पाचवे राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन
कवयित्री कै. सौ.उर्मिलाताई कराड यांच्या नावाने दिला जाणार प्रथम जीवनगौरव पुरस्कार केदार टाकळकर यांना
पुणे, दि. ३० डिसेंबर : “ राष्ट्रभक्ती हा शब्द कोणत्याही धर्मांशी निगडीत नाही. राष्ट्र धर्म हे एक आचरण पद्धत असून प्रत्येक व्यक्तीने ते आपल्या आचरणातून दाखविणे गरजेचे आहे. तसेच राष्ट्र शक्ती सांभाळण्यासाठी सर्वांनी स्वतःचे आरोग्य सांभाळावे.”असे विचार भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थाचे अध्यक्ष अॅड. नंदू उर्फ सदानंद फडके यांनी व्यक्त केले.कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे, मराठी भाषा संवर्धन समिती आणि चॅम्पियन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी साहित्याचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान या विषयावर पाचवे राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन २०२२ चे आयोजन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सभागृह, पुणे येथे करण्यात आले. त्यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
यावेळी अखिल भारतीय साहित्य परिषद, पुणे शाखेचे श्याम भुर्के, चॅम्पियन अकॅडमीचे राजकुमारसिंह सोळंकी, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त अॅड. नंदिनी शहासने, पुणे मनपाचे सह. महा आयुक्त व मराठी भाषा संवर्धन समितीचे सचिव शिवाजी दौंडकर, ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. माधव पोतदार, मंजिरी शहासने आणि देशभक्तकोषकार चंद्रकांत शहासने उपस्थित होते.
याप्रसंगी साहित्य,शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे केदार टाकळकर यांना कवयित्री कै. सौ.उर्मिलाताई कराड जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने प्रकाशित पर्यावरण व राष्ट्रभक्ती या विषयावरील १८ पुस्तके व स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
अॅड. नंदू उर्फ सदानंद फडके म्हणाले,“ व्यक्तीचे अंतिम उद्देश राष्ट्र भक्ती असावी. त्यासाठी जे जे साहित्य त्यासाठी लागेल त्यालाच खरी देशभक्ती असे म्हणू शकतो. साहित्य या शब्दाचा विचार संहिता आणि ऋग्वेदात सुद्धा संहिता असा अर्थ बोध होतो. परंतू संहिता याचा अर्थ संविधान असा होतो तो केवळ साहित्यापुर्ता मर्यादित न ठेवता राष्ट्रभक्ती पर्यंत ठेवावा. ”
राजकुमार सिंह सोळंकी म्हणाले,“ राष्ट्र निर्मितीसाठी व देशसेवेसाठी सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्तीचे बीज रूजविणे गरजेचे आहे. या देशाला अशा शास्त्रज्ञांची गरज आहे ज्यांच्यामध्ये देशभक्ती असेल. त्यांना पाहून येणारी पिढी ही आपला अभ्यास सांभाळून देश सेवा करतील. या संमेलनात देश सेवा कशी करता येईल हे शिकायला मिळाले. त्यामुळेच देशाला या सारख्या संमेलनाची गरज आहे.”
चंद्रकांत शहासने म्हणाले,“वृक्ष लागवड,वृक्ष संवर्धन व पर्यावरण रक्षण ही देखील एक राष्ट्रभक्ती आहे. असा संदेश समाजापर्यंत पोहचविल्यास मोठी चळवळ उभी राहिल. त्यासाठी राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ साहित्यिका व कवयित्री उर्मिला विश्वनाथ कराड यांनी पहिल्या संमेलनापासून त्यांचे समर्थन होते.”
अॅड. नंदिनी शहासने यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने मराठी साहित्याचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, बलिदानाचा इतिहास आणि १२०० क्रांतीकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शानाची माहिती दिली.
अनिल गोरे यांनी उपस्थितांना सांगितले की, मराठीभाषेतून गणित आणि विज्ञान अत्यंत सोप्या भाषेत शिकता येते.
श्याम भुर्के यांनी स्वागतपर भाषण केले.
माधुरी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. मंजिरी शहासने यांनी आभार मानले.