पुणे-पुण्यातील मार्केट यार्ड येथील पी.एम. कुरिअर कंपनीच्या कार्यालयात शिरुन चोरट्यांनी गोळीबार करत तब्बल 27 लाख 45 हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना 12 नोव्हेंबर रोजी दुपारी घडली होती.या गुन्ह्यातील फरार दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट-3 च्या पथकाने अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 2 पिस्तुल जप्त करण्यात आले आहेत. त्यापैकी एका पिस्तुल मधून गोळीबार करण्यात आला होता.
संतोष बाळू पवार (वय-23 रा. पानशेत रोड, खानापुर, ता. हवेली), साई राजेंद्र कुंभार (वय-19 रा. समाज मंदिराजवळ, खानापुर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 80 हजार रुपये किमतीची दोन गावठी पिस्तुल जप्त करण्यात आले आहेत. गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने ही कारवाई गंगाधाम परिसरातील महाराष्ट्र गॅरेज जवळ असलेल्या रोडवर शुक्रवारी (दि.18) केली.
गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी अभिलेखावरील गुन्हेगार चेक करत असताना पोलीस अंमलदार राकेश टेकावडे यांना मार्केट यार्ड गोळीबार प्रकरणातील तीन आरोपी गंगाधाम परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन पिस्तुल जप्त केले. जप्त केलेल्या पिस्टलबाबत आरोपींकडे चौकशी केली असता, संतोष पवार याने हे पिस्तुल जळगाव येथून आणून साई कुंभार याच्याकडे ठेवण्यासाठी दिल्याचे निष्पन्न झाले.
जप्त केलेल्या दोन पिस्तुल पैकी एका पिस्टलमधून आरोपींनी फायरिंग केले होते. गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी आले होते. पुढील तपासासाठी आरोपींना मुद्देमालासह मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. संतोष पवार याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर साई कुंभार याच्यावर आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस अंमलदार संतोष क्षिरसागर, रामदास गोणते, शरद वाकसे, किरण पवार,प्रकाश कटटे, ज्ञानेश्वर चित्ते, दिपक क्षिरसागर, साईनाथ पाटील, सतिश कत्राळे, प्रताप पडवाळ, राकेश टेकावडे,सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने केली.