Home Blog Page 1473

पावसकर अयशस्वी :पाण्याच्या नावाने बोंब अन मीटरच्या नोटीसा,सुलतानी कारभार थांबवा ,जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहाल तर खबरदार…

येत्या 72 तासात एरंडवणे परिसरातील पाणी प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन उभारणार-भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांचा इशारा ; जादा पाणी वापराच्या नोटिसांनी नागरिकांत तीव्र संताप
पुणे-महापालिकेने पुणेकरांना २४ तास पाणीपुरवठा करणार असे गोंडस आमिष दाखवून गेली ८ वर्षे पुणेकरांकडून दरवर्षी पाणीपट्टी वाढवून वसूल केली आहे. २४ तास तर सोडाच पण अजूनही कित्येक ठिकाणी २ ते ४./५ तास पाणी,काही ठिकाणी तेही दिवसाआड,काही ठिकाणी सकाळ संध्याकाळ ३ /३ तास अशा विषम स्वरूपात कुठे जादा प्रेशरने तर कुठे अत्यंत कमीप्रेशारणे पाणीपुरवठ्याचा कारभार सुरूच आहे. पुण्याच्या आमदारांनी विधानसभेत आवाज उठवून ही महापालिकेच्या पाणी वितरण व्यवस्थेत काडीमात्र फरक पडलेला नाही,ह .द राव नावाचे पाणीपुरवठा प्रमुख गेल्यानंतर या विभागाची अवस्था निव्वळ खाव खुजाव बनली आहे. आजपर्यंत सत्ताधारी असलेल्या काही पदाधिकाऱ्यांना सांभाळून या विभागाच्या प्रमुखांनी एकंदरीत तोच कारभार आता प्रशासकीय कारभारात देखील सुरु ठेवला आहे. शहराच्या उपनगरात पाण्याची बोंब होते आहेच .आता नळस्टॉप, सहकार वसाहत, पं.नेहरू वसाहत,दहा चाळ, (गणेशनगर) व एरंडवणे परिसरातील नागरिक कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठा व अपुऱ्या पुरवठयामुळे त्रस्त झाले आहेत, आणि या साठीच वारंवार आश्वासने घेऊन वैतागलेल्या सत्ताधारी भाजपच्या प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी आयुक्तांना उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

खर्डेकर यांनी सांगितले कि,’ या भागातील पाण्याच्या समस्येबाबत स्थानिक अधिकारी, कर्मचारी – “एस एन डी टी टाकीची लेव्हल राखली जात नसल्याने व एल अँड टी ची 6 इंची लाईन जोडणी पूर्ण न झाल्याने पाणी कमी दाबाने व कमी वेळ येत असल्याचे” सांगितले. याबाबत 15 दिवसापूर्वी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्याशी विस्तृत चर्चा केली होती,त्यांनी त्वरित प्रश्न सोडविण्याचे मान्य केले होते,मात्र अद्याप पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही.त्यामुळे येत्या 72 तासात पुरवठा सुरळीत न झाल्यास हंडा मोर्चा वा अन्य मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा आम्ही दिला आहे.

जादा पाणी वापराच्या नोटीसा म्हणजे पावसरांचा तुघलकी कारभार :
एकीकडे पाण्याचीच बोंब असताना,उन्हाळा नसताना,थंडीचे दिवस असताना,धरणात मुबलक पाणी साठ असताना “तुम्ही जादा पाणी वापर करत आहात व तुमच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल अश्या स्वरूपाच्या नोटीसा पाठविल्या जात आहेत. याबाबत अनिरुद्ध पावसकर यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार नागरिकांना आवाहन देखील केले आहे, मात्र याबाबत नागरिकांना घाबरवणे सोडून प्रशासनाने लोकशिक्षणावर तसेच जादा वापराची कारणे शोधण्यावर भर द्यावा अशी आग्रही मागणी ही यनिमित्ताने केली असल्याचे खर्डेकर यांनी सांगितले.

अद्याप मीटर नुसार बिलिंग नाही,पण घाबरवून सोडण्याचे पालिकेचे अण्वस्त्र

खर्डेकर पुढे म्हणाले कि,’ जादा पाणी वापराबाबत नोटीसा आल्यावर नागरिकांना केलेले आवाहन आपल्या भागात जेथे L & T च्या 24×7 योजनेअंतर्गत लाईन टाकण्यात आली आहे व जेथे मीटर बसविण्यात आले आहेत, तेथे मनपा ने trial basis वर पाणी वापराचा अभ्यास केला असता काही ठिकाणी जादा पाणी वापर होत असल्याचे निदर्शनास आले असून अश्या मिळकतींना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. अद्याप मीटर नुसार बिलिंग केले जात नाही हे आधी समजून घ्या. भावी काळात 24×7 अस्तित्वात आल्यावर विजेप्रमाणे पाण्याचा जेवढा वापर तेवढेच बिल हे अंमलात येईल. त्यासाठी trial उपयुक्त ठरेल. आता जादा पाणी वापर म्हणजे फक्त प्यायला किंवा आंघोळीला वापरले असे होत नाही जादा पाणी वापर हा….
💧 पाण्याची टाकी जुनी असल्यास टाकीला गळती लागते व ती वरकरणी दिसत नाही तर खाली पाणी झिरपत असते.
💧 अनेक ठिकाणी बॉल कॉक नसल्याने टाक्या वाहताना दिसतात जे जादा पाणी वापराचे मुख्य कारण असू शकते
💧 कमोड च्या फ्लश मधून जादा पाणी वापर, सोसायटीतील गाड्या धुवायला पिण्याच्या पाण्याचा वापर, बागेत सर्रास पिण्याच्या पाण्याचा वापर, अशी कारणे देखील असू शकतात
तरी याबाबत महापालिकेने आपल्या स्तरावर जादा पाणी वापराचे कारण शोधावे – मनपा अन्याय करत असल्यास माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आणि मी असे दोघेही महापालिकेच्या विरोधात तीव्र संघर्ष करू याचे भान संबधित अधिकाऱ्यांनी ठेवावे.

वाफगावचा किल्ला संवर्धित करावा – भूषणसिंहराजे होळकर

राजगुरूनगर (ता.खेड) – महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेला वाफगावचा  भुईकोट किल्ला सुभेदार मल्हारराव होळकर यांनी बांधून घेतला होता. पुण्यश्लोक अहल्यादेवी यांच्या वास्तव्याने ही वास्तू पावन झाली आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार वाफगावचा किल्ला आजही दुर्लक्षित, उपेक्षित आहे. त्याचे जतन, संवर्धन व्हावे यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्यामुळे परिसराचा विकास होईल, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील अशी भावना होळकर राजघराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी व्यक्त केली.

किल्ले वाफगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन सोहळा गजी नृत्य, मर्दानी खेळ, शस्त्र-अस्त्र प्रदर्शन, ढोलवादन व भंडाऱ्याच्या उधळणीने मोठ्या उत्साहात पार पडला. या वर्षी कर्तृत्ववान महिलांना राज्याभिषेकाची संधी देण्यात आली होती. खेडच्या तहसीलदार वैशाली वाघमारे, स्नेहल धायगुडे, उज्ज्वला हाक्के, पूजा मोरे, ललिता पुजारी, संगीता पाटील यांनी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला. यावेळी बडोद्याचे सरदार देवेंद्र पांढरे, निरावागास सरदार देवकाते, चौंडीचे सरदार शिंदे, आमदार प्रकाश आव्हडे, आमदार रामराव वडकुते, आमदार गोपीचंद पडळकर, आण्णा पाटील उपस्थित होते.

महाराजा यशवंतराव होळकर यांचे भारतीय इतिहासातील योगदान अद्वितीय आहे. इंग्रजांचा त्यांनी अनेक वेळा पराभव केला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची बीजे लढवय्या मनात पेरली. महाराजांशी बिनशर्त संधी  करण्याची इंग्रजांची मानसिकता होती. मात्र महाराजा यशवंतराव होळकर यांना स्वतंत्र हिंदुस्थान हवा होता, हा इतिहास तरुणांना प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातीं आणि बारा बलुतेदार यांना एकत्र घेवून स्वराज्य निर्माण केले. कोणत्याही जातीचा विचार या महापुरुषांनी केला नव्हता. या महापुरुषांनी राष्ट्रासाठी काम केले त्यांना धर्मात अडकू नका. ऐतिहासिक स्थळांचा आणि महापुरुषांच्या नावाचा वापर करून जे राजकारण सुरू आहे ते थांबले पाहिजे असे प्रतिपादन भूषणसिंहराजे होळकर यांनी यावेळी केले.

सारे आपल्याच हातात ठेवायचे म्हणून महापालिका निवडणुका घेत नाहीत-अजित पवारांनी केला आरोप

3 दिवस झोपा काढल्या नंतर यांना कळले सभागृहात माझे शब्द चुकले म्हणून..

पुणे- छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मी नागपूरच्या अधिवेशनात बोललो तेव्हा भाजपचे सारे नेते सभागृहात होते तेव्हा कोणी काही बोलले नाही,३ दिवस झोपा काढल्या नंतर समजले माझे शब्द चुकले..असले राजकारण करता..? मी काही चुकलो नाही.आता बघा १ वर्षे उलटली तरी महापालिकेच्या निवडणुका घेईनात,आमच्या काळात आम्ही आरक्षण,वगैरे सर्व गोष्टी पाहिल्या नंतर हे जून मध्ये आलेत,पावसाळा हे कारण दिले गेले आता तो हि गेला, आता जानेवारी आला,आता तरी घ्या ना निवडणुका ?यांना निवडणुका घ्यायच्या नाहीत सारेच आपल्या हातात ठेवायचे असा स्पष्ट आरोप काल येथे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.धाडसी,निर्णय घेणारे लोकप्रतिनिधी फक्त राष्ट्रवादीतच असल्याचा दावा त्यांनी करत येथे दक्षिण पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले.

पहा आणि ऐका अजित पवार यांचे संपूर्ण भाषण …

(बोलण्याच्या ओघात अनावधानेचूक:तरीही तातडीने दिलगिरी-बोलण्याच्या ओघात अनावधाने यावेळी अजित पवारांनी भाषणात ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ ऐवजी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर’ असा उल्लेख केला.हे लक्षात येताच भाषणानंतर चुकीच्या उल्लेखाबद्दल त्यांनी दिलगीरी व्यक्त करत आपली चूक कबूल केली आहे.)

स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांनी नवीन विषयांचे अभ्यासक्रम तयार करावे-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांनी नवीन विषयांचे अभ्यासक्रम तयार करावे. जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून नोकरी आणि उद्योजतेच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असे सांगून या विद्यापींठानी आपली सूची तयार करावी, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज स्वयंम अर्थसहाय्यीत विद्यापीठांच्या अडचणी संदर्भात मुंबई विद्यापीठात बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार सतेज (बंटी) पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाचे कुलगुरू तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री श्री. पाटील म्हणाले, वैद्यकीय शिक्षण आणि कृषिविषयक शिक्षणाचे अभ्यासक्रम सुरू करण्यातबाबत संबधित विभागाचे मंत्री यांच्या सोबत लवकरच बैठक घेण्यात येईल. विद्यापीठाच्या जागेबाबत विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. या विद्यापीठांसाठी गठित केलेल्या समितीने पुढील अधिवेशनापूर्वी अहवाल सादर करावा.तसेच विद्यापीठांच्या कुलगुरू यांची निवड विद्यापीठ अनुदान आयोगाने विहित केलेल्या नियमाप्रमाणे करावी. अशा सूचनाही यावेळी दिल्या. या बैठकीत स्वयंअर्थसहाय्यित विद्यपीठाबाबतचा कायदा व विद्यापीठाच्या अडचणी, विद्यापीठावरील नियंत्रण, नॅक मूल्यांकन कालावधी, शुल्क रचना या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या अडचणीसंदर्भात सादरीकरण करण्यात आले.

प्राजक्ता माळी घेऊन आली आहे, “प्राजक्तराज” पारंपरिक मराठी साज…


राज ठाकरे व महाकादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते वेबसाईटचे अनावरण .

मुंबई: आपल्या बहुरंगी अभिनयाने, सूत्रसंचालन, नृत्याने प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या प्राजक्ता माळीने अल्पावधीतच आपली एक वेगळी छबी निर्माण केली. ‘प्राजक्तप्रभा’ या काव्यसंग्रहातून आपल्याला प्राजक्तामध्ये दडलेली एक संवेदनशील कवयित्रीही दिसली. आता प्राजक्ता एका नवीन पर्वाला सुरुवात करत असून ‘प्राजक्तराज’ हा पारंपरिक मराठी साज घेऊन ती आपल्या समोर आली आहे. अस्सल मराठमोळ्या अलंकारांची श्रीमंती, पारंपरिक, घरंदाज आभूषणांच्या या नवीन शृंखलेच्या वेबसाईटचे; महाराष्ट्राचे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि कला- इतिहासप्रेमी मा. श्री . राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाकादंबरीकार, इतिहास प्रेमी व अभ्यासक विश्वास पाटील उपस्थित होते. महाराष्ट्राच्या विविध भागातील आभूषणे ‘प्राजक्तराज’च्या माध्यमातून तीने जगभरातील आभूषणप्रेमींसाठी आणली आहेत.

या वेळी प्राजक्ताला तिच्या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, प्राजक्ताने ‘प्राजक्तराज’ हा स्वतःचा जो ब्रँड उभा केला आहे, त्यासाठी तीचे अभिनंदन. तीने जे दागिने दाखवले त्यांची माहिती मलाही नव्हती. तिची या संकल्पनेमागची भावना, हेतू खरंच कौतुकास्पद आहे. आपल्याला आपल्याच काही गोष्टींचा इतिहास माहीत नसतो. प्राजक्ताप्रमाणेच पुढील पिढीही आपला पारंपरिक, मौल्यवान ठेवा, दागिने त्यांच्या पुढील पिढीला सांगण्यासाठी जोपासतील.‘’

प्राजक्ताचे कौतुक करताना महाकादंबरीकार विश्वास पाटील म्हणाले, ‘’कोणतीही कृती करण्यासाठीचे मूळ हे रक्तातच असावे लागते. प्राजक्ता ही महाराष्ट्रातील मुलगी आहे. त्यामुळे मराठी परंपरा जपण्याचे मूळ हे तिच्या रक्तातच आहे. तिने उचललेले हे पाऊल स्तुत्य आहे. तिच्या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात ‘प्राजक्तराज’ पोहोचावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे. ‘’

आपल्या या नवीन प्रवासाबद्दल प्राजक्ता माळी म्हणते,
”दागिन्यांचा स्वतःचा ब्रॅण्ड काढेन, हा विचारही कधी मनात नव्हता. भावाच्या लग्नादरम्यान दागिन्यांबाबत काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. एक जाणवले ते म्हणजे आपले पारंपरिक दागिने लोप पावत आहेत. ध्यानीमनी नसतानाही हा नवीन प्रवास सुरू झाला आणि त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. अनेक तज्ज्ञांची, जाणकारांची मदत घेतली आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक दागिन्यांचा अस्सलपणा जपण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. ‘प्राजक्तराज’ हे नावही अतिशय समर्पक आहे. राजेशाही थाटाचा हा नजराणाच आहे. ‘प्राजक्तराज’च्या माध्यमातून तुम्हाला महाराष्ट्रातील अस्सल पारंपरिक दागिने मिळतील. या दागिन्यांवर आधुनिकतेचा साज नसेल आणि हीच ‘प्राजक्तराज’ची खासियत असेल. आज माननीय श्री. राज ठाकरे व श्री. विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत ‘प्राजक्तराज’चा लोकार्पण सोहळा होत आहे. माझ्यासाठी ही मोठी गोष्ट आहे. सध्या ही आभूषणे वेबसाईटवर उपलब्ध असली तरी लवकरच काही प्रदर्शनांमध्येही हे अलंकार विक्रीसाठी उपलब्ध होतील. जेणे करून महाराष्ट्राची संस्कृती कानाकोपऱ्यात पोहोचेल. लवकरच आम्ही पुरुषांसाठीही अलंकार घेऊन येऊ. याशिवाय अनेक कल्पना आहेत, ज्या हळूहळू आपल्या समोर येतीलच. ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या अभिनयावर, नृत्यावर, कवितासंग्रहावर प्रेम केले, तसेच प्रेम, प्रतिसाद तुम्ही ‘प्राजक्तराज’वरही कराल, अशी अपेक्षा बाळगते.”

शाकंभरी पौर्णिमेनिमित्त दत्तमंदिरात फळ आणि भाज्यांची आकर्षक आरास 

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे आयोजन ; भाविकांची गर्दी
पुणे : मटार, पालक, गाजर, मुळा, टोमॅटो, लसूण, बटाटे, कणीस यांसारख्या भाज्यांसह द्राक्ष, डाळींब, संत्रे, खरबूज, कलिंगड आणि सफरचंदासारख्या अनेक फळांची आकर्षक आरास लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात करण्यात आली होती. विविध प्रकारच्या भाज्यांनी सजलेले मंदिरातील खांब, विविधरंगी फळांचे तोरण आणि कळसापासून पायथ्यापर्यंत लावलेला ऊस असे मनोहारी दृश्य भाविकांना पहायला मिळाले. फळ, भाज्यांवर कोरलेल्या नक्षीदार मूर्ती मोबाईल कॅमे-यामध्ये टिपण्याचा मोह देखील यावेळी अनेकांना झाला. 
शाकंभरी पौर्णिमेनिमित्त बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त दत्तमंदिरामध्ये ३५ प्रकारच्या फळ आणि भाज्यांचा वापर करुन आरास साकारण्यात आली. श्री म्हसोबा देवस्थान खारावडेच्या अध्यक्षा मधुरा व मुकुंद भेलके यांच्या हस्ते सजावटीचे अनावरण झाले. 
श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थानचे विश्वस्त रवींद्र शेडगे, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनिल रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई उपस्थित होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपव्यवस्थापक (प्रशासन) समीर व गीता रजपूत यांच्या हस्ते दत्तयाग पार पडला. 
अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले,  प्राचीन काळी पृथ्वीवर जेव्हा दुष्काळ पडला होता. तेव्हा या संकटातून बाहेर येण्याकरीता ॠषीमुनींनी देवीची आराधना केली. त्यावेळी देवीने प्रसन्न होऊन पृथ्वीवरील दुष्काळ दूर केला, सगळीकडे सुखसमृद्धी नांदू लागली. त्यामुळे अन्नदात्या शाकंभरी देवीचे पूजन केले जाते. याची माहिती आजच्या पिढीला व्हावी, यासाठी आरास करण्यात आली. 
मंदिराच्या मुख्य गाभा-यासह कळसापासून पायथ्यापर्यंत ही आरास करण्यात आली आहे. फळ-भाज्यांमध्ये नक्षीकामाने साकारलेल्या विविध मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच भाज्यांची आगळी-वेगळी रांगोळी पाहण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळाली. ही सजावट शनिवार, दिनांक ७ जानेवारीपर्यंत भाविकांना पाहण्यास खुली राहणार आहे.

पुणे ते जोधपूर रेल्वेसेवा दररोज सुरु करा-अखिल राजस्थानी समाज संघाचे रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन

पुणे | पुणे शहर व परिसरात सुमारे ८ लाख राजस्थानी समाज राहतो. व्यापार, व्यवसाय आणि रोजगाराच्या निमित्ताने राजस्थानहून आलेल्या नागरिकांना राजस्थानला जाण्यासाठी पुणे ते जोधपूर आणि जोधपूर ते पुणे ही रेल्वेगाडी दररोज सुरु करावी, अशी मागणी अखिल राजस्थानी समाज संघ, पुणे च्या वतीने करण्यात आली. यासंबंधीचे निवेदन पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांना गुरुवारी देण्यात आले आहे, अशी माहिती अखिल राजस्थानी समाज संघ, पुणेचे अध्यक्ष ओमसिंह भाटी यांनी दिली.

सध्या पुण्याहून जोधपूरला जाण्यासाठी आठवड्यातून एकच रेल्वे आहे. पुणे व परिसरातील राजस्थानी नागरिकांची संख्या लक्षात घेता आठवड्यातून एक रेल्वे पुरेशी नाही. परिणामी, जोधपुरला जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुणे ते जोधपूर रेल्वेसेवा दररोज सुरु करावी. अशी मागणी अखिल राजस्थानी समाज संघाकडून

मंडल रेल प्रबंधक कार्यालय येथे निवेदन देऊन केली आहे. यावेळी राजस्थानी समाजाच्या ३६ विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करण्यात आल्याचे ओमसिंह भाटी यांनी सांगितले.

राजस्थानी समाजाची मागणी मान्य न झाल्यास येत्या काळात धरणे आंदोलन, आमरण उपोषण करण्याचा इशारा अखिल राजस्थानी समाज संघ पुणे चे सचिव जयप्रकाश पुरोहित यांनी दिला आहे.

 स्पर्धेत टिकण्यासाठी उद्योग क्षेत्राचे स्वतःचे संशोधन विकास केंद्र गरजेचे-डॉ. प्रमोद चौधरी


पुणे-उद्योगांना जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी स्वतःचे संशोधन आणि विकास केंद्र असणे आवश्यक आहे आणि हीच भूमिका प्राज इंडस्ट्रीने  पहिल्यापासून स्वीकारली आहे त्याचा नक्कीच फायदा झाला असे मत प्राज  इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी येथे व्यक्त केले.
   १८ व्या जागतिक मराठी संमेलनातील २ ऱ्या सत्रात महाराष्ट्र  साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांनी डॉ. चौधरी यांना  मुलाखतीच्या माध्यमातून बोलते केले. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. डी. वाय . पाटील विद्यापीठाचे कुलपती आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी श्री. गायकवाड यांचा सन्मान केला.
   प्राज  इंडस्ट्रीजची सुरुवातीपासूनची वाटचाल तसेच शिक्षणाचा आणि नोकरीचा प्रवास श्री. चौधरी यांनी मुलाखतीच्या माध्यमातून उलगडला. प्राज इंडस्ट्रीजने १९८९ मध्ये संशोधन केंद्र सुरु केले. त्याआधी म्हणजेच १९८४ मध्ये प्राज चा स्वतंत्र उद्योग सुरु केला. आणि जैवइंधनाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. १९७३ मध्ये ब्राझीलला गेलो असताना तेथे इथेनॉल उत्पादन प्रकल्प पहिला. नंतर अमेरिकेने हा प्रकल्प सुरु केला. मात्र, भारतामध्ये या विषयाला म्हणावी तशी गती  मिळाली नाही. सन २००० मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी  ५ राज्यात इथेनॉल उत्पादनाला परवानगी दिली. हा विषय जरी केंद्राचा असला तरी महाराष्ट्राने देखील पाठिंबा दिला. इथेनॉलपासून होणारा फायदा आणि त्याची आवश्यकता याबाबत समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.  
   खेडेगावातील शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण झाले. मात्र, नंतर पुण्यामध्ये आलो आणि शालेय शिक्षण पूर्ण केले असे सांगून डॉ. चौधरी म्हणाले, फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण झाल्यावर आय .आय. टी . मध्ये प्रवेश घेतला आणि त्यासाठी परदेशात न जाता  भारतात राहूनच शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर , काही काळ नोकरी केल्यावर स्वतंत्र उद्योग सुरु करण्याचा निश्चय केला आणि तो प्राज  इंडस्ट्रीजच्या रूपाने उभा राहिला आहे. आजच्या काळात मनुष्यबळाची उपलब्धता विपुल प्रमाणावर असली तरीदेखील इंडस्ट्रीज आणि अकॅडमी यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. तरच जैव इंधनाच्या विषयाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होऊ शकेल.
   उद्योग-व्यवसाय करताना अनेक स्वरूपाची आव्हाने समोर उभी ठाकली, असे सांगून ते म्हणाले, त्यावर यशस्वीपणाने मात करता आली. एखादा उद्योग यशस्वी होण्यासाठी कष्ट, चिकाटी, याबरोबरच निर्णयक्षमता, नेमके धोरण आणि योग्य संधी याचा मागावा घेतला तर यश नक्कीच मिळू शकते. कोरोना नंतर उद्योग क्षेत्र सावरत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत. त्यासाठी उद्योजकीय मानसिकता ठेवणे गरजेचे आहे.
    साखर आयुक्त गायकवाड यांनी मुलाखतीचा समारोप करताना सांगितले की, साखर उद्योगाला प्राज  इंडस्ट्रीजने जे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले त्याचा नक्कीच फायदा झाला. त्यामुळे, आता साखर उद्योग बदलतो आहे. या उद्योगातून इथेनॉल, जैवइंधन याचे उत्पादन वाढत असून साखर उत्पादन हे दुय्यम ठरत आहे. इथेनॉलच्या निर्मितीमुळे आयाती तेलासाठी होणारा खर्च कमी होणार आहे. जेणेकरून परकीय चलन वाचणार आहे. एका अर्थाने भविष्यात ऊस हा कल्पवृक्ष होऊ शकणार आहे. सी.एन.जी. प्रमाणेच सी.बी.जी. वर या पुढील काळात वाहने मोठ्या प्रमाणावर चालवता येणार आहेत, असे ते म्हणाले.

   संशोधन व नवनवीन कल्पनांना जगाची सर्व दारे उघडी.

पुणे-परदेशात नोकरी व व्यवसायाला अनेकविध संधी महाराष्ट्रातील मराठी तरुणांना असून संशोधन व नावीन्यपूर्वक कल्पनांसाठी जगाची दारे उघडी असल्याची भावना परदेशस्थ यशस्वी मराठी मान्यवरांनी परिसंवादात व्यक्त केली.
  जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १८ व्या  जागतिक मराठी संमेलनामध्ये  समुद्रापलीकडे-भाग १ या कार्यक्रमात हा सूर प्रकट झाला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती व या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या परिसंवादात प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.
मनोज शिंदे (अमेरिका), भारत गिते (जर्मनी), रोहिदास आरोटे(दक्षिण कोरिया), विद्या जोशी(अमेरिका), सागर बाबर(युरोप), मिहीर शिंदे(ऑस्ट्रेलिया) हे मान्यवर या परिसंवादात सहभागी झाले होते.
जागतिक मराठी अकादमीचे सदस्य सचिन इटकर यांनी या सर्वांशी मुक्त संवाद साधला. तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथील पोलीस आयुक्त महेश भागवत हे प्रमुख म्हणून  उपस्थित होते .
  आपापल्या क्षेत्रात यशस्वी शिखरे गाठत असताना भारतभूमीतील आपल्या मराठी बांधवांना विविध संधी व दालने जागभरात  कशी उपलब्ध आहेत याची सर्वानी याप्रसंगी माहिती दिली.
ऑस्ट्रेलियातील मिहीर शिंदे यांनी, गुणवंतांना ऑस्ट्रेलिया हा देश सतत खुणावत असतो. जगाच्या बाजारपेठेत  ज्ञानाला कमी परंतु आयडिया (कल्पना) यांना जास्त महत्त्व आले आहे. त्याचबरोबर संशोधनपर शिक्षण घेतलेल्यांना ऑस्ट्रेलियामध्ये सदैव संधी असुन मराठी तरुणांनी शिक्षण घेऊन फक्त येथे या त्याचे पालकत्त्व घेण्यास आपण तयार असल्याचे म्हटले.
सागर बाबर यांनी आपले अनुभव सांगताना विज्ञान, तंत्रज्ञान व बुद्धिमत्ता हे तीन यशाचे दरवाजे असून व्यवस्थापन करण्याचे शास्त्र हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले असल्याने त्याचा आदर्श घ्यावा असे नमूद केले.
  रोहिदास आरोटे यांनी, भारतातील विद्यापीठे व कोरियामधील विद्यापीठांनी संशोधन करार केल्यास जगभरात त्याचे महत्त्व वाढणार आहे. डीएनए च्या संशोधनामध्ये  आपण केलेला अभ्यास हा जगभरातील विद्यार्थ्यांसाठी पायाभूत प्रकल्प ठरला असल्याचे म्हटले.
अमेरिकेतील सर्वात मोठी संस्था म्हणून बृहनमहाराष्ट्र  मंडळ असून, शिकागो येथे मराठी शाळा सुरु केल्यानंतर ९० विद्यार्थी मराठीचे शिक्षण घेत असल्याचे त्यांनी म्हटले. मराठी  युवक-युवतींनी आंधळेपणाने अनुकरण न करता मराठी तरुणांसाठी अमेरिकेत प्रचंड संधी असल्याचे त्यांनी सांगितले.  या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला.

विद्यांजली कार्यक्रमांतर्गत भारतीय लष्कराचे सरकारी/सरकारी अनुदानित शाळांसोबत सहकार्य

पुणे-सरकारी/सरकारी अनुदानित शाळांमध्ये पायाभूत सुविधा, सोई, आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी 07 सप्टेंबर 21 रोजी सुरू करण्यात आलेल्या विद्यांजली योजनेअंतर्गत निर्धारित केलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने,भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने दक्षिण भारतातील निवडक शाळांबरोबर एक व्यापक सहकार्य कार्यक्रम सुरू केला आहे.

भारताच्या स्वातंत्र्याला 75वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या उत्सवाच्याअंतर्गत , 75 सरकारी/सरकारी अनुदानित शाळांची निवड करण्यात आली, या शाळांमध्ये 06 जानेवारी 23 रोजी विविध उपक्रम राबवण्यात आले.30 आर्मी पब्लिक स्कूल्सच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी या शाळांमध्ये जाऊन पुस्तके, लेखन साहित्य , वाचन साहित्य यांची तरदूत केली तसेच लष्करी डॉक्टरांचे वैद्यकीय शिबिर, योगाभ्यासाचे आयोजन, शारीरिक शिक्षण वर्ग, क्रीडा स्पर्धा इत्यादी विविध उपक्रम राबवले गेले.

पुण्यात, घोरपडी गावातील कन्टोन्मेंट बोर्डाच्यामाध्यमिक शाळेची विद्यांजली योजनेंतर्गत निवड करण्यात आली होती. या शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांशी समन्वय करण्यासाठी आर्मी पब्लिक स्कुल (एपीएस) पुणे या शाळेला नामांकित करण्यात आले होते.या शाळेत आयोजित कार्यक्रमात दक्षिण मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल मनजीत कुमार उपस्थित होते.यावेळी बोलताना चीफ ऑफ स्टाफ यांनी , शाळेने मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केलेल्या कौतुकास्पद कार्याची प्रशंसा केली आणि आर्मी पब्लिक स्कुल, पुणे यांच्या सहकार्याद्वारे शिक्षणाच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा होईल आणि शाळेत अतिरिक्त सोयी आणि सुविधा निर्माण करणे सुलभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

15 जानेवारी 23 रोजी बंगळुरू येथे दक्षिण भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या लष्कर दिन संचलन बद्दल जागरुकता वाढविण्यासाठी देखील या कार्यक्रमाचा उपयोग करण्यात आला.विद्यांजली योजनेचा एक भाग म्हणून 06 जानेवारी 23 रोजी आयोजित केलेली मोहीम वर्षभर सुरू राहणार आहे.आणि यामुळे निवडलेल्या शाळांचे शिक्षण, पायाभूत सुविधा आणि सुविधांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी मदत होईल आणि देश उभारणीसाठी भारतीय लष्कराची वचनबद्धता ही मोहीम प्रदर्शित करेल.

श्री सम्मेद शिखरजी प्रश्नी झारखंड सरकारने लवकर निर्णय घ्यावा-शरद पवार यांची मुख्यमंत्री सोरेन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा

पुणे | श्री सम्मेद शिखरजी प्रश्नासंदर्भात झारखंड सरकारने देशभरातील जैन समाजाच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. केंद्र सरकारकडून गुरुवारी श्री सम्मेद शिखरजी संदर्भात अधिसूचना जाहीर झाल्यानंतर आज सकल जैन संघ पुणे च्या पदाधिकाऱ्यांनी पवार यांची पुण्यामध्ये भेट घेतली आणि त्यांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर पवार यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि त्यांना जैन धर्मियांच्या याविषयीच्या भावना सांगितल्या. तसेच, तत्काळ यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यासंबंधी विनंती केली. अशी माहिती सकल जैन संघातर्फे पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

पुण्यातील सकल जैन समाजाच्या वतीने शरद पवार यांची ‘मोदी बाग’ या त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेण्यात आली. यावेळी शिष्टमंडळाने पवार यांना श्री सम्मेद शिखरजी संदर्भात सर्व माहिती दिली. त्यानंतर केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्रसिंह यादव आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन तसेच महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली. या शिष्टमंडळाने चर्चा करताना गुजरातमधील श्री क्षेत्र पालीताना व गिरनारजी या जैन धर्मियांच्या धार्मिक तीर्थक्षेत्रांबाबत असलेल्या प्रश्नांकडेही पवार यांचे लक्ष वेधले.

सकल जैन समाजच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीसंदर्भात आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी झालेल्या चर्चेसंदर्भातील माहिती शरद पवार यांनी त्यांच्या फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून प्रसिद्ध केली आहे.

सकल जैन समाज पुणे च्या शिष्टमंडळात अध्यक्ष अचल जैन, अभय छाजेड, मिलिंद फडे, हरीषभाई शाह, लक्ष्मीकांत खाबिया, नितीन जैन, निलेश शाह, भरत सुराणा, अरुण कटारिया, देवेंद्र बाकलीवाल, अक्षय जैन, पोपटलाल ओस्तवाल, बाळासाहेब धोका, सुरेंद्र गांधी, अॅड. योगेश पांडे उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यात ७९ लाख ५१ हजार ४२० मतदारमतदार संख्येत ७४ हजार ४७० ची वाढ

पुणे, दि. ६: भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राबवण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांची अंतिम मतदार यादी गुरुवारी (५ जानेवारी) प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यामध्ये ७९ लाख ५१ हजार ४२० मतदार इतकी एकूण मतदारसंख्या असून यादीत ७४ हजार ४७० मतदारसंख्येची भर पडली आहे.

भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या सूचनानुसार १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ९ नोव्हेंबर २०२२ पासून राबवण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ पुणे येथे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता.

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातील वेळापत्रकानुसार अंतिम मतदार यादी पुणे जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तसेच सर्व पदनिर्देशित ठिकाणी ५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

या अंतिम मतदार यादीमध्ये एकुण ७४ हजार ४७० इतक्या मतदारांची वाढ झालेली असून त्यात पुरुष मतदार संख्या ३५ हजार ५९८ इतकी, महिला मतदार संख्या ३८ हजार ७२१ इतकी व तृतीयपंथी मतदार संख्या १५१ ने वाढलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये २१ विधानसभा मतदार संघात एकूण ७९ लाख ५१ हजार ४२० इतके मतदार समाविष्ट आहेत. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या ४१ लाख ६६ हजार २६५, महिला मतदारांची संख्या ३७ लाख ८४ हजार ६६० व तृतीय पंथी मतददारांची संख्या ४९५ इतकी आहे.

अंतिम मतदार यादी पाहणीसाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात उपलब्ध करुन दिलेली असल्याने नागरिकांना आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याबाबत खात्री करता येणार आहे. तसेच https://www.nvsp.in व https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने छायाचित्र नसलेली मतदार यादी उपलब्ध असून मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याबाबत खात्री करता येणार आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपले नाव अंतिम मतदार यादी मध्ये समाविष्ट असल्याबाबतची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

मतदार यादीत अद्यापही नाव समाविष्ट नसलेल्या पात्र नागरिकांनी https://www.nvsp.in या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने आपले नाव नोंदवावे किंवा नजीकच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन फॉर्म नं.६ भरून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा, असेही डॉ. देशमुख यांनी कळवले आहे.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याचा शुभहस्ते ‘महाराष्ट्र केसरी’च्या लोगोचे अनावरण

पुणे : महाराष्ट्रातील प्रतिष्ठित अशा ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचा थरार येत्या १० जानेवारीपासून पुण्यातील कोथरूडमध्ये रंगणार आहे. या ‘महाराष्ट्र केसरी’च्या लोगोचे अनावरण आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते तर विरोधी पक्षनेते अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाले.

म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या कार्यक्रमावेळी ‘महाराष्ट्र केसरी’चे प्रमुख संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर, आ. सुनील कांबळे, भाजपा शहराध्यक्ष जगदीळ मुळीक, चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. हनुमंत गावडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके, अहमदनगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते पै. विलास कथुरे, पै. मेघराज कटके, पै. नवनाथ घुले, पै. गणेश दांगट, पै. माऊली मांगडे, पै. कृष्णा बुचडे, पै. संतोष माचुत्रे आदी उपस्थित होते.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, “स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘महाराष्ट्र केसरी’चे आयोजन यंदा मोहोळ कुटुंबीयांकडे आहे. स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, कोथरूड येथे स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून, आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, क्रीडामंत्री व विरोधी पक्षनेते यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले, याचा आनंद होत आहे.”

महावितरणचे मोबाईल ॲप ५० लाखांपेक्षा अधिक वेळा डाऊनलोड

 मुंबई दि. ६ जानेवारी २०२३:- विद्युत ग्राहकांना नवीन वीज कनेक्शन घेण्यापासून बिले भरणे, तक्रारी नोंदविणे आणि वीजचोरीची खबर देणे अशा विविध सुविधा असलेल्या महावितरणच्या मोबाईल ॲपला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असून मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करण्याची संख्या ५० लाखांपेक्षा अधिक झाली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

ते म्हणाले की, ॲप डाऊनलोड करून ते सतत वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या २८ लाखांपेक्षा अधिक असून महावितरणच्या एकूण ग्राहकांचा विचार करता प्रत्येकी दहापैकी एक ग्राहक हे ॲप नियमित वापरत आहेत. ऊर्वरित ग्राहकांकडून ॲपचा वापर कमीअधिक कालावधीने होतो.

ते म्हणाले की, महावितरणच्या ग्राहकांना मोबाईल ॲपचा वापर करून महावितरणच्या अनेक सेवा सहजपणे मोबाईल फोनवरून मिळविता येतात. नवीन कनेक्शनसाठी अर्ज करणे, त्यासाठीची कागदपत्रे अपलोड करणे आणि त्यासाठीची फी भरून नवीन कनेक्शन मिळविणे ही सुविधा ॲपमार्फत उपलब्ध आहे. या ॲपवरून ग्राहकांना आपले विजेचे बिल पाहता येते आणि भरताही येते. वीजबिलाची नोटिफिकेशन आणि बिल भरल्याची माहिती या ॲपद्वारे उपलब्ध होते.

ग्राहकांना वीजेच्या बाबतीत तक्रार नोंदविणे आणि आपल्या तक्रारीवर पुढे काय कारवाई झाली याची माहिती घेणे ॲपमुळे सोपे जाते. वीजचोरीची खबर देण्याचीही सुविधा या ॲपवर उपलब्ध आहे. मोबाईल ॲपवरून ग्राहकांना आपल्या मीटरचे रिडिंग स्वतःच भरता येते. जवळचे महावितरणचे कार्यालय अथवा बिल भरणा केंद्र कोठे आहे आणि तेथे कसे जायचे, याचीही माहिती ॲपवरून मिळते, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, महावितरणच्या मोबाईल ॲपवरून विजेचे बिल भरण्यासाठी एप्रिल २०२१ मध्ये १० लाख ९७ हजार व्यवहार झाले होते व त्यावरून १५८ कोटी रुपयांची बिले भरण्यात आली होती. नोव्हेंबर २०२२ मध्ये व्यवहारांची संख्या १५ लाख ८९ हजार झाली होती व त्या माध्यमातून २३७ कोटी रुपयांची बिले भरण्यात आली होती. अर्थात या कालावधीत मोबाईल ॲपवरून होणाऱ्या व्यवहारांची संख्या ४४ टक्क्यांनी वाढली तर भरलेल्या बिलांच्या रकमेचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले.

नोव्हेंबर २०२२ या महिन्यात महावितरणच्या घरगुती ग्राहकांनी एकूण २१०४ कोटी रुपयांची बिले विविध माध्यमातून ऑनलाईन भरली होती. त्यापैकी मोबाईल ॲपवरून २३७ कोटी रुपयांची बिले भरण्यात आली. मोबाईल ॲपचे बिल भरण्याखेरीज अनेक उपयोग ध्यानात घेता त्याचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंड बंद करा;सुनील शेट्टींची थेट योगी आदित्यनाथांकडे मागणी

मुंबई-उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबई दौरा केला. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशात भव्य फिल्मसिटी उभारण्याच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडच्या चित्रपट निर्मात्यांसोबत बैठक घेतली. यावेळी, अभिनेता सुनील शेट्टी यांनी #BoycottBollywood हा ट्रेंड बंद करण्याची विनंती त्यांच्याकडे केली. बॉलिवूडवर लागलेला हा शिक्का पाहताना मनाला वेदना होतात, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. तुम्हीच हा ट्रेंड बंद करू शकता असे सांगत सुनील शेट्टींनी योगी आदित्यनाथांकडे ही मागणी केली.या बैठकीला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेते, संगीतकार, निर्मात्यांनी हजेरी लावली होती. यात मनोज जोशी,, सुभाष घई, जॅकी श्रॉफ, सोनू निगम आणि बोनी कपूर यांच्यासह अनेक कलाकारांनी त्यांची भेट घेतली.

योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलताना सुनील शेट्टी म्हणाले, “प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहात आणणे महत्त्वाचे आहे. तसेच चित्रपटसृष्टी ही चांगली काम करणाऱ्या चांगल्या माणसांनी बनलेली आहे, हे त्यांना पटवलून द्यायला हवे,” असे ते म्हणाले.

“आज लोकांना वाटते की, बॉलिवूड चांगले नाही. पण आम्ही इथे इतके चांगले चित्रपट बनवले आहेत. मीही अशाच एका चित्रपटाचा भाग होतो. मी बॉर्डर चित्रपट केला होता. बॉयकॉट बॉलिवूड हॅशटॅगपासून आपली सुटका कशी करता येईल यासाठी आपण एकत्र येऊन काम केले पाहिजे. आपण हा ट्रेंड कसा थांबवू शकतो याचा शोध घ्यावा लागेल. आज मी जर सुनील शेट्टी आहे तर ते यूपी आणि तिथल्या चाहत्यांमुळे आहे. त्यांनी शुक्रवारी चित्रपटगृहे भरली आणि त्यामुळेच आम्हाला तो चित्रपट चालेल असे कळले. हे पुन्हा होऊ शकते, पण तुम्हाला त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. आमच्यावर असलेला हा कलंक नाहीसा होणे खूप महत्त्वाचे आहे,” असे सुनील शेट्टी म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, “आमच्यापैकी 99% लोक असे नाहीत. आम्ही दिवसभर ड्रग्स घेत नाही, आम्ही चुकीची कामे करत नाहीत. आम्ही चांगले करतो, भारताला जर बाहेरच्या देशांशी कुणी जोडले असेल तर ते बॉलिवूडच्या कथा आणि संगीताने जोडले आहे.” योगीजी तुम्ही पुढाकार घेऊन पंतप्रधानांशी याबद्दल बोललात तर खूप फरक पडेल, अशी विनंती सुनील शेट्टी यांनी यावेळी योगींकडे केली.