मुंबई, दि. 19 : ‘वसुधैव कुटुंबकम’ हीच भारताची भूमिका राहिली आहे. अशा या भारतातील आणि भारताच्या आर्थिक राजधानीतील मुंबईच्या कुटुंबात आपले स्वागत आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मध्य आशियाई देशांतील तरुण- तरुणींच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले.
मध्य आशियाई देशांबरोबरील संबंधांना झालेली तीस वर्षे आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या देशांमधील तरुणांचा आदान- प्रदान सोहळा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसार मध्य आशियातील किरगिझस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, कझाकस्तानमधील शंभरावर तरुण-तरुणी आज मुंबई शहराच्या भेटीवर आले होते. या शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कझाकिस्तानच्या अलबोल्सियन ओराकबायेवा, किरगिझिस्तानचे तालबेक बेरदेव, ताजिकिस्तानचे अलिशेर असलुद्दीन, उझबेकिस्तानचे आयस्लोम ओकुनोव्ह उपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले, भारत आणि मध्य आशियाई देशांमध्ये अनेक शतकांपासून राजनैतिक, व्यापार, सांस्कृतिक संबंध आहेत. या शिष्टमंडळाच्या भेटीमुळे हे संबंध आणखी दृढ होतील. भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. या अर्थव्यवस्थेत मुंबईसह महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. मुंबईची भारताच्या आर्थिक राजधानीबरोबरच मनोरंजन क्षेत्राची राजधानी म्हणूनही ओळख आहे. मुंबई शहर हे तरुणांच्या स्वप्नपूर्तीसाठी नेहमीच मदत करणारे शहर आहे.’
यावेळी शिष्टमंडळातील श्रीमती अलबोल्सियन ओराकबायेवा, तालबेक बेरदेव, अलिशेर असलुद्दीन, आयस्लोम ओकुनोव्ह यांनी मनोगत मांडले. त्यांनी सांगितले, की भारत सुंदर देश आहे. मध्य आशियाई देशांबरोबर भारताचे संबंध सौहार्दपूर्ण राहिले आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील मध्य आशियाई देशांमधील सांस्कृतिक आदान- प्रदान, तरुणांच्या शिष्टमंडळाच्या भेटीचा उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. भारत आणि मुंबई शहराची भेट आमच्या कायमच आठवणीत राहील. मुंबई शहर स्वप्नपूर्ती करणारे शहर आहे. ते बॉलिवूडमुळेही आमच्या परिचयाचे आहे. भारत आणि मुंबईला दिलेला भेटीचा अनुभव अनमोल राहील, असेही या तरुणांनी सांगितले.
भारत सरकारचे अवर सचिव रवीकुमार सिन्हा यांनी तरुणांच्या शिष्टमंडळाच्या दौऱ्याविषयी माहिती दिली. मुंबई शहरचे जिल्हा क्रीडाधिकारी अभय चव्हाण, केंद्र सरकारमधील सहायक कक्ष अधिकारी निरज पुजारी आदी उपस्थित होते. शिष्टमंडळ दोन दिवस मुंबई दौऱ्यावर राहणार असून ते विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळांना भेट देणार आहेत.