राजगुरूनगर (ता.खेड) – महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेला वाफगावचा भुईकोट किल्ला सुभेदार मल्हारराव होळकर यांनी बांधून घेतला होता. पुण्यश्लोक अहल्यादेवी यांच्या वास्तव्याने ही वास्तू पावन झाली आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार वाफगावचा किल्ला आजही दुर्लक्षित, उपेक्षित आहे. त्याचे जतन, संवर्धन व्हावे यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्यामुळे परिसराचा विकास होईल, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील अशी भावना होळकर राजघराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी व्यक्त केली.
किल्ले वाफगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन सोहळा गजी नृत्य, मर्दानी खेळ, शस्त्र-अस्त्र प्रदर्शन, ढोलवादन व भंडाऱ्याच्या उधळणीने मोठ्या उत्साहात पार पडला. या वर्षी कर्तृत्ववान महिलांना राज्याभिषेकाची संधी देण्यात आली होती. खेडच्या तहसीलदार वैशाली वाघमारे, स्नेहल धायगुडे, उज्ज्वला हाक्के, पूजा मोरे, ललिता पुजारी, संगीता पाटील यांनी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला. यावेळी बडोद्याचे सरदार देवेंद्र पांढरे, निरावागास सरदार देवकाते, चौंडीचे सरदार शिंदे, आमदार प्रकाश आव्हडे, आमदार रामराव वडकुते, आमदार गोपीचंद पडळकर, आण्णा पाटील उपस्थित होते.
महाराजा यशवंतराव होळकर यांचे भारतीय इतिहासातील योगदान अद्वितीय आहे. इंग्रजांचा त्यांनी अनेक वेळा पराभव केला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची बीजे लढवय्या मनात पेरली. महाराजांशी बिनशर्त संधी करण्याची इंग्रजांची मानसिकता होती. मात्र महाराजा यशवंतराव होळकर यांना स्वतंत्र हिंदुस्थान हवा होता, हा इतिहास तरुणांना प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातीं आणि बारा बलुतेदार यांना एकत्र घेवून स्वराज्य निर्माण केले. कोणत्याही जातीचा विचार या महापुरुषांनी केला नव्हता. या महापुरुषांनी राष्ट्रासाठी काम केले त्यांना धर्मात अडकू नका. ऐतिहासिक स्थळांचा आणि महापुरुषांच्या नावाचा वापर करून जे राजकारण सुरू आहे ते थांबले पाहिजे असे प्रतिपादन भूषणसिंहराजे होळकर यांनी यावेळी केले.