पुणे दि.२३ : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते पुणे विमानतळावरील मल्टीलेवल पार्किंगचे दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 वाजता उद्घाटन होणार असल्याचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले. यावेळी बोलताना खासदार बापट यांनी सांगितले की पुणेकर आणि पुणे विमानतळावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना वाहनतळाचा प्रश्न भेडसावत होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी विमानतळा लगत मल्टीलेवल पार्किंग उभारण्यात आले. या वाहनतळामुळे प्रवाशांना विमानतळावर पार्किंगच्या सुविधेबरोबर इतर सुविधाही उपलब्ध होणार आहे. या वाहनतळाचे काम तातडीने पूर्ण करून ते नागरिकांकरिता उपलब्ध करून देणे गरजेचे होते. म्हणून मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होतो. सप्टेंबर २०२२ मध्ये सिंधिया हे पुणे दौऱ्यावर आले असता त्यांना या वाहनतळाच्या उद्घाटनाकरीता वेळ देणेसाठी विनंती केली असता त्यांनी उद्घाटनाकरिता वेळ देणेबाबत होकार दर्शविला. सद्यस्थितीत वहानतळाचे सर्व काम पूर्ण झाले असल्यामुळे दिनांक 25 नोव्हेंबर २०२२ रोजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सिंधिया यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रकांत पाटील, राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, वडगाव शेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे व इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे खासदार बापट यांनी सांगितले.
विमानतळावरील पार्किंगचा ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या मल्टीलेवल पार्किंगचे काम तातडीने पूर्ण करणे माझ्या दृष्टीने गरजेचे होते. काही अपूर्ण असलेल्या बाबी पूर्ण करून घेतल्यामुळे या वाहनतळाचे उद्घाटन दिनांक 25 नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्र्याचे हस्ते होणार आहे.
या संदर्भात पुणे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी सांगितले की,भारतीय विमानतळ प्राधिकरणाने २०२० साली पेबल्स इन्फ्राटेक प्रायव्हेट लि. च्या सहयोगाने मल्टीलेव्हल पार्किंग प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला.
नव्या मल्टीलेव्हल पार्किंगमुळे पुणे विमानतळावरील पार्किंगचा मोठा प्रश्न सुटणार आहे. १२० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पाच मजली एरोमॉलमध्ये सुमारे १ हजार चारचाकी व दुचाकींच्या पार्किंगची सोय असणार आहे. केवळ कार पार्किंगच नाही तर येथे प्रवाशांच्या सुविधांसाठी दालने, फुडकोर्ट अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
विमानांची आवागमन स्थिती दर्शविणारे डिस्प्लेज् पार्किंग इमारतींच्या सर्व मजल्यांवर लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना विमानांच्या वेळा समजण्यास मदत होणार आहे.
प्रवाशांना मिळणार या सुविधा
१. मोबाईलअॅप वरून स्लॉट बुक करण्याची सुविधा :
वाहनधारकांना पाच मजली पार्किंग इमारतीमधील पार्किंगची जागा (स्लॉट) निवडणे शक्य असणार आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरबसल्या पार्किंगचा स्लॉट बुक करता येणार आहे. हे अॅप येत्या महिनाभरात सुरू होईल. या अॅपच्या सुविधेमुळे प्रवाशांची गैरसोय थांबणार आहे. प्रवाशांना सुविधा देताना नव्या संकल्पनांचा विचार करण्यात आला आहे.
पेमेंटसाठी अनेकविध पर्याय – प्रवाशांना फास्टस्टॅग, क्रेडिट कार्ड, पे ऑन फूट, मोबाईल अॅप व्दारे पेमेंट करता येईल.
ज्यामुळे प्रवाशांची सोय व इमारतीतून लवकर बाहेर पडण्यास मदत होणार आहे. तसेच ‘फाईंड माय कार’ तंत्रज्ञान सुविधेच्या माध्यमातून आपली कार कोणत्या मजल्यावर पार्क आहे हे जाणता येणार आहे.
३. गोल्फ कारची सुविधा : विमानतळावर येण्या-जाणाऱ्या प्रवाशांना लिफ्ट, फुट ओव्हर ब्रीज, स्वयंचलित जिन्यांची पुरेशा संख्येने सुविधा आहेतच, त्यासोबतच विमानतळ ते कार पार्किंग दरम्यान जाण्या – येण्यासाठी वृद्धांसाठी पर्यावरणपूरक गोल्फ कार्टची (कार) व्यवस्था करण्यात आली आहे. ही सुविधा पूर्णपणे मोफत असणार आहे.
५. प्रवाशांना सोडण्यासाठी बाहेरून येणाऱ्या चालकांना विश्रांतीसाठी येथे खास विश्रांती कक्षाची स्थापन करण्यात आली आहे. तेथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था असणार आहे.
२४ तास सेवा
प्रवासी व अन्य नागरिकांकरिता हे पार्किंग बिल्डिंग (एरोमॉल) २४ तास सुरू असणार आहे. येथे त्यांना २४ तास पार्किंग सुविधेसह चांगल्या दर्जाच्या खाद्यपदार्थची चव चाखता येणार आहे. तसेच दुसऱ्या मजल्यावर छोट्या व तातडीच्या व्यावसायिक मिटिंग्जसाठी सशुल्क जागा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही आहेत वैशिष्ट्ये
१) ४ लाख ५० हजार स्केअर फूट एवढ्या भव्य पार्किंग इमारतीची (एरोमॉल) निर्मिती.
२) ३ लाख स्केअर फूट जागेचा वापर केवळ पार्किंगसाठी
३) उर्वरित १ लाख ५० हजार स्केअर फूट जागेचा व्यावसायिक वापर.
४) दुसऱ्या मजल्यावरून थेट टर्मिनल क्रमांक एक जवळील प्रस्थान गेट क्रमांक एकवर येता येईल.
५) प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच येथे दोन ट्रॅव्हलेटर फुट ओव्हर ब्रीजवर बसविण्यात येणार आहे.
६) इलेक्ट्रिक वाहनांसाठी पार्किंगमध्येच चार्जिंगची व्यवस्था.
७) इमारतीच्या छतावर सौर ऊर्जेचे पॅनल बसविण्यात आले असून ज्यामाध्यमातून निर्माण होणाऱ्या ग्रीन एनर्जीचा वापर इमारतीसाठी होणार आहे. ज्यातून पर्यावरण संरक्षणासाठीचे प्रयत्न केला गेलेला आहे.
८) २४×७ सेक्युरिटी व सीसीटीव्ही कॅमेरे.
९) सशुल्क ‘वॅले’ कार पार्किंग : पुणे विमानतळावर पहिल्यांदाच प्रवाशांना सशुल्क ‘वॅले’ कार पार्किंग ची सुविधा उपलब्ध असणार आहे.