पुणे दि. १२ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे येथे विशेष मोहिमेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या रोजगार मेळाव्यात ३ नामांकित कंपन्यानी मुलाखतीसाठी उपस्थित राहिलेल्या ५२ पैकी १४ उमेदवारांची प्राथमिक निवड केली.
रास्ता पेठ येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे बुधवारी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाच्या उपआयुक्त अनुपमा पवार यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.
मेळाव्यात जिल्ह्यातील ३ नामांकित उद्योगांना आमंत्रित करण्यात आले होते. या उद्योगांनी आपल्याकडील ३५८ रिक्त पदांची संख्या कळवून मागणी कळवली होती. कंपन्यांनी या ड्राईव्हमध्ये उपस्थित राहिलेल्या ५२ बेरोजगार युवक व युवतींच्या मुलाखतीतून १४ उमेदवारांची नोकरीसाठी प्राथमिक निवड केली.
हा उपक्रम दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी घेण्यात येणार असून बेरोजगार युवकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे.