नागपूर, दि. २९ : राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) भेट देऊन त्याची पाहणी केली. द सॉल्ट एव्हिएशन व कौशल्य विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथे सुरू असलेल्या एरॉनॉटिकल स्ट्रक्चर अॅण्ड इक्युपमेन्ट फिटर या व्यवसायाला त्यांनी भेट दिली. फ्रान्स येथील प्रशिक्षक तसेच आयटीआय विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी बदलत्या काळाला अनुषंगिक असलेला हा अनोखा अभ्यासक्रम आयटीआयमध्ये सुरु करण्यात आल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. सध्या एव्हिएशन क्षेत्रात प्रचंड रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने हा अभ्यासक्रम नाशिक व पुणे येथेही सुरु करण्याबाबत मंत्री श्री. लोढा यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
मंत्री श्री. लोढा म्हणाले की, एव्हिएशन क्षेत्रात अल्प मुदतीचे अभ्यासक्रम जास्तीत-जास्त राबविण्याबाबत व त्यातून रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पाऊले उचलणे आवश्यक आहे. त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम संपूर्ण राज्यातील आयटीआयमध्ये सुरू करावेत, जेणेकरुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्थानिक रोजगार मिळाल्यास त्यांना शहरामध्ये रोजगारासाठी येण्याची गरज भासणार नाही. त्याद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सशक्त भारताचे स्वप्न साकार होईल, असेही श्री. लोढा म्हणाले.
इंग्रजीसोबतच जर्मन, फ्रेंच, जपानी भाषेचे प्रशिक्षण
देशाबाहेरील रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी आयटीआयच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी सोबतच फ्रेंच, जपानी व जर्मन भाषेचे प्रशिक्षण सुरू करावे. विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेल्या विविध भाषातज्ज्ञांचे ऑनलाईन वर्ग घेण्याबाबत मदत घेण्याबाबत तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. आयटीआयमध्ये सर्व महापुरुषांच्या जयंती साजरी करुन त्यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांकडून भाषणे आयोजित करावीत, जेणेकरुन विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनचरित्रामधून प्रेरणा मिळेल, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.
यावेळी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी, दसॉल्ट एव्हिएशनचे समन्वयक मयुर याउल, सहसंचालक श्री. देवतळे, विशेष कार्य अधिकारी श्री. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.