पुणे – पुणेकरांना चांगले रस्ते देण्यासाठी महापालिकेने ५३ कोटीची निविदा काढली. पण या निविदा मर्जीतील ठेकेदारांना मिळाव्यात यासाठी दोन माजी सभागृहनेते, आमदार यांच्यात चढाओढ सुरू आहे. ही बाब धक्कादायक असल्याने प्रशासनाने यामध्ये बघ्याची भूमिका न घेता संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलचे नेते नितीन कदमांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
शहरातील रस्त्यांची कामे लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने होणे अत्यंत आवश्यक आहे. ही कामे करण्यासाठी ३०० कोटींच्या निविदाद्वारे कामे होणार आहेत. परंतू ही कामे मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधी अडथळे आणून निविदा प्रक्रियेला उशीर करत आहेत. त्यामुळे यातून लवकरात लवकर दिलासा मिळण्यासाठी प्रशासनाने बघ्याची भूमिका घेऊ नये. राजकीय दबाव झुगारून हस्तक्षेप करणाऱ्यांची नावे जाहीर करून कारवाई करा अशी राष्ट्रवादी अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम यांनी केली आहे.
पथ विभागाकडून प्रत्येक रस्त्यासाठी स्वतंत्र निविदा काढली जाते, पण यावेळी १० ते १५ रस्त्यांचे पॅकेज तयार करून एकत्र निविदा काढली आहे. या निविदेमुळे केवळ मोठे ठेकेदार समोर येणार त्यामुळे यात निकोप स्पर्धा होणार नाही. सध्याच्या राजकीय दबावामुळे किमान १० कोटीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच सर्व खातेप्रमुख, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता अशा महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या दालनात व पॅसेजमध्ये सीसीटीव्ही बसवा अशी मागणी कदम यांनी केली आहे.