Home Blog Page 1468

यंदाचा सैन्य दिन साजरा करण्यासाठी भारतीय सेनेतर्फे वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन

पुणे , 12 जानेवारी 2023

बंगळुरू येथे प्रथमच मुख्यालय दक्षिण कमांडच्या नेतृत्वाखाली सैन्य  दिन 15 जानेवारी 2023  रोजी साजरा केला जाणार आहे.  त्यानिमित्त होणाऱ्या संचलनाबरोबरच भारतीय लष्कराच्या पर्यावरणीय जबाबदाऱ्यांप्रती असलेल्या बांधिलकीच्या अनुषंगाने भारतीय लष्कर “गो ग्रीन” मोहीम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत 14 जानेवारी 2023 रोजी दक्षिण कमांड परिसरामध्ये 75 हजार रोपे लावण्यासाठी लष्कर प्रयत्नशील असेल.

ही वृक्षारोपण मोहीम लष्करी तसेच नागरी भागात राबवली जाईल. लष्कराचे कर्मचारी, वन विभाग, शाळकरी मुले, टेरिटोरियल आर्मी इकोलॉजिकल बटालियन आणि इतर सरकारी संस्था या मोहिमेत सहभागी होतील.या रोपांमध्ये सावली देणारी  झाडे, फळझाडे, औषधी वनस्पती आणि इतर वनस्पतींचा समावेश असेल.

पुणे येथे  मुख्यालय , दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्र अंतर्गत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. लष्करी आणि नागरी आस्थापनांमध्ये 3000 रोपे लावण्याचे प्रस्तावित आहे. केवळ वृक्षारोपण करून ही पृथ्वी हरित करणे हेच या मोहिमेचे ध्येय नसून पृथ्वी हरित  आणि स्वच्छ ठेवण्याच्या महत्त्वाबाबत तरुणांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची एक संधी म्हणून या मोहिमेकडे पाहिले जात आहे.

जागरूकता निर्माण करण्याचा हा उपक्रम आर्मी डे परेड 2023 आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित अनेक कार्यक्रमांपैकी एक आहे. केवळ पुणे येथेच नाही तर दक्षिण कमांडच्या कार्यक्षेत्रातील 11 राज्यांमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे.  भारतीय सैन्याच्या “सेवा परमो धर्म” या ब्रीदवाक्याला जागण्याचा तसेच सामंजस्य आणि समृद्धीचा  संदेश हा उपक्रम देत आहे.

‘मनाच्या मशागती’द्वारे महावितरणच्या विद्युत सुरक्षा जागराला पुण्यात प्रारंभ

पुणे, दि. १२ जानेवारी २०२३:यंदाच्या विद्युत सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ करताना महावितरणच्या पुणे परिमंडलामध्ये सकारात्मक व्याख्यानाची जोड देण्यात आली. बुधवारी (दि. ११) सायंकाळी सीओईपी टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक व माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांचे व्याख्यान झाले. तसेच मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे ८०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची विद्युत सुरक्षेची शपथ घेतली व विद्युत सुरक्षा सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला.

पुणे परिमंडलातील विविध संवर्गातील निवडक कर्मचाऱ्यांसाठी डॉ. दत्ता कोहिनकर यांचे ‘मनाची मशागत व सकारात्मकता’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ते म्हणाले, अंतर्मनात सकारात्मक विचार कायम ठेवले तर त्याचप्रमाणे कृती घडत जाते. नकारात्मक विचारांनी कृती देखील नकारात्मक होते. त्यामुळे आयुष्यात अडचणी व ताणतणाव वाढण्यास सुरवात होते. आरोग्यासोबतच कौटुंबिक स्वास्थ्य सुद्धा बिघडत जाते. एकाकीपणा येतो. आयुष्य उदास होते. त्यामुळे कौटुंबिक आणि नोकरीतील कर्तव्य व जबाबदाऱ्यांकडे जाणता अजाणता दुर्लक्ष होते. हे सर्व टाळून कोणतेही आव्हान स्वीकारणे व ते यशस्वी करणे यासाठी मनातील सकारात्मक विचार हेच खरे पाठबळ आहे असे डॉ. कोहिनकर यांनी सांगितले. त्यांच्या संपूर्ण व्याख्यानाला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

यावेळी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले, की वीजग्राहकांना उत्कृष्ट तसेच तत्पर व आपुलकीची सेवा देणे महावितरणचे कर्तव्य आहे. त्यासाठी प्रत्येकाच्या मनात सकारात्मक विचार रूजवणे महत्त्वाचे आहे. मनाची एकाग्रता व सजगता कायम ठेवून प्रत्येक काम सकारात्मकतेने केले पाहिजे. त्यातून कामाचा आनंद मिळतो, मानसिक समाधान मिळते. सोबतच वीज यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम करताना तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सुरक्षा साधनांचा वापर केलाच पाहिजे. सतर्क राहून सर्व खबरदारी घ्यावी. तसेच संबंधित कार्यक्षेत्रातील नागरिकांना विद्युत सुरक्षेबाबत माहिती द्यावी असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

या कार्यक्रमात विद्युत सुरक्षेची शपथ घेण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंते सर्वश्री प्रकाश राऊत व सतीश राजदीप, सहायक महाव्यवस्थापक सौ. माधुरी राऊत (वित्त व लेखा) व श्रीमती ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर तसेच परिमंडलातील अभियंता, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पटनी यांनी केले व आभार मानले. महावितरणच्या विद्युत सुरक्षेचा जागर येत्या २५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण वर्गांचे तसेच नागरिक तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर जनजागरण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. 

‘सीओईपी’कडून राजेंद्र पवार यांचा गौरव – सीओईपी टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू प्रा. मुकुल सुतावणे यांच्याहस्ते या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांचा गौरव करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपणारे श्री. पवार यांचा विद्यापीठाला अभिमान आहे. महावितरण व विद्यापीठाच्या संयुक्त सहकार्याने वीज क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांना चालना दिली जाईल असे कुलगुरू प्रा. सुतावणे यांनी सांगितले.

डाव्होसमधील जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री सहभागी होणार

महाराष्ट्राचे व्हिजन मांडणार

अनेक मान्यवरांशी चर्चा, गुंतवणूकदारांच्या भेटीगाठी

सर्वाधिक सामंजस्य करार होणार

मुंबई दि 12 :

स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिष्टमंडळासमवेत सहभागी होणार आहेत. जवळपास 20 उद्योगांसमवेत सुमारे 1 लाख 40 हजार कोटींचे करार होणार असून आजपर्यंत डाव्होस येथे इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच महाराष्ट्राचे सामंजस्य करार होत आहेत. याशिवाय पायाभूत सुविधा व इतर महत्वाच्या क्षेत्रात महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी जगभरातील मान्यवर, गुंतवणूकदार, तसेच उद्योगांच्या प्रमुखांशीही मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत. 16 आणि 17 जानेवारी असे दोन दिवस मुख्यमंत्री या परिषदेत उपस्थित राहतील. मुख्यमंत्र्यांसमवेत शिष्टमंडळात उद्योग मंत्री उदय सामंत तसेच वरिष्ठ अधिकारी असतील. ही परिषद 20 जानेवारीपर्यंत चालणार आहे.

महाराष्ट्रात नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर पायाभूत सुविधासह विविध क्षेत्रात झपाट्याने घोडदौड सुरू आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्राची नवी बलस्थाने संपूर्ण जगाला कळून राज्याकडे जगाचा ओढा कसा वाढेल यावर या जागतिक महत्वाच्या परिषदेत लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

अशी आहे डाव्होसमधील रूपरेषा

मुख्यमंत्री रविवारी 15 तारखेस मुंबईहून झुरिचसाठी रवाना होतील. सोमवारी 16 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. हे सुसज्ज आणि आकर्षक पॅव्हेलियन डाव्होस येथे प्रमुख ठिकाणी आणि भारताच्या पॅव्हेलियनसमोरच असणार आहे. त्यानंतर काही महत्वाच्या उद्योगांसमवेत सामंजस्य करार केले जातील. जागतिक आर्थिक परिषदेच्या न्यू इकॉनॉमी एंड सोसायटी या केंद्राचे तसेच अर्बन ट्रान्सफॉरमेशनचे प्रमुख देखील मुख्यमंत्र्यांना भेटतील.

सायंकाळी 7.15 वाजता मुख्यमंत्री हे मुख्य स्वागत समारंभासाठी काँग्रेस सेंटर येथे दाखल होतील.

मंगळवार 17 जानेवारी रोजी लक्झमबर्गचे पंतप्रधान, जॉर्डनचे पंतप्रधान, सिंगापूरचे माहिती व दूरसंचार मंत्री, जपान बँक, सौदी अरबचे उद्योग व खनिकर्म मंत्री, स्विस इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी आहेत. विविध क्षेत्रातील नामवंत उद्योगांसमवेत सामंजस्य करारही महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये करण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे संबोधन

मंगळवारी 3.45 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कॉँग्रेस सेंटर येथे संबोधन होणार आहे. यावेळी ते बदलत्या पर्यावरणाचे शहरांच्या विकासापुढील आव्हान आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकास यावर बोलतील.

स्नेहभोजनासाठी मान्यवर आमंत्रित

मंगळवारीच रात्री 8 वाजता महाराष्ट्राच्या वतीने स्नेहभोजन आयोजित करण्यात आले असून यासाठी उद्योग, राजकीय, तसेच इतर क्षेत्रातील 100 ते 150 मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री देखील यात असतील. यावेळी खास महाराष्ट्रीय भोजनाचा बेत असेल.

कोरोनामुळे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मागील दोन बैठक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. तर 2022 या वर्षातली बैठक जानेवारी ऐवजी मे मध्ये घेण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर आता होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्राची चांगली छाप पडावी म्हणून उद्योग विभागाने जय्यत तयारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तयारीचा वेळोवेळी आढावा घेऊन महत्वपूर्ण सूचनाही केल्या आहेत.

असे असेल पॅव्हेलियन

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या या डाव्होस बैठकीसाठी येणारे जगभरातील अनेक प्रतिनिधी या पॅव्हेलियनला भेट देतील अशी अपेक्षा आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या प्रगतीचे अत्याधुनिक पद्धतीने आणि प्रभावी असे प्रदर्शन केले जाणार आहे. त्यात विशेषत: गेल्या तीन ते चार महिन्यात मेट्रो, कोस्टल रोड, एमटीएचएल, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे मिसिंग लिंकसाठी सर्वात मोठा बोगदा तसेच ईलेक्ट्रिक वाहनांचा सार्वजनिक वाहतुकीत करण्यात येत असलेला उपयोग, पर्यावरण संरक्षणासाठी उचलण्यात आलेली पाऊले अशा अनेक बाबी दाखविण्यात येतील.

डाव्होस परिषद नेमकी काय आहे ?

जागतिक आर्थिक परिषद (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) ही एक खाजगी संस्था आहे. तीची स्थापना 1971 साली करण्यात आली होती. या संस्थेचं मुख्यालय स्वित्झर्लंडची राजधानी जिनेव्हामध्ये आहे. या संस्थेला आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून मान्यता मिळालेली आहे. या संस्थेचं ध्येय जागतिक व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणून जागतिक क्षेत्रिय आणि औद्योगिक विकासाला चालना देणं आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम निमंत्रण देण्यात आलेल्यांना यामध्ये सहभागी होता येते. या परिषदेत जवळपास 2500 व्यक्ती सहभाग घेतात. त्यात जगभरातील मोठे उद्योगपती, व्यावसायिक आणि अर्थशास्त्रज्ञ यांचा समावेश असतो.

व्यसनमुक्त भारता’ करिता व्यसनांच्या राक्षसाचे दहन 

न-हे येथील जाधवर ग्रुपच्या इन्स्टिटयूट आॅफ नर्सिंग व डॉ.सुधाकरराव जाधवर कॉलेज आॅफ पॅरामेडिकल यांच्यातर्फे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजन
पुणे : आम्ही व्यसन करणार नाही आणि इतरांनाही करु देणार नाही, अशी शपथ घेत दारु, गुटखा, चरस, सिगारेट, गांजा अशा व्यसनांच्या प्रतिकात्मक राक्षसाचे दहन करण्यात आले. व्यसनाधिनतेकडे वळणा-या तरुणाईला त्यापासून परावृत्त करण्यास प्रयत्न करु, असा निर्धार करीत नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला. व्यसनमुक्त युवा… व्यसनमुक्त भारताचा संकल्प देखील यावेळी करण्यात आला. 
जाधवर ग्रुप च्या इन्स्टिटयूट आॅफ नर्सिंग व डॉ.सुधाकरराव जाधवर कॉलेज आॅफ पॅरामेडिकल यांच्यातर्फे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त व्यसनांच्या प्रतिकात्मक राक्षसाचे दहन व शपथ कार्यक्रमाचे आयोजन न-हे येथील संस्थेच्या प्रांगणात करण्यात आले. यावेळी इन्स्टिटयूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, इन्स्टिटयूट आॅफ नर्सिंगच्या शितल निकम, अनुश्री पारधी, श्वेता कुंभार उपस्थित होते. महाविद्यालयातील नर्सिंगच्या विद्यार्थीनी या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.
अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, व्यसनांच्या विळख्यात अडकणा-या मुलांच्या संख्येइतकेच मुलींचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे व्यसनांपासून सर्वांनी परावृत्त व्हावे, याकरीता आम्ही नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. नर्सिंगच्या माध्यमातून पुढे या महाविद्यालयातील विद्यार्थीनी रुग्णसेवा करतात. परंतु व्यसनापासून दूर राहिल्यास आरोग्य खराब होणार नाही, हे तरुणाईला समजावे, याकरीता असे उपक्रम राबविले जातात. व्यसनमुक्त युवा…व्यसनमुक्त भारत हे ब्रीद अंगिकारुन व्यसनमुक्तीचा संदेश सर्वत्र देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १२: राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून लवकरच ही भरती सुरु करण्यात येईल. त्याशिवाय मानधनवाढीसह नवीन मोबाईल, विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक घेण्यात आली. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त रुबल अग्रवाल यांचेसह महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना-समितींचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेसाठी एलआयसीकडे शासनाने १०० कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. या संदर्भातील प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करुन संबंधितांना पैसे देण्यासाठी भारतीय जीवन विमा महामंडळाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजार १८६ पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून ही भरती प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

अंगणवाडी केंद्रासाठी सध्या अस्तित्वात असलेले वर्ग आणि भाड्याने घेतलेले वर्ग याचा आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विभागाला दिल्या. आढाव्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये हे वर्ग भरविण्याच्या संदर्भात त्यांना आदेश देण्यात येतील, असेही त्यांनी सांग़ितले. कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता लवकरच देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

पोषण आहाराचा दर वाढविण्यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच त्यात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करतांनाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्यांवर लवकरच निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

दिवाळीपूर्वी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने भाऊबीज दिल्याबद्दल आणि गणवेशाचे पैसे थेट खात्यावर जमा केल्याबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या बैठकीत पोषण ट्रॅकर ॲप, मानधनवाढ, रिक्त पदे आदी बाबींवर चर्चा करण्यात आली.

जी-२० बैठकीच्या पार्श्वभूमीवर मोटारसायकल फेरी व राष्ट्री युवा दिन व्याख्यानमालेचे आयोजन

पुणे , 12 जानेवारी 2023

गेल्या काही वर्षात भारतामध्ये  डिजिटल क्रांती घडून आली असून अशा वेळी जी 20 सारख्या संघटनेचे अध्यक्षपद भारताकडे येणे फार महत्वपूर्ण असल्याचे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ शैलेंद्र देवळाणकर यांनी आज पुण्यात बोलताना सांगितले.

पुण्यात होत असलेल्या जी 20 परिषद बैठकीच्या जनजागृतीसाठी आणि राजमाता जिजाऊ त्याचबरोबर स्वामी विवेकानंद जयंतीनमित्त आज भव्य मोटारसायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते . या रॅली चा समारोप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झाला . यावेळी भारताचे जी 20 अध्यक्षपद , संधी ,आव्हाने आणि युवकांची भूमिका या विषयावर श्री देवळाणकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आपल्या देशातील युवकांमुळे देशाची ही प्रगती झाली असून स्टार्ट अप, मेक इन् इंडिया, आत्मनिर्भर भारत यासारख्या योजना यशस्वी होत असल्याचे श्री देवळाणकर यावेळी म्हणाले . भारताची प्रगती दाखवण्याचे जी 20 हे प्रमुख माध्यम असून या संघटनेचे अध्यक्ष पद ही भारताला मिळालेली एक मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले .

21 व्या शतकात भारत जागतिक महासत्ता बनणार असून देशातील प्रत्येक युवक या देशाचा राजदूत बनला पाहिजे , त्यासाठी तरुणांनी आपली स्वप्ने देशाच्या विकासाशी जोडली पाहिजेत असे आवाहन देवळाणकर यांनी यावेळी केले . जागतिक पातळीवरील अनेक महत्वाच्या संघटनांना जी २० देशांची ही संघटना महत्व पूर्ण निर्देश देत असून संपूर्ण जग त्यांचे पालन करीत असल्याने या संघटनेचे अध्यक्ष पद भारताकडे येणे ही फार मोलाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे यांनी केले तर प्र कुलगुरू संजीव सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे , उपायुक्त संतोष वारुळे यांच्यासह विद्यापीठ अधिसभेचे सदस्य उपस्थित होते .

तत्पूर्वी आज सकाळी पुण्यातील ऐतिहासिक लाल महाला मध्ये राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जनजागृती रॅलीला प्रारंभ झाला . पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार , विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . कारभारी काळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते . बाईक रॅली मध्ये शहरातील तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली होती .सर्वसामान्य पुणेकरांनी देखील रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून या रॅली ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .
 

समाजात बंधुतेचा विचार रुजविण्याची गरज-शंकर आथरे

चोविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे उद्घाटन
पुणे, ता. १२ : “आज समाज विविध जाती आणि धर्मामध्ये विभागला आहे. अशावेळी बंधुतेची पताका हाती घेऊन समानतेच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्याची आस असलेले वारकरी घडविले पाहिजेत. दिवसेंदिवस दुभंगत चाललेल्या समाजामध्ये पुन्हा एकसंधपणा आणायचा असल्यास बंधुतेचा विचार खोलवर रुजविण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन चोविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक शंकर आथरे यांनी केले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय या संस्थाच्या वतीने नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक शंकर आथरे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत आहे. बंधुतेची ज्योत प्रज्वलित करून संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी संमेलनाचे उद्घाटक प्रसिद्ध साहित्यिक सायमन मार्टिन, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, स्वागताध्यक्ष दंतरोपण तज्ज्ञ डॉ. विजय ताम्हाणे, निमंत्रक डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, ज्येष्ठ विचारवंत प्रकाश जवळकर, लेखक-कवी चंद्रकांत वानखेडे, संयोजक व मराठी विभाग प्रमुख प्रा. प्रभंजन चव्हाण उपस्थित होते.
उद्घाटनावेळी मेघना पाटील (डोंबिवली), दिवाकर जोशी (परळी वै.), रघु देशपांडे (नांदेड), ज्ञानेश्वर शिंदे (कोपरगाव), रघु गरमडे (चंद्रपूर), राजू आठवले (सिल्लोड), रामदेव सित्रे (अकोला), अनुया काळे (मुरबाड) यांना ‘बंधुता शब्दक्रांती साहित्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. दुसऱ्या सत्रामध्ये ज्येष्ठ गझलकार सिराज शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली काव्य पंढरी कवी संमेलन झाले. कवी गुलाब राजा फुलमाळी यांना ‘लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार’, कवी किशोर भुजाडे यांना ‘लोक गायक प्रल्हाद शिंदे पुरस्कार’ आणि कवी अमोल घाटविसावे यांना ‘पद्मश्री नामदेव ढसाळ काव्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
शंकर आथरे म्हणाले, “लेखकाने सूक्ष्म निरीक्षणातून मांडणी करत समाज कायम जागता ठेवण्याचे काम केले पाहिजे. चिंतनशील व प्रबोधनात्मक लेखनाने समाजातील संवेदनशील मन घडवतानाच चांगल्या मार्गावर नेण्याचे काम केले पाहिजे. बंधुतेचा विचार जाती-धर्माचा भेद विसरून एकत्रित नांदायला लावण्याची प्रेरणा देतो. महाराष्ट्रात प्रबोधनाचा मोठा वारसा आहे. हा वारसा जपण्याचे काम अशा साहित्य संमेलनामधून होतो. नव्या पिढीमध्ये राष्ट्राभिमान जागृत ठेवत मूल्यशिक्षणाचा प्रचार करणे आणि बंधुता चळवळ अधिक बळकट करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा.” 
सायमन मार्टिन म्हणाले, “जग घडविण्यामध्ये साहित्यिकांचे मोठे योगदान आहे. आज माणूस जात, धर्म, वर्ण, पंथ, भाषा, प्रांत यामध्ये विभागला गेला आहे. दुसऱ्यांचे अस्तित्व आणि विचार मान्य करायचे नाहीत अशा टोकापर्यंत समाज पोहोचलेला आहे. हा विचार दूर करण्यासाठी बंधुतेचा विचार पुढे आणला पाहिजे. यासाठी अशी संमेलने उपयुक्त ठरतात व त्यातून समाजाच्या संवेदना जागृत राहतात.” 
प्रकाश रोकडे म्हणाले, “साहित्यिक आणि कलावंताची एकच भाषा असते ती म्हणजे देश. आज जाती-धर्माच्या भिंती उभ्या राहिल्यामुळे देशात भयाचे व चिंतेचे वातावरण आहे. देशात पुन्हा एकदा इंग्रजांच्या गुलामगिरीप्रमाणेच व्यवस्थेची गुलामगिरी येते की काय अशी स्थिती असून, सहिष्णुता आणि मानवता धोक्यात आली आहे. या काळामध्ये बंधुता समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविले पाहिजे.”
प्रकाश जवळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. विजय ताम्हाणे यांनी स्वागत केले. डॉ. अरुण आंधळे यांनी प्रास्ताविक केले. संगीता झिंजुर्के यांनी सूत्रसंचालन केले.

पर्यटन संचालनालयातर्फे चित्रकला व छायाचित्रण स्पर्धा

0

पुणे दि.१२: पर्यटन संचालनालय आणि भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये पर्यटन विषयक जागृती निर्माण करण्यासाठी चित्रकला स्पर्धा व खुल्या गटासाठी छायाचित्रण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

चित्रकला स्पर्धा ही इयत्ता ७ वी १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ किंवा पर्यटन वास्तू यावर चित्र काढायचे आहे. चित्र रेखाटताना त्याचा आकार -३७ सेमी x २७ सेमी एवढा असावा. चित्र जलरंग, पेस्टल्स किंवा रंगीत पेन्सिल माध्यमात रंगवलेले असावे. चित्राच्या मागील उजव्या कोपऱ्यात स्वत:चे संपूर्ण नाव, शाळेचे नाव, जन्म दिनांक, पूर्ण वय तसेच आपला मोबाइल क्रमांक आदी माहिती चौकटीत लिहावी. चित्राखाली पालकांची स्वाक्षरी असावी.

छायाचित्रण स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे अथवा पर्यटन वास्तू यांचेच छायाचित्र स्पर्धेसाठी पाठवावे. छायाचित्रे ए-४ आकाराच्या फोटो प्रिंट कागदावर द्यावेत. छायाचित्र व चित्रकला स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी काढलेली चित्रे व छायाचित्रे शुक्रवार २० जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या हॉटेल सेंट्रल पार्क येथील आयोजित पर्यटन प्रदर्शनातील बूथमध्ये जमा करावीत. उशीरा येणारी चित्रे स्पर्धेकरीता ग्राह्य धरली जाणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी.

दोन्ही स्पर्धांसाठी प्रवेश शुल्क नाही. स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व पर्यटन व्यावसायिकांकडून आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी चित्रकला स्पर्धेकरीता ऋषिकेश फुटाणे यांचेशी (९४२२३१८४४०) व छायाचित्र स्पर्धेकरीता चंदन पठारे (९७६५३०४०३४) यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर- दातार व भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रविण घोरपडे यांनी केले आहे.

पहिल्या रोजगार मेळाव्यात १४ उमेदवारांची निवड

0

पुणे दि. १२ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे येथे विशेष मोहिमेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या रोजगार मेळाव्यात ३ नामांकित कंपन्यानी मुलाखतीसाठी उपस्थित राहिलेल्या ५२ पैकी १४ उमेदवारांची प्राथमिक निवड केली.

रास्ता पेठ येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे बुधवारी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाच्या उपआयुक्त अनुपमा पवार यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.

मेळाव्यात जिल्ह्यातील ३ नामांकित उद्योगांना आमंत्रित करण्यात आले होते. या उद्योगांनी आपल्याकडील ३५८ रिक्त पदांची संख्या कळवून मागणी कळवली होती. कंपन्यांनी या ड्राईव्हमध्ये उपस्थित राहिलेल्या ५२ बेरोजगार युवक व युवतींच्या मुलाखतीतून १४ उमेदवारांची नोकरीसाठी प्राथमिक निवड केली.

हा उपक्रम दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी घेण्यात येणार असून बेरोजगार युवकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे.

स्वामी विवेकानंदांना घोषवादनातून विद्यार्थीनींनी केले अभिवादन

रा.स्व.संघाचे महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ.प्रविण दबडगाव यांची उपस्थिती ; अखिल भारतीय ग्राहक पंचायत व ग्राहक पेठेतर्फे स.प.महाविद्यालय चौकात आयोजन
पुणे : हिंदू धर्म मानवतेचे नाते निर्माण करतो, असे स्वामी विवेकानंद नेहमी सांगायचे. संघटन, शिक्षण व अध्यात्माची जोड देऊन त्यांनी समाजाला दिशा दिली. हे राष्ट्र माझे आहे, ही भावना आपल्यामध्ये असायला हवी, अशी स्वामीजींची धारणा होती. त्यामुळे त्यांच्या विचारांचे अनुकरण करीत आपले राष्ट्र मोठे करण्याचा निर्धार आपण करुया, असे मत रा.स्व.संघाचे महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ.प्रविण दबडगाव यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत व ग्राहक पेठेतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त स.प.महाविद्यालय चौकात अहिल्यादेवी प्रशाला, डी.ई.एस. प्रशालेतील विद्यार्थीनींनी घोषवादन करुन स्वामीजींना अभिवादन केले. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, संचालक रमेश गोंदकर आदी उपस्थित होते. स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळ्याला यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला. 
सूर्यकांत पाठक म्हणाले, सन १९७४ ला ग्राहक पंचायत सुरु झाली. स्वामी विवेकानंदांना आदर्श मानून पंचायतीचे कार्य सुरु झाले. त्यामुळे दरवर्षी हा कार्यक्रम ग्राहक पंचायतीच्या शाखांमध्ये देशभर साजरा केला जातो, असेही त्यांनी सांगितले. घोषवाद्यांवरील देशभक्तीपर गीतांच्या वादनाने आणि भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी सुधीर पाचपोर यांनी हे वीर विवेकानंद… हे गीत सादर केले. संचालक महेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

१३ ते १५ जानेवारी दरम्यान डोंबिवलीत राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शन,मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्या उद्धाटन

मुंबई, दि. १२ जानेवारी-दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल’चे आयोजन करण्यात आले असून १३ ते १५ जानेवारी दरम्यान बालभवन, रामनगर, डोंबिवली पूर्व येथे या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील विविध ठिकाणहून आलेल्या गुलाबांच्या विविध जातींचे तसेच विविधा रंगाचे, सुवासिक गुलाब पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. डोंबिवलीकर मासिकाचे संपादक व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेल्या या ‘डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल’मध्ये राज्यस्तरिय गुलाब प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. उद्या शुक्रवारी, १३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता मंत्री चव्हाण यांच्या हस्ते या प्रदशनाचे उद्धाटन होणार आहे.

‘डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल’ संदर्भात माहिती देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण ह्यांनी सांगितले की, यंदाही डोंबिवलीतील गुलाब प्रदर्शन हे राज्यस्तरीय स्वरुपाचे आहे. सकाळी १० ते रात्री ०९ पर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे.  इंडियन रोझ फेडरेशन ह्या अखिल भारतीय गुलाबप्रेमी संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्रातील मोठमोठ्या गुलाब शेती करणाऱ्या व्यक्ती व संस्था ‘डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल’मध्ये सहभागी होणार आहेत. त्याप्रमाणे मुंबई, पुणे, वांगणी, पनवेल, नाशिक शहापूरमधील गुलाब उत्पादकही सहभागी होणार आहेत. फेस्टिवलमध्ये अभिनव प्रकारच्या गुलाब स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेतील विजेत्यांना गुलाबांचा राजा, राणी, युवराज, युवराज्ञी आदी अनोखी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

‘डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल’साठी गौरवास्पद गोष्ट म्हणजे ठाणे जिल्ह्यातील दोन प्रमुख गुलाब उत्पादक कल्याणचे डॉ. म्हसकर व वांगणीचे मोरे बंधू पहिल्या वर्षांपासून प्रदर्शनात सहभागी होत आहेत. दोघांनीही गुलाब लागवडीत खरोखर पथदर्शक काम केलं आहे. डॉ. म्हसकर कल्याण डोंबिवलीतील प्रख्यात प्रसूतीतज्ज्ञ असून ते सच्चे गुलाबप्रेमी आहेत. तर वांगणीच्या आशीष मोरे यांनी भारतातील विविध गुलाब प्रदर्शन स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके जिंकली आहेतं.

तसेच दुर्मिळ टपाल तिकीटे, आणि प्रख्यात व्यक्तींच्या स्वाक्षऱ्यांचे संग्राहक सांगलीच्या गजानन पटवर्धन यांचे  विविध देशांचे गुलाब विषयावरील प्रदर्शन पाहायला मिळेल. त्यांनी देशविदेशातील सुमारे ५०,००० टपाल तिकिटे, त्या संबंधीचे टपाल साहित्य, तसेच सुमारे १५०० हून अधिक स्वाक्षऱ्या वैशिष्ट्य पूर्ण संग्रहात जतन केल्या आहेत असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

डोंबिवली गुलाब प्रदर्शनामध्ये सर्वसामान्य डोंबिवलीकरांना केवळ छानछान गुलाब पहायला मिळणार नाहीत तर त्यांच्या घराच्या बागेतील गुलाबही प्रदर्शनामध्ये मांडता येणार आहेत. हौशी स्पधर्कांच्या स्पर्धेत त्यांना सहभागी होता येईल. व्यावसायिक व घरगुती विभागातील स्पर्धेत लाल, गुलाबी, पिवळा, नारिंगी, निळसर, पांढरा, दुरंगी, रेघांचा, सुवासिक, मिनिएचर इ. १० प्रकारच्या गुलाबांचा समावेश असेल. गुलाब प्रदर्शनाव्यतिरिक्त याप्रसंगी आकर्षक पुष्परचना सजावटीची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये गुलाब फुलाला केंद्र स्थानी ठेवून अन्य फुले वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.

युवकांनी धैर्य व शौर्याने पुढे चालावे-गिर्यारोहक उमेश झिरपे

एमआयटीमध्ये स्वामी विवेकानंद जयंती साजरी

पुणे, दि. १२ जानेवारी:“युवकांमध्ये असीम शक्ती सामावलेली आहे. त्यांनी सतत धैर्याने, शौर्याने पुढे चालावे. एका  दिवसात वा एका वर्षात यश आपल्या पदरी पडेल अशी अपेक्षा बाळगू नका. सर्वदा प्रामाणिक रहा. स्वतःचे व्यक्तिमत्व, स्वतःचे जीवन हेच शक्तीचे रहस्य आहे.”असे विचार प्रसिद्ध गिर्यारोहक व गिरीप्रेमीचे संस्थापक संचालक उमेश झिरपे यांनी व्यक्त केले.भारताचे महान सुपुत्र स्वामी विवेकानंद यांची १६०वीं जयंती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि द स्टूडेंट कॉन्सिल ऑफ एमआयटी डब्ल्यूपीयूच्या वतीने विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड अध्यक्षस्थानी होते. तसेच गिरीप्रेमी उषःप्रभा पागे, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसन्तराव गाडगीळ, डॉ. संजय उपाध्ये, डॉ. मृदुला कुलकर्णी, एमआयटी डब्ल्यूपीयू अ‍ॅडव्हेंचर क्लबचे अध्यक्ष डॉ. समर्थ पटवर्धन, समन्वयक प्रा.रश्मी वारके आणि महेश थोरवे उपस्थित होते.
या प्रसंगी एमआयटी डब्ल्यूपीयू अ‍ॅडव्हेंचर क्लबचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
उमेश झिरपे म्हणाले,“ स्वामी विवेकांनद म्हणत असे की बलवान व निरोगी शरीरात सशक्त मन नांदते. विद्यार्थ्यांनी एखादी कल्पना स्वीकारली की मग तिलाच आपले जीवन सर्वस्व बनवा. सतत तिचाच ध्यास घ्या. तुमचे स्नायू, मज्जातंतू, शरीराचा अणुरेणु त्याच कल्पनेने भरला जाऊ दया, इतर कोणत्याही विचारांना थारा देऊ नका. यशस्वी होण्याचा हाच मार्ग आहे. तसेच गिर्यारोहण करतांना निर्सगात किती रहस्य आहेत हे कळेल.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ स्वामी विवेकानंद यांनी १८९३ मध्ये जागतिक धर्म परिषदेत भाकीत केले होते की, विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगात सुख, समाधान आणि शांती नांदेल. २१ व्या शतकात माझी भारत माता ज्ञानाचे दालन आणि विश्व गुरू म्हणून उदयास येईल. स्वामी विवेकानंदांनी भारताचा विचार जगासमोर मांडला. ते द्रष्टे व्यक्ती होते. धर्म, प्रार्थना आणि ध्यान या विषयी विचार जगासमोर ठेवले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने त्यांचा आदर्श घ्यावा.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,“ स्वामी विवेकांनद या शब्दाचे विस्तृतीकरण खूप सुंदर आहे. त्यात  स्वामी म्हणजे स्वतःला जिंकणे, विवेक म्हणजे विवेका बरोबर जगणे आणि आंनद म्हणजे स्वतःमध्ये आनंद शोधणे असा अर्थ होतो.”
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी उद्घाटन पर भाषण सांगितले की देशातील तरूणांना  स्वामींच्या विचारांनी प्रेरित करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. २१ व्या शतकात भारत जगाचा नेता म्हणून उदयास येईल. तरुणांची जबाबदारी असल्याने त्यांनी स्वामीजींनी दाखवलेल्या मार्गावर चालावे.
यानिमित्तान घेण्यात आलेल्या फोटोग्राफी प्रदर्शनी, बुद्धिबळ स्पर्धा, स्ट्रीट प्ले, मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी चैतन्य कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित एक स्ट्रीट प्ले विद्यार्थ्यांनी सादर केले. विविध समस्यांचा सामना करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. निरज खेडकर या विद्यार्थ्यांने स्वामी विवेकानंद यांची भूमिका सादर केली.
त्याच प्रमाणे स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर नंदिनी, श्रेयका व अन्य विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले.
स्टूडेंट कॉन्सिलच्या स्पोर्टस सेक्रेटरी श्रृती देशमुख यांनी आभार मानले.

मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय काळाची गरज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १२ : वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका व्हावी यासाठी मुंबई एकात्मिक वाहतूक व्यवस्थापनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय अवलंबण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी आणि एकात्मिक वाहतूक प्रणाली यंत्रणा तयार करणाऱ्या तंत्रज्ञांनी बैठक घ्यावी, त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

वर्षा निवासस्थानी यासंदर्भात आज झालेल्या बैठकीत मुंबईतील वाढती वाहतूक आणि त्यावरील उपाय, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. मल्टी मॉडेल इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क टनेलच्या माध्यमातून साकारण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच सादरीकरण करण्यात आले.

एमएमआरडीए क्षेत्र एकात्मिक वाहतूक प्रणालीद्वारे जोडून वाहतूक कोंडी कमी करण्याबाबतच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. मुंबईसाठी मल्टीडेक टनेल काळाची गरज असून, त्याचा अभ्यास करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन, मुंबई महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी तांत्रिक टीम सोबत बैठक घेऊन या एकात्मिक वाहतूक प्रणालीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी आमदार राजेंद्र पटणी, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन, मुंबई महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलारासू आदी उपस्थित होते.

एयर इंडिया ने लंडन गॅटविक साठी नवीन मार्ग सुरू केले

भारतातील एक अग्रगण्य विमान कंपनी आणि स्टार अलायन्स सदस्य असलेल्या एयर इंडियाने आज लंडन गॅटविक विमानतळावर १२ साप्ताहिक उड्डाणे आणि लंडनच्या हिथ्रो विमानतळावर ५ अतिरिक्त सेवा सुरू करण्याची घोषणा केली. एयर इंडिया लंडन गॅटविक विमानतळासाठी अमृतसर, अहमदाबाद, गोवा आणि कोची सारख्या शहरांमधून आठवड्यातून तीनदा सेवा चालवेल. यूकेच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या विमानतळावर थेट सेवा देणारी एयर इंडिया ही एकमेव नियोजित विमान कंपनी आहे. एयर इंडिया हिथ्रो विमानतळाकडे जाणाऱ्या अजून ५ अतिरिक्त साप्ताहिक उड्डाणे वाढवीत आहे आणि यामुळे आता दिल्ली हून १४ ऐवजी १७ वेळा आणि मुंबई हून १२ ऐवजी १४ वेळा उड्डाणे वाढत आहेत. हिथ्रो विमानतळाप्रमाणेच लंडन गॅटविक विमानतळ देखील प्रवाशांना यूके च्या द्रुतगती मार्गांवर थेट प्रवेश प्रदान करते, ज्यामुळे लंडन आणि दक्षिण-पूर्व इंग्लंड मध्ये कार किंवा बस ने सहज प्रवास करणे सोईस्कर होईल. शिवाय दक्षिण टर्मिनल वरुन २४ तास थेट रेल्वे सेवा उपलब्ध असल्यामुळे प्रवासी अर्ध्या तासापेक्षा कमी वेळेत मध्य लंडनला पोहोचू शकतात. आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीच्या नकाशावर आपले पंख पसरविण्याच्या एयरलाइन च्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मार्गांवर कंपनी तिचा बाजारपेठेतील सहभाग वाढवित आहे. ऑपरेशन्सची मजबूत वाढ हे  एयर इंडियाच्या परिवर्तनाचा रोड मॅप असलेल्या Vihaan.AI च्या प्रमुख स्तंभांपैकी एक आहे.

अधिक माहिती साठी कृपया www.airindia.in या वेब साइट ला भेट द्या.

Local Times
Gatwick Operations: Schedule* – Effective 26Mar2023
Flt No.DOPOriginDestinationDept TimeArr TimeAircraft
AI  0171Tues / Thu / SatAhmedabadLondon Gatwick13:1018:00B787-8
AI  0172Wed / Fri / SunLondon GatwickAhmedabad20:0008:50+1
AI  0145Wed / Fri / SunGoaLondon Gatwick12:2018:00B787-8
AI  0146Tues / Thu / SatLondon GatwickGoa20:0010:05+1
AI  0169Mon / Thu / SatAmritsarLondon Gatwick13:3018:00B787-8
AI  0170Wed / Fri / SunLondon GatwickAmritsar20:0008:50+1
AI  0149Wed / Fri / SunKochiLondon Gatwick11:5518:15B787-8
AI  0150Mon / Thu / SatLondon GatwickKochi20:0010:25+1

*Subject to regulatory approvals

Local Times
Heathrow Operations: Schedule : Effective 26Mar2023
Flight No.Days of OpsOriginDestinationDept TimeArrv TimeAircraft
AI  0161DailyDelhiLondon Heathrow02:3507:30B787-8
AI  0162DailyLondon HeathrowDelhi09:4522:55
AI  0111DailyDelhiLondon Heathrow06:3511:30B787-8
AI  0112DailyLondon HeathrowDelhi13:1502:25+1
AI  0165Tues / ThuDelhiLondon Heathrow15:0520:00B787-8
AI  0165SatDelhiLondon Heathrow14:0519:00
AI  0166Tues / Thu / SatLondon HeathrowDelhi21:4510:55+1
       
AI  0131DailyMumbaiLondon Heathrow14:0019:00B787-8
AI  0130DailyLondon HeathrowMumbai21:3010:55+1
AI  0129Daily ex-ThuMumbaiLondon Heathrow05:1510:15B787-8
AI  0128Daily ex-ThuLondon HeathrowMumbai12:3001:55+1
AI  0129ThursdayMumbaiLondon Heathrow07:0512:05B787-8
AI  0128ThursdayLondon HeathrowMumbai14:0003:25+1

राष्ट्रवादी कॉँग्रेस आयोजित स्वराज्य ते सुराज्य रॅली संपन्न

पुणे:ज्या राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांमार्फत स्वराज्याची स्थापना केली ,त्या राजमाता जिजाऊंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लाल महाल येथून प्रारंभ झालेली ही रॅली सुराज्याचे प्रणेते असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या स्मारक स्थळापर्यंत काढण्यात आली.

या रॅली मध्ये तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता यावेळी सर्वांना स्वराज्याचे रक्षण करत सुराज्यासाठी प्रतीज्ञा करण्यात आली ज्यात ..
राजमाता जिजाऊ आईसाहेब
छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यस्मृतींना स्मरुन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक-युवती-पदाधिकारी व कार्यकर्ते शपथ घेतो की, स्व यशवंतराव चव्हाण साहेब आणि आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांतून प्रेरणा घेत भारताचे नागरीक म्हणून आमच्या संवैधानिक हक्क आणि कर्तव्यासाठी सदैव कार्यरत राहू.या देशाची धर्मनिरपेक्ष, समाजवादी वीण कायम ठेवू.आम्ही आमच्या अस्मितेची जपणूक करीत असताना या देशाच्या विविधतेतून एकतेची परंपरा कायम राखली जाईल याची दक्षता घेऊ. या देशातील सौहार्द, एकोपा आणि सद्विवेक यांच्या विरोधातील कोणत्याही शक्तीपुढे आम्ही न झुकता तिचा प्राणपणाने प्रतिकार करु. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या देशातील राष्ट्रपुरुषांचे विचार तथा स्वातंत्र्यलढ्यातून तावून सुलाखून लाभलेल्या स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी आयुष्यभर काम करण्याची प्रतिज्ञा घेत आहोत.
॥जय हिंद॥
॥जय महाराष्ट्र॥
||जय राष्ट्रवादी||

तसेच यावेळी “होय आम्ही कठीबद्ध आहोत..
शिवराय – फुले – शाहू -आंबेडकर यांचा लोककल्याणकारी वसा आणि वारसा पुढे चालवण्यासाठी..” , “होय आम्ही कटिबद्ध आहोत..
युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी..” , “होय आम्हीहोय आम्ही कटिबद्ध आहोत..
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी.” , “कटिबद्ध आहोत..
सशक्त युवा पिढी निर्माण करण्यासाठी..” , “होय आम्ही कटिबद्ध आहोत..
देशाच्या उज्वल भविष्यासाठी..” अश्या सर्व घोषणांनी रॅलीचा संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

“आपल्या देशासह महाराष्ट्रातील सध्याचे वातावरण पाहता स्वराज्याचे आदर्श घेऊन पुन्हा एकदा सुराज्याची स्थापना व्हावी , अश्याच प्रकारचे आहे. नको त्या गोष्टींवरून वाद निर्माण केले जात आहेत, सर्वसामान्य रयतेच्या मनातील, लोकांच्या गरजेच्या अनेक प्रश्नांना बगल देत, चुकीचा इतिहास दाखवत, इतिहासावरून संभ्रम निर्माण केला जात आहे. यामध्ये स्वराज्य आणि सुराज्य या दोन्ही गोष्टीच्या मूळ हेतूला बगल देत राजकारणासाठी इतिहास बदलून आपल्या फायद्याचा राजकीय इतिहास लिहिला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा सर्वांना स्वराज्य व सुराज्य यांची आठवण करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती – युवा दिनाच्या पूर्वसंध्येला अश्या प्रकारच्या रॅलीचे आयोजन केले असल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
रॅलीप्रसंगी प्रशांत जगताप , प्रवक्ते प्रदीप देशमुख ,मूणालिनी वाणी , किशोर कांबळे , विक्रम जाघव ,सुषमा सातपुते , महेश शिंदे , गणेश नलावडे , उदय महाले , संतोष नांगरे , शंतनू जगदाळे , अजिंक्य पालकर , मनोज पाचपुते ,शुभम माताळे , वेणू शिंदे , शालिनी जगताप आदींसह मोठ्या संख्येने तरुणांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला.