या होत्या. दरम्यान २१ नोव्हेंबर रोजी मुंबईतील सांताक्रूझ याठिकाणी त्यांच्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे.तबस्सुम या प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘रामायण’मध्ये रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांच्या वहिनी आणि आणि विजय गोविल यांच्या पत्नी आहेत. तबस्सुम यांनी टॉक शोच्या होस्ट म्हणून विशेष लोकप्रियता मिळवली. त्या एक युट्यूबरही आहेत. दरम्यान तबस्सुम यांनी आपल्या करिअरची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती. त्यावेळी त्यांना प्रेमाने बेबी तबस्सुम म्हटले जायचे.
१९४७ साली बालकलाकार म्हणून तबस्सुम यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली. १७७२ ते १९९३ या सलग २१ वर्ष चालणाऱ्या दुरदर्शन वाहिनीवरील ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या कार्यक्रमाचे त्यांनी सुत्रसंचलन केले होते. वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांनी कॅमेऱ्यासमोर उभे राहून त्यांनी नर्गिस चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर बैजू बावरा चित्रपटातही त्यांनी मीना कुमारी यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. ‘तला’, ‘हिर रांझा’,’गॅम्बलर’, ‘जानी मेरा नाम’, ‘तेरे मेरे सपने’, ‘सूरसंगम’, ‘अग्निपथ’,’नाचे मयुरी’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी काम केले
Veteran actor Tabassum Govil no more
— ANI Digital (@ani_digital) November 19, 2022
Read @ANI Story | https://t.co/aNrQwhVCOi#TabassumGovil #Tabassum pic.twitter.com/89GOQuKKb0
9 जुलै 1944 रोजी अयोध्येमध्ये तबस्सुम यांचा जन्म झाला.
तबस्सुम गोविल यांनी लहान वयातच इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. कमी वयातच त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले. त्यांनी 40 आणि 50 च्या दशकात बालकलाकार म्हणूनही अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे., ज्यात ‘बहार’ आणि ‘जोगन’ सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी टीव्हीच्या दुनियेतील पहिला टॉक शो सुरू केला.या शोमध्ये त्यांनी सिने जगताशी संबंधित लोकांशी खास संवाद साधाला. या शोला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आणि याच कारणामुळे तबस्सुमचा शो दूरदर्शनवर एक-दोन वर्षे नाही तर तब्बल 21 वर्षे प्रसारित झाला.
‘वसुधैव कुटुंबकम’ हीच भारताची भूमिका : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 19 : ‘वसुधैव कुटुंबकम’ हीच भारताची भूमिका राहिली आहे. अशा या भारतातील आणि भारताच्या आर्थिक राजधानीतील मुंबईच्या कुटुंबात आपले स्वागत आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मध्य आशियाई देशांतील तरुण- तरुणींच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले.
मध्य आशियाई देशांबरोबरील संबंधांना झालेली तीस वर्षे आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या देशांमधील तरुणांचा आदान- प्रदान सोहळा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसार मध्य आशियातील किरगिझस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, कझाकस्तानमधील शंभरावर तरुण-तरुणी आज मुंबई शहराच्या भेटीवर आले होते. या शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कझाकिस्तानच्या अलबोल्सियन ओराकबायेवा, किरगिझिस्तानचे तालबेक बेरदेव, ताजिकिस्तानचे अलिशेर असलुद्दीन, उझबेकिस्तानचे आयस्लोम ओकुनोव्ह उपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले, भारत आणि मध्य आशियाई देशांमध्ये अनेक शतकांपासून राजनैतिक, व्यापार, सांस्कृतिक संबंध आहेत. या शिष्टमंडळाच्या भेटीमुळे हे संबंध आणखी दृढ होतील. भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. या अर्थव्यवस्थेत मुंबईसह महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. मुंबईची भारताच्या आर्थिक राजधानीबरोबरच मनोरंजन क्षेत्राची राजधानी म्हणूनही ओळख आहे. मुंबई शहर हे तरुणांच्या स्वप्नपूर्तीसाठी नेहमीच मदत करणारे शहर आहे.’
यावेळी शिष्टमंडळातील श्रीमती अलबोल्सियन ओराकबायेवा, तालबेक बेरदेव, अलिशेर असलुद्दीन, आयस्लोम ओकुनोव्ह यांनी मनोगत मांडले. त्यांनी सांगितले, की भारत सुंदर देश आहे. मध्य आशियाई देशांबरोबर भारताचे संबंध सौहार्दपूर्ण राहिले आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील मध्य आशियाई देशांमधील सांस्कृतिक आदान- प्रदान, तरुणांच्या शिष्टमंडळाच्या भेटीचा उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. भारत आणि मुंबई शहराची भेट आमच्या कायमच आठवणीत राहील. मुंबई शहर स्वप्नपूर्ती करणारे शहर आहे. ते बॉलिवूडमुळेही आमच्या परिचयाचे आहे. भारत आणि मुंबईला दिलेला भेटीचा अनुभव अनमोल राहील, असेही या तरुणांनी सांगितले.
भारत सरकारचे अवर सचिव रवीकुमार सिन्हा यांनी तरुणांच्या शिष्टमंडळाच्या दौऱ्याविषयी माहिती दिली. मुंबई शहरचे जिल्हा क्रीडाधिकारी अभय चव्हाण, केंद्र सरकारमधील सहायक कक्ष अधिकारी निरज पुजारी आदी उपस्थित होते. शिष्टमंडळ दोन दिवस मुंबई दौऱ्यावर राहणार असून ते विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळांना भेट देणार आहेत.
ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डी.लिट पदवी प्रदान
औरंगाबाद, दि.19, :- युवकांनी आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी तसेच देश विश्वगुरू होण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 62 व्या दीक्षांत समारंभाप्रसंगी राज्यपाल बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार शरद पवार, पद्मभुषण डॉ.विजय भटकर, कुलगुरू डॉ.प्रमोद येवले आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती होत आहे. विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा तसेच मुल्यांच्या विकासावरही भर देणे गरजेचे आहे. नव्या शैक्षणिक धोरणात सर्वच बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विज्ञानासोबतच संगीत शिकण्याची संधी देखील उपलब्ध झाली आहे. स्नातकांनी महापुरूषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे.

देश जागतिक पातळीवर प्रगतीकडे झेप घेत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीबाबत जाणून घेण्यासाठी राज्यातील अनेक कुलगुरू इतर देशात तसेच इतर देशातील कुलगुरू आपल्या राज्यात आले आहेत. या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील विचारांची देवाण घेवाण होण्यास मदत झाली आहे. स्नातकांनी आपले ध्येय सुनिश्चित करुन ध्येय पूर्ण करण्यासाठी सातत्याने काम करावे. राष्ट्रसेवेचा संकल्प करावा व समाज परिवर्तनासाठी पुढे यावे असे आवाहन राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात ‘हर घर शौचालय’ संकल्प केला. तसेच देशातील प्रत्येक नागरिकाचे बँकेत खाते असावे यासाठी खाते उघडण्याची मोहीम देशभर राबविली व ही मोहीम देशभर यशस्वी झाली. देश विविध क्षेत्रात प्रगती करत आहे. यामध्ये प्रत्येक घटकाने आपला सहभाग देण्याची गरज आहे. आज देशात रस्त्यांचे जाळे निर्माण करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व शेती क्षेत्रात विशेष कामगिरी केलेले ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना डी.लिट पदवीने सन्मानित करण्यात आले ही अभिमानास्पद बाब असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
प्रगतीशील, समृद्ध व संपन्न समाजाच्या निर्मितीसाठी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची–गडकरी
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, प्रगतीशिल, समृद्ध व संपन्न समाजाच्या निर्मितीसाठी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची आहे. शैक्षणिक क्षेत्रात गुणात्मक परिवर्तन व त्या भागातील सर्वांगिण विकासासाठी विद्यापीठाचे योगदान महत्त्वाचे आहे. प्रगतीशील मराठवाड्यासाठी विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची ठरणार असून शैक्षणिक क्षेत्रासोबतच विकासाची दिशा भविष्यातील पिढीला देणारे केंद्र विद्यापीठ असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यापीठ हे एक ज्ञानशक्ती केंद्र आहे. विद्यापीठाने त्या भागातील विविध क्षेत्रातील संशोधनातही अग्रेसर असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठालगत 36 तलाव बांधले गेले. त्यातुन 80 गावातील दुष्काळ मिटला. विद्यापीठाने सामाजिक, आर्थिक परिवर्तनासाठी योगदान देण्याची गरज आहे. स्नातकांनी आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी तसेच शैक्षणिक तसेच आपल्या परिसरातील सर्वांगिण विकासासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
पद्मभूषण डॉ.विजय भटकर म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. यामध्ये उच्च शिक्षण प्रादेशिक भाषेतून देण्याबाबत अंतर्भाव करण्यात आला आहे. विद्यापीठ, शाळा, शैक्षणिक पद्धती अत्यंत महत्वाची आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात कल आहे. भारतातील अनेक विद्यार्थी जगभरात कार्यरत आहेत. देशाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून यामुळेच भारत जगातील आर्थिकदृष्ट्या सक्षम राष्ट्र म्हणून पुढे येईल.
ज्येष्ठ नेते खा. शरद पवार म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातही औरंगाबाद पुढे येत आहे. नवीन पिढीला आंतरराष्ट्रीय पातळीवर दालने खुले करुन देण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा. शैक्षणिक क्षेत्रासोबतच मराठवाड्यातील शेतीक्षेत्रही बदलू लागले आहे. मराठवाड्यात वाढू लागलेल्या ऊस शेतीला चालना देण्याचा आपला प्रयत्न आहे. वसंतराव नाईक शुगर इन्स्टिट्युटच्या माध्यमातून जालना येथे शेती, उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्रात संधी देणारी संस्था लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची वाटचाल, उपक्रम, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी तसेच दीक्षांत समारंभाच्या आयोजनाबाबत कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी माहिती दिली.
यावेळी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व खा. शरद पवार यांना डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.भगवान साखळे, परीक्षा मुल्यमापन मंडळाचे डॉ.गणेश मंझा तसेच विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता तसेच स्नातक उपस्थित होते.
विद्यापीठ विकास मंचचे सर्व उमेदवार विजयी होणार – राजेश पांडे
पुणे-नुकत्याच पार पडलेल्या पुणे, नाशिक, मालेगाव आणि अहमदनगर येथील पदवीधर मेळाव्यांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभेच्या पदवीधर निवडणुकीसाठी विद्यापीठ विकास मंचचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास मंचचे समन्वयक राजेश पांडे यांनी आज पुण्यात बोलतांना व्यक्त केला.
विद्यापीठ विकास मंचने नुकतेच नाशिक, मालेगाव, पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर येथे पदवीधर मेळाव्यांचे आयोजन केले होते. मेळाव्यातील प्रतिसादाबद्दल बोलतांना पांडे म्हणाले “आमच्या विद्यापीठ विकास मंचाच्या व्यासपीठावर राजकीय पक्षांचा हस्तक्षेप आम्ही खपवून घेत नाही. संस्थाचालक गटातील पाचही जागा विद्यापीठ विकास मंचाने बिनविरोध जिंकल्या. या धक्क्यातून महाविकास आघाडीचे तथाकथित नेते सावरू शकलेले नाहीत. त्यांचे मनोधैर्य खचलेले आहे, हे मतदारांच्या लक्षात येते आहे. विद्यापीठ विकास मंचचे संपूर्ण पॅनेल निवडून येणार आहे. कारण पाच वर्षांत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्वच्छ, दूरदृष्टीचा, विद्यार्थीहिताचा कारभाराचा आदर्श आम्ही उभा केला आहे. महाविकास आघाडी म्हणून जे लोक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राजकारण घुसवू पाहात असतील, त्यांना विद्यापीठाचा सुशिक्षित मतदार धडा शिकवेल हे नक्की.”
विद्यापीठ विकासाकडे महाविकास आघाडी सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले असा आरोप करत पांडे यांनी सिनेटने विद्यापीठात विद्यार्थी केंद्रित निर्णय कसे घेतले याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले “कोरोनाकाळात महाविकास आघाडी सरकार निर्णय घेण्यात टाळाटाळ करत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आम्ही शुल्कवाढीबाबत विद्यार्थीहिताचे निर्णय घेतले. संलग्न महाविद्यालयांच्या शुल्कात २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी कपात केली आहे. विद्यापीठे, महाविद्यालये बंद असल्याने वापरण्यात न आलेल्या विविध शैक्षणिक सुविधांच्या शुल्कात २५ ते १०० टक्के शुल्क कपात लागू केली. या निर्णयामुळे पदवी, पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रमांना शिकणाऱ्या सात लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.”
पांडे पुढे म्हणाले “कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या पाल्यांचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. विद्यापीठाने कतारमधील दोहा शहरात स्थानिक शैक्षणिक संस्था आणि प्रशासनाशी समन्वय साधत रोजगाराभिमुख पदवी अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्गांना सुरूवात केली आहे. परदेशात अभ्यासक्रम सुरू करणारे हे देशातले पहिले विद्यापीठ ठरले. याशिवाय उपकेंद्रांची स्थापना केली. ज्यातील नाशिक येथील उपकेंद्र कार्यान्वितही झाले आहे. विद्यापीठाच्या कारभाराची काडीचीही माहिती नसलेल्या लोकांनी अधिसभेच्या निवडणुकीचे निमित्त करून आरोपांची राळ उडवून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बदनामी करायची, हा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही.”
मतदार याद्यांचा घोळ
यावेळी पांडे यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या कारभारावरही टीका केली. ते म्हणाले, “मेळाव्यात अनेक ठिकाणी आम्हाला मिळालेल्या फीडबॅकनुसार मतदार याद्यांमध्ये भरपूर घोळ आहे. पदवीधर मतदारांची नावं आणि केंद्र यांचा ताळमेळ लागत नाहीये. विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ बेजबाबदार कारभारामुळे पदवीधर मतदारांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.”
पुन्हा अपयशाच्या भीतीने जगतापांचे बेछूट आरोप, जगताप यांचा सुनेत्रा पवारांसारख्या जाणकारांवर विश्वास नाही का ?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलेले आरोप वाचनात आले. या निवडणुकीत जगताप यांनी पॅनेल उभे केले आहे. त्या पॅनेलचा पराभव समोर दिसत असल्याने जगताप यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
जगताप यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एकाधिकारशाही आणि भ्रष्टाचार झाल्याचा बेजबाबदार आरोप केला. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात अडीच वर्षे होते. सुनेत्राताई पवार यांच्यासारखे अनुभवी सदस्य अधिसभेवर होते. एकाधिकारशाही आणि भ्रष्टाचार झाला असता, तर सरकार, सुनेत्राताईंसारखे अनुभवी सदस्य गप्प राहिले असते का? सरकार डोळे मिटून कारभार पाहात होते, असे जगताप यांना म्हणायचे आहे का? सरकार आणि अनुभवी सदस्यांच्या कार्यक्षमतेवर जगतापांचा विश्वास नाही का?
बिनबुडाचे आरोप करायचे आणि नंतर ‘तडजोडी’ करायच्या असे जगतापांचे महापालिकेतील राजकारण आहे. हेच राजकारण ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आणू इच्छितात, असे त्यांच्या आरोपांवरून दिसते आहे.
जगताप पुण्याचे महापौर असताना २०१७ मध्ये त्यांच्या पक्षाची सत्ता गेली. तेव्हापासून त्यांना पक्षाने अडगळीत टाकले होते. आता अधिसभा निवडणुकीचे प्रमुखपद त्यांच्याकडे आहे आणि या निवडणुकीत पराभव होणार असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे. अपयशाच्या पुनरावृत्तीने अस्वस्थ होऊन त्यांनी बेछूट, बेजबाबदार आरोप चालविले आहेत.
विद्यापीठ विकास मंचच्या जाहीरनाम्यातले मुद्दे :
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पारदर्शक पद्धतीने अंमलात आणण्यासाठी कटीबद्ध.
रोजगारभिमुख शिक्षण, शिकाऊ उमेदवारी व निवड योजनेच्या विकासाला गती देणे.
विद्यापीठात अद्यावत क्रीडा सुविधा निर्माण करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील असे वातावरण रुजवणे.
विद्यापीठातील प्राध्यापक भरती करून शैक्षणिक व्यवस्था मजबूत करणे.
नवे व उत्तम कॅम्पस तयार करण्यासाठी योगदान देणे.
खुल्या विद्यार्थी निवडणुका सुरू करून त्यात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करणे.
अभ्यासक्रमात कलानुरूप बदल करण्यासाठी प्रयत्न करणे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकनांमध्ये अधिक उच्च दर्जासाठी प्रयत्न करणार.
उद्योग – शेतीपुरक नवनवीन अभ्यासक्रम आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम करून देणार.
संशोधनासाठी अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणार.
स्टार्टअपसाठी विशेष कार्यक्रम घेऊन, त्यातून युवकांना उद्योग व्यवसायात अधिक संधीसाठी प्रयत्न करणार.
सांस्कृतिक आणि क्रीडा व्यवस्था अधिक सक्षम करणार.
विद्यार्थी आणि विद्यार्थिनी साठी स्वतंत्र वसतिगृहांच्या संख्येत वाढ करणार.
विद्यापीठ विकास मंच: आवाहक
डॉ गजानन एकबोटे, डॉ राजेंद्र विखे पाटील, ॲड एस के जैन, राजेश पांडे, डॉ अपूर्व हिरे, ॲड नितीन ठाकरे, डॉ सोमनाथ पाटील, डॉ सुधाकर जाधवर, हेमंत धात्रक, प्रशांत साठे, एन डी पाटील
मार्केट यार्ड फायरिंग :दरोडा प्रकरणात आणखी दोघांना पकडले
पुणे-पुण्यातील मार्केट यार्ड येथील पी.एम. कुरिअर कंपनीच्या कार्यालयात शिरुन चोरट्यांनी गोळीबार करत तब्बल 27 लाख 45 हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना 12 नोव्हेंबर रोजी दुपारी घडली होती.या गुन्ह्यातील फरार दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट-3 च्या पथकाने अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 2 पिस्तुल जप्त करण्यात आले आहेत. त्यापैकी एका पिस्तुल मधून गोळीबार करण्यात आला होता.
संतोष बाळू पवार (वय-23 रा. पानशेत रोड, खानापुर, ता. हवेली), साई राजेंद्र कुंभार (वय-19 रा. समाज मंदिराजवळ, खानापुर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 80 हजार रुपये किमतीची दोन गावठी पिस्तुल जप्त करण्यात आले आहेत. गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने ही कारवाई गंगाधाम परिसरातील महाराष्ट्र गॅरेज जवळ असलेल्या रोडवर शुक्रवारी (दि.18) केली.
गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी अभिलेखावरील गुन्हेगार चेक करत असताना पोलीस अंमलदार राकेश टेकावडे यांना मार्केट यार्ड गोळीबार प्रकरणातील तीन आरोपी गंगाधाम परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन पिस्तुल जप्त केले. जप्त केलेल्या पिस्टलबाबत आरोपींकडे चौकशी केली असता, संतोष पवार याने हे पिस्तुल जळगाव येथून आणून साई कुंभार याच्याकडे ठेवण्यासाठी दिल्याचे निष्पन्न झाले.
जप्त केलेल्या दोन पिस्तुल पैकी एका पिस्टलमधून आरोपींनी फायरिंग केले होते. गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी आले होते. पुढील तपासासाठी आरोपींना मुद्देमालासह मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. संतोष पवार याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर साई कुंभार याच्यावर आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस अंमलदार संतोष क्षिरसागर, रामदास गोणते, शरद वाकसे, किरण पवार,प्रकाश कटटे, ज्ञानेश्वर चित्ते, दिपक क्षिरसागर, साईनाथ पाटील, सतिश कत्राळे, प्रताप पडवाळ, राकेश टेकावडे,सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने केली.
‘कोरा कॉकटेल बार अँड किचन हॉटेल’वर गुन्हे शाखेची कारवाई
पुणे- कोरेगाव पार्क परिसरात रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम लावुन संगित वाजवणाऱ्या ‘कोरा कॉकटेल बार अँड किचन हॉटेल’वर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे.
पोलिसांनी हॉटेलमधून साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त केले आहे. ही कारवाई केली.कोरेगाव पार्क परिसरातील ‘कोरा कॉकटेल बार अँड किचन हॉटेल’ मध्ये मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने छापा टाकला असता मोठ्या आवाजात संगित सुरु असल्याचे आढळून आले. पोलिसांनी हॉटेलवर कारवाई करुन 1लाख 80 हजार रुपये किमतीचे साऊंड सिस्टिमजप्त केले. पोलिसांनी हॉटेलवर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत ध्वनी प्रदुषण अधिनियमानुसारकारवाई केली.
जप्त केलेला मुद्देमाल कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने केली.

दक्षिण मुंबईतील ३० वर्ष जुन्या म्हाडा इमारतींच्या पुनर्विकास होणार
भाजपा म्हाडा सेल व म्हाडा संघर्ष कृती समितीच्या पाठपुराव्याला अखेरीस यश
मुंबई:
भाजपा म्हाडा सेल व म्हाडा संघर्ष कृती समिती सदस्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे
दक्षिण मुंबईतील ३० वर्ष जुन्या म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आला.
याबाबतची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात खा. राहुल शेवाळे, भाजपा म्हाडा सेल व म्हाडा संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पार पडली.
मुंबईकरांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवत या पुनर्रचित इमारतीतील रहिवाश्यांना न्याय दिला आहे. या बैठकीत ३३ (२४) कलमात आवश्यक त्या सुधारणा करुन एक आठवड्यात अध्यादेश जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी तशाप्रकारचे निर्देश बैठकीमध्ये उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. या निर्णयामुळे दक्षिण मुंबईतील सुमारे ३८८ इमारतीतील ५०,००० कुटुंबाना मुख्यमंत्र्यानी न्याय देवून त्यांच्या घराचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया भाजपा मुंबई म्हाडा सेलचे मिलिंद तुळसकर यांनी दिली. या बैठकीला दक्षिण मुंबई अध्यक्षा विनिता राणे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
जागतिक शौचालय दिन २०२२ च्या पूर्वसंध्येला आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत पर्यटन मार्गांवर- राष्ट्रीय उद्याने येथे इंधन स्थानकांमध्ये स्वच्छ आणि आरोग्यदायी स्वच्छतागृहे
मुंबई/नवी दिल्ली, : ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी आज पर्यटन मार्गांवर – राष्ट्रीय उद्यानांवरील त्यांच्या इंधन केंद्रांवर स्वच्छ आणि आरोग्यदायी शौचालये उभारण्याचा # ड्राईव्ह फ्रेश उपक्रम सादर करत असल्याची घोषणा केली आहे.
जागतिक शौचालय दिनाच्या पूर्वसंध्येला (१९ नोव्हेंबर) तीन ओएमसी तर्फे कान्हा, ताडोबा, बांधवगड, पेंच, सुंदरबन, मानस, रणथंबोर आणि इतरांसह प्रमुख राष्ट्रीय उद्यानांकडे जाणाऱ्या १९१ रिटेल आऊटलेट्समध्ये # ड्राईव्ह फ्रेश उपक्रमांतर्गत स्वच्छ आणि आरोग्यदायी स्वच्छतागृहांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्हर्च्युअल परिषदेद्वारे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री श्री. हरदीप सिंग पुरी, ईशान्य क्षेत्राचे माननीय सांस्कृतिक, पर्यटन आणि विकास मंत्री श्री गंगापुरम किशन रेड्डी आणि भारत सरकारचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि श्रम आणि रोजगार राज्यमंत्री माननीय श्री रामेश्वर तेली उपस्थित होते.
आझादी का अमृत महोत्सव मोहिमेअंतर्गत पर्यटक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांना अधिकाधिक चांगला अनुभव देत हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
ओएमसीची आयओसीएल, बीपीसीएल आणि एचपीसीएलची इंधन केंद्रे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक आणि इतरत्र देशभर पसरलेली आहेत.
वृंदावनमधील १६ ओएमसी रिटेल आऊटलेट्स आणि गोव्यातील १२ रिटेल आऊटलेट्समध्ये पर्यटकांना सर्वोत्कृष्ट दर्जाच्या सुविधा देण्यासाठी स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुधारित स्वच्छतागृहे आधीपासून सुरू करण्यात आली आहेत. पुरुष आणि स्त्रियांच्या स्वच्छतागृहांमध्ये फरक दाखविणारी ठळक चिन्हे आहेत, चांगले प्रकाशमान आहेत, पाण्याची उपलब्धता आहे, लॅचिंगची योग्य सोय आहे आणि ती स्वच्छ आणि आरोग्यदायी स्थितीत ठेवली जातात.
देशातील राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्ये ही ड्रायव्हिंगची खूप लोकप्रिय ठिकाणे आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक वैयक्तिक वाहनांमधून आणि पर्यटक बसमधून प्रवास करतात आणि इंधन भरण्यासाठी तसेच सुविधांच्या वापरासाठी महत्त्वाचे थांबण्याचे ठिकाण आहेत हे लक्षात घेऊन हा #DriveFresh उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
गावांच्या विकासात सरपंचांनी कृतीशील विचारांनी नेतृत्व करावे – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार
एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसदेचा महाराष्ट्र राज्य पदाधिकारी अधिवेशन आणि नियुक्तीपत्र व ओळखपत्र वितरण सोहळा संपन्न.
पुणे, दि. १९ नोव्हेंबर: राष्ट्रविकासाच्या प्रक्रियेमध्ये गावाचा विकास सर्वांत महत्त्वाचा आहे. पंचायत ते पार्लमेंट या प्रवासात सरपंच हा लक्षणीय महत्त्वाचा घटक आहे. सरपंच हे केवळ एक पद नाही, सरंपच हा सर्वसामान्यांचा विश्वास आणि सन्मान आहे. गावाच्या विकासात सरपंचांनी कृतीशील विचाराने कार्यरत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसद महाराष्ट्र राज्य पदाधिकारी अधिवेशन, नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र वितरण सोहळ्याच्या उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, अभिनव फार्मर्स क्लबचे संस्थापक ज्ञानेश्वर बोडके, सरपंच संसदचे सहसमन्वयक प्रकाश महाले आदी पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. भारती पवार व राहुल कराड यांच्या हस्ते राज्यातील विविध जिल्ह्यांतील संयोजक, संघटकांचा नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.
डॉ. पवार म्हणाल्या, गावाच्या विकासात सरपंचांची भूमिका महत्वाची आहे. सरपंचांनी गावाचे नेतृत्व करत असताना केंद्राच्या व राज्याच्या विविध योजना प्रभावीपणे समजून घेऊन गावकर्यांपर्यंत पोचवणे आवश्यक आहे. सरपंच हे केवळ पद नाही, तर कृतीशील नेतृत्वाची अपेक्षा त्यामागे आहे. त्यातूनच गावाची प्रगती होणार आहे.
गावे प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करू लागली, की राष्ट्रविकासाची संकल्पना साकार होणार आहे. गावापासून केंद्रापर्यंत सर्व घटक एका ध्येयाने एकत्र आले, की कोणती किमया घडू शकते, याचे उदाहरण आपण कोरोना संकटात जगासमोर ठेवले आहे. तसाच समन्वयाचा, एकत्रित कृतीशीलतेचा विचार सरपंचांनी गावागावांतून पोचवल्यास अपेक्षित राष्ट्रविकास घडून येईल.
गावाच्या विकासप्रक्रियेत महिलांचे योगदान अनन्यसाधारण असून, आरोग्य, शिक्षण या घटकांवर अधिक भर देणे आवश्यक आहे. त्यासाठी जाणीवजागृतीचे कार्य सरपंचांनी करावे. अन्य प्रशासकीय यंत्रणा त्यांना मार्गदर्शन करण्यास सज्ज आहेत. विकासाच्या वाटा, प्रगतीचे मार्ग घेऊन आपणच प्रत्येक समाजघटकापर्यंत पोचणे महत्त्वाचे आहे, असेही डॉ. पवार म्हणाल्या.
राहुल कराड म्हणाले, देशाच्या विकासाची प्रक्रिया अधिक गतीमान करायची असेल तर एमआयटी सारख्या सामाजिक बांधीलकी जपणार्या शिक्षणसंस्थांनी पुढाकार घेणे आणि अशा प्रयत्नांचे नेतृत्व करणे आवश्यक वाटले, या भूमिकेतून राष्ट्रीय सरपंच संसद हा उपक्रम सुरू केला आहे. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, भारतीय छात्र संसद, राष्ट्रीय सरपंच संसद, राष्ट्रीय शिक्षण परिषद हे उपक्रम त्याचाच एक भाग आहेत. शिक्षण एकांगी न राहता, ते समाजाच्या प्रत्येक घटकाशी, त्याच्या समस्यांशी, प्रगतीशी जोडले जावे, हा आमचा प्रयत्न आहे. येथील शिक्षणातून समाजाप्रती संवेदनशील आणि कृतीशील नागरिक घडावेत, हा उद्देश आहे.
राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. प्रसाद सानप यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.नीलम पंडित यांनी आभार मानले.
ऐतिहासिक वास्तू, किल्ल्यांच्या जतनकार्याला आवश्यक निधी देऊ- पालकमंत्री
पुणे, दि. १९: छत्रपतींचा स्वराज्याचा आणि देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास जनतेसमोर उभा करण्याचे काम पुरातत्व विभागाकडून व्हावे. शासन ऐतिहासिक वास्तू, किल्ल्यांच्या जतनकार्याबाबतीत अतिशय गंभीर असून त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले.
पुरातत्व विभाग पुणे प्रादेशिक कार्यालयामार्फत जागतिक वारसा सप्ताहानिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कलादालन कोथरूड येथे आयोजित राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन व दुरुस्ती कामांचे छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, पुणे महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे आदी उपस्थित होते.

जुन्या वारशाचे शोधकार्य करणे, त्याचे जतन करणे आणि अभिमान म्हणून समोर मांडणे हे काम या प्रदर्शनातून होईल असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यातील मजबूत, सुरक्षित किल्ल्यांचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जाते. ते समोर आणण्याचे काम विभागाने करावे. या विषयाबद्दल समाजात कुतूहल असून या क्षेत्रात अजून खूप शोध घेऊन काम करण्याची गरज आहे.
बांधकामास घाईत परवानगी दिल्यास पुराण कालीन वास्तू, वस्तूंच्या जतनकार्यास बाधा येईल. त्यामुळे परवानगी देताना पुरातत्व विभागाने आवश्यक वेळ घेणे स्वाभाविक आहे. असेही पालकमंत्री म्हणाले.
यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगडाचे संरक्षण व जतनचे कामाच्या माहितीपटाचे अनावरण करून लघुचित्रफीत दाखवण्यात आली. २८ ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन व त्याची माहिती असलेले पुस्तक पालकमंत्री श्री. पाटील यांना देऊन डॉ. वाहणे यांनी त्यांचे स्वागत केले.
या प्रदर्शनात राज्य संरक्षित स्मारके, गड किल्ले यांचे जतन व दुरुस्ती कामांची छायाचित्रे, किल्ल्यांचे त्रिमितीय रेखांकन (थ्री डी मॅपिंग) यांची छायाचित्रे, आराखडे पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सरकारने स्टीलवरील निर्यात शुल्क मागे घेतले
नवी दिल्ली- केंद्र सरकारने 22 मे, 2022 पूर्वी प्रचलित असलेली स्थिती कायम ठेवून 58% लोह मात्रा असलेली लोह सामग्री, लोह धातूच्या गोळ्या आणि पिग आयर्नसह, निर्दिष्ट स्टील उत्पादनांवरील निर्यात शुल्क मागे घेतले आहे. अँथ्रासाइट/पीसीआय कोळसा, कोकिंग कोळसा, कोक आणि सेमी कोक आणि फेरोनिकेलवरील आयात शुल्क सवलतीही मागे घेण्यात आल्या आहेत.
अशा प्रकारे, 19 नोव्हेंबर 2022 पासून खालील प्रमाणे शुल्क लागू होईल –
- 58% पेक्षा अधिक लोखंडाची मात्रा असलेल्या (< 58%Fe) लोखंडाच्या गुठळ्या आणि दंड याच्या निर्यातीवर शून्य निर्यात शुल्क लागू होईल.
- 58% पेक्षा कमी लोखंडाची मात्रा असलेल्या (58% Fe >) लोहखनिज गुठळ्या आणि दंडाची निर्यात केल्यास 30% नी कमी निर्यात शुल्क लागू होईल.
- लोखंडाच्या गोळ्यांच्या निर्यातीवर शून्य निर्यात शुल्क लागू होईल.
- पिग आयर्न आणि स्टील उत्पादनांच्या निर्यातीवर पुढील प्रमाणे वर्गीकृत केलेल्या HS 7201, 7208, 7209, 7210, 7213, 7214, 7219, 7222 आणि 7227 उत्पादनांवर शून्य निर्यात शुल्क लागू होईल
- अँथ्रासाइट/पीसीआय आणि कोकिंग कोळसा आणि फेरोनिकेलवर २.५% आयात शुल्क लागू होईल.
- कोक आणि सेमी कोकवर ५% आयात शुल्क लागू होईल.
मे, 2022 मध्ये, स्टीलच्या किमतीत तीव्र आणि सततची वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच तयार पोलाद आणि स्टील उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल किंवा लागणारी इतर सामग्री या दोन्हींची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला दर निश्चिती संबंधी अनेक उपाय केले. 22 मे, 2022 पासून, 58% पेक्षा जास्त लोह मात्रा असलेल्या लोह धातूच्या गुठळ्यांवरील निर्यात शुल्क 30% वरून 50% पर्यंत वाढविण्यात आले; 58% पेक्षा कमी लोहाची मात्रा असलेल्या लोह खनिजावर 50% निर्यात शुल्क लावण्यात आले; लोखंडाच्या गोळ्यांवर 45% एवढे निर्यात शुल्क लावण्यात आले; पिग आयरन (HS 7201, 7208, 7209, 7210, 7213, 7214, 7219, 7222, 7227) सह मिश्रधातू आणि नॉन-अलॉय स्टीलच्या विविध प्रकारांवर 15% पर्यन्त ऍड व्हॅलोरेम निर्यात शुल्क लादण्यात आले आणि पीसीआय कोळसा, कोकिंग कोळसा, कोक आणि सेमी कोक आणि फेरोनिकेल उत्पादनांच्या आयात शुल्कावर सूट देण्यात आली.
सध्याच्या या उपाययोजनांमुळे देशांतर्गत पोलाद उद्योगाला चालना मिळेल आणि निर्यातीलाही चालना मिळेल.
***
आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी देणार-पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील
पुणे: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सकाळी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराला भेट देऊन माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटींचा निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त विकास ढगे-पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, उप विभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, नगर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश जाधव आदी उपस्थित होते.
महसूल मंत्री असताना मंदिर परिसरातील जागेचा प्रश्न सोडविण्याची संधी मिळाली हे आपले भाग्य असल्याचे नमूद करून पालकमंत्री पाटील म्हणाले, आळंदी देवस्थानच्या जमिनींवर शासनाकडून गायरान जमिनीचा शेरा दिल्याने जागेच्या विकासावर मर्यादा आल्या. महसूल मंत्री असतांना समितीच्या सदस्यांनी हे निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ वारकरी बांधवांच्या सुविधेसाठी ४०० एकर जमीन देवस्थानला देण्याचा निर्णय घेतला. या जागेच्या विकासासाठी २०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यास पुणे महानगर विकास प्राधिकरणाची मान्यता घेण्यासाठी प्रशासनाशी चर्चा करण्यात येईल.
आराखड्यातील कामे करण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल. पहिल्या टप्प्यात भक्त निवास, वारकऱ्यांच्या राहुट्या उभारण्यासाठी ओटे आणि आभासी (व्हर्चुअल) वारीसाठी २५ कोटींचा निधी देण्यात येईल. व्हर्चुअल वारीमुळे पंढरपूरला जाऊ न शकलेल्या वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन घेता येईल. संस्थानने त्याचे डिझाईन त्वरीत तयार करावे. नगर परिषदेच्या माध्यमातून ही कामे करण्यात येतील. पुढील टप्प्यात रुग्णालय व इतर कामांचादेखील समावेश करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वारकरी आळंदीत येतात. ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी जगणाऱ्या वारकऱ्यांची भेट होईल म्हणून आपण आळंदीत आल्याचे त्यांनी सांगितले. जनतेची सेवा करण्यासोबत अशा देवस्थान परिसराचे प्रश्न सोडविण्याचे समाधान असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आर्थिक बदलाचे संवाहक म्हणून एक चांगले, शाश्वत जग निर्माण करण्याच्या दिशेने कार्य करा- लोकसभा अध्यक्षांचे लेखापालांना आवाहन
मुंबई-आर्थिक बदलाचे संवाहक म्हणून संवाद, चर्चा आणि सहकार्याद्वारे शाश्वत जगाच्या निर्मितीसाठी कार्य करण्याचे आणि एक चांगले जग उभारण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लेखापालांना केले. ते मुंबईत आयोजित 21 व्या जागतिक लेखापाल अधिवेशनाला (डब्लूसीओए) संबोधित करत होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लेखापालांच्या जागतिक अधिवेशनाला आभासी माध्यमातून संबोधित केले.

“तुम्ही आर्थिक जगताचे इंजिन आहात आणि भारत आणि परदेशातील अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहात.”, असे लोकसभा अध्यक्षांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लेखापालांचे स्वागत करताना सांगितले.
आंतरराष्ट्रीय लेखापाल महासंघ (आयएफएसी )आपल्या स्थापनेपासूनच, आर्थिक व्यवस्थेमध्ये विश्वास, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी आणि ते बळकट करण्यासाठी कार्यरत आहे.“या जागतिक अधिवेशनातील चर्चांमधून निघणारे फलित जागतिक अर्थव्यवस्थेला एक नवीन दिशा देईल आणि भविष्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करेल. हे लेखाशास्त्र क्षेत्रातील सध्याच्या समस्यांवर उपाय शोधण्यास मदत करेल.”, असे लोकसभा अध्यक्षांनी सांगितले.
“जागतिकीकरण आणि डिजिटल अर्थव्यवस्थेने आपल्यासमोर नवीन आव्हाने उभी केली आहेत. आर्थिक तज्ञ म्हणून, तुम्हाला ती अधिक चांगली समजतील. या आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता तुमच्यात आहे.”, असे लोकसभा अध्यक्षांनी सांगितले.
लेखापालांच्या जागतिक अधिवेशनाने विश्वास, नैतिकता, विविधता आणि पारदर्शकता यासारख्या मुख्य विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जागतिक लेखापाल अधिवेशनाला आभासी माध्यमातून संबोधित करताना सांगितले. जागतिक लेखापाल अधिवेशन 2022 पहिल्यांदाच भारतात आयोजित करण्यात आले असून या अधिवेशनाच्या माध्यमातून, पारदर्शक लेखा प्रक्रियेच्या शोधात असणाऱ्या देशांसाठी , बहु-राष्ट्रीय संस्थांसाठी संबंधित कल्पना मांडाव्यात .”, असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले.
सीतारामन यांनी यावेळी बोलताना शाश्वत जीवनशैलीच्या गरजेवर अधिक भर दिला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी एलआयएफई अर्थात पर्यावरणासाठी पोषक जीवनशैलीच्या संकल्पनेवर भर देत आहेत. येत्या 1 डिसेंबर पासून जी-20 समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी भारताकडे येणार आहे. “एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य”ही भारताची जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील संकल्पना आहे. पृथ्वीचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी आपल्याला शाश्वत जीवनशैलीचा स्वीकार करण्याची गरज आहे असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.
जागतिक लेखापाल संमेलन 2022 च्या आयोजनातील सर्व संकल्पनांमध्ये ‘विश्वास’ ही एक महत्त्वाची संकल्पना समाविष्ट आहे याकडे निर्देश करत केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, जनतेसाठी शाश्वत उपजीविका तसेच शाश्वत उत्पादन आणि सेवा क्षेत्र उभारण्यासाठी विश्वास महत्त्वाचा आहे. “शाश्वततेसह वाढीव पारदर्शकता आणून हे जग अधिक उत्तम प्रकारे कसे चालवता येईल यासाठीच्या कल्पना या जागतिक संमेलनात मांडल्या जातील अशी मला खात्री वाटते,” असे त्या म्हणाल्या.
जागतिक लेखापाल संमेलन 2022 हा लेखा, अर्थ आणि व्यवसाय क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी परस्परसंवादी चर्चांच्या माध्यमातून संकल्पनांच्या देवाणघेवाणीसाठीचा मंच आहे. लेखा क्षेत्राशी संबंधित सहा हजाराहून अधिक व्यावसायिक या संमेलनामध्ये उपस्थित राहणार असून त्यात जगभरातील 100 देशांतून आलेल्या 1800 हून अधिक परदेशी प्रतिनिधींचा समावेश आहे.
हे संमेलन आंतरराष्ट्रीय लेखापाल महासंघाने आयोजित केले आहे. वर्ष 1977 मध्ये स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय लेखापाल महासंघ ही संघटना लेखा व्यवसायातील व्यावसायिकांची जागतिक पातळीवरील संस्था असून ती या व्यवसायाला सशक्तता देण्यासाठी आणि जगातील मजबूत आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थांच्या विकासात योगदान देण्यासाठी लोककल्याणाच्या सेवेत समर्पित आहे. 135 देश तसेच न्यायाधिकार क्षेत्रांमध्ये या महासंघाचे 180 सदस्य आणि सहयोगी आहेत. ही संस्था सार्वजनिक सेवा, शिक्षण, सरकारी सेवा,उद्योग आणि वाणिज्य या क्षेत्रांतील 3 दशलक्षांहून अधिक लेखापालांचे प्रतिनिधित्व करते.
उचलली जीभ, लावली टाळ्याला..अमोल मिटकरींची संतप्त प्रतिक्रिया!
“आज पुन्हा त्यांनी आपली जीभ उचलली आणि टाळ्याला लावली. मराठवाडा विद्यापीठात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना मानाची डी लिट पदवी प्रदान करण्यात आली. तेव्हा हुरळून जाऊन एखादा माणूस जसं गडकरी आणि पवारांनी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी यासाठी बेताल वक्तव्य करावं तसं त्यांनी केलं. ते शिवाजी महाराजांबद्दल एकेरी बोलले. छत्रपती शिवाजी महाराज असं बोलण्याचं त्यांनी औदार्य दाखवलं नाही. कोई गांधी को मानता है, कौई नेहरू को मानता है, कोई सुभाषचंद्र बोस को मानता है असं ते एकेरी बोलले”, अशा शब्दांत अमोल मिटकरींनी राज्यपालांच्या विधानाचा समाचार घेतला. “महाराष्ट्राचे राज्यपाल नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करण्यात पटाईत आहेत. जाणीवपूर्वक त्यांना प्रसिद्धीची हाव आहे का असा प्रश्न निर्माण होईल अशी त्यांची वर्तणूक आहे. याआधीही त्यांनी महाराष्ट्राबाबत, मराठी माणसाबाबत, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत खालच्या पातळीचं वक्तव्य केलं. त्यावर त्यांनी कोणतीही माफी मागितली नाही”, असं अमोल मिटकरी म्हणाले.
