Home Blog Page 1502

पुण्याच्या प्रश्‍नांवर लवकरच बैठक ! मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन : प्रमोद भानगिरे यांची माहिती

पुणे -शहरात निवासी मिळकतींची 40 टक्के करसवलत पुन्हा सुरू करणे. वाढीव पाण्याचा कोटा मिळावा, ससूनच्या धर्तीवर हडपसर भागासाठी नवीन रुग्णालय, समाविष्ट गावांच्या विकासासाठी हजार कोटींचे अनुदान अशा विषयांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यातील अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेणार आहेत, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी दिली.

भानगिरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शहराच्या वेगवेगळ्या समस्या तसेच प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी बैठक घेण्याच्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

भानगिरे म्हणाले, “शहराचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. त्यात मिळकतकर सवलत, वाढीव पाणी कोटा, वाहतूक समस्या, मुळशी धरणातून शहरासाठी वाढीव 5 टीएमसी पाणी, पीएमपी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा, यासह हडपसर विधानसभा मतदारसंघातील अनेक समस्यांचे निवेदन देण्यात आले आहे. हे प्रश्‍न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून तातडीने या बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या प्रश्‍नांशी संबधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जाणार असून लवकरच मुंबईत ही बैठक घेतली जाणार आहे.’

राज्य उत्पादन शुल्क विभागाला नोव्हेंबर अखेरपर्यंत १२ हजार ९५२ कोटींचा महसूल

मुंबई दि. ०९ : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत १२ हजार ९५२.८२ कोटी रूपयांचा महसूल जमा झाला आहे.

विभागाने  सन 2021-22 यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर अखेरपर्यंत 9748.96 कोटी रूपयांचा महसूल जमा केला होता. सन 2021-22 यावर्षीच्या तुलनेत यावर्षी महसूलात 32.86 टक्के वाढ झाली आहे. राज्यात एप्रिल 2022 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत 34,164 गुन्ह्याची नोंद झाली असून 28 हजार 66 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 106.15 कोटी रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग राज्यात मद्य निर्मिती, घाऊक विक्री, किरकोळ विक्री इ. अनुज्ञप्त्या देणे व त्यांची तपासणी करुन नियमन करणे, मद्यावरील कर गोळा करणे इ. कार्य प्रामुख्याने करीत आहे. तसेच राज्यातील अवैध मद्य निर्मिती विक्री, वाहतूक, बनावट मद्य, परराज्यातून होणारी अवैध मद्याची तस्करी इ. विरुध्द सज्ज राहून महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 अन्वये फौजदारी गुन्हे दाखल करुन त्याचे उच्चाटन व नियंत्रणाचे कामकाज करीत आहे.

अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून तक्रारदार तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून तक्रार नोंदविण्यासाठी 18002339999 हा टोल फ्री क्रमांक, 022-22660152 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 8422001133 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधावा, त्याचप्रमाणे stateexcise.controlroom@gmail.com या ईमेलवर संपर्क करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.

राज्य सरकार कोणतीही भूमिका घेत नाहीत व चूकीच्या गोष्टींची पाठराखण करत आहेत-खासदार सुप्रिया सुळे

पंतप्रधानांची भेट घेऊन सुद्धा राज्याचे प्रश्न मांडले नाही हे राज्याचे दुर्दैव

पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाली तेव्हा राज्याच्या वतीने ईडी सरकारमधील लोकसभा सदस्यांपैकी कोणीही सीमाप्रश्न अथवा इतर प्रश्न मांडले नसतील तर ते राज्याचे दुर्दैव आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या,’ ईडी सरकारमधील सत्तेत असलेल्या सदस्यांपैकी एकाही सदस्याने पार्लमेंट सुरू होऊन तीन दिवस उलटून देखील राज्यातील कोणत्याही विषयाबद्दल बोलेलं माझ्या कानावर आलेलं नाही .त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज तसेच राज्यातील इतर प्रश्नांवर अतिशय असंवेदनशीलपणे ईडी सरकार वागत आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.तसेच पुढे सुप्रियाताई म्हणाल्या की, या चर्चेमध्ये सर्वपक्षीय सहभाग अपेक्षित होता जर एकत्रितपणे गेलो असतो तर जास्त योग्य ठरले असते. या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित करायला हवी होती. यापूर्वी अशा काही घटना घडल्या की तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी पक्षपात न करता राज्य ही पहिली अशी भूमिका घेतली. मात्र विद्यमान सरकारमधील मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री राज्याच्या हितासाठी कुठेही विरोधी पक्षाला विश्वासात घेताना दिसत नाही. सीमाप्रश्नाचा वाद चिघळला त्यावेळी पहिले चोवीस तास राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे राज्य सरकार कोणतीही भूमिका घेत नाहीत व चूकीच्या गोष्टींची पाठराखण करत आहेत हे राज्याचे दुर्दैव आहे असे त्या म्हणाल्या.

‘फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली’ या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण…

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली, असं विधान केलं आहे. यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका टिप्पणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारपरिषद घेत आपल्या वक्तव्यांबद्दलची भूमिका मांडली आहे.महापुरूषांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागीतली या विधानाचं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी समर्थन केलं आहे. पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी त्यांच्याबद्दल आदरच व्यक्त केला आहे. त्या शाळा सुरू करताना त्यांनी सरकारकडे अनुदान मागितलं नाही, त्यांनी लोकांकडे भीक मागितली. आता भीक म्हणजे काय, आत्ताच्या भाषेत सीएसआर, वर्गणी किंवा देणगी म्हणू असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “मला असं वाटतं कीतुमच्या(प्रसारमाध्यम) माध्यमातून मी काय म्हटलं हे मी सांगण्यापेक्षा लाईव्ह सगळ्यांनी पाहीलं असेल, की ज्यामध्ये. शाळा कोणी सुरू केल्या? डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीरभाऊराव पाटील, महात्मा फुलेंनी सुरू केल्या आणि मग त्या शाळा सुरू करताना, ते शासकीय अनुदानावर अवलंबुन राहिले नाहीत, त्यांनी लोकांकडे भीक मागितली. भीक म्हणजे काय आताच्या भाषेत सीएसआर, वर्गणी, देणग्या म्हणूयात. पण आपण साधरणपणे असं म्हणतो की, दारोदार भीक मागितली आणि मी माझी संस्था वाढवली.”याचबरोबर “माझी व्हिडीओ क्लिप जर पूर्ण ऐकली तर मी त्यामध्ये पैठणला आणखीही खूप मांडलं आहे. त्यांची तर प्रचंड वाहवाह सगळ्या वारकऱ्यांमध्ये आहे. तिथे मोठ्यासंख्यने वारकरी संप्रदाय उपस्थित होता. त्यामध्ये मी असं मांडलय, की जर आपल्याल संत विद्यापीठ सुरू करायचा असेल, तर सरकारही मदत करेल. पण सरकाच्या मदतीवर कशाला अवलंबून राहता?, समाजात खूप लोक देणारे आहेत. त्यावेळी मी हे वाक्य जोडलं की शाळा कोणी सुरू केल्या? डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीरभाऊराव पाटील, महात्मा फुलेंनी सुरू केल्या. त्यांना सरकार अनुदान देतय म्हणून त्यांनी सुरु नाही केल्या, वेळप्रसंगी त्यांनी लोकांकडे भीक मागितली. त्यावेळी दहा रुपये सुद्धा लोक द्यायचे, त्यातून त्यांनी संस्था चालवल्या.” असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

भीक एवजी देणगी शब्द वापरावा का असे विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, अरे बाबा मधुकरी मागून शिकलो म्हणजे काय? भीक मागून शिकलो. लोकांकडे हात पसरून मी शाळा चालवल्या, धान्य गोळा करायचे भाऊराव पाटील. मी त्या भागातला आहे, माहिती नसेल तर कर्मवीर भाऊराव पाटील वाचा असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

हे घरोघर धान्य मागायचे त्याला देणगी मागत होते असं म्हणू. हा प्रचलित शब्द आहे की भीक मागून मी माझी संस्था वाढवली यात काय चुक आहे, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना राबविण्याचा प्रयत्न करणार -राजेश पांडे

पुणे-युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविण्याचा प्रयत्न मी निश्चित करणार आहे असे भाजपाचे राजेश पांडे यांनी म्हटले आहे . महाराष्ट्र सरकारच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) राज्य सल्लागार समितीची नुकतीच पुनर्रचना करण्यात आलीय. या समितीत अशासकीय सदस्य म्हणून पांडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानून ते म्हणाले ,’राज्यातील सर्व प्रकारची विद्यापीठे तसेच महाविद्यालयांतील एनएसएसचे कामकाज अधिक कार्यक्षम पद्धतीने व्हावे, म्हणून ही समिती काम करत असते. दर तीन वर्षांनी या समितीची पुनर्रचना करण्यात येते. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंसह एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी यांचा समावेश असतो. समितीत अशासकीय सदस्य म्हणून माझ्यासोबत राज्याचे माजी संपर्क अधिकारी डॉ.प्रमोद पाब्रेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सहायक प्रा. डॉ. सतीश लोकपाल चापले यांचाही समावेश आहे.

पांडे पुढे असे म्हणाले कि,’या समितीच्या सदस्यपदी झालेली निवड म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या माध्यमातून मी केलेल्या कामाची पावती आहे, असे मी मानतो. गेल्या ४० वर्षातील विद्यार्थी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि युवकांसंदर्भातील कामाचा आणि सेवेचा अनुभव या समितीच्या माध्यमातून उपयोगात आणून केलेली निवड सार्थ ठरवेन, याबद्दल मला विश्वास आहे.तरुणांमध्ये समाजसेवेची जाण झाल्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे राष्ट्रसेवा होय. शिक्षण क्षेत्रातून सेवासंस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविण्याचा प्रयत्न आमच्याकडून नक्कीच केला जाईल, याची सर्व समिती सदस्यांच्यावतीने ग्वाही देतो.

न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा आ.टिंगरेंचा केविलवाणा प्रयत्न-भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक

पुणे-जी 20 परिषदेच्या निमित्ताने होत असलेल्या रस्त्यांच्या कामाचे श्रेय वडगावशेरीचे आमदार घेत असून, त्यासाठी त्यांनी कोणतेही प्रयत्न केले नसून आयत्या पीठावर रेघोट्या ओढत असल्याची टीका भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

मुळीक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला यावर्षी जी 20 परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे. त्यातील तीन परिषदा पुण्यात होणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकसित आणि विकसनशील देशांचे उच्चस्तरीय प्रतिनिधी या परिषदेसाठी येणार आहेत. भारताची देशात प्रतिमा निर्माण करण्यासाठी ही एक संधी आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू झाले आहेत. त्याच कामाचा भाग म्हणून विमानतळाकडे जाताना प्रवेशद्वारापासून ते येरवडा कडे जाणारा रस्ता, त्याचबरोबर फाईव्ह नाईन चौक ते विश्रांतवाडी कडे जाणारा रस्ता महापालिकेच्या वतीने नव्याने बनविण्यात येत आहे. यात वडगाव शेरीच्या आमदारांचे कोणतेही योगदान नाही परंतु भाजपने केलेल्या विकासकामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न ते करत आहे.

मुळीक पुढे म्हणाले, महाविकास आघाडीच्या सत्ता काळात पुणे शहरात कोणताही नवीन प्रकल्प आलेला नाही. वडगाव शेरीत आमदारांच्या निष्क्रियतेमुळे विकासकामे झाली नाहीत. परंतु भाजपच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांचे श्रेय ते घेत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या कामांची माहिती घ्यायची आणि त्याप्रमाणे पत्र द्यायचे याचा अर्थ त्यांनी काम केले असे होत नाही. वडगावशेरीतील नागरिकांची ते दिशाभूल करीत आहेत. भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत केंद्राच्या माध्यमातून सुरूअसलेल्या नगर रस्ता शिरूर उड्डाणपूल ही त्याची काही उदाहरणे आहेत.

नॅशनल फिनस्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पश्चिम बंगालची सात सुवर्णपदकासह आघाडी

पुणे : अंडरवॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया (USFI) द्वारे आयोजित दुसऱ्या नॅशनल फिनस्विमिंग चॅम्पियनशिपला पुणे 2022 ला शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे – बालेवाडी येथे आज सुरूवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पश्चिम बंगालने सात सुवर्णपदकासह १२ पदके पटकावत आघाडी घेतली, तर केरळने एका सुवर्णपदकासह 8 पदके मिळवली.

दुसऱ्या नॅशनल फिनस्विमिंग चॅम्पियनशिपला पुणे 2022 स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सुहास दिवसे (क्रीडा आयुक्त), सुभाष पाटील ( उप संचालक क्रिडा विभाग), यूएसएफआईचे जनरल सेक्रेटरी व द्रोणाचार्य पुरस्कार विजेते राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. तपन पाणिग्रही, अचिंता पंडित (कोषाध्यक्ष USFI),रियर एडमिरल पीडी शर्मा (अध्यक्ष RLSS (I),गौरव भट्टाचार्य आदी उपस्थित होते

स्पर्धेच्या पहिल्या दिवसाच्या समारोपानंतर लाईफ सेव्हिंग स्पोर्टची प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली. यात विविध राज्यांतील जलतरणपटूनी वैविध्यपूर्ण कसरती सादर केल्या. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे स्पर्धेला शुभेच्छा दिल्या

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
पुरुष 800 मीटर गटात प्रतीक पासी( छत्तीसगड) ला सुवर्णपदक, तर मॅचा राजू ( पाॅंडेचरी) रौप्य पदक, तर आकाश व्ही. एस (केरळ) कांस्य पदक, महिलांमध्ये द्विपन्विता मंडल (पश्मि बंगाल) सुवर्ण, सोहेली मंडल( पश्चिम बंगाल) रौप्य, प्रभालक्ष्मी डी (तामिळनाडू) कांस्य पदक पटकावले.

मुले (ज्युनिअर बी) 400 मीटर बीएन- फिन स्विमिंग गटात पौल आरम( केरळ) सुवर्णपदक), मानस मकड( गुजरात) रौप्य, प्रणित एस ( तामिळनाडू) कांस्य तर, मुलीमंध्ये ओलिविया बॅनर्जी( केरळ) सुवर्ण, नेहा सन्नाभाटी ९ पश्चिम बंगाल) रौप्य पदक, तर बानसुरी मकवाना (गुजरात) कांस्य पदक मिळाले.

मुले (ज्युनिअर सी) 200 मीटर बीएन- फिन स्विमिंग गटात अभिनव एस( केरळ) सुवर्ण पदक, ध्रुव टंक (गुजरात) रौप्य, तन्मय कौसल्या( तेलंगणा) कांस्य, तर मुलींमध्ये नादिया सैफ( केरला) सुवर्ण, अभिरामी पी.जे (केरळ) रौप्य, विहा जानी (गुजरात) कांस्य

मुले (ज्युनिअर डी) 200 मीटर बीआई- फिन स्विमिंग गटात जय जसवंत आर (तामिळनाडू) सुवर्ण, ईशांत (हरियाणा) रौप्य, त्रिदीप मंडल( पश्चिम बंगाल) कांस्य तर मुलींमध्ये रायमा चक्रवर्ती( पश्चिम बंगाल) सुवर्ण, श्रीजा साहा( पश्चिम बंगाल) रौप्य, तर निया पतंगे ( महाराष्ट्र) कांस्य,

मुले (ज्युनिअर ई) 200 मीटर बीआई- फिन स्विमिंग गट- श्रीशंक साहा( पश्चिम बंगाल) सुवर्ण, सचिनसात्विक सुरेशसरिता( तेलगंणा) रौप्य, तर विजयाशंकर पीव्ही( केरळ) कांस्य, मुलींमध्ये- सोहिनी दत्ता( पश्चिम बंगाल) सुवर्ण, सिल्मी हिबाह(पश्चिम बंगाल) कांस्य, व्यासघी के.एस. (केरळ) कांस्य पदक

200 मीटर बीआई फिन स्विमिंग (मास्टर व्हि ओ पुरुष गटात) ओमदत्त सिंग (उत्तराखंड) सुवर्णपदक, तर महिला गटात वेदनाथम भानुप्रिया ( आंधप्रदेश) सुवर्ण)

50 मीटर सरफेस मोनेफिन सीनिअर ए गटात पुरुषांमध्ये प्रल्हाद साहनी (उत्तरप्रदेश) सुवर्ण, चार्ल्स येन्नु( तेलगंणा) रौप्य, दीपक चौहान ( उत्तरप्रदेश)कांस्य, तर महिलांमध्ये सुनंदा दत्ता( पश्चिम बंगाल) सुवर्ण, साची ग्रामोपाध्ये ( गोवा) रौप्य, साग्रती मौर्या ( उत्तरप्रदेश) कांस्य,

50 मीटर सरफेस मोनेफिन ज्युनिअर बी- गट मुलांमध्ये दिबांका दास ( पश्चिम बंगाल) सुवर्ण, धनुष पी.जे (केरळ) रौप्य, जी. जैस (केरळ) कांस्य पदक तर मुलींमध्ये जिनल पित्रोदा( गुजरात) सुवर्ण, रिशीता दत्ता ( पश्चिम बंगाल), खुशी बेरा ( पश्चिम बंगाल) कांस्यपदक,

50 मीटर सरफेस मोनेफिन ज्युनिअर सी- गट पाथुरी भुवास- तेलगांना (सुवर्ण) विराट चौहान- उत्तरप्रदेश( रौप्य), तन्मय कौश्यल्या- तेलगांना ( कांस्य) तर मुलींमध्ये तनिशा मंडल- बंगाल ( सुवर्ण), प्रिशा टांक ( गुजरात) रौप्य, पवित्रा डी- तामिलनाडू( कांस्य)

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने वाद:महात्मा फुले, डाॅ. आंबेडकर, कर्मवीर पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी लोकांकडे भीक मागितली!

माफी मागा – महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष संगीता तिवारी

पुणे-‘निधींसाठी सरकारवर अवलंबून का राहता? या देशात शाळा कुणी सुरू केल्या. महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. या सर्व शाळा सुरू करताना शासनाने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे एका कार्यक्रमात केले. त्यामुळे वाद निर्माण झालाय.चंद्रकांत पाटील म्हणाले की, ”इमारतींना निधी कसा द्यायचा हे रस्तोगी आम्हाला शिकवतील. परंतु चांगल्या कामासाठी मी आणि संदीपान भुमरे चांगल्या कामांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मिळून गेलो तर पैशांना अडचण येणार नाही. सरकारवर अवलंबून का राहता? या देशात शाळा कुणी सुरू केल्या. महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. या सर्व शाळा सुरू करताना शासनाने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली शाळा चालवतोय मला मला पैसे द्या. त्या काळात दहा रुपये देणारे होते, दहा – दहा कोटी रुपये देणारेही आहेत.”

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याने वाद

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष संगीता तिवारी म्हणाल्या की, गेले कित्येक दिवस आपल्या महाराष्ट्रात राज्यपाल कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, प्रसाद लाड ,रावसाहेब दानवे सगळे भाजपाचे नेते आपल्या देशाच्या महापुरुषांबाबत वादग्रस्त आणि अपमानकारक वक्तव्य करीत आहेत. हा छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा देश आहे आणि तिथेच हे भाजपाचे नेते जाणून बुजून त्यांचा अपमान करीत आहेत. परंतु आम्ही आता हे सहन करणार नाही.संगीता तिवारी म्हणाल्या की, भाजपच्या नेत्यांना खरंच काही उरलीच नाहीय किंवा ते हे अपमान मुद्दामून करत आहेत. आम्ही महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस चंदकांत पाटील ह्यांचा जाहीर निषेध करतो. चंद्रकांत पाटील ह्यांनी ताबडतोब आपले शब्द माघारी घेवून राष्ट्रपुरुषांची आणि महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा आम्ही त्यांच्या घरा समोर आंदोलन करून त्यांचा समाचार घेवू .

मुंबईत उद्या महारोजगार मेळाव्यात ८ हजार ६०८ जागांवर नोकरीची संधी

मुंबई, दि. ९ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत उद्या शनिवारी १० डिसेंबर रोजी राणीचा बाग, ईएस पाटनवाला मार्ग, भायखळा (पूर्व) येथे “पंडित दीनदयाळ उपाध्याय  रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध नामवंत कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र, सेवा क्षेत्र यामधील ८ हजार ६०८ इतके रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या नोकऱ्यांसाठी कंपन्यांकडून थेट मुलाखती घेतल्या जाणार असून नोकरी इच्छूक उमेदवारांनी मेळाव्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

मेळाव्यामध्ये बीव्हीजी इंडिया, आयसीजे, स्पॉटलाईट, स्मार्ट स्टार्ट, बझ वोर्क, टीएनएस इंटरप्रायझेस, युवाशक्ती, इम्पेरेटीव्ह, हिंदू रोजगार डॉट कॉम, एअरटेल, रोप्पन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस, फास्टट्रॅक मॅनेजमेंट सर्व्हिसेस, अपोलो होम हेल्थकेअर, स्टेलर सिक्युरिटी अँड फॅसिलीटी सर्व्हिसेस इत्यादी उद्योग, कंपन्या सहभागी होणार आहेत. दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्नीक, इंजिनीअरींग पदवी इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी मेळाव्यामध्ये बँकिग, आयटीआयएस, टुरिझम, हॉस्पीटीलिटी, एचआर, ॲप्रेंटीसशीप, डोमॉस्टिक वर्कर, इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट तसेच मिडीया अँड एन्टरटेंमेंट अशा विविध क्षेत्रातील पदे उपलब्ध आहेत.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून (आयटीआय) एक किंवा दोन वर्षाचा तांत्रिक अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकरिता नामांकित कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत अप्रेंटीसशिपची पदेही या मेळाव्यामध्ये भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्वयंरोजगार इच्छूक उमेदवारांकरिता आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार असून यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ इत्यादी महामंडळांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात येणार आहेत. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही मेळाव्यात सहभाग असणार आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत राज्यात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून या विविध प्रशिक्षण योजनांची माहितीही मेळाव्यात मिळणार आहे. मेळाव्यामध्ये मुंबई शहर येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच तज्ज्ञांमार्फत उद्योजकता मार्गदर्शन आणि करियरविषयक समुपदेशनही करण्यात येणार आहे. मेळाव्याचे उद्घाटन उद्या शनिवारी सकाळी १० वाजता मंत्री श्री. लोढा, शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते  तसेच कौशल्य विकास विभागाचे सचिव तथा आयुक्त डॉ. रामास्वामी एन, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह विविध उद्योजकांच्या उपस्थितीत होणार आहे.

महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान ‘संस्कृती प्रतिष्ठान’कडेच-मुरलीधर मोहोळ

भारतीय कुस्ती महासंघाने दिले आयोजनाच्या जबाबदारीचे पत्र

पुणे : महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची असणाऱ्या ६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान संस्कृती प्रतिष्ठानला मिळाला आहे. या संदर्भात कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची अधिकृत जबाबदारी संस्कृती प्रतिष्ठानला दिल्याचे पत्र भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खा. ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून स्वीकारल्याची माहिती संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. स्पर्धेच्या तारखा आणि ठिकाण लवकरात लवकर कळवण्याच्या सूचना या पत्रात कुस्ती महासंघाने दिल्या आहेत.

नवी दिल्ली येथे बृजभूषण सिंह यांनी यांनी मोहोळ यांना हे पत्र दिले. यावेळी राज्य कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष योगेश दोडके समवेत होते. दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांना या स्पर्धेचे निमंत्रण देण्यात आले असून, ते त्यांनी स्वीकारले असल्याचेही मोहोळ यांनी नमूद केले. ‘महाराष्ट्र केसरी’ अधिकृतपणे कोण भरवणार याबाबत संभ्रम होता. मात्र, कुस्ती महासंघाने संस्कृती प्रतिष्ठानच्या आयोजनावर शिक्कामोर्तब केल्याने हा संभ्रम दूर झाला असून, महासंघाच्या अस्थायी समितीचे पदाधिकारी यासंदर्भातील कार्यभार पाहत आहेत.

“महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे संस्थापक आणि ‘महाराष्ट्र केसरी’चे जनक स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या कुटुंबियांकडे ‘महाराष्ट्र केसरी’चे आयोजन येणे, ही निश्चितच समाधान देणारी बाब आहे. प्रत्येकाच्या आठवणीत राहील आणि कुस्तीला आणखी उंचीवर नेता येईल, अशा प्रकारचे आयोजन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल. लवकरच महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला जाईल,” असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

ब्रिजभूषण सिंह म्हणाले, “महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा लाभलेली आहे. ११ ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीत पुण्यात ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवली जावी. या स्पर्धेसाठी आपण स्वतः उपस्थित राहणार आहोत. शाहू महाराजांनी कुस्तीला प्रोत्साहन दिले. त्यातून अनेक कुस्तीगीर घडले. तालीम संघ मोठ्या प्रमाणावर आहेत. तेव्हा ही स्पर्धा चांगल्या स्वरूपात पार पडेल.”

समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

पंतप्रधानांच्या उपस्थितीत नागपूरला विविध लोकाभिमुख उपक्रमांचा शुभारंभ

मुख्यमंत्र्यांनी घेतला लोकार्पण सोहळ्याच्या तयारीचा आढावा

समृद्धी महामार्ग राज्याच्या समृद्धीची भाग्यरेषा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ९: महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान श्री. मोदी हे मेट्रो ट्रेनमधून प्रवास करणार असून समृद्धी महामार्गावरून प्रवास देखील करणार आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थित होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यात भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
दरम्यान, काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर मेट्रो टप्पा दोन आणि नाग नदी प्रदुषण नियंत्रण प्रकल्पाला मंजूरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यासाठीची तयारीचा आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर हे यावेळी उपस्थित होते. तर नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपरवार, नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, महामेट्रोचे ब्रिजेश दिक्षित आदी यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, राज्य सरकारने उभारलेला देशातील सर्वाधिक लांबीचा वेगवान असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणार असून राज्याच्या सर्वांगिण विकासात हा महामार्ग गेमचेंजर ठरणार आहे. विदर्भ, मराठवाडा भागात औद्योगिक क्रांती करणारा ठरेल असे सांगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा होत असून आपल्या राज्यासाठी मोठा आनंदाचा क्षण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी मुख्य सचिवांनी दि. ११ डिसेंबरला पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास नागपूर विमानतळावर पंतप्रधानांचे आगमन होणार असून त्यानंतर खापरी मेट्रो स्टेशन, नागपूर फेज १ चे उद्घाटन, वंदे मातरम ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणे, मिहान एम्सचे लोकार्पण त्यानंतर वायफळ टोल नाका येथून समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. या काळात पंतप्रधान श्री. मोदी नागपूर मेट्रोमधून प्रवास करणार असून झीरो माईल्स ते वायफळ टोलनाका असा प्रवास देखील करणार आहेत. टेम्पल मैदानावर पंतप्रधानांची सभा होणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव, हरदीप पुरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, रावसाहेब दानवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधानांच्या दौऱ्याची तयारी यावेळी होणाऱ्या विविध उपक्रमांचे कोनशिला अनावरण आदी बाबत नागपूर जिल्हा प्रशासन, एमएसआरडीसी, मेट्रो यांच्या मार्फत करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली.

समृद्धी महामार्गाविषयी:
नागपूर मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग हा महत्वाचा प्रकल्प म्हणुन अधिसुचित करण्यात आला आहे.

सदर महामार्गास दिनांक २२ डिसेंबर, २०१९ रोजीच्या शासननिर्णयाव्दारे “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग” असे नाव देण्यात आले आहे.

• पुर्ण प्रकल्पाला पर्यावरण विषयक, वन विभाग आणि वन्यजीव संरक्षण विभाग यांची मंजूरी प्राप्त झाली आहे.

• सद्यस्थितीत प्रकल्पासाठी लागणारी ८८६१.०२ हेक्टर जमीन (रस्त्याची रुंदी + इंटरचेंज) संपादित करण्यात आली आहे.

• सदर प्रकल्प १६ पॅकेजमध्ये विभागण्यात आला आहे. संपूर्ण प्रकल्प माहे जुलै २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

• प्रकल्पामध्ये वन्यजीव संरक्षणासाठी एकुण ८४ बांधकामे प्रस्तावित होती तथापि गरजेनुसार हि बांधकामे १०० पर्यंत वाढविण्यात आली आहेत, त्यांची रचना वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत १ ते ११ (शिर्डी पर्यंत) पॅकेजेसचे काम पुर्ण झाले आहे.
पहिला टप्पा म्हणून, नागपूर ते शिर्डी ७०१ किमी पैकी ५२० किमी लांबीचा रस्ता, वाहतुकीसाठी तयार आहे त्याचे लोकार्पण होत आहे. जुलै २०२३ पर्यंत उर्वरित महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.

औंध आयटीआयमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

पुणे, दि. ८ : औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथे सोमवार दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना ही कुशल कारागीर बनवणारी योजना आहे. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार आय. टी.आय. उत्तीर्ण व इच्छुक उमेदवारांसाठी या जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचा आय. टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंधचे सहा. सल्लागार (तां). यशवंत कांबळे व उपसंचालक आर. बी. भावसार यांनी केले आहे.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला साडेसात कोटी रुपयांची देणगी देणार

पुणे, ९ डिसेंबर २०२२- मूर्ती ट्रस्ट या श्रीमती सुधा मूर्ती आणि श्री. नारायण मूर्ती यांच्या कौटुंबिक प्रतिष्ठानने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला (BORI) संस्कृत आणि प्राकृत भाषेतील दुर्मिळ पुस्तके आणि हस्तलिखितांचे जतन आणि संशोधन करण्यासाठी साडेसात कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली. या अनुदानामध्ये १८,००० चौरस फूट हेरिटेज शैलीची, २०० आसन क्षमता असलेली शैक्षणिक आणि संशोधन इमारत, व्याख्याने आयोजित करण्यासाठी एक अत्याधुनिक सभागृह आणि प्राचीन पुस्तके आणि हस्तलिखिते डिजीटाईज करण्यासाठी दृकश्राव्य स्टुडिओ असलेल्या मूर्ती सेंटर ऑफ इंडिक स्टडीजचे बांधकाम समाविष्ट आहे. श्रीमती सुधा मूर्ती यांच्या हस्ते इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.

नवीन उपक्रमाबद्दल बोलताना श्रीमती सुधा मूर्ती म्हणाल्या, “भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था  ही १०५ वर्षे जुनी संस्था आहे आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे. या संस्थेने बौद्धिक शोधनिबंध आणि पुस्तकांची भरपूर निर्मिती केली आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमधील प्रत्येक प्राध्यापक महान विद्वान आहेत. ‘महाभारताची चिकित्सा आवृत्ती’ आणि ‘काणे यांचे धर्मशास्त्र’ या दोन पुस्तकांच्या बौद्धिक कार्याने मी भारावून गेले. ही दोन्ही पुस्तके माझ्या मनाला खूप भावली आहेत. काळ बदलला तसे आता लोकांना आपल्या संस्कृतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ऑनलाइन वर्ग हवे आहेत. या क्षेत्रातील जाणकारांशी संवाद साधायची इच्छा आहे. म्हणूनच मूर्ती ट्रस्टने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेसाठी भारताचा सांस्कृतिक वारसा साजरा करण्यासाठी समर्पित असलेली एक नवीन आणि आधुनिक इमारत बांधून देण्याचे ठरवले आहे.”

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्री. भूपाल पटवर्धन यांनी देखील संस्थेच्या मूर्ती सेंटर ऑफ इंडिक स्टडीजच्या योजनांबद्दल सांगितले. “माननीय सुधाताई यांनी शैक्षणिक प्रकल्पांसाठी निधी दिला आहे आणि आता संस्थेकडे भारतीय तत्त्वज्ञान ते कथ्थक आणि आयुर्वेदापासून खगोलशास्त्रापर्यंत विविध विषयांवर काम करणारे अंदाजे ४० विद्वान आहेत. आगामी मूर्ती सेंटर ऑफ इंडिक स्टडीज ६० हून अधिक विद्वानांना सामावून घेऊ शकते. त्याच वेळी या संशोधन संस्थेने आता शिक्षणकार्यातही प्रवेश केला आहे. त्यामुळे, वर्गखोल्यांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी २००  विद्यार्थ्यांना सामावून घेता येईल आणि या मूर्ती सेंटरमध्ये स्टुडिओ असल्याने आम्ही चांगला ऑनलाइन आशय  तयार करू शकू आणि तो  ‘भारतविद्या’ या आमच्या प्लॅटफॉर्मवर सादर केला जाईल. संस्थेकडे २८,००० हस्तलिखिते आणि जुनी पुस्तके आहेत. ही पुस्तके जतन करण्यासाठी नवीन इमारतीत एक संवर्धन प्रयोगशाळा असणार आहे. संस्थेसाठी आणि तिच्या भविष्यासाठी ही एक मोठी झेप ठरणार आहे. या सुविधेमुळे भारतीय संस्कृतीतील्  विविध विषयांचा प्रसार जगभर केला जाऊ शकतो. त्यामुळे आम्ही मूर्ती ट्रस्टचे अत्यंत ऋणी आहोत.”

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था (BORI)

पुण्यात १९१७ मध्ये स्थापन झालेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थे(BORI) मध्ये संस्कृत आणि प्राकृत सारख्या अनेक भाषांमधील १,२५,००० हून अधिक पुस्तके आणि २८,००० हस्तलिखिते असा दुर्मिळ पुस्तके आणि हस्तलिखितांचा सर्वात मोठ्या संग्रहापैकी एक आहे. संस्थेला महाराष्ट्र शासनाचे अंशत: पाठबळ आहे. विशिष्ट संशोधन प्रकल्पांसाठी भारत सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडूनही अनुदान मिळाले आहे. ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ याचे विविध खंड आणि ‘महाभारताची चिकित्सा आवृत्ती’ यासारख्या जागतिक दर्जाच्या उत्कृष्ट अभ्यासपूर्ण प्रकल्पांची निर्मिती करण्याचे श्रेय संस्थेला जाते.

मूर्ती ट्रस्ट

मूर्ती ट्रस्ट ही भारतात उदयास आलेल्या संस्कृती, विज्ञान आणि ज्ञान प्रणालींचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी समर्पित असलेली ना नफा तत्वावर काम करणारी संस्था आहे. श्रीमती सुधा मूर्ती आणि श्री. रोहन मूर्ती हे मूर्ती ट्रस्टचे प्रमुख आहेत.

वसंत मोरे,म्हणाले,’असे करतो पत्रकारांच्याच पक्षात येतो’

वसंत मोरे आणि मनसे कोअर कमिटी यांच्यातील मतभेद जाणून घेण्यासाठी अमित ठाकरेंचा पुढाकार

वसंत मोरेंनी अमित ठाकरेंना सांगितली कोअर कमिटी बाबतची गाऱ्हाणी

म्हणाले ,’ मला ऑफर भरपूर ,पण मी राजमार्गावर

पुणे- मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी आज नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली, यानंतर कोअर कमिटीचे अन्य सदस्य अमित ठाकरे यांच्याशी चर्चेसाठी गेले आहेत.यावेळी वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. वसंत मोरे म्हणाले, माझी वेळ दुपारी एकची होता पण मी विनंती करून , दूर असल्याने अमित ठाकरे यांच्याकडून दोन वाजताची वेळ घेतली . मी मनाचे कधीच काही सांगत नाही. मी राष्ट्रवादी प्रवेशाबाबत भूमिका जाहीर केली नाही. ती क्लिप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आली.माझे काम चांगले असल्याने मला अन्य पक्षाचे नेते ऑफर करतात त्याला मी काय करू .

हे किती दिवस चालणार ?तुम्हाला ओफार आहेत , इथे तुमची अवहेलना होते मग किती दिवस थांबणार ? अशा प्रश्नांच्या सरबत्तीला मोरे वैतागले आणि म्हणाले , असे करतो मी तुमच्याच पत्रकारांच्या पक्षात येतो .मनसे सोडणार असे मी कधीच सांगितले नाही. मी मनाचे काहीच सांगत नाही. मला जायचे असते तर कधीच गेलो असतो. मी हे वारंवार सांगतो. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने एक क्लिप त्यांच्या फेसबूक वाॅलवर टाकली बस्स एवढेच,आणि जयश्री जाधव च्या लग्नात चंद्रकांत पाटील पत्रकारांच्याच समोर बोलले , काय ते तुम्हाला माहिती आहे .

पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत माेरे हे पक्षातील अंर्तगत राजकारणाला कंटाळलेले असून त्यांनी थेट शहराच्या पदाधिकाऱ्यांवर आराेप केले आहे. यानंतर विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी वसंत माेरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची जाहीर ऑफर दिली. दरम्यान, यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी वसंत माेरे यांच्याशी संपर्क साधत त्यांना चर्चा करण्यासाठी शुक्रवारी बाेलवले. त्यानुसार राजमहाल या ठाकरे यांच्या पुण्यातील निवासस्थानी सदर दोघांची भेट झाली आहे.

वसंत माेरे म्हणाले, अमित ठाकरे यांनी मला नेमके कशाकरिता बाेलवले हे मला माहिती नाही, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर स्पष्टता हाेईल. मी काेणतीही पक्ष विराेधी कारवाई करत नाही पक्ष वाढीसाठीच मागील 16 वर्ष काम केलेले आहे. त्यामुळे माझी पक्षातून हाकलपट्टी करण्याचा काेणताही विषय नाही. मला काेणती तडजाेड करायची असती तर मी कधीच दुसऱ्या पक्षात गेलाे असताे त्यामुळे त्याचा काही विषय नाही.

वसंत माेरे मागील अनेक दिवसांपासून पक्षातील वातावरण बिघडल्याचे सांगत त्यावर उपाययाेजना हाेणे आवश्यक असल्याचे सांगत आहे. परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ते नाराज आहे. त्यामुळे पुणे शहरातील पक्षांतर्गत वाद साेडविण्यासाठी आता अमित ठाकरे मध्यस्थी करणार अशी चर्चा रंगली आहे.

मनसे कार्यालयात जाणार नाही

वसंत मोरे नाराज असल्याचे अनेकदा त्यांची समजूत काढली जाते. मात्र, याचा फायदा घेत त्यांचे पक्षांतर्गत विराेधक ते पक्ष साेडणार असल्याचे सांगतात. परंतु वसंत माेरे यांनी मी राज ठाकरे यांचा सच्चा मनसैनिक असून आपण पक्षातच असल्याचे सांगितले आहे. मात्र, पक्षात मला जाणीवपूर्वक डावललेले जात असून लक्ष्य करण्यात येते. कार्यक्रमाचे निराेप न देणे, कार्यक्रम परस्पर ठरवणे, भाषणासाठी वेळ न देणे, व्यासपीठावर जागा न देणे आदी आराेप लावलेले आहे.ज्या कार्यालयात मी फुले वेचली तिथे काटे वेचायला मी जाणार नाही असे सांगत आपला मनसे कार्यालयात अवमान होत असल्याची भावना मोरे यांनी व्यक्त केली .मात्र राज साहेबांनी सांगितले तर कार्यालयात देखील जाईल असेही ते म्हणाले आहेत.

सध्या अमित ठाकरे पुणे शहराच्या दाैऱ्यावर असून त्यांनी शुक्रवारी दुपारी वसंत माेरे यांना भेटीसाठी आमंत्रित केले. त्यामुळे या भेटीनंतर वसंत माेरे यांचे नाराजी नाट्यावर पडदा पडून पक्षांतर्गत वातावरण सुधारणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. .

‘सोनिया शक्ती’ विद्यार्थ्यांच्या पंखाना बळ देईल : सतेज पाटील

सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत ७६ विद्यार्थ्यांना ‘सोनिया शक्ती’ शिष्यवृत्तीचे वितरण; १४० तरुणांना पोलीस भरतीसाठी साहाय्य
पुणे : “भारत हा तरुणांचा देश असून, या तरुणाईला सक्षम बनविण्यात काँग्रेस पक्षाने कायमच पुढाकार घेतला आहे. श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु केलेला ‘सोनिया शक्ती’ शिष्यवृत्तीचा उपक्रम विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देईल. याच मदतीची जाणीव ठेवून भविष्यात इतर गरजूना मदतीची भावना तुमच्या मनात निर्माण व्हायला हवी,” असे मत माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांच्या पुढाकारातून ७६ गरजू मुलींना ‘सोनिया शक्ती’ शालेय साहित्य शिष्यवृत्तीचे, तसेच बळीराम डोळे व इम्रान शेख यांच्या पुढाकारातून पोलीस भरतीतील १४० विद्यार्थ्यांना ९० हजारांचे साहाय्य सतेज पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. 

बालगंधर्व कलादालनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी होते. यावेळी माजी मंत्री रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस वीरेंद्र किराड, दत्ता बहिरट, सत्संग मुंडे, चंद्रशेखर कपोते, रमेश अय्यर, चेतन अगरवाल, आयुब पठाण, रोहन सुरवसे, सौरभ अमराळे, पुष्कर आबनावे, प्रवीण करपे, बळीराम डोळे, कान्होजी जेधे आदी उपस्थित होते.

सतेज पाटील म्हणाले, “कर्तृत्ववान नेत्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याचे मोठे काम मोहन जोशी यांनी केले. एकनिष्ठतेचे उदाहरण त्यांनी विद्यार्थ्यांना घालून दिले आहे. अभ्यासात, नोकरी-व्यवसायामध्ये एकनिष्ठता जपली पाहिजे. ‘भारत जोडो’ यात्रा पक्षाची नव्हे; तर देशाची आहे. जात, धर्मविरहित मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होण्यासाठी राहुल गांधी चालत आहेत. यातून प्रेमाचे, आपुलकीचे वातावरण तयार होईल. राज्यघटनेने सर्वसामान्यांना समान अधिकार दिले, त्याचे पालन व्हावे. राज्यघटनेच्या संरक्षणासाठी आपण प्रत्येकाने काम केले पाहिजे.”
प्रास्ताविकात मोहन जोशी म्हणाले, “दर महिन्याला ७६ याप्रमाणे वर्षात ७६० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. देशातील महिला वर्ग ही खरी शक्ती असून, महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना सक्षम करण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे.”

रमेश बागवे म्हणाले, “तरुणांना, महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम काँग्रेस पक्षाने आजवर केले आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी काँग्रेसच्या माध्यमातून भारत एकसंध राहावा, सामाजिक ऐक्य जपावे यासाठी प्रयत्न करत आहेत.”

अभिषेक अवचार यांनी सूत्रसंचालन केले. चेतन अगरवाल यांनी आभार मानले.