Home Blog Page 1472

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे,: सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसुचित जाती घटकात चर्मकार समाजातील गटई काम करणाऱ्या कामगारांसाठी पत्र्यांचे स्टॉल देण्याची योजना राबवण्यात येत असून त्यासाठी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चर्मकार समाजातील गटई काम (चामड्याच्या वस्तू दुरुस्ती व पादत्राणे दुरुस्ती) करणाऱ्या व्यक्तीस रस्त्याच्या कडेला ऊन व पावसापासून संरक्षण होण्यासाठी १०० टक्के अनुदानावर ४ फूट लांबीx ५ फूट रुंदीx ६.५ फूट उंची या आकाराचा पत्र्याचा स्टॉल शासनाकडून देण्यात येतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा व त्याबाबतचे जातीचे प्रमाणपत्र जोडावे. अर्जदाराचे वय १८ ते ६० वर्षादरम्यान असावे व वार्षिक उत्पन्न नागरी भागासाठी ५० हजार रुपयांपेक्षा कमी तर ग्रामीण भागासाठी ४० हजार रुपयांपेक्षा कमी असावे. उत्पनाचा दाखला सोबत जोडणे आवश्यक आहे. स्टॉल ठेवण्यासाठी स्वत:ची जागा असावी किंवा नगर परिषद, महानगरपालिका जागेमध्ये ठेवण्यासाठी ना- हरकत प्रमाणपत्र असावे. तसेच स्टॉल विकणार नसल्याचे हमीपत्रही अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

इच्छुकांनी मुदतीत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, सर्वे नं. १०४/१०५. विश्रावाडी पोलिस स्टेशनच्या समोर येरवडा, पुणे ४११००६ (दूरध्वनी क्र. ०२०-२९७०६६११) येथे अर्ज करावा, असे आवाहन समाज कल्याणच्या सहायक आयुक्त संगिता एन. डावखर यांनी केले आहे.

  देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमीच….  -डॉ.रवी गोडसे (अमेरिका)

                                             
पिंपरी-देशामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. पण आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे असे डॉ. रवी गोडसे (अमेरिका)यांनी सांगितले. १८ व्या जागतिक मराठी संमेलनातील ” जागतिक आरोग्य व्यवस्था आणि भारत” या परिसंवादात ते बोलत होते.
   आय. सी. एम. आर.चे माजी संचालक पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. श्रीकांत चिंचालकर(कॅनडा), डॉ. रवी गोडसे(अमेरिका), डॉ. मकरंद जावडेकर(अमेरिका) हे यामध्ये सहभागी झाले होते. डॉ. शंतनु अभ्यंकर(वाई -सातारा)यांनी सूत्रसंचालन केले.


     आपला देश हा महाशक्ती झाला पाहिजे त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. आवश्यक धोरणे राबविण्यात येत असून त्याबरोबर लोक शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. आपल्या देशात आणखी संशोधन होण्यास वाव आहे. मात्र त्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. त्याकरता मानसिकता तयार केली पाहिजे, असे डॉ. रवी गोडसे म्हणाले.
     डॉ. गंगाखेडकर म्हणाले, कोरोना भारतात आल्यावर रुग्णांची तपासणी करण्यात आपणाला यश आले आहे. त्याचप्रमाणे त्यावर संशोधन करुन लस तयार करण्यात यशस्वी झालो आहोत. पण अजूनही बरेच काम करण्याची गरज आहे.
      डॉ. जावडेकर यांनी सांगितले की, विविध प्रकारच्या औषध उत्पादनात आपल्या देशाने चांगले काम करुन दाखविले आहे आणि त्यावर अधिक संशोधन करण्यात येत आहे. मोठा पुरवठादार देश म्हणून जग आपल्याकडे आकर्षित होत आहे. असे ते म्हणाले.
डॉ. चिंचालकर यांनी मनोगत व्यक्त केले.
    पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी सर्व मान्यवरांचा शॉल, स्मृतिचिन्ह व रोपटे देऊन गौरव केला. कार्यक्रमास प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य सैयद शहजादी ८ जानेवारीपासून राज्याच्या दौऱ्यावर

      मुंबई, दि. ७ : राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य (केंद्रीय मंत्री दर्जा) कुमारी सैयद शहजादी या ८ ते ११ जानेवारी २०२३ या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

            या दौऱ्याच्या कार्यक्रमात त्या अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीची पाहणी करतील. तसेच अल्पसंख्याक समाजाला भेडसावणाऱ्या तक्रारी, प्रश्नांवर चर्चा करतील. प्रधानमंत्री यांचा १५ कलमी कार्यक्रम, केंद्र आणि राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आढावा बैठक घेऊन चर्चा करतील.

क्रांती रेडकर- समीर वानखेडेंच्या घरी चोरी

मुंबई- अभिनेत्री क्रांती रेडेकर हिच्या घरी चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. आपल्या घरात काम करणाऱ्या मोलकरनीने ही चोरी केली असल्याचा आरोप क्रांती रेडकरने केला आहे.घरातील मौल्यवान असे साडेचार लाख रुपये किमतीचे घड्याळं चोरी झाल्याची तक्रार क्रांतीने गोरेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यांनतर गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून यासंदर्भात अधिकचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रांती रेडकर यांनी एका एजन्सी मार्फत घरात काम करणाऱ्या महिलेची नेमणूक केली होती. मात्र, काही दिवस काम केल्यानंतर घरात कोणी नसताना योग्य संधी साधत मोलकरनीने चोरी केली. त्यानंतर ही महिला फरार झाली आहे. क्रांतीच्या तक्रारीच्या आधारावर गोरेगाव पोलिस तपास करत आहेत आणि त्या मोलकरणीला ज्या संस्थेने नोकरी दिली होती तिचा तपास सुरू आहे.

क्रांती रेडेकर यांचा 2017 साली क्रांती यांचा समीर वानखेडे यांच्याशी विवाह झाला होता. क्रांती आणि समीर यांना झिया आणि झायदा या दोन जु्ळ्या मुली आहेत. क्रांती रेडकर यांनी 2000 साली ‘सून असावी अशी’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.2006 साली आलेल्या ‘जत्रा- ह्याला गाड रे त्याला गाड’ या चित्रपटात क्रांती यांची भूमिका होती. याच चित्रपटातल्या कोंबडी पळाली तंगडी धरून या गाण्याने आणि त्याहून जास्त ‘गंगाजल ‘या हिंदी चित्रपटाने तिला लोकप्रियता मिळवून दिली होती .बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी म्हणून आजवर समीर वानखेडे महराष्ट्रासह देशाला परिचित झाले असावेत.

भारतीय हवाई दल आणि जपान एअर सेल्फ डिफेन्स फोर्स जपानमध्ये संयुक्त सरावासाठी सज्ज

नवी दिल्ली – देशादेशांमधील हवाई संरक्षण सहकार्याला चालना देण्यासाठी, जपानच्या हयाकुरी हवाई तळावर, 12 जानेवारी   2023 ते 26 जानेवारी 2023 याकाळात भारतीय हवाई दल आणि जपान एअर सेल्फ डिफेन्स फोर्स (जेएएसडीएफ) यांचा  ‘वीर गार्डियन-2023’ हा संयुक्त हवाई सराव, भारत आणि जपानने आयोजित केला आहे. या हवाई सरावात सहभागी होणाऱ्या भारतीय तुकडीत चार एययू-30 एमकेआय, दोन सी-17 आणि एक आयएल-78 विमाने असतील, तर जेएएसडीएफची चार एफ-2 आणि चार एफ-15 लढावू विमाने सहभागी होतील.

जपानमधील टोकियो येथे 08 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या दुसऱ्या 2+2 परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रिस्तरीय बैठकीत,दोन्ही बाजूंमधील सुरक्षा सहकार्य तसेच द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वाढवण्यास आणि पहिल्या संयुक्त लढाऊ जेट कवायतींसह अधिक लष्करी सरावांमध्ये सहभागी होण्याचे भारत आणि जपानने

मान्य केले. हा सराव दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंध आणि घनिष्ठ संरक्षण सहकार्यासाठी आणखी एक महत्वपूर्ण पाऊल ठरेल.

उद्घाटनाच्या संयुक्त सरावामध्ये दोन्ही हवाई दलांमधील विविध हवाई लढाऊ कवायतींचा समावेश असेल. ते जटिल वातावरणात बहु-क्षेत्रीय हवाई युद्ध मोहिमांची प्रात्यक्षिके  हाती घेतील आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करतील. दोन्ही बाजूंचे तज्ञ विविध कार्यान्वयन पैलूंवर त्यांचे कौशल्य सामायिक करण्यासाठी चर्चा करतील.  ‘वीर गार्डियन’ या सरावामुळे मैत्रीचे दीर्घकालीन बंध दृढ होतील आणि दोन्ही हवाई दलांमधील संरक्षण सहकार्याचे मार्ग वाढतील.

‘नटश्रेष्ठ निळू फुले स्मृती’ पुरस्काराने अभिनेते अशोक शिंदे सन्मानित करणार

मराठी  सिनेनाटयसृष्टीत चिरतरुणअभिनेता म्हणून अशोक शिंदे   यांची ओळख आहे.नाटक, चित्रपट, मालिकांमधून नायक, सहनायक तसेच खलनायक अशा विविधांगी भूमिका त्यांनी आजवर साकारल्या. आपल्या व्यक्तिमत्वाच्या आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात  स्थान  निर्माण करणाऱ्या या  अभिनेत्याच्या कारकिर्दीचा सन्मान करत यंदाचा  ‘नटश्रेष्ठ निळू फुलेस्मृति’ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.   

सांस्कृतिक, सामाजिक आणिशैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना नटश्रेष्ठ निळूफुले आर्ट फाउंडेशनतर्फे ‘नटश्रेष्ठ निळू फुले स्मृति पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येते.यंदाचा सांस्कृतिक पुरस्कार अभिनेते अशोक शिंदे यांना जाहीर झाला आहे. अशोक शिंदे यांनीआजवर २२५चित्रपट, १५० मालिका, ५० पेक्षा जास्तनाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप रसिकांवर पाडली आहे.  हा  पुरस्कार वितरण सोहळा ८जानेवारी २०२३ ला शेतकरी सदन सभागृह, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे संपन्न होणार आहे. 

या  पुरस्काराबद्दल  आपल्या भावना व्यक्त करताना अशोकजी  सांगतात, ‘नटश्रेष्ठ निळू फुले या महान कलाकाराच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. या अशा पुरस्करांमुळे काम करायला बळ मिळते. माझा होत  असलेला हा सन्मान खरंच माझ्यासाठी आनंददायी आहे. 

‘एका पेक्षा एक’, ‘रंगत संगत’, ‘हमाल दे धमाल’, ‘एवढंस आभाळ’, ‘लालबागची राणी’, ‘रॉकी’, ‘विजय दीनानाथचौहान’, ‘हर हर महादेव’   यासारख्या अनेक चित्रपटांमधून काम करत त्यांनी आपली लोकप्रियता जपली. मालिका विश्वातही अशोक शिंदे यांनी स्वतःचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे.’घरकुल’, ‘दामिनी’, ‘अवंतिका’, ‘स्वप्नांच्या पलीक’डे, ‘दुहेरी’, ‘वसुधा’, ‘छत्रीवाली’ आणिसध्या गाजत असलेली ‘स्वाभिमान शोध या अस्तित्वाचा’ यांसारख्या अनेक मालिकांमधील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.  ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘प्रेम प्रेम असतं’, ‘अपराध मीच केला’, ‘षडयंत्र’, ‘ब्लाइंड गेम’ अशा विविध जॉनरच्या नाटकां मध्येही त्यांनी साकारलेल्या भूमिकांनी रसिकांना आनंद दिला.

‘शाश्वत पाणीपुरवठा व सार्वजनिक आरोग्या’वरदेशभरातील तज्ज्ञ करणार तीन दिवस विचारमंथन

पुणे : पाणी व्यवस्थापनाशी संबंधित तंत्रज्ञान, विकास, नियोजन यासाठी कार्यरत इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनचे (आयवा) तीन दिवसीय ५५ वे अखिल भारतीय वार्षिक अधिवेशन २०, २१ व २२ जानेवारी २०२३ रोजी होत आहे. ‘शाश्वत पाणी पुरवठा व सार्वजनिक आरोग्य-सर्वांसाठीची उपलबद्धता’ या संकल्पनेवर देशभरातील तज्ज्ञ या अधिवेशनात विचार मंथन करतील,,” अशी माहिती अधिवेशनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष, ‘आयवा’चे उपाध्यक्ष व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी संयोजन समिती उपाध्यक्ष, ‘आयवा’चे राष्ट्रीय सरसचिव डॉ. डी. बी. पानसे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता वैशाली आवटे, अनंत नामपूरकर, पराग कश्यप, अनिल कुलकर्णी, शिवराज कुलकर्णी, राजेंद्र आंटद, दिलीप पंडित, दीपक म्हस्के आदी उपस्थित होते.
सुभाष भुजबळ म्हणाले, “हडपसर येथील मेस्से ग्लोबल (लक्ष्मी लॉन्स) पुणे येथे २० जानेवारीला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. विविध सत्रात तज्ज्ञ विचार मांडतील. त्यासोबतच पाणीपुरवठा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. लखनौ येथील इंजि. अनिल कुमार गुप्ता यांना ‘जलनिर्मलता’, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथील डॉ. पराग सादगीर यांना ‘जलसेवा’ पुरस्कार, तर लखनौ येथील पल्लवी राय यांना युवा महिला अभियंता म्हणून ‘ब्रिज नंदन शर्मा पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाणार आहे. यासह इतर पुरस्कारांचे वितरण या अधिवेशनात होणार आहे.”
डॉ. डी. बी. पानसे म्हणाले, “संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमाचे माजी संचालक डॉ. राजेंद्र शेंडे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांचे वातावरणातील बदलांचे पाण्यावर होणारे परिणाम यावर व्याख्यान होईल. तरुणांना उद्योगासाठी चालना देणाऱ्या उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन केले असून, त्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, पुणे पालिकेच्या सहआयुक्त पूनम मेहता, शास्त्रज्ञ डॉ. पवन लाभशेटवार, युनिसेफ इंडियाचे युसूफ कबीर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वैज्ञानिक अधिकारी डॉ. अमर सुपाते, मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, एम. मॅथियालगन आदी मार्गदर्शन करणार आहेत. युनिसेफ आणि स्थानिक संस्थांच्या सहकार्याने हे सत्र होत आहे.”
“या परिषदेत ‘हर घर जल : आव्हाने व उपाय’, ‘ग्रामीण व शहरी भागासाठी चोवीस तास पाणीपुरवठा’, शहरी व ग्रामीण भागातील सांडपाणी नियोजन’, मानवी विष्ठेचे नियोजन/व्यवस्थापन’, ‘जलशुद्धीकरण व मैलापाणी शुद्धीकरण’, ‘यंत्रणांचे संचलन व देखभाल’, ‘जलस्रोतांचे व्यवस्थापन’ आदी विषयांवर विचारमंथन होईल. यासह ‘जलजीवन अभियान’ व ‘अमृत’ ही विशेष सत्रे व युरोप, जपान आणि ब्रिटन येथील तज्ज्ञांचे ‘संशोधन व विकास तंत्रज्ञानाचे आदानप्रदान’वर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, तरुणाईसाठी पाणी क्षेत्राशी निगडित पोस्टर स्पर्धा, तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींचे शोधनिबंध सादरीकरण असा भरगच्च कार्यक्रम आखण्यात आला आहे. अत्याधुनिक यंत्रे, उपकरणे व तांत्रिक माहिती असलेल्या १४२ स्टॉल्सचे प्रदर्शन असणार आहे. भारतासह परदेशातून ११०० पेक्षा अधिक अभियंता प्रतिनिधी, तर १५० हुन अधिक युवकांनी सहभागासाठी नोंदणी केली आहे. प्रशासनातील विविध अधिकारी, आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ व्यक्ती या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत,” डॉ. डी. बी. पानसे यांनी नमूद केले.
इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन विषयी:इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन देशातील ३६ केंद्रांद्वारे पाणी पुरवठा व सार्वजनिक आरोग्य विभागाशी संबधित १२ हजार व्यक्तींच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण, औद्योगिक व कृषी, जलशुद्धीकरण यावर काम करत आहे. पाणी पुरवठा व जलस्वच्छता यावर संस्था अद्ययावत तंत्रज्ञान, माहिती पुस्तिका, मार्गदर्शक सूचना आदी माध्यमातून प्रसार व जागृती करत आहे. पाणी व संबंधित क्षेत्राशी निगडित व्यावसायिक, तंत्रज्ञ, सल्लागार, यांना एकाच व्यासपीठावर चर्चा व विचारमंथन तसेच तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करून समस्यांचे निराकरण, दूरगामी परिणाम साधणाऱ्या उपायोजना सुचविण्यासाठी ही वार्षिक परिषद महत्वपूर्ण असते.

बुद्धिबळाचे समाजाला मोठे योगदान! ग्रँडमास्तर प्रवीण ठिपसे यांचे प्रतिपादन

मुंबई : बुद्धिबळ खेळल्याने मुलांची बौद्धिक क्षमता विकसित होते. ती हुशार होतात. बुद्धिबळामुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात वाटचाल करताना तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी होते. त्यामुळे ही मुले फक्त बुद्धिबळ चॅम्पियनच होणार नाहीत, तर भविष्यात समाजातील यशस्वी व्यक्ती म्हणूनही नाव कमावतील. हेच बुद्धिबळाचे समाजाला दिलेले खूप मोठे योगदान आहे, असे मत ग्रँडमास्तर प्रवीण ठिपसे यांनी व्यक्त केले.

गरवारे क्लब हाऊसतर्फे शनिवारी वानखेडे स्टेडियम येथे आयोजित केलेल्या पहिल्या गरवारे क्लब हाऊस (जीसीएच) शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमात ठिपसे बोलत होते.

“तुम्ही विविध क्षेत्रांतील यशस्वी सीईओ, आयपीएस अधिकारी, मुख्याध्यापक, प्राध्यापक, आयआयटीयन्स, राजकीय नेते पाहिलेत तर ते आपल्या आयुष्यात चांगले बुद्धिबळपटू होते. माजी लोकसभाध्यक्ष बलराम जाखड हे विद्यापीठ चॅम्पियन होते, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुखसुद्धा कॉलेज चॅम्पियन होते. अशी अनेक नावे विविध क्षेत्रात आढळतात,” असे ठिपसे यांनी सांगितले.

“२०१९पासून भरतसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय बुद्धिबळ संघटना उत्तम कार्य करीत आहे. महाबलीपुरमला झालेली चेस ऑलिम्पियाडही यशस्वीपणे पार पडली. तामिळनाडू राज्य सरकार आणि भारत सरकारने या स्पर्धेसाठी उत्तम पाठबळ दिले. संघटनेचा ‘चेस इन स्कुल’ हा उपक्रमही यशस्वीपणे राबविला जात आहे. आम्ही मुलांना बुद्धिबळ मार्गदर्शक ठरेल असे मार्गदर्शक पुस्तकही संघटनेच्या वेबसाईटवर उपलब्ध केले आहे. अशी खेळाला प्रेरक अनेक पावले आम्ही उचलली आहेत,” असे ठिपसे यावेळी म्हणाले.

१९८५मध्ये मॉस्को येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेची आठवण ठिपसे यांनी सांगितली. ते म्हणाले, “गॅरी कास्पारोवला त्याच्या विश्वविजेतेपदाबाबत विचारले होते. तेव्हा त्याने सांगितले, माझ्या देशात ४५ लाख खेळाडू बुद्धिबळ खेळतात. त्यामुळे त्यापैकी एखादा जगज्जेता होणे स्वाभाविक आहे.’’

‘’शरद पवार हे गेली अनेक वर्षे बुद्धिबळच नव्हे, तर अन्य अनेक क्रीडा संघटनांचे आधारस्तंभ आहेत. ते राज्यातील अनेक क्रीडा प्रकारांचे खंदे पुरस्कर्तेही आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीच्या नावाने स्पर्धा होणे हे अभिमानास्पद आहे. गरवारे क्लब हाऊसने या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या अध्यक्षांचा सन्मानच केला आहे. या एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धेत सात राज्यांतील विक्रमी संख्येने जवळपास सातशे खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेला देशातील सर्वाधिक रकमेचे बक्षीस देण्यात येणार आहे. अगदी ८, १०,१२वर्षांखालील वयोगटासाठी संयोजकांनी बक्षिसे ठेवली आहेत. यासाठी मी गरवारे क्लब हाऊसचे अभिनंदन करतो,’’ असे ठिपसे यांनी सांगितले.

शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी गरवारे क्लब हाऊसकडे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातून सुमारे सातशे प्रवेशिका दाखल झाल्या आहेत. यापैकी ७० टक्के मुलांचा समावेश आहे. मुंबईच्या बुद्धिबळ इतिहासात सर्वाधिक बुद्धिबळपटूंचा सहभाग असलेली ही महाबुद्धिबळ स्पर्धा असणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील विजेत्याला शरद पवार चषक आणि दोन लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात येईल. याचप्रमाणे अन्य ४५ विजेत्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या सहकार्याने आम्ही गेले तीन आठवडे स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेत आहोत, अशी माहिती गरवारे क्लब हाऊसचे संचालक आणि बुद्धिबळ समितीचे अध्यक्ष मोहित चतुर्वेदी यांनी दिली.

“आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ क्षेत्रातील गुणवत्ता जोपासण्याची ही संधी आमच्या गरवारे क्लब हाऊसला शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या निमित्ताने मिळत आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो. स्पर्धेत मोठ्या संख्येने बुद्धिबळपटूंनी भाग घेतला असला तरी मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि गरवारे क्लबची कार्यकारिणी समिती हे यशस्वीपेणे पेलते आहे. गरवारे क्लब हाऊसची क्रीडा संस्कृती वैभवशाली अशी आहे. मोहित आणि त्याची चमू ही बुद्धिबळ स्पर्धा उत्तम योजना आखून ही स्पर्धा घेत आहे,” असे गरवारे क्लब हाऊसचे उपाध्यक्ष राज पुरोहित यांनी सांगितले.

“क्रीडा उपक्रम आयोजित करण्याचा आमचा उद्देश फक्त फक्त तरुण खेळाडूना घडवणे नव्हे, तर उत्तम व्यक्तिमत्व विकास आणि व्यक्ती घडवणे, हा आहे,” असे गरवारे क्लब हाऊसचे कोषाध्यक्ष मनीष अजमेरा यांनी सांगितले.

“बुद्धिबळ या खेळाला उत्तम चालना मिळावी, या हेतूने हे गरवारे क्लब हाऊसचे पाऊल आहे. चेस ऑलिम्पियाडच्या टॉर्च रिलेचेही आमच्या क्लबने त्यावेळी आयोजन केले होते. काही वर्षांपूर्वी क्लबतर्फे जीसीएच महाराष्ट्र राज्य ज्युनियर खुली बुद्धिबळ स्पर्धासुद्धा यशस्वी आयोजित केली जायची. पहिल्या शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या यशामुळे क्लबच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे,” असे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर यांनी सांगितले.

महिलांच्या तायक्वांदो स्पर्धेत पालघरच्या तन्वी पोस्तुरेला सुवर्णपदक

पुणे- पालघरच्या तन्वी पोस्तुरे हिने ५३ किलो गटात सुवर्णपदक जिंकून महिलांच्या तायक्वांदो स्पर्धेत चमकदार यश मिळविले. अन्य गटात रागिणी जयस्वार (४९ किलो) व आकांक्षा बोरकर (५७ किलो) यांना सुवर्णपदक मिळाले.

शिवछत्रपती क्रीडा नगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत
पोस्तुरे हिने ५३ किलो गटाच्या अंतिम फेरीत पुण्याच्या श्रुती शेटे हिच्यावर मात केली. या गटात श्रुती शिर्के (मुंबई( व विद्या नागपूरे (नागपूर) यांना ब्रॉंझपदक मिळाले. ४९ किलो गटाच्या अंतिम फेरीत रागिनी हिने पालघर संघाची खेळाडू माही निपाणकर हिचा पराभव केला. भक्ती चव्हाण सातारा व अपूर्वा देसाई रायगड यांना ब्रॉंझपदक मिळाले.
महिलांच्याच ५७ किलो गटात पुण्याची आकांक्षा बोरकर हिने सोनेरी कामगिरी करताना रायगडच्या जयश्री गोसावी हिचा पराभव केला.‌ धृती हाते (मुंबई) व सपना मोरे (सातारा) यांनी ब्रॉंझपदक जिंकले.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा ट्रायथलॉनमध्ये नागपूरच्या जोशी भगिनींचे वर्चस्व

पुणे, 7 जानेवारी: नागपूरच्या स्नेहल आणि संजना या जोशी भगिनींनी शनिवारी येथील बालेवाडी स्टेडियमवर महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक 2023 मध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकून राज्यातील ट्रायथलॉन स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले.

गेल्या वर्षी नेपाळमधील आशियाई ट्रायथलॉन चषक स्पर्धेत भाग घेतलेल्या जोशी भगिनींनी, जलतरण आणि सायकलिंग फेरीनंतर झालेल्या धावण्याच्या शर्यतीनंतर पुण्याच्या मानसी मोहितेला पिछाडीवर टाकले.

वर्ध्याच्या अंगद इंगळेकरने पुरुषांच्या ट्रायथलॉन क्रमवारीत पुण्याच्या पार्थ मिरगे आणि कोल्हापूरच्या हृषीकेश पाटील यांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले.

तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या औरंगाबादमध्ये, स्थानिक खेळाडू सय्यद अंबीर आणि वैदेही लोहिया यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला फॉइल प्रकारात सुवर्णपदके जिंकली. अंबीरने पुरुषांच्या अंतिम फेरीत त्याचा सहकारी तेजस पाटीलचा पराभव केला तर लोहियाने महिलांच्या अंतिम लढतीत मुंबईच्या वैभवी इंगळेचा पराभव केला.

अमरावती येथे झालेल्या तिरंदाजी प्रकारात नाशिकच्या पुरुष आणि अमरावतीच्या महिलांनी रिकर्व्ह सांघिक सुवर्णपदके जिंकली, तर पुण्याच्या पुरुष आणि महिलांनी कंपाउंड प्रकारात दोन्ही सुवर्णपदके जिंकली.

फुटबॉल स्पर्धेत, पुण्याचे पुरुष आणि महिला दोन्ही संघ संबंधित अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर दुहेरी मुकुट मिळवण्याचे उद्दिष्ट असेल.

पुण्याच्या पुरुषांनी मुंबईचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. त्यांच्यापुढे कोल्हापूरचे आव्हान असणार आहे. अन्य उपांत्य फेरीत कोल्हापूर संघाने पालघरचा 4-0 असा पराभव केला.
ठाणे महिला संघाने नागपूरचा ३-० असा पराभव करत टेबल टेनिस सांघिक विजेतेपद पटकावले.

सविस्तर निकाल

धनुर्विद्या:
पुरुष:
रिकर्व्ह: सुवर्ण: नाशिक, रौप्य: उस्मानाबाद, कांस्य: बुलढाणा
कंपाऊंड : सुवर्ण : पुणे, रौप्य : सातारा, कांस्य : अकोला
महिला:
रिकर्व्ह: सुवर्ण: अमरावती, रौप्य: नाशिक, कांस्य: अ’नगर
सुवर्ण: पुणे, रौप्य: नागपूर, कांस्य: बुलढाणा

कुंपण
पुरुष:

फॉइल : सुवर्ण : सय्यद अंबीर (औरंगाबाद), रौप्य : तेजस पाटील (औरंगाबाद), कांस्य : अनिल महिपती (कोल्हापूर), आदित्य राठोड (मुंबई)
इप्पे : सुवर्ण : गिरीश जकाते (सांगली), रौप्य : प्रथमकुमार शिंदे (कोल्हापूर), कांस्य : यश वाघ (औरंगाबाद), सौरभ तोमर (भंडारा)

महिला:
फॉइल : सुवर्ण : वैदेही लोहिया (औरंगाबाद), रौप्य : वैभवी इंगळे (मुंबई), कांस्य : अनिता साळोखे (कोल्हापूर), ज्योती सुतार (कोल्हापूर)
इप्पे : सुवर्ण : ज्ञानेश्वरी शिंदे (लातूर), रौप्य : माही अरदवाड (लातूर), कांस्य : हर्षदा वडते (औरंगाबाद), वैष्णवी कोडलकर (अ’नगर)
फुटबॉल (उपांत्य फेरी)
पुरुष: पुणे (नरशिमा मगम, रोमॅरियो नाझरेथ) वि.वि मुंबई (मार्क डिसोझा पेनल्टी) 2-1;

कोल्हापूर (सतेज साळोखे, संकेत साळोखे, करण चव्हाण)३-० वि.वि नागपूर

महिला: मुंबई (सानिया पाटील स्वयं गोल, भूमिका माने) २-० वि.वि कोल्हापूर;
पुणे (दिव्या पावपा, सुमैय्या शेख ३ गोल) ४-० वि.वि. पालघर .

टेबल टेनिस (अंतिम फेरी):
महिला
संघ : ठाणे वि.वि नागपूर ३-०
कांस्यपदक विजेते: पुणे आणि नाशिक

ट्रायथलॉन
मुले : अंगद इंगळेकर (वर्धा), २. पार्थ मिरगे (पुणे), ३. हृषीकेश पाटील (कोल्हापूर)

मुली : १. स्नेहल जोशी (नागपूर), २. संजना जोशी (नागपूर), ३. मानसी मोहिते (पुणे)

कबड्डीतील महिलांमध्ये पुणे व रायगडची आगेकूच

बारामती- विजेतेपदासाठी दावेदार असलेल्या पुणे संघाने रायगड व मुंबई उपनगर यांच्यासह राज्य मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या गटात आगेकूच कायम राखली.

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात सुरू असलेल्या या स्पर्धेत पुणे संघाने नागपूर संघाचा ५२-१४ असा धुव्वा उडविला. मध्यंतराला ३६-५ अशी आघाडी घेत त्यांनी आपला विजय निश्चित केला होता. त्याचे श्रेय आम्रपाली गलांडे व अंकिता जगताप यांच्या चतुरस्त्र खेळास द्यावे लागेल. मुंबई उपनगर संघाने आपले पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या मुंबई शहर संघाला ४८-३६ असे पराभूत केले.‌ त्यावेळी पूर्वार्धात त्यांनी २३ विरुद्ध १७ अशी सहा गुणांची आघाडी घेतली होती. मुंबई उपनगर संघाकडून हरदीप कौर, याशिका पुजारी व प्रांजल पवार यांनी अष्टपैलू खेळ केला.‌ मुंबई शहर संघाकडून मेधा कदम व प्रतीक्षा तांडेल यांचे प्रयत्न अपुरे ठरले.
रायगड संघाने अमरावती संघावर ३३-१९ अशी मात केली त्यावेळी पूर्वार्धात त्यांच्याकडे १८-१० अशी आघाडी होती. रायगड संघाच्या या विजयाचे श्रेय तेजा सकपाळ व रचना मात्रे यांच्याकडे द्यावे लागेल. अमरावती संघाकडून बरखा गेडाम व मंगला राऊत यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.‌
पुरुष गटात मुंबई शहर संघाने विजयी वाटचाल कायम राखताना धुळे संघावर ४६-१६ असा दणदणीत विजय नोंदविला त्यावेळी मध्यंतराला त्यांनी ३१-१० अशी भक्कम आघाडी घेतली होती. मुंबई शहर संघाच्या या विजयात सुशांत नाईक व मयूर शिवतीर्थकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. धुळे संघाकडून दिनेश अहिरराव याची लढत एकाकी ठरली.

तुम्ही म्हणजे आयोग नाही,आकस कसला?अशा ५६ नोटीसा आल्यात मला -चित्रा वाघांचा पुन्हा चाकणकरांवर हल्लाबोल

आम्ही आकस करावा असे काय आहे तुमच्यामध्ये ?-चित्रा वाघ यांचा रुपाली चाकणकरांना सवाल

पुणे-आयोगाच्या कार्यपद्धतीमुळे न्यायाची भाषा कोणती, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हीही तिथे काम करुन आलेलो आहोत. तुम्ही म्हणजे आयोग नाही, एकटी अध्यक्ष म्हणजे आयोग नसतो. एकटी मी म्हणजे आयोग, हे डोक्यातून काढा, असे म्हणत चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रत्त्युतर दिले. अशा 56 नोटीसा मला आल्या आहेत. त्यात आणखी एक भर पडली, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले.

मॉडेल उर्फी जावेदच्या वेशभूषेवरून सुरू झालेला वाद आता भाजप नेत्या चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचला आहे. चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या कामकाजावर आक्षेप घेतल्यानंतर शुक्रवारी राज्य महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात आली. त्यावर आज चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली.

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, आयोग म्हणजे अध्यक्षासह सदस्य असतात. महाराष्ट्राचे डीजी आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात. मला पाठवलेली नोटीस सर्व सदस्यांच्या सहमतीने पाठवली का? मुंबई पोलिस आयुक्तांनी दखल घेतली नाही, हे कशाच्या आधारावर सांगता, असे चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच महिला आयोगाचे अध्यक्षपदी आतापर्यंत अनेकांनी कामे केली. पण कोणीही अशा विकृतीला खतपाणी नाही घातले. तुमच्यामध्ये असे काय आहे. ज्यामुळे आम्ही आकस करावा, असे म्हणत चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकरांवर हल्लाबोल केला. शिवाजी महाराजांच्या पवित्र महाराष्ट्रात उर्फीचा नंगानाच चालू देणार नाही, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सायकल फेरी

पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, दि.७: पुण्यात होणाऱ्या ‘जी-२०’ परिषदेबाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने पुणे महापालिका सायकल क्लबतर्फे सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले.महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार आणि विकास ढाकणे यांनी झेंडा दाखवून या फेरीचा शुभारंभ केला.

सायकल फेरीच्या माध्यमातून ‘जी-२०’ बाबत तसेच पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात आली. महापालिका मुख्य भवनापासून सुरू झालेली सायकल फेरी जंगली महाराज रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, थोरले बाजीराव रस्ता, शनिवार वाडा आणि पुन्हा महानगरपालिका इमारत अशा मार्गाने पूर्ण करण्यात आली.

सुमारे पंधराशे सायकलप्रेमी नागरिक या सायकल फेरीत सहभागी झाले. पुणे महापालिकेचे सर्व विभाग प्रमुखदेखील या सायकल फेरीत सहभागी झाले होते.या सायकल फेरीचे नियोजन पुणे महानगरपालिका सायकल क्लबचे मुख्य समन्वयक सुरेश परदेशी आणि महापालिकेचे उपायुक्त (क्रीडा) संतोष वारुळे यांनी केले.
000

नालेसफाईच्या निविदांना याही वर्षी विलंब

तातडीने निविदा काढण्याची मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांची मागणी

मुंबई, दि. 7 जानेवारी 2022

गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी मुंबईतील मोठ्या नाल्यांच्या साफसफाईच्या निविदा अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे साफसफाईच्या कामांना विलंब होण्याची शक्यता लक्षात घेऊन याकडे पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष. आमदार. अँड आशिष शेलार यांनी केली आहे.

आमदार अँड आशिष शेलार यांनी आयुक्तांना पत्र लिहिले असून पत्रात त्यांनी म्हटले आहे की,
आपणास ज्ञात आहेच की,
पावसाळ्या पुर्वी दरवर्षी मुंबईतील सुमारे 309 मोठ्या नाले, 508 छोटे नाले, 5 नद्या आणि रस्त्या लगतची छोटी गटारे यातील गाळ काढण्याची कामे करावी लागतात. साधारणतः मार्च महिन्याच्या अखेरीस अथवा एप्रिल पासून पुर्ण क्षमतेने नालेसफाईच्या कामांना सुरुवात केली तरच ती कामे वेळेत पुर्ण होतात, असे आजपर्यंतच्या कार्यपध्दतीवरुन दिसून आले आहे.

मात्र यावर्षी अद्याप नालेसफाईच्या कंत्राटाच्या निविदाच काढण्यात आलेल्या नाहीत. जर ही निविदा प्रक्रिया वेळीच पुर्ण न झाल्यास प्रत्यक्ष कामे वेळीच सुरु होणार नाहीत. गतवर्षी अशा प्रकारे निविदा प्रक्रिया उशिरा सुरु झाली होती त्यावेळी ही आम्ही सातत्याने पाठपुरावा केला होता, त्यानंतर विलंबाने प्रक्रिया सुरु झाली खरी मात्र त्याचा कामांवर परिणाम झाला होता.
गतवर्षीचा अनुभव लक्षात न घेता पुन्हा याही वर्षी प्रशासनाने निविदा प्रक्रियेला उशीर केल्याचे दिसून येते आहे, ही बाब गंभीर असून याकडे आपण तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
त्यामुळे आम्ही आपल्याकडे या पत्राव्दारे विनंती करतो की,
1) ज्या पध्दतीने छोट्या नाल्यांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे तशीच मोठ्या नाल्यांच्या कामांची निविदा तातडीने काढण्यात याव्यात.

2) निविदा प्रक्रिया पारदर्शक असावी

3) मागितल काळात काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांना या मध्ये समावेश करण्यात येऊ नये

4) निविदेपासून साफसफाई पर्यंत संपूर्ण कामांचा कालबद्ध कार्यक्रम तयार करावख

5) कामे वेळेत सुरु व्हावीत, यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही, गाळ संपूर्ण काढला जाईल या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात यावी.

तरी आपण याबाबत तत्काळ लक्ष द्यावे ही विनंती आमदार अँड आशिष शेलार यांनी पत्रात केली आहे.

बांगलादेशी हटाव, दादर बचाव:दादरमध्ये स्थानिक भूमिपुत्रांच्या समर्थनार्थ भाजपा मैदानात

मुंबई:
घुसखोर बांगलादेशी रोहिंग्याना हटवा, दादर वाचवा…दादरकरांच्या पैशावर रोहिंग्याना पोसणाऱ्या जमालला अटक करा..! अशा घोषणा देत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दादर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ आज जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले.

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले, बांगलादेशमधून येवून दादरमध्ये घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे. बांगलादेशी रोहिंगे दादागिरी करून जागा बळकावत आहेत. मराठी माणसाच्या जीवावर पैसे कमवायचे आणि ते बांगलादेशी घुसखोरांसाठी वापरायचे हे भाजपा कदापि खपवून घेणार नाही. स्थानिक भूमिपुत्राला त्याचा हक्क मिळाला पाहिजे त्यासाठी भाजपा त्यांच्या पाठीशी कायम आहे असेही ते म्हणाले. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने बांगलादेशी घुसखोरांवर, जे भारतीय नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी असून या विषयाचा पाठपुरावा केल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी दिला.

पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेरीवाल्यांसाठी सुरू केलेली योजना उद्धवजींच्या शिवसेनेने बंद केली. त्याला विरोध केला. महाविकास आघाडीच्या काळात केवळ ८ हजार फेरीवाल्यांना मदत मिळाली. तर शिंदे- फडणवीस सरकारच्या काळात १ लाख १२ हजार स्थानिक फेरीवाल्यांना मदत मिळाली. स्थानिक फेरीवाल्यांची मदत थांबवण्यापेक्षा जमाल शमशुद्दीनला शोधा असा टोला आमदार ॲड. आशिष शेलार यांनी लगावला. दादर, माहीम परिसर गल्ल्यांमधील अनधिकृत घुसखोरी केलेल्या फेरीवाल्यांना शोधून हा परिसर मोकळा करणार असल्याचे सांगून महापालिका आणि पोलीस प्रशासनाने गरीब प्रामाणिक फेरीवाल्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवू नये असेही ते म्हणाले. तुम्ही शमशुद्दीनला शोधा नाहीतर आम्ही त्याला आमच्या भाषेत प्रसाद देवू अश्या शब्दात आमदार ॲड. आशिष शेलार यांनी महापालिका पोलीस प्रशासनाचे कान टोचले.

यावेळी मुंबई भाजपा सचिव जितेंद्र राऊत, माहिम विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकर, मुरजी पटेल, महेश मुदलीयार आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.