Home Blog Page 1495

बंगळुरू येथे 15 जानेवारी 2023 रोजी लष्कर दिन संचलनाचे आयोजन

पुणे, 16 डिसेंबर 2022

आगामी लष्कर  दिन संचलन बंगळुरू (कर्नाटक) येथे  15 जानेवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आले आहे.नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्यासाठीं आणि व्यापकपणे पाहता यावे या दृष्टीने, राष्ट्रीय महत्त्वाच्या  कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रीय राजधानीबाहेर करण्याच्या निर्णयाशी सुसंगत राहून हे आयोजन करण्यात आले आहे. 15 जानेवारी 1949 रोजी भारतीय लष्कराचे पहिले  कमांडर-इन-चीफ, फील्ड मार्शल केएम करिअप्पा यांनी  ब्रिटिश पूर्वसूरींची जागा घेत भारतीय लष्कराची औपचारिक सूत्रे हाती घेतली होती, यानिमित्त दरवर्षी  15  जानेवारी रोजी  लष्कर दिन साजरा केला जातो.  यंदा बंगळुरू येथे  या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन म्हणजे दक्षिण भारतातील लोकांनी  राष्ट्रासाठी दिलेले  शौर्य, बलिदान आणि सेवा यांचा गौरव आहे तसेच  कर्नाटकचे असलेले फील्ड मार्शल केएम करिअप्पा यांनाही ही समयोचित आदरांजली  आहे.

भारतीय लष्कराने, पुढील एक महिना , शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी, दुर्गम गावे आणि समाजातील सर्व स्तरातील लोकांसोबत कार्यक्रम आयोजित करून नागरिकांशी असलेले संबंध  दृढ करण्यासाठी व्यापक जनसंपर्क  मोहीम आखली आहे.

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे बंगळुरू येथे हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करतील आणि 15 जानेवारी 23 रोजी होणाऱ्या लष्कर दिन संचलनाचे पुनरावलोकन करतील. या संचलनामध्ये, भारतीय लष्कराचा पराक्रम अधोरेखित करतानाच   भविष्यातील सज्जतेसाठी   तंत्रज्ञानावर आधारित, घातक आणि चपळ वेगवान दलामध्ये  रूपांतरित करण्याच्या भारतीय लष्कराच्या प्रयत्नांचे दर्शन घडणार  आहे.  देशाच्या  तरुण पिढ्यांना  प्रेरित करण्यासाठी लष्करी संचलन तुकडी  आणि लष्करी बँड सोबत, मोटार सायकल डिस्प्ले, पॅरा मोटर्स आणि कॉम्बॅट फ्री फॉल यांसारख्या  साहसी उपक्रमांचे आयोजन  करण्यात येणार आहे. देशासाठी लष्करी जवानांनी  शौर्य आणि गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान केल्याचा गौरव म्ह्णून लष्करप्रमुखांकडून शौर्य पुरस्कार आणि लष्कराच्या तुकड्यांना  प्रशस्तिपत्रके प्रदान केली जातील. लष्कर दिन 2023 ची पूर्वतयारी म्हणून, 13 जानेवारी 23 रोजी बंगळुरू येथे दक्षिण  कमांड पुरस्कार प्रदान  समारंभ आयोजित करण्यात आला आहे., ज्यामध्ये दक्षिण कमांडचे आर्मी  कमांडर लेफ्टनंट जनरल ए के सिंग लष्करी जवानांना विशिष्ट सेवा पुरस्कार प्रदान करतील.

भारतीय लष्कराची देश  उभारणीत असलेली बांधिलकी दर्शविणाऱ्या कार्यक्रमांची मालिका पुढील एका महिन्यात दक्षिण कमांडच्या लष्करी तुकड्यांद्वारे समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांच्या सर्वांगीण सहभागासह आयोजित  करण्यात आली आहे.विजय दिवसाच्या स्मरणार्थ 17 डिसेंबर 22 रोजी दक्षिणी स्टार विजय दौड  – 2022  (संकल्पना  – जवानांसाठी  धावा – जवानांसह धावा) हा कर्टन रेझर कार्यक्रम होणार आहे. यामध्ये दक्षिण कमांडमधील 18 ठिकाणांवरील (जैसलमेर, जोधपूर, अहमदाबाद, भुज आणि अल्वर, भोपाळ, सिकंदराबाद, झाशी, ग्वाल्हेर, चेन्नई, बेंगळुरू, बेळगाव, वेलिंग्टन (टीएन), पुणे, नाशिक, नागपूर, अहमदाबाद आणि मुंबई) 50,000 हून अधिक सहभागींना    एकाच वेळी हिरवा झेंडा दाखवला जाईल.

त्यानंतर भारतीय लष्कराची देशाप्रती असलेली वचनबद्धता दर्शविणारे अनेक कार्यक्रम,  स्थानिक संस्था आणि समाज यांच्या समन्वयाने आयोजित केले जातील त्याचा तपशील खालीलप्रमाणे :-

24 डिसेंबर 2022  : रक्तदान (संकल्पना : रक्तदान करा – जीवन वाचवा) गरजू रुग्णांसाठी 7,500 युनिट रक्त संकलन आणि 75,000 स्वैच्छिक रक्तदात्यांच्या डेटाचे संकलन 

30 डिसेंबर 2022 :  75x दुर्गम / सीमावर्ती / कमी विकसित गावांमध्ये भारतीय सैन्याद्वारे जनसंपर्क  कार्यक्रम (संकल्पना : ग्राम सेवा- राष्ट्र सेवा) यामध्ये  वैद्यकीय शिबिरे, अग्निपथ योजना जागृती, वीर नारी आणि वीर माता यांचा सत्कार, स्वच्छता अभियान, क्रीडा सुविधांची निर्मिती -व्हॉलीबॉल / खो खो / कबड्डी आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाईल.

07 जानेवारी 2023 : ‘विद्यांजली योजना, ज्यात  क्रीडा पायाभूत सुविधा सामायिक करणे, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे आणि योग आणि इतर सुप्त कौशल्यांना प्रोत्साहन देणे यासांसारख्या  परस्पर फायदेशीर विकास कार्यक्रम सामायिक  आणि देवाणघेवाण करण्यासाठी आर्मी पब्लिक स्कूल 75 x सरकारी/सरकारी अनुदानित शाळांशी संलग्नता साधतील.

10 जानेवारी 2023 : 75 x अमृत सरोवर/तलाव (संकल्पना : जल – जीवन सुरक्षा) यांच्या पुनरुज्जीवनासाठी आणि पर्यावरणाच्या विकासासाठी कार्य

14 जानेवारी 2023 : ‘वृक्षरोपण’ (संकल्पना : पर्यावरण सुरक्षा) दक्षिण कमांड परिसरात  हरित भारतासाठी 75,000 रोपांची लागवड.

 लष्कर दिनाच्या  (09 -15 जानेवारी 2023)  आधीच्या आठवड्यात, शस्त्रे आणि उपकरणे प्रदर्शन, बँड सादरीकरण , प्रश्नमंजुषा स्पर्धा, चित्रकला आणि निबंध लेखन स्पर्धा, सायक्लोथॉन, शौर्य पुरस्कार विजेत्यांकडून प्रेरक भाषणे, प्रसिद्ध युद्धांचे  सादरीकरण, युद्ध स्मारक/युद्ध संग्रहालयांना भेटी आणि ‘एक भारत सर्वश्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर  आधारित सांस्कृतिक कार्यक्रम या अतिरिक्त उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. 

लष्कर दिन संचलनापर्यंत  आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन भारतीय लष्कराने केले आहे.

रितेश कुमार यांनी पुणे पोलिस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली

पुणे : नवनियुक्त पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी पुणे पोलिस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. मावळते पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी रितेश कुमार यांच्याकडे पदभार सुपूर्द केला.पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी फुलांची उधळण करीत त्यांचे स्वागत केले. राज्य सरकारच्या गृह विभागातर्फे 13 डिसेंबर रोजी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये मागील काही दिवसांपासून पुण्याच्या पोलिस आयुक्त पदी कोण विराजमान होणार, यावरून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. अखेर राज्य सरकारने रितेश कुमार यांची नियुक्ती केल्यानंतर चर्चेला पूर्णविराम मिळाला. दरम्यान, रितेश कुमार हे सोमवारी पदभार स्वीकारणार होते, मात्र त्यांनी शुक्रवारी सायंकाळी पावणे पाच वाजताच पोलिस आयुक्तालयात हजेरी लावून पदभार स्वीकारला.

सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात आले. उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी फुलांची उधळण करीत त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मावळते पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. अतिरिक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, रामनाथ पोकळे यांच्यासह सर्व परिमंडळाचे, विभागाचे पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यावेळी उपस्थित होते. रितेश कुमार यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्याशी संवाद साधला.

लेखापरीक्षक, प्रशासकांनीच दोन लाख हडपले; फेरलेखापरीक्षणातून उघड, गुन्हा दाखल

पुणे-पुण्यातील एका साेसायटी संस्थेचे फेरलेखापरीक्षण करताना सहकार विभागातील लेखापरीक्षक आणि प्रशासक यांनी दाेन लाख दाेन हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दाेघांवर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिलीे लेखापरीक्षक किरण चाैधरी आणि प्रशासक हरुन सय्यद अशी गुन्हा दाखल झालेल्या आराेपींची नावे आहे.

याप्रकरणी सहकार विभागाचे वर्ग एकचे अधिकारी अपर लेखा परीक्षक महेश चंद्रकांत जाधव (वय-55) यांनी पोलिसांकडे आराेपी विराेधात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार हे अप्पर लेखापरीक्षण श्रेणी सहकारी संस्था, पुणे येथे विशेष लेखापरीक्षक पदावर काम करत आहे. 16/6/2017 राेजी प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने यल्लाे ब्लाॅसम सहाेरी गृहरचना संस्था, बी.टी.कवडे राेड,घाेरपडी,पुणे या संस्थेचे 2011-12 या कालावधीचे फेरलेखापरीक्षण करण्याचे आदेश प्राप्त झाले हाेते.

याबाबत तक्रारदार यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,पुणे यांचे फेरलेखापरीक्षण पूर्ण करुन वैधानिक लेखापरीक्षक किरण चाैधरी व प्रशासक हरुन सय्यद यांनी दाेन लाख दाेन हजार रुपये रक्कमेचा अपहार केले असल्याचा फेरलेखापरीक्षण अहवाल 27/9/2022 राेजी उपनिंबधक पुणे शहर सहकारी संस्था यांचेकडे सादर केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास मुंढवा पोलिस करत आहे.

‘मविआ’च्या महामोर्चाला परवानगी:मुंबईत तब्बल अडीच हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त; ड्रोनच्या माध्यमातून ठेवणार लक्ष

पुणे -महाविकास आघाडीच्या मुंबईत शनिवारी निघणाऱ्या महामोर्चाला अखेर पोलिसांनी परवानगी दिलीय, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मोर्चासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शिवाय ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे.

मोर्चाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोर्चा शांतपणे व्हावा. त्याला आवश्यक असणारी परवानगी दिली आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना विरोध करायचा अधिकार आहे. आम्ही सरकार म्हणून फक्त कायदा आणि सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे हेच पाहू.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते ज्या पद्धतीने वारकरी संताबद्दल बोलतायत, रामकृष्णांबद्दल त्यांचे उदगार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलतायत. याविरोधातही संताप आहे. तो व्यक्त करावाच लागेल. त्यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेले अवमानकारक वक्तव्य, सीमाप्रश्नी महाराष्ट्राची गळचेपी, सत्ताधाऱ्यांची महापुरुषांबत वादग्रस्त वक्तव्ये याच्या निषेधार्थ शनिवारी (१७ डिसेंबर) मुंबईत विरोधी पक्ष ‘संयुक्त महामोर्चा’ काढणार आहे. दुसरीकडे भाजपही ‘मविआ’च्या मोर्चाविरोधात प्रतिमोर्चा काढणार आहे. यापार्श्वभूमीवर प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

‘मविआ’च्या मोर्चाला तब्बल अडीच हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. मोर्चाच्या सुरक्षेची जबाबदारी दोन अतिरिक्त पोलिस आयुक्त चारे ते पाच पोलिस उपायुक्तांवर टाकण्यात आली आहे. मोर्चात एसआरपीएपच्या वाढीव तुकड्याही असतील. ड्रोनच्या माध्यमातून मोर्चावर लक्ष ठेवले जाणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडीने आपल्या नेत्यांना संरक्षण देण्यासाठी तब्बल दीडशे सुरक्षा रक्षकांची टीम तयार केलीय. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येक पन्नास सदस्य असणार आहेत.

रोजगार भरती मेळाव्यात १६९  उमेदवारांची निवड

पुणे दि. १६ : औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी तसेच रोजगार भरती मेळाव्यात विविध कंपन्याकडून नोंदणी केलेल्या १९० पैकी १६९ उमेदवारांची निवड करण्यात आली.

या मेळाव्यात जिल्ह्यातील एकूण ३२ आस्थापना सहभागी झाल्या होत्या. उपस्थित आस्थापनांची विविध व्यवसायांकरीता १०५२ शिकाऊ उमेदवारांची मागणी होती. परंतु प्रत्यक्षात १९० उमेदवार उपस्थित राहिल्याने त्यापैकी १६९ उमेदवारांची निवड करण्यात आली.

औंध औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक बी. आर. भावसार यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार यशवंत कांबळे, गणित निदेशक श्रीमती जी. बी परदेशी, कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार एस. आर. खुडे व डी. टी.चौधरी आदी उपस्थित होते.

माता आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राला दोन राष्ट्रीय पुरस्कार

पुणे दि.१६- माता आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून माता मृत्यू दर कमी करण्यासाठी तसेच प्रसूतीदरम्यान पुरविल्या जाणाऱ्या सुविधांची गुणवत्ता वाढविण्यासाठी लक्ष्य संस्था प्रमाणिकरणामध्ये महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या यशाबद्दल राज्याचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

शाश्वत विकास ध्येय (SDG) साध्य करण्यासाठी आणि देशातील माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी माता आरोग्य केंद्रात नाविन्यपूर्ण योजनांच्या देवाणघेवाणीबाबत विचार विनिमयासाठी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मातृत्व आरोग्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. माता मृत्यू कमी करण्यासाठी आयोजिण्यात आलेल्या या कार्यशाळेची मुख्य संकल्पना ‘टाळता येण्याजोगे माता मृत्यू शून्य करण्यासाठी प्रयत्न’ अशी होती.

माता आरोग्याच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यांना पुरस्कार देण्यात आले आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये रजिस्ट्रार जनरल इंडियाने प्रकाशित केलेल्या नमूना नोंदणी प्रणालीच्या सर्वेक्षण अहवालानुसार सन २०१७-१९ मध्ये देशातील मातामृत्यु प्रमाण १०३ प्रति लक्ष जिवंत जन्म वरुन सन २०१८-२० मध्ये ९७ प्रति लक्ष जिवंत जन्म इतका झालेला आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये मातामृत्यू प्रमाण सन २०१७-१९ च्या ३८ प्रति लक्ष जिवंत जन्म वरुन सन २०१८-२० मध्ये ३३ प्रति लक्ष जिवंत जन्म झाला आहे. देशामध्ये मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर महाराष्ट्र राज्य दुसऱ्या स्थानावर आहे तर पहिल्या स्थानावर केरळ राज्य आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, मातृत्व अनुदान योजना, मानव विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना इत्यादी योजना प्रभावीपणे राबवल्या तसेच सुरक्षित मातृत्वासाठी विविध उपाय योजना राबवल्यामुळे राज्याला हे साध्य करता आले.

राष्ट्रीय स्तरावर लक्ष्य संस्था प्रमाणिकरणासाठी महाराष्ट्राला द्वितीय पुरस्कार

लक्ष संस्था प्रमाणिकरणामध्ये महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. केंद्र सरकारने प्रसूतीदरम्यान पुरविल्या जाणाऱ्या सुविधांची गुणवत्ता वाढविण्याकरीता डिसेंबर २०१७ मध्ये लक्ष्य (LaQshya) कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. प्रसूतीगृह आणि माता शस्त्रक्रियागृहमध्ये गुणवत्ता सुधारणा करुन त्याद्वारे माता मृत्यू, उपजत मृत्यू आणि नवजात अर्भक मृत्यू कमी करणे तसेच प्रसूतीदरम्यान दर्जात्मक सेवेसोबतच मातृत्वाची काळजी घेणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. लक्ष्य २०१७ च्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात सन २०१८-१९ पासून लक्ष्य कार्यक्रम महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे.

महिला व बालकाचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री मा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याला हे मोठे यश मिळाले आहे. दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या शुभहस्ते हे दोन्ही पुरस्कार डॉ. अशोक नांदापुरकर, उपसंचालक, कु.क. पुणे व डॉ. अनिरुध्द देशपांडे, सहाय्यक संचालक व नोडल अधिकारी, माता आरोग्य, कु. क. पुणे यांनी स्वीकारले.

राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल आशा व परिचारिका गटात महाराष्ट्र राज्याला द्वितीय पुरस्कार गोंदिया जिल्ह्यातील डव्वा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशासेविका गीता चोपराम भेंडारकर व परिचारिका पंचफुला राणे यांना देण्यात आला.

पुणे येथे आयोजित बैठकीत मंत्री सावंत यांनी सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन आंबाडेकर, सहसंचालक डॉ.भोये, डॉ.रामचंद्र हंकारे , डॉ.अशोक नंदापूरकर , डॉ.अनिरुद्ध देशपांडे व इतर अधिकारी उपस्थित होते.

हरभरा पिकावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन

पुणे, दि. १६ : ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. घाटेअळीचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच उपाय योजना कराव्यात, असे आवाहन कृषि सह संचालक (विस्तार व प्रशिक्षण) पुणे डॉ. तुकाराम मोटे यांनी केले आहे.

सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था व प्रथम अवस्थेतील अळी असल्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण होऊ शकते. बऱ्याच ठिकाणी अळीने प्रादुर्भाव करण्यास सुरुवात केली असून ही कीड बहुभक्षी असून विशेषतः पिक फुलोरा आणि प्रामुख्याने घाटे अवस्थेत नुकसानकारक असते.

शेतकऱ्यांनी शेताची कोळपणी किंवा निंदणी करून पिक तणविरहित ठेवून घाटेअळीच्या मोठ्या अळ्या हाताने वेचून त्यांना नष्ट कराव्यात. घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे जमिनीपासून १ मिटर उंचीवर लावावेत. कामगंध सापळयामध्ये पतंग आढळल्यास किटकनाशकाची फवारणी करावी.

शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकाच्या किमान एक ते दोन फूट उंचीवर हेक्टरी ५० ते ६० ठिकाणी पक्षी थांबे उभारावेत. पिक कळी अवस्थेत असतांना ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अझेंडिरेक्टिन ३०० पीपीम ५ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. घाटेअळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी. व्ही. ५०० एल. ई. १ मिली प्रति लिटर पाण्यात ५ ग्रॅम निळ टाकून संध्याकाळच्या वेळेला फवारणी करावी.

किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर आढळून आल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५, एसजी ४.४ ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डामाईड ३९.३५ एससी २ मिली किंवा क्लोरॅनट्रीनीलीप्रोल १८.५ एससी २५ मिली यापैकी एका कीटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कीटकनाशकांचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी मात्रा तीनपट वापरावी. शेतात किटकनाशकांचा वापर करतांना हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा व सुरक्षिततेची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

पुण्यात दक्षिण कमांड युद्ध स्मारक येथे विजय दिवस साजरा

पुणे, 16 डिसेंबर 2022-पुणे येथील दक्षिण कमांड युद्ध स्मारक येथे आज 16 डिसेंबर 2020 रोजी पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात विजय दिवस 2022 साजरा करण्यात आला. 51 वर्षांपूर्वी युद्धात, भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या रोमहर्षक विजयाचे स्मरण म्हणून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.या युद्धातील भव्य विजयानंतर पाकिस्तानचे विभाजन होऊन, स्वतंत्र देश म्हणून बांगलादेश उदयाला आला आणि या विजयामुळे भारत आशिया प्रांतात एक मोठी शक्ती म्हणून उदयास आला. भारताच्या पारंपरिक शत्रूवरील या निर्णायक विजयानंतर भारताची सैन्यदले देशाच्या सामर्थ्याचे एक भक्कम अंग असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

1971 साली पाकिस्तानचे तत्कालीन लष्करशहा जनरल याह्या खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी लष्कराने पूर्व पाकिस्तानमध्ये केलेल्या नृशंस हत्याकांडांमुळे भारतावर ही युद्धजन्य आपत्ती ओढवली. हे अल्पकाळ चाललेले मात्र अत्यंत भीषण स्वरूपाचे युद्ध भारताच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही सीमांवर लढले गेले. 13 दिवसांच्या या युद्धानंतर, पाकिस्तानी सैन्य पूर्णपणे शरण आले आणि त्यानंतर बांगलादेशची निर्मिती झाली. या युद्धात, भारतीय सैन्य, पाकिस्तानी लष्करावर सर्व दृष्टीनी वरचढ ठरले.युद्धादरम्यान, दक्षिण कमांडच्या सैन्याने शौर्य गाजवत पाकिस्तानच्या कारवायांपासून देशाच्या सीमांचे रक्षण केले. या युद्धादरम्यान दक्षिण कमांड क्षेत्राकडील जबाबदारीच्या क्षेत्रात लढल्या गेलेल्या गाजलेल्या लढायांमध्ये लोंगेवाला लढाईत पाकिस्तानी सैन्याचा भारतीय जवानांनी धुव्वा उडवला होता. लेफ्टनंट कर्नल भवानी सिंग (नंतर ब्रिगेडियर), यांच्या नेतृत्वाखाली 10 पैरा कमांडो बटालियनने पाकिस्तानामधल्या छाछरो गावात घुसून परबत अलीवर मिळवलेला ताबा ही दक्षिण कमांडची आणखी एक गाजलेली लढाई होती. या लढायांमध्ये भारतीय सैन्याचे शौर्य, दृढनिश्चय आणि पराक्रमाचे सर्वांना दर्शन घडले.

आपल्या महान राष्ट्राच्या सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देण्यापूर्वी एकदाही विचार केला नाही अशा भारतीय सशस्त्र दलातील शूर सैनिक, हवाई दल आणि नौसैनिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दक्षिण कमांड युद्ध स्मारक येथे पुष्पअर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दक्षिण कमांड मुख्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मनजीत कुमार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. या कार्यक्रमाला पुणे स्थित लष्करी अधिकारी आणि जवान तसेच 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात सहभागी झालेल्या भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे ज्येष्ठ माजी सैनिक उपस्थित होते. त्यानंतर शूर वीरांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही क्षण मौन पाळण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रत्नागिरी विमानतळावर स्वागत

0

रत्नागिरी, दि.16 : येथील कोस्टगार्ड धावपट्टीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय विमानाने आगमन झाले. त्यावेळी मंत्रीगण, प्रशासन आणि पोलीस दलातर्फे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्यासोबत बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे उपस्थित होते.

विमानतळावर उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कृषीमंत्री अब्दुल सत्तार तसेच जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार आदींसह पक्षाचे पदाधिकारी यांनी स्वागत केले.

यावेळी पोलीस दलातर्फे मुख्यमंत्री महोदयांना सलामी देण्यात आली.

देशातील विभाजनकारी शक्तींना प्रेम, सत्य, अहिंसेच्या मार्गाने हरविल्या जाऊ शकते.

ॲड. असिम सरोदे,विश्वभंर चौधरी कॉंग्रेसच्या कार्यक्रमात सहभागी

पुणे, १६ डिसेंबर – भारत जोडो यात्रेला १०० दिवस पुर्ण झाले त्या निमित्ताने भारत जोडो यात्रा समितीपुणे तर्फे पुण्यात प्रतिकात्मक पदयात्रा काढण्यात आली. भारताला जोडणाऱ्या महात्मा गांधींचे राजकीय गुरू गोपाळ कृष्ण गोखले यांच्या पुतळ्याला हार घालून पदयात्रेची सुरूवात करण्यात आली.

      यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते  ॲड. असिम सरोदे म्हणाले की, ‘‘देशातील विभाजनकारी शक्तींना प्रेमसत्यअहिंसेच्या मार्गाने हरविले जाऊ शकते हा या यात्रेचा संदेश आहे.भारत जोडोमुळे अनेक लोक एकत्र आली. काँग्रेस पक्षाला लोक जोडली जातील का? याचा विचार न करता राहुल गांधी आज चालत आहेत यामुळे लोक त्यांच्याकडे आर्कषली जात आहेत. भारत जोडो यात्रेमुळे देशाची लोकशाही मजबूत होईल अशी खात्री राहुलजी गांधी यांना आहे.’’

      यानंतर सामाजिक कार्यकर्ते विश्वभंर चौधरी यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. ते म्हणाले की, ‘‘गेल्या आठ वर्षात समाजात, जातीजातीत, धर्माधर्मात व्देष, तेढ निर्माण करून देशातील वातावरण दूषित करण्यात आले  आहे. हे प्रयास आजही सुरू आहे. अशा वातावरणात देशाला धर्मनिरपेक्षतेच्या सूत्रात पुन्हा एकत्र बांधण्याचे काम महात्मा गांधींचे आचार विचार करू शकत होते. गेले शंभर दिवस कन्याकुमारी पासून सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ते ठळकपणे अधोरेखीत केले आहे. त्यामुळे या यात्रेमुळे म. गांधींनी दाखवलेल्या धर्मनिरपेक्षतेचा मार्ग काँग्रेसला पुन्हा एकदा गवसला आहे.’’

      पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यावेळी म्हणाले की, ‘‘सत्तारूढ हे धर्मा धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे, महिलांचा सन्मान न करणे, महापुरूषांचा वारंवार अपमान करणे, संविधानाचा न पाळण्याचे काम आत्ताचे सत्ताधारी करीत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या हे ईडीचे मुख्य कार्यकारी असल्यासारखे वागत आहे. या सत्ताधारी पक्षाने लाजलज्जा सोडली आहे म्हणून आम्ही भारत जोडो म्हणत आहोत’’

या पदयात्रेचे प्रास्ताविक करताना ॲड. अभय छाजेड म्हणाले की, ‘‘भारत जोडो यात्रा देश जोडणारी यात्रा असून ही यात्रा काश्मीर मध्ये पोहोचल्यानंतर देशातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलेले असेल. राहुल गांधीजींच्या भारत जोडो यात्रेचा जो देश हिताचा उद्देश आहे, त्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी आम्ही ही पदयात्रा काढीत आहोत.’’  

      महागाईबेरोजगारीच्या विरोधात निघालेल्या या यात्रेचा संदेश घराघरापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे असे लोकायतच्या अलका जोशी म्हणाल्या.

      तिरंगा झेंड्याखाली निघालेल्या या पदयात्रेचा समारोप पोलिस ग्राउंड येथे करण्यात आला. संपूर्ण पदयात्रे दरम्यान ‘महागाईशी नाते तोडा, भारत जोडा या व इतर घोषणांनीरंग दे बसंती‘ , ‘हम होंगे कामयाब या गाण्यांनी फर्ग्युसन कॉलेज रोडवर जोशपूर्ण वातावरण तयार झाले होते.

      समारोप करताना पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी युक्रांदचे संदीप बर्वेकाँग्रसचे दत्ता बहिरट यांनी मनोगत व्यक्त केले.

      या पदयात्रेतगोपाळ कृष्ण गोखले यांची नात शर्मिष्ठा खेरेयुवराज शाहनिरज जैनसंगिता तिवारीरजनी त्रिभुवन, रफिक शेखजाबुंवत मनोहरॲड. अनिल कांकरीया, गोपाळ तिवारीरविंद्र म्हसकर, संदीप मोकाटेविनय ढेरेविजय खळदकरअजित जाधवअविनाश गोतारणेरमेश सोनकांबळेरविंद्र आरडेहेमंत राजभोज, जयकुमार ठोंबरे, विनोद रणपिसे, गुलाम खान, चैतन्य पुरदंरे, भगवान कडू, अशोक गेलोत, शिलार रतनगिरीसुनिल शिंदेआबा जगताप, सोमेश्वर बालगुडे, प्रसन्न मोरेराजेंद्र भूतडाविश्वास दिघेसुंदरा ओव्हाळ, शर्वरी गोतारणे, रजिया बल्लारी इ. तसेच लोकायत व युक्रांतचे कार्यकर्ते सहभागी होते.

एअर इंडियाने मुंबई व सॅन फ्रांसिस्को दरम्यान आपली पहिली नॉन-स्टॉप सेवा सुरु

0

ही विमानसेवा आठवड्यातून तीन वेळा उपलब्ध असणार आहे

भारत-यूएस दरम्यानच्या विमानसेवेची वारंवारता दर आठवड्याला ४० नॉन-स्टॉप विमानांपर्यंत वाढवली जाणार.

नवी दिल्ली१६ डिसेंबर२०२२: भारतातील आघाडीची एअरलाईन आणि स्टार अलायन्समधील एक सदस्य, एअर इंडियाने १५ डिसेंबर २०२२ पासून मुंबई आणि सॅन फ्रांसिस्कोदरम्यान पहिली नॉन-स्टॉप सेवा सुरु करून युनायटेड स्टेट्समध्ये आपले पंख अजून जास्त विस्तारले आहेत. २ डिसेंबर २०२२ रोजी एअर इंडियाने बंगलोर आणि सॅन फ्रांसिस्कोदरम्यान आठवड्यातून तीनदा विमानसेवा सुरु केली होती, त्यानंतर लगेचच ही मुंबईहून सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे.  जगाच्या नकाशावर जास्तीत जास्त सेवाविस्तार करण्याच्या आणि आपल्या ग्राहकांना उच्चतम दर्जाच्या सेवा व सुविधा पुरवण्याच्या एअर इंडियाच्या व्हिजनला अनुसरून ही नवी विमानसेवा सुरु करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत प्रवासाचे मुख्य केंद्र मुबई बनावे यासाठीचे प्रयत्न एअर इंडियाने सुरु ठेवले आहेत. मुंबई-सॅन फ्रांसिस्कोनंतर मुंबई-न्यूयॉर्क सिटी (जेएफके), मुंबई-फ्रँकफर्ट आणि मुंबई-पॅरिस हे रूट देखील सुरु केले जातील. मुंबईहून देशांतर्गत विमानसेवांची व्याप्ती व संख्या देखील वाढवली जाईल.

नव्याने भरती करून घेण्यात आलेल्या बोईंग ७७७-२००एलआर एअरक्राफ्टचा यामध्ये वापर केला जाईल आणि दर आठवड्याला मंगळवार, गुरुवार व शनिवार अशा तीन दिवशी मुंबई-सॅन फ्रांसिस्को विमानसेवा उपलब्ध असेल. सध्या एअर इंडियाच्या नॉन-स्टॉप विमानसेवा मुंबई ते नेवार्क, दिल्ली ते न्यूयॉर्क, नेवार्क, वॉशिंग्टन डीसी, सॅन फ्रांसिस्को आणि शिकागो, बंगलोर ते सॅन फ्रांसिस्को या मार्गांवर उपलब्ध आहेत. दिल्ली आणि बंगलोरनंतर मुंबई हे भारतातील तिसरे शहर आहे जिथून सॅन फ्रांसिस्कोसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे.

मुंबई ते सॅन फ्रांसिस्को या मार्गावरील पहिले विमान एआय १७९ मुंबईहून १४३० वाजता निघून त्याचदिवशी १७०० (स्थानिक वेळ) या सुविधाजनक वेळी सॅन फ्रांसिस्कोला पोहोचले. परतीचे विमान एआय१८० सॅन फ्रांसिस्कोहुन २१०० (स्थानिक वेळ) वाजता निघून मुंबईला ०३४० वाजता पोहोचेल + दोन दिवस.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. ज्योतिरादित्य एम सिंधिया आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे हे विमानसेवेच्या व्हर्च्युअल उदघाटन समारंभामध्ये उपस्थित होते. नागरी विमान वाहतूक विभागाचे सचिव श्री. राजीव बन्सल आणि एअर इंडियाचे फायनान्स चीफ श्री. विनोद हेजमाडी यांच्यासह त्यांनी या विमानाला हिरवा झेंडा दाखवला.

विमानसेवेचा शुभारंभ पवित्र दीपप्रज्वलनाने करण्यात आला, त्यानंतर केक कापण्यात आला, रिबन कापण्यात आली. एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी श्री कॅम्पबेल विल्सन यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बोर्डिंग गेटवर चेक इन करत असलेल्या पहिल्या प्रवाशाला बोर्डिंग पास सुपूर्द केला. यावेळी एअर इंडिया, मुंबई विमानतळ आणि इतर कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रवासी उपस्थित होते. रिबन कापण्याच्या प्रसंगी विमानातील दोन सर्वात ज्येष्ठ नागरिक देखील उपस्थित होते.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. ज्योतिरादित्य एम सिंधिया यावेळी म्हणाले, “आज महाराष्ट्रभारत आणि एअर इंडिया यांच्या वाटचालीतील एक ऐतिहासिक दिन आहे. भारतामध्ये नागरी विमान वाहतूक क्षेत्रात अनेक बदल घडून येत आहेत आणि भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी नागरी विमान वाहतूक बाजारपेठ आहे. गेल्या तीन वर्षात भारताने १०.६% सीएजीआरची वाढ नोंदवली आहे.  याआधी देखील एअर इंडियाने या क्षेत्रातील परिवर्तनामध्ये लक्षणीय भूमिका बजावली आहे आणि यापुढे देखील त्यांचे योगदान कायम राहील. एअर इंडियाचा वारसासंस्कृती आणि व्हिजन यांच्यासह ही एअरलाईन भारतीय नागरी विमान वाहतूक क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जाईल.”

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी सांगितले, “महाराष्ट्रातील जनतेसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण एअर इंडियाने महाराष्ट्र व सॅन फ्रांसिस्को दरम्यानचे अंतर मिटवून टाकले आहे. नागरी विमान वाहतूक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यावरमहाराष्ट्रात अजून अनेक ठिकाणी अजून जास्त विमानतळेहेलिपॅड्स उभारण्यावर सरकारचा भर आहे. मुंबईहून एअर इंडियाने सेवेचा शुभारंभ केला याचा मला अतिशय आनंद आहे.  इथून जगातील आणि देशातील इतर अनेक ठिकाणी विमानसेवा सुरु केल्या जाण्याची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत.”   

एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी श्री कॅम्पबेल विल्सन यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले, “विहान.एआय या आमच्या पंचवार्षिक परिवर्तन योजनेचा एक भाग म्हणूनभारतातील प्रमुख शहरे आणि जगभरातील प्रमुख डेस्टिनेशन्स यांच्यात कनेक्टिव्हिटी लक्षणीय प्रमाणात सुधारावी अशी आमची योजना आहे.  भारताची आर्थिक राजधानी आणि सिलिकॉन व्हॅली यांच्या दरम्यान नॉन-स्टॉप विमानसेवा हे ग्राहकांना सुधारित अनुभव प्रदान करण्याच्या दिशेने उचललेले पाऊल आहे.  हा मार्ग सुरु करण्यात आल्यामुळे आमच्याकडे दर आठवड्याला ४० नॉन-स्टॉप विमानसेवा उपलब्ध आहेतज्यामुळे यूएसएसोबत भारताच्या कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा होईल.

मुंबई ते सॅन फ्रांसिस्को दरम्यानच्या पहिल्या विमानातील प्रवाशांना एअर इंडियाच्या वतीने विशेष तयार करण्यात आलेल्या गुडी बॅग्स स्वागतपर भेट म्हणून देण्यात आल्या. 

अधिक माहितीसाठी प्रवाशांनी www.airindia.in याठिकाणी लॉग ऑन करावे किंवा आमच्या बुकिंग ऑफिसेसशी किंवा तुमच्या ट्रॅव्हल एजंट्सशी संपर्क साधावा.

राज्यात हिंदुजा समूह करणार ३५ हजार कोटींची गुंतवणूक

0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

उद्योजकांना सर्व सुविधा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध – मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई, दि. १५- महाराष्ट्रात उद्योगांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला जगभरातील विविध उद्योजकांसह उद्योग समूहांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आज, हिंदुजा समूहाने महाराष्ट्रात विविध ११ क्षेत्रांमध्ये सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा राज्य शासनाबरोबर सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करुन त्याचे आदानप्रदान करण्यात आले.

‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीस हिंदुजा ग्रुपचे जी. पी. हिंदुजा, अशोक हिंदुजा, प्रकाश हिंदुजा, माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी हिंदुजा समूहाचे स्वागत करुन महाराष्ट्रात गुंतवणुकीला प्राधान्य दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. अत्यंत कमी कालावधीत हा सामंजस्य करार होत असल्याचे सांगून महाराष्ट्रातील भूमिपुत्र म्हणून हिंदुजा समूहाने या गुंतवणुकीसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल समूहाचे कौतुक केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपूर्वी शासनाने ७० हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली असून त्यातून ५५ हजारांपेक्षा अधिक तरुणांना रोजगार मिळणार आहे. सरकारी विभागांमध्ये ७५ हजार नोकऱ्या आम्ही उपलब्ध करुन देत आहोत, मात्र खाजगी क्षेत्रातही आता या गुंतवणुकीमुळे नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, तरुणांच्या हाताला काम मिळेल, त्यांच्या जीवनात परिवर्तन येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

नुकतेच नागपूर-मुंबई दरम्यानच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले आहे, हा फक्त महामार्ग नाही तर तो एक ‘गेमचेंजर प्रोजेक्ट’ असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशात सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून उद्योगांच्या परवान्यांसाठी एक खिडकी योजना सुरु केली आहे. लवकरच यासंदर्भातील कायदा आणणार असून उद्योगांना इतर प्रोत्साहनात्मक सुविधा सरकार देत आहे. महाराष्ट्रात गुंतवणुकीला पोषक वातावरण असून कुशल मनुष्यबळ देखील उपलब्ध आहे, उद्योजकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

हिंदुजा समूहाची ३५ हजार कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी निर्माण करतानाच राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी हिंदुजा समूहाने राज्यात ३५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार आज केला आहे. नवीकरणीय ऊर्जा, माध्यमे आणि मनोरंजन, ग्रामीण आर्थिक विकास, सायबर सुरक्षा, व्यावसायिक ऑटोमोबाईल्स, बॅंकिंग- फायनान्स, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण, उत्पादन आणि नव तंत्रज्ञान या ११ क्षेत्रात हा उद्योग समूह गुंतवणूक करणार आहे.

मी महाराष्ट्राचा, राज्याच्या प्रगतीसाठी कटिबद्ध – जी. पी. हिंदुजा
अतिशय कमी वेळेत हा सामंजस्य करार आज होत असल्याबद्दल हिंदुजा समूहाचे जी. पी. हिंदुजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले. मी महाराष्ट्रातील असून १९१४ पासून इथे राहतो, राज्याच्या प्रगतीसाठी, समाजसेवेसाठी शिक्षण, आरोग्य, निर्मिती उद्योग, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रात काम करून, अमेरिका, इंग्लंड येथील उद्योजक मित्रांना देखील महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीसाठी आणणार असल्याचे सांगून अतिशय कमी वेळेत विविध निर्णय घेऊन सरकार गतीने काम करीत असल्याबद्दल श्री. हिंदुजा यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे कौतुक केले. आज झालेल्या सामंजस्य करारांची गतीने अंमलबजावणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

००००००

अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली महाराष्ट्राच्या आयटी क्षेत्राला जोडणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला चालना

मुंबई, दि. 15 : मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. थेट सेवेमुळे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मुंबई, पुणे शहराला जोडली जाणार असून त्याचा महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा लाभ होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

एअर इंडियाच्या मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेचा शुभारंभ केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया यांच्या हस्ते आज करण्यात आला. या सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. केंद्रीय नागरी विमान उड्डाण विभागाचे सचिव राजीव बन्सल, एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्बेल विल्सन आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, मुंबई येथून सुरू झालेली ही थेट सेवा आहे. हा प्रवास आतापर्यंतची सर्वांत लांब अंतराचा हवाई प्रवास आहे. आठवड्यातून तीन वेळा ही सेवा असून त्यानंतर ती दररोज सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

सॅनफ्रान्सिस्को हे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र असल्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी ही थेटसेवा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनानंतर आता आंतरराष्ट्रीय प्रवासात वाढ झाली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चोवीस तासात दिड लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबईसह महाराष्ट्रातील लाखो लोक अमेरिकेत स्थायिक असून या सगळ्यांचे हवाईसेवेच्या माध्यमातून जोडणाऱ्या एअर इंडियाशी वेगळं नातं निर्माण झालं आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे. महाराष्ट्राला देखील जी २० परिषदेच्या बैठकांचा मान मिळाल्याने ही राज्याच्या ब्रॅंडींगची संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नुकतेच आमच्या शासनाने राज्यात ७० हजार कोटींच्या गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मंजुरी दिली असून विमानतळ विस्ताराला प्राधान्य दिले आहे. राज्यात प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करणार असून त्यामाध्यमातून हवाईसेवा जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र आवडते ठिकाण असून थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एअर इंडियाने युरोप आणि अमेरिकेतील महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी योवळी केले.

केंद्रीय मंत्री श्री. सिंदिया यांनी मराठीतून भाषणाला सुरूवात करून, मुंबई आणि सॅनफ्रान्सिस्कोशी असलेल्या भावनिक नात्याची आठवण सांगितली. हवाईसेवेच्या क्षेत्रात भारतात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत असल्याचे सांगत जगात भारत हे नागरी हवाई उड्डाण क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाचा देश असून हवाईप्रवास सेवेला अधिक बळ देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मुंबई विमानतळावर श्री. विल्सन यांच्या हस्ते प्रवाशांना बोर्डींग पासचे वितरण करण्यात आले.

शिष्यवृत्ती परीक्षेकरिता आवेदनपत्र भरण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

पुणे, दि.१५: पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) या परीक्षेकरीता शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरीता २० डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.या परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची १५ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र अद्यापपर्यंत शाळांनी ऑनलाईन शाळेची माहिती व आवेदनपत्र भरलेले नसल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र व नियमित शुल्क ऑनलाईन भरण्याची मुदत २० डिसेंबर, विलंब शुल्क २१ ते २५ डिसेंबर, अतिविलंब शुल्क भरण्याची मुदत २६ ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत आहे. शाळांनी आपली माहिती व आवेदनपत्र विहीत मुदतीत भरण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी केले आहे.

तारांगणाचे निमित्त ज्ञान… विज्ञानाची झेप

वैज्ञानिक पैलू असण्याची गरज राष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यक असते. मुळात मनुष्य प्राणी स्वभावत: कौतूहल असणारा प्राणी आहे आणि याच कुतूहलातून तो निरानराळे प्रयोग करीत आला आणि याच प्रयोगातून निरनिराळे शोध लागले. प्रगत तंत्र विकसित होत आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पोहोचलो. माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये राहत असताना नवीन पिढीमध्ये संशोधन वृत्ती तयार व्हावी, यास्तव सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण’ हा त्यातीलच एक प्रयत्न आहे.


मी स्थानिक आमदार झाल्यानंतर तारांगणाची संकल्पना प्रथम मांडली व त्याचा पाठपुरावा सुरु झाला. हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी अनेक बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यातून ही वास्तू आज साकारली आहे. यात केवळ तारांगणाचा प्रकल्प ११ कोटी ५८ लाख रुपयांचा आहे. यातील स्थापत्य कामाची किंमत ५ कोटी ६८ लाख एवढी आहे तर प्रत्यक्षात तारांगणासाठी लागणारी अद्ययावत प्रक्षेपण यंत्रणा ३ डी प्रक्षेपण साहित्य आणि सुसज्ज असे वातानुकूलीत थिएटर यासाठी ५ कोटी ९० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. जगात सर्वोत्तम अशी तारांगण निर्मिती यामुळे शक्य झाली आहे. या ठिकाणी कार्यक्रम सादरीकरणासाठी खुल्या व्यासपीठाचीही उभारणी स्वतंत्रपणे करण्यात आली आहे.

येणाऱ्या विद्यार्थी व पर्यटकांना पहिला प्रक्षेपण कालावधी संपेपर्यंत फिरण्याची व्यवस्था आहे. दुसऱ्या टप्प्यात या तारांगणालगत ८० लाख ७६ हजार रुपये खर्च करुन येथे कलादालन (आर्टगॅलरी) उभारण्यात आले आहे. स्थानिकांची गुणवत्ता यामुळे जगासमोर येण्यास मदत होईल. सोबतच विज्ञान गॅलरी या ठिकाणी विकसित होत आहे. त्यावर १ कोटी ६२ लाख ८५ हजार रुपये खर्च होणार आहेत.

सर्वांना एकाच ठिकाणी कला व विज्ञान यांचा संगम या वास्तूत आगामी काळात बघायला मिळेल. या दृष्टीकोनातून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करीत असताना नियोजन करुन ते कार्य साकारण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि येत्या पिढ्यांना एक मोलाचा साठा तयार करुन दिला आहे. ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण’ या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभहस्ते होणार आहे, याचा मला मनस्वी आनंद होत आहे.

कुतूहलाला मर्यादा नाही त्यामुळे संशोधनाचे क्षेत्र देखील त्याच पद्धतीने अमर्याद असे आहे. मराठीन म्हणतात की जे न देखे रवी ते देखे कवी. कल्पनाशक्तीवर असंख्य बाबी अवलंबून असतात याच धर्तीवर आणखी पुढचा टप्पा म्हणजे अवकाश संशोधन अर्थात खगोल विज्ञान. कधी काळी सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे मानले जात होते. ही धारणा संशोधनातून रद्दबातल ठरली आणि हळू हळू विश्वाचा पसारा किती अवाढव्य आहे याचा खुलासा आपणास व्हायला लागला. अवकाश अमर्याद आहे आणि त्यात संशोधन देखील.
हॉलंडमध्ये १६०८ साली टेलीस्कोपचा शोध लागला. त्यात आवश्यक त्या सुधारणा करून १६११ साली गॅलिलियो ने त्याचा वापर अवकाशात डोकावण्यासाठी केला. त्यानंतर गेला ४०० वर्षांहून अधिकच्या प्रवासात’ विविध प्रकारे अवकाशाचा वेध आपण घेत आहोत.
नोबेल पदक मिळविणारे शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांचा या विश्वाचा धांडोळा घेण्यात मोलाचा वाटा आहे. ज्यांनी शोधलेला स्पेक्ट्रोग्राफीक किरणांच्या आधारे विश्वाच्या नवनव्या अंतरांचा वेध घेण्यात येतो. त्याचप्रमाणे रेडिओ लहरी, एक्स-रे अर्थात क्ष किरणे, इन्फ्रारेड तसेच अल्ट्रा व्हायोलेट किरणांची देखील यात मदत होते.

पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाऊन उपग्रहांच्या माध्यमांमधून वेध घेण्यासोबत अवकाशात उभारण्यात ‘हवल’ टेलिस्कोप अर्थात अंतराळ दुर्बीणीने विश्वाचे अंतरंग किती विस्तीर्ण आणि विराट आहे. याचे स्वरूप आपल्याला कळायला लागले. २५ डिसेंबर २०२१ रोजी अंतराळात पाठविण्यात आलेली अंतराळ दुर्बीण जेम्स वेब कार्यान्वित झाल्याने या संशोधनास आता अधिक गती प्राप्त झाली. हा या मालिकेतील सर्वात ताजा अध्याय म्हणता येईल.

आपल्या आयुष्यात देखील कुतूहलाचा हा भाग असतो आणि पुराणकाळापासून याचे दाखले देखील आपणास सापडतील. पृथ्वीच्या सर्वच ठिकाणी प्रत्येकाच्या मनान कुतूहल असले तरी समुद्र किनाऱ्यावरील जीवनात याला अधिक महत्वाचे स्थान आहे. सागरी जीवन पूर्णपणे त्यावर अवलंबून आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सागरास येणारी भरती आहोटी आणि आकाशातील त्या चंद्रकलांमुळे घडणारे बदल यात अमावस्या आणि पौर्णिमा या भोवती सागरी व सागर किनाऱ्यावरील जीवन अधिक अवलंबून असते.

अंतराळाचा वेध घ्यावा याची आवड अनेकांना आहे. याची तोंड ओळख रत्नागिरी सारख्या ठिकाणी झालेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाच्या माध्यमातून सर्वांना होणार आहे. अतिशय अद्ययावत आणि त्रिमीती (3D) तारांगण असणाऱ्या या वास्तूच्या रुपाने नव्या पिढीतील कुतुहलाची उत्तरे मिळू शकतील आणि यातून या भूमीतून या क्षेत्रात संशोधन करण्यास अनेकजण पुढे येतील.
विज्ञान हे प्रगतीचे साधन आहे आणि संशोधन हा प्रगतीचा मार्ग आहे. भारतात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने यात अतुलनीय कामगिरी केली आहे. ज्या आधारे आपण चांद्रयान व मंगळयान सारख्या मोहिमा आखल्या. मंगळावर आपला उपग्रह पोहोचला. याला नव्या पिढीपर्यंत नेण्यासाठी नव्या शैक्षणिक धोरणात प्राधान्य देण्यात आले आहे.

रत्नागिरी येथे इन्फोव्हीजन टेक्नॉलॉजीज प्रा.लि. ने या सुसज्ज तारांगणाच्या उभारणीत महत्वाचा वाटा उचलला आहे. भारतात आजवर ५० हून अधिक तारांगणे उभारण्यात आली आहेत. देशातील पहिले डिजिटल तारांगण मुंबईत नेहरु तारांगण ठरले. तर देशातील पहिले डिजिटल ३D स्वामी विवेकानंद तारांगण आहे हे मंगलोर येथे आहे. रत्नागिरीत आकारास आलेले ३-D तारांगण देशातील या स्वरुपाचे पाचवे तारांगण आहे.

आपण चांद्रयान पाठविणाऱ्या प्रगतशील देशातील नागरिक असून संशोधक वृत्ती जोपासण्यासाठी अशा तारांगणाची गरज आहे. ही गरज या तारांगणाच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे. पुढच्या पिढीसाठी अशा स्वरुपाच्या वास्तू प्रेरणादायी राहणार असून हा रत्नागिरीच्या पर्यटन आणि शिक्षण मार्गावरील मैलाचा दगड ठरणार आहे.

– उदय सामंत,
उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य