Home Blog Page 1483

विभागीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये पुण्याची उत्कृष्ट कामगिरी

पुण्याच्या सिद्धी जगदाळेला जिल्हास्पर्धेत सुवर्ण तर विभागात रौप्यपदक

पुणे- नुकत्याच अहमदनगर येथे झालेल्या दक्षिण विभागीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये पुण्यातील लोहगावमधील विखे पाटील मेमोरियल स्कूलच्या प्राची चॅटर्जी हिला सुवर्णपदक मिळाले तर पोतदार इंटरनॅशनल स्कुलची विद्यार्थिनी सिद्धी जगदाळे हिला रौप्य पदक मिळाले असून त्याआधी दौण्ड येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत सिद्धीला धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले होते. १७ वर्ष वयोगटातील दोघी विजेत्या आहेत.

देशभरातून या स्पर्धेसाठी सीबीएसई शाळांमधील ३०० स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात केरळ, नागपूर, पुणे, नाशिक, सातारा, गोवा, अहमदनगर, दिल्ली, जळगाव येथील विद्यार्थ्यांचा समावेश होता. १४, १७ आणि १९ वयोगटात या स्पर्धा घेण्यात आल्या.

प्रशिक्षक रणजित चांबले यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धीचा धनुर्विद्येचा सराव सुरु आहे. सिद्धीने धनुर्विद्येमध्ये मिळविलेले प्रावीण्य वाखाण्याजोगे आहे. यापुढे तिला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायचे आहे. खेळावर सातत्यपूर्ण लक्ष केंद्रित करून दिवसागणिक सराव वाढविण्यावर तिचा भर असल्याचे ती सांगते.

आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतली कोविड टास्क फोर्सची बैठक

पुणे, दि. २८: परदेशात वाढणारी कोविड-१९ रुग्णांची संख्या लक्षात घेता या साथरोगाला प्रतिबंध करण्यासाठी तसेच यातून निर्माण होऊ शकणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

कोविड-१९ बाबत जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय कोविड टास्कफोर्स समितीची बैठक दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आली. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अंकित गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते.

सद्यस्थितीत चीन, अमेरिका, ब्राझील, इंडोनेशिया आदी देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात व पुणे जिल्ह्यातही खबरदारी म्हणून प्रतिबंधक उपाययोजनांना गती देण्यासाठी आणि यंत्रणांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात यावी. ऑक्सिजन प्रकल्प, लिक्विड ऑक्सिजन स्टोरेज टँक, मेडिकल ऑक्सिजन पाईपलाईन आदी आवश्यक साहित्य सामुग्रीच्या प्रात्यक्षिकात त्रूटी आढळल्या असल्यास त्या तातडीने दूर करण्यात याव्यात. कोविड-१९ च्या संभाव्य स्थितीचा नियोजनबद्धरित्या सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. जास्तीतजास्त पात्र नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी लसीकरण बुथची संख्या वाढविण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बैठकीत दिले.

डॉ. पवार यांनी यावेळी माहिती दिली, सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात कोविडचे ५० रुग्ण असून दैनंदिन सरासरी ११ रुग्ण बरे होत आहेत. कोविड प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यात येत असून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १ कोटी ९३ लाख ४५ हजार ४७० कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये ९९ लाख ५ हजार ४१८ पहिली मात्रा, ८४ लाख ५९ हजार ८३४ दुसरी मात्रा तर ९ लाख ८० हजार २१८ वर्धक मात्रा देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावर सर्व लाभार्थीसाठी कोविड लसीकरणाची सोय केलेली आहे, असेही ते म्हणाले.

कोविड उपाययोजनांतर्गत जिल्ह्यात ११४ पीएसए ऑक्सिजन प्रकल्प तर १०९ लिक्विड ऑक्सिजन स्टोरेज टँक उपलब्ध असून या दोन्हींची मिळून एकूण क्षमता १ हजार २१० मेट्रीक टन आहे. जिल्ह्यामध्ये सुस्थितीतील १ हजार १९६ व्हेंटीलेटर्स तसेच १ हजार ९७ ऑक्सिजन कॉन्सन्स्ट्रेटर्स उपलब्ध आहेत. जिल्ह्यात एकूण ५ हजार ४०१ विलगीकरण बेड, ५ हजार ९६४ ऑक्सिजन बेड, १ हजार २९३ आयसीयु बेड उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

अटकवून ठेवलेली वाहने नेण्याबाबत आवाहन

पुणे दि.२८-पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील अन्य गुन्ह्यांतर्गत कार्यालयाच्या आवारात अटकवून ठेवलेली वाहने मोटार वाहन कर व दंड भरून पुढील ७ दिवसांत सोडवून नेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातील अशी वाहने मालक/चालक यांच्या जबाबदारीवर अटकावून ठेवलेली आहेत. ही वाहने सोडवून नेण्यासाठी वाहन मालकांनी या कार्यालयात वाहन कर, दंड भरलेला नाही अथवा वाहने नेण्यासाठी संपर्क केलेला नाही.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन थकीत कराच्या वसुलीसाठी अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रियादेखील सुरु केलेली आहे. त्यापैकीच १८ वाहनांच्या मालकांना कार्यालयाने नोटीस पाठविल्या होत्या. परंतू वाहन मालक नोंदणीकृत पत्त्यावर आढळून न आल्याने अशा नोटीस वाहन मालकांना पोच झालेल्या नाहीत. अशा वाहनांची यादी या कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केलेली आहे.

मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार वाहन मालकांनी नोंदणी प्रमाणपत्रावर पत्ता बदलाची नोंद पत्ता बदल झाल्यास ७ दिवसात करावयाची आहे. परंतू वाहन मालकांनी पत्ता बदल न केल्याने वाहन मालकाचे अद्ययावत पत्त्यावर पत्रव्यवहार करणे शक्य होत नाही व वाहन मालकासोबत संपर्क होऊ शकत नाही.

वाहन मालकांनी आपली वाहने मोटार वाहन कर व दंड भरून पुढील ७ दिवसांत सोडवुन न्यावीत, अन्यथा अशी वाहने बेवारस वाहने आहेत समजुन सक्षम प्राधिकारी यांच्या परवानगीने अशा वाहनांचा जाहीर ई लिलाव करण्यात येईल असेही पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.

ऑनलाईन लॉटरीच्या दुष्परिणामांविषयी नागरिकांमध्ये जाणीव जागृती करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर, दि. 28 : “ऑनलाईन लॉटरीच्या दुष्परिणामांविषयी नागरिकांमध्ये जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी व्यापक स्तरावर मोहीम राबविण्यात येईल. अवैध ऑनलाईन लॉटरीच्या प्रतिबंधासाठी कायद्यात सुधारणा करून त्यांना कायद्याच्या परिप्रेक्ष्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभेत सदस्य महेश लांडे यांनी लक्षवेधीद्वारे याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. त्यांनी सांगितले, की राज्यात उपसंचालक लॉटरी, नवी मुंबई यांच्यामार्फत पेपर लॉटरी चालविण्यात येते. महाराष्ट्रात ऑनलाईन पद्धतीची लॉटरी चालविण्यात येत नाही. महाराष्ट्र पोलिस दलातर्फे बेकायदेशीर ऑनलाइन लॉटरी सुरू असलेल्या आस्थापना व व्यक्तींविरुद्ध भारतीय दंडसंहिता, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा व लॉटरी रेग्युलेशन कायद्यानुसार दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येते.

शासनाच्या महसूलात वाढीसाठी व बेकायदेशीर चालू असलेल्या ऑनलाईन लॉटरीवर आळा घालण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांकडून वेळोवेळी कायदेशीर कारवाई करण्यात येते. तसेच गुन्हे शाखेतील गुन्हे कक्षाकडून व समाजसेवा शाखेकडूनदेखील छापे मारुन कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात स्टील, ॲपेक्स, प्लॅटिनम या कंपन्यांविरुद्ध ऑनलाईन लॉटरीबाबत तक्रार नसल्याने गुन्हा दाखल नाही.

महाराष्ट्रात सन २०२० ते २०२२ पर्यंत एकूण २६७ गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण १०० आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात १३४ गुन्हे दाखल करण्यात आले असून ५५६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ऑनलाईन लॉटरीसाठी वापरण्यात येणारी माध्यमे व संगणकीय प्रणालीचा अभ्यास करून त्याबाबतीत पाठपुरावा करण्यात येत आहे. नागरिकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी सायबर पोलिस ठाणे विभाग, जिल्हा पोलिस व पोलिस आयुक्तालयातर्फे विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. मुंबईतील चांदिवली, साकिनाका व पवई या भागात सन २०२० ते २०२२ पर्यंत अनधिकृत ऑनलाईन लॉटरीसंदर्भात दोन गुन्हे दाखल करण्यात असून १० आरोपींना अटक करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री रईस शेख, राहुल आहेर आदींनी सहभाग घेतला.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशन ३० डिसेंबरपर्यंत

0

नागपूर, दि. २८ : नागपूर येथे सुरु असलेले हिवाळी अधिवेशन येत्या ३० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. याबाबत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

गुरुवार दि.२९ डिसेंबर रोजी शासकीय कामकाज आणि शुक्रवार दि. ३० डिसेंबर रोजी शासकीय कामकाज व अशासकीय कामकाज केले जाईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सभागृहात सांगितले.

अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याचा प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाकडे पाठविणार –मंत्री दीपक केसरकर यांची विधानपरिषदेत माहिती

नागपूर, दि. 28 : अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’  करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिल्ह्याची माहिती आल्यानंतर  केंद्र शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.

अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न सदस्य गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता. प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री केसरकर बोलत होते.

मंत्री श्री केसरकर यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अहमदनगर नामांतरसाठी विभागीय आयुक्त नाशिक आणि जिल्हाधिकारी अहमदनगर यांना परिपूर्ण प्रस्ताव, माहिती पाठविण्यास कळविले आहे. शिवाय अहमदनगर महापालिका, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पोस्ट कार्यालय, तहसीलदार यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत कळविण्यात आले आहे.

सर्व परिपूर्ण माहिती आल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही श्री. केसरकर यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रा. राम शिंदे, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.

0000

बजरंग दलाच्या वतीने आयोजित रक्तदान महायज्ञात ९९७ पिशव्यांचे संकलन

विश्व हिंदू परिषद बजरंग दल सिंहगड भागाच्यावतीने आयोजन : हुतात्मा जवान व हुतात्मा कारसेवक कोठारी बंधू यांच्या स्मरणार्थ रक्तदान
पुणे : विश्व हिंदू परिषद बजरंग दल सिंहगड भागाच्यावतीने शौर्य दिन आणि विजय दिनानिमित्त हुतात्मा जवान व हुतात्मा कारसेवक कोठारी बंधू यांच्या स्मरणार्थ रक्तदान महायज्ञ आयोजित करण्यात आला होता. रक्तदान महायज्ञात ९९७ रक्तपिशव्यांचे संकलन झाले. १२ ठिकाणी एकाच वेळी ही रक्तदान शिबिरे घेण्यात आली.

या शिबिरांमध्ये सुमारे शंभरहून अधिक गणेश मंडळे, विविध हाउसिंग सोसायटी, सामाजिक संस्था, महिला बचत गट आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंत फडके, दत्ताजी काळे विश्व हिंदू परिषदेचे संजय मुद्राळे, सतीश गोरडे, किशोर चव्हाण, श्रीकांत चिल्लाळ, मनोहर ओक, प्रदिप वाजे, दिनेश लाड, नितीन महाजन धनंजय गायकवाड, आमदार भीमराव तापकीर यांच्यासह सिंहगड रस्ता परिसरातील लोकप्रतिनिधींनी विविध केंद्रांना भेट दिली.

सिंहगड रस्ता परिसरातील जगताप शाळा हिंगणे खुर्द, आनंद मारुती मंदिर आनंदनगर, कृष्णांगण हाईट्स विठ्ठलवाडी, वांजळे तलाव, सनसिटी सोसायटी, पी. जोग शाळा माणिकबाग, सोबा ऑप्टिमा सोसायटी, भैरवनाथ मंदिर वडगाव बुद्रुक, अभिरुची मॉल, वस्ताद पोकळे शाळा धायरी, भैरवनाथ मंदिर नन्हे, नांदेड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आदी केंद्रांवर शिबिर भरविण्यात आले. या उपक्रमाला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  

शिबिरात मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेल्या महिला हिमोग्लोबिन कमतरतेमुळे रक्तदान करू शकत नसल्याची बाब चिंताजनक असल्याचे मत विहिंप सिंहगड भाग उपाध्यक्षा शुभदा गोडबोले यांनी मांडले तर हिमोग्लोबिन वाढीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य आहार नियोजन पत्रक लवकरच सर्वांपर्यंत पोहोचवू असे मत विहिंप सिंहगड भाग अध्यक्ष शरद जगताप यांनी व्यक्त केले. यावेळी  मोफत दंत चिकित्सा शिबीर घेण्यात आले. कै. किशोरदादा गोसावी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा रक्तदान करंडक सर्वात जास्त रक्तपिशव्या संकलित केल्याबद्दल आनंदनगर केंद्रास देण्यात आला.

विरोधकांनी मोठ्या प्रमाणात जमिनी हडप केल्या- विरोधकांच्या सभात्यागानंतर सत्तारांनी केला आरोप

0

नागपूर :अब्दुल सत्तर यांच्या मंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी करणारे विरोधक आज ‘भ्रष्ट मंत्र्यांवर सरकार कारवाई करत नाही ‘ असा आरोप करून सभात्याग करून बाहेर गेल्यावर अब्दुल सत्तर यांनी ,’ समोर बसलेल्या विरोधकांनीसारख्या जमिनी हडप केल्या नाहीत. विरोधी बाकावर बसलेल्या विरोधकांनी मोठ्या प्रमाणात जमिनी हडप केल्या, असा आरोप विरोधी पक्षावर केला.आणि गायरान जमीन वाटप प्रकरणात उच्च न्यायालय जो निर्णय देईन तो निर्णय मान्य असेल, असे सांगत आपले स्पष्टीकरण देखील विरोधकांच्या अनु प स्थितीतच दिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात जाऊन अवैधरित्या गायरान जमिनीचं वाटप केल्याचा आरोप करुन गेल्या तीन दिवसांपासून शिंदे सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. दररोज सकाळी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधक सत्तारांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करत आहेत. आपल्यावर झालेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी सत्तारांनी करेक्ट टायमिंग साधत विरोधकांचा सभात्याग होताच भावुक होऊन आपल्यावरील झालेल्या सगळ्या आरोपांचं खंडन करत माझ्या आदेशामुळे शासनाचे कुठलेही नुकसान झाले नाही. उच्च न्यायालय जो निर्णय देईन तो निर्णय मान्य असेल, असं सांगितलं.वाशीम जिल्ह्यातील १५० कोटी रुपये किमतीची गायरान जमीन एका खासगी व्यक्तीला बेकायदा बहाल केल्याचा आरोप करत, महसूल राज्यमंत्री असताना अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विधानसभेचे कामकाज विरोधकांनी रोखून धरलं होतं. मात्र मंगळवारी विरोधकांनी या मुद्द्यावर आश्चर्यकारकरित्या मौन पाळले. मंगळवारी विरोधकांनी सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अवाक्षरही न उच्चारल्याने आश्चर्य व्यक्त झालं. आजही विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात तू तू मैं मैं रंगल्याचं पाहायला मिळालं. सरकार भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घातल असल्याचे सांगत विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला. तेच टायमिंग साधून सत्तार आपल्यावर झालेल्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी विधानसभेत उभे राहिले.गाव नमुन्यात काहीही बदल झाला नाही. माझ्या आदेशामुळे शासनाचे कुठलेही नुकसान झाले नाही. उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य असेल, असं सांगतानाच माझ्यावर झालेल्या आरोपात काही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत दिले. मी एका मागासवर्गीयाला न्याय दिला, मी काहीही चुकीचे केले नाही, असं ते म्हणाले .

 ‘द इको फॅक्टरी फाऊंडेशन’ संस्थेतर्फे शाश्वत जीवनशैलीच्या प्रसारासाठी ७५,०००+ भारतीय वंशाच्या जातींच्या रोपांचे दान

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्त सुरू केलेला उपक्रम पूर्ण

पुणे पुणेस्थित द इको फॅक्टरी फाऊंडेशन (टीईएफएफ) या विना-नफा स्वयंसेवी संस्थेची स्थापना आनंद चोरडिया यांनी वर्ष २०१६ मध्ये केली. ही संस्था ग्रामीण, शहरी व औद्योगिक क्षेत्रात शाश्वतता प्राप्त करण्यासाठी अथक कार्यरत आहे. भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७५वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी आनंद चोरडिया यांनी ७५,०००+ भारतीय वंशाच्या जातींची रोपे / झाडे दान करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार टीईएफएफ संस्थेने गेल्या वर्षापासून भारतीय देशी झाडांच्या ३७ जातींची ७५,००० रोपे आदिवासी महिलांकडून बनवून घेऊन, वाढवून ती कंपन्या, शाळा/महाविद्यालये आणि जबाबदार नागरिकांच्या गटाला दान केली आहेत. ह्या उपक्रमामुळे आदिवासी महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. जैववैविध्य जतन करणे व पडीक जमीन सुपीक करणे या उद्देशाने गेल्या १५ ऑगस्टला सुरू झालेला हा उपक्रम नुकताच पूर्ण झाला.

यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना आनंद चोरडिया म्हणाले, “ आपल्या राष्ट्राचे आरोग्य मातीच्या आरोग्यात सामावलेले आहे आणि जोडीलाच कचऱ्यातून संपत्ती व कचऱ्यातून आरोग्य या संकल्पनेवर माझा दृढ विश्वास आहे. त्यामुळे आपण या दिशेने प्रयत्न केले आणि प्रत्येकाला शाश्वत जगण्यासाठी सक्षम बनवले तर देशाला स्वच्छ, हरित, आरोग्यपूर्ण आणि संपन्न बनवू शकतो. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त आम्ही आमचा वाटा उचलला ही भावना खूप सुखद आहे. मी आनंदी आणि समाधानी असून यापुढेही खूप काही काम करण्याची अपेक्षा बाळगून आहे.”

या उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना श्री. चोरडिया म्हणाले, की विविध प्रकल्प संघटितरीत्या राबवण्यासाठी आम्ही आमची कार्यपद्धती चार ‘एस’मध्ये विभागली आहे. हे चार ‘एस’ म्हणजे सेवा, सेतू, सत्त्व आणि संवर्धन. यातून शाश्वत जीवनशैली आणि प्रथा अंगिकारण्याचा आमचा हेतू आहे.” फाऊंडेशनने विविध ठिकाणे, संस्था व खासगी शेतांमध्ये रोपांचे वितरण हाती घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रत्येक व्यक्तीत आरोग्यपूर्ण जीवनशैली रुजवण्यासाठी प्रत्येकाला शाश्वत जीवन सक्षमीकरणाचा प्रवर्तक बनवणे आणि समाज, पृथ्वी व संपन्नता यासाठीच्या पारंपरिक पण अभिनव पद्धतींची जोपासना करणे, हे श्री. चोरडिया यांचे उद्दिष्ट आहे. धरतीला हिरवीगार बनवणे, जैवविविधतेत सुधारणा व संवर्धन आणि भारतीय देशी वृक्षांचे संवर्धन यासाठी आम्ही अथक काम करत आहोत, असेही त्यांनी बोलून दाखवले.

‘द इको फॅक्टरी फाऊंडेशन’ने ग्रामीण, शहरी, औद्योगिक व वैयक्तिक शाश्वतता या चार मूलभूत क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी मोहिम सुरू केली आहे. त्याचे उद्देश पुढीलप्रमाणे –  

अ) नागरी व औद्योगिक क्षेत्रांत बहुशाखीय मार्गाने जीवनाच्या शाश्वत पद्धतीचा प्रसार करणे.

ब) भारतातील पहिल्या  कचरा  व्यवस्थापन  वाटिकेच्या  पर्यावरण  उद्योजकतेला  मदत व प्रसार करणे

क) शाश्वत  भारत  कृषी  रथाच्या  माध्यमातून  ग्रामीण  पातळीवर  व्यवसाय  संधी  निर्माण  करणे 

ड) शून्य हरितगृह वायू उत्सर्जनाचे (नेट झिरो) लक्ष्य गाठणे.

विरोधकांच्या सभात्यागानंतर विधानसभेत चर्चेशिवाय महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर

0

नागपूर-

नागपूरमधील महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या अनुपस्थित चर्चेशिवाय महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आलं. विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरील घोटाळ्याच्या आरोपावरून सभात्याग केला. त्यानंतर हे विधेयक मंजूर करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या विधेयकावर सरकारची बाजू मांडली.त्यानंतर सभागृहात आलेल्या शिवसेनेच्या भास्कर जाधव यांना बोलण्याची अनुमती अध्यक्षांनी नाकारली .

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक २०२२ विचारात घ्यावे का? असा विचारलं. यानंतर विरोधकांच्या गैरहजेरीत सभागृहात उपस्थित असलेल्या सत्ताधाऱ्यांनी त्यावर हो असं उत्तर दिलं. त्यामुळे विधेयक विचारार्थ घेण्यात आलं. त्यानंतर हे विधेयक खंडनिहाय विचारात घेण्यात आलं.

मुंबई केंद्रशासित करा म्हणणाऱ्या कर्नाटकच्या मंत्र्याला फडणवीस म्हणाले “कोणाच्या बापाची…”

नागपूर-कर्नाटकच्या कायदामंत्र्यांनी मुंबई केंद्रशासित करावी अशी मागणी तेथील विधानपरिषदेत केली आहे. तसंच मुंबईत २० टक्के कन्नडभाषिक राहतात असा जावईशोध लावला असल्याची माहिती अजित पवार यांनी विधानसभेत दिली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महाराष्ट्राची असून, कोणाच्याही बापाची नसल्याचं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.

“विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेला विषय महत्त्वाचा आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत दोन्ही राज्यांनी नव्याने दावे केले जाणार नाहीत हे मान्य केलं होतं. आपणही काल ठराव करताना सर्वोच्च न्यायालयात जो दावा आहे, त्यानुसारच ठराव केला आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मंत्र्यांनी किंवा आमदार तसंच काँग्रेस अध्यक्षांनी केलेले दावे त्या बैठकीशी विसंगत आहेत. ते पूर्णपणे चुकीचे आहेत,”

“मुंबईवर दावा सांगणं खपवून घेतलं जाणार नाही. त्याबद्दल आम्ही निषेध करतो. विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे तशा प्रकारचं निषेधाचं पत्र आम्ही त्यांना पाठवू. गृहमंत्र्यांसमोर जे ठरलं आहे त्याचं उल्लंघन करणं दोन राज्यांमधील संबंधांसाठी योग्य नाही. हे त्यांना अतिशय कडक शब्दांत सांगण्यात येईल. तसंच तुमच्यासमोर जे ठरलं होतं त्याचं कर्नाटक पालन करत नसल्याचं गृहमंत्र्यांच्याही निदर्शनास आणून दिलं जाईल,” असं फडणवीस म्हणाले.

“केंद्रीय गृहमंत्र्यांनीही कर्नाटकच्या अशा बोलघेवड्या लोकांना तंबी दिली पाहिजे अशी विनंतीही करण्यात येईल. मी पुन्हा सांगतो की, मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही. त्यावरचा कोणाचाही दावा खपवून घेतला जाणार नाही,” असं फडणवीसांनी ठणकावून सांगितलं. सरकार नव्हे तर सभागृह म्हणून निषेध असून या सभागृहाच्या भावना कर्नाटक सरकार, केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या जातील अशी माहितीही त्यांनी दिली.

कात्रज दरी पुल ते वारजे दरम्यान महामार्गावर सेवा रस्ते तयार करण्याचे महापालिकेला आदेश देऊ – मंत्री शंभूराज देसाई

0

नागपूर, दि. २७ : “पुणे शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ च्या शहरालगतच्या मार्गावर पुणे महापालिकेच्या ताब्यात असणाऱ्या जागेवर सेवा रस्ते तयार करण्यासंदर्भात महापालिकेला सूचना दिल्या जातील”, अशी माहिती परिवहन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य भीमराव तापकीर यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

त्याला उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते. ते म्हणाले की, दरीपूल ते सिंहगड रोड पर्यंत डाव्या बाजूचा सेवा रस्ता बांधण्यात आलेला आहे. उजव्या बाजूस सिंहगड रोड ते इंद्रयणी शाळेपर्यंत सेवा रस्ता असून नऱ्हे स्मशानभूमीजवळ महामार्गाच्या बाजूने समांतर नाला असल्यामुळे महामार्गाच्या हद्दीत सेवा रस्ता होऊ शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी नाल्याच्या बाजूने सुमारे तीन मीटर रुंदीची भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची जागा आणि उर्वरित पुणे महानगर पालिकेच्या हद्दीतील महाराष्ट्र प्रांतिक अधिनियम १९४९ चे कलम २०५ नुसार आखावयाचा नियोजित ६ मीटर रूंदीचा रस्ता असे दोन्ही मिळून एक मीटर रुंदीच्या सेवा रस्त्याचे काम महानगरपालिकेमार्फत करण्याचे नियोजित केलेले आहे. या कामासाठी पथ विभागामार्फत रु. ४.१८ कोटी रकमेची निविदा मागविण्यात आली असून ती मान्यतेच्या प्रक्रियेत आहे. या मान्यतेनंतर राष्ट्रीय मार्ग रस्त्यालगत इंद्रायणी इंटरनॅशनल स्कूल ते नऱ्हे स्मशानभूमी दरम्यान नऊ मीटर रुंदीच्या सेवा रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यापुढील नऱ्हे स्मशानभूमी ते भूमकर चौक व नवले पुल ते कात्रज दरम्यानच्या भागातील सेवा रस्ते भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत करण्याचे नियोजन असल्याची माहिती मंत्री श्री. देसाई यांनी दिली. पुणे महानगर पालिकेच्या हद्दीमध्ये ६० मीटर रुंदीचा राष्ट्रीय महामार्ग सोडून त्याच्या लगत मंजूर विकास आराखड्यामध्ये दोन्ही बाजूस प्रत्येकी १२ मीटर रुंदीचे डी.पी. रस्ते वारजे ते वडगाव बु. ते आंबेगाव या भागापर्यंत दर्शविण्यात आलेले आहे. पुणे महानगर पालिकेच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्ग लगतचे १२ मीटर रूंदीचे डी. पी. रस्ते संपूर्णतः विकसित झालेले नाही. तथापि, वारजे भागामध्ये ज्या ठिकाणी चटई क्षेत्र मोबदल्यामध्ये रस्त्याची जागा पुणे महानगर पालिकेच्या ताब्यात आलेली आहे,  त्या ठिकाणी १२ मीटर रुंदीच्या राष्ट्रीय महामार्गा लगतचे सुमारे ३.५ कि.मी. लांबीच्या डी. पी. रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे वडगाव बु. मध्ये सुमारे १ कि.मी. लांबीचे १२ मीटर रूंदीच्या डी. पी. रस्त्याचे काम करण्यात आलेले आहे. आंबेगाव बु. या भागामध्ये १२ मीटर डी.पी. रस्त्याची जागा पुणे महानगर पालिकेच्या ताब्यात आली नसल्याने तेथे रस्ता विकसनाचे काम अद्याप झालेले नाही. मात्र या भागामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या ६० मीटर रूंदी अंतर्गत स्वंतत्र सेवा रस्त्याचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत सुरू असल्याची माहिती मंत्री श्री. देसाई यांनी दिली.  या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सदस्य राहुल कुल यांनी सहभाग घेतला. 

शरद पवार यांची विठ्ठलाशी तुलना योग्य आहे का; देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

नागपूर -खासदार संजय राऊत यांच्या आईला जिजाऊंची उपमा दिली जाते. तर शरद पवारांना विठ्ठलाची उपमा दिली जाते. ही तुलना योग्य आहे का? महापुरुष आणि विठ्ठलाची तुलना होऊ शकते का?, परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक ही तुलना करतात, परंतु खरेच अशी तुलना होऊ शकते का? हा संत, देवांचा अपमान नाही का? असा सवाल विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. यावेळी सत्ताधारी व विरोधकांत भाषण सुरू असताना मोठा गदारोळ झाला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेनेच्या नेत्या म्हणाल्या की, संजय राऊतांच्या आई म्हणजे जिजाऊंचे रूप आहे. त्यांनी शिवबांसारखा हिरा जन्माला घातला. आपण कुणाची तुलना करतोय. सर्वच माता महान असतात. पण ही तुलना होऊ शकते का, असा सवाल त्यांनी केला.

आमदार अमोल मिटकरी चांगल्या हेतूने बोलले असतील, पण ते म्हणाले की, शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत. शरद पवार मोठे नेते आहेत, पण विठ्ठलाची कुणाशीच तुलना होऊ शकत नाही. रेड्याला शिकवण्याचे सामर्थ्य आहे म्हणून संतांचा चमत्कार म्हणता, तर सामान्य माणसांना का शिकवले नाही, असे म्हणत नामदेव महाराजांचा अपमान करीत कुत्र्याला दूध देतात, पण माणसांना देत नाही, असे वक्तव्य आले त्याचा निषेध आपण केला का तर नाही.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, वारकरी संप्रदायांनी जातविरहीत वारकरी समाज उभा केला. त्यात संत चोखोबा आणि ज्ञानेश्वर माऊलीही आहेत, पण त्यांच्या जाती कुणी विचारत नाहीत. कारण ते विचार समाजापर्यंत पोहचवतात. जगद्गुरू तुकोबांची गाथा ज्यांनी वाचवली ते संताजी महाराज जगनाडे हे तुकाराम महाराजांच्या समाजाचे नाहीत परंतु, आज त्यांनाही समाजात विभाजित केले जाते. त्याबद्दल कुणीही काहीच बोलत नाही.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल कलाल यांनी शिवरायांच्या चेहऱ्यावर आदित्य ठाकरेंचा फोटो लावून रयतेचा राजा शिवबा माझा असे ग्राफिक्स तयार केले व हॅंडलवर ट्विट केले. अनिल गोटे काय म्हणतात महाराण्या पायलीच्या पन्नास आहेत, राजमाता ऊसाच्या मळ्यात फुटाफुटावर आहेत हे अनिल गोटे म्हणतात. माऊलींबद्दल बोलले जात असेल तर कुणाचा अपमान आहे?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंबद्दल लालूप्रसाद यादव काय म्हणाले होते? त्यांचे खानदान घुसपैठी आहेत. महाराष्ट्र मे घुसखोरी करके आये है. अनिल परबांकडून एकच अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. आपण जे उदाहरणे दिली त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उदाहरण दिले नाही.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणतात आणि त्यांच्या गळ्यात गळे घालून स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे काहीच बोलत नाहीत. सावरकरांना भारतरत्न मिळाला नाही तरी चालेल किमान त्यांचा अपमान थांबावा. वीरेंद्र जगताप यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानावर आपली नाराजी प्रगट केली. कृष्ण आणि भगवान राम यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्यावर ‘मविआ’चे लोक काहीच बोलत नाहीत. गप्प बसतात. छत्रपतींच्या जन्मस्थानाबद्दल बोलले तर चूक आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाबद्दल जर चुकीचे वक्तव्य आले, तर त्यावर काहीच बोलले जात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

सहकारी संस्थांना वैधानिक लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याचे आवाहन

0

पुणे, दि. २७: जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांनी २०२१-२२ या वर्षाचे लेखापरीक्षण करुन वैधानिक लेखापरीक्षण अहवाल उप किंवा सहाय्यक निबंधक कार्यालयास तात्काळ सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व सहकारी संस्थांनी त्यांचे ३१ मार्च २०२२ अखेरचे वैधानिक लेखापरीक्षण ३१ ऑक्टोबर २०२२ अखेर पूर्ण करणे महाराष्ट्र संस्था अधिनियम १९६० नुसार बंधनकारक होते. तसेच सदर वैधानिक लेखापरीक्षण अहवाल ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत संबंधित उप किंवा सहाय्यक निबंधक कार्यालयास सादर करणे बंधनकारक होते.

विहित कालमर्यादेत वैधानिक लेखापरीक्षण अहवाल सादर न करणाऱ्या सहकारी संस्थांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० नुसार वैधानिक व दंडात्मक स्वरुपाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहकारी संस्थाचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक डी. एन. काळे यांनी दिली आहे.
0000

जयस्तंभ अभिवादन सोहळा सर्वांनी मिळून यशस्वी करावा-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे, दि. २७: पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२३ रोजी आयोजित जयस्तंभ अभिवादन सोहळा शासनाच्या सर्व यंत्रणांनी मिळून यशस्वी करावा; कार्यक्रमासाठीची पूर्वतयारी वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे आदी उपस्थित होते.

डॉ.देशमुख म्हणाले, कार्यक्रमादरम्यान स्वच्छतेची चांगली सुविधा राहील याकडे विशेष लक्ष द्यावे, त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करावे. आरोग्य विभागाने मास्क वाटपाची सुविधा करावी. शौचालयांची नियमित स्वच्छता होईल आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता राहील याकडे विशेष लक्ष द्यावे. कार्यक्रमाच्या दिवशी सर्व संबंधित यंत्रणांनी नियंत्रण कक्षाच्या संपर्कात रहावे, असे त्यांनी सांगितले.

अभिवादन सोहळ्यासाठी १ हजार ५०० शौचालयांची व्यवस्था करण्यात आली असून १५० अतिरिक्त कर्मचारी स्वच्छतेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी कचराकुंडी ठेवण्यात येणार आहे. २१ आरोग्य पथकात २४० कर्मचारी, ४१ रुग्णवाहिका, बाईक ॲम्ब्युलन्स, ३८ घंटागाडी, १० अग्निशमन वाहन, १७५ कचारकुंड्यांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.