Home Blog Page 1515

साताराकडून पुण्याकडे येणारी वाहतूक नवीन कात्रजबोगद्यातून दरीपूलमार्गे

पुणे, दि. ३०: पुणे कात्रज- शिंदेवाडी रस्ता राज्य मार्ग क्र. १२६ अर्थात जुना कात्रज घाट रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरु असल्याने एकेरी वाहतूक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत. ३ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सातारा ते पुणे जुना कात्रज घाट रस्त्यावरील वाहतूक बंद करुन वाहतूक नवीन बोगद्यातून पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.

जुना कात्रज घाट रस्त्याच्या कि.मी. २२/०० ते २०/२०० या लांबीत डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरु असल्याने दुहेरी वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी व अपघाताच्या शक्यता लक्षात घेऊन या उपाययोजन करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ३ ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत या रस्त्यावर एकेरी वाहतूक करुन साताराकडून येणारी वाहतूक नवीन बोगद्यातून दरीपूल मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.

पुणे मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ मधील तरतूदीनुसार व गृह विभागाचे १९ मे १९९० च्या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी हे आदेश जारी केले आहेत.
000

पुणे कीर्तन महोत्सवात ऐका ‘कथा रणधुरंधरांच्या’

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजन : ह.भ.प. मंजुश्रीताई खाडिलकर यांना जीवनगौरव पुरस्कार
पुणे : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने ‘पुणे कीर्तन महोत्सव २०२२ – कथा रणधुरंधरांच्या’ चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ३ ते ५ डिसेंबर रोजी दररोज सायंकाळी ६ वाजता कसबा पेठेतील ऐतिहासिक लाल महालात हा कीर्तन महोत्सव होणार आहे, अशी माहिती शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी दिली.

किर्तन महोत्सवात सोमवार दिनांक ५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता कीर्तन कोविद ह.भ.प. स्व. कमलाकरबुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.  ह.भ.प. मंजुश्रीताई खाडिलकर यांना श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य  विद्या नृसिंह भारती (करवीर पीठ) यांच्या हस्ते  जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

दिनांक ३ आणि ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ह.भ.प. ज्ञानेश्वरबुवा कपलाने यांचे कीर्तन होणार आहे. तर दिनांक ५ डिसेंबर रोजी राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांचे कीर्तन होणार आहे. विक्रमादित्य, सरसेनापती उमाबाई दाभाडे, पृथ्वीराज चौहान यांच्या कथा कीर्तनातून सांगण्यात येणार आहेत. यावेळी त्यांना उदय शहापूरकर (हार्मोनियम) होनराज मावळे (तबला) साथ संगत करणार आहेत.

ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

पुणे-ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (वय 75) यांचे दीर्घ आजाराने बुधवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, कन्या, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

डाॅ. कोत्तापल्ले यांना 14 नोव्हेंबर रोजी विषाणू संसर्गाचे निदान झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्रास वाढल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणेचा आधार त्यांना देण्यात आला होता. दोन दिवसांपासून ते अत्यवस्थ होते. अखेरीस बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

डॉ. कोत्तापल्ले यांचा जन्म 6 मार्च 11948 रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला. मराठी साहित्यात पीएचडी प्राप्त केल्यानंतर ते औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात अध्यापन करू लागले. पुढे पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. प्रदीर्घ कारकिर्दीत डॉ. कोत्तापल्ले यांनी अनेक शैक्षणिक तसेच साहित्यिक संस्थांचे पदाधिकारी म्हणून काम केले.

कथा, लघुकथा, कविता, कादंबरी, अनुवाद तसेच समीक्षा व संपादन अशी बहुआयामी साहित्यिक कारकीर्द, हे डॉ. कोत्तापल्ले यांचे वैशिष्ट्य होते. चिपळूण येथे झालेल्या 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचेही ते अध्यक्ष होते. त्यांच्या अनेक साहित्यकृतींना राज्य शासनाचे पुरस्कार लाभले होते.

डाॅ. कोत्तापल्ले यांची साहित्यसंपदा

कथासंग्रह

कर्फ्यू आणि इतर कथा, संदर्भ, राजधानी, रेखा आणि पाऊस, कवीची गोष्ट, देवाचे डोळे, सावित्रीचा निर्णय

कादंबरी – मध्यरात्र, गांधारीचे डोळे, पराभव

समीक्षा – पापुद्रे, ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि शोध, नवकथाकार शंकर पाटील, साहित्य अन्वयार्थ, मराठी कविता : एक दृष्टीक्षेप, साहित्याचा अवकाश

इतर लेखन

गावात फुलले चांदणे, मराठी साहित्य संमेलन आणि सांस्कृतिक संघर्ष, उद्याच्या सुंदर दिवसासाठी, ज्योतिपर्व (ज्योतिराव फुले यांचे चरित्र), कोमेजलेला चंद्र (उडिया अनुवाद)

सुवर्णबुद्ध (अनुवाद)

सत्यधर्मी ज्योतिबा फुले

रयत शिक्षण संस्था

संपादने

अपार्थिवाचे गाणे

स्त्री-पुरुष तुलना

निवडक बी. रघुनाथ

शेतकऱ्याचा आसूड

गद्यगौरव

गद्यवैभव

सन्मान – पुरस्कार

राज्य शासनाचे पुरस्कार – मूड्स (कवितासंग्रह), संदर्भ, गांधारीचे डोळे, ग्रामीण साहित्य, उद्याच्या सुंदर दिवसासाठी, केशवराव विचारे पारितोषिक, बी. रघुनाथ पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार, परिमल पुरस्कार, गिरीष गांधी साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार

विभागीय महारोजगार मेळाव्याचे ४ डिसेंबर रोजी आयोजन

पुणे दि.२९: कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठान, पिंपळे गुरव यांच्या संयुक्त विद्यमाने ४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता विभागीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दि न्यू मिलेनियम इंग्रजी माध्यम शाळा, समर्थ नगर, नवी सांगवी, पुणे येथे आयोजित महारोजगार मेळाव्यामध्ये पुण्यासह कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे ४० पेक्षा जास्त खाजगी उद्योजक सहभाग घेणार आहेत. त्यांच्याकडून सुमारे ७ हजार ३०० पेक्षा जास्त रिक्तपदे भरण्यात येणार आहे. या पदांकरीता किमान इयत्ता ८ वी ९ वी १० वी, १२ वी तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदवीकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आदी पात्रताधारक स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.

या रोजगार मेळाव्यामध्ये स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करणारी विविध महामंडळे, दिव्यांग उमेदवारांकरीता विविध योजनांची माहिती, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे माहिती देणारे स्टॉल देखील लावण्यात येणार आहे. उमेदवारांना एकाच ठिकाणी रोजगार, स्वयंरोजगार व कौशल्य विकास प्रशिक्षणाबाबतचीही माहिती उपलब्ध होणार आहे.

इच्छूक उमेदवारांनी http://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईनपद्धतीने आपले पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पारपत्र आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डच्या प्रती सोबत आणावीत. या संधीचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाच्या उप आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलं खुलं आव्हान,’हिंमत असेल तर माझ्यासोबत मीडियासमोर डिबेट करा

मुंबई-आज आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिलं आहे.घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये गेलेत. या विषयावर हिंमत असेल तर त्यांनी माध्यमांसमोर माझ्याशी १० मिनीटं चर्चा करावी, असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं. मुळात मुख्यमंत्र्यांना प्रकल्पाबाबत माहित होतं का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माहिती अधिकारात मिळालेलं पत्र वाचून दाखवलं.

आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर अनेक आरोप केले. ते म्हणाले की, वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प एकनाथ शिंदे यांच्या सरकारमुळेच गुजरातला गेला. एकनाथ शिंदें हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. त्यांना उद्योग गुजरातमध्ये गेले, त्यावरून काही बोलायचंच नाही. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीचा संदर्भ देत शिंदे यांच्यावर आरोप केलेत.

दरम्यान आम्ही ब्लेम गेम करत नसून तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. जी गुंतवणूक आपल्या राज्यात येणार होती, ती दुसरीकडे पाठवण्यात आली, याचा पुरावा मिळाल्याचं आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं.

सुयोग हॉस्पिटलसमोर रात्री साडेअकरा वाजता खुनाचा प्रयत्न :सागर ढमढेरेसह चौघांना अटक

पुणे- धनकवडी येथील ती हत्ती चौकाकडून अहिल्यादेवी मटन शॉप कडे येणाऱ्या रस्त्यावर असलेल्या संभाजीनगरातील सुयोग हॉस्पिटल समोर एकाला जबरदस्त मारहाण करून, कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे .सागर जयसिंग ढमढेरे (वय २८ रा. धनकवडी ), ओंकार संतोष येनपुरे (वय २३) ,सुमित संतोष येनपुरे (वय २० )आणि रुपेश किसान खोपडे (वय ३२ रा. पद्मावती ) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत .या प्रकरणी योगेश पवळे (वय ३१ रा. धनकवडी ) याने सहकारनगर पोलिसात फिर्याद नोंदविली आहे.

पोलिसांनी सांगितले कि ,२७ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता सुयोग हॉस्पिटल समोर दहशत निर्माण करत या चार आरोपींनी फिर्यादीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला . यांची आपसात ओळख असून जुन्या भांडणातून राग धरून त्यांनी त्यास मारहाण केली आणि डोक्यात वार करून कोयता हवेत फिरवत दहशत निर्माण केली.या आरोपींवर भा द वि ३०७,३२३,५०४,३४ तसेच भा.ह. का. क. ४(२५),म पो अधिक ३७(१)(३) सह क्रिमिनल लों अमेंडमेंड कायदा कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे (मोबाईल -9552635151) अधिक तपास करत आहेत .

RTO कडून ६४० बाईक टॅक्सींवर कारवाई,४५ लाखांचा दंड वसूल

पुणे : रिक्षा संघटनांनी जोरदार विरोध करत संप केल्यावर त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर आरटीओ ने आता कुठे बाईक टॅक्सी चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून म्हणजेच आरटीओकडून आत्तापर्यंत ६४० बार्इक टॅक्सी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून ४५ लाख रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे. कारवार्इची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर या दुकाची चालकांना परत करण्यात आल्या आहेत.

बेकायदा प्रवासी वाहतूक केल्याचा ठपका ठेवत दुचाकी चालकांकडून दंडासह वाहतुकीचा कर ही वसूल केला जात आहे. वाहन परमीट नियमानुसार एका सिटप्रमाणे ३०६ रुपयांचा कर आकारण्यात येत आहे. तसेच, दुचाकी मालक व्यवसाय करीत असेल तर गाडीचे कागदपत्रे सादर करून त्याला १० ते २० हजारांपर्यंत दंड भरावा लागणार आहे, तर दुचाकी भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिली असेल तर चालकाला २० ते ३० हजारांपर्यंत दंड भरावा लागणार आहे, असे आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांत शहरात मोठ्या संख्येने दुचाकीचालकांनी बाईक टॅक्सीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. बाईक टॅक्सीमुळे सोसावी लागत असलेली आर्थिक झळ थांबावी यासाठी ही सेवा बंद करण्याच्या मागणीसाठी शहरातील अनेक रिक्षा संघटना रस्त्यावर उतरल्या असून वारंवार तीव्र आंदोलन करीत आहेत. बाईक टॅक्सी कायमस्वरूपी बंदी आणावी, या मागणीसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा संघटनांनी एकत्र येत आरटीओ कार्यालयासमोर सोमवारी चक्का जाम आंदोलन केले होते. हजारो रिक्षाचालक त्यात सहभागी झाले होते.

कोथरूडमध्ये पावणे ​​​​​​​10 कोटींचा अपहार करून ठेवीदारांना गंडवले,पतसंस्थेच्या चेअरमनला अटक, संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे- काेथरुड भागातील लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेच्या अध्याक्षासह संचालकांनी पावणेदहा काेटी रुपयांची फसवणूक करत ठेवीदारांना गंडावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने याप्रकरणी पतसंस्थेच्या संचालकांवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करत पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र बाबुराव पवार यांना अटक केल्याची माहिती मंगळवारी दिली आहे.

याबाबत अपर विशेष लेखापरीक्षक जे,एस. गायकवाड यांनी काेथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापिका रंजना दिपक निकम, नियंत्रक अभिजीत भाेसले, नियंत्रक वैशाली पवार, संचालक चंद्रशेखर दिनकर देशमुख व सतर सहा संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संचालकांवर एमपीआयडी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा प्रकार 1 ऑगस्ट 2015 ते 31 मार्च 2020 यादरम्यान घडलेला आहे.

लक्ष्मीबाई नागरी सहकारी पतसंस्थेचे विशेष लेखापरीक्षण करण्याचे आदेश सहकार विभागाने दिलेले हाेते. त्यानुसार पतसंस्थेच्या कारभाराचे 2015 ते 2020 यादरम्यानच्या काळातील लेखापरीक्षण करण्यात आले. कालावधीत पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी संस्थेतील निधी हा अनामत खात्याद्वारे स्वत:च्या फायद्याकरिता संचालक मंडळाची मंजुरी न देता पदाचा दुरुपयाेग करुन घेतला. त्यासाठी इतरांनी पवार यांना मदत करुन या अपहारामुळे पतसंस्था अडचणीत येणार असून ही गाेष्ट निंबधक कार्यालयास कळवणे गरजेचे हाेते. परंतु तशाप्रकारे कल्पना न देता तसेच नियंत्रक वैशाली पवार व अभिजीत भाेसले यांनी संगनमताने बाेगस कर्ज नावे टाकून अपहार करण्यात आला आहे.

खात्याची बाकी कमी करुन कमी व्याज आकारुन अपहार करणे, बँक उचल खात्यावर व्याज आकारणी न करुन अपहार करणे, दुबेरजी व्यवहाराने अनामत येणे, तारण कर्ज याद्वारे संस्थेतील रक्कमेचा अपहार करणे अशा विविध प्रकारे गैरव्यवहार करुन नऊ काेटी 74 लाख 40 हजार रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे लेखा परीक्षणातून समाेर आले आहे. त्यानुसार याप्रकरणाची दखल घेत आर्थिक व सायबर गुन्हे शाखेकडून याप्रकरणी पतसंस्थेच्या चेअरमनसह संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अडीच हजार रिक्षा चालकांवर बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे-बाइक टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अडीच हजार रिक्षा चालकांच्या विरोधात बंडगार्डन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रादेशिक परिवहन कार्यालय चौकातील ठिय्या आंदोलन करुन वाहतुकीस अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डाॅ. केशव क्षीरसागर, बाबा कांबळे, आनंद अंकुश यांच्यासह २३०० ते २५०० रिक्षाचालकांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर सोमवारी विविध रिक्षा संघटनांनी आंदाेलक रिक्षाचालकांनी या भागात दुतर्फा रिक्षा लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता. सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेले आंदोलन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आश्वासनानंतर सोमवारी रात्री मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. आदेशाचा भंग करुन वाहतुकीस अडथळा निर्माण केल्या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. शासनाच्या आदेशाचे पालन न केल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदत-आतापर्यंत 11 लाख 80 हजार अर्ज

0

मुंबई-

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलिस भरतीचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ जाहीर केली आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना सर्व्हर डाऊन असल्याने राज्यातील अनेक उमेदवारांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आतापर्यंत आमच्याकडे 11 लाख 80 हजार अर्ज आलेले आहेत. तथापि काही ठिकाणांहून ही तक्रार येते आहे की, तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

गृहमंत्री फडणवीस म्हणाले की, मागील वर्षीचे नॉन क्रिमिलीयर प्रमाणपत्र यावर्षी मिळते. त्यामुळे मागील वर्षीचे त्यांनी यावर्षी घेतल्यावर ते ग्राह्य धरले जाणार आहे. भरतीसंदर्भातील ज्या काही मागण्या आहेत, त्या आम्ही मान्य केल्या आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत, एक फॉर्म भरण्यासाठी 4 ते 5 दिवस लागत आहे. त्यामुळे आता 15 दिवसांची मुदत वाढवली असून त्यामुळे 15 डिसेंबर ही ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत राहील.

रिक्षा संप:पीएमपीएमएल’१७४०बसेस रस्त्यावर :१५ लाख ४७ हजार ९४६ प्रवासी; उत्पन्नाने ओलांडला २ कोटींचा टप्पा

‘पीएमपीएमएल’ने दैनंदिन उत्पन्नात ओलांडला २ कोटींचा टप्पा
 पीएमपीएमएल स्थापनेनंतर प्रथमच तिकीट विक्रीतून मिळाले उच्चांकी उत्पन्न.
 १७४० बसेस संचलनात.
 नव्याने ग्रामीण भागातील बंद केलेल्या मार्गावरील बसेस पुणे – पिंपरी चिंचवड शहरात संचलनात.
 १५ लाख ४७ हजार प्रवाशांनी केला पीएमपीएमएल च्या बससेवेचा वापर.
 दैनंदिन संचलनातील बसेस व्यतिरिक्त शंभर जादा बसेस संचलनात.
 दि. २८ नोव्हेंबर २०२२ रोजी तिकीट विक्रीतून १,९२,०८,९६८ रु. तर पास विक्रीतून १२,६२,७५५ रु. असे
एकूण २,०४,७८,७२३ रु. उत्पन्न प्राप्त.
पुणे — काल दि. २८ नोव्हेंबर २०२२ रोजी रिक्षा संघटनांनी बेमुदत संप पुकारल्याने पीएमपीएमएलने दैनंदिन उत्पन्नात २ कोटी रूपयांचा टप्पा पार केला असून पीएमपीएमएलला प्रथमच पीएमपीएमएल स्थापनेपासून १५ लाख ४७ हजार ९४६ प्रवाशांनी पीएमपीएमएल च्या बससेवेवर विश्वास दाखवून बससेवेचा वापर केल्याने निव्वळ तिकीट विक्रीतून १,९२,०८,९६८ रु. एवढे उच्चांकी उत्पन्न मिळाले.
पास विक्रीतून १२,६२,७५५ रु. एवढे उत्पन्न मिळाले असून असे एकूण २ कोटी ४ लाख ७८ हजार ७२३ रूपये इतक्या विक्रमी उत्पन्नाचा टप्पा पार केला आहे. यापूर्वी दि. १४ नोव्हेंबर २०२२ व दि. ४ जानेवारी २०१६ रोजी २ कोटी रूपयांचे दैनंदिन उत्पन्न पार करण्यात पीएमपीएमएल ला यश आले होते.
दि. २८ नोव्हेंबर २०२२ रोजी रिक्षा संघटनांनी बेमुदत संप पुकारल्याने पीएमपीएमएलने दैनदिन संचलनात असलेल्या बसेस व्यतिरिक्त शंभर जादा बसेस पुणे – पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी १७४० बसेस संचलनात आणल्या होत्या. तसेच पुणे – पिंपरी चिंचवड शहर हद्दीबाहेरील बसेस कमी करून दोन्ही शहरात संचलनात ठेवल्या होत्या. वाहतूक कोंडीचा विचार करता पीएमपीएमएल च्या ताफ्यात असणाऱ्या पर्यावरणपूरक स्मार्ट एसी ईलेक्ट्रीक बस व सीएनजी बसेसचा वापर शहरवासियांनी व शहरात येणाऱ्या प्रवाशांनी वाढविला आहे. दि. २८ नोव्हेंबर २०२२ रोजी १५,४७,९४६ प्रवाशांनी पीएमपीएमएल च्या बससेवेचा वापर केल्याने दैनंदिन उत्पन्नात २ कोटी रूपयांचा टप्पा पार करण्यात यश आले आहे. यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरांची लाईफलाईन म्हणून ओळख असलेली
पीएमपीएमएलची बससेवा ही किफायतशीर, सुरक्षित व विश्वासार्ह असल्याचे यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मजूर, कामगार, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या बससेवेवर नेहमीच विश्वास दाखवला आहे. त्याचबरोबर शहरातील शाळा व कॉलेज पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थी संख्येत देखील लक्षणीय वाढ झाली आहे. दैनंदिन प्रवाशी संख्या व दैनंदिन उत्पन्नामध्ये झालेली वाढ ही प्रवाशांनी पीएमपीएमएल च्या बससेवेवर दाखविलेला विश्वास आहे. प्रवाशांनी पीएमपीएमएल च्या पर्यावरणपूरक स्मार्ट एसी ईलेक्ट्रीक बस व सीएनजी बसेसचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन पीएमपीएमएल कडून करण्यात येत आहे.

नेहा पेंडसे लवकरच देणार सरप्राईस

हिंदी, मराठी अशा दोन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री नेहा पेंडसे आज वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या चाहत्यांसाठी एक सरप्राईस घेऊन येणार होती. आपल्या नवीन चित्रपटाची ती घोषणा करणार होती. मात्र आपल्या दमदार अभिनयाने मराठी, हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनामुळे या घोषणेची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. रोहित मित्तल दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती शार्दूल सिंग बायस, नेहा पेंडसे बायस आणि निखिल महाजन यांनी केली असून चित्रपटाचे लेखन श्रीपाद देशपांडे आणि रोहित मित्तल यांचे आहे. सध्या जरी या चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात असले तरी लवकरच ते प्रेक्षकांसमोर येणार आहे.

सगळ्यांचे आभार मानत नेहा पेंडसे म्हणते, ” माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुटुंबीयांनी, मित्रमंडळींनी, चाहत्यांनी माझ्यावर जो शुभेच्छांचा वर्षाव केला आहे, त्यासाठी मी सर्वांची खूप आभारी आहे. खूप छान वाटते जेव्हा आपल्यावर कोणी इतके प्रेम करते. या खास दिनी मी माझ्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करणार होते, मात्र सध्या चित्रपटाच्या घोषणेची ही योग्य वेळ नाही असे मला वाटते. आपल्या सर्वांचे लाडके, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे नुकतेच निधन झाले. सिनेसृष्टीने एक उत्कृष्ट कलाकार गमावला आहे. त्यामुळे या घोषणेसाठी आम्ही थोडी प्रतीक्षा करणार आहोत.”

निर्माते निखिल महाजन म्हणतात, ” नेहाच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही आमच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणणार होतो. यापूर्वी मी नेहासोबत ‘जून’ मध्ये काम केल्याने तिच्या कामाची पद्धत मला माहित आहे. ती एक हरहुन्नरी अभिनेत्री तर आहेच याशिवाय ती उत्तम निर्माती आहे. त्यामुळे तिच्यासोबत आणखी एक नवा प्रोजेक्ट मी करतोय. मात्र ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनामुळे आमच्या या नव्या प्रोजेक्टची घोषणा आम्ही लांबणीवर नेली आहे. विक्रम सर आणि माझे अनोखे नाते आहे. ‘गोदावरी’ आणि आज ज्या चित्रपटाची घोषणा होणार होती, त्या चित्रपटातही विक्रम सरांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. आज ते आपल्यात नाही, परंतु त्यांच्या आठवणी आमच्यासोबत कायम असतील. हा नवीन चित्रपट आम्ही त्यांना समर्पित करणार आहोत.”

अहिंसक संप्रेषणासाठी पंच तत्वांचे पालन करावे- डॉ. वेदाभ्यास कुंडू

पुणे, दि. २९ नोव्हेंबर:“  सृष्टीवर शांती निर्मितीसाठी महात्मा गांधी यांचे विचार प्रेरणादायी आहेत. सुसंवादाला सह अस्तित्वासाठी अहिंसक संप्रेषणासाठी एकमेकांचा आदर करणे, समजूतदारपणा स्विकारणे, प्रोत्साहन देणे व सहानुभूती या पंच तत्वाच्या माध्यमातूनच घडू शकते. आत्मशांती शिवाय विश्वशांतीची कल्पना सुद्धा करता येणार नाही.” असे विचार केंद्राच्या सांस्कृतिक  मंत्रालयाच्या गांधी स्मृति आणि दर्शन स्मृतिचे वरिष्ठ कार्यक्रम प्रमुख डॉ. वेदाभ्यास कुंडू यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित २७वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेत पाचवे पुष्प गुंफतांना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
तसेच डॉ. संजय उपाध्ये, धिरज सिंग, डॉ. सौरभ चतुर्वेदी, डॉ.मिलिंद पात्रे, अनामिका बिश्वास व महेश थोरवे उपस्थित होते.
डॉ. वेदाभ्यास कुंडू म्हणाले,“ शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान मोलाचे आहे.  आपला संवाद आपले जीवन बनविते तसेच त्याचा परिणाम कार्याच्या ठिकाणी होतो. भगवान गौतम बुद्धांनी शांतीचा मंत्र दिला आहे, परंतु त्याचे पालन किती होते हा एक मुद्दा आहे. अहिंसक संवादामध्ये आपली भाषा, सकारात्मकता, भावनात्मकता, ज्ञान, भाषेमुळे किती नागरिकांवर त्याचा परिणाम होतो हे प्रत्येकाने तपासणे गरजेचे आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ महात्मा गांधी यांनी अहिंसक तत्वाचे पालन करून सृष्टीवर जीवनाचे नवे तत्वज्ञान सांगितले आहे. आध्यात्मिक जीवन जगणाऱ्या गांधीजींनी शेवटच्या क्षणाला सुद्धा हे राम या शब्दांचा उच्चार केला होता. त्यांनी जीवनाची नवी दिशा दाखविली आहे.”
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात प्रेरणादायी वक्ता प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी ‘ युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर ते म्हणाले,“ एक हजार वर्षांचे नियोजन करणारे युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखा राजा सृष्टीवर होणे असंभव आहे. सैनिकांना दिलेल्या कौतुकाच्या थापेवर त्यांनी स्वराज्य उभे केले. कायद्याचे व न्यायाचे राज्य आणणाऱ्या राजांच्या दरबारात कारणे देणारी माणसे नसल्यामुळे मोठी क्रांती घडून आली. सध्यादेशात जी राज्य राखीव दलाची कल्पना आहे, ती राजांची देण आहे. अनेक लढाया या बुद्धिने लढता येतात, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.”
वरिष्ठ पत्रकार सचिन परब यांनी ‘ भारताच्या जडण घडणीत महाराष्ट्रातील संतांचे योगदान’ यावर ते म्हणाले,“ भारताच्या जडणघडणीत संताचे खूप मोठे योगदान आहे. हिंगोली येथील संत नामदेव यांनी शिखधर्माच्या स्थापनेसाठी सुद्धा मोठे योगदान दिले आहे. त्यामुळेच पंजाब, गुजरात आणि राजस्थान येथे त्यांची देवळे दिसतात. एकट्या राजस्थान येथे ३०० देवळे आहेत. त्याचप्रमाणे संत कबीरांच्या दोह्या मध्ये नामदेवांचा उल्लेख सापडतो. तसेच संत जनाबाई या स्त्री मुक्तीच्या पहिल्या जनक आहेत असे संबोधू शकतो. संत मीराबाई, गोरा कुंभार, सावतामाळी बरोबरच अनेक महाराष्ट्रातील संतांनी सांगितलेल्या भारतीय परंपरेच्या तत्वावर आपण जगत आहोत.”
डॉ. महेश थोरवे यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषण केले.
प्रा. रवी साहू यांनी सूत्रसंचालन केले. अनामिका बिश्वास यांनी आभार मानले.

शिवाजीनगर,डेक्कन परिसरात दि. १ व ४ रोजी वीजपुरवठा बंद राहणार

पुणे, दि. २९ नोव्हेंबर २०२२: औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावरील महापारेषणच्या १३२ केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांसाठी नवीन मनोरे उभारणीचे व इतर दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि. १ डिसेंबर) सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत तसेच रविवारी (दि. ४ डिसेंबर) सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत शिवाजीनगर, डेक्कनमधील काही परिसराचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

याबाबत माहिती अशी की, गणेशखिंड येथे महापारेषणचे १३२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र आहे. या उपकेंद्राला गणेशखिंड ते चिंचवड आणि गणेशखिंड ते रहाटणी या अतिउच्चदाब १३२ केव्ही वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र या दोन्ही वीजवाहिन्यांचे मनोरे व तारांमुळे औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. तो दूर करण्यासाठी महापारेषण कंपनी व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने नवीन मोनोपोल टॉवर उभारण्यात येणार आहे.

दोन टप्प्यांमध्ये नवीन टॉवर उभारणी व १३२ केव्ही वीजवाहिन्यांच्या इतर तांत्रिक कामांमुळे महापारेषणच्या गणेशखिंड १३२ केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे महावितरणच्या ११ केव्ही व २२ केव्ही क्षमतेच्या एकूण ३२ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद राहणार आहेत. यात शिवाजीनगरमधील २८ तर कोथरूड विभागातील ४ वीजवाहिन्यांचा समावेश आहे. त्यामुळे पूर्वनियोजित कामाच्या वेळेत शिवाजीनगर परिसरातील सुमारे ३८ हजार ३०० तसेच डेक्कन व जंगली महाराज रोड परिसरातील सुमारे ८ हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा नाईलाजास्तव बंद ठेवावा लागणार आहे.

पहिल्या टप्प्यात गुरुवारी (दि. १) सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत तसेच दुसऱ्या टप्प्यात रविवारी (दि. ४) सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत शिवाजीनगर व डेक्कनच्या काही भागात वीजपुरवठा बंद राहील. यामध्ये एफसी रस्ता, वाकडेवाडी, मॉडेल कॉलनी, मोदीबाग १, रेंज हिल्स, ई-स्क्वेअर, वडारवाडी, गोखलेनगर, लकाकी रस्ता, सेनापती बापट रस्ता, हनुमाननगर, मंगलवाडी, वेताळबाबा चौक, राजभवन, खैरेवाडी, अशोकनगर, यशवंत घाडगेनगर, पोलीस लाईन वसाहत, घोले रस्ता, शिवाजीनगर गावठाण, काँग्रेस भवन, सावरकर भवन, जिल्हा न्यायालय, कामगार पुतळा, तोफखाना, मंगला टॉकीज, आयआयटीएम, कॅस्टेल रॉयल टॉवर, काकडे मॉल, एसएसपीएमएस कॉलेज, रेव्हेन्यू कॉलनी, आकाशवाणी, शिमला ऑफीस, सीआयडी वसाहत, संचेती हॉस्पीटल, लक्ष्मी रस्ता, नारायण पेठ, शनिवार पेठ व सदाशिव पेठचा काही भाग, चित्रशाला, आपटे रस्ता, शिरोळे रस्त्याचा अर्धा भाग, जंगली महाराज रस्ता, पुलाची वाडी, छत्रपती चौक, आयएमडीआर कॉलेज, गणेशवाडी आदींचा समावेश आहे.

औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावर नवीन मनोरे व अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांच्या अत्यावश्यक कामांमुळे नागरिकांनी गुरुवारी व रविवारी वीज बंदच्या पूर्वनियोजित वेळेत सहकार्य करावे असे आवाहन महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे.

‘फ्रेंच फ़्राईस’, ‘पँडेमिक द ब्राइट साइड’, ‘स्पेशल पेन्टिंग’ आणि ‘लुडो क्वीन’ लघुपटांचे गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव “एनएफडीसी फिल्म बाजार” स्पेशल स्क्रिनिंग

भारतातील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या “गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव” आणि  “एनएफडीसी फिल्म बाजार” २०२२ मध्ये पहिल्यांदाच लघुपट निर्मितीत उतरलेल्या ‘गामा फाऊंडेशन फिल्म्स’ने बाजी मारली आहे. त्यांच्या चारही मराठी लघुपट चित्रपट या विभागात यावर्षीच्या “मार्केट स्क्रीनिंग” आणि “विव्हिंग रूम” या विभागात स्क्रीनिंग संपन्न झाले आहे. या चारही लघुपटांसाठी ‘गामा फाऊंडेशन फिल्म्स’सोबत ‘छाया प्रॉडक्शन’ने सहनिर्मिती केली आहे. या महोत्सवात या लघुपटाचे सिलेक्शन झाल्याने यातील आशय वैश्विक स्तरावर पोहचण्यास विशेष मदत झाली असून देश विदेशातील अनेक मान्यवरांनी या लघुपटांचे कौतुक केले आहे.

एन.एफ.डी.सी फिल्म बाजार हे एक प्रकारचे संपूर्ण चित्रपटसृष्टी करता लागणारी आर्थिक सहाय्य व्यवस्था आणि सहनिर्मिती त्याच बरोबर फिल्म्स रिलीझ व  डिस्ट्रिब्युशन यांचा दुवा जोडणारे व्यासपीठ आहे. विविध दर्जेदार कलाकृतींना भक्कम पाठबळ देण्याचे काम एन.एफ.डी.सी फिल्म बाजार सातत्याने करीत आहे.

‘गामा फाऊंडेशन फिल्म्स’ निर्मित आणि ‘छाया प्रॉडक्शन’ सहनिर्मित एकूण ४ लघुपटांचे प्रदर्शन करण्यात या महोत्सवात करण्यात आले.[ (फ्रेंच फ़्राईस (हॉरर) /पँडेमिक द ब्राइट साइड( फॅमिली ड्रामा)/स्पेशल पेन्टिंग (हॉरर) /लुडो क्वीन (हॉरर) ] लघुपटांचे दिग्दर्शन अनुक्रमे अमृता देवधर आणि नंदू धुरंधर यांनी केले आहे. या लघुपटांचे कथा लेखन अमृता देवधर आणि कल्पना राणे यांनी केले आहे.

गोव्यातील महोत्सवाला दिग्दर्शिका अमृता देवधर, दिग्दर्शक नंदू धुरंधर,  सहनिर्माते संदीप कामत उपस्थित होते.  भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI), आशियातील सर्वात जुना व भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असून दरवर्षी या महोत्सवात दर्जेदार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपटांची निवड होते. चित्रपट रसिकांसाठी ही एक पर्वणी असते.