Home Blog Page 1494

मुंबई भाजपाकडून ‘माफी मागो’ आंदोलन

मुंबई:

उद्धव ठाकरे माफी मागा, अजित पवार माफी मागा, नाना पटोले माफी मागा, पाकिस्तान हाय हाय अश्या घोषणा देत भाजपा कार्यकर्त्यांनी आज मुंबईत ठिकठिकाणी रोष प्रकट केला. विशेष म्हणजे या आंदोलनात वारकरी दिंड्या ही सहभागी झाल्या होत्या.

हिंदू-देवदेवतां व महापुरूषांविरोधात वारंवार अपमानास्पद वक्तव्य करणारे महाविकास आघाडीतील नेते, विशेषत: शिवसेना उप नेत्या सुषमा अंधारे तसेच परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करणारे शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) नेते संजय राऊत यांच्या विरोधात भाजपाने निदर्शने केली.
तसेच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध ही
यावेळी करण्यात आला. मुंबईतील सहा विभागातील खासदार, आमदार, पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मुंबईत कांदिवली रेल्वेस्थानक, अंधेरी पूर्व रेल्वेस्थानक, घाटकोपर पूर्व, दादर पूर्व रेल्वेस्थानक, भाजप प्रदेश कार्यालयाजवळ, स्वा. सावरकर पुतळा, विलेपार्ले या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत निदर्शनं केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर प्रचंड जनप्रक्षोभ निर्माण झाला आहे. या विरोधात हे ‘माफी मागो’ आंदोलन करण्यात आले. टाळ मृदंगाचा गजर करीत वारकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तसेच एकनाथ महाराज यांचा अपमान करणाऱ्या अंधारे यांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.

मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, विधान परिषद गट नेते प्रवीण दरेकर, मुंबई प्रभारी अतुल भातकलकर, आमदार अमित साटम, आमदार प्रसाद लाड, कालिदास कोळंबकर, मनिषा चौधरी, योगेश सागर, सुनील राणे, यांच्यासह महामंत्री संजय उपाध्याय, माजी आमदार मधू चव्हाण, माजी नगरसेवक, जिल्हा अध्यक्ष, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अमित शहांसमोरच ममतांचा BSF शी वाद : म्हणाल्या- BSF ला मिळालेल्या वाढीव अधिकारांमुळे नागरिकांना नाहक त्रास

0

कोलकाता –

कोलकात्यात शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व बीएसएफच्या अधिकाऱ्यांत वाद झाला. यासंबंधीच्या वृत्तानुसार, यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही उपस्थित होते. ही घटना हावडा येथे आयोजित ईस्टर्न झोनल परिषदेच्या बैठकीत घडली. ममता बीएसएफला सीमेच्या आत 50 किमीपर्यंत कारवाई करण्याचे अधिकार दिल्यामुळे नाराज आहेत. ममतांच्या मते, यामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

केंद्राने एका नव्या कायद्यांतर्गत बीएसएफला आंतरराष्ट्रीय सीमेपासून 50 किमी आतपर्यंत कारवाई करण्याचे अधिकार प्रदान केलेत. यासाठी दंडाधिकाऱ्यांच्या आदेश किंवा वॉरंटची गरज नाही. यापूर्वी बीएसएफला केवळ 15 किमी आतपर्यंत कारवाई करण्याचा अधिकार होता. ममता या दुरुस्तीवर नाराज आहेत. त्यांच्या मते, सीमा सुरक्षा दलाकडील वाढीव अधिकारामुळे जनता व अधिकाऱ्यांत योग्य समन्वय साधता येत नाही.ममतांनी गत मे महिन्यात बीएसएफवर गंभीर आरोप केले होते. बीएसएफचे जवान गावात घुसून सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करून बांगलादेशमध्ये पाठवत आहेत. केंद्राच्या अखत्यारित येणारे सीमा सुरक्षा दल आंतरराष्ट्रीय सीमेपलिकडे गायींची तस्करी करते. तसेच नागरिकांची हत्या करून त्यांचे मृतदेह बांगलादेशात फेकते. पण त्याचा आरोप बंगाल पोलिसांवर टाकला जातो. त्यामुळे मी राज्य पोलिसांना बीएसएफला रोखण्याचे निर्देश दिलेत. डिसेंबरमध्ये पश्चिम बंगाल विधानसभेने बीएसएफचे अधिकार क्षेत्र वाढवण्याच्या विरोधात एक प्रस्ताव पारित केला होता.गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात केंद्राने बीएसएफ कायद्यात एक महत्वपूर्ण बदल करत दलाच्या पाक व बांगलादेशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील अधिकार क्षेत्रात वाढ केली होती. यामुळे बीएसएफ अधिकाऱ्यांना पश्चिम बंगाल, पंजाब व आसाममध्ये देशाच्या सीमेपासून 50 किमी आतपर्यंत झडती, अटक व जप्ती करण्याची परवानगी मिळाली होती.या फैसल्यामुळे पंजाबमध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. पंजाबमध्ये यापूर्वी कोणत्याही कारवाईत बीएसएफ स्थानिक पोलिसांच्या मदतीने काम करत होती. पण नव्या दुरुस्तीनंतर बीएसएफचा थेट हस्तक्षेप वाढला. त्याला काँग्रेस व अकाली दलाने जोरदार विरोध केला. पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी हा राज्याच्या अधिकारांवरील हल्ला असल्याचा आरोप केला. बंगालनेही त्यावेळी केंद्राच्या या निर्णयाला विरोध केला होता.

BSF कायदा 1968 च्या कलम 139 (1) मधील सुधारणांचा देशाच्या 12 राज्यांवर थेट परिणाम पडला. त्यात गुजरात, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड व मेघालय, केंद्रशासित जम्मू काश्मीर व लडाखचा समावेश आहे.नव्या कायद्यामुळे आसाम, बंगाल, पंजाबमधील सीमा सुरक्षा दलाचे अधिकार क्षेत्र वाढले. त्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असल्याचा आरोप या राज्यांतील सरकारांकडून केला जातो.

महाविकास आघाडीचा आजचा मोर्चा असफल-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाविकास आघाडीचा आजचा मोर्चा असफल झाला आहे. तीन पक्ष एकत्र येऊनदेखील आजची संख्या पाहता हा मोर्चा ड्रोनशॉट लायकदेखील नव्हता, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महाविकास आघाडीच्या मोर्चानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना मोर्चावर जोरदार टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा महाविकास आघाडीचा मोर्चा हा असफल मोर्चा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक आलेच नाही. विशेष म्हणजे तीन पक्ष मिळून हा विराट मोर्चा असल्याचे सांगितले जाते. परंतू तसे मुळात अजिबात नाही. हा मोर्चा अतिशय मिनी होता.

आजच्या मोर्चातरी उद्धव ठाकरे नवीन काहीतरी बोलतील अशी आशा होती. पण तसे अजिबात झालेच नाही. नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे हे ठरलेले वाक्य बोलले आहेत. उद्धव ठाकरे हे किती दिवस तेच तेच डायलॉग बोलणार आहेत. शिवराळ भाषा वापरायची म्हणजे झाले बोलणे, अशी गत ठाकरेंची झालेली आहे. त्यांनी नवीन गोष्टी पाहाव्या, नवीन स्क्रिफ्ट ठेवावा, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांना आम्ही आझाद मैदानावर मोर्चा घ्यावा, असे आवाहन केले होते. एव्हाना आम्ही त्यासाठी परवानगी देऊ इच्छित होतो. परंतु त्यांना माहित होते की, एवढी लोकांची संख्या आपल्याकडून आणणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांनी गल्लीबोळातून हा मोर्चा काढण्याची परवानगी घेतली. एक प्रकारे हा मोर्चा असफल झाला आहे, ड्रोनशूंिटगलायक देखील हा मोर्चा नव्हता, अशी खोचक टीका फडणवीसांनी केली आहे.

जे संतांना शिव्या देतात, ज्यांना बाबासाहेबांचा जन्म कुठं झाला माहित नाही, ते मोर्चा काढतात; अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा मोर्चा हा राजकीय मोर्चा आहे. जे संतांना शिव्या देतात, ज्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला हे माहित नाही, ते आज मोर्चा काढतात. रोज सावरकरांचा अपमान काँग्रेसने केला, तेव्हा शिवसेना कुठे होती. राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतोय, अशी टीका फडणवीसांनी केली.

संजय राऊतांना आपली खुर्ची देत स्वतः उभे राहिले आदित्य ठाकरे …

मुंबई – महापुरुषांच्या अवमानाविरोधात महाविकास आघाडीने काढलेल्या महामोर्चात उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोलेंसह अनेक प्रमुख नेते सहभागी झाले होते.या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले आहे. या सभास्थळावर नेते स्थानापन्न होत असताना आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना मान देत केलेल्या एका कृतीची चर्चा होत असून, त्याचं कौतुक होत आहे.

मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर सभास्थानी नेते स्थानापन्न होत होते. आदित्य ठाकरेही खुर्चीवर बसले होते. मात्र तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांना मंचावर बसण्यासाठी खुर्ची नव्हती. तेव्हा आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना आग्रह करून आपल्या जागेवर बसवले आणि स्वत: उभे राहिले. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थितांचं लक्ष वेधलं गेलं. तसेच आदित्य ठाकरेंच्या या कृतीचं कौतुक होत आहे.

‘महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा भाजपाचा डाव कदापि यशस्वी होऊ देणार नाही’,नाना पटोलेंचा इशारा

मुंबई – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सीमावादाचा प्रश्नाने डोके वर काढले असून सीमेवरची गावं शेजारच्या राज्यात जाण्याची मागणी करत आहेत.

महापुरुषांचा अपमान, सीमावाद या प्रश्नावर महाराष्ट्रद्र्योह्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा हा मोर्चा आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला तेव्हापासून महाराष्ट्र एकसंध रहावा यासाठी प्रयत्न करण्यात आले, पण ईडी सरकार मात्र महाराष्ट्राचे तुकडे करू पहात असून आम्ही ते कदापी होऊ देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

महाविकास आघाडीने रिचर्डसन अँड कृडास कंपनी, नागपाडापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत हल्लाबोल मोर्चा काढला. या मोर्चात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप यांच्यासह मविआचे सर्व घटक पक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनीही मोर्चाला संबोधित केले.

नाना पटोले पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करण्याचे काम राज भवनातून भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून सुरु झाले आणि नंतर भाजपाच्या नेत्यांनी सातत्याने तेच काम सुरु ठेवले. भाजपा नेते सातत्याने महापुरुषांचा अपमान करत आहेत यावर जनतेत प्रचंड चीड आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले यांनी शिक्षण संस्थांसाठी भीक मागितली असे उद्गार काढून महापुरुषांच्या अपमानाचा कळसच गाठला.

बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कायदा आणा- अजित पवार

मुंबई-राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह भाजपा नेत्यांनी शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांविरोधात आज महाविकास आघाडीकडून महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे करण्यात आला. यावेळी आयोजित सभेत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवरून शिंदे-भाजपा सरकारला लक्ष केलं. तसेच बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी कडक कायदा आणावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.“मागील काही दिवसांपासून ज्या पद्धतीने शिवरायांबाबत आणि इतर महापुरुषांबाबत विधानं करण्यात आली आहेत, ती बघून राज्यपालांना त्यांच्या पदावरून हटवले पाहिजे. जे आमदार, मंत्री अशी विधानं करत आहेत, त्यांनाही पदावरून हटवले पाहिजे. सोमवारपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेश सुरू होणार आहे. या अधिवेशनात राज्य सरकारने अशी बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करावा. विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्याचे समर्थन करू”,  असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना त्यांनी सीमावादाच्या मुद्द्यावरूनही शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं. “बेळगावसह सीमाभागातील ८६५ मराठी गावं महाराष्ट्रात आणण्याचा संघर्ष सुरू असताना अचानक ही गावं कर्नाटकात जाण्याचा मुद्दा कसा उपस्थित झाला? यासाठी टुलकीट कोणी दिली? याचाही राज्यातील नागरिकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. अडीच वर्ष आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करत होतो. त्यापूर्वी विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण यांच्या बरोबर काम केलं. मात्र, तेव्हा कोणीही अशी मागणी केली नव्हती”, असेही ते म्हणाले.

“शिंदे-फडणवीस सत्तेत आल्यानंतर सीमेवरील गावं शेजारच्या राज्यात जातो म्हणायला लागली आहेत. अशा स्थितीत महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ कर्नाटक बॅंकेत खाती उघडण्याचा निर्णय कसा घेऊ शकतात? कर्नाटक सातत्याने आपल्यावर अन्याय करत आहेत. तरीही असा निर्णय घेतला जातो आहे. त्यामुळे तुमचं पुतना मावशीचं प्रेम सर्वांना कळलं आहे, अशी टीका अजित पवारांनी केली. एकंदरीत परिस्थिती बघता, या सरकारला त्यांची जागा दाखवण्याचे काम आपण सर्वांनी केलं पाहिजे”, असेही ते म्हणाले.

मुंबईशी खेळाल, तर आगडोंब उसळेल; महाविकास आघाडीच्या महामोर्चात उद्धव ठाकरेंचा घणाघात

हे लफंगे महाराष्ट्र लुटायला आले आहेत! हल्लाबोल मोर्चात उद्धव ठाकरे कडाडले

मुंबई-

बऱ्याच वर्षांनंतर एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला असेल. जेव्हा ह्या मोर्चाची घोषणा केली, तेव्हा मला काही जणांनी विचारलं तुम्ही चालणार का? मी एकटा नाही, तर माझ्याबरोबर लाखो महाराष्ट्रप्रेमी महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहेत. ज्यांनी ज्यांनी आपल्याला डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे, असा एल्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे.

महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या ‘महामोर्चा’त उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, “संयुक्त महाराष्ट्रानंतर असे दृष्य देशाने नव्हे तर जगाने पाहिलं असेल. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी प्रचंड संघर्ष करावा लागला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला, पण अजूनही बेळगाव कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला नाही. तो घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

उद्धव ठाकरे म्हणाले की, कर्नाटक असो वा आणखी कोणी असोत, हे सगळे एकत्र महाराष्ट्रावर तुटून पडत आहेत. या महाराष्ट्र द्रोह्यांचा राजकीय शेवट करणार. आजचा मोर्चा त्याची सुरुवात आहे. ज्यांनी-ज्यांनी डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळय. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर जगानं हे दृश्य पहिल्यांदाच पाहिले. संयुक्त महाराष्ट्रासाठी असाच संघर्ष करावा लागला. बेळगाव, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

शिंदेंवर तोतये म्हणून टीका…

ठाकरे पुढे म्हणाले की, महामोर्चासाठी सर्व पक्ष एकटवलेत. फक्त महाराष्ट्र द्रोही आणि बाळासाहेबांचे विचार सोबत घेऊन जाणारे तोतये या महामोर्चा नाहीत. राज्यपाल कोण असावा, केवळ केंद्रात बसतो म्हणून त्यांची सोय म्हणून पाठवून द्यायचे हे चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, फुले यांच्याबद्दल अवमानकारक बोलतात. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले नसते तर आज आपण कुठे असतो, त्याचे उदाहरण मंत्र्यांनी भीक शब्द उच्चारून दाखवून दिलाय. सावित्रीबाईंनी शेणमार सहन केला. ते डगमगले नाहीत. महिला शिकल्याच पाहिजेत. त्या शिकल्या नसत्या, आपण शाळेत गेलो नसतो, तर भीक मागत बसलो असतो, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.

बौद्धिक दारिद्र्याचे मंत्री

ठाकरे पुढे म्हणाले की, मिंदे सरकारमध्ये मुळात बौद्धिक दारिद्रय असलेले मंत्री सुप्रियाताई सुळेंबद्दल काय बोललो आपण पाहिलेच. हे आंदोलन त्यांच्याविरोधात आहे. या लफ्यग्यांना महाराष्ट्राबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. एक – दोन मंत्री झाले. तिसरे मुंबईचे पालकमंत्री. त्यांनी महाराजांची आग्रह्याहून सुटका झाली त्यांची तुलना चक्क खोकेवाल्यांसोबत केली. मात्र, आग्राहून सुटल्यानंतर शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. मात्र, स्वतःच्या आईच्या कुशीत वार करून सरकार स्थापन केले.

प्रकल्प पळवणे सुरू

महामोर्चातल्या गर्दीने महाराष्ट्र द्वेष्ट्याचे डोळे उघडले पाहिजेत. मुंबईचा, महाराष्ट्राचा लचका कसा तोडतायत ते पाहतोच. उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही सत्तेत असताना अनेक प्रकल्प सुरू केले, पण ते दुसऱ्या राज्यात पळवले जात आहेत. सध्याचे मुंबईचे पालकमंत्री स्केअर फूटमध्ये बोलतात. मात्र, मुंबईत विकणारी जागा नाही. ती आमची माय आहे. तिच्याशी खेळायचा प्रयत्न केला, तर आगडोंब उसळेल. यांना महाराष्ट्राची अस्मिता संपवून टाकायची आहे. मात्र, महाराष्ट्र द्रोह्यांना या मातीत गाढल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

कोश्यारींची तातडीने हकालपट्टी करा, अन्यथा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही-शरद पवार

0

मुंबई- केंद्र सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची लवकरात लवकर हकालपट्टी केली नाही, तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.आज महाविकास आघाडीने मुंबईत ‘महामोर्चा’चं आयोजन केलं होतं. या मोर्चादरम्यान केलेल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर हल्लाबोल केला आहे.

यावेळी , पवार म्हणाले,’आजचा हा मोर्चा एका वेगळ्या स्थितीचे दर्शन करतो. मला आठवते ७० वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्रात प्रश्नासंबंधी मुंबईमध्ये लाखोंचे मोर्चे निघाले. मराठी भाषिकांचे राज्य व्हावे यासाठी हा उपक्रम यशस्वी झाला. अनेक तरूण पुढे आलेत. अखेर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. मात्र तरीही जे मराठी भाषिक महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. ते महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी सातत्याने आग्रह करत आहेत. मग तो बेळगाव असेल, निपाणीचा असेल किंवा अन्य भागातील असेल त्या सर्वांचा महाराष्ट्रामध्ये समावेश व्हावा यासाठी जी त्यांची भावना आहे या भावनेसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील मराठी माणूस अंतःकरणापासून सहभागी आहे.आज आपण लाखोंच्या संख्येने इथे का जमलोय तर महाराष्ट्राच्या सन्मानासाठी एकत्रित आलोय. आज ज्यांच्या हाती राज्याची सूत्र आहेत त्या सत्तेत बसलेले लोक महाराष्ट्राच्या महापुरुषांबद्दल वेगळ्या प्रकारची भाषा वापरतात. देशात अनेक राजे रजवाडे होऊन गेले अनेकांची संस्थाने झाली पण साडेतीनशे वर्ष झाली तरी सामान्य माणसाच्या अंत:करणात एक नाव अखंड आहे ते म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवछत्रपती महाराज. त्या शिवछत्रपतींबद्दल राज्याचा एखादा मंत्री, अन्य कोणी सत्ताधारी पक्षाचे घटक काही चुकीचे वक्तव्य करतात ते महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. या संबंधीची तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी आज आपण लाखोंच्या संख्येने इथे जमलो. आज जो ईशारा या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला त्यातून राज्यकर्त्यांनी बोध घेतला नाही तर लोकशाहीच्या मार्गाने त्यांना काय धडा शिकवायचा त्यासाठी महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. महाराष्ट्राची काही वैशिष्ट्य आहेत, काही सन्मानचिन्ह आहेत. महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील ही आमची सगळी सन्मानाची, आदराची स्थान आहेत. आजचे राज्यकर्ते यासंबंधी बोलतात. राज्याच्या इतिहासात असा राज्यपाल कधी पाहिला नाही. मी स्वत: विधानसभेत जाऊन ५५ वर्षे झाली याकाळात अनेक राज्यपाल पाहिले त्यांनी महाराष्ट्राचे नावलौकीक वाढविण्याचे काम केले. पण यावेळी जी व्यक्ती या ठिकाणी आली तिने महाराष्ट्राच्या एकंदर विचारधारेला संकटात नेण्याचे काम करते. महात्मा फुले, सावित्रीमाई यांच्याविषयी बाष्कळ उद्गार काढतात. त्यांना शरम वाटली पाहिजे. महात्मा जोतिबा फुले यांनी देशात सामान्य माणसाला संघटित करण्यासाठी, आधुनिक विचार देण्यासाठी, शेतीच्या क्षेत्रात परिवर्तन आणण्यासाठी, स्त्री शिक्षण असो किंवा ज्ञानदानाचे कामात पुढाकार घेणारे महात्मा जोतिबा फुले यांचे नाव सबंध देशात आदराने घेतले जाते. अशा व्यक्तीच्यासंबंधी राज्यपाल काही वक्तव्य करत असतील तर त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही.त्यामुळे या मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारला लोकशाहीच्या मार्गाने संदेश द्यायचा आहे की राज्यपालांची हकालपट्टी लवकरात लवकर करा. आज लोक शांतप्रिय आहेत, जर यांची हकालपट्टी वेळेत केली नाही तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही त्याचे प्रत्यय या ठिकाणी आला आहे. मला गंमत वाटते की या राज्यकर्त्यांमध्ये एक स्पर्धा सुरु झाली आहे. ही स्पर्धा कर्तृत्वाची किंवा राज्याच्या विकासाची नाही तर महाराष्ट्राच्या बदनामीची आहे. कोणी मंत्री शिक्षण संस्था काढण्यासाठी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागितली असे वक्तव्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यात शिक्षणाची दालन नव्हती त्यावेळी औरंगाबाद येथे मराठवाड्याला शिक्षणाचे दालन उभ करण्याचे फार मोठं काम त्यांनी केले. महात्मा फुले यांनी पुण्याच्या भिडे वाड्यात शाळा सुरु केली. सावित्री माईंना पुढे करून शिक्षणाची दालन खुली केली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी सबंध आयुष्य ज्ञानदानासाठी घालवले. कर्मवीरांनी त्यांच्या घरी अन्न नव्हते ते उभे करण्यासाठी खबरदारी घेतली पण कधीही लाचारी स्वीकारली नाही. गरीब मुलामुलींसाठी वसतिगृह काढली व हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. आज अशा व्यक्तींसंबंधीचा उल्लेख करताना कोणी गलिच्छ शब्द वापरत असतील तर अशा लोकांना धडा शिकवण्याचे काम आपल्याला करावे लागेल. मला आनंद आहे की आपली विचारधारा वेगळी असली तरी महाराष्ट्राच्या भल्यासाठी, सन्मानासाठी, स्वाभिमानासाठी एवढ्या हजारोंच्या संख्येने लोक संयमाने आणि शिस्तीने आलात. माझी अपेक्षा आहे या चुकीच्या प्रवृत्तीला यातून काही धडा मिळेल. जर त्यांनी यातून काही धडा घेतला नाही तर पुढचा कार्यक्रम आपण एकत्र बसून करू आणि त्यांना उलथून कसे टाकायचे याचा विचार करू.

भारताच्या सामर्थ्यामुळे हताश पाकिस्तानचे मोदींंविषयी वक्तव्य- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

बिलावल भुट्टो यांच्या निषेधार्थ भाजपाचे राज्यात १२०० ठिकाणी आंदोलन

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सामर्थ्यशाली झाला आहे. पाकिस्तान भारतात दहशतवादी कारवाया करू शकत नाही तसेच भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्याची भारताची ताकद आहे. यामुळे हताश पाकिस्तानकडून मोदींंविषयी अपमानास्पद वक्तव्य करण्यात आले, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पुणे येथे केली.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करताना ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आ. माधुरी मिसाळ व आ. सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मोदीजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे संपूर्ण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. याचा निषेध करण्यासाठी राज्यात भाजपा कार्यकर्ते १२०० ठिकाणी आंदोलन करत आहेत. सर्व शहरे, जिल्हे व तालुक्यांच्या ठिकाणी आंदोलने होत आहेत. बिलावल भुट्टो यांचा पुतळा जाळून कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत.

त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण जगामध्ये भारताला महत्त्वाचे स्थान मिळवून देत आहेत. भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्याची ताकद भारताकडे मा. मोदीजींच्या नेतृत्वात आहे. तो देश भारताच्या विरोधात बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी कारवाया अशी कृती करू शकत नाही. दहशतवाद्यांना पोसणारा पाकिस्तान हतबल झाला आहे. पाकिस्तान कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे अशी वक्तव्ये केली जात आहेत.

त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची बुलेट ट्रेन सुरू झाली असून हे असेच काम चालू राहिले तर आपले राजकीय अस्तित्व संकटात येईल, अशी भीती महाविकास आघाडीला वाटते व तेच त्यांच्या मोर्चामागचे खरे कारण आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्राची पिछेहाट झाली. आता राज्य गतीने पुढे जात आहे, यामुळे हा मोर्चा काढण्यात आला आहे.

ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महापुरुषांचा अपमान केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला त्यावेळी आदित्य ठाकरे त्यांना मिठी मारत होते. महाविकास आघाडीच्या एका आमदाराने छत्रपती शिवाजी महाराजांसारखी वेषभूषा करून तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसमोर नतमस्तक झाला होता. ही महाविकास आघाडीची संस्कृती आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील.

झेंडा जाळून भाजपच्या वतीने पाकिस्तानचा निषेध

पंतप्रधान मोदींचे जगात प्रस्थापित झालेले नेतृत्व पाकिस्तानला सहन होत नाही

जगदीश मुळीक म्हणाले,’पाकिस्तानला भारताकडून पराभव स्वीकारावा लागला, तरी त्यांचा मूळ स्वभाव बदलत नाही. मोदींमुळे जगात शांतता प्रस्थापित होत आहे. पाकिस्तानातील जनतेचे लक्ष तेथील परिस्थितीवरून विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता बदलेला भारत आहे. महाविकास आघाडीचे नेते आज बोलत नाहीत. पंतप्रधान एका पक्षाचे नाहीत, ते देशाचे नेते आहेत. महाविकास आघाडीच्या स्वाभिमानाचे काय झाले.

पुण्यातील सर्व सोसायट्यांच्या नावे जागा करण्यासाठी अभिहस्तांतरणाची कार्यवाही करून देणार – सुधीर कुरुमकर

पुणे- पुणे महापालिका हद्द आणि आसपासच्या देखील सर्व सोसायट्यांच्या नावे जागा होण्यासाठी बिल्डरकडून अभिहस्तांतरणाची कार्यवाही त्वरेने करून देणार असल्याची माहितीएकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे उप शहर प्रमुख सुधीर शंकरराव कुरुमकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

ते म्हणाले, अनेक सोसायट्यांचे डीम्ड कान्वेंस म्हणजेच अभिहस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने सोसायटीची जागा बिल्डरच्याच नावे राहते आणि अशा सोसायट्यांना पुनर्विकास किंवा अन्य अनेक कामासाठी अडचणी चा सामना करावा लागतो , आमच्या पक्षातर्फे अशा सोसायट्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात येणार असून सर्वांचीच अभिहस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी कार्यवाही सुरु करण्यात येते आहे. सर्व सोसायट्यांना कायदेशीर तसेच तांत्रिक मदत मोफत केली जाणार आहे , इच्छुकांनी जनसंपर्क कार्यालय : नियोजित शिवसेना भवन, कुरुमकर बिल्डींग, ९८६ शुक्रवार पेठ,सर्स्बागेसमोर,पुणे २ (मोबाईल-9112048111) येथे संपर्क साधावा असे आवाहन देखील उप शहर प्रमुख सुधीर कुरुमकर यांनी केले आहे.

विद्यार्थी साहाय्यक समितीतील ६६१ विद्यार्थ्यांचीरोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडतर्फे आरोग्य तपासणी

पुणे : विद्यार्थी साहाय्यक समितीच्या आपटे वसतिगृह (मुलींचे), सुमित्रा सदन वसतिगृह (मुलींचे) व लजपतराय विद्यार्थी भवन (मुलांचे) येथील ६६१ विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडच्या पुढाकाराने खास समितीच्या विद्यार्थ्यांसाठी दंत तपासणी, नेत्र तपासणी, हिमोग्लोबिन आणि तंदुरुस्ती तपासणी शिबीर आणि जागृतीपर व्याख्यानाचे आयोजन केले होते.
डॉ. नितीन कोलते, डॉ. मंजुश्री कुलकर्णी, डॉ. आकांक्षा बत्रा, डॉ. अनिकेत कासोदेकर, डॉ. सायली केले-वाणी, डॉ. भक्ती कासोदेकर, डॉ. हेमंत जाधव, डॉ. सागरिका बसवराज या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सलग तीन शनिवार हे शिबीर घेण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनावेळी विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, विश्वस्त सुप्रिया केळवकर, राजेंद्र ततार, रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडचे अध्यक्ष उज्ज्वल केले, कम्युनिटी डायरेक्टर अतुल परचुरे, सचिव राधा गोखले, स्नेहा सुभेदार आदी उपस्थित होते.
उज्वल केले म्हणाले, “बहुतांश विद्यार्थी-विद्यार्थिनी ग्रामीण भागातून आलेले असल्याने त्यांना या शिबिराचा लाभ झाला. योग्य ठिकाणी हा उपक्रम राबविल्याने समाधान आहे. सर्व रोटरी सदस्य आणि डॉक्टरांनी अतिशय मन लावून काम केले. समितीच्या विद्यार्थ्यांना आरोग्यदायी जेवण मिळत असल्याने तसेच नियमित तपासणी होत असल्याने त्यांचे आरोग्य चांगले असल्याचे आढळले. आरोग्यासाठी पोषक वातावरण समितीमध्ये दिले जात असल्याबाबत डॉक्टरांनीही समाधान व्यक्त केले.”

तुकाराम गायकवाड म्हणाले, “समितीमध्ये नेहमीच आरोग्यावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांना योगासने, व्यायाम अनिवार्य असल्याने तसेच पोषक आहार दिला जात असल्याने आरोग्याच्या फारशा समस्या आढळत नाहीत. रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडच्या या पुढाकाराने विद्यार्थ्यांना आपल्या आरोग्याची स्थिती तपासून घेता आली. सर्व पदाधिकाऱ्यांचे व डॉक्टरांचे आभार मानतो.”

केजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास खोत यांना ‘आऊटस्टँडिंग लीडर इन हायर एज्युकेशन’ पुरस्कार


पुणे : केजे अभियांत्रिकी व व्यवस्थापन संशोधन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास खोत यांना ‘आऊटस्टँडिंग लीडर इन हायर एज्युकेशन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हॉटेल नोवोटेल येथे नुकत्याच झालेल्या इलेट्स एज्युकेशन इनोव्हेशन समिटमध्ये इलेट्स टेक्नोमिडीयाचे वरिष्ठ व्यवस्थापक अभिषेक सिंग तोमर व सीए मयूर झंवर यांच्या हस्ते या पुरस्काराने डॉ. खोत यांना सन्मानित करण्यात आले. 
गेल्या २७ वर्षात उच्च शिक्षणामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. खोत यांना हा पुरस्कार देण्यात आला. केजे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव यांनी या सन्मानाबद्दल डॉ. खोत यांचे अभिनंदन केले. याआधी डॉ. खोत यांना नवी दिल्ली येथील इंटलेक्च्युअल पीपल फाउंडेशनच्या वतीने ‘बेस्ट प्रिन्सिपल परफॉर्मन्स अवार्ड’ने सन्मानित केले आहे.
सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे पदवीधर असलेल्या डॉ. खोत यांनी औरंगाबाद येथून एमटेक केले. त्यात त्यांनी सुवर्णपदक मिळवले. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पीएचडी पूर्ण केली असून, ‘फंडामेंटल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस अँड इट्स कॅरॅक्टरिस्टिक्स विथ ऑप्टिमायझेशन’ असा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.
वयाच्या ३९ व्या वर्षांपासून प्राचार्य म्हणून ते काम पाहत आहेत. गेल्या ७ वर्षांपासून केजे महाविद्यालयाचा कार्यभार सांभाळत आहेत. आजवर खोत यांचे २५ हुन अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

स्वाधार योजनेच्या लाभर्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप

पुणे, दि. १७: समाजकल्याण विभागाच्या स्वाधार योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या अर्जदारांना समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवन येथे योजनेच्या मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास समाजकल्याण सहआयुक्त भारत केंद्रे, उपायुक्त विजयकुमार गायकवाड, , बाळासाहेब सोळंकी, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहायक आयुक्त संगिता डावखर, विशेष अधिकारी एम. आर. हरसुरे आदी उपस्थित होते.

यावेळी समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले, स्वाधार योजनेअंतर्गत २५ कोटी रुपयांची तरतूद प्राप्त झाली आहे. शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येत आहे. स्वाधार योजनेचा लाभ तालुकास्तरावरही मिळावा यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे.

प्रत्येक महाविद्यालयात समानसंधी केंद्र स्थापन करण्यात आलेले असून त्यामार्फत समाजकल्याण विभागाच्या सर्व योजनांचा प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उद्गार विद्यार्थ्यांनी अंमलात आणावे. भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत असे सांगून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्तीचाही लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.नारनवरे यांनी केले.

याप्रसंगी स्वाधार योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

सहआयुक्त (शिक्षण) भारत केंद्रे यांनी समाजकल्याण समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, स्वाधार, परदेश शिष्यवृत्ती इत्यादी योजनांची माहिती दिली.

प्रास्ताविकात सहायक आयुक्त संगिता डावखर स्वधार योजनेअंतर्गत प्राप्त अर्जावर आठ दिवसात कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले.

समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक-पालकमंत्री

पुणे दि.१७: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर आयोजित पवनाथडी यात्रेला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट दिली आणि सहभागी बचत गटांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार उमा खापरे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी महापौर माई ढोरे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, महिला स्वावलंबी होत नाहीत तोपर्यंत समाजाच्या प्रगतीला मर्यादा आहेत. महिला बचत गटांना प्रशिक्षण आणि बाजार उपलब्ध करून दिल्यास ते अधिक सक्षमपणे काम करतील. बचत गटांनी नागरिकांची गरज ओळखून नवे उत्पादन आणि सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. बचतगटांना असे नवे प्रयोग करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असेही श्री.पाटील म्हणाले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पवनाथडी यात्रेच्या माध्यमातून ४०० बचत गटांना चांगली संधी उपलब्ध करून दिल्याचे सांगून अशा उपक्रमाद्वारे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला गती मिळेल असे पालकमंत्री म्हणाले.

पवनाथडी यात्रेविषयी…
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाकडील महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील महिला बचतगट, वैयक्तिक महिला यांनी तयार केलेल्या वस्तू उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांना मार्केटिंग कौशल्ये ज्ञात व्हावीत, महिला उद्योजिका तयार होऊन महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात या हेतूने गवनाथडी जत्रेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.

महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या विविध प्रकारच्या चटण्या, पापड, लोणची, जाम, जेली, विविध प्रकारचे मसाले, विविध गृहोपयोगी उत्पादने, दैनंदिन वापराच्या वस्तु, हस्तकला निर्मित उत्पादने यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचा समावेश विक्री स्टॉलमध्ये आहे. खवैय्यांना महिलांनी तयार केलेले चुलीवरचे वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, शाकाहारी मासवडी, खानदेशी पुरणाचे मांडे, झणझणीत चुलीवरचं मटण, खेकडा करी, कोंबडी वडे, दमबिर्याणी, कुरकुरीत मच्छी फ्राय अशा मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.

जत्रेमध्ये नागरिकांच्या मनोरंजनासाठी रोज सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पवनाथडी जत्रेत एकूण ४०० इतकी स्टॉल आहेत, तर ५६० बचगटांनी यात्रेत सहभाग घेतला आहे. बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू विक्रीचे २४६ स्टॉल, महाराष्ट्रीयन मराठमोळ्या शाकाहारी पदार्थाचे १७७ स्टॉल, तर मांसाहारी पदार्थाचे १३७ स्टॉल यात्रेत आहेत.

जैविक पद्धतीने नदीतील जलपर्णी हटविणार पालिका आयुक्तांचे आदेश-आमदार शिरोळे यांची माहिती

पुणे – शहरातील मुळा आणि मुठा नदीतील जलपर्णी हटविण्यासाठी जैविक पद्धतीचा वापर करावा, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी शुक्रवारी सांगितली.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ आणि शहरातील विविध प्रलंबित विषयांबाबत आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि आयुक्त विक्रम कुमार तसेच पालिकेतील अन्य अधिकारी यांची विस्तृत बैठक आज (शुक्रवारी) झाली. या बैठकीची माहिती देताना आमदार शिरोळे यांनी सांगितले की, विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२ मध्ये दिनांक ८ मार्च रोजी पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरातील नद्यांमधील जलपर्णीच्या त्रासासंबंधीची लक्षवेधी सूचना मांडली होती. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीतील जलपर्णी हटविण्यासाठी जैविक पद्धतीचा वापर करण्यात आला होता. याच धर्तीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील जलपर्णी हटवावी, अशी माझी मागणी होती. त्याला अनुसरून लवकर कार्यवाही करण्याचे आदेश पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी दिले.

नदीकाठच्या धार्मिक स्थळांनी निर्माल्य आणि मूर्तीवर प्रदान केलेले सजावटीचे साहित्य याची जबाबदारी घ्यावी. सर्व वस्तूंचे विलगीकरण करुन ओले निर्माल्य धार्मिक स्थळांच्या जागेतच जिरवावे. याकरिता महापालिकेकडून सीएसआर फंडातून तरतूद करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. शहरातील अस्तित्वात असलेल्या विहिरींचे सर्वेक्षण आणि संरक्षण आणि नवीन विहिरींचे संवर्धन याकरिता कायम स्वरुपी धोरण ठरवून त्याच्या अंमलबजावणीची मागणी आमदार शिरोळे यांनी केली.

वस्ती भागातील स्वच्छतागृहे स्वच्छ आणि सुविधायुक्त ठेवावीत, तसेच शहरातील बंद अवस्थेतील इ-टॉयलेट्सही तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. ‘आपली शाळा, सुंदर शाळा’ असे अभियान मी सुरू केले‌. शाळा सुंदर रहाण्याच्या दृष्टीने निधीची तरतूद करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

शिवाजीनगर मतदारसंघातील भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, डेक्कन जिमखाना कॉलनी यांना जोडणाऱ्या गल्ल्यांमधील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. तेथील खड्ड्यांमुळे अपघात होतात तरी, ते खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली.

पंजाब नॅशनल बँक ते मेडी पॉईंट, शिवालय अपार्टमेंट, ग्रीन पार्क सोसायटी, औंध येथील पाणीपुरवठा समस्या सोडवावी, घोले रस्ता येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मिळणारी प्रत्यक्ष लाभ हस्तांतराची रक्कम देण्यात यावी. वसतीगृहातील गैरसोयी दूर व्हाव्यात, अशाही मागण्या आमदार शिरोळे यांनी केल्या आहेत.

बालभारती ते पौड फाटा रस्ता प्रकल्पास गती देण्यात यावी. येरवडा येथील स्व.बिंदूमाधव बाळासाहेब ठाकरे चौक येथील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन चौकात उड्डाणपूल बांधावा किंवा ग्रेड सेपरेटर करावा, असेही आमदार शिरोळे यांनी सुचविले. अपघात टाळण्यासाठी महापालिका हद्दीतील ब्लॅक स्पॉटबाबत उपाययोजना कराव्यात असेही आमदार शिरोळे यांनी सांगितले.

भारतरत्न पं.भीमसेन जोशी प्रेक्षागृहात बऱ्याच असुविधा असल्याचे लक्षात आले आहे. आयुक्तांनी त्यात लक्ष घालून सुधारणा घडवाव्यात, असेही आमदार शिरोळे यांनी बैठकीत सांगितले.