या हबमध्ये ७०,००० अत्याधुनिक लर्निंग टुल्सचा समावेश
गुरुग्राम, ३१ मे २०२३ – कर्मचाऱ्यांना शिक्षणाचा अनोखा अनुभव देण्यासाठी एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या विमानवाहतूक आणि स्टार अलायन्स सदस्य कंपनीने नाविन्यपूर्ण लर्निंग हब लाँच केले आहे. Gurukul.AI नावाचे हे हब कंपनीने आपले स्वरूप बदलण्यासाठी आखलेल्या पाच वर्षीय Vihaan.AI उपक्रमाशी सुसंगत आहे. या लाँचमुळे एयर इंडियाला सातत्यपूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून क्रांतीकारी बदल घडवणे शक्य होणार आहे.
आजच्या तंत्रज्ञानाने वर्चस्व असलेल्या व्यावसायिक जगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी Gurukul.AI मध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी आपली कौशल्ये अद्ययावत करण्यासाठी आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत. यात कर्मचाऱ्याच्या कामाचे स्वरुप, क्षमता आणि कौशल्ये यांचे विश्लेषण केले जाते. या प्लॅटफॉर्मवर कंपनीतील वेगवेगळ्या पदांसाठी आवश्यक क्षमतांची माहिती देण्यात आली असून त्यानुसार शैक्षणिक मोड्युल्स उपलब्ध करून दिले जातात.
एयर इंडियाचे प्रमुख मानवी संसाधन अधिकारी डॉ. सुरेश त्रिपाठी म्हणाले, ‘Gurukul.AI लाँच करत एयर इंडियाने प्रत्येक कर्मऱ्याच्या गरजा पुरवण्यासाठी, त्यांना शिक्षणाचा आधुनिक अनुभव देण्यासाठी कंपनीची बांधिलकी दर्शवली आहे. सतत बदलत असलेल्या जगात आपली कौशल्ये तातडीने विकसित करणे आणि डिजिटल सुविधांच्या माध्यमातून जागतिक दर्जाचा कंटेंट उपलब्ध करून देणे खूप महत्त्वाचे झाले आहे. या व्यावसायिक धोरणाच्या माध्यमातून आम्ही एयर इंडियाचे अखंड शिक्षण देणाऱ्या कंपनीत रुपांतर करण्याचे ठरवले आहे.’
सध्याच्या युगात कामासाठी आवश्यक कौशल्ये असणे आणि कंपनीतील कामाच्या अनुभवासह ही कौशल्ये विकसित करत राहाणे महत्त्वाचे आहे. हेच लक्षात घेऊन Gurukul.AI यश व कार्यक्षमतेवर प्रभावी परिणाम घडवून आणण्यासाठी सज्ज झाले आहे.
जागतिक दर्जाच्या सुविधा – एयर इंडियामध्ये अत्याधुनिक, जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे, कर्मचाऱ्यांची उत्पादनक्षमता वाढवणे आणि जागतिक मापदंडानुसार त्यांची कौशल्ये विकसित करणे यावर Gurukul.AI चा प्रमुख भर आहे.
शिक्षण सहज उपलब्ध – या लर्निंग हबच्या मदतीने एयर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ज्ञानाची खाण खुली करून दिली आहे. कर्मचाऱ्यांना आपली कौशल्ये अद्ययावत करण्याची प्रेरणा मिळावी आणि स्वतःच्या विकासाची जबाबदारी स्वतःच घेण्याची संस्कृती तयार व्हावी या हेतूने या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे.
आवश्यकतेनुसार अत्याधुनिक तंत्रज्ञान – आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून Gurukul.AI मध्ये कौशल्यांचे मोजमाप करण्यासाठी समग्र यंत्रणा देण्यात आली आहे. प्रत्येकाच्या गरजेनुसार यात शिफारस केली जाते. विशेष म्हणजे, या पोर्टलमधील तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांना आकडेवारी तयार करून देत आपली प्रगती जोखण्याची संधी देते. त्याशिवाय आपल्या कामगिरीचं व्यवस्थापन करण्याची सोयही यात आहे.
वैविध्यपूर्ण साधने – या हबद्वारे ७०,००० आधुनिक लर्निंग टुल्स पुरवली जातात. त्यामध्ये लर्निंग मोड्युल्स, मायक्रो- लर्नुंग, मोबाइल लर्निंग रिसोर्सेस, व्हिडिओवर आधारित मोड्युल्स यांचा समावेश आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार निवड करता येते.
संवादी पद्धतीद्वारे शिक्षण – यात देण्यात आलेल्या लीडर बोर्डासारख्या वैशिष्ट्यामुळे टीम लर्निंग सोपे होते. त्याशिवाय लर्निंग वॉलेटमध्ये रिवॉर्ड पॉइंट्स मिळवण्याची सोय असून त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपले ज्ञान विकसित केल्याबद्दल आकर्षक लाभ मिळतात.
गेमिफिकेशन – गेमसारखे दिसणारे संवादी घटक, प्रत्यक्ष संवाद साधणारी यंत्रणा यामुळे कर्मचाऱ्यांना आपली प्रगती जाणून घेता येते. महत्त्वाचे टप्पे तसेच उद्दिष्ट पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते.
एयर इंडिया टप्प्याटप्प्याने Gurukul.AI लाँच करणार असून त्यात इनफ्लाइट सर्व्हिसेस, ग्राउंड सर्व्हिसेस आणि इंजिनियरिंगसारख्या वेगवेगळ्या विभागांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान व यंत्रणेचा समावेश केला जाईल. आगामी टप्प्यात या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वैमानिक प्रशिक्षणासाठी आधुनिक, एआयवर आधारित सुविधा दिली जाणार आहे.