Home Blog Page 1498

पुण्यात १० हजार कोटींचा देशातला पहिला ईलेक्ट्रीक व्हेइकल प्रकल्प

0

महाराष्ट्रात ७० हजार कोटी गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मान्यता: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात २० हजार कोटींच्या स्टील प्रकल्पास मान्यता

मुंबई, दि. १३: राज्यातील विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे या भागातील औद्योगिक विकासाला चालना देत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या चौथ्या बैठकीत ७० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे ५५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात औद्योगिक गुंतवणुकीस पोषक वातावरण असून उद्योगांना सवलत देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उद्योगवाढीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांची विशेष गरज लक्षात घेता त्यापद्धतीने औद्योगिक तंत्रज्ञान उद्यान विकसीत करण्याची सूचना यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली.

मंत्रालयात उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, प्रधान सचिव राजगोपाल देवरा, औद्योगीक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, उद्योग विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह आदी उपस्थित होते.

राज्यातील उद्योग घटकांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने यापूर्वी केलेल्या शिफारशींचा विचार करुन या उद्योग घटकांना प्रोत्साहन अनुदान तसेच अन्य मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत राज्यात नवीन तंत्रज्ञानावर आधारित तसेच अविकसित असलेल्या भागांमध्येही मोठ्या उद्योगांना चालना मिळावी व त्याबरोबरच या उद्योगांमधून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मंत्रिमंडळ उप समितीने मोठे निर्णय आज घेतले आहेत.

विदर्भातील गडचिरोली व चंद्रपूर सारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये ३ मोठे प्रकल्प उभारण्याकरिता मंत्रिमंडळ उप समितीने मान्यता दिलेली आहे. यात २० हजार कोटी गुंतवणूकीचा हरित तंत्रज्ञानावर आधारीत मे. न्युईरा क्लिनटेक सोल्युशन्स प्रा. लि. या घटकाचा चंद्रपूर येथे कोल गॅसिफिकेशन प्रकल्प (हरित हायड्रोजन, मिथेनॉल, अमोनिया व युरिया इ.) चा समावेश आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊन उद्योग उभारणीस मदत होणार आहे. या भागाचा रोजगार निर्मितीबरोबरच सामाजिक व आर्थिक विकासास हातभार लागणार आहे.

देशाच्या व राज्याच्या इलेक्ट्रॉनिक व्हेईकल पॉलिसीनुसार देशातील इलेक्ट्रीक व्हेईकल निर्मितीच्या क्षेत्रातील दहा हजार कोटींची गुंतवणूक असलेला महिंद्रा इलेक्ट्रीक व्हेईकल ऑटोमोबाईल्स पहिला प्रकल्प पुणे येथे सुरू होणार आहे. या माध्यमातून राज्यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारीत घटकामध्ये विदेशी गुंतवणूक होणार असून, व्होक्सवॅगन यांच्याबरोबर तंत्रज्ञान विषयक तसेच पुणे या ठिकाणी तंत्रज्ञान, संशोधन व विकास संदर्भात प्रोटोटाईप बनविण्यात येणार आहे. यामुळे राज्यात ईलेक्ट्रीक व्हेईकल निर्मिती संदर्भात IP (Intellectual property) (बौद्धिक संपदा) तयार होत असून, त्याची व्याप्ती “मेड इन महाराष्ट्र” अशी होईल. या प्रकल्पामुळे सभोवतालच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सहयोगी उद्योगांची निर्मिती होईल.

गडचिरोली जिल्ह्यात मे. लॉयड मेटल्स एनर्जी लि. या घटकाचे खनिज उत्खनन व प्रक्रिया याद्वारे स्टील निर्मितीचा प्रकल्प उभारण्यास व एकूण २० हजार कोटी गुंतवणूक करण्यास मंत्रिमंडळ उप समितीने मान्यता दिली. गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास होण्यास व त्या संदर्भातील आवश्यक उद्योग वाढीसोबतच रोजगार निर्मितीवर होण्यास मदत होईल. गडचिरोली जिल्ह्यात मे. वरद फेरो अलॉय ही कंपनीच्या १५२० कोटी गुंतवणूकीच्या प्रकल्पाला देखील मान्यता देण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये नवीन उद्योग स्थापित होण्यास बळ मिळणार असून या भागात औद्योगिक क्षेत्रामध्ये नवनवीन उद्योगांची वाढ होण्यास मदत होणार आहे. अमरावती व नागपूर विभागात वस्त्रोद्योग वाढीस चालना मिळावी यासाठी इंडोरामा कंपनीच्या उपकंपन्यांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करता यावी, यासाठी त्यांच्या २५०० कोटीच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेली आहे. ज्यामुळे, अमरावती व नागपूर हे वस्त्रोद्योग उद्योगामध्ये मोठी क्षेत्रे म्हणून उदयास येतील.

या बैठकीत मान्यता देण्यात आलेल्या निप्रो फार्मा पॅकेजींग इंडीया प्रा. लि. ही कंपनी पुणे जिल्ह्यामध्ये नवीन तंत्रज्ञानावर आधारीत Pharmaceutical Glass Tubing Production या अंतर्गत घटक Clear Glass Tubing. Dark Amber Glass Tubing, Syringe & Cartridge Tubing या उत्पादन निर्मितीकरीता दोन फेजमध्ये रु. १६५० कोटीची गुंतवणूक करणार आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष २००० लोकांना रोजगार निर्मिती उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीत ही उत्पादने आयात केली जातात, अशा प्रकारचा उद्योग महाराष्ट्रात प्रथमच सुरू होणार आहे.

रिलायन्स लाईफ सायन्स नाशिक कंपनीच्या ४२०६ कोटी प्रस्तावित गुंतवणूकीस मान्यता देण्यात आली आहे. ही कंपनी प्लाझा प्रोटीन, व्हॅक्सीन आणि जीन थेरपी इ. जीवरक्षक औषधांची निर्मिती करणार असून हा प्रकल्प  आयात पर्यायी प्रकल्प असणार आहे. या मुख्य प्रकल्पांसोबतच इतर अन्य प्रकल्पांसह राज्यात ७०,००० कोटींची गुंतवणूक व सुमारे ५५००० एवढी रोजगार निर्मिती होणार आहे.

एक कोटी ११ लाख ५३ हजार ग्राहकांनी भरले ऑनलाईन वीजबिल

0

महावितरणच्या ग्राहकांकडून नोव्हेंबर महिन्यात २२३० कोटींचा भरणा

मुंबई : दि. १३ डिसेंबर २०२२

महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन पेमेंट सुविधांचा वापर करीत राज्यातील महावितरणच्या घरगुती, औद्योगिक व वाणिज्य वर्गवारीतील एक कोटी ११ लाख ५३ हजार ७०३ लघुदाब ग्राहकांनी नोव्हेंबर महिन्यात ऑनलाईन पेमेंटचा पर्याय स्वीकारला आहे. या ग्राहकांकडून वीजबिलाच्या भरण्यापोटी एकूण २२३० कोटी सहा लाख इतकी रक्कम भरली आहे. प्रत्येक ग्राहकाला ऑनलाईन पेमेंटवर ०.२५ टक्के सवलत मिळत त्यामुळे ऑनलाईन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.

            ऑनलाईन वीज बिल भरणा करण्यात कोकण प्रादेशिक विभागाचे ग्राहक आघाडीवर असून एकूण ४९ लाख २१ हजार ६९३ ग्राहकांनी १००१ कोटी १२ लाख रुपयांचा भरणा केला आहे. तर याखालोखाल पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या ३३ लाख ७५ हजार ४७१ ग्राहकांनी ७५१ कोटी ८५ लाख इतका तर नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्या १९ लाख ३३ हजार २५६ ग्राहकांनी २९९ कोटी १५ लाख इतका भरणा केला आहे. याचबरोबर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या ९ लाख २३ हजार २८३ इतक्या ग्राहकांनी १७७ कोटी ९६ लाख इतका ऑनलाईन भरणा केला आहे.

            वीज ग्राहक संगणक किंवा मोबाईल ॲपच्या मदतीने वीज बिल भरू शकतात. यामुळे ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचतात. ग्राहक महावितरणच्या मोबाईल ॲप किंवा  संकेत स्थळावर चालू किंवा थकबाकीची देयके पाहू शकतात. तसेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंगदवारे वीजबील भरण्याची सुविधा आहे. ऑनलाइन वीजबील भरल्यास संगणकीकृत पावतीही ग्राहकाला मिळते. तसेच महावितरणचे मोबाइल ॲप्लिकेशन मराठी आणि इंग्रजी भाषेत असून ही सेवा २४ तास उपलब्ध आहे. त्यामुळे वीज ग्राहकाला आपले वीज बिल केंव्हाही आणि कोठूनही भरता येते. या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

‘महापुरुषांच्या बदनामीचे षडयंत्र देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातच’; सुषमा अंधारे यांचा आरोप

पुणे -राज्यपाल या घटनात्मक पदबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. पण, या पदावर बसलेली व्यक्ती आदराच्या लायकीची नाही. जेव्हा-जेव्हा ते महापुरुषांबद्दल बोलले तेव्हा गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना रोखले नाही. आमच्या ४० चुकार भावांनी देखील त्यांना थांबवले नाही. महापुरुषांच्या बदनामीचे सुनियोजित षडयंत्र देवेंद्रजींच्या नेतृवात सुरू असल्याचा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी सर्वधर्मीय पुणेकर शिवप्रेमींच्या वतीने  पुणे बंदचे आवाहन करण्यात आले होते. यानिमित्ताने मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चाची लाल महाल येथे सभेने सांगता झाली. त्यावेळी अंधारे बोलत होत्या. खासदार उदयनराजे भोसले यांनी लाल महाल येथे येऊन अभिवादन केले. मात्र, निषेध सभेमध्ये ते अनुपस्थित होते.

महापुरुषांचा अवमान होत असल्याबद्दल उद्विग्न होऊन कदाचित राजीनामा देण्यासाठी उदयनराजे दिल्लीला गेले असतील, अशी टिप्पणी करून अंधारे म्हणाल्या, उद्योग गुजरातला, मंत्री गुवाहाटीला, गावे कर्नाटकात आणि आपण आज लाल महालात, असेही अंधारे यांनी नमूद केले. तसेच एकनाथभाऊ बाजूला बसले असून महाराष्ट्राचे स्टिअरिंग देवेंद्रजींच्या हातात आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नरेंद्र मोदी यांना रावण म्हटल्यानंतर त्यांच्याविरोधात बोलण्यासाठी देवेंद्रजी हिरीरीने पुढे आले. पण, महापुरुषांचा अवमान होतो तेव्हा चकार शब्दही बोलत नाहीत. राज्यपालांना परत बोलवा, असे पत्रही महाशक्तीला पाठवत नाहीत. त्यांच्याविरोधात निंदाजनक ठरावही विधीमंडळात मांडला जात नाही, असे मुद्दे अंधारे यांनी उपस्थित केले.शाईफेक झाल्यानंतर हे सुनियोजित षडयंत्र असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर ‘होय, हे भाजपमधील बहुजन नेत्यांविरोधात त्याच पक्षातील मनुवादी नेत्यांचे षडयंत्र असल्याची टिप्पणी अंधारे यांनी केली. विनोद तावडे सुटले. बिचारे चंद्रशेखर बावनकुळे अडकले आहेत, असा दावा त्यांनी केला. राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोनिया गांधी यांनी माफ केले. तुमच्यावर शाई फेकणाऱ्यावर तुम्ही खुनाचे कलम लावले. दादा, तुम्ही लोकशाहीच्या गप्पा मारू नयेत. महाराष्ट्राचा आक्रोश जनता तुम्हाला मतपेटातून दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अंधारे यांनी दिला

डेटाच्या उत्तम वापरातूनच व्यापक विकास शक्य – शेर्पा अमिताभ कांत

0

मुंबई, दि. १३ : माहिती तंत्रज्ञानाच्या जगात डेटाच्या (माहितीच्या) उत्तम वापरातून देशाचा व्यापक विकास शक्य होणार आहे, उपलब्ध माहितीच्या आधारे प्रत्येक क्षेत्रानुसार त्याचे विश्लेषण करता येऊ शकते. विकसनशील देशाचा विकास करायचा असेल तर डेटा (अद्ययावत माहिती) संकलित करणे, त्याचे विश्लेषण, संप्रेषण करणे आणि उपलब्ध डेटावर कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या विकासासाठी एक स्पर्धा निर्माण होईल आणि त्यातून विविध क्षेत्रात बदल दिसून येईल, असे मत वार्षिक जी – २० परिषदेत शेर्पा अमिताभ कांत यांनी व्यक्त केले.

बांद्रा -कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे  जी-२० परिषदेची आज  सुरुवात झाली. या परिषदेच्या पहिल्या सत्रात डेटा फॉर डेव्हलपमेंट : रोल ऑफ जी २० इन ॲडव्हान्सिंग द २०३० अजेंडा विषयावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी श्री. कांत बोलत होते.

श्री. कांत पुढे म्हणाले की, प्रशासनात सामान्य नागरिकांच्या कल्याणकारी योजना राबवीत असताना समर्पक डेटा (अद्ययावत माहिती) उपलब्ध असल्यास योजना प्रभावीपणे राबविणे शक्य होते. आता सुप्रशासनासाठी एक स्पर्धात्मक वातावरण तयार झाले असून याचा फायदा सामान्य नागरिकांना होत आहे. मात्र, यासाठी असलेला सर्व डेटा विखुरलेला असल्याने याचे एकत्रित संकलन करणे आणि योग्य वापर करून थेट नागरिकांना लाभ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

विकसनशील देशाचा विकास करायचा असेल तर डेटा निर्माण होणे, त्याचे विश्लेषण, संप्रेषण करणे आणि उपलब्ध डेटावर कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर करणे आवश्यक आहे. याचबरोबर सुप्रशासन डेटा गुणवत्ता इंडेक्स सातत्याने तपासत राहणे आवश्यक आहे. जी २० परिषदेत या विषयावर सांगोपांग चर्चा होऊन काही दिशादर्शक निष्कर्ष नक्कीच निघतील अशी आशा श्री. कांत यांनी यावेळी व्यक्त केली.

केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जी २० परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी भारताला मिळणे ही अभिमानाची बाब आहे. विकसनशील देशांमध्ये ‘डेटा’संबंधित क्षमता-निर्मितीवर भर देण्यात आला असून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सरकारी-खासगी भागीदारीमुळे भारताच्या ‘डिजिटल पेमेंट’ प्रणालीने नागरिकांच्या जीवनात व्यापक बदल घडवून आणले आहेत. त्यामुळेच ‘कोविड-१९’ साथीच्या काळात अवघ्या काही सेकंदांत गरजू लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये मदत निधी देणे भारताला शक्य झाले आहे असेही ते म्हणाले.

भारताच्या ‘जी २०’ परिषदेत अध्यक्षपदाच्या कार्यकाळात ‘विकास कार्य गट’ हा, विकसनशील देशांमध्ये ‘डेटा’संबंधित क्षमता-निर्मितीवर लक्ष केंद्रित करेल आणि विकासासाठी माहितीचे आदान-प्रदान या आधारे बहुमुखी व मानव केंद्रित शाश्वत विकासाला चालना देईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या परिषदेचे प्रस्ताविक करताना ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष समीर सरन म्हणाले की,  ही परिषद देशांना एकसंघता, शाश्वत विकास आणि समृद्धीच्या दिशेने नेणारी ठरणार आहे. ‘वसुधैव कुटुंबकम् : एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही या परिषदेची संकल्पना आहे. याच संकल्पनेतून आणि दृष्टिकोनातून वातावरणासंबंधी आव्हाने, शांतता आणि शाश्वत विकासाच्या मार्गावरील आव्हानांवर आंतरराष्ट्रीय सहकार्य  आणि  सांघिकरित्या मात करण्यासाठी एक ‘सर्वंकष आराखडा २०३०’ मांडण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

नेदरलँडसच्या महाराणी क्वीन मॅक्सिमा म्हणाल्या की, डेटा वापर करून आर्थिक उन्नती साधता येते. वित्तीय समावेशन हे कोणत्याही देशाच्या विकासाचे शक्तिशाली साधन आहे. शाश्वत विकासाची उद्दिष्टे म्हणजे  शून्य गरिबी, चांगले आरोग्य, लिंग समानता आणि आर्थिक वाढ डेटाच्या नियोजनातून साध्य करता येऊ शकेल.

नंदन नीलकेणी म्हणाले की, आधार तसेच जनधन या सारख्या योजनेतून देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत ‘डिजिटल’ माध्यमातून  थेट लाभ देता आला. या  ‘इको सिस्टम’चा समावेश असलेले नवनवीन तंत्रज्ञान भारतीय ‘स्टार्टअप्स’ शोधून काढत आहेत. विकासासाठी माहितीच्या आदान-प्रदानाला प्रोत्साहन देण्याच्या धारणेमुळे भारताने  अनेक मुक्त-स्रोत मंच जगासाठी खुले करण्यासह संयुक्त राष्ट्रांच्या मदतीने,  विकसनशील देशांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी ‘जी २०’ ची क्षमता निर्माण करणारी यंत्रणा उभी करण्यात पुढाकार घेतला आहे.

या पहिल्या सत्रात दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून नेदरलँडसच्या महाराणी क्वीन मॅक्सिमा, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, नॉन एक्झिक्युटिव अध्यक्ष, तथा इन्फोसिसचे माजी अध्यक्ष तसेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीआय)चे  नंदन नीलकेनी यांनी ऑनलाइन संदेश दिला. तर ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष समीर सरन हे प्रत्यक्ष सहभागी होते. याचबरोबर २० देशातील मान्यवर पाहुणे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रथम चर्चासत्र

Rejuvenating legacy systems: from data to public value intelligence

वारसा प्रणालींचे पुनरुज्जीवन: डेटापासून सार्वजनिक मूल्य बुद्धिमत्तेपर्यंत या विषयावर चर्चासत्र

जी -२०  परिषदेच्या पहिल्या चर्चासत्रात वारसा प्रणालीचे पुरुज्जीवन; डेटा ते सार्वजनिक बुद्धिमत्ता या विषयावर चर्चा झाली. या चर्चेत कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल अर्थव्यवस्था आणि दूरस्थकार्य अनुप्रयोग कार्यालय, यूएईचे कार्यकारी संचालक सक्र बिन गालिब, राष्ट्रीय ई शासन ( NeGD, MeiTY)चे कार्यकारी संचालक आणि अध्यक्ष अभिषेक सिंग, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन (आर्थिक धोरण) उपाध्यक्ष श्रीमती सुश्री शमीका रवी, जपानचे जी २०  संबंधाचे उपमहासंचालक योची लिडा  (Yoichi lida ) यांनी सहभाग घेतला. या सत्राचे संचालन ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या वरिष्ठ फेलो सूनयना कुमार यांनी केले. बदलत्या परिस्थितीनुसार डेटा वापरचा सकारात्मक परिणाम या विषयावर मान्यवरांनी आपले मत प्रदर्शित केले. आरोग्य, निवडणूक, शिक्षण महिला विकास या क्षेत्रात डेटाच्या वापरातून होत असलेले स्थित्यंतर या विषयावर चर्चा झाली.

दुसरे चर्चासत्र

Models for the future : Leveraging internet of things, Big Data and Artificial Intelligence for the Sustainable Development Goals

भविष्यासाठी प्रारुप (मॉडेल्स) : शाश्वत विकास लक्ष्यांसाठी इंटरनेट ऑफ थिंग्ज, बिग डेटा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

दुसऱ्या सत्रात झालेल्या चर्चा सत्रात पायाभूत सुविधा, जागतिक हवामान संस्थेचे संचालक अँथनी रिया, टॅलेंट डेव्हलपमेंट, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी राष्ट्रीय केंद्र, सौदी डेटा आणि एआय प्राधिकरणाचे उपाध्यक्ष अब्दुल रहमान हबीब, संस्थापक सदस्य आणि कार्यकारी संचालक, अनिता गुरुमूर्ती, बांगलादेशचे धोरण सल्लागार अनिर चौधरी यांनी सहभाग घेतला. तर या चर्चासत्राचे सूत्रसंचालन आपती इन्स्टिट्यूटच्या सह संस्थापक श्रीमती आस्था कपूर यांनी केले. या चर्चासत्रात तंत्रज्ञानाच्या  वापरातून भविष्यातील सुधारणांचा होणार विकास याचा मान्यवर तज्ज्ञांनी वेध घेतला. शाश्वत विकासासाठी निर्धारित लक्षांक गाठण्यासाठी इंटरनेट ऑफ थिंग्ज, बिग डेटा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याविषयी चर्चा झाली.

सीमेवर चिनी माकडांची घुसखोरी कधी थांबणार?

मुंबई-गलवान खोऱ्यानंतर आता अरुणाचल प्रदेशातील तवांग क्षेत्रात भारत आणि चीनी सैनिकांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाल्याची माहिती आहे. यावेळी उडालेल्या चकमकीत 10 ते 15 भारतीय जवानांना किरकोळ दुखापत झाल्याचे समोर आले आहे. यावरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

डोळे मिटून का घेत आहात?

नाना पटोलेंनी म्हटले आहे की, चीनला डोळे दाखवण्याची वार्ता करणारे आज डोळे मिटून का घेत आहेत? भारतीय सीमेवर चालू असलेली चिनी माकडांची घुसखोरी कधी थांबणार? यात भारतीय जवान जखमी होत असताना मोदी सरकार शांत का?नाना पटोले यांनी ट्विट करून मोदी सरकारवर टीका केली आहे. माहितीनुसार 9 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. चीन सैनिक या ठिकाणी तारांचे कुंपण बांधण्याच्या हेतून आले होते. भारतीय जवानांनी त्याला विरोध करताच चीनी सैनिकांनी वायरचे कटर आणि लोखंडांच्या इतर अवजारांनी भारतीय जवानांवर हल्ला केला. मा,त्र चीनचे 50 सैनिक प्रचंड रक्तबंबाळ अवस्थेतच माघारी फिरले. तर, 10 ते 15 भारतीय जवान जखमी झाले.

नागपूर येथे १९ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

0

मुंबई, दि. १३ : विधिमंडळाचे सन २०२२ चे हिवाळी अधिवेशन सोमवार दि. १९ डिसेंबरपासून विधान भवन, नागपूर येथे सुरु होणार आहे. १९ ते ३० डिसेंबर या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

मुंबईतील विधानभवन येथे  विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी दिनांक 19 ते 30 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या विधानपरिषद व विधानसभा बैठकांच्या  तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली. या अधिवेशनात सीमा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठराव मांडणार आहेत. तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विशेष कार्यक्रम राबविण्याबाबत यावेळी चर्चा झाली. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक दि. २८ डिसेंबर रोजी घेण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. या अधिवेशनात अंदाजे २१ विधेयके सभागृहात चर्चा आणि मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत.एकूणच दोन्ही सभागृहातील कामकाजासदर्भात सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.

रिक्षा चक्काजाम प्रकरणी:केशव क्षीरसागर आणि 40 जणांना अटक

पुणे-पुण्यात बाइक टॅक्सीविरोधात रिक्षा चालकांनी सोमवारी चक्काजाम आंदोलन केले. संगमपुलावर रिक्षा चालकांनी रिक्षा सोडून दिल्याने रस्ता बंद झाला होता. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली असून रिक्षाचालक संघटनेच्या अध्यक्षांना आणि तब्बल 40 अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांना अटक करण्यात आली आहे.पुण्यात बाईक टॅक्सीच्या विरोधात सोमवारी रिक्षा चालकांनी चक्काजाम आंदोलन केले. पुण्यात आरटीओ कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक जमले व त्यांनी घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलनात कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा आरटीओ कार्यालयासमोर रस्त्यातच सोडून निघून गेले.

संध्याकाळी देखील रिक्षा चालकांनी आरटीओ चौकात रिक्षा रस्त्यात लावल्या होत्या. रात्री उशिरा पोलिसांनी येऊन त्या बाजूला केल्या. यावेळी 40 रिक्षा चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांना अटक करण्यात आली.दरम्यान, मंगळवारी सकाळी देखील संगम पुलावर रिक्षा चालक जमू लागले आहे. आज देखील रिक्षा चालक यांनी आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला असून जमणाऱ्या आंदोलकांना हुसकावून लावले जात आहेत. यामुळे आज देखील आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे .पुण्यातील रिक्षा चालकांनी संगम ब्रीज येथील आरटीओ कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलन केले. अनेक रिक्षा चालकांनी आपली रिक्षा रस्त्यावरच सोडून दिल्याने शकडोच्या संख्येने रिक्षा रस्त्यावर उभ्या होत्या अन् रिक्षाचे मालक घरी निघून गेले होते. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. रिक्षा चालकांनी रिक्षा रस्त्यावरच सोडून दिल्याने पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली होती.

‘पेपरलेस’साठी मदत करा, वीजबिलात सवलत मिळवा

0

गो ग्रीन योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

 मुंबईदि. १२ डिसेंबर २०२२ – मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी १ एप्रिलपासून ई ऑफीस प्रणाली सुरू करणार असल्याची घोषणा नुकतीच केली असून त्यामध्ये पेपरलेस व्यवहार करण्यावर भर असेल. त्या दिशेने महावितरणने बिलांच्या बाबतीत यापूर्वीच काम सुरू केले असून गो ग्रीन योजनेचा लाभ घेऊन वीज ग्राहकांनी पर्यावरण वाचविण्यास मदत करावी आणि प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळवावी, असे आवाहन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले.

ते म्हणाले की, महावितरणच्या गो ग्रीन योजनेत ग्राहकांनी छापील कागदी बिलाच्या ऐवजी ईमेलने येणाऱ्या पेपरलेस बिलाचा पर्याय स्वीकारला तर त्यांना कागदी बिल पाठविणे बंद केले जाते व प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत देण्यात येते.

त्यांनी सांगितले की, मा. मुख्यमंत्र्यांनी ई ऑफीस प्रणालीचा संदेश दिला आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचा पर्यावरण रक्षणावर भर असतो. ई ऑफीस प्रणालीमध्ये प्रत्यक्ष कागदाचा वापर न करता माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पेपरलेस कामावर भर आहे. वीज ग्राहकांनी गो ग्रीनच्या सवलतीचा लाभ घेतला तर छापील बिले कमी होऊन कागदाचा वापर कमी होईल व पेपरलेस कामाला चालना मिळेल तसेच पर्यावरणाचे रक्षण होईल.

गो ग्रीन योजनेचा आतापर्यंत तीन लाख ५६ हजार ग्राहकांनी लाभ घेतला आहे. ज्या ग्राहकांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना महावितरणच्या वेबसाईटवर जाऊन ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट ही माहिती भरून नोंदणी करता येते. महावितरणच्या मोबाईल ॲपवरूनही नोंदणी करता येते. नोंदणी करणाऱ्या ग्राहकाला ओटीपी क्रमांक पाठविण्यात येतो. त्यामुळे नेमक्या संबंधित ग्राहकाकडूनच नोंदणी होत असल्याची खात्री होते. त्यानंतर ग्राहकाला त्याने दिलेल्या ईमेल आयडीवर एक लिंक पाठविली जाते. लिंकवर क्लिक करून पडताळणी केली की प्रक्रिया पूर्ण होते. पुढच्या बिलापासून ग्राहकाला त्याची बिले ईमेलने पाठविली जातात व कागदी छापील बिले बंद केली जातात. ग्राहकाला हवे तेव्हा त्याला ईमेलने आलेल्या बिलाचा प्रिंट घेता येतो. त्यासोबत सर्वच ग्राहकांना त्यांच्या बिलाविषयी नियममाहिती देणारे एसएमएसही पाठविले जात आहेतच.

गो ग्रीन योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांमध्ये पुणे परिमंडळ आघाडीवर आहे. या परिमंडळात ८९,९३६ ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्या पाठोपाठ कल्याण (४०,१४४), भांडूप (३४,९१७), नाशिक (३३,१४१) आणि बारामती (२६,३९८) यांचा क्रमांक लागतो. राज्यात महावितरणचे २ कोटी ८ लाख घरगुती ग्राहक आहेत.

‘टारझन’ फेम हेमंत बिर्जे मराठी चित्रपटात

आज बऱ्याच अमराठी कलाकारांना  मराठीची गोडी लागली असून, त्यांची पावलं मराठी चित्रपटसृष्टीच्या दिशेने वळत आहेत. काही कलाकार चांगल्या संधीद्वारे मराठीत पदार्पण करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ‘सुर्या’ या आगामी मराठी चित्रपटाच्या रूपात चालून आलेल्या संधीचं मराठमोळे अभिनेते हेमंत बिर्जे यांनी सोनं केलं आहे. नायक बनून सिनेसृष्टीत दाखल झालेल्या हेमंत यांनी ‘नायक नहीं खलनायक हूं मैं…’चा सूर आळवत मराठी सिनेसृष्टीत  खलनायकाच्या भूमिकेतून पदार्पण केलं आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत एस. पी. मोशन पिक्चर्सच्या या चित्रपटाची निर्मिती रेशमा मंगेश ठाणगे यांनी केली आहे. येत्या ६ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सुर्या’चं दिग्दर्शन हसनैन हैद्राबादवाला यांनी केलं आहे.

८० च्या  दशकात  गाजलेल्या ‘टारझन’ चित्रपटात अविस्मरणीय टायटल रोल साकारणाऱ्या हेमंत बिर्जे यांनी ‘सुर्या’ चित्रपटाद्वारे केलेला मराठीपर्यंतचा प्रवास चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ते म्हणाले की, मी महाराष्ट्रीय असून, पुण्यात वाढलो असलो तरी कधी मराठी सिनेमात काम करण्याची संधी मिळाली नाही. २० वर्षांपूर्वी अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी मराठी चित्रपटात काम करण्यासाठी विचारलं होतं, पण त्यावेळी शक्य झालं नाही. आता ‘सुर्या’‘ चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. खरं तर मला गावाकडच्या भूमिका साकारायच्या नव्हत्या. शहरातील व्यक्तिरेखा मी अधिक सक्षमपणे साकारू शकतो याची खात्री होती. त्यामुळे मराठीत येण्यासाठी योग्य संधीच्या प्रतीक्षेत होतो. ‘सूर्या’च्या निर्माता-दिग्दर्शकांनी जेव्हा माझ्याशी संपर्क साधला तेव्हा मला कथा आणि त्यातील कॅरेक्टर खूप आवडल्यानं होकार दिला. यात मी खलनायक साकारला असून, डॉन बनलो आहे. हा खूप खतरनाक असला तरी जास्त बोलत नाही. इथे धंदा करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील आणि पैसे द्यायचे नसतील तर मरायला तयार रहा, हा त्याचा डायलॉग आहे. हा चित्रपट तेलुगू शैलीत बनवला आहे. यातील अॅक्शन, अभिनय, नृत्य, दिग्दर्शन, गीत-संगीत, कॅमेरावर्क सारं काही आजवरच्या मराठी चित्रपटांपेक्षा खूप वेगळं आहे.

‘सुर्या चित्रपटात प्रसाद मंगेश, रुचिता जाधव, देवशी खंडुरी हे युवा चेहरे दिसणार आहेत. याखेरीज उदय टिकेकर, अखिलेंद्र मिश्रा, गणेश यादव, संदेश जाधव, पंकज विष्णू, हॅरी जोश, अरुण नलावडे, संजीवनी जाधव, राघवेंद्र कडकोळ, दीपज्योती नाईक, प्रताप बोऱ्हाडे, प्रदीप पटवर्धन, दिलीप साडविलकर, जसबीर थंडी आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत. मंगेश ठाणगे यांनी चित्रपटाची कथा लिहिली असून, मंगेश यांनी विजय कदम यांच्यासोबत पटकथालेखनही केलं आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेते डिओपी मधु. एस. राव यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, राहुल भातणकर यांनी संकलन केलं आहे.या चित्रपटाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असलेली धडाकेबाज अॅक्शनदृश्ये फाईट मास्टर अब्बास अली मोघल आणि कौशल-मोझेस यांनी दिग्दर्शित केली आहेत. संग्राम शिर्के या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

६ जानेवारीला ‘सुर्या’ चित्रपट राज्यभरातील चित्रपटगृहांतून प्रदर्शित होणार आहे.   

भाजपला फक्त गोळवलकर, हेडगेवार हवे आहेत, बाकी महापुरुष नकोत-सुषमा अंधारे

पुणे : भाजपला फक्त गोळवलकर, हेडगेवार हवे आहेत, बाकी महापुरुष नको आहेत असे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून मंगळवारी पुणे बंद पाळण्यात येत आहे.बंदबरोबरच आता मोर्चाचेही आयोजन केले आहे. डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी साडेनऊ वाजता या मोर्चाला सुरु झाला आहे. अलका चित्रपटगृह चौक, लक्ष्मी रस्ता, बेलगाव चौक मार्गे लाल महालाजवळ जाहीर सभेने मूक मोर्चाची सांगता होणार आहे. या मोर्चात अंधारे सहभागी झाल्या आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली आहे. अंधारे म्हणाल्या, भाजपच्या नेत्यांकडून जाणूनबूजून महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. त्यांना फक्त गोवळवलकर आणि हेडगेवार हवे आहेत, बाकी महापुरुष नकोत. भाजपाला ऐकायचं नसेल तर आम्ही असं समजू की भाजप महापुरुषांच्या विरोधात आहे. १७ मार्चला आमचा सर्वपक्षीय मोर्चा मुंबई येथे आहे. आम्ही सर्व महापुरुषांच्या सन्मानार्थ एकत्र येणार आहोत. पुण्यातून या बंदला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घ्यावी अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे तसेच राज्यातील अन्य नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत, अशी माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली होती. तसेच गणेश मंडळांचा पाठिंबा आहे. शहरातील नागरिकांनीही यात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले होते. आता मोर्चा सुरु असताना उदयनराजे भोसले आणि सुषमा अंधारे या मोर्चात सहभागी झाले आहेत.

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

0

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी फोन करून ही धमकी देण्यात आली. आरोपीने शरद पवारांना मुंबईत येऊन देशी कट्ट्याने जीवे मारण्याची धमकी दिली. २ डिसेंबर रोजी ही धमकी आल्याचे सूत्रांनी सांगितले.

फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिल्याची माहिती मिळत आहे. सिल्वर ओकवरील टेलिफोन ऑपरेटर पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी ग्रामदेवी पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.

पवार यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर अनोळखी व्यक्तीने दूरध्वनी केला होता. पोलीस हवलदार कृष्णा देऊळकर यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने पवार यांना मुंबईत येऊन देशी कट्ट्याने ठार मारण्याची धमकी दिली आहे. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिली. तक्रारीनुसार गावदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात २९४, ५०६ (२) भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यपाल कोश्यारींच्या निषेधार्थ पुणे बंद:शिवप्रेमी संघटनांसह सर्वधर्मीयांचा मोर्चा; खासदार उदयनराजे सहभागी

पुणे -मराठा संघटना संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आणि विरोधी पक्षांसह सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकरांनी मंगळवारी पुणे बंद पाळला आहे. छत्रपती उदयनराजे भोसले,दीपक मानकर, आबा बागुल ,अरविंद शिंदे ,दत्ता सागरे आदी मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला प्रारंभ केला आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे.बंदला अनेक सामाजिक, व्यापारी संघटनांचा पाठिंबा राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मिळाला आहे. फेडरेशन ऑफ ट्रेडर्स असोसिएशन ऑफ पुणे (एफएटीपी) चे अध्यक्ष एफ एम रांका म्हणाले , “आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि व्यापाऱ्यांना बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन करतो.सर्व दुकाने आणि कार्यालये दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहतील.

मोर्च्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लाल महाल याठिकाणी मोर्चाचा समारोप केला जाणार आहे. विविध संघटनांनी आजच्या पुणे बंदला पाठिंबाही दिला आहे. यावेळी पुण्यातील मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे नेते माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे ,शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, रूपाली ठोंबरे ,प्रदीप देशमुख, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे ,विकास पासलकर ,मुस्लिम मूलनिवासी मंचाचे अंजुम इनामदार सहभागी झाले

मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या दिसून आली आहे. राज्यपाल कोशियारी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी काळीपट्टी दंडाला बांधत निषेध व्यक्त केला. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा चित्र असलेला झेंडा आणि भगवे झेंडे घेऊन कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाल्याने भगवामय वातावरण पाहवयास मिळाले. सदर मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी निषेध मोर्चा सुरू झालेल्या डेक्कन परिसर ते लाल महाल या दरम्यान चोख बंदोबस्त तैनात केला.

लक्ष्मी रोडची दुकाने बंद

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य नंतर पुण्यातील विविध पक्षांनी आज बंदचे आयोजन केले होते. त्यास व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला आणि दुपारी तीन वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मंगळवारी सकाळी नेहमी गजबजलेल्या पुण्यातील लक्ष्मी रोड, तुळशीबाग परिसरातील दुकाने बंद असल्याची पाहावयास मिळाली. त्याचप्रमाणे बंदच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील वाहतूकही काहीशी कमी झाल्याचे यावेळी दिसून आले. रिक्षा ही बंद ठेवण्यात आल्या होत्या.

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मुंबईत १७ तारखेला महाविकास आघाडीचा महामोर्चा!: नाना पटोले

नागपूर अधिवेशन किमान तीन आठवडे हवे; अधिवेशनात राजभवनची पोलखोल करणार.

पंतप्रधान मोदी विदर्भात येऊनही शेतकऱ्यांबद्दल शब्दही का बोलले नाहीत?

मुंबई, दि. १२ डिसेंबर..

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने चार महिन्यातच राज्याचा नावलौकिक रसातळाला मिळवला असून महापुरुषांचा अपमान सातत्याने केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान करुनही भाजपा नेत्यांवर कारवाई होत नाही. महापुरुषांच्या अपमानाबद्दल जनतेत तीव्र संताप आहे पण सत्ताधारी मात्र विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम करत आहेत. भाजपाच्या विखारी प्रचाराविरोधात एकत्रपणे लढले पाहिजे म्हणूनच महापुरुषांच्या अपमानासह राज्यातील विविध समस्याप्रश्नी महाविकास आघाडी १७ तारखेला मुंबईत महामोर्चा काढून मस्तवाल सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

गांधी भवन येथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान आदी उपस्थित होते. या बैठकीत महाविकास आघाडीचा महामोर्चा व राज्यातील समस्यांवर चर्चा झाली.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष महापुरुषांचे विचार पुसून टाकण्याचे काम करत असून त्यातूनच महापुरुषांचा सातत्याने अपमान केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्यात राज्यपालांसह भाजपात चढाओढच लागलेली दिसते. हे अनवधानाने झालेले नाही तरल जाणीवपूर्वक केले जात आहे. जनतेत या अपमानाबद्दल प्रचंड रोष आहे, कारवाई करण्याची मागणी केली जात आहे परंतु भाजपा या वाचाळवीरांवर कारवाई न करता त्यांचा निषेध करणाऱ्यांवर कारवाई करत आहे. शाईफेक चुकीचीच आहे, त्याचा आम्ही निषेध करतो पण पत्रकारावर ३०७, ३५३ चे गंभीर कलमे लावून गुन्हा दाखल केला तो कशाच्या आधारावर? पोलिसांचे निलंबन कशासाठी? या पोलिसांचे निलंबन तात्काळ मागे घेतले पाहिजे.

राज्यातील सत्ताधारी पक्षाचे मंत्री व आमदार राजरोसपणे धमक्या देत आहेत पण राज्य सरकार त्यांच्यावरही कारवाई करत नाही. चंद्रकांत पाटील यांनी बाळशास्त्री जांभेकर यांनाही एकेरी भाषा वापरली, मलाही एकेरी भाषा वापरली. तर सत्ताधारी पक्षाचा एक आमदार गावकऱ्यांना खुलेआमपणे धमकावतो. विरोधकांची सुरक्षा काढून घेतली जाते आणि सत्ताधारी पक्षाच्या ५० आमदारंना, त्यांच्या नातेवाईकांना सुरक्षा पुरवते, या सुरक्षेसाठी निर्भया फंडातील गाड्या पुरवल्या जात आहेत. राज्यातील जनतेची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे. राज्यात कायद्याचे राज्य राहिले का? असे चित्र महाराष्ट्रात सध्या आहे. गृहमंत्र्यांनी यावर उत्तर दिले पाहिजे..

२०१४ च्या निवडणुकीआधी नरेंद्र मोदी विदर्भात येऊन चाय पे चर्चा करत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन गेले. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासनही दिले होते पण य़ातील एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. रविवारी पंतप्रधान मोदी नागपूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले ज्या विदर्भात शेतकरी आत्महत्येची मोठी समस्या आहे त्याबद्दल पंतप्रधान एक शब्दही बोलले नाहीत. समृद्धी महामार्गामुळे कोणाची समृद्धी झाली, हे सर्वांना माहित आहे पण शेतकऱ्याची समृद्धी झालेली नाही.

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन अनेक वर्षांच्या कालखंडानंतर होत आहे. हे अधिवेशन किमान तीन आठवड्यांचे असावे अशी काँग्रेसची मागणी आहे. मंगळवारच्या बैठकीत काँग्रेस तशी ही मागणी करणार आहे. विदर्भातील समस्या, प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन जास्त काळ चालले पाहिजे अशी काँग्रेसची भूमिका आहे. या अधिवेशनात राजभवनमधील कारभाराची पोलखोल करणार असल्याचेही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.

भर दुपारी औंध मध्ये तब्बल ६६ लाखाची घरफोडी

पुणे- औंध बाणेर रोड सिंध हौसिंग सोसायटीतील बंगला नंबर १७ सुमा अनामिका दुपारी कुलूप बंद असताना अज्ञात चोरट्याने ते तोडून घरातील ६६ लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला . हि घरफोडी काल भर दुपारी दीड ते चार वाजण्याच्या दरम्यान झाली .

घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून , आतील बेडरूम मध्ये प्रवेश करून तेथील कपाट फोडून २ लाखाची भारतीय चलनातील रोख रक्कम आणि ३ लाखाची परदेशी चलनातील रक्कम तसेच सोन्या चांदीचे आणि हिऱ्या चे ६१ लाख ४२ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले .चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक रुपेश चाळके याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

हडपसर ते वैदवाडी बस प्रवासात ४८ हजार ५०० चा ऐवज चोरी

हडपसर ते चिंचवड गाव या बस मधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्स मधून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम , दागिने असा ४८ हजार ५०० रुपयांचा ऐवज पळविला . हि चोरी हडपसर ते वैदवाडी दरम्यान बस मधील गर्दीचा फायदा घेऊन करण्यात आली हडपसर पोलीस ठाण्यातील अंमलदार वाय बी टिळेकर अधिक तपास करत आहेत.

पुणे बंद : मोर्चासाठी वाहतुकीमध्ये बदल ,त्या व्यतरिक्त मात्र जमावबंदी -प्रतिबंधात्मक आदेश

पुणे-दिनांक १३ डिसेंबर रोजी काही राजकीय पक्ष आणि संघटना यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे बाबत होत असलेल्या अवमानास्पद वक्तव्याचा निषेध म्हणून संभाजी महाराज पुतळा टिळक चौकातून सकाळी ९ वाजता मोर्चा काढण्याचे ठरविल्याने पोलिसांच्या वाहतूक विभागाने दैनदिन वाहतूक मार्गात तात्पुरते बदल केले आहेत तर दुसरीकडे विनापरवानगी आंदोलनास बंदी घालून पुणे पोलिसांनी (या मोर्चा व्यतरिक्त ) शहरात जमावबंदी आणि प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत .

विशेष शाखेचे उपायुक्त आर राजा यांनी उद्यापासून १४ दिवस ३७ (१)(३) कलम लागू केले आहे , ज्यामुळे पोलीस आयुक्त यांच्या परवानगी शिवाय मोर्चा , आंदोलन ,मिरवणूक, सभा घेता येणार नाही . घोषणा देणे , वाद्य वाजविणे , कोणाच्याही प्रतिमांचे दहन करणे अगर प्रतीकात्मक प्रेताचे , छायाचित्रांचे प्रदर्शन करणे, पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे यास बंदी घालण्यात आली आहे.

तर पोलीस उपायुक्त विजय कुमार मगर यांनी डेक्कन , विश्रामबाग , फरासखाना , आणि समर्थ पोलिसांच्या हद्दीतील वाहतूकव्यवस्था उद्या सकाळी ९ पासून मोर्चा संपेपर्यंत किंवा त्यांना आवश्यक वाटेल तोवर काही भागातील बदलली आहे.यात लक्ष्मी रोड , बाजीराव रोड, केळकर रोड,गणेश रोड ,येथील काही भागातील वाहतूक मोर्चा जाईपर्यंत वळविली आहे.तिलक चौक ते बेलबाग चौक नो पार्किंग करण्यात आले आहे.