Home Blog Page 1477

अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात मुंबई भाजपाचे ‘गोमुत्र पाजा’ आंदोलन

मुंबई :
धरण बहाद्दर अजित पवारांचा जाहीर निषेध..! संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्यास नकार देणाऱ्या अजित पवारांना पाकिस्तानात पाठवा, राजीनामा द्या, राजीनामा द्या, धरणवीर राजीनामा द्या…! अश्या घोषणा देत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांविरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुंबई भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मंगळवारी दादर पूर्व येथे ‘गोमुत्र पाजा’ आंदोलन केले. यापुढील काळातही मुंबईतील विविध भागात आंदोलने करण्याचा इशारा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत, असे वक्तव्य केले होते. त्याचा समाजाच्या सर्व स्तरांतून निषेध आणि संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन करत अजित पवार यांचा तीव्र निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. छत्रपती संभाजी महाराजांनी नरकयातना भोगूनही धर्मांतर केले नव्हते. त्यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी कार्य केले होते. त्यामुळे अजित पवार यांचे वक्तव्य निंदनीय आहे, असे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी सांगितले.

या आंदोलनात माजी नगरसेविका नेहल शहा, राजेश्री शिरवडकर, महादेव शिवगण, राजेश्री पालंडे, निर्मला सिंग, अजित सिंग, श्रीनिवास शुक्ला, निरज उभारे, विलास आंबेकर, विजय डगरे, बबलू पांचाळ, राहूल वाळंज, संतोष गुप्ता, अक्षता तेंडुलकर, गोवर्धन चौहान सहभागी झाले होते.

बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार रामहरी कराड यांना जाहीर-मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्य मुंबईचे पुरस्कार जाहीर

पुणे, दि. ३ जानेवारी: पत्रकारीता क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार २०२३ हा पुरस्कार पुणे येथील दै. नांदेड एकजूटचे प्रतिनिधी रामहरी तुळशीराम कराड यांना जाहीर झाला आहे. अशी घोषणा मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्य मुंबई याचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी केली.
संस्थेचा २२ वा वर्धापण दिन सोहळा व पत्रकार दिनाचे औचित्य साधत अन्य पुरस्कारांची घोषणा केली आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार दि. ६ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ४ वा. मुंबई मराठी ग्रंथ संग्रालय, डॉ. सुरेंद्र गावस्कर सभागृह , शारदा सिनेमा जवळ, नायगाव, दादर,(पुर्व), मुंबई येथे संपन्न होणार आहे.
ठाणेचे आमदार संजय केळकर, मुंबई येथील माहिती व जनसंपर्क महासंचानालय चे संचालक हेमराज बागूल आणि नगरपाल डॉ. जगनाथराव हेगडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  अध्यक्षस्थानी दै. प्रहारचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर असतील.
या व्यतिरिक्त कै. यशवंत पाध्ये स्मृती पुरस्कार २०२३ ज्येष्ठ पत्रकार सहार बिराडे( दै. लोकसत्ता वसई विहार,मुंबई), तर ज्येष्ठ पत्रकार, लेकख साहित्यिक डॉ. सकृत खांडेकर यांना जीवन गौरव पुरस्कार २०२३ व गंगाधार म्हात्रे (आदिवासी सेवक विरार) यांना घोषित करण्यात आला आहे.
तसेच पत्रकार भूषण पुरस्कार २०२३
अरूण सुरडकर(दै. सामपत्र, औरंगाबाद), भारत शंकरराव गड्डेवार, (सहसंपादक दै. नांदेड एकजूट नांदेड),   दिलीप जाधव (प्रतिनिधी दै. रत्नागिरी टाईम्स) व दिपक सोनवणे, (दै. नवनगर, नवी मुंबई) यांना जाहीर करण्यात आला आहे.

संपकाळातही अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबईदि.०३ जानेवारी २०२३: महावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडलातील कार्यक्षेत्रामध्ये अदानी इलेक्ट्रीकल्स कंपनीने वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेल्या परवान्याच्या विरोधात राज्याच्या वीज कामगार संघटनांनी आज मध्यरात्रीपासून तीन दिवसांच्या पुकारलेल्या संपकाळात राज्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणने संपूर्ण तयारी केली आहे.

वीजपुरवठ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडल व मंडल कार्यालयाच्या ठिकाणी संनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आली असून हे नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. कंपनीने ठरवून दिलेली कामे न करणाऱ्या अधिकारी व कर्मचा-यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार  आहे. रजेवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्वरीत कामावर रूजू होण्याचे आदेश देण्यात आले  आहे. संपकाळात वीजपुरवठा अखंडित व नियमित ठेवण्याकरिता महावितरणने नियुक्त केलेल्या एजन्सीचे कामगार, कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त झालेले अभियंता व कर्मचारी यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत निरीक्षक व महाऊर्जा या विभागातील अभियंत्यांना या संपकाळात विविध उपकेंद्राच्या ठिकाणी नेमण्यात येणार आहे. महावितरणतर्फे नियुक्त करण्यात आलेल्या ज्या एजन्सी या संपकाळात काम करणार नाहीत अशा एजन्सीना तात्काळ बडतर्फ करण्याचे निर्देश देण्यात आले असून वीजपुरवठा सुरळित ठेवण्यासाठी ज्याठिकाणी साहित्याची आवश्यकता भासणार आहे. अशा ठिकाणी  आजच साहित्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या अभियंता, तंत्रज्ञ, कर्मचारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवार दि. ४ जानेवारीच्या शून्य तासांपासून ६ जानेवारीपर्यत  संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरण संपूर्ण काळजी घेत असून याउपरही वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्र. 1800-212-3435/1800-233-3435/1912/19120 यावर संपर्क साधावा. संपात सहभागी असलेल्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या उपस्थित उद्या दि. ४ जानेवारी रोजी दुपारी १.०० वा. सह्याद्री अतिथी गृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपला प्रस्तावित संप मागे घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी २५०० मेगावॅटचे सौर ऊर्जा प्रकल्प

मुंबईदि.०३ जानेवारी २०२३: उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने’च्या अंमलबजावणीवर भर देण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार महावितरणने राज्यात अडीच हजार मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना चालना दिली असून राज्यात ५४६ मेगावॅटचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यरत झाले आहेत तर ऊर्वरित प्रकल्पांपैकी काही अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर तर काही निविदाप्रक्रियेत आहेत, अशी माहिती अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

ते म्हणाले की, महावितरणने शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यासाठी घेतलेल्या पुढाकारापैकी एकूण ५४६ मेगावॅट वीज निर्मितीचे विविध प्रकल्प सुरू झाले असून त्यांचा लाभ ९०,००० शेतकऱ्यांना मिळत आहे. एकूण सुमारे एक हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीच्या विविध प्रकल्पांच्या निर्मितीचे काम वेगवेगळ्या टप्प्यांवर सध्या चालू आहे. महावितरणच्या पुढाकाराने एकूण ५५० मेगावॅट वीज निर्मितीच्या विविध सौर ऊर्जा प्रकल्पांसाठीची निविदा जारी झाली असून त्याची मुदत १६ जानेवारी आहे. या खेरीज ४५० मेगावॅट वीज निर्मितीच्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठीची आणखी एक निविदा जारी झाली असून त्याची मुदत ३० जानेवारी आहे. अशा रितीने एकूण अडीच हजार मेगावॅट विजेची सौर ऊर्जेद्वारे निर्मिती करून ती वीज शेतकऱ्यांना दिवसा पुरविण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे. मंजुरीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वर्षभरात हे प्रकल्प पूर्ण होऊन लाखो शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल.

त्यांनी सांगितले की, सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यातील सर्वात मोठा अडथळा जमिनीच्या उपलब्धतेचा आहे. या योजनेत एक ते दहा मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यासाठी वीज उपकेंद्रापासून जास्तीत जास्त पाच किलोमीटर अंतरापर्यंतची जमीन आवश्यक असते. शेतकऱ्यांसाठीच्या या वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी ग्रामपंचायतींच्या ताब्यातील सरकारी जमीन घ्यावी, अशी सूचना मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. जमीन तातडीने मिळविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणचे अधीक्षक अभियंता, नगररचना विभागाचे सहायक संचालक आणि महाऊर्जाचा प्रतिनिधी अशी समिती नियुक्त करण्यात आली. महावितरण आणि महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राज्यभरातील अशी ग्रामपंचायतींची ३५०० एकर जमीन निश्चित केली, त्यापैकी प्रकल्पासाठी उपयुक्त सुमारे २१०० एकर जागेवर एकूण ५५० मेगावॅट क्षमतेचे सौर उर्जानिर्मिती प्रकल्प उभारता येतील. याखेरीज आणखी ३१२३ एकर जमीन निश्चित केल्यामुळे त्यापैकी प्रकल्पासाठी उपयुक्त सुमारे १७०० एकर जागेवर एकूण ४५० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येतील.

महावितरणच्या पुढाकाराने जारी झालेल्या एकूण ५५० व ४५० मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीच्या निविदांना मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाची मंजुरी घेण्यात येईल. त्यानंतर महावितरण संबंधित कंपन्या, विकासक आणि शेतकऱ्यांसोबत विद्युत खरेदी करार करेल. करारानंतर प्रकल्प उभारणीचे काम सुरू होईल. एक वर्षात प्रकल्प उभारून त्यामध्ये तयार झालेली वीज शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे.

सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पांसाठी अधिक जागा उपलब्ध करण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. विजय सिंघल स्वतः जिल्हाधिकारी स्तरावर पाठपुरावा करत आहेत.शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी सामान्यतः रात्री वीज पुरवली जाते. पण त्यामुळे त्यांना शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी रात्री जागरण करावे लागते तसेच अंधारात साप, विंचू चावण्याचा धोका असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याला शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार सौर ऊर्जा प्रकल्पांना चालना देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरविणे, महावितरणला किफायतशीर भावात वीज मिळणे आणि पर्यावरण रक्षणाला मदत करणे असा लाभ होणार आहे.

रुग्णसेवेची शपथ घेत नर्सिंगच्या विद्यार्थीनींनी केले लॅम्प लायटिंग

पुणे : नर्सिंग क्षेत्राशी जोडल्या जाणा-या नव्या परिचारिका सर्वात आधी द नाइटिंगल प्लेज ही रुग्णांच्या सेवेशी निगडीत प्रतिज्ञा घेतात. तसेच यावेळी ज्याप्रमाणे जगातील पहिली परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी मेणबत्ती घेऊन रुग्णांची सेवा केली, त्याचप्रकारे आपण देखील रुग्णांची अविरतपणे सेवा करू व त्यांचा आयुष्यातील अंधार दूर करून त्यांना प्रकाशाकडे नेऊ यासाठी लॅम्प लायटिंग करून शपथ घेतली जाते. अशीच शपथ रुग्णसेवा करीत आपले कार्य प्रामाणिकपणे बजावण्यासाठी नर्सिंगचा कोर्स करणा-या विद्यार्थीनींनी घेतली.  
न-हे येथील कै.उद्धवराव तुळशीराम जाधवर फाऊंडेशन संचलित जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सच्या  कॉलेज आॅफ नर्सिंग मधील नर्सिंगच्या विद्यार्थीनींचा लॅम्प लायटिंग करून शपथ ग्रहण कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर, नर्सिंगच्या प्राचार्या शितल निकम, उपप्राचार्या अनुश्री पारधी, समन्वयक श्वेता कुंभार यांसह प्राध्यापक, पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. 
अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, जगातील पहिली परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल या आधुनिक नर्सिंग आंदोलनाच्या जनक मानल्या जातात. त्यांचा जन्म १२ मे १८२० रोजी झाला. त्यांच्या जन्म एका समृद्ध आणि उच्चवर्णीय कुटुंबामध्ये झाला. उच्च कुटुंबात जन्माला आलेल्या फ्लोरेन्स यांनी सेवेचा मार्ग स्वीकारला. त्या काळच्या दवाखान्यातील भयानक परिस्थितीमुळे घरच्यांचा परिचर्येसाठी विरोध होता. परिवाराचा तीव्र विरोध असताना देखील त्यांनी अभावग्रस्त लोकांच्या सेवेचे व्रत घेतले. 
क्रिमिया युद्धामध्ये जखमी रुग्णांची त्यांनी खूप सेवा केली होती. या युद्धातील जखमी सैनिकांवर उपचार करून जेव्हा तज्ज्ञ डॉक्टर्स जात असत तेव्हा रात्रीच्या अंधारात मेणबत्तीच्या प्रकाशात त्या रात्रभर जखमी रुग्णांची सेवा, सुश्रुषा करीत असत. त्यामुळे या युद्धानंतर दया आणि सेवेची मूर्ती असलेल्या फ्लोरेन्स नाइटिंगेल द लेडी विथ द लॅम्प या नावाने प्रसिद्ध झाल्या. युद्धानंतर त्यांची प्रसिध्दी इग्लंडमध्ये देखील पोहोचली. यानंतर १९६० साली त्यांनी लंडनमध्ये नर्सिंग स्कूलची स्थापना केली. भारतीय सैनिकांमध्ये स्वच्छता या विषयावर त्यांनी खूप काम केले आहे. त्यामुळे १८७३ साली सैनिकांचा मृत्यूदर ६९ हून कमी होऊन प्रती हजार १८ एवढा झाला. त्यांचा मृत्यू १३ आॅगस्ट १९१० रोजी झाला. प्रत्येक वर्षी भारतात उल्लेखनीय कार्य करणा-या परिचारिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते नॅशनल फ्लोरेन्स नाइटिंगेल अ‍ॅवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित केले जाते.

छत्रपती संभाजी महाराज ‘स्वराज्य रक्षक’ च , धर्मवीर म्हणणाऱ्यांना ‘संभाजी ब्रिगेड’ जाहीर चॅलेंज; दम असेल तर पुरावे द्या… अन्यथा महाराष्ट्राची माफी मागा

धर्मवीर वाद खोटा, ही भाजप, RSS ची चाल. पुरावे असतील तर जाहीर चर्चा करा…

पुणे- छत्रपती संभाजी महाराज ‘स्वराज्य रक्षक’ होते याबद्दल पुराव्यानिशी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र समोर मांडायला तयार आहे. ज्यांना कुणाला वाटतं (भाजप, RSS) छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’ आहे त्यांनी संभाजी ब्रिगेडचे चॅलेंज एक्सेप्ट करावं व जाहीर इतिहासातील वादावर ‘परिसंवादाला’ तयार व्हावं. तुमच्यात दम असेल तर पुरावे द्या… अन्यथा महाराष्ट्राची माफी मागा असे उघड चॅलेंज संभाजी ब्रिगेडने आज पत्रकार परिषद घेऊन दिले आहे. यावेळी पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, सचिव संदीप कारेकर, प्रसिद्ध लेखक नवनाथ रेपे, महादेव मातेरे आदी उपस्थित होते.

ब्रिगेडचे संतोष शिंदे म्हणाले कि,’ छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते हे आम्ही पंचवीस वर्षापासून सांगत आलेलो आहोत. छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्या बुधभूषण ग्रंथ साहित्यातून स्वराज्य धर्म, मराठा धर्म व महाराष्ट्र धर्म सांगितला. त्यांनी कुठेही ‘धर्मवीर’ किंवा स्वतःच्या धर्माबद्दल लिखाण केलं नाही. कारण ‘छत्रपती’ हे सर्व धर्माचा आदर करणारे अद्वितीय रयतेचे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा संभाजी महाराज यांनी सक्षमपणे पुढे चालवला होता.

तथाकथित धर्ममार्तंडांनी छत्रपती संभाजी महाराजांचा आयुष्यभर छळ केला. संभाजी महाराजांना ज्यांनी पकडून दिलं, ज्यांनी शंभूराजेंना मारलं हेच आज साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा संभाजीराजे यांच्या नावावर त्यांच्या विचारांचा छळ करत आहेत. आजही पाठ्यपुस्तकात, कथा, कादंबऱ्या, नाटकातून छत्रपती संभाजी महाराजांना बदफैली, दारुडे असं ठरवून बदनाम केलं जात आहे. आरएसएसच्या भट्टीतले तथाकथित साहित्यिक लेखक आणि विचारवंत हे वारंवार शिवद्रोही भूमिका घेत आलेले आहेत. म्हणूनच खोटा इतिहास मांडला जात आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण, सात-सतक, नाईका भेद व नखशिक हे चार ग्रंथ लिहिले. त्यांना आठ भाषा येत होत्या, ते संस्कृत पंडित होते. मात्र हे कधीही कोणीही कुठेही सांगितलेलं नाही. असेही शिंदे म्हणाले .

गायत्री परिवारतर्फे युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या पुस्तकांच्या प्रदर्शनाचे ७ ते २२ जानेवारी दरम्यान आयोजन

पुणे : अखिल विश्व गायत्री परिवारतर्फे विचारक्रांती अभियानांतर्गत सेवा शांतिकुंज हरिद्वारचे युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य (१९११ ते १९९०) यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. ७ ते २२ जानेवारी २०२३ या कालावधीत बाजीराव रस्त्यावरील आचार्य अत्रे सभागृहात सकाळी ९ ते रात्री ९.३० या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे, अशी माहिती गायत्री परिवारचे राजेश टेकरीवाल, हेमंत जोगळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी हरिद्वार येथील प्रा. विश्वप्रकाश त्रिपाठी, गायत्री परिवाराच्या प्रतिभा मुळे, विनोद पटेल, पद्माकर लांजेवार आदी उपस्थित होते.
राजेश टेकरीवाल म्हणाले, “आचार्यांनी गायत्री मंत्राच्या साधनेद्वारे माणसाचे परिवर्तन घडवून यावे, त्याची प्रतिभा जागृत व्हावी, चांगले विचार व चांगल्या कर्माकडे माणसाचा प्रवास होत रहावा, त्यातून कुटुंब, समाज व राष्ट्र देखील सकारात्मक ऊर्जेने भरून जावे व विश्वातील सर्व घटकांनी भेदाभेद विसरून, एकत्र येऊन आपले कल्याण करून घ्यावे, या उद्देशाने जन्मभरात सुमारे ३२०० पुस्तकांचे लेखन केले.जीवनातील प्रत्येक समस्येवर उपाय सांगणारी ही पुस्तके आहेत. आत्मबल, मनोबल वाढवून तणावातून मार्ग कसा काढावा, याविषयी ही पुस्तके मार्गदर्शनपर आहेत. सामाजिक काम करणार्‍यांनाही ती उपयुक्त आहेत. हा सर्व द्न्यानाचा खजिना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विचारक्रांती अभियानाच्या माध्यमातून या पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. अतिशय सवलतीच्या दरात ही पुस्तके वाचकांना उपलब्ध होणार आहेत.”
हेमंत जोगळेकर म्हणाले, “आचार्यजींनी आपल्या लेखनातून मानवी समाजापुढे ‘मानवात देवत्वाचा उदय व पृथ्वीवर स्वर्गाचे अवतरण’ हेच ध्येय ठेवले आहे. देह ठेवण्याआधी सुमारे पाच वर्षे त्यांनी क्रांतिधर्मी साहित्य या नावाने विशेष पुस्तके लिहिली. त्याद्वारे येणाऱ्या नवीन युगासाठी त्यांनी मानवतेला उज्ज्वल भविष्याचा मार्ग  दाखवला आहे. युगऋषी पंडित श्रीराम शर्मा यांच्या पुस्तक प्रदर्शनाचे हे पाचवे वर्ष आहे. युगऋषी यांनी आपल्या ८० वर्षांच्या तपस्वी जीवनात ३२०० पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. याबरोबरच चार वेद, १०८ उपनिषदे, श्रुती व इतर ग्रंथांवर अभ्यास करुन सर्वसामान्यांना समजेल, अशा स्वरुपात त्याची मांडणी केली आहे.”
हे प्रदर्शन विद्यार्थी, समाजसेवक, अध्यात्म मार्गावरील साधक, देश प्रेमी, संस्कृती प्रेमी अशा सर्व लोकांसाठी नवीन प्रेरणा देऊन, योग्य मार्गदर्शन करणारे ठरेल असा आम्हाला विश्वास वाटतो. गायत्री महाविज्ञान हा हिंदीतील तीन खंडात असलेला- गायत्री मंत्र व साधना विषयीचा विश्वकोश समजला जाणारा- ग्रंथ मराठी भाषेत एकत्रित स्वरूपात या प्रदर्शनात उपलब्ध केला जाणार आहे. भारतीय संस्कृतीची बीजे तरुण पिढीमध्ये उतरावीत, यासाठी परिवाराच्या वतीने शाळा, महाविद्यालयांतून भारतीय संस्कृती ज्ञान परिक्षा आयोजित करण्यात येते. राजस्थान व छत्तीसगड या राज्यांनी तर ही परिक्षा शाळांमधून अनिवार्य केली आहे, असेही यावेळी नमूद करण्यात आले.

संपाच्या ७२ तासांमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आपत्कालीन व्यवस्था पूर्णत्वास

पुणे परिमंडलामध्ये पर्यायी मनुष्यबळाद्वारे २४ तास सेवा राहणार

पुणे, दि. ०३ जानेवारी २०२३: महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संघर्ष समितीने मंगळवारी (दि. ३) मध्यरा‍त्रीनंतर ७२ तासांचा संप पुकारला आहे. हा संप झाल्यास पुणे परिमंडल अंतर्गत आपत्कालीन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याद्वारे पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे तालुके व हवेली तालुक्यांमध्ये सर्वच ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी घेतली जात आहे.

दरम्यान, नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर २४ तास सज्ज आहे. काही तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व संपाच्या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

या संपाच्या पार्श्वभूमीवर पुणे परिमंडलामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून आपत्कालीन व्यवस्था उभारण्यास वेग आला आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल व संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनुसार पुणे परिमंडलस्तरावर कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये विविध उपाययोजनांसह विभाग, मंडल व परिमंडलस्तरावर २४ तास सुरु राहणारे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. दर तासाला वीजपुरवठ्याच्या स्थितीबाबत वरिष्ठ अधिकारी व मुख्यालयास कळविण्यात येणार आहे.

पर्यायी स्वरुपात मनुष्यबळ- राज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संघर्ष समितीमधील २९ विविध संघटनांनी हा संप पुकारला आहे. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठ्यास सर्वोच्च प्राथमिकता देण्यासाठी महावितरणकडून पर्यायी स्वरुपात मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत आहे. संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, बाह्य स्त्रोत कर्मचारी, महावितरणचे अप्रेंटिस, विद्युत सहायक, प्रशिक्षणार्थी अभियंता, देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या निवड सूचीवरील कंत्राटदारांचे कर्मचारी यांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. तसेच शासनाच्या विविध विभागातील सेवानिवृत्त विद्युत अभियंता व तांत्रिक कर्मचारी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत निरीक्षक कार्यालयामधील विद्युत अभियंता व कर्मचारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व विद्यार्थी यांच्याशी संपर्क करण्यात आला असून त्यांचे सहकार्य मिळणार आहे. बाह्य स्त्रोत कंत्राटदारांना अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करण्यात आली आहे. या सर्वांना पोलीस संरक्षण तसेच वाहन व्यवस्था, जेवण व इतर सुविधा महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

रोहीत्र, वीजवाहिन्यांसह इतर साधनसामुग्री उपलब्ध- संपकाळामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी प्रत्येक विभागात निवडसूचीवर असलेल्या सर्व कंत्राटदारांना आवश्यक साधनसामुग्री, मनुष्यबळ व वाहनांसह संबधीत कार्यालयांमध्ये उपलब्ध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच महावितरणकडून वितरण रोहीत्र, ऑईल, वीजतारा, केबल्स, वीजखांब, फिडर पिलर्स, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सेस, वाहतुकीसाठी वाहने आदी आवश्यक साधनसामुग्री महावितरणच्या विविध कार्यालयांमध्ये उपलब्ध ठेवण्यात आली आहे.

सर्व वरिष्ठ अधिकारी ‘ऑन फिल्ड’- पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश राऊत, श्री. सतीश राजदीप, डॉ. सुरेश वानखेडे यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते हे संपकाळात ‘ऑन फिल्ड’ असणार आहेत. विभाग ते परिमंडलस्तरीय नियंत्रण कक्षाशी २४ तास संपर्क ठेऊन कोणत्याही कारणास्तव खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यास सर्वोच्च प्राथमिकता देण्यात येणार आहे. यासोबतच महापारेषणचे वरिष्ठ अधिकारी व उपकेंद्रांशी समन्वय ठेवण्यात येत आहे.

शासनाच्या विविध विभागांचे सहकार्य- संपकाळात वीजग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरण व राज्य शासनाचे विविध विभागांमध्ये समन्वय सुरु झाला आहे. महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी विभागीय आयुक्त श्री. सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महानगरपालिका आयुक्त श्री. विक्रम कुमार (पुणे), श्री. शेखर सिंह (पिंपरी), पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार (पुणे), श्री. विनय कुमार चौबे (पिंपरी) यांना लेखी निवेदन देऊन संपाबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार संपाच्या आपत्कालीन परिस्थितीत महावितरण व शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून नागरिकांची गैरसोय होणार नाही याबाबत नियोजन करण्यात आले आहे. तसेच पोलीस विभागाला महावितरणचे कार्यालय व उपकेंद्रांची यादी देण्यात आली आहे. त्याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठीही दक्षता घेतली जात आहे. पोलीस संरक्षण दिले जात आहे. याकामी महावितरणचे सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी तसेच सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

घरगुतीसह अत्यावश्यक क्षेत्रात सुरळीत वीजपुरवठ्याची खबरदारी- संपकाळात प्रामुख्याने घरगुती ग्राहकांसह पाणी पुरवठा योजना, रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, शासकीय कार्यालये आदींचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. ज्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला त्या ठिकाणी सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून (बॅकफिड) वीजपुरवठा सुरू करण्यात येईल. या संपाची व्याप्ती मोठी असल्याने पर्यायी सेवा देणाऱ्या अभियंता व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे तसेच वीजपुरवठा संदर्भात काही तक्रारी असल्यास शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत.

भाजपा आ.लक्ष्मण जगताप यांचे कर्करोगाने निधन

पिंपरी, दि. ३ –नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष,महापौर ते आमदार असा प्रवास वेगाने केलेले पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे नेते लक्ष्मण पाडुरंग जगताप (वय-५९) यांचे आज सकाळी अखेर दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या एश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजूअण्णा जगताप असा मोठा परिवार आहे.आमदार जगताप हे गेली दोन वर्षांपासून आजारी होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची तब्बेत खालवत गेली. मार्च च्या शेवटच्या आठवड्यात कुटुंबियांनी उपचारासाठी त्यांना अमेरिकेत नेले होते. एप्रिल २०२२ मध्ये ते पुन्हा मायदेशी परतले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आले. नंतरच्या काळात त्यांची तब्बेत अधिक चिंताजनक झाली. प्रबळ इच्छाशक्ती मुळे अखेर पर्यंत त्यांनी मृत्युशी दोन हात केले. डॉक्टरांनी अगदी शर्थीचे प्रयत्न केले, पण अखेर सर्व उपाय संपले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.सांगवी येथील गणेश को-ऑपरेटिव्ह बँक, न्यू मिलेनियम स्कूल, प्रतिभा कॉलेज ऑफ सायन्स एन्ड कॉमर्स आदी संस्थांचे ते संस्थापक होते. पतंजली संस्था, हरिद्वारचे ते संस्थापक सदस्य होते. शहरातील अनेक संस्था, संघटनांचे ते आधारस्तंभ होते.

शहराच्या राजकारणात गेली ३५ वर्षे चार वेळा नगरसेवक, तीन वेळा आमदार राहिलेले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये आमदार जगताप यांच्यामुळे भाजपाची एकहाती सत्ता आली होती. पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील स्थानिक बलशाली राजकारणी अशी त्यांची ओळख होती . १९८६ मध्ये ते प्रथम नगरसेवक झाले. नंतर स्थायी समिती अध्यक्ष होण्याची संधी त्यांना मिळाली. सन २००० मध्ये ते शहराचे महापौर होते. पुढे हवेली विधानसभेसाठी प्रबेळ दावेदार म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते, पण विलास लांडे यांना संधी मिळाली होती. नंतर विधान परिषदेसाठी पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकित अपक्ष उमेदवारी करून त्यांनी काँग्रेसचे चंदूकाका जगताप यांचा पराभव केला होता. राज्यात ती निवडणूक खूपच गाजली होती. २००९ मध्ये चिंचवड विधानसभेसाठी त्यांनी अपक्ष उमेदवारी करून शिवसेनेचे आताचे खासदार श्रीरंग बारणे यांचा पराभव केला आणि विजयश्री खेचून आणली होती. नंतर मावळ लोकसभा मतदारसंघातून शेकापचे उमेदवार म्हणून त्यांनी अत्यंत कडवी झूंज दिली, पण तिथे श्रीरंग बारणे हे शिवसेनेकडून विजयी झाले. नंतरच्या काळात बदलती राजकिय समिकरणे लक्षात घेऊन त्यांनी राष्ट्रवादी सोडून सरळ भाजपामध्ये प्रवेश केला आणि चिंचवड विधानसभेतून आमदारकी केली. २०१९ मध्येही ते मोठ्या मताधिक्याने जिंकले आणि चौथ्यांदा आमदार झाले. २०१७ मध्ये अजित पवार यांच्या ताब्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व सूत्रे केवळ आमदार जगताप यांच्यामुळे भाजपाकडे आली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आमदार जगताप यांचे नाव मंत्री पदासाठी आघाडीवर होते.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

ठाणे, दि. ३ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

देशातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचा वारसा जपून आजच्या महिलांनी विविध क्षेत्रात आणखी भरारी मारावी, हेच सावित्रीबाई फुले यांना खरे अभिवादन असेल, अशा शब्दात मुख्यमंत्री महोदयांनी अभिवादन केले.

यावेळी तहसीलदार राजाराम तवटे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

विक्रमकुमार तुम्ही बघ्याची भूमिका न घेता “त्यांची” नावे जाहीर करा..नितिन कदम

पुणे – पुणेकरांना चांगले रस्ते देण्यासाठी महापालिकेने ५३ कोटीची निविदा काढली. पण या निविदा मर्जीतील ठेकेदारांना मिळाव्यात यासाठी दोन माजी सभागृहनेते, आमदार यांच्यात चढाओढ सुरू आहे. ही बाब धक्कादायक असल्याने प्रशासनाने यामध्ये बघ्याची भूमिका न घेता संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलचे नेते नितीन कदमांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

शहरातील रस्त्यांची कामे लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने होणे अत्यंत आवश्यक आहे. ही कामे करण्यासाठी ३०० कोटींच्या निविदाद्वारे कामे होणार आहेत. परंतू ही कामे मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधी अडथळे आणून निविदा प्रक्रियेला उशीर करत आहेत. त्यामुळे यातून लवकरात लवकर दिलासा मिळण्यासाठी प्रशासनाने बघ्याची भूमिका घेऊ नये. राजकीय दबाव झुगारून हस्तक्षेप करणाऱ्यांची नावे जाहीर करून कारवाई करा अशी राष्ट्रवादी अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम यांनी केली आहे.

पथ विभागाकडून प्रत्येक रस्त्यासाठी स्वतंत्र निविदा काढली जाते, पण यावेळी १० ते १५ रस्त्यांचे पॅकेज तयार करून एकत्र निविदा काढली आहे. या निविदेमुळे केवळ मोठे ठेकेदार समोर येणार त्यामुळे यात निकोप स्पर्धा होणार नाही. सध्याच्या राजकीय दबावामुळे किमान १० कोटीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच सर्व खातेप्रमुख, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता अशा महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या दालनात व पॅसेजमध्ये सीसीटीव्ही बसवा अशी मागणी कदम यांनी केली आहे.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्पांचा आढावा

पुणे, दि. २: पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज बैठक घेऊन पुणे महानगरपालिकेंतर्गत विविध प्रकल्पांचा आढावा घेत कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मनपा अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, उपवसंरक्षक राहुल पाटील, मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मुख्य अभियंता विजय कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सूर्यकांत मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी आंबेडकर चौक वारजे ते महात्मा कॉलनी रस्त्याचा आढावा, एकलव्य कॉलेज ते मुंबई- पुणे रस्ता, बालभारती ते पौड फाटा रस्ता, पंचवटी ते पाषाण सुतारदरा रस्ता याबाबत आढावा घेतला. जनतेच्या सोयीसाठी राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पांना गती द्यावी. कोठे भूसंपादनाचे अडथळे असतील तर सहमतीने मार्ग काढण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

आंबेडकर चौक वारजे ते महात्मा कॉलनी रस्त्याअंतर्गत विकास योजनेच्या मान्य विकास आराखड्यानुसार आंबेडकर चौक ते गोपीनाथ नगर कोथरुड पर्यंत ३० मी. डी. पी. रस्त्यांची लांबी सुमारे १ हजार ८०० मी. इतकी आहे. या रस्त्याच्या सद्यस्थितीमध्ये डोंगर उतार व मोठ्या प्रमाणात पातळी कमी जास्त आहे. त्यामुळे नवीन विस्तृत प्रकल्प अहवाल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा रस्ता झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. कोथरुड व कर्वेनगर भागातील प्रवासाचे अंतर कमी होवून कर्वेरस्ता (एन.डी.ए. रस्ता) रस्त्यावरील वाहतूक कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली.

एकलव्य कॉलेज ते पुणे मुंबई सेवा रस्ता १५ मी रुंदीचा आहे. या रस्त्याची लांबी शांतिबन चौक ते एकलव्य कॉलेज २५० मी व एकलव्य कॉलेज ते पुणे मुंबई सर्विस रस्त्यापर्यंत ३६० मी असा एकूण ६१० मी लांबीचा आहे. या लांबीपैकी एकूण विकसित झालेल्या रस्त्याची लांबी सुमारे ५४० एवढी आहे. विकसन न झालेल्या रस्त्याची बाधित मिळकत भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरु आहे. हा रस्ता विकसित झाल्याने चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास तसेच या रस्त्याच्या परिसरातील नागरिकांना प्रमथेश सोसायटीतील खाजगी रस्ता न वापरता सदर रस्त्याच्या वापर करून पुणे मुंबई सेवा रस्त्यास जाणे सोयीचे होणार आहे.

बालभारती ते पौड फाटा या ३० मी रुंद विकास आराखड्यातील रस्त्या रस्त्याची एकूण लांबी सुमारे २.१० कि.मी. आहे. हा रस्ता विकसित झाल्याने लॉ कॉलेज रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणेस मदत होणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. पंचवटी ते पाषाण सुतारदरा रस्त्याच्या अनुषंगानेही यावेळी आढावा घेण्यात आला.

बैठकीदरम्यान भिडे वाड्यातील पहिल्या मुलींच्या शाळेला राष्ट्रीय स्मारक करणे, पी.एम.सी. व स्वच्छ संस्थेचे मॉडेल व घनकचरा व्यवस्थापन, सिंहगड कॉलेज परिसर व आंबेगाव बु. येथील समस्यांबाबत बैठक, कोथरूड येथील गदिमा स्मारकाचे काम आदींबाबतही आढावा घेण्यात आला.
00000

अजित पवार यांनी माफी मागावी:भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक

पुणे-

वंदनीय छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

मुळीक यांच्या नेतृत्त्वाखाली आज शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने आज खंडोजीबाबा चौकात तीव्र निदर्शने केली. या वेळी ते बोलत होते.

मुळीक म्हणाले, ‘संभाजी महाराजांचे कर्तृत्व थोर आहे. त्यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणे विरोधी पक्षनेत्यांना शोभत नाही. शंभू राजांचा अपमान हा शिवछत्रपती घराण्याच्या कर्तृत्वाचा, माता जिजाऊंच्या संस्कारांचा आणि समस्त हिंदुजनांच्याअस्मितेचा अपमान असून, तो कदापि सहन केला जाणार नाही. अजित पवारांनी संपूर्ण देशाची माफी मागावी.’

युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, युवा मोर्चा अध्यक्ष बापू मानकर, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दिपक नागपुरे, संदिप लोणकर, प्रतिक देसरडा, दिपक पवार, राजू परदेशी, सुनील शर्मा, यांच्यासह नगरसेवक, शहर पदाधिकारी आणि युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.

येरवडा कारागृहात तीन कैद्यांचा मृत्यु

पुणे – येरवडा मध्यवर्ती कारागृहातील तीन कैद्यांचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दरम्यान, तिन्ही कैद्यांचे मृत्यु हे वेगवेगळ्या आजारपणातुन झाले असल्याचे कारागृह प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी येरवडा कारागृहात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

संदेश अनिल गोंडेकर (वय 26, रा. डोणजे, हवेली), शाहरूख बाबू शेख (वय 29, रा. कोंढवा), रंगनाथ चंद्रशेखर दाताळ (वय 32, रा. मोरगाव, बारामती) असे मृत्यु झालेल्या कैद्यांची नावे आहेत

आमदार अनिल भोसले यांना जामिन नाही, रेश्मा भोसले अद्यापही फरार

पुणे- शिवाजीराव भोसले बँक प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार अनिल भोसले यांनी उपचारांसाठी केलेला तात्पुरत्या जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर. एन. हिवसे यांनी हा आदेश दिला. या प्रकरणात भोसले यांची पत्नी रेश्मा भोसले अजून फरार आहे

आमदार भोसले यांनी त्यांना होणाऱ्या किडनीच्या आजारांचे उपचार ससून रुग्णालयात उपलब्ध नाहीत. ते उपचार केवळ रूबी आणि पूना हॉस्पिटल येथेच होत आहेत. तसेच प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तात्पुरता जामिन मिळावा, असा अर्ज केला होता.

या अर्जास सरकारी वकील विलास पठारे यांनी विरोध केला. मूळ फिर्यादी व गुंतवणूकदारांचे वकील सागर कोठारी याबाबत कामकाज पाहिले. भोसले एकाच वेळी उच्च न्यायालय मुंबई आणि विशेष न्यायालय पुणे येथे जामिनाचा अर्ज करून दोन्ही न्यायालयापुढे माहिती लपवून न्यायालयाची फसवणूक करीत असल्याचे ॲड. कोठरी यांनी निदर्शनास आणून दिले.तसेच ससून रुग्णालयाने दिलेल्या वैद्यकीय अहवालाबाबत आक्षेप घेतल्याने न्यायालयाने ही बाब ग्राह्य धरीत ससूनने दिलेल्या अहवालाबाबत देखील प्रश्नार्थक मत नोंदविले इतर बारा आरोपींना अद्याप अटक नाही या बाबी न्यायालयाने त्यांच्या निरीक्षणात नमूद केल्या आहेत. भोसले यांना उपचाराकरिता जामिनावर सोडण्याची गरज नसून, नियमानुसार सरकारी किंवा खासगी रूग्णालयात उपचार घेऊ शकतात, असा युक्तिवाद ॲड. पठारे यांनी केला.