Home Blog Page 1522

मुख्यमंत्री ज्योतिष बघतात हे ऐकूण हतबल झालो; अजित पवार, सुप्रिया सुळेंची टीका

0

२१ व्या शतकात अंधश्रद्धेकडे महाराष्ट्राची वाटचाल …?

नवस पूर्ण करायचा म्हणून कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊ ,जाऊ म्हणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बुधवारी मिरगाव येथील शिवनिका संस्थानच्या ईशान्येश्वर मंदिरात हजेरी लावत दर्शन घेत पूजा केली. विशेष म्हणजे हा दौरा गोपनीय होता. यासंदर्भात शासकीय यंत्रणांना पुसटशी कल्पनाही नव्हती. यावेळी शिंदे यांनी ईशान्येश्वर मंदिरातील ज्योतिषाकडे भविष्य पाहिल्याच्या चर्चा सुरूयत. त्यावरून टीकेची झोड उठू लागली आहे.

आमचा श्रद्धेवर विश्वास आहे. अंधश्रद्धेवर नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. तर पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात… काय बोलावं. आम्ही हतबल झालो ऐकून, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केलीय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मिरगाव येथील शिवनिका संस्थानच्या ईशान्येश्वर मंदिरात हजेरी लावत दर्शन घेत पूजा केली. यावेळी शिंदे यांनी ब्रह्मांड शास्त्रज्ञ तथा श्री शिवनिका संस्थानचे अध्यक्ष कॅ. अशोककुमार खरात यांच्या मंत्रोच्चारात ईशान्येश्वराच्या पिंडीवर जलाभिषेक केला. पूजानंतर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. संस्थानतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर या तिन्ही मंत्र्यांनी शिर्डीकडे कूच केले. यावेळी शिंदे यांनी ज्योतिषाकडे भविष्य पाहिल्याची चर्चाय.

मुख्यमंत्र्यांच्या भविष्य पाहण्यावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, श्रद्धा असावी. आमचा श्रद्धेवर विश्वास आहे, पण अंधश्रद्धेवर नाही. डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धेविरोधात लढा दिला. त्यामुळे उभ्या देशात महाराष्ट्राची वेगळी ओळखय. महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींनी श्रद्धा जरूर ठेवावी. मात्र, अंधश्रद्धेबद्दल माझे मत वेगळे असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या भविष्य पाहण्यावर अजित पवार म्हणाले की, आम्ही शिर्डी येथे गेलो. पंढरपूर येथे गेलो तर दर्शन घेतो. आपली ती परंपरा आहे. तिथपर्यंत समजू शकतो. मात्र, ज्योतिषाकडे जाऊन आपले भविष्य बघणे कितपत योग्य आहे. २१ व्या शतकात जग कुठे चालले आहे. बदल होत असताना सायन्स काय सांगत आहे. पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात…काय बोलावं आम्ही हतबल झालो ऐकून, अशा शब्दांत अजित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

दुष्काळग्रस्त भागात पुराचे पाणी वळविण्याच्या प्रकल्पाला जागतिक बॅंकेने अर्थसहाय्य करावे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मराठवाडा, विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य

बेस्टसाठी इलेक्ट्रीकल बसेस, कौशल्य विकास प्रकल्प, पोक्रा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याबाबत चर्चा

मुंबई, दि. २४: राज्यातील मराठवाडा, विदर्भ भागातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी प्रकल्पांसोबतच दुष्काळग्रस्त भागात पुराचे पाणी वळविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने तयार केला असून त्यासाठी जागतिक बॅंकेने अर्थसहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

जागतिक बॅंकेचे भारतातील प्रमुख ऑगस्टे तानो कौमे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. शिष्टमंडळात श्रीमती शबनम सिन्हा, आदर्श कुमार, सुदीप मोजुमदार, झियांग वाँग सदस्यांसमवेत निवृत्त सनदी अधिकारी प्रविण परदेशी, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग आदी यावेळी उपस्थित होते.

आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्प, हवामान बदल आणि त्यामुळे कृषी क्षेत्रावर होणारा परिणाम, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प, बेस्टसाठी इलेक्ट्रीक बसेस याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्रात कौशल्य विकास कामे सुरू असून त्याद्वारे क्षमता बांधणीस मदत होत आहे. भविष्यातही अशाचप्रकारे राज्यातील विविध क्षेत्रातील प्रकल्पांना सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

राज्यातील कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांपैकी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा) मराठवाडा आणि विदर्भातील सुमारे ५००० गावांना फायदा होत आहे. या प्रकल्पाला जागतिक बॅंकेचे सहाय्य लाभले असून प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वीतेनंतर दुसऱ्या टप्प्यास मान्यता देण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागात वळविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पिण्याच्या पाणी तसेच लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात येणार आहे. यामुळे शेतीला फायदा होणार असून त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. याप्रकल्पासाठी जागतिक बॅंकेने सहकार्य करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी अपर मुख्य सचिव श्री. कपूर, प्रधान सचिव श्रीमती वर्मा, श्री. गुप्ता, श्री. डवले यांनी आपापल्या विभागाच्या प्रकल्पांविषयी माहिती दिली.

शरद पवार, गडकरी तेव्हाच का बोलले नाही?:शिवरायांबाबत यापुढे वादग्रस्त वक्तव्य करेल त्याला नेस्तनाबूत केले जाईल-उदयनराजेंचा इशारा

राज्यपाल आणि भाजप प्रवक्ते यांच्या वक्तव्यावर उदयनराजे भोसले म्हणाले …लाज वाटत नाही …

मी प्रथम शिवभक्त ..भाजपा पक्ष बिक्ष नंतर

पुणे-छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला आहे.उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार जुना झाला, हे वाक्य राज्यपालांच्या तोंडून ऐकून मी सुन्न झालो. त्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार, नितीन गडकरीही होते, त्यांनी महापुरुषांच्या अपमानाबाबत आपल्या भाषणात भूमिका मांडणे आवश्यक होते.राज्यपालांना तसेच शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली, असे वक्तव्य करणाऱ्या सुधांशू त्रिवेदीला पदावरून हटवावे, या मागणीसाठी उदयनराजेंनी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिले आहे. याबाबत आज पत्रकार परिषदेत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

लाज वाटत नाही

उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जुने झाले असतील तर देशाने आणि राज्याने कोणाला पाहून प्रगती केली. भाजप प्रवक्ते त्रिवेदी यांना महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करताना लाज वाटत नाही. सर्वधर्म समभाव, स्वराज्य संकल्पना, समानतेची वागणूक असे विचार शिवाजी महाराज यांनी मांडली. अशाप्रकारे चुकीची विधाने कोणी करत असेल तर आमच्या सारख्या शिव भक्तांना चीड निर्माण होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवीन विचार आणि आदर्श कोण हे जनतेला स्पष्ट करून सांगावे. त्यांचा पंतप्रधान यांनी राजीनामा घ्यावा. यापुढे अशाप्रकारे कोणी वक्तव्य केले तर त्यांना आम्ही नेस्तनाबूत करू, असा इशारा उदयनराजेंनी यावेळी दिला.

अन्यथा देशाचे तुकडे

उदयनराजे म्हणाले, सर्वधर्म समभाव आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी यांचे विचार दिशादर्शक आहे. अन्यथा देशाचे तुकडे होण्यास वेळ लागणार नाही. सर्वसामान्य लोकांचा स्वराज्यात सहभाग असावा ही संकल्पना शिवाजी महाराज यांची होती. त्यांनी कधी स्वतःचे राज्य केले नाही तर रयतेचे राज्य संकल्पना राबवली. मात्र, आज समाजाचा विचार कमी झाला असून व्यक्ती केंद्रित विचार वाढले आहेत.

उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोणी अपमान करत असेल किंवा त्यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत असेल तर त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. देशांत अनेक राजे मुघल साम्राज्यासमोर शरण केले. पण, छत्रपती शिवाजी महाराज हे कधी शरण गेले नाही. लोकांचे अन्याय दूर करण्यासाठी आणि चांगले साम्राज्य देण्यासाठी त्यांनी आयुष्भर प्रयत्न केले. देशातील सर्वसामान्य लोकांना गुलामगिरीमधून मुक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रयत्न केले. आधुनिक भारत संकल्पना त्यांनी मांडली. अनेक जणांचे ते आदर्श स्फूर्तिस्थान ठरले आहेत.

उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार केवळ मोठे पुतळे उभे करून होणार नाही. तर त्यांच्या विचारांची अंमलबजावणी दैनंदिन जीवनात झाली पाहिजे. देव कोणी पहिला नाही मात्र, शिवाजी महाराज हे देवा सारखे होते. त्यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणे लज्जास्पद आहे. लोकशाहीत मोकळा श्वास हा आपण महाराज यांच्या काळात ज्यांनी योगदान दिले त्यामुळे घेत आहोत. अन्यथा आपण गुलामगिरीत अजून अडकलो असतो.

१ हजार २६७ खोके जप्त..विदेशी मद्याचे…

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विदेशी मद्यासह १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे: राज्य उत्पादन शुल्क, तळेगांव विभाग पथकाने केलेल्या कारवाईत तळेगाव दाभाडे शहराच्या हद्दीत ८७ लाख ८९ हजार ५२० रूपये किंमतीच्या गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यासह एकूण १ कोटी ५ लक्ष ७ हजार ५२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर, हॉटेल शांताई समोर रोडवर सापळा रचून गोवा राज्य निर्मीत आणि केवळ गोवा राज्यात विक्रीस असलेले विदेशी मद्याचा साठा घेऊन जाणाऱ्या भारत बेंझ कंपनीच्या ट्रक क्र.एम एच ४६ एफ – ६१३८ या क्रमांकाचा ट्रक जप्त करुन कारवाई करण्यात आली.

या ट्रकमध्ये रिअल व्हिस्की ७५० मि.ली चे ४ हजार १६४ सीलबंद बाटल्या व रिअल व्हिस्की १८० मि.ली चे ५ हजार ७६० सीलबंद बाटल्या, रॉयल ब्ल्यू व्हिस्की ७५० मि.ली चे ९ हजार ६०० सीलबंद बाटल्या असे विदेशी मद्याचे एकुण १ हजार २६७ खोके जप्त करण्यात आले. मद्य आणि वाहनासह इतर जप्त मुद्देमालाची किंमत १ कोटी ५ लक्ष ७ हजार ५२० रुपये इतकी आहे. वाहन चालक प्रवीण परमेश्वर पवार वय २४ वर्षे, रा. मु.पो. तांबोळे, ता. मोहोळ व देविदास विकास भोसले वय-२९ वर्षे रा. मु.पो. खवणी, मोहोळ जि. सोलापूर यांना अटक करुन त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चरणसिंह राजपूत यांनी दिली आहे.
0000

पहिल्याच प्रयत्नात पुणे विद्यापीठ अधिसभेत ठाकरे गटाचे अ‍ॅड.बाकेराव विठोबा बस्ते विजयी.

महाविकास आघाडीच्या वतीने अ‍ॅड. बस्ते यांचा सत्कार..

पुणे, प्रतिनिधी: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पहिल्यांदाच निवडणूक लढवत चांगलाच ठसा उमटवत खाते उघडले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार अ‍ॅड. बाकेराव बस्ते या एकमेव उमेदवाराचा खुल्या गटातून विजय झाला. विजयी उमेदवाराचे शिवसेना भवन येथे भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी शहर प्रमुख गजानन थरकुडे, विस्तारक राजेश पळसकर, विभागीय सचिव अविनाश बलकवडे, माजी नगरसेवक सचिन भगत, राम थरकुडे, युवराज पारीख, अक्षय माळकर, अक्षय फुलसुंदर, शिवप्रसाद जठार, शुभम दुगाने, हर्षद मंजाळकर, वैभव दिघे, गौरव पापळ, रुपेश थोपटे, गणेश काकडे, प्रथमेश भुकण, मयूर कुटे, संजय वाल्हेकर, सुरेश घाडगे, राहुल शेडगे, किशोर राजपूत, संतोष शेलार, सागर दळवी, नितीन रावलेकर उपस्थित होते.

पुणे विद्यापीठाच्या अधिसभा नोंदणीकृत पदवीधर गटाच्या निवडणुकीच्या १० जागांसाठी रविवारी मतदान झाले. पुणे विद्यापीठाची यंदाची निवडूक चुरशीची झाली. यात भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनीही आपले थेट पॅनल उभे केले होते. त्यामुळे या निवडणुकीला राजकीय स्वरूप मिळाले होते. युवासेनेच्या पदाधिकार्‍यांची नव्याने नियुक्ती करण्यात आलेली. त्यातच विद्यापिठ अधिसभेच्या निवडणूकांना लागलीच सामोरे जावे लागले. मात्र एवढ्या कठीण काळातदेखील चारपैकी एक उमेदवार जिंकत युवासेनेने आपले स्थान सिद्ध केले आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने आगामी महागरपालिका निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना एकत्रित महाविकास आघाडीद्वारे निवडणूक लढवून जिंकल्याची ही रंगीत तालीम असल्याचे चित्र आहे.

पुणे विमानतळावरील मल्टीलेवल पार्किंगचे केंद्रिय मंत्री सिंधिया यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन : खासदार गिरीश बापट

पुणे दि.२३ : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते पुणे विमानतळावरील मल्टीलेवल पार्किंगचे दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 वाजता उद्घाटन होणार असल्याचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले. यावेळी बोलताना खासदार बापट यांनी सांगितले की पुणेकर आणि पुणे विमानतळावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना वाहनतळाचा प्रश्न भेडसावत होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी विमानतळा लगत मल्टीलेवल पार्किंग उभारण्यात आले. या वाहनतळामुळे प्रवाशांना विमानतळावर पार्किंगच्या सुविधेबरोबर इतर सुविधाही उपलब्ध होणार आहे. या वाहनतळाचे काम तातडीने पूर्ण करून ते नागरिकांकरिता उपलब्ध करून देणे गरजेचे होते. म्हणून मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होतो. सप्टेंबर २०२२ मध्ये सिंधिया हे पुणे दौऱ्यावर आले असता त्यांना या वाहनतळाच्या उद्घाटनाकरीता वेळ देणेसाठी विनंती केली असता त्यांनी उद्घाटनाकरिता वेळ देणेबाबत होकार दर्शविला. सद्यस्थितीत वहानतळाचे सर्व काम पूर्ण झाले असल्यामुळे दिनांक 25 नोव्हेंबर २०२२ रोजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सिंधिया यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रकांत पाटील, राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, वडगाव शेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे व इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे खासदार बापट यांनी सांगितले.

विमानतळावरील पार्किंगचा ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या मल्टीलेवल पार्किंगचे काम तातडीने पूर्ण करणे माझ्या दृष्टीने गरजेचे होते. काही अपूर्ण असलेल्या बाबी पूर्ण करून घेतल्यामुळे या वाहनतळाचे उद्घाटन दिनांक 25 नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्र्याचे हस्ते होणार आहे.

या संदर्भात पुणे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी सांगितले की,भारतीय विमानतळ प्राधिकरणाने २०२० साली पेबल्स इन्फ्राटेक प्रायव्हेट लि. च्या सहयोगाने मल्टीलेव्हल पार्किंग प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला.

नव्या मल्टीलेव्हल पार्किंगमुळे पुणे विमानतळावरील पार्किंगचा मोठा प्रश्न सुटणार आहे. १२० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पाच मजली एरोमॉलमध्ये सुमारे १ हजार चारचाकी व दुचाकींच्या पार्किंगची सोय असणार आहे. केवळ कार पार्किंगच नाही तर येथे प्रवाशांच्या सुविधांसाठी दालने, फुडकोर्ट अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

विमानांची आवागमन स्थिती दर्शविणारे डिस्प्लेज् पार्किंग इमारतींच्या सर्व मजल्यांवर लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना विमानांच्या वेळा समजण्यास मदत होणार आहे.

प्रवाशांना मिळणार या सुविधा
१. मोबाईलअॅप वरून स्लॉट बुक करण्याची सुविधा :
वाहनधारकांना पाच मजली पार्किंग इमारतीमधील पार्किंगची जागा (स्लॉट) निवडणे शक्य असणार आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरबसल्या पार्किंगचा स्लॉट बुक करता येणार आहे. हे अॅप येत्या महिनाभरात सुरू होईल. या अॅपच्या सुविधेमुळे प्रवाशांची गैरसोय थांबणार आहे. प्रवाशांना सुविधा देताना नव्या संकल्पनांचा विचार करण्यात आला आहे.

पेमेंटसाठी अनेकविध पर्याय – प्रवाशांना फास्टस्टॅग, क्रेडिट कार्ड, पे ऑन फूट, मोबाईल अॅप व्दारे पेमेंट करता येईल.
ज्यामुळे प्रवाशांची सोय व इमारतीतून लवकर बाहेर पडण्यास मदत होणार आहे. तसेच ‘फाईंड माय कार’ तंत्रज्ञान सुविधेच्या माध्यमातून आपली कार कोणत्या मजल्यावर पार्क आहे हे जाणता येणार आहे.

३. गोल्फ कारची सुविधा : विमानतळावर येण्या-जाणाऱ्या प्रवाशांना लिफ्ट, फुट ओव्हर ब्रीज, स्वयंचलित जिन्यांची पुरेशा संख्येने सुविधा आहेतच, त्यासोबतच विमानतळ ते कार पार्किंग दरम्यान जाण्या – येण्यासाठी वृद्धांसाठी पर्यावरणपूरक गोल्फ कार्टची (कार) व्यवस्था करण्यात आली आहे. ही सुविधा पूर्णपणे मोफत असणार आहे.

५. प्रवाशांना सोडण्यासाठी बाहेरून येणाऱ्या चालकांना विश्रांतीसाठी येथे खास विश्रांती कक्षाची स्थापन करण्यात आली आहे. तेथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था असणार आहे.
२४ तास सेवा
प्रवासी व अन्य नागरिकांकरिता हे पार्किंग बिल्डिंग (एरोमॉल) २४ तास सुरू असणार आहे. येथे त्यांना २४ तास पार्किंग सुविधेसह चांगल्या दर्जाच्या खाद्यपदार्थची चव चाखता येणार आहे. तसेच दुसऱ्या मजल्यावर छोट्या व तातडीच्या व्यावसायिक मिटिंग्जसाठी सशुल्क जागा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही आहेत वैशिष्ट्ये
१) ४ लाख ५० हजार स्केअर फूट एवढ्या भव्य पार्किंग इमारतीची (एरोमॉल) निर्मिती.
२) ३ लाख स्केअर फूट जागेचा वापर केवळ पार्किंगसाठी
३) उर्वरित १ लाख ५० हजार स्केअर फूट जागेचा व्यावसायिक वापर.
४) दुसऱ्या मजल्यावरून थेट टर्मिनल क्रमांक एक जवळील प्रस्थान गेट क्रमांक एकवर येता येईल.
५) प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच येथे दोन ट्रॅव्हलेटर फुट ओव्हर ब्रीजवर बसविण्यात येणार आहे.
६) इलेक्ट्रिक वाहनांसाठी पार्किंगमध्येच चार्जिंगची व्यवस्था.
७) इमारतीच्या छतावर सौर ऊर्जेचे पॅनल बसविण्यात आले असून ज्यामाध्यमातून निर्माण होणाऱ्या ग्रीन एनर्जीचा वापर इमारतीसाठी होणार आहे. ज्यातून पर्यावरण संरक्षणासाठीचे प्रयत्न केला गेलेला आहे.
८) २४×७ सेक्युरिटी व सीसीटीव्ही कॅमेरे.
९) सशुल्क ‘वॅले’ कार पार्किंग : पुणे विमानतळावर पहिल्यांदाच प्रवाशांना सशुल्क ‘वॅले’ कार पार्किंग ची सुविधा उपलब्ध असणार आहे.

मतदार नोंदणी साठी आता वर्षातून चार वेळा संधी

पुणे दि.२३-भारत निवडणूक आयोगामार्फत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० मध्ये सुधारणा करण्यात आल्याने वयाची १८ वर्ष पुर्ण होणाऱ्या व्यक्तींना १ जानेवारी २०२३, १ एप्रिल २०२३, १ जुलै २०२३ व १ ऑक्टोबर २०२३ रोजी असे वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे.

सद्यस्थितीत भारत निवडणूक आयोगाचा छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. त्यानुसार ८ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीमध्ये मतदार यादीत अजून नाव समाविष्ट नसलेल्या १८ वर्षावरील सर्व पात्र व्यक्तीना नाव नोंदविण्यासाठी नमुना अर्ज भरता येणार आहे.

पात्र नागरिकांनी यासंधीचा लाभ घेऊन सर्व त्यांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी nvsp.in या संकेतस्थळावरुन तसेच, Voter Helpline App आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन नमुना अर्ज क्र.६ भरावा किंवा आपल्या नजीकच्या मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधावा.

मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार २६ व २७ नोव्हेंबर २०२२ रोजी तृतीयपंथी समुदाय, देहव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आणि भटक्या व विमुक्त जमातींच्या व्यक्तींसाठी नियोजित ठिकाणी व ३ व ४ डिसेंबर २०२२ रोजी सर्व नागरिकांसाठी मतदान केंद्रावर विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यावेळी सर्व अर्हता पात्र नागरिकांनी या विशेष शिबीरांचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीत नोंदवावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे

सीमाप्रश्नावर कर्नाटक सरकारच्या बेजबाबदार भूमिकेबाबत, केंद्राने हस्तक्षेप करणे गरजेचे – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे- महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर कर्नाटक सरकारच्या बेजबाबदार भूमिकेबाबत, केंद्राने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ .नीलम गोऱ्हे यांनी येथे व्यक्त केले आहे

त्या म्हणाल्या ,’महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमा प्रश्नावर गेली अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. या दोन्ही राज्यांच्या सीमा भागात राहत असलेल्या मराठी भाषिक नागरिकांची महाराष्ट्रात सहभागी होण्याची गेली अनेक वर्षे होत नाही. बेळगाव, भालकी, बिदर सारख्या जिल्ह्यांत ही मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने होते आहे. यासाठी कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रात अनेकांनी आपले बलिदान दिले आहे. मात्र अजूनही याबाबत काही निर्णय न झाल्याने येथील जनता याबाबत आतुरतेने वाट पाहत आहे.

कन्नड भाषिक शाळांना अनुदान देऊन कर्नाटक सरकार खोडसाळपणा करीत आहे. खरेतर महाराष्ट्र राज्य देखील इतर भाषांना प्रोत्साहन देत असते. भाषिक शाळांना अनुदान देत आहे. मात्र कन्नड भाषेचे आम्हीच खरे पुरस्कर्ते आहोत किंवा कसे याबाबत आपला टेंभा मिरविण्याची कर्नाटक सरकारची सुरू असलेली धडपड दिसत आहे. असे वागणे बरोबर नाही याबाबतची जाणीव कर्नाटक सरकारला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आणि माननीय राष्ट्रपती, पंतप्रधान महोदयांच्या माध्यमातून करून द्यायला हवी असे या निमित्ताने मला वाटतं आहे. या कारणासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष उच्चाधिकार समितीने आपली भूमिका सौम्य न ठेवता कर्नाटक सरकारला ठणकावून सांगितले पाहिजे. आपल्या कामाचा नियमित अहवाल लोकांना सादर करावा, असे महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती या नात्याने मी यावेळी आवाहन करीत आहे.

‘ काश्मीर फाईल्स चित्रपटातील माझे अश्रू आणि वेदना खऱ्या आहेत’-अनुपम खेर

काश्मिरी पंडितांची शोकांतिका पडद्यावर दाखवून त्यांचे वेदनांचे घाव भरण्याची प्रक्रिया सुरू केली

‘वास्तववादी चित्रपट प्रेक्षकांना भिडतात’

गोवा/पुणे , 23 नोव्‍हेंबर 2022

‘काश्मीर फाईल्स’ मुळे जगभरातील लोकांना 1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांची जाणीव होण्यास मदत झाली, असे चित्रपटातील प्रमुख अभिनेते अनुपम खेर म्हणाले. गोव्यातील पणजी येथे 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त आयोजित इफ्फी टेबल टॉक्समध्ये ते सहभागी झाले होते.

“हा सत्य घटनांवर आधारित चित्रपट आहे. चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटासाठी जगभरातल्या  सुमारे 500 लोकांच्या मुलाखती घेतल्या. 19 जानेवारी 1990 च्या रात्री वाढत्या हिंसाचारामुळे काश्मीर खोऱ्यातील 5 लाख काश्मिरी पंडितांना त्यांची घरे आणि तिथल्या आठवणी मागे सोडून जावे लागले. एक काश्मिरी हिंदू म्हणून मी या दुःखद घटनांसोबत  जगलो. मात्र असे काही घडले हे कुणीच मान्य करत नव्हते. जग ही शोकांतिका लपवण्याचा प्रयत्न करत होतं . या चित्रपटाने पडद्यावर ही शोकांतिका दाखवून त्यांचे वेदनांचे घाव भरण्याची  प्रक्रिया सुरू केली ” असे अनुपम खेर पुढे म्हणाले.

त्यांनी भोगलेली शोकांतिका पुन्हा जागवताना अनुपम खेर म्हणाले की, द काश्मीर फाईल्स हा त्यांच्यासाठी केवळ एक चित्रपट नाही, तर त्यांनी पडद्यावर चित्रित केलेली एक भावना आहे.  “ज्या लोकांना त्यांच्या घरातून हाकलून देण्यात आले,  त्यांचे मी प्रतिनिधीत्व करत असल्याने, ते शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने व्यक्त करणे ही माझी मोठी जबाबदारी होती असे मी मानतो. माझे अश्रू, माझ्या वेदना ज्या तुम्ही या चित्रपटात पाहत आहात ते सगळे खरे आहे,” असे ते म्हणाले.

अनुपम खेर पुढे म्हणाले की, या चित्रपटात आपल्या कलेचा अभिनेता म्हणून वापर करण्याऐवजी, वास्तविक जीवनातील घटनांमागील सत्याला अभिव्यक्ती देण्यासाठी त्यांनी आपल्या आत्म्याचा वापर  केला. कधीही हार मानू नका ही या चित्रपटामागील मुख्य संकल्पना असल्याचे  त्यांनी अधोरेखित केले.

“कोविड महामारी आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनचा चित्रपट पाहण्याच्या लोकांच्या पद्धतीवर परिणाम झाला आहे, या वस्तुस्थितीवर अधिक भर देत अनुपम खेर म्हणाले की, ओटीटी  प्लॅटफॉर्ममुळे प्रेक्षकांना जागतिक चित्रपट आणि बहुभाषिक चित्रपट पाहण्याची सवय लागली आहे. “प्रेक्षकांना वास्तववादी चित्रपट आवडू लागले. ज्या चित्रपटांमध्ये वास्तवाचा घटक आहे ते नक्कीच प्रेक्षकांच्या मनाला भिडतील. काश्मीर फाईल्स सारख्या चित्रपटांचे यश हे त्याचेच द्योतक आहे. कुठलीही गाणी, विनोद नसलेला हा चित्रपट अजूनही सरस ठरत आहे . हाच  खरे तर सिनेमाचा विजय आहे”, असे ते म्हणाले. क नेहमी घडू शकतं”  असे ते म्हणाले.

उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना एक सल्ला देताना  ते म्हणाले की आपण एका विशिष्ट भाषिक चित्रपट उद्योगातले आहोत हा समज आपल्या मनातून काढून टाकायला  पाहिजे. ” त्याऐवजी, चित्रपट निर्मात्यांनी स्वतःला भारतीय चित्रपट उद्योगातले चित्रपट निर्माते म्हणून ओळखले पाहिजे जे विशिष्ट भाषेतील चित्रपट बनवतात.  हा एक लार्जर दॅन लाइफ चित्रपट उद्योग आहे.”

इफ्फीसोबतच्या प्रवासाची आठवण सांगताना  अनुपम खेर म्हणाले की, 1985 मध्ये 28 वर्षांचा असताना  ‘सारांश’ या चित्रपटासाठी ते पहिल्यांदा इफ्फीमध्ये सहभागी झाले होते. “त्या चित्रपटात मी 65 वर्षांची व्यक्तिरेखा साकारली होती, त्यामुळे तेव्हा मला इफ्फीमध्ये कोणीही ओळखले नाही. त्यानंतर  37 वर्षांत  532 हून अधिक चित्रपट केल्यानंतर इफ्फीसाठी पुन्हा गोव्यात येणं हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे , हा महोत्सव एक प्रतिष्ठित महोत्सव आणि जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपट महोत्सवांपैकी  एक बनला आहे,” असे ते म्हणाले.

या संवादादरम्यान अनुपम खेर यांनी जाहीर केले की ते प्रतिक्षा या ओडिया चित्रपटाची निर्मिती करतील – यात बेरोजगारी एक प्रमुख विषय असून वडील आणि मुलाची कथा आहे – हिंदीमध्ये, त्यांनी एक प्रमुख भूमिका केली आहे. ‘प्रतीक्षा’चे दिग्दर्शक अनुपम पटनायक हे देखील महोत्सवाच्या ठिकाणी पत्र सूचना कार्यालयाने प्रसारमाध्यमांबरोबर  आयोजित केलेल्या संवादात सहभागी झाले  होते.  काश्मीर फाईल्सचे निर्माते अभिषेक अग्रवाल हे देखील या संवादात सहभागी झाले होते.  ते म्हणाले की या चित्रपटाने त्यांची निवड केली , त्यांनी चित्रपट निवडला नाही. 

रूपरेषा:

कृष्णा पंडित हा एक तरुण काश्मिरी पंडित निर्वासित असून तो  त्याच्या आजोबांसोबत राहतो, ज्यांनी 1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या नरसंहार पाहिला होता आणि त्यांना काश्मीरमधून पळून जावे लागले होते. पुष्करनाथ पंडित यांनी  कलम 370 रद्द व्हावे यासाठी आयुष्यभर लढा दिला होता . कृष्णाला वाटत असते की त्याच्या आई-वडिलांचा काश्मीरमध्ये अपघातात मृत्यू झाला. कृष्णा पंडित हा जेएनयूचा विद्यार्थी असून  त्याच्यावर  मार्गदर्शक  प्राध्यापिका  राधिका मेननचा प्रभाव असतो आणि त्यामुळे तो त्या नरसंहाराचे खंडन करतो आणि स्वतंत्र काश्मीरसाठी लढतो. मात्र  आजोबांच्या मृत्यूनंतरच त्याला सत्य काय आहे ते कळते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक घेतले श्री साईबाबा समाधी दर्शन

0

शिर्डी, दि.२३ नोव्हेंबर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक आज शिर्डी येथे श्री.साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे ‌- पाटील, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव, प्रांताधिकारी गोविंद शिंदे उपस्थित होते.

तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साईबाबा संस्थानच्या हेलिपॅडवर आज आगमन झाले. यावेळी महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले ‌. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर त्यांच्या समवेत उपस्थित होते

‘सिया’- न्यायासाठी निर्दयी समाज व्यवस्थेशी लढा देणाऱ्या मुलीची, आतडे पिळवटून टाकणारी गोष्ट

“माझा चित्रपट म्हणजे अन्याय झालेल्या व्यक्तींची मानवी बाजू रेखाटण्याचा एक प्रयत्न आहे”:दिग्दर्शक मनीष मुंद्रा

गोवा/पुणे , 23 नोव्‍हेंबर 2022

‘सिया’ हा आपल्या सामाजिक न्यायव्यवस्थेचे प्रतिबिंब दाखवणारा प्रभावी चित्रपट आहे. हा चित्रपट म्हणजे अन्याय झालेल्या व्यक्तींची मानवी बाजू रेखाटण्याचा एक प्रयत्न आहे, अशा शब्दांत या चित्रपटाचे दिग्दर्शक मानसी मुंद्रा यांनी त्यांच्या चित्रपटाचे वर्णन केले आहे. ‘सिया’ ही न्यायासाठी निर्दयी पितृसत्ताक समाजाच्या विरोधात लढा देणाऱ्या मुलीची आतडे पिळवटून टाकणारी कथा आहे. आंखो देखी, मसान आणि न्यूटन यासारख्या काही उत्तम चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या मनीष मुंद्रा यांनी ‘सिया’ या चित्रपटासाठी प्रथमच दिग्दर्शनाची जबाबदारी शिरावर घेतली आहे.

गोवा येथे सुरु असलेल्या 53व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पत्रसूचना कार्यालयातर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या ‘टेबल टॉक्स’ या संवादात्मक चर्चासत्रात प्रसार माध्यमे आणि महोत्सवाच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना मनीष मुंद्रा म्हणाले की, न्याय मिळविण्यासाठी पीडितांना ज्या वेदनादायक परिस्थितीमधून जावे लागते ती समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न या चित्रपटाद्वारे करण्यात आला आहे.  “आपण सर्वांनी पीडितांची तीच वेदना आणि दुःख समजून घेतले पाहिजे, त्यातून आपल्याला जबाबदार नागरिक म्हणून घडण्यासाठी पाठबळ मिळेल,” ते म्हणाले.

बलात्काराच्या घटनेतील पिडीतेला सहन करावे लागणारे भय आणि वेदना यांचा आत्म्याला मुळापासून हलवून सोडणारा अनुभव सांगणारा ‘सिया’ हा चित्रपट उत्तर भारतातील ग्रामीण भागातल्या तरुण मुलीच्या जीवनात वास्तवात घडलेल्या प्रसंगावर आधारित आहे. लैंगिक अत्याचाराला बळी पडल्यानंतर ही मुलगी न्यायासाठी लढा देण्याचा निर्णय घेते.ती न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करण्याचे धाडस दाखवते आणि मुठभर ताकदवान लोकांच्या हातातील बाहुले झालेल्या सदोष न्याय व्यवस्थेविरुध्द चळवळ उभी करते याचे चित्रण यात आहे.

अशा प्रकारच्या घटनांमध्ये कायद्याची लढाई लढताना पिडीत व्यक्तीला समाजाकडून क्रूरतेने बाजूला करण्यात येते या आपल्या समाजातील सर्वात मोठ्या पेचप्रसंगाबाबत बोलताना मनीष म्हणाले की, लोकांना पहिले पाऊल उचलण्याचे धाडस होत नाही. जरी एखाद्या वेळेस त्यांनी असे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला तरी त्यांना त्या कारणाने कल्पनातीत वेदना सहन कराव्या लागतील आणि त्यासाठी फार मोठ्या धैर्याची गरज लागेल. “यातून आपल्या सामाजिक न्याय व्यवस्थेचे दर्शन घडते,” ते म्हणाले.अशा समस्यांच्या बाबतीत आपली चिंता फारच अल्पजीवी असते असे त्यांनी पुढे सांगितले. अशा घटना आपण लगेचच विसरून जातो आणि पिडीत व्यक्तीचे सांत्वन न करताच आपापली आयुष्ये पुढे जगायला सुरुवात करतो.

समाजातील नकारात्मक बाबी पाहण्याऐवजी विविध सकारात्मक पैलूंचे वर्णन करण्यासंदर्भात प्रश्न विचारल्यावर मनीष मुंद्रा म्हणाले की, ‘सिया’ सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून समाजातील सत्य गोष्टी  मांडता येतात हे महत्त्वाचे आहे. “हा चित्रपट म्हणजे केवळ दुःख नाही.आमचा चित्रपट भावपूर्ण आहे. त्यात सत्य सांगितले आहे आणि या सत्यात वेदना, आनंद, आशा आणि निराशा अंतर्भूत आहे.”  कुठल्याही गोष्टीचे नेहमीच कौतुक आणि टीका दोन्ही होत असते, मात्र आपण सकारात्मकतेवर भर दिला पाहिजे आणि चित्रपटांमध्ये समाजातील सत्याचे  दर्शन घडविले पाहिजे. “चित्रपट निर्मितीची ही माझी शैली आहे, वास्तववादी चित्रपटांचे आयुष्य खूप मोठे असते आणि असे चित्रपट लोकांच्या मनाला भिडतात,”ते पुढे म्हणाले.

पदार्पणातील सर्वोत्तम फिचर फिल्म या पारितोषिकासाठी ‘सिया’ हा चित्रपट  भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील  फिक्शन फिचर फिल्म प्रकारच्या 6 इतर चित्रपटांसह स्पर्धेत आहे. चित्रपट निर्मात्यांची पुढची पिढी पडद्यावर कोणते विषय सादर करण्याची संकल्पना करत आहे हे यावरून दिसून येते. 53 व्या इफ्फी मध्ये भारतीय पॅनोरमा विभागात फिचर फिल्म श्रेणीत ‘सिया’ चित्रपट सादर करण्यात आला. या चित्रपटातील सीता आणि महेंद्र ही प्रमुख पात्रे अनुक्रमे अभिनेत्री पूजा पांडे आणि अभिनेता विनीत कुमार यांनी रंगविली आहेत.

चित्रपटाची माहिती

दिग्दर्शक: मनीष मुंद्रा

निर्माता: दृश्यम फिल्म्स

पटकथाकार: मनीष मुंद्रा

सिनेमॅटोग्राफर: रफी महमूद आणि शुभ्रांशु कुमार दास

संकलक: महेंद्र सिंग लोधी

कलाकार : पूजा पांडे, विनीत कुमार सिंग

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरली -भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक

पुणे-पुणे शहरात गेली पाच वर्षे सुरू असलेली मेो, समान पाणीपुरवठा, उड्डाण पूल, रस्ते, पीएमपी बसेस खरेदी, आरोग्य यंत्रणांचे सक्षमीकरण आदी विकासकामांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरली असून, पराभूत मानसिकतेतून त्यांचे शहर अध्यक्ष न्यायालयात जाण्याची भाषा करीत असल्याची टीका भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.राष्ट्रवादी काँग्रेसला पाच वर्षांपूर्वी महापालिकेतील सत्ता गमवावी लागली होती. नुकत्याच झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. या पराभवातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सावरलेले नाहीत. आत्मविश्वास गमावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणेकर महापालिका निवडणुकीत पराभव करतील. इजा-बिजा-तिजा पराभव स्वीकारण्याची तयारी त्यांनी ठेवावी अशी टीकाही मुळीक यांनी केली.

मुळीक म्हणाले, पुणे महापालिकेची प्रभाग रचना कशीही झाली, तरी गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील असा भाजपला ठाम विश्वास आहे. म्हणूनच महाविकास आघाडी सरकारने नैसर्गिक हद्दींची तोडफोड करून त्यांच्या सोयीने केलेली प्रभाग रचना आम्ही स्वीकारली होती. आम्ही रडीचा डाव खेळून न्यायालयाचे दरवाजे ठोठावले नव्हते. कारण आमचा आम्ही केलेल्या विकासकामांवर आणि पुणेकरांवर विश्वास आहे.

गेल्या काही दिवसांत राज्यात आणि देशात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने निर्विवाद यश मिळविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर मतदारांचा दृढ विश्वास आहे. या उलट महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात झालेली राज्याच्या अधोगती आणि भ्रष्ट कारभाराने जनता हवालदिल झाली होती. या कार्यकाळात राज्य सरकारने पुण्यासाठी कोणताही नवीन प्रकल्प आणला नाही किंवा शहरातील चालू असलेल्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे पुण्याच्या विकासकामांना खीळ बसली. निवडणुकांना सामोरे जाण्यास राष्ट्रवादी काँग्रेसला भिती वाटते.


एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे निवडणुकांना का घाबरतात..? प्रशांत जगतापांचा सवाल

पुणे- मुळातच १४ जून रोजीच्या न्यायमूर्ती खानविलकर यांच्या आदेशानुसार पंधरा दिवसात आहे त्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचे आदेश असताना, तातडीने निवडणुका घ्या यासाठी सर्वोच्च न्यायालयात आमची याचिका असताना आणि २८ नोव्हेंबर हि त्याबाबत तारीख असताना काल शिंदे-फडणवीस सरकारने नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्यातील २४ महानगरपालिकांच्या आयुक्तांना दिले आहे असे करणे म्हणजे निवडणुका आणखी पुढे ढकलण्याचे राजकारण करणे होय असा आरोप करत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकांना का घाबरत आहेत असा थेट सवाल हि केला आहे.

जगताप म्हणाले कि,’ मागच्या ८ महिन्यांपासून राज्यातील २४ महानगरपालिका,२७ जिल्हा परिषद, ३५०पंचायत समिती व ३५०नगरपालिका यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या सर्वच ठिकाणी प्रशासक राज्य आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती. प्रशांत जगताप विरुद्ध महाराष्ट्र शासन ही याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. हे प्रकरण न्याय प्रविष्ट असून येणाऱ्या २८ नोव्हेंबर रोजी याची अंतिम सुनावणी होऊन निकाल येणे अपेक्षित आहे.असे असताना काल राज्य सरकारने रडीचा डाव खेळत नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्यातील २४ महानगरपालिकांच्या आयुक्तांना दिले आहेत,ही बाब निश्चितच सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी आहे. आज सकाळी याबाबत आम्ही सर्व पुराव्यानिशी सर्वोच्च न्यायालयाच्या ही बाब लक्षात आणून दिलेली आहे. आमचा लोकशाहीवर पूर्ण विश्वास असून मला खात्री आहेत की येणाऱ्या २८ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालय तातडीने निवडणुका घेण्याच्या आदेश देईल मुळातच १४ जून रोजीच्या न्यायमूर्ती खानविलकर यांच्या आदेशानुसार पंधरा दिवसात आहे त्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचे आदेश असताना एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे निवडणुका घेण्यास घाबरत असल्याने हा विलंब होत आहे. लोकशाहीच्या रचनेत निवडणुकींना विशेष महत्त्व असून नागरिकांना त्यांचे हक्काचे लोकप्रतिनिधी निवडण्यापासून वंचित ठेवत लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार शिंदे- फडणवीस सरकार करत आहे.असाही आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे.

इंटरनेट कॉमर्सचे लोकशाहीकरण करण्याच्या ध्येयात मीशो ओएनडिसीमध्ये सामील

बंगळूर, नोव्हेंबर २३, २०२२: भारताची तेजीने वाढणारी कॉमर्स कंपनी मीशो ने आज जाहीर केले की, ते खरेदीदारांना  अति-स्थानिक विक्रेत्यांशी जोडून  सर्वसमावेशक ई-कॉमर्स ईको सिस्टम तयार करण्याच्या भारताच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देण्यासाठी शासनाच्या ‘ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स’ बरोबर एकीकरण करीत आहेत.

            प्रत्येकासाठी इंटरनेट कॉमर्स चे लोकशाहीकरण करण्याच्या मीशो च्या ध्येयाच्या अनुषंगाने या एकीकरणामुळे अति-स्थानिक पुरवठादारांसाठी व्यापक बाजारपेठ तयार करून ग्राहकांसाठी उत्पादनांच्या शोधक्षमतेला चालना मिळून ती वाढेल. पहिले प्रायोगिक काम बंगळूर मध्ये सुरू होईल आणि येत्या काही महिन्यांमध्ये हळू हळू अन्य ठिकाणी आणले जाईल.

            मीशो च्या १४ कोटी वार्षिक व्यवहार करणाऱ्या ग्राहकांपैकी ८०% ग्राहक टीअर २+ शहरांमधून असून आता त्यासह कंपनी संपूर्ण देशभरातली ज्या ग्राहकांना ही सेवा उपलब्ध नाही अशा वापरकर्त्यांना ही सुविधा मिळवून देऊन त्यांची वाढ व्हावी म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. सध्या ८ लाखांहून अधिक विक्रेते या प्लॅटफॉर्म मध्ये नोंदीत आहेत  आणि त्यापैकी ४०% विक्रेते टीअर २ शहरांमधून आहेत. मिशोने नेहमीच ई- कॉमर्स ला अधिक सर्वसमावेशक बनविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे आणि आता ओएनडिसी सोबतचे हे एकीकरण कंपनीच्या त्या प्रयत्नांना अधिक गती देईल.

            मिशोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) श्री. विदित अत्रे म्हणाले की, लहान विक्रेत्यांना सक्षम बनविण्याच्या आणि अति-स्थानिक व्यवसायांना चालना  देण्याच्या सामायिक उद्दिष्टासह आमचे हे एकीकरण सर्वांसाठी इंटरनेट कॉमर्स चे लोकशाहीकरण करण्याच्या आमच्या प्रयत्नांना चालना देईल. अधिकाधिक ग्राहक ऑनलाइन आणून भारताच्या ई-कॉमर्स क्षेत्राचा विस्तार करण्यात ओएनडिसी महत्वाची भूमिका बजावेल. वापरकर्ता अनुभव अखंड आणि सुरळीत आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही ओएनडिसी सोबत एकत्र काम करीत आहोत.”

            ओपन् नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडिसी)चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ)श्री. टी कोशी म्हणाले की, ओएनडिसीमध्ये आमचे ध्येय एक मुक्त ई-कॉमर्स ईको सिस्टम तयार करणे आहे जी प्रत्येकासाठी सेवा देईल. मीशो सोबत या कार्यासाठी जुडताना आम्हाला आनंद होत आहे कारण लहान शहरांमधील तिची सखोल क्षमता एकूण नेटवर्क वाढविणारी गती निर्माण करेल    आणि ओएनडिसीला त्याच्या उद्दिष्टांच्या अधिक जवळ घेऊन जाईल. भारतात ई-कॉमर्स अजूनही लहान आहे आणि ओएनडिसीच्या हे क्षेत्र वाढविण्याच्या प्रवासात मीशो सारखे नवीन प्लॅटफॉर्म आमच्यासाठी एक मजबूत नेटवर्क सहयोगी ठरेल.”

२७व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला आज पासून

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीतर्फे आयोजन

(२४ ते ३० नोव्हेंबर पर्यंत विविध क्षेत्रातील वक्त्यांचे व्याख्याने)

पुणे, दि. २३ नोव्हेंबर : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत गुरूवार, दि. २४ नोव्हेंबर ते बुधवार, दि. ३० नोव्हेंबर  या कालावधीत २७वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृह, कोथरूड, पुणे येथे ेआयोजित करण्यात आली आहे.
या व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ गुरूवार, दि. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी  दुपारी ४.०० वा. होणार आहे. या समारंभासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध लेखक आणि जागतिक स्तरावरील व्यावसायिक सल्लागार प्रा. राम चरण  हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तसेच, अनामेय वैदिक आश्रमचे आध्यत्मिक गुरू स्वामी आशितोष व रामकृष्ण मिशनचे स्वामी समरपणानंद सन्माननीय पाहुणे असतील. अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड असतील.
बुधवार दि. ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११.०० वा. व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे. या समारंभासाठी राजस्थान विधानसभेचे सभापती डॉ.सी.पी जोशी, द्वारका येथील इस्कॉन मंदिराचे अमोग लिला दास, पद्मश्री शांती दूत सद्गुुरू ब्रह्मेशानंदचार्य स्वामी आणि कवी, लेखक व प्रेरक वक्ता डॉ. इंद्रजीत भालेराव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
२५ ते २९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत दुपारी ४.३० वाजता होणार्‍या व्याख्यानमालेत राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील (राष्ट्रीश शिक्षण धोरण), पुणे येथील गोखले इन्स्टीट्यूट ऑफ पॉलिटेक्निक व इकॉनॉमीचे कुलगुरू डॉ. अजित रानडे (आर्थिक वाढ आणि समानता), इस्त्रोेचे माजी शास्त्रज्ञ डॉ. भानू पंत (इस्त्रोः आज आणि उद्या), नवी दिल्ली येथील डॉ. वेदाभ्यास कुंडू (नॉनव्हाइलेंट कम्यूनिकेशन फॉर हार्मेनियस कोएक्झीटन्स), महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव श्रिकांत देशपांडे ( इन सर्च ऑफ व्हाब्रंट डेमॉक्रॉसी अ‍ॅण्ड पीस) अशा मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.
या व्याख्यानमालेला जोडूनच सकाळी ८.४५ ते १२.०० पर्यंत कार्याशाळा होणार आहे. यामध्ये आध्यात्मिक वक्ता डॉ. भावार्थ देखणे, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे माजी प्र्रभारी कुलगुरू सय्यद अहमद अली, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, विचारवंत व प्रेरणादायी वक्ते डॉ. संजय उपाध्ये, डीआरडीच्या  संशोधन आणि विकास आस्थापनाचे संचालक प्रदीप कुरूळकर, सामाजिक कार्यकर्ता रमेश पानसे, प्रसिद्ध हदय रोग तज्ञ डॉ. जगदिश हिरेमठ, रिंगणचे मुख्य संपादक सचिन परब, लेखक व इतिहास अभ्यासक प्रा.नितीन बालगुडे पाटील, युनेस्को चेअर डॉ. प्रियंकर उपाध्याय, पिस फेलो डॉ. अंजू उपाध्याय, लेखक विश्वासराव पाटील या मान्यवरांची विश्वशांती, संस्कृती व प्रबोधन इत्यादी विषयांवर व्याख्यानांची विशेष कार्यशाळाही आयोजित केली आहे.
प्रत्येक व्याख्यानानंतर वक्ता व श्रोते यांच्यामधील प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम हे या व्याख्यानमालांचे वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे या व्याख्यानमालेमध्ये २५ ते २९  नोव्हेंबर पर्यंत माईर्स एमआयटी संकुलातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी सकाळी ७.०० ते ८.०० या वेळात योगासन वर्गाचेही आयोजन स्कूल ऑफ योग अँड मेडिटेशन चे विभाग प्रमुख  प्रा. निरंजन खैरे व क्रीडा विभागाचे संचालक प्रा.डॉ. पी. जी. धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. योगासन वर्ग आयोजित करणारी माईर्स एमआयटी, पुणे ही एकमेव शैक्षणिक संस्था आहे.
‘विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये शांतता नांदेल’, हे स्वामी विवेकानंदांचे वचन व  तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु संतश्री तुकाराम महाराज यांच्या ज्ञानेश्वरी व गाथेतील ज्ञान-विज्ञानाधिष्ठित तत्त्वदर्शन हा या व्याख्यानमालेचा मुख्य हेतू आहे.
या व्याख्यानमालेसाठी शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, तसेच, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांना निमंत्रित केले असून, मानवी आणि आध्यात्मिक मूल्यांचे या व्याख्यानमालेद्वारे संवर्धन व्हावे, हा या व्याख्यानमालेमागील प्रमुख उद्देश आहे.
आयोजित व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली आहे.
अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड व २७ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पांडे यांनी दिली.