विश्व हिंदू परिषद बजरंग दल सिंहगड भागाच्यावतीने आयोजन : हुतात्मा जवान व हुतात्मा कारसेवक कोठारी बंधू यांच्या स्मरणार्थ रक्तदान
पुणे : विश्व हिंदू परिषद बजरंग दल सिंहगड भागाच्यावतीने शौर्य दिन आणि विजय दिनानिमित्त हुतात्मा जवान व हुतात्मा कारसेवक कोठारी बंधू यांच्या स्मरणार्थ रक्तदान महायज्ञ आयोजित करण्यात आला होता. रक्तदान महायज्ञात ९९७ रक्तपिशव्यांचे संकलन झाले. १२ ठिकाणी एकाच वेळी ही रक्तदान शिबिरे घेण्यात आली.
या शिबिरांमध्ये सुमारे शंभरहून अधिक गणेश मंडळे, विविध हाउसिंग सोसायटी, सामाजिक संस्था, महिला बचत गट आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंत फडके, दत्ताजी काळे विश्व हिंदू परिषदेचे संजय मुद्राळे, सतीश गोरडे, किशोर चव्हाण, श्रीकांत चिल्लाळ, मनोहर ओक, प्रदिप वाजे, दिनेश लाड, नितीन महाजन धनंजय गायकवाड, आमदार भीमराव तापकीर यांच्यासह सिंहगड रस्ता परिसरातील लोकप्रतिनिधींनी विविध केंद्रांना भेट दिली.
सिंहगड रस्ता परिसरातील जगताप शाळा हिंगणे खुर्द, आनंद मारुती मंदिर आनंदनगर, कृष्णांगण हाईट्स विठ्ठलवाडी, वांजळे तलाव, सनसिटी सोसायटी, पी. जोग शाळा माणिकबाग, सोबा ऑप्टिमा सोसायटी, भैरवनाथ मंदिर वडगाव बुद्रुक, अभिरुची मॉल, वस्ताद पोकळे शाळा धायरी, भैरवनाथ मंदिर नन्हे, नांदेड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आदी केंद्रांवर शिबिर भरविण्यात आले. या उपक्रमाला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिबिरात मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेल्या महिला हिमोग्लोबिन कमतरतेमुळे रक्तदान करू शकत नसल्याची बाब चिंताजनक असल्याचे मत विहिंप सिंहगड भाग उपाध्यक्षा शुभदा गोडबोले यांनी मांडले तर हिमोग्लोबिन वाढीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य आहार नियोजन पत्रक लवकरच सर्वांपर्यंत पोहोचवू असे मत विहिंप सिंहगड भाग अध्यक्ष शरद जगताप यांनी व्यक्त केले. यावेळी मोफत दंत चिकित्सा शिबीर घेण्यात आले. कै. किशोरदादा गोसावी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा रक्तदान करंडक सर्वात जास्त रक्तपिशव्या संकलित केल्याबद्दल आनंदनगर केंद्रास देण्यात आला.