Home Blog Page 1472

‘मोदी@9’पुस्तक पोहोचविण्यासाठी माजी खासदार काकडेंची पराकाष्ठा

पुणे-९ वर्षाच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत नरेंद्र मोदी यांनी कोणकोणती कामे केलीत याची झलक दर्शविणारी पुस्तिका प्रकाशित केल्यावर ती स्वतःच्या हाताने , स्वतःच्या उपस्थितीत रस्तोरस्ती , वस्त्यात , बाजारातील दुकानं दुकानात पोहोचविण्यासाठी गेली ४ दिवसांपासून पुण्यातील माजी खासदार संजय काकडे यांनी पराकाष्ठा चालविली आहे, सकाळ पासून रात्रीपर्यंत पावसाची तमा न बाळगता मोदींच्या कार्याबाबत जागृतीची मोहीम ते पुण्याच्या सर्व विधानसभा मतदार संघातून राबवीत आहेत . आपले मोजके कार्यकर्ते बरोबर घेऊन वाहतुकीला अडथळा होणार नाही, लोकांना उपद्रव वाटणार नाही अशा पद्धतीने सुसूत्रता पाळून त्यांनी चालविलेल्या या मोहिमेमुळे आता विरोधी पक्षांना तेवढे जागृत होण्याची गरज भासणार आहे.वडगाव शेरी, पुणे कँटोमेंट, कसबा नंतर आज त्यांनी पर्वती विधानसभा मतदार संघात नागरिकांशी संपर्क साधला ,अनेक जुने नवे ओळखीचे चेहरे त्यांना या मोहिमेच्या माध्यमातून भेटले . आणि प्रत्येक ठिकाणी मोदींची प्रशंसा त्यांनी ऐकली .काकडे यांच्या वतीने ही पुस्तिका तयार करण्यात आली असून तिच्या 60 हजार प्रती पुणे लोकसभा मतदार संघात वाटप करण्यात येणार आहेत. त्याचा शुभारंभ बावनकुळे यांच्या हस्ते झाला.पहा आजच्या त्यांच्या जनसंपर्क मोहिमेची एक झलक

माजी IRS अधिकारी सचिन सावंत यांना ED कडून अटक; भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी कारवाई

मुंबई–सीमा शुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेले सचिन सावंत यांच्या मुंबईतील निवासस्थानावर ईडीने छापा टाकला आहे. भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी, ही कारवाई करण्यात आली आहे. 500 कोटी रुपये बेकायदेशीर रित्या वळवण्याच्या एका प्रकरणातील आरोपीने सचिन सावंत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सीबीआयने एफआरआय दाखल केली असून, याच प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

ईडीने वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्या निवासस्थानावर धाड टाकली होती. सीमा शुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेले सचिन सावंत यांच्यावर भ्रष्टाचार आणि मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे. सचिन सावंत यांच्या सोबतच त्यांच्या नातेवाईकांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आहे.

सचिन सावंत हे पूर्वी मुंबईतील ईडीच्या झोन 2 या कार्यालयात उपसंचालक म्हणून कार्यरत होते. काही हिरे कंपन्या द्वारे 500 कोटी रुपये बेकायदेशीरपणे वळवल्याप्रकरणी त्यांनी चौकशी केली होती. या प्रकरणावर अटक करण्यात आलेल्या अरोपीने सावंत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने सचिन सावंत यांच्या विरोधात प्रथम माहिती अहवाल तयार करत करून घेतली होती. सध्या सावंत यांच्याकडे सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर टँकरची दुचाकीला जोरदार धडक; दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू तर शाळकरी मुलगी गंभीर जखमी

पुणे-

पुणे-सोलापूर महामार्गावर एका भरधाव इंधनवाहू टँकरने महिला दुचाकीस्वारला धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी कुंजीरवाडी येथे घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला असून सहप्रवासी शाळकरी मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या अपघातानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली होती.

योगिता राजकुमार गव्हाणे (वय- 35, रा. होले काॅम्प्लेक्स, ऊरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) असे मयत झालेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. या अपघातात सुरेखा राजकुमार गव्हाणे (वय- 16) ही मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मयत योगिता गव्हाणे या बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घरातून कामाला निघाल्या होत्या. पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी जवळून त्या जात असताना अचानक भरधाव इंधनवाहू टँकरने दुचाकीला भरधाव वेगात धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार योगिता आणि त्यांची मुलगी सुरेखा गंभीर जखमी झाल्या आणि मोठा रक्तस्त्राव होऊन त्या कोसळल्या. स्थानिकांनी दोघींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच योगिता गव्हाणे यांचा मृत्यू झाला होता असे डॉक्टरंनी सांगितले.तर मुलीवर अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले.सदर अपघातानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर पोलिसांनी पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत केली आहे. योगिता गव्हाणे यांचा अचानक अपघाती मृत्यू झाल्याने उरळी कांचन परिसरात शोककळा पसरली.

शासकीय ई-बाजारात महाराष्ट्राची उल्लेखनीय कामगिरी; विविध श्रेणीत राज्याला ५ ‘क्रेता-विक्रेता गौरव पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली : महाराष्ट्राने शासकीय ई-बाजार मध्ये लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल राज्याला विविध श्रेणीत एकूण 5 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्यावतीने येथील वाणिज्य भवनमध्ये  शासकीय-ई-बाजारपेठ (Government e Marketplace (GeM)) ला प्रोत्साहन देण्यासाठी  ‘क्रेता-विक्रेता गौरव पुरस्कार 2023’ प्रदान सोहळयाचे आयोजन सोमवारी सायंकाळी करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्र शासनाने शासकीय-ई-बाजारपेठ प्रणाली 2016 पासून  विकसित केली असून या अंतर्गत शासनाला लागत  असलेल्या सेवा सामुग्रीचा पुरवठा जेमच्या माध्यमातून केला जातो. राज्य शासन, विविध विभाग, महिला उद्योजक, अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गातील उद्योजकांना यामाध्यमातून मोठया प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे. यामध्ये महाराष्ट्राने उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे. यासाठी विविध श्रेणीत महाराष्ट्राला  5  ‘क्रेता-विक्रता गौरव पुरस्कार’ प्रदान करून  गौरविण्यात आले.

विविध पाच श्रेणीत राज्याने मारली बाजी

राज्याने सन 2022-23 मध्ये जेम प्रणालीवरून 4130 कोटींची खरेदी करून देशात तिसरे स्थान पटकावून सिल्वर पुरस्काराचा मान मिळविला.  स्टार्टअप – उद्योजकांच्या खरेदीमध्ये राज्याने दुसरे स्थान मिळविले असून गोल्ड पुरस्कार प्रदान करण्यात आला. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती उद्योजकांच्या खरेदीमध्ये राज्याने चांगली कामगिरी केलेली असून या श्रेणीत राज्याचा दुसरा क्रमांक आलेला असून गोल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुक्ष्म व लघु उपक्रमांमार्फतच्या खरेदीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असून सिल्वर पुरस्कार प्रदान करण्यात आला. महिला उद्योजकांमार्फतच्या खरेदी या श्रेणीमध्ये राज्याने तिसरा क्रमांक मिळवून सिल्वर पुरस्काराचा मानकरी ठरला. या सर्व श्रेणीतील पुरस्कार उद्योग संचालनालयाचे  विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी केंद्रीय वाणिज्य राज्य मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते  स्वीकारले. उद्योग सह संचालक (खरेदी धोरण) विजू सिरसाठ या यावेळी उपस्थित होत्या.

राज्याच्या उद्योग संचालनालयाने शासकीय ई- बाजार प्रणालीला असे दिले प्रोत्साहन

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये राज्याने राष्ट्रीय सार्वजनिक खरेदी बाजारात व्यवसाय करण्यासाठी सातत्याने जेम पोर्टलवर अवलंबून राहून सार्वजनिक खरेदी प्रक्रियेची विश्वासार्हता वाढविण्याच्या दिशेने अनुकरणीय वचनबद्धता दर्शविली आहे. यांतर्गत उद्योग संचालनायाच्यावतीने राज्यात मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्या विभागांकरिता कालबद्ध बाह्यपोच कार्यक्रम (Outreach Program) राबविला. यांतर्गत जेम पोर्टलचा वापर वाढविण्यासाठी पोर्टलचे नवनवीन फिचर्स आणि कार्यप्रणालीबाबत जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन केले.

खरेदी प्रक्रियेत उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी जलद उपाय योजले. सुक्ष्म व लघु  उद्योजकांची जेम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी शासनाने विविध विभागांमार्फत जागरूकता कार्यक्रम आणि प्रशिक्षण सत्रे आयोजित केली. आतापर्यंत शासनाने पोर्टलवर 7508 खरेदीदार प्रशिक्षणार्थीसाठी  105 प्रशिक्षण कार्यक्रम आणि 5004 पुरवठादारांसाठी 95 प्रशिक्षण कार्यक्रम आखले आहेत.

राज्य शासनाने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे जेम पोटर्लवर आतापर्यंत एकूण नोंदणीकृत 1073377 पुरवठादार आहेत तर एकूण नोंदणीकृत  12398 खरेदीदार झाले आहेत. यासह पोर्टलवर राज्यातील एकूण नोंदणीकृत 10,619 सुक्ष्म व लघु पुरवठादार देखील आहेत.

महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी इच्छुक उद्योजकांकडे पाठपुरावा करणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी परकीय उद्योजक इच्छुक आहेत. त्यांच्याबरोबर राज्य शासनाने विविध करार केले आहेत. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. आज विधान भवनात उद्योजकांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत या उद्योजकांसोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

जपानच्या भेटी दरम्यान अनेक उद्योजकांनी महाराष्ट्रात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आज विविध उद्योजक आणि त्यांच्या संस्थांसोबत ही बैठक झाली. महाराष्ट्र शासनासोबत, उद्योग विभागामध्ये अनेक प्रकारचे करार उद्योजकांनी केलेले आहेत. महाराष्ट्रात उद्योग, अर्थ विकास आणि शेती विषयांत आणखी सुधारणा होण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.

राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध उद्योजकांना योग्य स्वरुपाची बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी उद्योजक म्हणाले. उद्योगांना पायाभूत सुविधा मिळण्यासाठी राज्यात पोषक वातावरण तयार होत आहे. मात्र, ग्रामीण भागात मोबाईल कनेक्टीव्हिटी, दळण-वळणाच्या सुविधा, या सोबतच उद्योगांना पूरक सुविधा असाव्यात अशा स्वरूपाची मागणी करण्यात आली.

या सर्व विषयांचा राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. या बैठकीला उद्योजक इंडियन मर्चंट चेम्बर्सचे अनंत सिंघानिया, समीर सोमैय्या, महाराष्ट्र आर्थिक सामाजिक विकास परिषदेच्या शीतल पांचाळ, अमेरिका स्थित उद्योजक किशोर गोरे, सौरभ शहा आदी उपस्थित होते.

येत्या सप्टेंबर महिन्यात विदेशातील महिला धोरण याबाबत एक परिसंवाद घेण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. या परिसंवादाला काही देशांच्या प्रतिनिधींचा पाठिंबा असून यामध्ये सहभागी होण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.Tags:उद्योजकगुंतवणूक

राज्यातील देवस्थानांवर महिलांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याबाबत विचार व्हावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची धर्मादाय आयुक्तांना सूचना

मुंबई : राज्यभरात असलेल्या विविध देवस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. विशेषत: पंढरपूर, एकवीरा देवी, तुळजापूर, अष्टविनायक अशा देवस्थानांमध्ये भाविकांसाठी सुविधा होणे अत्यावश्यक आहे. महिला भाविकांसाठी पायाभूत सुविधा करण्याची आवश्यकता नेहमीच भासते. प्रवास, निवास, हिरकणी कक्ष, सुलभ शौचालये, महिलांसाठी अनुषंगिक सुविधा यावर विचार करण्याची अजूनही गरज आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थानांच्या विश्वस्त समितीमध्ये योग्य प्रमाणात महिलांचा समावेश असावा. यासाठी नियमावलीमध्ये काय सुधारणा करता येतील याचा विचार व्हावा अशी सूचना आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी धर्मादाय आयुक्तांना केली.

विधान भवनात जेजुरी देवस्थानच्या विषयावर विनंती अर्ज समितीच्या वतीने एक बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे जेजुरी देवस्थानबाबत एक अहवाल सादर करण्यात आला. मंदिराच्या आवारातील दुरुस्ती, डागडुजी कामे याबाबत पुरातत्व खात्याकडून माहिती सादर करण्यात आली. जेजुरी मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून भाविकांकडून घेण्यात येणाऱ्या दर्शन पासच्या व्यवस्थेबाबत यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी विचारणा केली. गेल्या काही वर्षातील झालेल्या बैठकांच्या कागदपत्रांची तपासणी धर्मादाय आयुक्तांनी करावी. मंदिरात लावण्यात आलेल्या मेटल डिटेक्टरची नियमित देखभाल करून ते सुधारित स्वरूपात लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. जेजुरीमधील चिंचेची बाग परिसरात भाविकांकडून होत असलेल्या विविध विधींबाबत एक नियमावली करावी. मंदिर परिसरात भाविकांकडून उधळण्यात येणाऱ्या भंडारा (हळद) आयुर्वेदिक असली पाहिजे असा आग्रह धरतानाच त्यांनी आता वापरण्यात येणाऱ्या हळदीच्या नमुन्यांची चौकशी अन्न व औषध प्रशासनाकडून करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

मंदिर देवस्थानच्या विश्वस्त नेमणुकीबाबत निर्णय हा धोरणात्मक असल्याने संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी यामध्ये निर्णय घेणे उचित असल्याचे त्या म्हणाल्या. जेजुरी देवस्थानमध्ये नेमणूक केलेल्या विधिज्ञ यांची माहिती देण्याची सूचना यावेळी त्यांनी केली. मंदिराचे कार्यकारी अधिकारी यांनी पुरातत्व खात्याच्या अहवालावर केलेल्या कार्यवाहीबाबत त्यांच्याकडून येत्या ८ दिवसांत खुलासा मागवला आहे. जुलै महिन्यात डॉ. गोऱ्हे जेजुरीला भेट देणार असून याबाबत विभागीय आयुक्त स्तरावर आणखी आढावा बैठक घेणार आहेत.

या बैठकीला विधान परिषद सदस्य उमा खापरे, विधी व न्याय विभागाचे सचिव नंदकिशोर मोरे, सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के, महेंद्र महाजन, जेजुरी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चारुदत्त इंगळे,  पुणे जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, प्रांत राजेंद्र सावंत, पुरातत्व खात्याचे विलास वाहने, तेजस्विनी आफळे, जेजुरी देवस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.

लोकसभेच्या 20 जागांवर काँग्रेस ठाम; मविआ नेत्यांची आज बैठक,ठाकरेंवर दबाव?

मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (२८ जून) मुंबईत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत या बैठकीत चर्चा होईल. राष्ट्रवादीकडून ४८ मधील जास्तीत जास्त मतदारसंघांवर दावा करून ठाकरे गटावर दबाव टाकण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी दुपारी ही बैठक होणार आहे. तिन्ही पक्षांचे नेते या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसने चंद्रपूरची एक जागा जिंकली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तर शिवसेनेचे १८ खासदार आहेत. मात्र, शिवसेनेच्या अनेक खासदारांनी आता उद्धव ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हाती घेतले आहे. त्या जागांवर काँग्रेस व राष्ट्रवादीचा डोळा आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांची मंगळवारी मुंबईत बैठक झाली. यापूर्वी झालेल्या चर्चेनुसार या पक्षाने २० लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता, त्याचा पुनरुच्चार ज्येष्ठ नेत्यांनी केला. हीच मागणी मविआच्या बैठकीत जोर देऊन रेटून नेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे उपस्थित होते. वज्रमूठ सभांना अजून वेळ लागणार असल्याचे या नेत्यांनी मान्य केले.

वांद्रे येथील बीकेसी क्लबमध्ये काँग्रेसची बैठक झाली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, आजच्या बैठकीत आम्हाला अनुकूल अशा २० मतदारसंघावर चर्चा झाली. अजून पूर्ण चर्चा झालेली नाही. आमची पुढील बैठक ६ जुलैला आहे. त्यामध्ये काँग्रेस दावा करणाऱ्या मतदारासंघाची नावे निश्चित केली जातील.

लोकसभेच्या जागावाटपावर ६ तारखेला काँग्रेसची बैठक व अधिवेशनाआधी मित्रपक्षांशी चर्चा करु:- नाना पटोले

काँग्रेस कोअर कमिटीची बैठक बीकेसीतील एमसीए क्लबमध्ये संपन्न.

मुंबई, दि. २७ जून

राज्यातील राजकीय परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. पाऊस उशिरा पडल्याने दुबार पेरणीचे संकट असून शेतकऱ्याला खते, बियाणे मोफत द्यावे यासाठी सरकारकडे पाठपुरावा करु आणि वेळपडली तर राज्यपालांकडे जाऊ. पावसामुळे मंबईत सहा लोकांचा हकनाक बळी गेला, मुंबईत जागोजागी पाणी साचून मुंबईकरांची प्रचंड झाले आहे त्यामुळे खर्च केलेले कोट्यवधी रुपये कुठे गेले? हा प्रश्न आहे. यासह लोकसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आला, ६ तारखेला पुन्हा बैठक घेऊन अंतिम चर्चा होईल व त्यानंतर अधिवेशनाआधी मित्रपक्षांशी चर्चा करु, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

बीकेसी येथील MCA क्लबमध्ये काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, बस्वराज पाटील, आ. प्रणिती शिंदे उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले पुढे म्हणाले की, राज्यातील सद्य परिस्थितीवर बैठकीत चर्चा करताना कायदा व सुव्यवस्थेवरही चर्चा करण्यात आली. पुण्यात दिवसाढवळ्या एका तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आले. महिला, मुलींवरील हल्ले, लैंगिक अत्याचारामध्ये वाढ झाली असून महिलांसाठी सुरक्षित असलेले मुंबई शहर व महाराष्ट्र शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात बिहार उत्तरप्रदेशसारखे जंगलराज झाले असल्याची जनतेची भावना झाली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही पण काँग्रेस पक्ष मात्र गंभीर आहे. काँग्रेसने राज्यपाल व पोलीस महासंचालक यांना भेटून यासंदर्भात अवगत केले आहे पण त्यात सुधारणा झालेला नाही. वेळप्रसंगी काँग्रेस पक्ष कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरेल असेही नाना पटोले म्हणाले.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्यासंदर्भात केलेल्या टीकेला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, भाजपा मुळ मुद्द्यांपासून पळ काढत असतो. शेतकरी, बेरोजगारी, महागाईवर काय केले त्यावर भाजपाकडे उत्तर नाही म्हणून ते हास्यकल्लोळ करण्याचा प्रयत्न करत असतात पण जनता त्यांच्या हास्यकल्लोळला ओळखून आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका करणे म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे आहे ही टीका भाजपाला महागात पडेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आजच्या बैठकीत १५ ते २० जागांवर चर्चा झाली आहे, अजून पूर्ण चर्चा झालेली नाही. पुढील बैठक ६ तारखेला होईल. सध्या काही जागांवर साधक-बाधक चर्चा सुरू आहे, महाविकास आघाडीसोबत आम्ही चर्चा करत आहोत. वज्रमूठ सभांना थोडा वेळ झाला आहे, हे आम्ही नाकारत नाही.

केसीआर संदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले की, सध्या ते कोणत्याही बैठकीत भाजप विरोधात भूमिका घेत नाहीत. पाटण्यातील विरोधी पक्षांच्या बैठकीला ते अनुपस्थित राहिले होते यावरून ते कोणाची B टीम आहेत हे स्पष्ट होते. ऐन निवडणुकांआधी हे सगळे सुरू झालं आहे.

प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री नसीम खान यावेळी म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात मॉब लिंचिंगच्या दोन घटना झाल्या असून यात दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनांवरून राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही हे स्पष्ट होत आहे. राज्य सरकार या घटनांकडे राजकीय फायद्यासाठी दुर्लक्ष करत आहे का, हा प्रश्न असून सरकारने या दोन्ही घटनांचा गांभिर्याने तपास करावा व गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे.

माजी खासदार संजय काकडे आणि कॉंग्रेस आमदार धंगेकर यांच्या भेटीत नेमके झाले काय ?

पुणे-मोदींच्या ९ वर्षाचा कार्यकाळ सांगायला माजी खासदार काकडे,कॉंग्रेस आमदार धंगेकरांच्या कार्यालयात ..पोहोचले ..तेव्हा लोकसभेच्या रिंगणात इच्छुक म्हणून असलेले या दोघानाही त्यांच्या त्यांच्या पक्षाने उमेदवारी दिली तर किती चुरस होईल आणि किती होणार नाही ? याबाबतची खसखस तेथील कार्यकर्त्यांत पिकली होती. पुण्याच्या राजकीय व्यासपीठावर एकमेकांचे विरोधक असलेल्या या दोन्ही तगड्या व्यक्ती सांगत होत्या आम्ही दोघेही मित्र आहोत ,पण पक्ष वेगवेगळे अंनि विचारधारा वेगळी ..पुण्याची संस्कृती मैत्रीपूर्ण राजकारणाची ,पण जर पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली तर … दोघेही टक्कर देऊ ..संजय काकडे म्हणाले , मी तमाम जनतेत पीएम मोडी यांनी ९ वर्षात केलेले कामाची पुस्तिका वाटतो आहे ,धंगेकरांनाही दिली आहे. त्यांनीही सांगावे त्यांच्या पीएम स्तरावरील नेत्यांनी काय काय कामे केलीत ते … धंगेकर म्हणाले , आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे आपली परंपरा आहे , उमेदवारी मिळाली तर मात्र आम्ही लढा देणार …यासह पहा काकडे यांच्या मोदी @9 या जन्साम्र्क मोहिमेची आणखी एक झलक

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत लघु उद्योग व्यवसायासाठी थेट कर्ज योजना

पुणे, दि. २७: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत लघु उद्योग व्यवसायासाठी थेट कर्ज योजना राबविण्यात येत असून त्यासाठी ३१ जुलै २०२३ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

महामंडळामार्फत अनुदान योजना, बीज भांडवल योजना तसेच थेट कर्ज योजना अशा तीन योजना राबविण्यात येतात. थेट कर्ज योजनेचा लाभ मातंग समाज व त्यामध्ये अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादिग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी व मादिगा या १२ पोट जातींना घेता येणार आहे. अर्जदार पुणे जिल्ह्यातील रहिवासी असावा. वय १८ वर्षे पूर्ण व ५० वर्षाच्या आत असावे. सीबील क्रेडिट स्कोअर किमान ५०० असावा. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल. वेळोवेळी महामंडळाने घातलेल्या अटी, शर्ती बंधनकारक राहतील.

योजनेअंतर्गत १ लाख रुपयांच्या प्रकल्प मूल्यासाठी महामंडळाचे बीजभांडवल ८५ हजार रुपये, अनुदान १० हजार रुपये, अर्जदाराचा सहभाग ५ हजार रुपये असून बीजभांडवल रक्कमेवर ४ टक्के व्याजदर असणार आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी भौतिक उदिष्ट ९० प्रकरणांचे प्राप्त झाले आहे. उद्दिष्टापेक्षा अधिक अर्ज आल्यास लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल.

अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, शिधापत्रिका, आधार कार्ड, पॅन कार्डची छायांकित प्रत, व्यवसायासाठी आवश्यक जागेचा पुरावा, तीन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, व्यवसायाचे दरपत्रक, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला, शैक्षणिक दाखला, अनुदान, कर्जाचा लाभ न घेतल्याबाबतचे स्वत:चे प्रतिज्ञापत्र, आधार क्र. जोडणी केलेल्या बँक खात्याचा तपशील, ग्रामसेवकाचे शासकीय योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र, दुकाने अनुज्ञप्ती/ उद्योग आधार जोडणे आवश्यक आहे.

इच्छुक व पात्र अर्जदारांनी अटी व शर्ती, अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे, विहित नमुन्यातील अर्ज आदींबाबत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्वे नंबर १०३,१०४ मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे दूरध्वनी क्र. ०२०-२९७०३०५७ येथे संपर्क साधून माहिती घ्यावी, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक शिवाजी मांजरे यांनी कळवले आहे.

समाज कल्याण विभागातर्फे सामाजिक न्याय दिनानिमित्त समता रॅलीचे आयोजन

पुणे, दि. २७ : राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या १४९ व्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने सोमवारी नशामुक्त भारत प्रबोधन समता रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात समाज कल्याण विभागाचे उपायुक्त रविंद्र कदम पाटील, सहायक आयुक्त कैलास आढे, सहायक आयुक्त हरिश डोंगरे, ह.भ.प. स्नेहल जाधव पायगुडे, विश्वास बनसोडे, हरीजी डोंगरे, श्री शाहू महाविद्यालयाचे राष्ट्रीय छात्र सेवेचे विद्यार्थी, कर्वे संस्था व पी.व्ही.जी. महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी ह.भ.प. श्रीमती पायगुडे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर पोवाडा गायला. श्री. बनसोडे यांनी स्वरचित बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे व संत कबीर यांच्या कार्यावर प्रेरणादायी गीते सादर केली.

राजीव गांधी ई लर्निंग स्कूल ते पर्वती येथील श्री शाहू मंदिर महाविद्यालय पर्यंत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कर्वे समाज सेवा संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देश नशामुक्त करण्यासाठी शहरातील चौकांत जन प्रबोधन करुन सामाजिक परिवर्तनाची गीते सादर केली. श्री. डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना व नागरिकांना नशामुक्त भारत अभियानांतर्गत शपथ देऊन स्वतःपासून याची सुरुवात करण्याचे आवाहन केले.

रास्त दरात तूर डाळ उपलब्धतेसाठी केंद्र सरकार राखीव साठ्यातून डाळ उपलब्ध करुन देणार

नवी दिल्ली  27 : तूरडाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच आयात केलेली तूरडाळ भारतीय धान्य बाजारात उपलब्ध होईपर्यंत, राष्ट्रीय राखीव साठ्यातून टप्प्याटप्प्याने आणि लक्षित तूरडाळ साठा बाजारात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज घेतला आहे. त्यादृष्टीने, डाळ उत्पादित करणाऱ्या पात्र मिलधारकांकडून ऑनलाईन लिलावाद्वारे डाळ घेण्याचे निर्देश ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारीतील ग्राहक व्यवहार विभागाने नाफेड (राष्ट्रीय कृषी सहकार विपणन महासंघ) आणि एनसीसीएफ म्हणजे राष्ट्रीय सहकार ग्राहक महासंघाला दिले आहेत. याद्वारे सर्व राज्यांच्या ग्राहकांना तूरडाळ उपलब्ध होणार आहे.

ग्राहकांना रास्त दरात तूरडाळ उपलब्ध होण्याच्या निकषांवर वितरणाचे मूल्यमापन करुन, त्या आधारे लिलावासाठी तूरडाळीचे प्रमाण आणि नियमितता निश्चित केली जाईल.

सरकारने 2 जून, 2023 रोजी, अत्यावश्यक वस्तू कायदा, 1955 लागू करून तूर आणि उडीद डाळीवर साठा मर्यादा लागू केली होती. त्यामुळे अवैध साठेबाजी रोखता येईल आणि ग्राहकांना परवडणाऱ्या दरात डाळी उपलब्ध होऊ शकतील. या आदेशानुसार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत तूर आणि उडीद डाळीसाठी साठा मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

घाऊक विक्रेत्यांसाठी प्रत्येक डाळीबाबत वैयक्तिकरित्या लागू असलेली साठवणूक मर्यादा 200 टन आहे. किरकोळ विक्रेत्यांसाठी 5 टन, मोठ्या साखळी विक्रेत्यांसाठी प्रत्येक किरकोळ दुकानांमधे 5 टन आणि गोदामामधे ती 200 टन आहे. डाळीच्या गिरणी मालकांसाठी उत्पादनाचे शेवटचे 3 महिने किंवा वार्षिक स्थापित क्षमतेच्या 25 टक्के, यापैकी जास्त असेल ती मर्यादा असेल. या आदेशाद्वारे विभागाच्या पोर्टलवर (https://fcainfoweb.nic.in/psp ) साठ्याची स्थिती घोषित करणे संबंधितांना बंधनकारक केले आहे.

या आदेशान्वये साठा मर्यादेची अंमलबजावणी आणि पोर्टलवरील साठ्याची जाहीर केलेली माहिती यावर ग्राहक व्यवहार विभाग आणि राज्य सरकार सतत लक्ष ठेवतात.

या संदर्भात, केन्द्रीय गोदाम महामंडळ (CWC) आणि राज्य गोदाम महामंडळ (SWCs) यांच्या गोदामांमध्ये विविध संस्थांनी ठेवलेला साठा आणि बाजारातील व्यापाऱ्यांनी बँकांकडे तारण ठेवलेला साठा यांची पुन्हा पडताळणी पोर्टलवर घोषित केलेल्या प्रमाणांच्या तुलनेत केली आहे.

राज्य सरकारे आपापल्या राज्यातील किमतींवर सतत लक्ष ठेवत असून  आवश्यक साठा उपलब्ध आहे किंवा नाही याची पडताळणी करत असून, साठा मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल, असेही नमूद केले आहे.

पंढरपुरात राजकीय नेत्यांचे नव्हे, तर वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुंबई, दि 27 : पंढरपुरात विविध राजकीय नेत्यांच्या स्वागताचे फलक आणि बॅनर्स लावण्यापेक्षा  विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.

मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येथे जाऊन आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांसाठी केलेल्या व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा काल घेतला. तसेच वारकऱ्यांची संवादही साधला. यावेळी त्यांच्या लक्षात आले की पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर विविध पक्षांनी त्यांच्या राजकीय नेत्यांचे स्वागताचे बॅनर्स आणि पोस्टर्स लावले आहेत. पंढरपूरला राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी येतात. विठ्ठल रखुमाई हे त्यांचे श्रद्धास्थान आहे, अशावेळी राजकीय पक्षांचे बॅनर्स लावण्यापेक्षा मजल दरमजल विठूनामाचा गजर करत येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावले पाहिजेत, असे मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सुचवले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनादेखील आवश्यक त्या सूचना केल्या.

पाच नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना पंतप्रधानांनी हिरवा झेंडा 

नवी दिल्‍ली, 27 जून 2023

भारतीय रेल्वेच्या इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमधील राणी कमलापती स्थानक इथून पाच नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाडयांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, लोकप्रतिनिधी आणि विशेष अतिथी उपस्थित होते.

आरामदायी आणि उत्तम रेल्वे प्रवासाच्या नव्या युगाची सुरुवात करत राणी कमलापती-जबलपूर, राणी कमलापती-इंदूर, गोवा (मडगाव)-मुंबई, रांची-पाटणा आणि धारवाड-बंगळुरू दरम्यान पाच नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. आज हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलेल्या या वंदे भारत गाड्या राज्यांची  राजधानी आणि इतर शहरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारतील, प्रवासाचा वेळ कमी करतील आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देतील. ह्या वंदे भारत गाड्या नव्या भारताचा – विकसित भारताचा संदेश देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवत आहेत.  

रानी कमलापती-जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस

रानी कमलापती – जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून निघेल आणि त्याच दिवशी नरसिंगपूर, पिपरिया आणि नर्मदापुरम रेल्वे स्थानकावर थांबे घेऊन जबलपूर स्थानकावर पोहोचेल.

वंदे भारत रेल्वेगाडी   सुरू झाल्यामुळे मध्यप्रदेशची सांस्कृतिक राजधानी जबलपूर, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आणि जवळपासची धार्मिक आणि पर्यटन स्थळांमधील संपर्क वाढेल तसेच या भागाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.

रानी कमलापती – इंदूर वंदे भारत एक्सप्रेस

भोपाळ – इंदूर वंदे भारत एक्सप्रेस भोपाळ रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि त्याच दिवशी उज्जैन रेल्वे स्थानकावर थांबून इंदूर स्थानकावर पोहोचेल. रानी कमलापती ते इंदूर दरम्यान वंदे भारत  रेल्वेगाडी चालवण्यामुळे प्रवास सुलभ आणि जलद  होईल आणि या प्रदेशांची संस्कृती, पर्यटन आणि तीर्थक्षेत्रे यांना जोडण्यासाठी, ही गाडी एक महत्त्वाचे माध्यम बनेल. वंदे भारत एक्सप्रेस सुखद आणि उत्तम रेल्वे प्रवाचाही देखील अनुभव देईल.

गोवा (मडगाव) – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस

गोवा (मडगाव)- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस  रेल्वेगाडी छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावरून सुटेल आणि दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम रेल्वे स्थानकांवर थांबे घेऊन त्याच दिवशी मडगाव स्थानकात पोहोचेल.

अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेसमुळे कोकणातील लोकांना वेगवान आणि आरामदायी प्रवास करण्याचे साधन उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे परिसरातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. या मार्गावरील नवीन वंदे भारत रेल्वेगाडीमुळे पर्यटकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवासुविधांना नवा आयाम मिळेल, अशी अपेक्षा आहे.

रांची-पाटणा वंदे भारत एक्सप्रेस

रांची- पाटणा नवी वंदे भारत एक्सप्रेस  रेल्वेगाडी पाटणा येथून निघेल आणि त्याच दिवशी गया, कोडरमा, हजारीबाग, बरकाकाना आणि मेसरा रेल्वे स्थानकांवर थांबे घेऊन रांची स्थानकात पोहोचेल.

विपुल प्रमाणात खनिज संपत्तीचे वरदान मिळालेले रांची हे खनिज आधारित उद्योगांसाठी एक आदर्श ठिकाण आहे. पाटणाशी जलद कनेक्टिव्हिटीसाठी ही  रेल्वेगाडी स्थानिक व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरेल.

धारवाड-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस

धारवाड-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस  केएसआर बेंगळुरू शहरातून निघेल आणि त्याच दिवशी यशवंतपूर, दावणगिरी आणि हुबळी रेल्वे स्थानकांवर थांबे घेऊन धारवाडला पोहोचेल.

कर्नाटकात धारवाड – बेंगळुरू वंदे भारत रेल्वेगाडी विद्या काशी धारवाड, वैनिज्य नगरी हुबळी आणि बेंगळुरूला जोडेल. ही वंदे भारत रेल्वेगाडी उत्तर कर्नाटक ते दक्षिण कर्नाटक जोडेल.

वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या अनेक उत्कृष्ट सुविधा देतात. त्यामुळे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळतो. या गाड्यांमध्ये असलेल्या ‘कवच’ तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना प्रगत, अद्ययावत आणि अत्याधुनिक सुरक्षा मिळते.  प्रगत अत्याधुनिक सस्पेन्शन सिस्टीममुळे प्रवास अधिक सुरळीत, सुरक्षित आणि सुखकर होण्याची ग्वाही मिळते.

पॉवर कार्समुळे रेल्वेकडून कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होते आणि ब्रेक लावण्याच्या प्रगत प्रणालीमुळे सुमारे 30% विजेची बचत होते.  भारतीय रेल्वेला पर्यावरण रक्षण करता येईल अशी या रेल्वेगाड्यांची  रचना करण्यात आली आहे.

गुरुंच्या नावाने पुरस्कार हा आशीर्वादच-ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांचे उद्गार’श्रीकांत ठाकरे संगीत पुरस्कार प्रदान’

पुणे : ‘गुरुंच्या नावाने शिष्येला पुरस्कार मिळणे, हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. हा पुरस्कार म्हणजे गुरू श्रीकांत ठाकरे यांचा आशीर्वाद आहे. मी नम्रतापूर्वक हा प्रसाद स्वीकारते, असे भावपूर्ण मनोगत ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.
‘संवाद, पुणे’ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त केळकर यांना ‘श्रीकांत ठाकरे संगीत’ पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. मानपत्र, शाल, श्रीफळ आणि महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक आनंद माडगूळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाची संकल्पना सुनील महाजन यांची होती तर सूत्रधार निकिता मोघे होत्या.
याप्रसंगी ‘संवाद, पुणे ‘चे सुनील महाजन, निकिता मोघे, मनसेचे नेते अनिल शिदोरे, हेमंत संभूस, चित्रपट अभ्यासक दिलीप ठाकूर, योगेश राजापूरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्रीकांत ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत उत्तराताई म्हणाल्या, ‘मी त्यांच्याकडे अनेक वर्षे शिकले. त्यांनी सर्व संगीत प्रकल्पांमध्ये मला गाण्याची संधी दिली. अतिशय मनापासून गझल, ठुमर्या शिकवल्या. कोणतीही तडजोड न करता, त्यांनी मनाला पटेल तेच काम केले,’.
माडगूळकर यांनीही आठवणींना उजाळा दिला. ‘लाखाची गोष्ट ‘चित्रपटाची सुंदर अर्कचित्रे ठाकरे यांनी तेव्हा ‘मार्मिक’ मध्ये केली होती. श्रीकांत ठाकरे यांनी स्वत:चा वेगळा बाज जपून, निष्ठेने काम केले. ‘लोकप्रिय’ वाटांनी ते कधीच गेले नाहीत. त्यामुळे ते मुख्य प्रवाहापासून दूर राहिले, असे माडगूळकर म्हणाले.
अनिल शिदोरे यांनी ‘श्रीकांत ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी उपक्रम करावा आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त २०३० मध्ये श्रीकांत ठाकरे यांचे बहुढंगी व्यक्तिमत्त्व उलगडणारा मोठा समारंभ करण्याचे आवाहन केले.
सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात ‘स्वरराज’ या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. निकिता मोघे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कै. श्रीकांत ठाकरे यांनी संगीत दिलेल्या गाण्यांवर आधारित ‘स्वरराज’ हा विशेष गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यामध्ये गप्पागोष्टी आणि आठवणींना उजाळा देखील देण्यात आला.
‘स्वरराज’ या कार्यक्रमात रश्मी मोघे, धनश्री गणात्रा, अजित विसपुते आणि सारंग कुलकर्णी यांनी गीते सादर केली. त्यांना अमृता ठाकूरदेसाई, केदार परांजपे, नितीन शिंदे, अपूर्व द्रवीड, अभय इंगळे यांनी साथसंगत केली. ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर यांचा विशेष सहभाग या कार्यक्रमात होता. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.
——–

फोटो ओळ : ‘संवाद, पुणे’ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित ‘स्वरराज’ या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना श्रीकांत ठाकरे संगीत पुरस्कार आनंद माडगूळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सुनील महाजन, आनंद माडगूळकर, अनिल शिदोरे, हेमंत संभूस, दिलीप ठाकूर आदी उपस्थित होते.