Home Blog Page 1518

पुणे पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेसाठी १०० कोटी रुपयांचा निधी-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि. ३१: पुणे व पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेकरीता जिल्हा नियोजन समितीमधून ५० कोटी आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून ५० कोटी असे एकूण १०० कोटी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यापैकी ४१ कोटी रुपये मंजूर करण्यात येत असून उर्वरित रक्कम लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

पुणे ग्रामीण पोलीसदलाअंतर्गत वेल्हे पोलीस ठाण्याच्या दुमजली नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार दिनेश पारगे, गट विकास अधिकारी पंकज शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, राज्याची कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी पोलीस दलाला सुसज्ज साधने, आणि पोलिसांच्या निवासस्थानासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस शहर आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाला वाहनासाठी जिल्हा नियोजन समितीमधून प्रत्येकी २ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व्यायामशाळेकरिता सुमारे २ लाख रुपयापेक्षा अधिकचा निधी देण्यात आला आहे.

वेल्हे येथील पोलीस ठाण्याचे बांधकाम अद्ययावत पद्धतीने करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या पोलीस स्थानकाच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम आणि फर्निचर करण्यासाठी रुपये ३ कोटी ३४ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यापुढेही आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलाला सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. कायदा व सुव्यवस्थेचे उत्कृष्ट कार्य या इमारतीतून व्हावे, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

पोलीस विभागाकडून गुन्ह्यांची उकल करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या परिसरातील घटनेबाबत माहिती पोलिसांना दिली पाहिजे. पोलीस विभागाने निःपक्षपणे तपास करुन सर्व सामान्य नागरिकाला न्याय मिळवून दिला पाहिजे. महिला विषयक प्रकरणे, जातीय तंटे आदी प्रकरणे जलदगतीने तपास केला पाहिजे. गुन्हा घडूच नये यासाठी सदैव सावध असले पाहिजे. वेल्हा तालुकाच्या विकासासाठी मागणीप्रमाणे पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येत असून यापुढेही विकासात्मक कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील श्री. पाटील यांनी दिली.

विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. फुलारी म्हणाले, वेल्हे पोलीस ठाण्याची इमारत ही पर्यावरणपूरक व निसर्गाला साजेशी आहे. सर्वसामान्य नागरिकाला न्याय देण्यासाठी पोलीस दल कार्यरत असून पोलीस अधिकारी व कर्मचारी पारदर्शकपणे काम करावे. आपल्या परिसरात अनुचित घटना घडल्यास नागरिकांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. फुलारी यांनी केले.

पोलीस अधीक्षक श्री. गोयल म्हणाले, जुने पोलीस ठाणे ब्रिटीशकालीन इमारतीत होते. सदर इमारत मोडकळीस आल्याने येथील कामकाज सन २०१६ पासून भाडेतत्वावर जागा घेऊन सुरु करण्यात आले होते. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस स्थानकाच्या नवीन इमारत बांधकाम आणि फर्निचरसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहिती श्री. गोयल यांनी दिली.

श्री. पाटील यांनी पोलीस स्थानकाच्या नूतन इमारतीची पाहणी करुन झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच त्यांच्या हस्ते पोलीस स्थानक प्रागंणात वृक्षारोपण करण्यात आले.

सहायक निरीक्षक मनोज पवार यांचा सत्कार
यावेळी वेल्हे पोलीस स्थानकचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. पवार यांचा सत्कार करण्यात आला. श्री. पवार यांनी पानशेत हद्दीत तीन वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपीचा ४८ तासात शोध घेतला. हा खटला ‘फास्ट ट्रक कोर्टामध्ये चालविण्यात आला. उत्कृष्ट पद्धतीने तपास करुन पुरावे सादर केल्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात आली. याबद्दल भारत सरकारच्या केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत उत्कृष्ट तपासी अधिकारी म्हणून गौरव तसेच गृहमंत्री व पोलीस महासंचालक पदक प्राप्त झालेले आहे.

यावेळी परिसरातील आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.

अद्ययावत सुविधा असलेले पोलीस स्थानक
वेल्हे पोलीस स्थानकाचे एकूण चटई क्षेत्रफळ ७८३.३० चौ. मी. आहे. तळमजला मजल्यावर एकूण १२ कक्ष असून पहिल्या मजल्यावर एकूण ६ कक्ष आहेत. या पोलीस स्थानक हद्दीत एकूण १२९ गावे असून क्षेत्रफळाने मोठी हद्द आहे. यामध्ये डोंगर दरे, दोन किल्ले, ३ धरणे व पर्यटन स्थळे, शिवकालीन मेंगाई माता देवीचे मंदीर, महाराणी राजमाता सईबाई समाधीस्थळ, पाल यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांनी परिसरात वृक्षारोपणदेखील केले आहे.
0000

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश 

आक्षेपार्ह मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे मुख्य सचिवांना निर्देश

मुंबई, दि. ३१ – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत, याबद्दल अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेबसाईटवरील मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

महापुरुषांच्या बाबतीत लिखाण करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण असायला हवे, तसेच त्यामधून त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता लेखक किंवा प्रकाशन संस्थांनी घेणे गरजेचे आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन गय करणार नाही, असा इशारा देतानाच  ‘इंडिक टेल्स’ वरील लेखात आक्षेपार्ह बाबी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

०००

उपदेशापेक्षा मुलांशी संवाद साधा-योगगुरु डॉ. संप्रसाद विनोद

कसबा संस्कार केंद्राचा ३८ वा वर्धापनदिनानिमित्त सारंग सराफ, वसुधा वडके, समृद्धी पटेकर यांना यंदाचा कसबा कार्य गौरव पुरस्कार प्रदान
पुणे : आजी आजोबांना वृध्दाश्रमात ठेवायचे आणि मुलांना संस्कार वर्गात घालायचे असे विचित्र चित्र आज समाजात दिसत आहे. मुले आपल्या पालकांकडे बघून शिकत असतात आणि हे संस्कार दिर्घकाळ टिकतात. मुलांचे भावविश्व समजून घेतले तर त्यांच्यावर संस्कार करावे लागणार नाही तर ते आपोआप रुजतील. त्यासाठी मुलांना वेळ द्या, सतत उपदेश देण्यापेक्षा मुलांशी संवाद साधा, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद यांनी व्यक्त केले.

श्रुतीसागर आश्रम फुलगांव पुणे संचलित कसबा संस्कार केंद्राच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयात कसबा कार्य गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यंदाचा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते सारंग सराफ, अष्टपैलू कलाकार वसुधा वडके आणि गायिका समृद्धी पटेकर यांना प्रदान करण्यात येणार आला. यावेळी श्री देशमुख महाराज फाऊंडेशनचे प्रमुख प.पू. गुरुदास देशमुख महाराज,अॅड. प्रताप परदेशी, योगेश समेळ, सीमा सरदेशपांडे, प्रल्हाद गवळी, कसबा संस्कार केंद्राचे प्रमुख संयोजक अनिल दिवाणजी, अनघा दिवाणजी आदी उपस्थित होते.

शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमात कसबा गौरव पुरस्कार नृत्यांगना हर्षदा बांदल आणि खेळाडू प्रांजल पोटफोडे यांना प्रदान करण्यात आला. तर, बालगौरव पुरस्कार कलाकार ईशान जबडे याला देण्यात आला. संस्कार केंद्राची माहिती देणाऱ्या नविन पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच स्वाधार संस्थेतील देवदासींच्या मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. पुरस्कार वितरण समारंभानंतर विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ आणि संस्कार वर्गातील ७५ मुला-मुलींच्या सांस्कृतिक कार्यक्रमात समूहनृत्य व समूहगीत सादर केले.

प.पू. गुरुदास देशमुख महाराज म्हणाले, आज स्पर्धेच्या युगात मुलांना केवळ शिक्षण देवून चालणार नाही तर त्यांच्यावर चांगले संस्कार देखील करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या मुलांबरोबर चांगले नातेसंबध प्रस्थापित करा. आज अनेक शिवबा जन्माला येत असतील परंतु त्यांना घडविणाऱ्या जिजाऊंचा अभाव दिसत आहे. ज्या देशात संस्कारांचा पाया मजबूत असेत ते सक्षम राष्ट्र असते, असेही त्यांनी सांगितले. स्मिता जोशी, संगिता जयंत ठकार, प्रिती  नायकवडी, अपेक्षा राऊत, सोनाली खानगांवकर, सारिका पाटणकर, यशवंत पारखी, रुपेश कुलकर्णी हे मान्यवर देखील उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पूर्वा ढोले, आर्या परदेशी, दिव्या राऊत यांनी केले होते.अनघा दिवाणजी व चैताली सरमहाले यांनी सूत्रसंचालन केले. अनिल दिवाणजी यांनी प्रास्ताविक केले.

एयर इंडियातर्फे लाँच करत शिक्षणाला नवा आयाम

या हबमध्ये ७०,००० अत्याधुनिक लर्निंग टुल्सचा समावेश

गुरुग्राम, ३१ मे २०२३ – कर्मचाऱ्यांना शिक्षणाचा अनोखा अनुभव देण्यासाठी एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या विमानवाहतूक आणि स्टार अलायन्स सदस्य कंपनीने नाविन्यपूर्ण लर्निंग हब लाँच केले आहे. Gurukul.AI नावाचे हे हब कंपनीने आपले स्वरूप बदलण्यासाठी आखलेल्या पाच वर्षीय Vihaan.AI उपक्रमाशी सुसंगत आहे. या लाँचमुळे एयर इंडियाला सातत्यपूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून क्रांतीकारी बदल घडवणे शक्य होणार आहे. 

आजच्या तंत्रज्ञानाने वर्चस्व असलेल्या व्यावसायिक जगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी Gurukul.AI मध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी आपली कौशल्ये अद्ययावत करण्यासाठी आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत. यात कर्मचाऱ्याच्या कामाचे स्वरुप, क्षमता आणि कौशल्ये यांचे विश्लेषण केले जाते. या प्लॅटफॉर्मवर कंपनीतील वेगवेगळ्या पदांसाठी आवश्यक क्षमतांची माहिती देण्यात आली असून त्यानुसार शैक्षणिक मोड्युल्स उपलब्ध करून दिले जातात.

एयर इंडियाचे प्रमुख मानवी संसाधन अधिकारी डॉ. सुरेश त्रिपाठी म्हणाले, ‘Gurukul.AI लाँच करत एयर इंडियाने प्रत्येक कर्मऱ्याच्या गरजा पुरवण्यासाठी, त्यांना शिक्षणाचा आधुनिक अनुभव देण्यासाठी कंपनीची बांधिलकी दर्शवली आहे. सतत बदलत असलेल्या जगात आपली कौशल्ये तातडीने विकसित करणे आणि डिजिटल सुविधांच्या माध्यमातून जागतिक दर्जाचा कंटेंट उपलब्ध करून देणे खूप महत्त्वाचे झाले आहे. या व्यावसायिक धोरणाच्या माध्यमातून आम्ही एयर इंडियाचे अखंड शिक्षण देणाऱ्या कंपनीत रुपांतर करण्याचे ठरवले आहे.’

सध्याच्या युगात कामासाठी आवश्यक कौशल्ये असणे आणि कंपनीतील कामाच्या अनुभवासह ही कौशल्ये विकसित करत राहाणे महत्त्वाचे आहे. हेच लक्षात घेऊन Gurukul.AI यश व कार्यक्षमतेवर प्रभावी परिणाम घडवून आणण्यासाठी सज्ज झाले आहे.

जागतिक दर्जाच्या सुविधा – एयर इंडियामध्ये अत्याधुनिक, जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे, कर्मचाऱ्यांची उत्पादनक्षमता वाढवणे आणि जागतिक मापदंडानुसार त्यांची कौशल्ये विकसित करणे यावर Gurukul.AI चा प्रमुख भर आहे.

शिक्षण सहज उपलब्ध – या लर्निंग हबच्या मदतीने एयर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ज्ञानाची खाण खुली करून दिली आहे. कर्मचाऱ्यांना आपली कौशल्ये अद्ययावत करण्याची प्रेरणा मिळावी आणि स्वतःच्या विकासाची जबाबदारी स्वतःच घेण्याची संस्कृती तयार व्हावी या हेतूने या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे.

आवश्यकतेनुसार अत्याधुनिक तंत्रज्ञान – आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून Gurukul.AI मध्ये कौशल्यांचे मोजमाप करण्यासाठी समग्र यंत्रणा देण्यात आली आहे. प्रत्येकाच्या गरजेनुसार यात शिफारस केली जाते. विशेष म्हणजे, या पोर्टलमधील तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांना आकडेवारी तयार करून देत आपली प्रगती जोखण्याची संधी देते. त्याशिवाय आपल्या कामगिरीचं व्यवस्थापन करण्याची सोयही यात आहे.

वैविध्यपूर्ण साधने – या हबद्वारे ७०,००० आधुनिक लर्निंग टुल्स पुरवली जातात. त्यामध्ये लर्निंग मोड्युल्स, मायक्रो- लर्नुंग, मोबाइल लर्निंग रिसोर्सेस, व्हिडिओवर आधारित मोड्युल्स यांचा समावेश आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार निवड करता येते.

संवादी पद्धतीद्वारे शिक्षण – यात देण्यात आलेल्या लीडर बोर्डासारख्या वैशिष्ट्यामुळे टीम लर्निंग सोपे होते. त्याशिवाय लर्निंग वॉलेटमध्ये रिवॉर्ड पॉइंट्स मिळवण्याची सोय असून त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपले ज्ञान विकसित केल्याबद्दल आकर्षक लाभ मिळतात.

गेमिफिकेशन – गेमसारखे दिसणारे संवादी घटक, प्रत्यक्ष संवाद साधणारी यंत्रणा यामुळे कर्मचाऱ्यांना आपली प्रगती जाणून घेता येते. महत्त्वाचे टप्पे तसेच उद्दिष्ट पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते.

एयर इंडिया टप्प्याटप्प्याने Gurukul.AI लाँच करणार असून त्यात इनफ्लाइट सर्व्हिसेस, ग्राउंड सर्व्हिसेस आणि इंजिनियरिंगसारख्या वेगवेगळ्या विभागांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान व यंत्रणेचा समावेश केला जाईल. आगामी टप्प्यात या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वैमानिक प्रशिक्षणासाठी आधुनिक, एआयवर आधारित सुविधा दिली जाणार आहे.

अमेरिकेत राहुल गांधींच्या कार्यक्रमात खलिस्तान्यांची मुजोरी,’खलिस्तान झिंदाबाद’च्या दिल्या घोषणा

राहुल म्हणाले ,नफरत के बाजार मी मोहब्बत कि दुकान .. राहुलच्या समर्थकांनी दिल्या ‘भारत जोडो च्या घोषणा

सॅन फ्रान्सिस्को

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात खलिस्तानी समर्थकांचा सामना केला. बुधवारी ते सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करत असताना सभागृहात बसलेल्या खलिस्तानी समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यांनी हवेत खलिस्तानी झेंडे फडकावले आणि ‘खलिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी हसले आणि म्हणाले, ‘नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान’. दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींना धमकी देणारा व्हिडिओ जारी केला आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वाँटेड असलेला ‘सिख फॉर जस्टिस’चा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू हा राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकावताना दिसत आहेत. अमेरिकेत राहणारा मोस्ट वाँटेड खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू व्हिडिओमध्ये म्हणतो की, राहुल गांधी अमेरिकेत जिथे जातील तिथे त्यांच्यासमोर खलिस्तानी उभे राहतील. त्याने म्हटले की, 22 जूनला पुढचा नंबर मोदींचा आहे.

तथापि, खलिस्तान्यांच्या घोषणाबाजीनंतर तेथे उपस्थित भारतीय जनसमुदायाने प्रत्युत्तरात नफरत छोडो, भारत जोडो अशा घोषणा दिल्या.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय प्रवासींच्या मेळाव्याला संबोधित करताना, भारतातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर लोकांना ‘धमकावणे’ आणि देशाच्या एजन्सीचा ‘दुरुपयोग’ केल्याचा आरोप केला. मंगळवारी कॅलिफोर्नियातील सांता क्लारा येथे एका कार्यक्रमात गांधी म्हणाले की, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) भारतातील राजकारणाच्या सर्व माध्यमांवर नियंत्रण ठेवत आहेत. ते म्हणाले की, त्यांची ‘भारत जोडो यात्रा’ सुरू करण्यापूर्वी, राजकारणातील जुनी जीवनशैली आता चालत नाही, याची जाणीव झाली.

राहुल गांधी म्हणाले, ‘भाजप लोकांना धमकावत आहे आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत आहे. ‘भारत जोडो यात्रा’ सुरू करण्यात आली कारण भाजप-आरएसएसने लोकांशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व माध्यमांवर नियंत्रण ठेवले. “राजकीयदृष्ट्या काम करणे खूप अवघड झाले आहे, हेही आम्हाला जाणवत होते. म्हणून आम्ही भारताच्या दक्षिणेकडील टोकापासून श्रीनगरपर्यंत कूच करण्याचे ठरवले. ही यात्रा स्नेह, आदर आणि नम्रतेच्या भावनेने पार पडल्याचे गांधी म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले- भाजप आणि आरएसएसचे लोक भारताच्या विविधतेला धोका आहेत

कॅलिफोर्निया-राहुल गांधी 6 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. मंगळवारी रात्री ते अमेरिकेत पोहोचले. सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा आणि इतर आयओसी सदस्यांनी राहुल यांचे स्वागत केले. इमिग्रेशन क्लिअरन्ससाठी राहुल यांना दोन तास विमानतळावर थांबावे लागल्याचे पक्षाने म्हटले आहे. यादरम्यान, जेव्हा लोकांनी त्यांना विचारले की ते लाइनमध्ये का उभे आहेत, तेव्हा ते म्हणाले- मी एक सामान्य माणूस आहे, मी आता खासदार नाही.येथे ते सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीयांना संबोधित करत आहेतराहुल गांधी म्हणाले, ‘भारतातील काही लोकांना वाटते की त्यांना सर्वकाही माहित आहे. ते देवालाही गोष्टी शिकवू शकतात आणि आपले पंतप्रधान मोदी हे त्यापैकीच एक आहेत. भारत जोडो यात्रेत मी खचून जात नव्हतो कारण माझ्यासोबत संपूर्ण भारत होता. माझा प्रवास रोखण्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले, पोलिस बळाचा वापर केला. असे असूनही भेटीचा प्रभाव वाढला.

प्रश्न : हा कार्यक्रम यशस्वी करण्यात महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महिला आरक्षण विधेयक गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास यावर काय कारवाई करणार?

राहुल : सरकार स्थापन होताच आम्ही नक्कीच विधेयक मंजूर करू. मागील सरकारमधील काही पक्ष या विधेयकावर आम्हाला सहकार्य करत नव्हते, पण आता तसे होणार नाही.

प्रश्न : तमिळ लोकांमध्ये बंधुभावाचे नाते आहे. आपण प्रत्येक माणसाला समान मानतो. भारतात विविध धर्म, जाती आणि संस्कृतीचे लोक राहतात. राहुलजी, तुम्ही अमेरिकेत शिकलात. येथे प्रत्येक राज्याचे स्वतःचे संविधान आहे. माझा प्रश्न असा आहे की भारताला युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया बनवण्याबद्दल तुम्हाला काय वाटते?

राहुल : आपली राज्यघटना सांगते की प्रत्येक धर्म, जात आणि संस्कृतीचे लोक समान आहेत. त्यांचे संरक्षण करावे लागेल. भाजप आणि आरएसएसचे लोक भारताच्या विविधतेला धोका आहेत. माझ्यासाठी तमिळ भाषा ही केवळ एक भाषा नसून तमिळ लोकांची संपूर्ण संस्कृती आहे. मी तमिळ भाषेला कधीही धोका होऊ देणार नाही, कारण त्यामुळे भारताच्या सभ्यतेला हानी पोहोचेल. कोणत्याही भाषेला धोका हा भारताच्या एकात्मतेला धोका आहे. आमची ताकद विविधतेमध्ये आहे आणि आम्ही वेगळे असतानाही एकत्र काम करतो.

प्रश्नः फॅसिझम हा भारतातील एक मोठा मुद्दा आहे, मग तुम्ही अर्थव्यवस्था आणि विकासाच्या बाबतीत सर्व घटकांना कसे कव्हर कराल?

राहुल : देशात विविध जाती-धर्माचे लोक राहतात. त्यांना जाणून घेतल्याशिवाय त्यांच्याबाबत योग्य धोरण बनवणे शक्य नाही. जात जनगणनेसाठी काँग्रेस भाजपवर सातत्याने दबाव आणत आहे. विविध सरकारी योजनांद्वारेच आपण सर्व लोकांना वाचवू शकतो. भारतातील खरे प्रश्न आहेत महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचा हक्क. यापासून लोकांना वळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

प्रश्न : द्वेषाच्या बाजारात तुम्ही प्रेमाचे दुकान उघडले आहे. भारतातील मुस्लिमांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. त्यांच्यावर अनेक कायदे केले जात आहेत. मुस्लिम मुलांना त्यांनी न केलेल्या आरोपांसाठी तुरुंगात टाकले जात आहे. यावर तुम्ही काय सांगाल?

राहुल : आज भारतात मुस्लिम समाज आणि सर्व अल्पसंख्याकांमध्ये भेदभाव आहे. काही लोकांकडे देशाचा सर्व पैसा आहे आणि अल्पसंख्याक गरिबीच्या गर्तेत बुडाले आहेत. पण तुम्ही द्वेषाला द्वेषाने मारू शकत नाही. भारतीय लोक द्वेषावर विश्वास ठेवत नाहीत. काही लोकांनी यंत्रणा आणि माध्यमे पकडली आहेत आणि ते ही मानसिकता पसरवत आहेत. मी काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास केला आहे. भारतातील सामान्य नागरिकांची अशी मानसिकता नाही. आपण मिळून या भेदभावाला तोंड देऊ आणि प्रेमाने जिंकू.

प्रश्नः विद्यार्थ्यांना भारतात परत जाऊन भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे. पण आज तिथल्या पैलवानांची अवस्था बघून आम्हाला माघारी फिरता येत नाही. मग तुम्ही आमच्यासाठी काय कराल?

उत्तरः मीडिया आज जे दाखवतो तो भारत नाही. ते फक्त देशातील द्वेषाला ठळकपणे दाखवतात, पण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लोकांमध्ये खूप प्रेम आहे. अशा परिस्थितीत तुम्ही परत जा आणि देशाचा नावलौकिक करा. तुम्ही सर्व परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करता. त्या भावना तुम्हाला पुढे न्याव्या लागतील जेणेकरून आम्ही भाजपचा पराभव करू शकू.

अहमदनगरचे नाव आता अहिल्यानगर होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौंडी येथे घोषणा

अहमदनगर- अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणार, अशी घोषणा बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते अहमदनगरमधील चौंडी येथे आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयेजित कार्यक्रमात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर केले, उस्मानाबादचे धाराशिव केले. आता अहमदनगरचे आहिल्यानगर करणारच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात हे नामांतर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धनगर समाजासाठी आपल्या सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. विखे – पाटील यांच्या नेतृत्वात 10 हजार कोटींचा फंड तयार केला. एकाही पैशाचे व्याज न घेता मेढपाळांना कर्ज देण्याचा आम्ही निर्णय घेतला. आजपर्यंत मेढपाळांना पावसाळ्यात चरायसाठी जमीन ठरवून द्या ही गेल्या 25 वर्षांची मागणी आपण पूर्ण केली आहे. मेढपाळाकरता चरायराण राखून ठेवण्याचे काम या सरकारने केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धनगर वाड्यांना जोडण्यासाठी आपण अर्थसंकल्पात रस्त्याची तरतूद केली आहे. 22 वेगवेगळ्या योजनाचा लाभ आपण आपल्या समाजाला उपलब्ध करुन दिला आहे. धनगर समाजासाठी 1 हजार कोटींच्या कामाची सुरूवात झाली होती. मात्र, सरकार बदलले आणि एक रुपयाही मिळाला नाही. आमचे सरकार आले नी पुन्हा सर्व मागण्यासाठी निधी दिला.

अहमदनगरचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर करावे अशी मागणी चौंडीतील कार्यकमात बोलताना भाजप आमदार राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. धाराशिव केले छत्रपती संभाजीनगर केले मग आमच्या नावात बदल करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धनगर समाजासाठी दरवर्षी 25 हजार घरे बांधण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. वाडी वस्तीवर राहणारा एकही धनगर बेघर राहणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्याचे लवकरच नामांतर होणार आहे. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिंदेंनी दिली. ते चौंडी येथे एका सभेला संबोधित बोलत होते. त्यामुळे आगामी काळात हा जिल्हा ‘अहिल्यानगर’ म्हणून ओळखला जाईल, असे शिंदेंनी स्पष्ट केले.

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मागदर्शन शिबीर संपन्न


पुणे दि.30:- कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध यांच्या संयुक्त विद्यमाने पर्वती विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक बिबवेवाडी येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मागदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबीराचे उद्घाटन आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक आर.बी. भावसार, उपप्राचार्य यशवंत कांबळे, नगरसेवक महेश वाबळे तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी व विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

यावेळी आमदार मिसाळ म्हणाल्या, कोणताही व्यवसाय अथवा नोकरी ही कमी दर्जाची नसते. तरुणांनी सरकारी नोकरीच्या मागे न लागता स्विकारलेल्या क्षेत्रात चांगले काम केल्यास त्यांची निश्चित प्रगती होईल. तसेच स्वयंरोजगार व स्टार्टअपच्या माध्यमातून देखील तरुणांना अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत असेही त्या म्हणाल्या.

उपसंचालक श्री. भावसार, यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रम, मुलींसाठीच्या औद्योगिक क्षेत्रातील संधी व शासनाच्या विविध योजना, भगवान पांडेकर यांनी दहावी, बारावीनंतर पुढे काय, अरविंद केळकर यांनी Swor Analysis याबद्दल माहिती देऊन व्यक्तिमत्व विकासासंबंधी मार्गदर्शन केले.

सचिन येडे यांनी पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग अभ्यासक्रम, डिप्लोमा कोर्सेस व प्रवेश प्रक्रिया याबद्दल माहिती दिली.
0000

लोकसेवा हक्क आयोगाच्या सेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक-आयुक्त दिलीप शिंदे


पुणे, दि. ३० :- राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सेवा राज्यातील सामान्य माणसापर्यंत तत्परतेने, सहज व सुलभपणे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य हक्क अधिनियम २०१५ अंमलात आहे. या कायद्यातील तरतूदींचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून त्यासाठी विविध माध्यमांतून लोकजागृती करावी, असे आवाहन राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांनी केले.

राज्य हक्क अधिनियम २०१५ मधील तरतूदी, कार्यपद्धती व अधिसूचित सेवा ऑनलाईन पद्धतीने घेण्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत आयुक्त श्री. शिंदे बोलत होते. यावेळी आयोगाच्या उप सचिव अनुराधा खानविलकर, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, पुणे मनपाचे उप आयुक्त सचिन इथापे, श्यामला देसाई, विक्रम महिते आदी उपस्थित होते.

या अधिनियमांतर्गत ५११ सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून त्यापैकी ३८७ सेवा ऑनलाईन पद्धतीने दिल्या जात असल्याचे सांगून श्री. शिंदे म्हणाले अधिनियमामध्ये पदनिर्देशित अधिकाऱ्याने पात्र व्यक्तींना कालबद्ध लोकसेवा देणे बंधनकारक असून सेवा देण्यासाठी निश्चित कालमर्यादा आहे. कालमर्यादेत माहिती देण्यास कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपयांपर्यंत दंड लावण्याची तसेच शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. शिंदे म्हणाले, आयोग स्थापन झाल्यापासून १३ कोटी ६२ लाख इतके अर्ज प्राप्त झाले असून १२ कोटी ९४ लाख अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. तर पुणे विभागात एप्रिल २०२३ पासून ७ लाख २७ हजार ४७१ अर्ज प्राप्त झाले असून ६ लाख २८ हजार ६५० असे एकूण ८६ टक्के अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. आयोगांतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांचा लाभ आपले सरकार पोर्टलद्वारेही घेता येतो. सध्या पुणे शहरामध्ये ५८६ आपले सरकार सेवा केंद्रचालक असल्याचे सांगितले.

या कायद्यान्व्ये जिल्हाधिकारी यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. लोकसेवा हक्क अधिनियमाची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आठवडी बाजार, भित्तीपत्रके, शिबीरे, जाहिरात आदींच्या माध्यमातून प्रसिद्धी व लोकजागृती होणे आवश्यक आहे, असे श्री. शिंदे म्हणाले. पुणे जिल्ह्याने सेवा देण्यामध्ये चांगले काम केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी आयोगाची संरचना, अधिनियमाची उद्दिष्ट्ये, महत्त्वाच्या तरतूदी, आयोगाचे अधिकार, जिल्हाधिकारी यांची जबाबदारी,आपले सरकार पोर्टलमार्फत ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध असलेल्या सेवा, दैनंदिन वापरासाठी देण्यात येणाऱ्या पदनिर्देशित अधिकारी, नाविन्यपूर्ण उपक्रम याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

बैठकीला आयोगाचे अधिकारी- कर्मचारी, नागरिक, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
0000

कसबा पेठ येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन

पुणे, दि. ३० : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध यांच्यावतीने २ जून रोजी सकाळी १० वाजता रतनबेन चुनिलाल मेहता गुजराती हायस्कुल, १४३६ गणेश रोड, फडके हौद, कसबा पेठ, पुणे येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे संस्थेचे प्रभारी उपसंचालक आर.बी.भावसार यांनी कळविले आहे.

या शिबीरात इयत्ता १० वी व १२ वी नंतर करिअर, शिक्षणाच्या विविध संधीबाबत मार्गदर्शनपर व्याख्याने, सचित्र प्रदर्शन, आय.टी.आय. कोर्सच्या पुढील शिक्षणासंदर्भातील माहिती, १२ वी नंतरचे अभ्यासक्रम व प्रवेश प्रक्रियेची माहिती, शैक्षणिक कर्ज, शिष्यवृत्ती, परदेशातील शिक्षण व महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ यासंदर्भातील माहिती देण्यात येणार असून स्वयंरोजगाराबद्दल माहिती देणारे स्टॉल देखील लावण्यात येणार आहेत.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत नोंदणीसाठी क्यू. आर. कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. इयत्ता ९ वी ते १२ वी परीक्षा दिलेले विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी क्यू. आर. कोडच्या सहाय्याने नोंदणी करून शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
0000

डिजिटलसह इलेक्ट्रॉनिक्स व रेडिओ क्षेत्र “श्रमिक पत्रकार” कक्षेत घेण्याचा मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील डिजिटल पत्रकारांना दिलेला शब्द पाळला!

डिजिटल मिडिया शिंदे-फडणवीस सरकारचे आभार -राजा माने.
मुंबई,दि.३०- सहा महिन्यांपूर्वी भिलार-महाबळेश्वर येथे झालेल्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या पहिल्या ऐतिहासिक अधिवेशनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील डिजिटल मिडिया पत्रकारांना दिलेला शब्द आज खरा करुन दाखविला.डिजिटल मिडियासह इलेक्ट्रॉनिक्स माध्यम अस्थापनांना “श्रमिक पत्रकार” कक्षेत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.त्या बद्दल डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी राज्यातील डिजिटल पत्रकारांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत.
भिलार महाबळेश्वर येथे झालेल्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन भाषण करुन उद्घाटन केले होते.डिजिटल मिडिया क्षेत्राचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाद्वारे दिला होता.डिजिटल मिडियाला पत्रकारिता माध्यम म्हणून मान्यता देवून सरकार दरबारी नोंदणी व्हावी, मुद्रित माध्यमांप्रमाणे डिजिटल मिडिया ला नियमित जाहिराती मिळाव्यात, डिजिटल पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका दिल्या जाव्यात यासह सोळा मागण्या करणारे ठराव अधिवेशनात करण्यात आले होते.त्या अधिवेशनात प्रमुख पाहुणे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, सांसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सिक्कीमचे माजी राज्यपाल खा.श्रीनिवास पाटील, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा सक्रीय सहभाग होता.राज्यातील सुमारे दोन हजार प्रतिनिधींच्या उपस्थित पार पडलेल्या अधिवेशनात मांडलेले सर्व प्रश्न मार्गी लागण्याची प्रक्रिया आज मंत्रिमंडळाच्या निर्णयाद्वारे सुरु झाली आहे.संघटनेचे राज्यातील सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांच्यावतीने राजा माने यांनी एकनाथ शिंदे -देवेंद्र फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ९ वर्षात पुण्याला काय दिले ? उद्घाटने जाहिराती व भाषणे अंमलबजावणी शून्य -मोहन जोशींची टीका

पुणे-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी ते म्हणाले पंतप्रधान मोदी यांची नऊ वर्षाची कारकीर्द धुमधडाक्यात साजरी केली जात आहे
नवा भारत नवी संसद याचे नारे दिले जात आहेत पण काँग्रेसचा शहर भाजपाला यानिमित्त एकच प्रश्न आहे तो म्हणजे पुणेकरांनी तुम्हाला भरपूर दिले पुणे शहराला तुम्ही काय दिले?


ते पुढे म्हणाले,’ दोन खासदार, सर्व विधानसभा मतदारसंघात आमदार महानगरपालिकेत 98 नगरसेवक केंद्रात राज्यात आणि मनपाती एक हाती सत्ता पुणेकरांनी उदार मनाने इतके राजकीय यश दिले त्या बदल्यात पुणे शहराच्या पदरी काय पडले फक्त भ्रष्टाचार महागाई बेरोजगारी केंद्र सरकारने जायका समान पाणीपुरवठा मेट्रो स्मार्ट सिटी पंतप्रधान आवास योजना आणखी काही योजना जाहीर केल्या त्या कागदावर असतानाच निविदानाच्या पातळीवर भ्रष्टाचार.महापालिकेची सत्तेची पाच वर्षे निव्वळ भ्रष्टाचारात गेली हे सर्व पुणे शहराने पाहिले त्या भ्रष्टाचाराच्या भीतीने आता भाजपमहानगरपालिकेच्या निवडणुका घ्यायला तयार नाही काय केले घरपट्टीत महापालिकेने ठराव करून घेतलेली नागरिकांना दिलेली ४० टक्के सवलत यांनी काढून घेतली वसुली लावली ती सुद्धा चार वर्षापासूनवीस ते बावीस हजार रुपयांच्या बोजा साधे घर असणाऱ्यापर्यंत पडत होता आंदोलने करावी लागली तेव्हा कुठे परत निर्णय फिरवला
आमदार रवींद्र धंगेकर यांनी हा विषय विधिमंडळात मांडून या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळवून दिला
भ्रष्टाचारी लोक या शहरातील नागरिकांचे गुन्हेगार आहेत असा काँग्रेसचा आरोप आहे यांना सत्ता दिली ती स्वतःसाठी वापरली केंद्र सरकारची ९ वर्ष कसली साजरी करता महानगरपालिकेतल्या सत्तेतला पाच वर्षाचाकामचा लेखा जोखा पुणेकरांना हिम्मत असेल तर द्या ?असे काँग्रेसने भाजपाला आव्हान दिले आहे.

तेरा वर्षाच्या कांग्रेस पक्ष च्या प्रयत्नांमुळे 2013 रोजी मेट्रो मंजूर झाली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ डिसेंबर 2016 रोजी पुणे मेट्रोची पायाभरणी केली तब्बल सहा वर्षांनी पूर्ण झालेल्या गरवारे ते वनाज या छोट्या मार्गाचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले
३४.६ किमी चा मेट्रो प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मोदींनी कोणतेही आग्रह केल्याचे अजूनही ऐकिवात नाही
मोदीजींनी पुणेकरांना उत्तर द्यावे की अजूनही मेट्रो का सुरू होत नाहीये.स्मार्ट सिटी चे पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ जून 2016 रोजी बालेवाडी ते उद्घाटन केले झोपडपट्टी पुनर्वसन रस्ते फुटपाथ विकास रस्त्यावरील दिवस रोहित वाहतूक मला निसर्गाचे 14 प्रकल्प यात होते पुढील महिन्यात 15 जून रोजी पुण्यातील स्मार्ट सिटी प्रकल्प म्हणून सात वर्ष होत आहेत कुठलाही अजूनही कुठलाही प्रकल्प मार्गी लागलेला नाही

पंतप्रधान आवास योजना दुर्बल घटकांसाठी या योजनेतून सन 2022 पर्यंत मोफत घरे देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे योजनेअंतर्गत किती घरे बांधून दिली याची माहिती भाजपा का लपवत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन जाहिराती फोटो आणि बातम्या झाले की जणू विकास झाला असे भाजप दाखवते पुण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घोषणांचा सुकाळ आहे मात्र अंमलबजावणी चा दुष्काळ आहे पुण्याची शैक्षणिक प्रगती लक्षात घेऊन मंजूर झालेले आयआयएम नागपूरला गेली
श्री प्रकाश जावडेकर माहिती आणि नभोवाणी मंत्री असताना पुण्यातील नॅशनल फिल्म अर्किव ची स्वायत्तता संपली दूरदर्शन केंद्र मराठी बातम्या आकाशवाणी याची स्वायत्तता संपली असेही जोशी यांनी म्हटले आहे.
याप्रसंगी काँग्रेसचे सरचिटणीस प्रवक्तेरमेश अय्यर श्याबीर खान ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रशांत सुरसे शहर काँग्रेसचे चिटणीस चेतन अग्रवाल खानप्रांतिक प्रतिनिधी यशराज पारखे उपस्थित होते

‘टीडीएम’ जूनमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार

‘टीडीएम’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येत आहे. एप्रिल महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण थिएटर न मिळाल्याने उद्विग्न होत चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी हा चित्रपट थांबवण्याचा निर्णय घेतला होता. ” त्यावेळी इतर सर्व चित्रपटांना महाराष्ट्रभर दीड-दीड हजार शो दिले होते. परंतु मलाच महाराष्ट्रात केवळ १२० शो दिले, हा एका षडयंत्राचा भाग असावा” अशी शंका कऱ्हाडे यांनी उपस्थित केली आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदमध्ये बोलत होते. सोबत चित्रपट अभिनेत्री, अभिनेता हे देखील सहभागी झाले होते. सध्या टीडीएम या चित्रपटाचे प्रमोशन वेगवेगळ्या महाविद्यालयात करण्यात येत आहे.आता नऊ जूनला पुन्हा हा चित्रपट प्रदर्शित होत असून यावेळी २०० पेक्षा अधिक थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.

“२८ एप्रिल ला सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा ज्या गोष्टी घडल्या ती गळचेपी होती. ती संस्कृतीला काळिमा फासणारी गोष्ट घडली. आम्ही स्वतःहुन ‘टीडीएम’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले. एका बाजूला सर्व चित्रपटांना दीड -दीड हजार शो होते. तिथं मला महाराष्ट्रात केवळ १२० शो दिले. ही तफावत खूप वाईट होती. यावरून अस वाटतंय की हा एक माझ्या विरोधातील षडयंत्राचा भाग असावा” अशी प्रतिक्रिया भाऊराव कऱ्हाडे यांनी दिली आहे. “हे घडल्यानंतर सिनेमा करावी की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता, एवढं वाईट त्या गोष्टीचे वाटत होते, सिनेमा बनवण्यापेक्षा गावाकडे जाऊन काम करावं अशी मानसिकता झाली होती, मी संपलो अस वाटत होतं, पुन्हा सिनेमा करायचा नाही हे विचार डोक्यात डोकावत होते. परंतु महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी आम्हाला पाठिंबा दिला म्हणून पुन्हा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांनी मराठी चित्रपटासाठी नवीन नियमावली जाहीर केली. त्यात सलग चार आठवडे मराठी चित्रपट थेटरने दाखवावा असे म्हटले आहे. याचे मला समाधान वाटत आहे” अशी भावना कऱ्हाडे यांनी यावेळी व्यक्त केली.

किनारी रस्ता प्रकल्प मुंबईकरांसाठी दिलासा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 30 :- मुंबई किनारी रस्ते प्रकल्पातील बोगदे खणनाचा टप्पा मावळा-टीबीएम यंत्राने पूर्ण केला आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवास आरोग्यदायी, आरामदायी आणि वाहतूक कोंडीमुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. या प्रकल्पामुळे मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये एक महत्त्वपूर्ण अशी भर पडल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील स्वराज्यभूमी-गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क दरम्यानचा बोगदा खणण्याचा अखेरचा टप्पा- ब्रेक थ्रू मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आला. याप्रसंगी मुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, एल ॲण्ड टी कंपनी तसेच या प्रकल्पातील सल्लागार कंपन्यांचे अभियंते, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. प्रियदर्शनी पार्क येथे टीबीएम यंत्राने खोदाईचा हा अखेरचा टप्पा पूर्ण करून बोगदा पूर्ण करताच, या ठिकाणी काम करणाऱ्या अभियंते, अधिकारी, कर्मचारी-कामगारांनी एकच जल्लोष केला.

या किनारा रस्ता प्रकल्पाला छत्रपती संभाजीराजे यांचे नाव देण्याचे यापूर्वीच जाहीर केल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, एमटीएचएल हा समुद्री सेतूही आता पूर्ण होतो आहे. हा मार्ग पुढे वरळीला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम महामार्गावरील ताण कमी होणार आहे. मेट्रोचे विविध मार्ग, उड्डाणपूल यांचे काम पूर्ण होण्यामुळे पश्चिम उपनगरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील हा बोगदा खोदाईचा टप्पा पूर्ण होणे एक महत्त्वाचा टप्पा आहे. या क्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. या प्रकल्पाचे काम मार्गी लागावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विशेष सहकार्य केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे हे देखील या प्रकल्पाच्या कामावर सातत्याने लक्ष ठेवून होते. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल. तो जनतेसाठी खुला होईल, असे प्रयत्न आहेत. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन वाहतूक सुविधेत एक महत्त्वाची भर पडणार आहे. हे आव्हानात्मक काम पूर्ण केल्याबद्दल या प्रकल्पासाठी झटणाऱ्या सर्वांचेच कौतुक करावे लागेल.

मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाविषयी…

  • बोगदा खणणाऱ्या यंत्राने (TBM) खोदण्यात येणारा भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचा (व्यास १२.१९ मी.) बोगदा आहे.
  • प्रकल्पातील बोगद्याला ३७५ मि.मी. जाड काँक्रिट अस्तर. त्यावर अग्निप्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत फायरबोर्डची व्यवस्था. यामध्ये भारतात प्रथमच सकार्डो वायूविजन प्रणालीची व्यवस्था.
  • दुहेरी बोगद्यासाठी अद्ययावत वाहतूक व्‍यवस्‍थापन नियंत्रण प्रणालीची व्‍यवस्‍था. भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ (मोनोपाईल) बांधून पुलांची उभारणी.
  • प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतू वरळी टोकापर्यंतच्या या एकाच प्रकल्पामध्ये रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग, आच्छादित बोगदा, समुद्र तसेच टेकडीखालून बोगदा, हरितक्षेत्राची निर्मिती.
  • पर्यावरणपूरक पद्धतीनं काम. प्रवाळ (Coral)स्थलांतर व अस्तित्व टिकविण्याची कार्यवाही यशस्वी.
  • या सागरी किनारी रस्त्यामुळे अंदाजे ७० टक्के वेळेची बचत, ३४ टक्के इंधन बचत. इंधन बचतीमुळे प्रती वर्षी विदेशी चलनाची मोठ्या प्रमाणात बचत.
  • ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण कमी होण्यास मदत. अतिरिक्त जवळजवळ ७० हेक्टर हरितक्षेत्र निर्मितीमुळे प्रदूषण कमी होऊन पर्यायाने मुंबईकरांचे जीवनमान सुधारण्यास मदत. सुरक्षित, जलद, कमी खर्चात प्रवास
  • या प्रकल्पात हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक (Cycle tracks), सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, (Jogging tracks), खुले प्रेक्षागृह (Open Theatre) इत्यादी समाविष्ट
  • हाजीअली व महालक्ष्मी मंदिर या दोन्ही ठिकाणी वरळी येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध
  • प्रकल्पाचा अंदाजित खर्च रु. १२ हजार ७२१/-कोटी (बांधकाम खर्च रु. ८४२९/- कोटी).
  • रस्त्याची लांबी – १०.५८ कि.मी. मार्गिका संख्या – ८ (४+४), (बोगद्यांमध्ये ३+३)

शुटींगसाठी पहाटे निघालेल्या आर्टिस्टना लुटणारे दोघे गजाआड

पुणे- मराठी सिनेमाच्या शुटिंगसाठी पहाटे ४ वाजता निघालेल्या सहकलावंतांना लुटणाऱ्या दोघांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्नील दादा कोतवाल (वय २३ ,रा.शिंदेवस्ती ,हडपसर ) आणि महेश बबन गाजेसिंह (वय २९ रा.भीमनगर ,मुंढवा )अशी या २ चोरट्यांची नावे आहेत .

दि.२१/०५/२०२३ रोजी पहाटे ०४/०० वा. चे सुमारास पहाटे ०४/०० वा.च्या सुमारास फिर्यादी, व त्यांचे दोन मित्र असे सासवड, जि. पुणे येथे मराठी पिक्चरचे शुटींकरीता जाण्याकरीता स्वारगेट येथून असलेली बस पकडणे करीता निघालेले असताना, वानवडी पोलीस ठाणे हददीतील ९३ अॅव्हॅन्यू मॉल, पुणे सोलापूर रोड, येथील बी. टी. कवडे रोडचे लगत असलेल्या चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी थांबले असता, तेथे उभा असलेल्या एका इसमाने जाणीवपूर्वक फिर्यादीस धक्का मारून फिर्यादीस हाताला धरून खेचून त्याचेसोबत टपरी मागील हमरस्त्या लगतचे मोकळया व अडचणीच्या जागेत घेवून जावून, तेथे
त्या इसमाचे उभे असलेले साथीदारापैकी एकाने त्याचेकडील धारदार हत्यार काढून फिर्यादीचे मानेवर ठेवले, व फिर्यादीचे पॅन्टच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने काढून घेवून धमकी दिली व फिर्यादीला घेवून आलेल्या इसमाने फिर्यादीकडील पॅन्टचे खिशातून जबरदस्तीने असलेले पैसे काढून घेतले. तसेच फिर्यादीचे मित्र हेही फिर्यादीस पाहण्यासाठी आले असता तेथे असलेल्या आणखी दोन इसमांनी त्यांना हाताने मारहाण करून त्याचेकडील असलेले पैसे असा एकूण १९,६०० /- रुपये ( एकोणीस हजार सहाशे रुपये फक्त) किंमतीचे एक मोबाईल हॅन्डसेट व रोख रक्कम जीवे मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने काढून स्वतःचे फायदयाकरीता चोरुन नेली आहे. म्हणून फिर्यादीने वरील अनोळखी इसमांविरुध्द कायदेशीर तक्रार
दिल्याने गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक संतोष सोनवणे तपास पथक, वानवडी पोस्टे हे करत आहेत.
सदर दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास पथक प्रभारी पोउपनि संतोष सोनवणे यांनी तपासकरत असताना,बी.टी.कवडे रोड येथील गुन्हयातील घटनास्थळावरील साक्षीदार, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषन करून, वानवडी पोलीस ठाणे कडील तपास पथकातील पो.अं./ राठोड, गायकवाड, चोरमले, साळवे, सतार व इतर सर्व पोलीस अंमलदार यांनी मोठ्या शिताफिने व कौशल्याने गुन्हयातील खालील नमूद आरोपीत यांना जेरबंद करून अटक केली व त्यांचेकडुन गुन्हयातील व्हीवो कंपनीचा
मोबाईल, कोयता तसेच गुन्हयात वापरणेत आलेली दुचाकी मोपेड गाडी असे एकुण रू. ७४,२००/- रक्कमेचा गुन्हयातील मुददेमाल हस्तगत करणेत आलेला आहे.
गुन्हयातील जबरी चोर आरोपीतांची नावे खालीलप्रमाणे.
१) स्वप्नील दादा कोतवाल, वय २३ वर्षे, धंदा. राहणार शिंदे वस्ती, हडपसर, पुणे २ ) महेश बबन गजेसिंह,
वय. २९ वर्षे, राहणार राहणार भिमनगर, मुंढवा, पुणे

सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर रंजनकुमार शर्मा, पोलीस उपआयुक्त परि ५, पुणे शहर विक्रांत देशमुख, सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर सौ. पौर्णिमा तावरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरिक्षक गुन्हे संदिप शिवले व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, पो.अंम.अमोल गायकवाड, विठठल चोरमले, अतुल गायकवाड, पोहवा / अमजद पठाण, संतोष नाईक, हरीदास कदम,महेश गाढवे, विनोद भंडलकर, पोअं / संदिप साळवे, विष्णु सुतार, राहुल गोसावी, निलकंठ राठोड, व मनिषा सुतार, सोनम भगत यांनी केली आहे.