Home Blog Page 1493

महेश काळे आणि संदीप नारायण यांच्या हिंदुस्थानी- कर्नाटक संगीत जुगलबंदीने रसिक भारावले

पुणे : घटम, मृदुंग, तानपुरा अशा विविध तालवाद्द्यांच्या तडफदार साथीने रंगलेल्या हिंदुस्थानी- कर्नाटक संगीत जुगलबंदीने रसिक भारावले होते. राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध गायक महेश काळे व अमेरिकेतील संदीप नारायण  यांनी सादर केलेल्या या जुगलबंदीला तरुण श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या काल पाचव्या व शेवटच्या दिवशी उत्तरार्धातील पहिल्या सत्रात महेश काळे व अमेरिकेतील संदीप नारायण यांची  हिंदुस्थानी- कर्नाटक संगीताची जुगलबंदी  रसिकांनी अनुभविली.

तत्पूर्वी कार्यक्रमात मिरज येथील बाळासाहेब मिरजकर व साजिद मिरजकर या मिरजकर बंधूंकडून आर्यसंगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांच्याकडे दोन विशेष तानपुरे सुपूर्द करण्यात आले. या तानपुऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तबकडी – गळा – दांडी या एकसंध स्वरूपात असून, यांच्या तळाशी कुठेही जोड नाही. अतिशय अनोखी रचना असलेल्या या  तानपुऱ्यांच्या निर्मितीसाठी १ वर्षे कालावधी लागला आहे.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे सहस्र वर्षांत  एकदाच घडणाऱ्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सवाईमध्ये गाण्याची संधी मिळत आहे, याचा अतिशय आनंद होत आहे. संदीप आणि मी लहानपणापासूनचे मित्र आहोत मात्र आज तब्बल १५ वर्षांनंतर एकत्र गात आहोत, असे सांगत त्यांनी ढाणी रागाने आपल्या गायनाची सुरूवात केली. यामध्ये ‘देवी ब्रोवा समयमी दे…’ ही कर्नाटक संगीतातील बंदिश, ‘लंगरवा छंड मोरी बैया…’ ही हिंदुस्थानी संगीतातील बंदिश जलद लयीत ‘मोरे सर से सरक गई गगरी…’ ही मिश्र बंदिश आणि तराणा सादर केला. त्यांनतर  ‘कृष्णानी बेगडी बारू’  हे कर्नाटकी संगीतातील उपशास्त्रीय गीत सादर केले. त्यांनी सादर केलेल्या ‘कानडा राजा पंढरीचा’ या अभंगास रसिकांनी टाळ्यांचा भरभरून प्रतिसाद दिला.

यावेळी महेश काळे यांना राजीव तांबे (हार्मोनियम), विभव खांडोलकर (तबला), ओंकार दळवी (पखवाज), अपूर्व द्रविड (साइड रिदम),  प्रल्हाद जाधव, अमृत छ्नेवार, मनाली जोशी (तानपुरा आणि गायन) यांनी साथसंगत केली. तर संदीप नारायण यांना व्हीव्हीएस मुरारी (व्हायोलिन), साई गिरीधर (मृदंग), चंद्रशेकर शर्मा (घटम) यांनी साथसंगत केली.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सुनील गोगले यांचा बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

पुणे – पुणे महानगरपालिकेत वर्ष 2007/ 2012 राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील गोगले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहनदादा जोशी माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे यांच्या उपस्थिती विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे

‘आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोहन जोशी रमेश बागवे यांच्याशी संपर्क झाला माझ्यावर विश्वास दाखवून मला कॉंग्रेस पक्षात येण्याचे आवाहन करण्यात आले.
तसेच भाजपच्या शासन काळातील वाढलेली महागाई,बेरोजगारी,शेतकन्यांवरील अत्याचार, समाजा समाजातील कटुता, संविधानाला निर्माण झालेला धोका, राष्ट्रीय असुरक्षितता, शोषित, दलीत, महिला,अल्पसंख्याक यांच्यावरील अन्याय इ. अनेक समस्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे आदरणीय राष्ट्रीय नेते सन्माननीयश्री राहुलजी गांधी यांच्या ऐतिहासिक ” भारत जोडो यात्रा” मुळे मी आत्यंतिक प्रभावित झालो काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
काँग्रेस पक्षाचा एक सैनिक म्हणून आपण जी जबाबदारी माझ्यावर सोपवाल ती प्रामाणिकपणे निभावण्याचा प्रयत्न करीन व पक्षाच्या ध्येय धोरणांना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे योजले आहे

आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेत मिलेनियम नॅशनल स्कुल प्रथम

पुणे :  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विज्ञान प्रसारासाठी कार्यरत विज्ञान भारती आणि केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे विजेतेपद पुण्यातील मिलेनियम नॅशनल स्कूलने पटकाविले. मयूर कॉलनीतील मएसो बालशिक्षण मंदिर (इंग्लिश मिडीयम) शाळेने द्वितीय, तर नऱ्हे येथील सिग्नेट पब्लिक स्कूलने तृतीय क्रमांक पटकावला.
प्रथम क्रमांकास १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ७ हजार, तृतीय क्रमांकास ५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन या गुणवान विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. मिलेनियम नॅशनल स्कुल आणि अराईज इंटरनॅशनल स्कुल या शाळांना अडीच हजार रुपये रोख व प्रमाणपत्र उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेत सहभागी प्रत्येकाला प्रमाणपत्र देण्यात आले. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफी थिएटरमध्ये ही स्पर्धा पार पडली.
‘स्वातंत्र्यलढ्यात भारतीय शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक संस्थांचे योगदान’ या संकल्पनेवर आधारित ही प्रश्नमंजुषा स्पर्धा झाली. मराठी, इंग्लिश, सेमी इंग्लिश आणि हिंदी माध्यमातील आठवी व नववीच्या मुलांच्या ३९ संघांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रसिद्ध क्विझ मास्टर राजीव संन्याल यांनी अतिशय मनोरंजक पद्धतीने ही स्पर्धा घेतली.

राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्राचे (एनसीसीएस) संचालक डॉ. मोहन वाणी, विज्ञान भारतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. क. कृ. क्षीरसागर, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. स्वाती जोगळेकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सदस्य डॉ. सविता केळकर, विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत सचिव डॉ. मानसी माळगावकर, डॉ. रमेश जोशी, श्रीकांत कुलकर्णी, डॉ. प्रमिला लाहोटी आदी उपस्थित होते.
डॉ. मोहन वाणी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अशा प्रकारच्या स्पर्धांतून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. आपल्या भारतीय शास्त्रज्ञ, संशोधन संस्थांचे योगदान सहजपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल, असे त्यांनी नमूद केले. 
राजिब संन्याल यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाबद्दल, तसेच त्यांच्यातील गुणवत्तेबद्दल कौतुक केले. विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रज्ञ, महापुरुष, संस्कृती आणि वारसा, भारतमाता याची माहिती असावी. त्यासाठी देशभर अशा प्रकारच्या स्पर्धा, उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.

वारकरी संप्रदायातील संत महाराष्ट्राचे वैभव – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर, दि. 18 : संत तुकाराम महाराजांच्या गाथा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम संताजी जगनाडे महाराजांनी केले. मानवतेचा विचार त्यामधून पुढील पिढीपर्यंत घेऊन जाण्याचे काम संतांनी केले असून वारकरी संप्रदायातील संत हे महाराष्ट्राचे वैभव आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आज 18 डिसेंबर रोजी नंदनवन भागातील ग्रेट नाग रोडवरील संत जगनाडे चौकात श्री. संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी पर्वावर श्री. संताजी आर्ट गॅलरीचे भूमिपूजन श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, कृष्णा खोपडे, अभिजीत वंजारी, प्रविण दटके, मोहन मते, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, माजी कुलगुरु एस. एन. पठाण, माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, रमेश गिरडे, बाबुराव वंजारी, स्वामी भद्रे, उमेश शाहू व स्वप्नील वरंभे यांची उपस्थिती होती.

संतांच्या आध्यात्मिक विचारातून मानवी जीवन कसे बदलू शकते हे दिसून येते. ते केवळ संतच नव्हते तर समाजसुधारक होते. समाजातील चालीरिती बदलवून समाजातील विषमता दूर करून समाज पुढे गेला पाहिजे. संतांनी दिलेला विचार हा शाश्वत आहे. सशक्त समाज निर्मितीसाठी संतांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. संत जगनाडे महाराजांच्या सौदुंबरे या जन्मभूमी व कर्मभूमीचा विकास करण्यासाठी 60 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या वास्तूचे जतन करणार असल्याचे सांगून श्री. फडणवीस म्हणाले की, त्या माध्यमातून संतांचे विचार नव्या पिढीपर्यंत आपणाला पोहोचावे लागतील. संत जगनाडे चौकातील हे स्मारक मोठ्या स्वरूपातील व्हावे यासाठी आमदार श्री. बावनकुळे आणि आमदार श्री. खोपडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या स्मारकासाठी येणाऱ्या अडचणी दूर केल्या. या आर्ट गॅलरीसाठी लागणारा आवश्यक तो निधी मार्च 2023 पूर्वी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही यावेळी श्री. फडणवीस यांनी दिली.

संत जगनाडे महाराजांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्यात येत आहे. त्यांच्यावर काही वर्षापूर्वी डाक तिकीटाचे अनावरण करण्यात आले. समाजाला उर्जा देण्याचे काम संतांच्या विचारातून होत आहे, असे खासदार तडस यांनी सांगितले.

संत जगनाडे महाराजांचे विचार समाजाला दिशा देणारे आहे. संताच्या विचारावर प्रत्येकाने आपली वाटचाल करून समृध्द करावे. श्री. संताजी आर्ट गॅलरीतून संत जगनाडे महाराजांच्या जीवनकार्याची माहिती पहायला मिळणार असल्याचे श्री. बावनकुळे म्हणाले.

श्री. पठाण म्हणाले, वारकरी संप्रदायाचे राज्यावर मोठे उपकार आहे. देशातील समाज रूढी परंपरा, जातीपातीत असतांना त्यांचा स्वाभिमान जागवून त्यांचे प्रबोधन करण्याचे काम संतांनी केले. तुकाराम महाराजांच्या गाथा समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम संत जगनाडे महाराजांनी केले. बहुजन समाजाला अध्यात्माची दारे उघडे ठेवण्याचे काम संतांनी केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ. श्री. खोपडे, श्री. क्षीरसागर यांनीही विचार व्यक्त केले.

प्रास्ताविकातून माहिती देताना नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी म्हणाले, ही आर्ट गॅलरी 8 हजार स्के.फुट जागेवर बांधण्यात येणार आहे. 1 कोटी रूपये निधी उपलब्ध झाला असून साडेसहा कोटी रुपये खर्च या गॅलरीवर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्याने त्यांच्या शुभेच्छा संदेश यावेळी वाचून दाखविला. श्री. फडणवीस यांनी संत जगनाडे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. संताजी आर्ट गॅलरीचे आर्किटेक्ट स्वप्नील वरंभे यांचा श्री. फडणवीस यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

कार्यक्रमाला तैलिक समाज बांधवांची व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार ज्योती भगत यांनी मानले.

पंडित आनंद भाटे व राजेंद्र कंदलगावकर या शिष्यांनी सवाईत पंडितजींना वाहिली सांगीतिक मानवंदना

पुणे, दि. १८ डिसेंबर २०२२ : पंडित आनंद भाटे यांचे बहारदार गायन आणि त्यानंतर सादर झालेल्या पंडित राजेंद्र प्रसन्ना यांच्या सुरेल बासुरी वादनात रसिक दंग झाले. त्यानंतर राजेंद्र कंदलगावकर यांच्या गायनाने कार्यक्रमात आणखी रंग भरले. गायन आणि वादनाच्या या सुमधुर प्रस्तुतीने पुणेकर रसिकांनी रविवारी एक सुरेल दुपार अनुभविली.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा रविवारी पाचवा व शेवटचा दिवस होता. या दिवसाची सुरुवात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंद भाटे यांच्या गायनाने झाली.

महोत्सवात आजपर्यंत मी अनेकदा संध्याकाळचे राग गायले आहे. यंदा मी खास दुपारच्या वेळ निवडली असून, यावेळेत गायनाची ही माझी पहिलीच वेळ आहे, असे सांगत त्यांनी
राग वृंदावनी सारंगने आपल्या गायनाची सुरूवात केली. त्यामध्ये त्यांनी विलंबित बंदिश ‘तुम रब तुम साहेब ‘, द्रुत बंदिश ‘जाऊ मै तोपे बलिहारी’ सादर केले. त्यानंतर  पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेली ‘राम रंगी रंगले मन’ ही भक्तीरचना सादर केली. पंडितजी आणि लता मंगेशकर या दोन भारतरत्नांनी गायलेल्या अतिशय लोकप्रिय अशा ‘बाजे मुरलिया बाजे’ या गीताच्या तडफडदार सादरीकरणातून त्यांनी या दोन्ही दिग्गजांना आपली आदरांजली अर्पण केली. त्यांच्या या प्रस्तुतीला रसिकांनी उभे राहून टाळ्यांची उस्फूर्त दाद दिली. त्यानंतर ‘मी वसंतराव’ या चित्रपटात समाविष्ट असलेले ‘झाले युवतीमना दारुण रण रुचिर प्रेम…’ हे बालगंधर्व आणि सवाई गंधर्व यांच्या गायकीचा प्रभाव असलेले मानापमान नाट्यातील पद सादर करत त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना सुयोग कुंडलकर (हार्मोनियम),  भरत कामत (तबला),  प्रसाद जोशी (पखवाज), ललित देशपांडे व आशिष रानडे (तानपुरा), माऊली टाकळकर ( टाळ) यांनी साथ केली.

त्यानंतर बनारस घराण्याचे ज्येष्ठ बासरीवादक राजेंद्र प्रसन्ना यांचे बासरीवादन झाले. पुण्यात बरेचदा आलोय पण आज पहिल्यांदा सवाईत प्रस्तुती करत आहे, असे सांगत त्यांनी राग अलया बिलावल’द्वारे आपल्या वादनाची सुरुवात केली. त्यामध्ये विलंबित गत, द्रुत गत सादर करत हळूवारपणे या रागाची उकल केली. त्यानंतर पहाडी धून सादर करत, बनारसी दादराच्या प्रस्तुतीने त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. त्यांना रवींद्र यावगल ( तबला ), राजेश व ऋषभ प्रसन्ना ( बासरी साथ ) नीता दीक्षित ( तानपुरा ) यांनी साथ केली.

तिसऱ्या सत्रात पं. भीमसेन जोशी यांचे दीर्घकाळ मार्गदर्शन लाभलेले राजेंद्र कंदलगावकर यांचे गायन झाले.

“गुरुजींनी फार कष्ठाने हा कल्पवृक्ष जोपासला आहे. त्या कल्पवृक्षाच्या छत्रछायेत आज आम्ही सर्व कलाकार वृद्धिंगत होत आहोत. कोविडच्या मधल्या काळात ही पंढरीची वारी चुकली, पण आता ती पुन्हा सुरू झाली आहे आणि याचा आनंद होत आहे,” असे सांगत त्यांनी भीमपलास रागाने आपल्या गायनाची सुरूवात केली. त्यामध्ये ‘अब तो भई तेर… ‘ ही विलंबित बंदिश, ‘ मिल जाना राम पियारे… ‘ ही तीन तालातील बंदिश त्यानंतर ‘कटे ना अब बिरहा की रात…’ ही  पिलू रागातील ठुमरी त्यांनी सादर केली. पंडित भीमसेन जोशी यांच्या ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा..’ या लोकप्रिय भजन प्रस्तुतीने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना उमेश पुरोहित ( हार्मोनियम), पं. रामदास पळसुले ( तबला), हर्षद डोंगरे व रवी फडके ( तानपुरा), माऊली टाकळकर ( टाळ)  यांनी साथ केली.  

गाण्यातील बेशरम शब्दाला आक्षेप… रामदास आठवले

पुणे : “शाहरुख खानच्या पठाण सिनेमाला आमचा विरोध नाही. गौतम बुद्ध हे देखील भगवा रंग परिधान करायचे. जसा भगवा रंग भाजप, शिवसेनेचा आहे; तसाच आमचा पण रंग भगवा आहे. मात्र, गाण्यातील बेशरम हा शब्द काढला पाहिजे. कोणताही रंग बेशरम नसतो. बेशरम शब्द काढला नाही, तर आम्हीही आंदोलन करू,” असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.

पुण्यातील नवीन विश्रामगृहात आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रसंगी ‘रिपाइं’ शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, ‘रिपाइं’ नेते परशुराम वाडेकर, प्रदेश उपाध्यक्ष असित गांगुर्डे, महिपाल वाघमारे, रोहिदास गायकवाड, अशोक कांबळे, संजय सोनवणे, विशाल शेवाळे, मोहन जगताप, बसवराज गायकवाड, निलेश आल्हाट, वीरेन साठे, यशवंत नडगम, शाम सदाफुले, राजेश गाडे, अक्षय गायकवाड, आनंद लवटे, वैभव पवार, महादेव साळवे, जयदेव रंधवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, “कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी येतील. स्तंभाजवळ सभा घेता येणार नाही, असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आमचा या निर्णयाला विरोध नाही. ज्यांना सभा घ्यायची ते आजुबाजूबाजूला घेऊ शकतात. याची परवानगी देण्यात यावी, याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहोत. तसेच विजयस्तंभ प्रकरणी दाखल केसेस मागे घ्याव्यात, अशी आमची मागणी आहे.”

संविधानाने भारत जोडलेला
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान देऊन भारत देश जोडलेला आहे. काँग्रेसने जाती-पातीचे राजकारण करून देश तोडण्याचा प्रयत्न केला. आज पुन्हा राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रेतून देश जोडण्याबाबत सांगत आहे. संविधान धोक्यात असल्याचा समज पसरवत आहेत. पण कोणीही संविधान बदलू शकत नाही. त्यामुळे मोदी सरकारकडून संविधान बदलले जात असल्याचा अपप्रचार विरोधकांनी थांबवायला हवा. मोदी संविधान मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत असल्यानेच रिपब्लिकन पक्ष मोदींसोबत आहे,” असे रामदास आठवले यांनी नमूद केले.

महापुरुषांचा सन्मान ठेवावा
आठवले पुढे म्हणाले, “पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चुकीची भाषा वापरली. मात्र, त्यांनी याप्रकरणी जाहीर माफी मागितली आहे. शाईफेक प्रकरणातील तरुणांना जामीन झालेला आहे. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार आहे. त्यामुळे आता हे प्रकरण अधिक ताणला जाऊ नये. सर्वांनी शांतता पाळावी आणि महापुरुषांचा सन्मान ठेवावा. हे सर्वच महापुरुष अनेक पिढ्यासाठी आदर्श राहणार आहेत. महाविकास आघाडीने काढलेला मोर्चा फार मोठा नव्हता. आमदार सांभाळता न आल्याने मोर्चे काढण्याची वेळ आली आहे. राज्यपालांच्या संदर्भात भाजप नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केली आहे.”

समान नागरी कायद्याला पाठिंबा
रिपब्लिकन पक्षाचा समान नागरी कायद्याला पाठिंबा आहे. हा कायदा कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. तसेच या कायद्यामुळे आरक्षणाला कोणताही धोका नाही. लोकसंख्या नियंत्रणासाठी हा कायदा महत्वाचा आहे. आरक्षण जाणार असेल, तर आवाज उठवू, असेही आठवले यांनी सांगितले.

शैलेंद्र चव्हाण यांनी स्वागत प्रास्ताविक केले व आभार मानले.

अमिताभ गुप्ता यांची राज्य कारागृह अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

पुणे :  कारागृह व सुधारसेवाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी अमिताभ गुप्ता यांची बदली करण्यात आली आहे. मुंबईतील विशेष शाखेचे अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांची पुणे शहर अतिरिक्त पोलीस आयुक्त (पूर्व) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची दोन दिवसांपूर्वी अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था मुंबई येथे बदली करण्यात आली होती. त्यांची पुन्हा पुण्यात बदली झाली आहे.कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस सह आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

कोथरूडमध्ये अल्पदरातील कापडी पिशव्यांच्या मशिनचे लोकार्पण

पुणे -महिला सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर असून, त्यासाठी अनेक उपक्रम राबविले असल्याचे प्रतिपादन शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले. तसेच, आगामी काळात कोथरूड मध्ये शंभर ठिकाणी सदर मशिन कार्यान्वित करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी मंत्री पाटील यांच्या संकल्पनेतून अल्पदरात कापडी पिशव्या उपलब्ध करून देणारे मशिन कोथरूड मधील कर्वेनगर येथे कार्यान्वित केले असून, याच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे मनपा माजी शिक्षण मंडळ अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक दीपक पोटे, राजाभाऊ बराटे, स्विकृत सदस्या मिताली सावळेकर, उद्योजिका सई मुळे, अग्रजचे फुडस् चे बाळकृष्ण थत्ते, कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे राजेश गुर्रम यांच्या सह इतर मान्यवर आणि कर्वेनगर भागातील नागरीक उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर असून, त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी नेहमीच विविध उपक्रम राबविले आहेत. आजही नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी त्याला पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी अल्पदरात कापडी पिशव्यांचे मशिन उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी ही या मशिनचा आवश्य वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, आज आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना अनेक समस्या असतात. बाजारात उपलब्ध असलेले सॅनेटरी नॅपकीन आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आगामी काळात घरकाम करणाऱ्या महिलांसाठी कोथरुमधील सोसायटीमध्ये सॅनेटरी व्हेडिंग आणि व्हॅनिशिंग उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, यावेळी कापडी पिशव्यांच्या लोकार्पणानंतर नामदार पाटील यांनी स्वतः याचा वापर करून कापडी पिशवी खरेदी केली. तसेच यानंतर एका ज्येष्ठ नागरीक महिलांनाही यासाठी सहाय्य केले.

दुचाकी टॅक्सी विरोधात व इतर प्रश्नांसाठी 19 डिसेंबरला शांततेच्या मार्गाने देशव्यापी आंदोलन : बाबा कांबळे

पुणे-“ऑटो रिक्षा, दुचाकी चालकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांची चर्चा केंद्र व राज्य स्तरावर होणे गरजेचे आहे. हिवाळी अधिवेशनात संसदेत आणि विधानभवनात हे प्रश्न लोकप्रतिनिधींनी उपस्थित करावे यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्यासाठी खासदार व आमदार यांना भेटून हे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे ऑटोरिक्षा, टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले की, 19 डिसेंबर पासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होत आहे. संसदेचे अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनामध्ये दुचाकी, टॅक्सी, रिक्षा चालकांच्या कल्याणकारी महामंडळ व इतर विविध प्रश्न मांडले जावेत, या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी सर्व आमदार व लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले जाणार आहे. विधानसभा व लोकसभेत देखील या प्रश्नावर ती चर्चा व्हावी, यासाठी खासदारांना देखील भेटणार असून निवेदन देणार आहे.

या बरोबरच खासदार, आमदारांचे लक्ष वेधण्यासाठी 19 डिसेंबर रोजी विधान भवन येथे पुणे पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालक धरणे आंदोलन करतील, महाराष्ट्राच्या व भारतातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या त्या भागातील लोक एकत्र येऊन महाराष्ट्र सह देशभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतील, हे इशारा आंदोलन असेल देशभरामध्ये एकाच वेळी आंदोलन होईल असे बाबा कांबळे यांनी सांगितले. या वेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय तसेच देशभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यावरती एकाच वेळी आंदोलन करण्यात येणार आहे. रिक्षा चालकांच्या प्रश्नांवर गंभीरपणे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.

महाराष्ट्र मध्ये २० लाखापेक्षा अधिक रिक्षा चालक मालक असून देशभरामध्ये रिक्षा टॅक्सी टुरिस्ट बस व इतर सर्व प्रकारच्या चालक व्यक्तींची संख्या सुमारे १५ कोटी आहे. या सर्व चालकांच्या प्रश्नांसाठी केन्द्र वर राज्य सरकार कडे प्रलंबित आहेत ते न सोडवल्यामुळे दिल्ली काश्मीर गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार सह सर्वच राज्यातील रिक्षा टॅक्सी टुरिस्ट परमिट मध्ये व्यवसाय करणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांमध्ये संताप आहे. हा संताप देशभर पोचण्यासाठी व केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी, 19 डिसेंबर रोजी पुणे पिंपरी चिंचवड सह देशभरामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती ऑटो, रिक्षा, टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली.

या आंदोलनामध्ये ऑटोरिक्षा, टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन दिल्ली, ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पुणे रिक्षा फेडरेशन, जय महाराष्ट्र रिक्षा संघटनांसह विविध संघटना सहभागी होणार असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.

संघटनेच्या मागण्या

१) रॅपिड मोबाईल आपलिकेशन मधून टू व्हीलर ची सुविधा हटवा.

२) रॅपिडो ओला उबेर कंपनीवर जनतेचे फसवणूक केली म्हणून फसवणुकीचा गुन्हा दाखल करा.

३) मान्यता नसताना टू व्हीलर टॅक्सी व्यवसाय करत असेल तर ही सेवा बेकायदेशीर म्हणून घोषित करा.

४) रिक्षा चालक मालकांसाठी प्रलंबित असलेले कल्याणकारी महामंडळ तातडीने घोषित करा.

५) मुक्त रिक्षा परवाना बंद करा ई रिक्षाला परवाना सक्तीचा करा.

६) पिंपरी चिंचवड पुणे येथे मीटर कॅरीबॅॅशनची मुदत 30 जानेवारीपर्यंत वाढवा.

आंदोलनामध्ये कुणालाही जबरदस्ती करू नये रिक्षा बंद नाही धरणे आंदोलन आहे स्वइच्छेने सहभागी होतील त्यांनाच सहभागी करून घ्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी कोणालाही जबरदस्ती करू नका असे आवाहन बाबा कांबळे यांनी रिक्षा चालक मालकांना केले आहे

62 वर्षात कधीही झाले नव्हते ,लोक महाराष्ट्र नको, कर्नाटकात जाऊ म्हणायला लागले .. सरकारकडून नको ते उद्योग सुरु .. अजित पवारांचा तडाखा

नागपूर -अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आयोजित चहापानावर विरोधकांनी नेहमीप्रमाणं बहिष्कार घातला आहे. राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून(सोमवार) नागुपरात सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज(रविवार) महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पत्रकारपरिषदही झाली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. तसेच, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांकडून बहिष्कार टाकण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.

यावेळी अजित पवार म्हणाले की, हे अधिवेशन तीन आठवड्याचं घ्यावं अशी आमची मागणी आहे. सरकारकडून काम करण्याऐवजी नको ते उद्योग सुरु आहेत, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, आम्हाला चहापणाला उपस्थित रहा असं सांगितलं, मात्र 6 महिने सरकारं सत्तेवर आलं आहे. मात्र जनतेच्या अपेक्षा यांनी पूर्ण केलेल्या नाहीत. अनेक मंत्री, आमदार महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. सीमा प्रश्नाबाबत देखील अजून पुरेशी उपाययोजना केलेली नाही. 865 गावांचा प्रश्न अजून कायम आहे. आहे ती गावे इतर ठिकाणी जाण्यासाठी ठराव करू लागली आहेत. असा प्रयत्न 62 वर्षात कधीही झाला नव्हता. त्यावेळी पलीकडच्या राज्यांतील गावे महाराष्ट्रात येण्यासाठी इच्छुक होती. मात्र सध्या परिस्थिती वेगळी आहे. उलट आत्ताचे मंत्री पुरेशी बाजू देखील मांडू शकले नाहीत, असंही ते म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, ज्यांना वेगवेगळ्या शिष्यवृत्या मिळतात त्याचे पैसे देखील वेळेवर जात नाही. अनेक संस्थांचे पैसे थकले आहेत. राज्यात मराठवाडा, विदर्भ कोकणला देखील मदत मिळाली पाहिजे. कर्ज काढण्याला विरोध नाही मात्र त्यातून सर्वांना न्याय मिळतोय का हे पाहणं महत्त्वाचं आहे. विदर्भाचा अनुशेष अजुनही पुरेसा नाही. धान खरेदी तोंड बघून केली जाते, असा आरोपही त्यंनी केला.

अजित पवार म्हणाले की, राज्यातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. लाखो कोटीची गुंतवणूक होणार होती. मात्र या सगळ्या गोष्टींना महाराष्ट्र मुकला आहे. विरोधाला विरोध करणारे आम्ही नाहीत. आम्ही चर्चेतून मार्ग काढणारी लोकं आहोत. आम्ही आमदाराचा निधी वाढवला होता. त्यांच्यात हिमंत असेल तर त्यांनी 7 कोटी निधी करावा आहे का हिंमत बघुयात. असं अजित पवार म्हणाले.

मी प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजे; बावनकुळेंच्या विधानाने शिंदे समर्थकांत चुळबुळ ? 

नागपूर – मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे, असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे. बावनकुळेंच्या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जातीपातीच्या बाहेर निघालेले नेते आहेत. न्यायासाठी आलेल्या प्रत्येकाला त्यांनी मदत केली आहे. जो जो समाज त्यांच्याकडे गेला. त्याच्यासाठी त्यांनी काम केलं आहे. मराठा असतील, धनगर असतील, ओबीसी असतील, सर्वांसाठी त्यांनी काम केलं. त्यामुळे आपली सर्वांची जबाबदारी आहे की ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजे असे स्पष्ट वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. माझ्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात ते मुख्यमंत्री झाले पाहिजे असेही त्यांनी म्हटले. बावनकुळे यांच्या या वक्तव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांत चुळबूळ सुरु होऊ शकणार आहे. नागपुरात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मारक आणि आर्ट गॅलरीचा भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर तेली समाजातील नागरिक उपस्थित होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. त्यांनी म्हटले की, समाजाला जेव्हा काही द्यायचा प्रश्न आला, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मागण्या मान्य केल्या. त्यामुळे आपली ही जबाबदारी आहे की पुन्हा एकदा 2014 ते 2019 चा काळ महाराष्ट्रात आला पाहिजे. त्यासाठी आपण सर्व समाजातील लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभे राहिले पाहिजे असे आवाहन बावनकुळे यांनी केले. फडणवीस यांनी कधीही आपल्याकडून (समाजाकडून) अपेक्षा व्यक्त केली नाही, की अमक्या समाजाने माझ्यासाठी हे करावं. देवेंद्र फडणवीस यांना फक्त पदावर बसवण्यासाठी नाही तर सर्व समाजाला न्याय मिळण्यासाठी आता आपली जबाबदारी वाढली आहे असे ही बावनकुळे म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात क्लीन चिटच्या बंपर ऑफर ? ..आता प्रसाद लाड यांना 10 कोटींच्या फसवणूकप्रकरणी क्लीन चिट

मुंबई-शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांना क्लीन चिटच्या बंपर ऑफर सुरू झाल्यात कि काय ? असा प्रश्न पडावा असे वृत्त हाथी आले आहे,प्रवीण दरेकर, किरीट सोमैया यांच्यानंतर मुंबई पोलिसांनी आता भाजपचे आणखी एक नेते आणि विधान परिषदेचे सदस्य प्रसाद लाड यांना 10 कोटींच्या फसवणूकीप्रकरणी क्लीन चिट दिली आहे. व्यापारी बिमल अग्रवाल यांनी प्रसाद लाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

प्रसाद लाड यांच्यावर काय होते आरोप?

प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल ट्रेडकॉम प्रायव्हेट लिमिटेड आणि हणमंत गायकवाड यांच्या बीव्हीजी लिमिटेड यांनी संयुक्त उपक्रमाद्वारे बीव्हीजी-क्रिस्टल नावाची कंपनी स्थापन केल्याचा आरोप बिमल अग्रवाल यांनी केला आहे. लाड आणि गायकवाड यांनी स्थापन केलेल्या जॉइंट व्हेंचर कंपनीला मुंबई महापालिकेच्या जलसाठा आणि पंपिंग स्टेशनजवळ भिंत बांधण्याचे टेंडर मिळाले. अग्रवाल यांच्याशी सामंजस्य करार करून त्यांनी हे काम त्यांना दिले. या कामाच्या मोबदल्यात अग्रवाल यांच्या कंपनीच्या वतीने लाड व गायकवाड यांना 5 टक्के रॉयल्टी देण्याचे ठरले. काम पूर्ण झाल्यावर लाड आणि गायकवाड यांनी निविदांची संपूर्ण रक्कम त्यांच्या संयुक्त कंपनीच्या खात्यात वर्ग केल्याचा आरोप आहे. या कंपनीकडून जवळपास 10 कोटी रुपये घ्यायचे आहेत. मात्र, प्रसाद लाड व गायकवाड ही रक्कम त्यांना देत नाहीत, असा आरोप बिमल अग्रवाल यांनी केला होता.

प्रसाद लाड यांच्याविरोधात पुरावा नाही

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2014 सालच्या या प्रकरणी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. हे संपूर्ण प्रकरण दिवाणी वादाचे असून त्यात प्रसाद लाड यांना आरोपी बनवण्यासाठी कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

प्रवीण दरेकरांना क्लीन चिट

देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक तपास शाखेकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना एकापाठोपाठ जुन्या प्रकरणांमध्ये क्लीन चिट देण्यात येत आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. (मुंबई बँक) आर्थिक अनियमितता प्रकरणात भाजपचे विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. या बहुचर्चित राज्यातील कथित बँक घोटाळ्यात 123 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

किरीट सोमय्यांनाही क्लीन चिट

‘सेव्ह आयएनएस विक्रांत’ मोहिमेतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नीला यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी ‘सेव्ह आयएनएस विक्रांत’ मोहिमेतून ५७ हजार कोटींचा घोटाळा केला होता. असा आरोप करण्यात आला होता.

विराज जोशी, सीड श्रीराम या नव्या पिढीच्या दर्जेदार कलाकारांचे ‘सवाई’ सादरीकरण

पुणे : भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे नातू व श्रीनिवास जोशी यांचे पुत्र विराज जोशी आणि श्रीवल्ली या लोकप्रिय गीताचे गायक सीड श्रीराम या नव्या पिढीच्या दर्जेदार कलाकारांचे सादरीकरण काल चौथ्या दिवसाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आकर्षण ठरले. रसिक श्रोत्यांनीही या कलाकारांना मनापासून दाद देत त्यांचे कौतुक केले.  चौथ्या दिवसाची सुरूवात महोत्सवात पहिल्यांदाच आपली कला सादर करणाऱ्या यशस्वी सरपोतदार यांच्या दमदार गायनाने झाली. जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका पद्मा तळवलकर यांच्या शिष्या असलेल्या यशस्वी सरपोतदार यांनी महोत्सवाच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच आपली कला सादर केली. त्यांनी राग गौड सारंगने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. हरकती आणि लयकारी यांचा सुंदर मेळ त्यांच्या सादरीकरणात पहायला मिळाला. स्वरमंचावरून सादर होणारे सुरेल गायन आणि त्याला रसिकांकडून मिळणारा उस्फूर्त प्रतिसाद अशा उत्साही वातावरणात महोत्सवाच्या चौथ्या दिवसाची सुरुवात झाली.  किराणा घराण्याचे उदयोन्मुख गायक असलेल्या विराज जोशी यांनी राग मारुबिहागने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. त्यांनी विलंबित एकताल ‘रसिया हो ना…’ ही व दृत तीन तालातील ‘परी मोरी नाव…’ व ‘दरपत रैन दिना…’ या रचना प्रस्तुत केल्या.  पं. भीमसेन जोशी यांच्या ‘संतवाणी’ या कार्यक्रमाला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत त्यातेच औचित्य साधत त्यांनी अजरामर केलेल्या भक्तीसंगीताची झलक विराज यांच्या गायनाने रसिकांनी अनुभविली. यामध्ये पं. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या काही रचनांचे तुकडे गुंफण्यात आले होते, हे विशेष. या दरम्यान त्याने ‘नामाचा गजर…’, ‘रूप पाहता लोचनी…’, ‘बाजे मुरलिया बाजे…’, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा…’, ‘जो भाजे हरी को सदा…’, ‘विठ्ठलाच्या पायी थरारली वीट…’ या रचना सादर केल्या.        या वेळी विराज यांना अविनाश दिघे (संवादिनी), पांडुरंग पवार (तबला), सुखद मुंडे (पखावज) व माऊली टाकळकर (टाळ), पांडूरंग पाटोळे, दशरथ चव्हाण, रवी पंडित (तानपुरा), अपूर्व द्रविड यांनी (तालवाद्य) तर राहुल गोळे (ऑर्गन) अशी साथसांगत केली.विराजाचे कौतुक करण्यासाठी एमआयटी विश्व शांती विद्यापीठाच्या लिबरल आर्टस् विभागाच्या प्रमुख डॉ. प्रीती जोशी, तेथील शिक्षक वृंद व त्याचे सहाध्यायी विद्यार्थी मित्र उपस्थित होते. सादरीकरणानंतर या सर्व विद्यार्थ्यांनी विराज यांचा सत्कार करीत कौतुक केले.          यानंतर सुप्रसिद्ध गायक सीड श्रीराम यांनी कर्नाटक शैलीतील संगीताची सुरेल अनुभूती उपस्थितांना दिली. त्यांनी राग कावेरीमधील वर्णम सरसुदाने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘परी दनमी चिथे…’ ही राग भिलहारी, ‘श्री सत्यनारायणा…’ ही राग सुबहापंतूवरली मधील प्रस्तुती केली. सरासासमा ही रचना राग कापी नारायणीमध्ये सादर केली. त्यानंतर त्यांनी आलाप- तोडी मध्ये कडनुवारीकी निरावळ आणि ‘जगादो उधाराणी…’ , ‘राधा समेथा..’ व ‘कुरई ओन्ध्रम इलाई…’ या  कर्नाटक शैलीत त्यांनी सादर केलेल्या विविध रचनांनी रसिक प्रेक्षकांची वाह वाह मिळविली. श्रीवल्ली या अलीकडेच गाजलेल्या गीताने सीड श्रीराम तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत आज त्यांच्या कर्नाटक संगीताच्या प्रस्तुतीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. व्हायोलिन आणि घटम् सोबत प्रस्तुत झालेले सवाल जवाब चांगलेच रंगले. त्यांना राजीव मुकुंदम (व्हायोलिन), जे. वैद्यनाथन (मृदमगम्), डॉ. एस. कार्तिक (घटम्) व विनायक कोळी यांनी तनपु-यावर साथसंगत केली.

एकल नृत्यांच्या ‘ लक्ष्य’ कार्यक्रमाला प्रतिसाद

‘भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन  
पुणे ः
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत  आयोजित ‘ लक्ष्य ‘ या  नृत्य विषयक कार्यक्रमाला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला.   हा कार्यक्रम शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेने  सादर केला.शनिवार,दि.१७ डिसेंबर २०२२ रोजी  सायंकाळी ६  वाजता  भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.कार्यक्रमामध्ये डॉ. अनुपमा कैलाश ( कुचीपुडी ), पूर्वा शहा ( कथक ), राधिका मुळये (भरत नाट्यम् ) यांनी ३ शास्त्रीय नृत्यप्रकार एकल ( सोलो ) स्वरूपात सादर केले.पूर्वा शहा यांनी दुर्गा स्तुती ने प्रारंभ केला.ताल धमार, ततकार , बंदिश ,चक्री, ठुमरी हे कथक मधून प्रस्तुत केले.
अनुपमा कैलाश यांनी कुचीपुडी नृत्यातून कृष्णाच्या रूसलेल्या विरहिणीची अनोखी रुपे प्रस्तुत केली. राधिका मुळये यांनी भरतनाटयम् मधून  ‘यती ‘ सह अनेक बहारदार नृत्ये सादर केली.

नृत्य गुरू मनीषा साठे, डॉ.सुचेता भिडे – चापेकर, सुचित्रा दाते , भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे,  रसिका गुमास्ते आदी मान्यवर उपस्थित होते. नृपा सोमण यांनी  सूत्रसंचालन केले.

शिवसेनेसोबत जाण्यास आम्ही तयारच: पण आघाडीत घेण्यास काँग्रेस, राष्ट्रवादीकडूनच विरोध

नाशिक-महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घेण्याबाबत राष्ट्रवादी व काँग्रेसचा विराेध आहे. शिवसेनेबराेबर युती करण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याच निर्णयावर सर्व काही अवलंबून असेल असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‌ॅड. प्रकाश) आंबेडकर यांनी नाशिकमध्ये शनिवारी (१७ डिसेंबर) सांगितले.

नाशिकच्या ईदगाह मैदानावर शनिवारी धम्म परिषदेचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. राष्ट्रवादी व काँग्रेस या दाेघांनाही गरीबांना सत्तेत येऊ द्यायचे नाही ही विचारधारणा आहे. मुंबईत निघालेला माेर्चा हा शिवसेनेचाच हाेता. काँग्रेस व राष्ट्रवादी फक्त नावाला होते. महाविकास आघाडीत आम्हाला घेण्याबाबत मतभेद असल्याने या मोर्चात सहभागी झालो नाही, असेही आंबेडकरांनी सांगितले. धम्म परिषदेत आपल्या ४८ मिनिटांच्या भाषणात त्यांनी संघ व पंतप्रधान माेदी यांच्यावर सडकून टीका केली. सत्तेचा गैरवापर करत काेणत्याही पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या चाैकशा लावण्यात आल्या आहेत.

देशात पंतप्रधानांच्या ताेडीचा दुसरा माणूसच नाही असे बिंबवले जात आहे आणि दुर्दैवाने आपण सर्व त्याला बळी पडताे. आपल्याला पंतप्रधान नव्हे तर खासदार निवडून देण्याचा अधिकार आहे आणि खासदारांना त्यांचा पंतप्रधान निवडण्याचा अधिकार आहे. मात्र ही व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांचे थेट पंतप्रधान निवडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हळूहळू आपला मेंदू ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालला आहे. असे झाल्यास या देशात न्हावी, कुंभार, लाेहार, आदिवासी, काेळी, भटके कधीच पंतप्रधान हाेणार नाहीत. म्हणजेच तुमचा पंतप्रधान हाेण्याची संधी कायमची गेली. खासदारांची संधी काढून तुम्हाला कायमचे बंदिस्त केले जाईल, असेही आंबेडकरांनी सांगितले. धम्म परिषदेस बाैद्ध भिक्खूंसह आंबेडकरांचे अनुयायी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

चीन, अमेरिकेचे पेमेंट गेट वे बंद करून दाखवा

चीनला पंतप्रधान नरेंद्र माेदी दादा समजतात. तुमची जर ५६ इंच छाती आहे तर चीन व अमेरिकेचे पेमेंट गेट वे बंद करून दाखवा. चीनाबाबत त्यांचे सैन्य पिटाळून लावल्याची खाेटी माहिती दिली जाते. संसदेत आपल्या खासदारांनी त्याबाबतचे प्रश्न विचारल्यास खरा मुद्दा सांगितला जात नाही. प्रत्यक्षात चिनने आपली २५०० चौरस फूट जागा ताब्यात घेतल्याचा गाैप्यस्फाेटही त्यांनी केला. त्यामुळे आता आंबेडकर यांच्या टीकेवर भाजप काय प्रत्युत्तर देते, हे पहावे लागणार आहे.

माेदी, भागवतांना तुरुंगात बघायचे असेल तर सत्ता बदला

पंतप्रधान नरेंद्र माेदी सर्वात माेठे चाेर आहेत. पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन युद्धाची भाषा करणाऱ्या माेहन भागवत यांच्याकडे शस्त्र परवाना आहे का, हे अगाेदर त्यांनी जाहीर करावे. हे दाेघेही आराेपी आहेत. असे मी म्हणत नाही तर न्यायालयाने माेदींच्या वकिलांना सांगितलेले आहे. तुम्हाला जर या दाेघांनाही जेलमध्ये बघायचे असेल तर सत्ता बदलावी लागेल. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीसाठी आत्तापासूनच कामाला लागा, असे आवाहन आंबेडकर यांनी केलेे. दरम्यान या धम्म परिषदेला राज्यभरातून कार्यकर्ते आणि वंचितचे कार्यकर्ते आले होते. या वेळी त्यांच्या हातातमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर आणि पोस्टर्स पहायला मिळाले. उपस्थित घोषणाबाजीही करत होते.