Home Blog Page 1481

शारिरीक, मानसिक स्वास्थ्यासाठी खेळ महत्वाचे -उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे

0

मुंबई दि. ३०: शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खेळ अतिशय महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी डॉ. कल्याण पांढरे यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या जनजागृतीसाठी क्रीडा ज्योत रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीचा शुभारंभ गेट वे ऑफ इंडिया येथून श्री. पांढरे यांच्या हस्ते झाला. क्रीडा ज्योत रॅली बृहन्मुंबई महापालिकेनजीकच्या सेल्फी पॉइंट पर्यंत काढण्यात आली.

गेट वे ऑफ इंडिया येथे क्रीडा क्षेत्रातील महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार प्राप्त उदय देशपांडे, मेजर ध्यानचंद पुरस्कार विजेते प्रदीप गंधे, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे उपाध्यक्ष संजय शेटे, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे सचिव गोविंद मथ्युकुमार, जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण आदींची उपस्थिती होती.

श्री. पांढरे म्हणाले की, प्रत्येकाने कुठलातरी खेळ खेळला पाहिजे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खेळ खेळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या स्पर्धांमध्ये खेळाडूंनी जास्तीत जास्त सहभागी होऊन यश संपादन करावे. जेणेकरून मुंबईचा लौकिक वाढेल.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना २ जानेवारी २०२३ पासून शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथून प्रारंभ होणार आहे. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद व जळगाव येथे ३९ क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. मुंबई शहरात ४ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीत इंडियन जिमखाना, डॉन बास्को स्कूल किंग्ज सर्कल, माटुंगा येथे बास्केटबॉल स्पर्धा होईल. दि.१० ते १४ जानेवारी या कालावधीत गिरगांव चौपाटी येथे याटिंग क्रीडास्पर्धा होईल, अशी माहिती श्री. चव्हाण यांनी दिली.

रॅलीमध्ये मुंबई शहर जिल्ह्यातील क्रीडा पुरस्कारप्राप्त नामांकित खेळाडू, जिन्मॅस्टिक, तायक्वांदो, सॉफ्ट टेनिस, मल्लखांब, फेन्सिंग, बॉक्सिंग, थ्रो बॉल, शूटिंग, किक बॉक्सिंग क्रीडा प्रकारातील खेळाडू, एनसीसी कॅडेटस्, क्रीडा अधिकारी, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.

राष्ट्रभक्ती कोणत्याही धर्माशी निगडीत नाही-अ‍ॅड. नंदू फडके

 पाचवे राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन
कवयित्री कै. सौ.उर्मिलाताई कराड यांच्या नावाने दिला जाणार प्रथम जीवनगौरव पुरस्कार केदार टाकळकर यांना

पुणे, दि. ३० डिसेंबर : “ राष्ट्रभक्ती हा शब्द कोणत्याही धर्मांशी निगडीत नाही. राष्ट्र धर्म हे एक आचरण पद्धत असून प्रत्येक व्यक्तीने ते आपल्या आचरणातून दाखविणे गरजेचे आहे. तसेच राष्ट्र शक्ती सांभाळण्यासाठी सर्वांनी स्वतःचे आरोग्य सांभाळावे.”असे विचार भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थाचे अध्यक्ष अ‍ॅड. नंदू उर्फ सदानंद फडके यांनी व्यक्त केले.कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे, मराठी भाषा संवर्धन समिती आणि चॅम्पियन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी साहित्याचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान या विषयावर पाचवे राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन २०२२ चे आयोजन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सभागृह, पुणे येथे करण्यात आले. त्यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
यावेळी अखिल भारतीय साहित्य परिषद, पुणे शाखेचे श्याम भुर्के, चॅम्पियन अकॅडमीचे  राजकुमारसिंह सोळंकी, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त अ‍ॅड. नंदिनी शहासने, पुणे मनपाचे सह. महा आयुक्त व मराठी भाषा संवर्धन समितीचे सचिव शिवाजी दौंडकर, ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. माधव पोतदार, मंजिरी शहासने आणि देशभक्तकोषकार चंद्रकांत शहासने उपस्थित होते.  
याप्रसंगी साहित्य,शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे केदार टाकळकर यांना कवयित्री कै. सौ.उर्मिलाताई कराड जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने प्रकाशित पर्यावरण व राष्ट्रभक्ती या विषयावरील १८ पुस्तके व स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
अ‍ॅड. नंदू उर्फ सदानंद फडके म्हणाले,“ व्यक्तीचे अंतिम उद्देश राष्ट्र भक्ती असावी. त्यासाठी जे जे साहित्य त्यासाठी लागेल त्यालाच खरी देशभक्ती असे म्हणू शकतो. साहित्य या शब्दाचा विचार संहिता आणि ऋग्वेदात सुद्धा संहिता असा अर्थ बोध होतो. परंतू संहिता याचा अर्थ संविधान असा होतो तो केवळ साहित्यापुर्ता मर्यादित न ठेवता राष्ट्रभक्ती पर्यंत ठेवावा. ”
राजकुमार सिंह सोळंकी म्हणाले,“ राष्ट्र निर्मितीसाठी व देशसेवेसाठी सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्तीचे बीज रूजविणे गरजेचे आहे. या देशाला अशा शास्त्रज्ञांची गरज आहे ज्यांच्यामध्ये देशभक्ती असेल. त्यांना पाहून येणारी पिढी ही आपला अभ्यास सांभाळून देश सेवा करतील. या संमेलनात देश सेवा कशी करता येईल हे शिकायला मिळाले. त्यामुळेच देशाला या सारख्या संमेलनाची गरज आहे.”
चंद्रकांत शहासने म्हणाले,“वृक्ष लागवड,वृक्ष संवर्धन व पर्यावरण रक्षण ही देखील एक राष्ट्रभक्ती आहे. असा संदेश समाजापर्यंत पोहचविल्यास मोठी चळवळ उभी राहिल. त्यासाठी  राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ साहित्यिका व कवयित्री उर्मिला विश्वनाथ कराड यांनी पहिल्या संमेलनापासून त्यांचे समर्थन होते.”
अ‍ॅड. नंदिनी शहासने यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने मराठी साहित्याचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, बलिदानाचा इतिहास आणि १२०० क्रांतीकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शानाची माहिती दिली.
अनिल गोरे यांनी उपस्थितांना सांगितले की, मराठीभाषेतून गणित आणि विज्ञान अत्यंत सोप्या भाषेत शिकता येते.
श्याम भुर्के यांनी स्वागतपर भाषण केले.
माधुरी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. मंजिरी शहासने यांनी आभार मानले.

 कात्रज घाटात रिक्षाचालक महिलेवर बलात्काराचा प्रयत्न

पुणे-प्रवासी म्हणून बसलेल्या एकाने रिक्षाचालक महिलेशी अश्लील कृत्य केले. प्रवाशाने रिक्षाचालक महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना कात्रज घाटात नुकतीच घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका तरुणास अटक केली. याप्रकरणी निखिल अशोक मेमजादे (वय ३०, रा. शंकर मठ, हडपसर) याला अटक करण्यात आली. याबाबत रिक्षाचालक महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले कि,’हा प्रकार 26 डिसेंबर राेजी रात्री दहा वाजता घडला. घटनेच्या दिवशी तक्रारदार त्यांची रिक्षा घेऊन हडपसर परिसरात गेल्या हाेता. त्यावेळी मगरपट्टा येथून आराेपी निखिल मेमजादे यास त्यांनी रिक्षात प्रवासी म्हणून घेतले.रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कात्रज घाटातून अंधाऱ्या वाटेतून जात असताना एका लाॅजिंग बाेर्डाजवळ आराेपीने रिक्षा थांबविण्यास सांगून ताे खाली उतरला आणि त्याने रिक्षाचालक महिलेस जेवणासाठी बळजबरी करू लागला. त्यास महिलेने नकार दिला असता, आराेपीने तिला गालात चापट मारुन ‘मला तुझ्या साेबत इथेच शारिरिक संबंध करायचे आहेत, या अंधारात तुझ्या मदतीला काेणीही येणार नाही, तुला काय करायचे ते कर’ असे बाेलून अंगावरील सर्व कपडे काढून नग्न झाला. त्यानंतर विवस्त्र अवस्थेत महिले शेजारी बसून त्याने तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य केल्याने ती रिक्षा साेडून घाबरून खाली उतरून पळू लागली.प्रवासी आराेपी हा सुद्धा रिक्षाचालक महिलेच्या पाठीमागे नग्न अवस्थेत तिला पकडण्यासाठी पळू लागला. याबाबत महिलेने पाेलिसांकडे तक्रार दिल्यानंतर याबाबत पाेलिसांनी गुन्हा दाखल करत, आराेपीचा शाेध घेत त्यास जेरबंद केले. याप्रकरणी पुढील तपास महिला पाेलिस उपनिरीक्षक एन. घाेगरे करत आहे.

कोयत्याने दिसेल त्यावर हल्ले चढवत सुटलेल्या मस्तीखोरांना पोलिसांनी दाखविले आसमान

मार्शल धनंजय पाटील आणि अक्षय इंगवले यांचे कौतुक

पुणे- आंबेगाव येथील सिंहगड विधी महाविद्यालयपरिसरात कोयता घेऊन दोघांनी दहशत माजविली.समोर दिसेल त्याच्यावर वार करण्यास सुरुवात केल्याने एकच खळबळ उडाली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी तिकडे धाव घेतली. कोयता घेऊन रस्त्याने फिरणार्‍याचा पाठलाग करुन त्याला गाठले व धु धु धुतले. या संपूर्ण प्रकरणाचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

सुजित रावसाहेब गायकवाड आणि करण दळवी (दोघेही रा. वडगाव) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी करण दळवी याला पोलिसांनी पकडले आहे. याप्रकरणी अथर्व सुनिल लाडके (वय २०, रा. आंबेगाव) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

आंबेगाव परिसरातील विधी महाविद्यालयासमोरील खाऊ गल्लीत रात्री दहाच्या सुमारास करण व त्याचा साथीदार कोयते फिरवत आले. त्यांनी सुरुवातीला रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकींवर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तेथील एका हॉटेलमध्ये घुसून एका ग्राहकावर कोयत्याने वार केला. तेथून बाहेर येऊन पुन्हा रस्त्याने जाणार्‍या येणार्‍या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली.

एकाच्या पाठीवर प्लॅस्टिकचा स्टुल फेकून मारला.या दोघांनी या परिसरात साधारण २० ते २५ मिनिटे धुडगुस घातला.
सिंहगड रोड पोलिसांना याची माहिती मिळताच मार्शल धनंजय पाटील आणि अक्षय इंगवले हे तातडीने तेथे पोहचले.
तेव्हा करण हा हातात कोयता घेऊन भर रस्त्यावर फिरत होता. त्यांनी दुचाकीवरुनच त्याला पकडण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले.भर रस्त्यात काठीने त्याला धु धु धुतला. या सर्व प्रसंगाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.अशा गुंडाना भर चौकात असेच तुडवले पाहिजे, म्हणजे गुंडांवर पोलिसांची दहशत बसणार आहे.

कृष्णा, सार्थक यांनी पटकावले विजेतेपद

अमनोरा-पीवायसी एचटीबीए कप बॅडमिंटन स्पर्धा ; हवेली तालुका बॅडमिंटन संघटना आणि पीवायसी  हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

पुणे : हवेली तालुका बॅडमिंटन संघटना (एचटीबीए) आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमनोरा-पीवायसी एचटीबीए बॅडमिंटन कप अजिंक्यपद स्पर्धेत कृष्णा जसूजा आणि सार्थक पाटणकर यांनी आपापल्या गटाचे विजेतेपद पटकावले.

पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित सार्थक पाटणकरने अग्रमानांकित कोणार्क इंचेकरवर १५-८, १४-१६, १५-१३ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. ही लढत ३२ मिनिटे चालली. यानंतर १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या अंतिम फेरीत कृष्णा जसूजाने दुसऱ्या मानांकित आद्य पारसनीसला १५-११, १५-१३ असा पराभवाचा धक्का देऊन विजेतेपद पटकावले.

निकाल : अंतिम फेरी – ५५ वर्षांवरील पुरुष दुहेरी – नितीन कोनकर-परेश पटानी वि. वि. भरत भोसले-संजय परांडे १५-४, १५-७. उपांत्य फेरी – भरत भोसले – संजय परांडे वि. वि. रमाकांत शिरनाळकर – सुभाष अंबवणे  १५-१०, १५-१०; नितीन कोनकर- परेश पटानी वि. वि. उमेश देवधर -विक्रांत लुकतुके १५-७, १५-२.

५० वर्षांवरील पुरुष दुहेरी – नितीन कोनकर – रवी सारांगपाणी वि. वि. अजय रावळ – संदीप डांगी १५-८,१५-५. उपांत्य फेरी – नितीन कोनकर – रवी सारांगपाणी वि. वि. भीमराव कदम – नागेश शिंदे १५-९, १५-१२; अजय रावळ – संदीप डांगी वि. वि. हीरो मोटवाणी – शशिकुमार अय्यर १८-१६, ४-१५, १५-१३.

४५ वर्षांवरील पुरुष एकेरी – अंतिम फेरी – सचिन फडके वि. वि. विश्वनाथ भिडे १७-१५, ११-१५, १५-१०. उपांत्य फेरी – सचिन फडके वि. वि. अभय खर्शिकर १५-१२, ७-१५, १५-५; विश्वनाथ भिडे वि. वि. विक्रमसिन्हा शिंदे १५-६, १५-८.

४५ वर्षांवरील महिला एकेरी – अंतिम फेरी – मंजूषा सहस्त्रबुद्धे वि. वि. रुची वहाळ १५-३, १५-५. उपांत्य फेरी – मंजूषा सहस्त्रबुद्धे – स्वाती कुलकर्णी १५-७, १५-९; रुची वहाळ वि. वि. अनिता कदम १५-९, १५-४.

४५ वर्षांवरील पुरुष दुहेरी – अंतिम फेरी – अमित तेरे-शिवकिरण सिंग ठाकूर वि. वि. हर्षवर्धन दामले -विश्वनाथ भिडे १५-७, १५-१०. उपांत्य फेरी – अमित तरे – शिवकिरण सिंग ठाकूर वि. वि. मोहित खेउर – सचिन फडके १५-१२, १६-१४; हर्षवर्धन दामले – विश्वनाथ भिडे वि. वि. अजित गोरे – अजित सप्रे १५-११, १५-१३.

४५ वर्षांवरील मिश्र दुहेरी – अंतिम फेरी – अमित तरे – वैशाली किरणे पुढे चाल वि. दीपक पटवर्धन – दीपाली जोशी. उपांत्य फेरी – दीपक पटवर्धन – दीपाली जोशी पुढे चाल वि. मनीष तेरदालकर – अनिता कुलकर्णी; अमित तरे-वैशाली किरणे वि. वि. शशिकुमार अय्यर- सुजा नायर २०-१८, १५-११.

PM नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबा यांचे निधन:मोदी खांद्यावर आईचे पार्थिव घेऊन निघाले

0

मोदींनी आईला दिला मुखाग्नी, अखेरच्या प्रवासात पार्थिवासोबत शव वाहनात बसून राहिले

अहमदाबाद-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा मोदी यांचे शुक्रवारी निधन झाले. त्या 99व्या वर्षी होत्या. अहमदाबाद येथील रुग्णालयात हिराबा यांनी अखेरचा श्वास घेतला.पंतप्रधान मोदी सकाळी 7.45 वाजता अहमदाबादला पोहोचले. येथून ते थेट गांधीनगरच्या रायसण गावात भाऊ पंकज मोदी यांच्या घरी गेले. मोदी घरी पोहोचताच अंत्ययात्रेला सुरुवात झाली. मोदी स्वत: पार्थिव खांद्यावर घेऊन अंत्ययात्रेत सहभागी झाले. शववाहनातही बसले. सेक्टर-३० येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या सर्व नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याची माहिती पीएमओने ट्विट करून दिली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते बंगालमधील महत्त्वाच्या प्रकल्पांचा शुभारंभही करणार आहेत.

मोदींनी स्वतः ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. हिराबा यांना मंगळवारी अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. याशिवाय त्यांना खोकल्‍याचाही त्रास होता. त्‍यामुळे त्‍यांना अहमदाबाद येथील यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. हीराबेन यांची प्रकृती स्थिर असल्‍याचे सांगण्‍यात येत होते, मात्र उपचारादरम्‍यान त्‍यांची प्राणज्‍योत मालवली.

आईजे जीवन म्हणजे एका तपस्वीची यात्रा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आई म्हणजे निष्काम कर्मयोगी व आदर्श मुल्यांनी जीवन जगण्याचे प्रतीक आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आईला श्रद्धांजली वाहिली आहे.

जिल्ह्यातील १०६ बालकांना मिळाले हक्काचे कायदेशीर पालक

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या पुढाकाराने दत्तक विधानांसाठी गतीने प्रक्रिया

पुणे, दि. २९: नविन दत्तक नियमावली अंमलात आल्यापासून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गेल्या दीड महिन्यात १०६ बालकांचे दत्तक विधान आदेश केले आहेत. त्यामुळे या अनाथ, सोडून दिलेल्या अथवा जैविक पालकांनी समर्पण केलेल्या बालकांना कायदेशीर पालक मिळाले असून त्यांची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल सुरू झाली आहे.

यापूर्वीची दत्तक विधान आदेश प्रक्रिया ही ४ जानेवारी १९९७ नुसारची दत्तक विधान नियमावली व केंद्रीय दत्तक स्रोत प्राधिकरण (सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी- कारा) यांच्या दत्तक नियमावली २०१७ नुसार चालत होती. यामध्ये बाल कल्याण समितीने बालकाला दत्तकासाठी मुक्त केल्यावर आणि दत्तक समितीने मान्यता दिल्यानंतर संस्था दत्तकसाठीचे अर्ज वकिलामार्फत न्यायालयामध्ये दाखल करत होते व न्यायाधीश दत्तकाचे आदेश देत होते. परंतु, केंद्रीय दत्तक स्त्रोत प्राधिकरणद्वारा २३ सप्टेंबर २०२२ च्या अधिनसूचनेनुसार नविन दत्तक नियमावली बनवण्यात आली आहे. या नवीन नियमावलीनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडून बालकांचे दत्तक आदेश देण्यात येत आहेत.

नवीन दत्तक नियमावली अंमलात आल्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा न्यायालयाकडील वर्ग झालेली प्रकरणे व नवीन दत्तक प्रकरणांमध्ये नियमानुसार कार्यवाही करुन १०६ बालकांचे दत्तकविधान आदेश देण्यात आले आहेत. या दत्तक विधानाची सुरुवात १४ नोव्हेंबर २०२२ या बालदिनाचे औचित्य साधून करण्यात आली.

१०६ दत्तक आदेश झालेल्या बालकांपैकी यामध्ये ९० बालके देशांतर्गत दत्तक देण्यात आली आहेत तर १६ बालके परदेशामध्ये (आंतरदेशीय) दत्तक देण्यात आली आहेत. या दत्तक आदेशामुळे या मुलांना त्यांच्या हक्काचे कायदेशीर पालक व हक्काचे कुटुंब मिळाले आहे. मुलाला जन्माने जे अधिकार मिळतात ते सर्व अधिकार व विशेषाधिकार दत्तक विधान आदेशामुळे प्राप्त होतील.

दत्तक नियमावलीमध्ये सुधारणा झाल्यानंतर न्यायालयाकडील वर्ग झालेली एकूण १०० प्रकरणे व कारा पोर्टल नुसार नवीन मान्य झालेली प्रकरणे यांची संख्या जास्त असल्याने जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी या सर्व प्रकरणात गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद व कार्यालयातील कर्मचारी व तसेच जिल्ह्यातील मान्यता प्राप्त दत्तक संस्था सोफोश, भारतीय समाज सेवा केंद्र, रेणुका महाजन ट्रस्ट, अरुणाश्रय, महिला सेवा मंडळ, आधार दत्तक संस्था आणि पंडिता रमाबाई मुक्ती मिशन यांच्या एकत्रित प्रयत्नाने व सर्वांनी आपआपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्यामुळे सर्वाधिक १०६ दत्तक विधान आदेश दीड महिन्यात पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

ज्या पालकांना मुल दत्तक घ्यावयाचे आहे त्यांनी दत्तक प्रक्रिया अंतर्गत बाळ दत्तक घेण्यासाठी https://cara.nic.in या संकेत स्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. अनिवासी भारतीय, भारतात राहणारे परदेशी पालक, नाते संबंधातील दत्तक इच्छुक पालक आणि सावत्र पालकांची दत्तक प्रक्रिया करण्यासाठी दत्तक नियमावली २०२२ नुसार प्रक्रिया करणे गरजेचे आहे.

नोंदणी केल्यानंतर दत्तक इच्छुक पालकांची गृह भेट, सामाजिक तपासणी, आवश्यक दस्त ऐवजांची पूर्तता झाल्यानंतर ‘कारा’ संकेतस्थळावरून दत्तक नियमावली २०२२ नुसार सर्व दत्तक विधान प्रक्रिया केली जाते. त्यानंतर सदर प्रकरण विशेष दत्तक संस्थामार्फत संस्थेत दाखल बालकांचे दत्तक प्रकरण जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्यामार्फत छाननी करून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले जाते. तसेच नाते संबंधातील व सावत्र पालकाचे दत्तक प्रक्रियेची अर्ज ‘कारा’ पोर्टलवर मान्य झाल्यावर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्याकडून छाननी झाल्यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी सादर केली जाते.

तिन्ही प्रकारचे दत्तक प्रकरण अर्जावर दत्तक नियमावली २३ सप्टेंबर २०२२ नुसार केंद्रीय दत्तक स्त्रोत प्राधिकरण द्वारा नवीन दत्तक नियमावलीनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या मान्येतेने व स्वाक्षरीने बालकांचे दत्तक आदेश देण्यात येत आहेत.

आयटीआय विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीसोबतच जर्मन, फ्रेंच, जपानी भाषेचे प्रशिक्षण

0

नागपूर, दि. २९ : राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) भेट देऊन त्याची पाहणी केली. द सॉल्ट एव्हिएशन व कौशल्य विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथे सुरू असलेल्या एरॉनॉटिकल स्ट्रक्चर अॅण्ड इक्युपमेन्ट फिटर या व्यवसायाला त्यांनी भेट दिली. फ्रान्स येथील प्रशिक्षक तसेच आयटीआय विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी बदलत्या काळाला अनुषंगिक असलेला हा अनोखा अभ्यासक्रम आयटीआयमध्ये सुरु करण्यात आल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. सध्या एव्हिएशन क्षेत्रात प्रचंड रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने हा अभ्यासक्रम नाशिक व पुणे येथेही सुरु करण्याबाबत मंत्री श्री. लोढा यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, एव्हिएशन क्षेत्रात अल्प मुदतीचे अभ्यासक्रम जास्तीत-जास्त राबविण्याबाबत व त्यातून रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पाऊले उचलणे आवश्यक आहे. त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम संपूर्ण राज्यातील आयटीआयमध्ये सुरू करावेत, जेणेकरुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्थानिक रोजगार मिळाल्यास त्यांना शहरामध्ये रोजगारासाठी येण्याची गरज भासणार नाही. त्याद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सशक्त भारताचे स्वप्न साकार होईल, असेही श्री. लोढा म्हणाले.

इंग्रजीसोबतच जर्मनफ्रेंच, जपानी भाषेचे प्रशिक्षण

देशाबाहेरील रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी आयटीआयच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी सोबतच फ्रेंच, जपानी व जर्मन भाषेचे प्रशिक्षण सुरू करावे. विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेल्या विविध भाषातज्ज्ञांचे ऑनलाईन वर्ग घेण्याबाबत मदत घेण्याबाबत तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. आयटीआयमध्ये सर्व महापुरुषांच्या जयंती साजरी करुन त्यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांकडून भाषणे आयोजित करावीत, जेणेकरुन विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनचरित्रामधून प्रेरणा मिळेल, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

यावेळी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी, दसॉल्ट एव्हिएशनचे समन्वयक मयुर याउल, सहसंचालक श्री. देवतळे, विशेष कार्य अधिकारी श्री. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

आज तुम्ही सुपात आहात, पण जात्यात कधी जाताल हे सांगता येत नाही – अजित पवार

काय दोष होता संजय राऊत आणि अनिल देशमुखांचा ? अजित पवारांचा विधिमंडळात सवाल ..

नागपूर -ज्यांच्यावर कायदा सुव्यवस्था राखायची जबाबदारी तेच अशांतता , अन्याय करत असतील तर दाद मागायची कुठे ?महापुरुषांच्या वारंवार अपमाना ची दखल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घेतली नाही आणि असे प्रकार होतच गेले. निष्पापांना तुरुंगात घालण्या ऐवजी यांना घाला ना. पूर्वी पत्रकारांशी बोलल्यावर, दुसर्‍या दिवशी मी असे बोललोच नाही म्हंटले जात आता डिजिटल मीडिया आला आता असे म्हणता येत नाही.

पुरावे नसताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेलमध्ये टाकले. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातले 14 महिने वाया गेले. त्यांचा दोष काय होता? खासदार संजय राऊत यांच्याबाबतही तसेच घडले. त्यांचाही दोष काय होता? निष्पापांना जेलमध्ये टाकण्यापेक्षा महापुरुषांचे अपमान करणाऱ्यांना तुरुंगात धाडा. त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडेल, असा घणाघात गुरुवारी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, मंगलप्रभात लोढा आणि इतर वादग्रस्त बोलणाऱ्या नेत्यांची अक्षरशः पिसे काढले. यावेळी सभागृहात चिडीचूप शांतता अनुभवायला मिळाली.विधानसभेत गुरुवारी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांच्या नाकी नऊ आणणारे आणि डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे भाषण केले. अजित पवार म्हणाले की, अनिल देशमुखांच्या आयुष्यातले 14 महिने वाया गेले. त्यांचा दोष काय होता? पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केले, पण त्याचे पुरावे नव्हते. खासदार संजय राऊत यांच्याबाबत तेच झाले. हे मी म्हणत नाही. कोर्ट म्हणाले. राजकीय मतमतांतर होईल, पण या व्यक्तीच्या आयुष्यातले एवढे महत्त्वाचे दिवस वाया जातात. आरोप सिद्ध झाल्यानंतर काय दिवाणी शिक्षा असेल, ती करा. काय संजय राऊत यांची चूक होती? काय अनिल देशमुख यांची चूक होती? हे जे चाललंय, त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आलीय. त्यांच्या कुटुंबीयांवर काय वेळ आली असेल. कायदा सुव्यवस्था करणारेच बिघडवत असतील, अशांतता निर्माण करत असतील, तर करायचे काय? असा सवाल अजित पवार यांनी केला.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरही अजित पवारांनी जोरदार आक्षेप घेतला. ते म्हणाले, शिवरायांचा जाज्वल अभिमान बाळगणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळखय. त्यांचा झालेला अपमान महाराष्ट्राच्या जनतेला पटलेला नाही. शिवाजी महाराज पुराने जमाने के है. आजचे आदर्श नितीन गडकरी. त्यांच्याबद्दलही आम्हाला सार्थ अभिमान आहे, पण गडकरी साहेब आणि शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकेल का? असा सवाल त्यांनी केला.राज्यपाल म्हणाले, कल्पना करो, शादी दस साल में ही कर दी थी. तब जोतीराव तेरा साल के उमर के थे. तब वो क्या करते होंगे शादी के बाद. हातवारे करून, हसत-हसत हे सतत चालू आहे. मुख्यमंत्री काही कामानिमित्त दिल्लीला जाऊ शकतात. त्यांनी दिल्लीत वरिष्ठांच्या कानावर घातले पाहिजे. काल जसे ठोकून सांगितले मुंबई आमचीय तसेच इथेही करावे, असे आवाहन त्यांनी केले.समर्थाशिवाय शिवाजीला कोण विचारतोय?, असे राज्यपाल म्हणाले. कितीदा आमच्या युगपुरुषांचा अपमान करताय. त्यांच्या अपमानाचा विडा उचलून आलाय का? राजमाता जिजाऊंनी त्यांना बाळकडू दिले. एका जाहीर कार्यक्रमात चुकीचा इतिहास सांगितला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू स्वतःला शांतीदूत समजायचे. त्याच्यामुळे देश कमकुवत राहिला, असे कोश्यारी म्हणाले. मात्र, त्यावेळी देशात टाचणी तयारी व्हायची नाही आणि आता असे बोलले जाते. हे बाकीचे करण्यापेक्षा पंडित नेहरूंबद्दलचे चार पुस्तके वाचा ना. पहाटे चारला उठता. संविधानिक पदाची शोभा राखण्यासाठी असली वक्तव्य टाळावीत, असे आवाहन त्यांनी केले.अजित पवार पुढे म्हणाले की, राज्यपाल मुंबईबद्दल काय म्हणाले. गुजराती – राजस्थानी माणसाला मुंबईच्या बाहेर काढले, तर मुंबईत पैसा उरणार नाही. ही भाषा राज्यपाल महोदयांची. त्यांना एकनाथ शिंदे यांचे सरकार अस्थिर करायचेय का? त्यामुळे सुरूय का? अशा वक्तव्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड संताप, आक्रोश, चीडय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यावर जाहीर आक्षेप आणि निषेध नोंदवतील, अशी अपेक्षा होती. साधा निषेध नोंदवत नाहीत. माघारी बोलावतील अशी अपेक्षा होती. ही महाराष्ट्राची शोकांतिकाय.अजित पवार पुढे म्हणाले की, मंत्र्यांचेही हेच सुरू आहे. चंद्रकांत पाटील याच्या भीक मागितली या वक्तव्याबद्दल ते म्हणाले की, देणगी मागितली, मदत मागितली असे ते म्हणू शकत होते. ज्यांच्याबद्दल असे बोलता. जरा इतिहासात खोलात जा. महात्मा फुले यांच्या कंपनीचा टर्नओव्हर होता २० हजार रुपयांचा होता आणि तेव्हा टाटांचा टर्नओव्हर १९ हजार रुपयांचा होता. त्यांच्यावरच्या शाईफेकीचे समर्थन करत नाही. मात्र, विधानभवनात शाईपेन आणण्यासाठीही बंदी केली. आमच्यावर अविश्वास करता हे बरोबर नाही. लाइटली घेऊ नका.अजित पवार पुढे म्हणाले की, शिवरायांचा गनिमा कावा कुठला? तुमचा गनिमा कावा कुठला? तुम्हाला मंत्रिपद हवंय. त्यांना कुठं हरबऱ्याच्या झाडावर चढवताय. छत्रपतींचा गनिमी कावा हिंदवी स्वराज्यासाठी होता. तुमचा गनिमी कावा कशासाठी होता? याचाही विचार केला पाहिजे. मंगलप्रसाद लोढा पहिल्यांदा मंत्री झाले. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन शिवराय जसे निसटले, तसे शिंदे निसटले म्हणतात. एक जण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला म्हणतात. शेंबड्या पोराला विचारले, तर सांगतो त्यांचा जन्म शिवनेरीवर झाला. तुम्ही वेळ काढा. इतिहासाची माहिती घ्या…माहिती नसेल, तर बोलू नका. एक म्हणतात, अफजलखानाने शिवाजी महाराजांचा कोथळा बाहेर काढला, हे काय सुरूय, असा सवाल त्यांनी केला.अजित पवार पुढे म्हणाले की, सुधांशू त्रिवेदी म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली. हा निल्लर्जपणाचा कळसय. तुम्हाला राग कसा येत नाही? इतिहास तोडून – मोडून मांडताय. तुमची सटकत कशी नाही? सटकली पाहिजे. एवढ्या महापुरुषांचा अपमान होऊनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्री गप्प कसे? हे प्रकरण गंभीर आहे . यापुढे कोणत्याही महापुरुषाचा अपमान सहन केला जाणार नाही. नको त्या निष्पाप लोकांना जेलमध्ये टाकण्यापेक्षा महापुरुषांचे अपमान करणारे तुरुंगात टाका. त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडू द्या. आपण प्रतापगडाच्या जवळ राहता, अशा परिसराचे प्रतिनिधित्व करता. याचा विचार करा. गुलाबराव महिला सहकाऱ्यांना नट्यांची उपमा कशी देता? तुमची-आमची बहीण,आई, असेल? असा सवाल त्यांनी केला.तानाजीराव सावंत म्हणाले, दोनवेळा आरक्षण गेल्यानंतर मराठा समाज गप्प राहिला. आता सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला खाज सुटली. चाळीस लोकांचे नेते एकनाथ शिंदेयत. काय जाब विचारला यांना. कान पकडा, उठा-बशा काढायला लावा. अब्दुल सत्तार यांनी माझ्या बहिणीबद्दलच एकदा, दोनदा नव्हे चारदा बोलले. जिल्ह्याधिकाऱ्यांना दारू पिता का म्हणत पाणउतारा केला. नोटाबदलीत नोटा बदलून घेतला म्हणता. मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये अधिकाऱ्याला झाप झाप झापता. हे आमच्याकडे असताना वाईट होते. आता तुमच्याकडे आले म्हणजे गोमूत्र शिंपडलं की झालं का? असा सवाल त्यांनी केला.अजित पवार पुढे म्हणाले की, विद्यमान केंद्रीय मंत्री तुम्हाला महाराष्ट्रात रहायचं, फिरायचं की नाही, अशी उघड धमकी देतात. काही जण सरपंच निवडून दिला नाही, तर निधी मिळणार नाही म्हणतात. मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी मला विचारल्याशिवाय निधी देऊ शकणार नाहीत म्हणतात. हे कशाचे लक्षणय?, असा सवाल त्यांनी केला. दादरला गोळीबार केला. पोलिसांनी गोळी जप्त केली. पुढे काय कारवाई झाली? जाहीरपणे विरोधकांना हातपाय तोडण्याची धमकी देतात. यावर काल गुन्हा दाखल झाला. काही काही जण म्हणतात चून-चून के मारुंगा. पत्रकारांना ‘एचएमव्ही’ आणि चाय बिस्कुट पत्रकार म्हणतात याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली.

‘एमसीए’ची निवडणूक प्रक्रियाच बोगस-माजी रणजीपटू अनिल वाल्हेकर यांचा आरोप

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) निवडणूक आठ जानेवारीला होणार आहे. मात्र, ही निवडणूक प्रक्रियाच सुप्रीम कोर्टाच्या शिफारशींनुसार नाही आणि घटनेनुसारही नाही. ही पूर्ण प्रक्रियाच बोगस असल्याचा आरोप माजी रणजी क्रिकेटपटू अनिल वाल्हेकर यांनी पत्रकार परिषदेत केला. 
पत्रकार परिषदेला माधव रानडे, ॲड. कमल सावंत उपस्थित होते.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची २०२२-२५ ची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी २७ डिसेंबर ते दोन जानेवारीदरम्यान उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर तीन जानेवारी रोजी अर्जांची छाननी होणार असून, त्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जे. एस. सहारिया यांनी हा कार्यक्रम जाहीर केला. मात्र, गुरुवारी पत्रकार परिषदेत वाल्हेकर यांनी निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
वाल्हेकर म्हणाले, ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची २०२२ ते २०२५ या कालावधीसाठीची निवडणूक प्रक्रिया ही सुप्रीम कोर्टाच्या शिफारशींना धरून नाही; तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची घटना ही फक्त धर्मादाय आयुक्तांकडे सादर केल्याचा दावा केला आहे. त्या घटनेला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. असे असतानाही ही निवडणूक होत आहे. घटना मंजूर नसताना ही निवडणूक होतेच कशी?’
वाल्हेकर यांनी आणखी दुसरा एक मुद्दा उपस्थित केला. या निवडणुकीत सुरुवातीला १६ कौन्सिलरची अर्थात सर्वोच्च समितीच्या सदस्यांसाठीची निवडणूक होईल. सोळा सदस्यांमधूनच पाच पदांसाठी निवडणुक लढवता येईल. यात त्रुटी दाखविताना वाल्हेकर म्हणाले, ‘पहिला मुद्दा असा की आधी सर्वोच्च समिती सदस्यांची निवडून कशी होऊ शकते. आधी अध्यक्ष-उपाध्यक्ष अशी पदाधिकाऱ्यांची निवडणूक होणे अपेक्षित आहे. जर आधी सर्वोच्च समिती सदस्यांची निवडणूक होत असले, तर हेच सभासद पदाधिकारी म्हणून निवडणूक लढवू शकणार आहेत. जे सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार नाही.’

आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मतदानाच्या अधिकाराबाबतही वाल्हेकर यांनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, ‘या घटनेत आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मतदानाचा अधिकार नाही. एमसीएने आंतरराष्ट्रीय खेळाडूंची निवडणूक दाखवून खेळाडू प्रतिनिधींचा अधिकार काढून घेतला आहे. याबाबत घटनेमध्ये बदल करताना निवडणूक प्रक्रियेत आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मतदान अधिकार देताना त्यांच्यामधील निवडणूक रद्द करताना निवडणूक अधिकारी यांनी ही घटना अयोग्य असल्याचे सिद्ध केले आहे.’
अॅड. नीला गोखले यांनी सादर केलेला इ-मेल वर निवडणूक जाहीर करणे योग्य नव्हते. कारण सुप्रीम कोर्टाने किंवा समिती एमसीएच्या घटनेला मान्यता दिल्या बाबतचा कोणताही उल्लेख इ-मेल मध्ये नाही.  

जालना क्रिकेट असोसिएशनला निवडणुकीचा अधिकार देताना जुने सभासद ‘डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन जालना’ यांचा अधिकार काढून घेतला. वास्तविक त्यांनी सर्व पुरावे देऊन सुद्धा जुन्या संघटनेवर अन्याय केला आहे, असा आरोप अनिल वाल्हेकर यांनी केला.
ते पुढे म्हणाले, ही निवडणूक प्रक्रियाच बेकायदेशीर आहे. निवडणूक होण्याला आमचा विरोध नाही. मात्र, त्यात पारदर्शकता हवी आणि घटनेनुसार, सुप्रीम कोर्टाच्या शिफारशींनुसार ती व्हावी.,तरी योग्य विचार करून निवडणूक अधिकारी यांनी निर्णय करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड येथून भारतात येणाऱ्या प्रवाशांनी निघण्यापूर्वीच आरटीपीसीआर चाचणी करुन घेणे अनिवार्य

0

1 जानेवारी 2023 पासून हवाई सुविधा पोर्टलवर त्याबाबतचा अहवाल प्रवासाआधी अपलोड करावा लागणार

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2022

चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड येथून भारतात प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना संबंधित देश/गंतव्यस्थान येथून निघण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचण्या करणे अनिवार्य असेल आणि 1 जानेवारी 2023 पासून आरटीपीसीआर चाचणीचा कोविड निगेटिव्ह अहवाल हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करावा लागेल. भारतासाठीचा प्रवास सुरू करण्याआधी 72 तासांच्या आत ही चाचणी करावी.

भारतात येणाऱ्या 2% आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी करण्याव्यतिरिक्तचे हे पाऊल आहे असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने आज जारी केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे.

जगभरातील, विशेषतः उपरोक्त देशांमधील, वाढत असलेल्या कोविड-19 परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली जात आहे.

भारतीय वस्तू शून्य सीमा शुल्कासह ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत सर्व टॅरिफ लाइनवर उपलब्ध

0

मुंबई, 29 डिसेंबर 2022

भारताने यावर्षी दोन व्यापार करार कार्यान्वित करण्याचा अनोखा गौरव प्राप्त केला आहे. या  वर्षात 1 मे रोजी भारत- संयुक्त अरब अमिरात सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार अंमलात आल्यानंतर, भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार (#IndAusECTA) आजपासून, म्हणजे 29 डिसेंबर 2022 पासून लागू झाला आहे. 2 एप्रिल 2022 रोजी आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यात आली, 21 नोव्हेंबर रोजी मान्यता देण्यात आली, 29 नोव्हेंबर रोजी लेखी अधिसूचनांची देवाणघेवाण झाली आणि 30 दिवसांनंतर आज हा करार लागू झाला आहे.

हा करारासंदर्भात “ब्रेट लीचा वेग आणि सचिन तेंडुलकरची परिपूर्णता समोर ठेवून वाटाघाटी करण्यात आल्या आहेत”, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज मुंबईत उद्योग प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांना संबोधित करताना सांगितले.

या कराराचा देशांना कसा फायदा होईल?

याविषयी बोलताना पीयूष गोयल म्हणाले, “ऑस्ट्रेलियाला आपण मोठ्या प्रमाणात तयार मालाची निर्यात करु शकतो, कारण ते फारच कमी वस्तूंचे उत्पादन करतात, ऑस्ट्रेलिया मुख्यत्वे कच्चा माल आणि मध्यवर्ती उत्पादक देश आहेत. आपल्याला तेथून स्वस्त कच्चा माल मिळेल. त्यामुळे आपल्याला जागतिक स्तरावर अधिक स्पर्धात्मक बनवण्याबरोबरच भारतीय ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी सक्षम देखील होता होईल. आपल्याला अधिक परवडणाऱ्या किमतीत अधिक दर्जेदार वस्तू उपलब्ध करून देण्यास सक्षम बनता येईल.

 “ऑस्ट्रेलिया, जो मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे, त्यांना मोठा फायदा होईल, त्यांना लवकरच भारतातून आणखी बराच तयार माल मिळण्यास सुरुवात होईल, तसेच भारतीय प्रतिभेने प्रदान केलेल्या वस्तू आणि सेवा या दोन्ही क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम आणि नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.”

 “या करारामुळे आयटी सेवांवरील दुहेरी कर आकारणी देखील दूर होईल. ही दुहेरी कर आकारणी आपल्याला कमी स्पर्धात्मक बनवत होती आणि सोबतच आपल्यासाठी आयटी क्षेत्र कमी फायदेशीर बनवत होती. आता कायद्यात सुधारणा करून दुहेरी कर प्रणाली हटवण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून आयटी क्षेत्रासाठी दुहेरी कर आकारणी संपुष्टात येईल. त्यामुळे आपण आत्ताच लाखो डॉलर्स वाचवू आणि पुढे जाऊन एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाचवू, कदाचित 5 – 7 वर्षे पुढे जातील, पण यामुळे आपल्याला स्पर्धात्मक वातावरण मिळेल आणि बर्‍याच नोकऱ्याही निर्माण होतील.”

“ऑस्ट्रेलियाच्या सरकारने अत्यंत संवेदनशील आणि विचारशील बनून संपूर्ण वाटाघाटींमध्ये, विशेषतः भारतातील शेतकरी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्राच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पूर्ण सहकार्य दिल्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो. कृषी उत्पादने आणि डेअरी क्षेत्रासारखी उत्पादने – जी भारतासाठी अतिशय जिव्हाळ्याची आहेत आणि ज्याशिवाय ऑस्ट्रेलियाने यापूर्वी कधीही करार केला नव्हता ते आता संरक्षित केले गेले आहेत, यासाठी मी ऑस्ट्रेलियन सरकारचा खूप आभारी आहे.”

सर्व प्रशुल्क गटांतील भारतीय वस्तूंना ऑस्ट्रलियाई बाजारात सीमाशुल्काविना प्रवेश मिळणार

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारामुळे या दोन देशांमधील संस्थात्मक व्यवस्थेला प्रोत्साहन मिळणार असून द्विपक्षीय व्यापारात सुधारणा होतील. या करारात भारत- ऑस्ट्रेलियादरम्यान व्यापाराच्या सर्व प्रशुल्क गटांचा समावेश आहे.

भारताला ज्यांच्या निर्यातीत उत्सुकता आहे अशा, भरपूर श्रम लागणाऱ्या 100% क्षेत्रांमधील – जसे की मूल्यवान खडे व दागिने, कापड उद्योग, कातडे उद्योग, पादत्राणे, फर्निचर, अन्न आणि कृषी उत्पादने, अभियांत्रिकी उत्पादने, वैद्यकिय उपकरणे, मोटार वाहने – उत्पादनांना ऑस्ट्रेलियाच्या बाजारपेठेत प्राधान्याने प्रवेश ही बाब भारताला फायदेशीर ठरेल. ज्यांच्या निर्यातीबाबत ऑस्ट्रेलिया उत्सुक आहे अशा 70% हून अधिक प्रशुल्क गटांतील ऑस्ट्रेलियाई उत्पादनांना भारतीय बाजारपेठेत प्राधान्याने प्रवेश मिळेल. यामध्ये प्रामुख्याने कच्चा माल, कोळसा, खनिज धातुके व वाईन्सचा समावेश आहे.

सेवाविषयक व्यापारामध्ये ऑस्ट्रेलियाने 135 विविध उपक्षेत्रांबाबत व्यापक वचनबद्धता दर्शवली असून 120 उपक्षेत्रांसाठी भारताचा ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ अर्थात सर्वाधिक प्राधान्यता असलेल्या देशांमध्ये समावेश केला आहे.

भारताने 103 ऑस्ट्रेलियाई उपक्षेत्रांना आपल्या बाजारपेठेत प्रवेश देऊ केला असून व्यवसायविषयक सेवा, संवादविषयक सेवा, बांधकाम व संबंधित अभियांत्रिकी सेवांसह 11 व्यापक सेवा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या 31 उपक्षेत्रांसाठी ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक प्राधान्य असलेल्या देशाचा दर्जा दिला आहे.

औषधनिर्माण क्षेत्रातील उत्पादनांसाठी स्वतंत्र सूची जोडण्याचे या करारांतर्गत दोन्ही देशांनी मान्य केले आहे. त्यामुळे पेटंट झालेल्या, जेनेरिक व तत्सम सारख्याच असलेल्या औषधांना वेगाने मंजुरी मिळणे शक्य होणार आहे.

या करारांतर्गत ऑस्ट्रेलिया भारतात 10 लाख अतिरिक्त नोकऱ्या निर्माण करेल, असा अंदाज आहे. भारतीय योग शिक्षक आणि आचाऱ्यांना वार्षिक व्हिसा कोट्यात स्थान मिळेल. एक लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ऑस्ट्रेलियात काम करण्यासाठी 18 महिने ते 4 वर्षे कालावधीपर्यंतचा व्हिसा या करारामुळे मिळू शकेल. दोहों देशांमध्ये या करारामुळे गुंतवणुकीच्या संधींमध्ये वाढ, निर्यातीला प्रोत्साहन, महत्त्वपूर्ण अतिरिक्त रोजगारनिर्मिती आणि दृढ द्विपक्षीय संबंध निर्माण होण्यास मदत होईल.

ऑस्ट्रेलिया हा भारताचा महत्त्वपूर्ण धोरणात्मक भागीदार आहे. भारताप्रमाणे ऑस्ट्रेलियाही ‘क्वॉड’ (QUAD) या चार देशांच्या गटाचा, त्रिपक्षीय पुरवठा साखळी अभियान आणि भारत-प्रशांत आर्थिक मंचाचा (IPEF) सदस्य आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व अधिसूचना वाणिज्य खात्यांतर्गत येणाऱ्या परराष्ट्र व्यापार महासंचालक आणि महसूल विभागाने 29 डिसेंबर 2022 रोजी जारी केल्या आहेत.

काही मालाला प्राधान्यक्रमाने प्रवेशासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज मुंबईत प्रमाणपत्रे दिली.

पुण्यातील अंगणवाड्यांचा प्रश्न काढताच राज्यातील अंगणवाड्यांसाठी २० कोटी रुपयांची तरतूद

0

नागपूर, दि. २९ : “राज्यातील ६० हजार अंगणवाड्यांना वीज जोडणी नाही. तेथे वीज जोडणी देण्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करून येत्या तीन महिन्यात या सगळ्या अंगणवाड्यांना वीज पुरवठा होईल”, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज विधानसभेत दिली. याशिवाय, अंगणवाडी कार्यकर्तींना मानधन वाढविण्याचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.सदस्य सुनील टिंगरे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. लोढा यांनी ही माहिती दिली.या चर्चेत सदस्य राहुल कुल, बाळासाहेब पाटील, संग्राम थोपटे, यशोमती ठाकूर यांनी सहभाग घेतला.

ते म्हणाले की, राज्यात १ लाख १० हजार अंगणवाड्या आहेत. त्यापैकी ९५ हजार ग्रामीण भागात तर १५ हजार शहरी भागात आहेत. ग्रामीण भागात अंगणवाड्यांचे वीज देयक देण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांची असते. परंतु काही ठिकाणी निधी अभावी हे पैसे दिले गेले नसल्याने अशा अंगणवाड्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. राज्यात वीज जोडणी नसलेल्या ६० हजार अंगणवाड्या आहेत. महिला व बालविकास विभागाकडून २ कोटी रुपयांची तरतूद करून तेथे वीज जोडणी दिली जाईल, अशी माहिती मंत्री श्री. लोढा यांनी दिली.याशिवाय, अंगणवाड्या बळकटीकरणासाठी आपण राज्यातील ५ हजार अंगणवाड्या स्मार्ट बनवत आहोत. याशिवाय, अंगणवाडी दत्तक योजना आपण राबवित आहोत. त्यासाठी समाजातील विविध संस्था, उद्योग यांना पत्र पाठवून त्यांच्या सीएसआर मधून निधी मिळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मंत्री श्री. लोढा यांनी दिली.ग्रामविकास विभागाला सांगून जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून १० टक्के निधी महिला व बालविकास विभागाला देण्याचा निर्णय यापूर्वी झाला आहे. तो निधी मिळाला तर हा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.अंगणवाड्यांमध्ये सामान्य कुटुंबातील मुले शिकतात. त्यांच्यासाठी आपण विविध उपक्रम हाती घेत आहोत. मुंबई मध्ये आपण २०० कंटेनर अंगणवाडी सुरू केल्या आहेत. याशिवाय, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये २०० बालवाडी सुरू करण्यात आल्याची माहिती मंत्री श्री. लोढा यांनी दिली.

बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहीम गतिमान करणार – मंत्री गिरीष महाजन

0

नागपूर, दिनांक २९ : “राज्यातील बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहीम गतिमान करण्यात येईल, तसेच अशा डॉक्टरांना कायद्यानुसार अधिकाधिक कडक शिक्षा कशी करता येईल, यासाठी कायद्यात काही सुधारणा करता येतील का, याचा विचार करण्यात येईल”, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य संजय बनसोडे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावेळी उत्तर देताना मंत्री श्री. महाजन यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की, बोगस डॉक्टर शोधण्यासाठी जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय समिती आहेत. त्या समिती सदस्यांना नियमित बैठका घेऊन त्यांना कार्यक्षमतेने काम करण्याच्या सूचना देण्यात येतील. सध्याच्या कायद्यानुसार या प्रकरणात सापडलेले बोगस डॉक्टर कायद्यातील तरतुदीचा लाभ घेऊन सुटतात. त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांना कडक शिक्षा देण्याबाबत कायद्यात कडक तरतूद करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहितीही मंत्री श्री. महाजन यांनी दिली.

याशिवाय, जिल्हा तेथे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय स्थापन करण्याचा आपण निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशिक्षित डॉक्टर येत्या काळात उपलब्ध होतील. त्याचबरोबर ग्रामीण भागातील ग्रामीण आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पूर्णवेळ डॉक्टर्स उपस्थित राहतील, याबाबतही सूचना देण्यात येतील, असे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात ४ बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

जमीन मालकांना भूसंपादनाचा मोबदला देण्याची कार्यवाही तात्काळ करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

नागपूर, दि.२९ : धुळे येथील सर्व्हे क्रमांक ८०/५, ८०/६ व ८०/७/५ या आरक्षित जमिनीचे भूसंपादन व जमीन मालकांना मोबदला देण्याची कार्यवाही धुळे महानगरपालिकेने तात्काळ करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या.

धुळे येथील सर्व्हे क्रमांक ८०/५, ८०/६ व ८०/७/५ या जमिनीच्या भूसंपादनाबाबत आढावा बैठक विधानभवन येथे डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा (दूरदृश्य प्रणालीद्वारे), सह सचिव प्रतिभा भदाने, धुळे महानगरपालिका आयुक्त देविदास टेकाळे, शेतकरी घनश्याम खंडेलवाल व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

धुळे येथील सर्व्हे क्रमांक ८०/५, ८०/६ व ८०/७/५ ही जमीन २००३ ते २०२२ पर्यंत म्हाडाच्या विविध योजना राबविण्यासाठी संपादित केली होती. परंतु म्हाडाने हे भूसंपादन रद्द केले. दरम्यान महानगरपालिकेने या जमिनी सार्वजनिक प्रयोजनासाठी आरक्षित केल्याने  महानगरपालिकेने या जमिनींचे भूसंपादन करून जमीन मालकांना मोबदला देण्याची कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

याबाबत जमीन मालकांनी लेखी निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी संबंधित बैठक आयोजित केली. तसेच या आरक्षित भूखंडाबाबत प्रशासकीय बाबी व तांत्रिक बाबींची पूर्तता जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर पूर्ण करावी असे निर्देश दिले.