पुणे-पुणे शहरात गेली पाच वर्षे सुरू असलेली मेो, समान पाणीपुरवठा, उड्डाण पूल, रस्ते, पीएमपी बसेस खरेदी, आरोग्य यंत्रणांचे सक्षमीकरण आदी विकासकामांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरली असून, पराभूत मानसिकतेतून त्यांचे शहर अध्यक्ष न्यायालयात जाण्याची भाषा करीत असल्याची टीका भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.राष्ट्रवादी काँग्रेसला पाच वर्षांपूर्वी महापालिकेतील सत्ता गमवावी लागली होती. नुकत्याच झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. या पराभवातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सावरलेले नाहीत. आत्मविश्वास गमावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणेकर महापालिका निवडणुकीत पराभव करतील. इजा-बिजा-तिजा पराभव स्वीकारण्याची तयारी त्यांनी ठेवावी अशी टीकाही मुळीक यांनी केली.
मुळीक म्हणाले, पुणे महापालिकेची प्रभाग रचना कशीही झाली, तरी गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील असा भाजपला ठाम विश्वास आहे. म्हणूनच महाविकास आघाडी सरकारने नैसर्गिक हद्दींची तोडफोड करून त्यांच्या सोयीने केलेली प्रभाग रचना आम्ही स्वीकारली होती. आम्ही रडीचा डाव खेळून न्यायालयाचे दरवाजे ठोठावले नव्हते. कारण आमचा आम्ही केलेल्या विकासकामांवर आणि पुणेकरांवर विश्वास आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यात आणि देशात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने निर्विवाद यश मिळविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर मतदारांचा दृढ विश्वास आहे. या उलट महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात झालेली राज्याच्या अधोगती आणि भ्रष्ट कारभाराने जनता हवालदिल झाली होती. या कार्यकाळात राज्य सरकारने पुण्यासाठी कोणताही नवीन प्रकल्प आणला नाही किंवा शहरातील चालू असलेल्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे पुण्याच्या विकासकामांना खीळ बसली. निवडणुकांना सामोरे जाण्यास राष्ट्रवादी काँग्रेसला भिती वाटते.