एमआयटीमध्ये स्वामी विवेकानंद जयंती साजरी
पुणे, दि. १२ जानेवारी:“युवकांमध्ये असीम शक्ती सामावलेली आहे. त्यांनी सतत धैर्याने, शौर्याने पुढे चालावे. एका दिवसात वा एका वर्षात यश आपल्या पदरी पडेल अशी अपेक्षा बाळगू नका. सर्वदा प्रामाणिक रहा. स्वतःचे व्यक्तिमत्व, स्वतःचे जीवन हेच शक्तीचे रहस्य आहे.”असे विचार प्रसिद्ध गिर्यारोहक व गिरीप्रेमीचे संस्थापक संचालक उमेश झिरपे यांनी व्यक्त केले.भारताचे महान सुपुत्र स्वामी विवेकानंद यांची १६०वीं जयंती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि द स्टूडेंट कॉन्सिल ऑफ एमआयटी डब्ल्यूपीयूच्या वतीने विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड अध्यक्षस्थानी होते. तसेच गिरीप्रेमी उषःप्रभा पागे, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसन्तराव गाडगीळ, डॉ. संजय उपाध्ये, डॉ. मृदुला कुलकर्णी, एमआयटी डब्ल्यूपीयू अॅडव्हेंचर क्लबचे अध्यक्ष डॉ. समर्थ पटवर्धन, समन्वयक प्रा.रश्मी वारके आणि महेश थोरवे उपस्थित होते.
या प्रसंगी एमआयटी डब्ल्यूपीयू अॅडव्हेंचर क्लबचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
उमेश झिरपे म्हणाले,“ स्वामी विवेकांनद म्हणत असे की बलवान व निरोगी शरीरात सशक्त मन नांदते. विद्यार्थ्यांनी एखादी कल्पना स्वीकारली की मग तिलाच आपले जीवन सर्वस्व बनवा. सतत तिचाच ध्यास घ्या. तुमचे स्नायू, मज्जातंतू, शरीराचा अणुरेणु त्याच कल्पनेने भरला जाऊ दया, इतर कोणत्याही विचारांना थारा देऊ नका. यशस्वी होण्याचा हाच मार्ग आहे. तसेच गिर्यारोहण करतांना निर्सगात किती रहस्य आहेत हे कळेल.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ स्वामी विवेकानंद यांनी १८९३ मध्ये जागतिक धर्म परिषदेत भाकीत केले होते की, विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगात सुख, समाधान आणि शांती नांदेल. २१ व्या शतकात माझी भारत माता ज्ञानाचे दालन आणि विश्व गुरू म्हणून उदयास येईल. स्वामी विवेकानंदांनी भारताचा विचार जगासमोर मांडला. ते द्रष्टे व्यक्ती होते. धर्म, प्रार्थना आणि ध्यान या विषयी विचार जगासमोर ठेवले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने त्यांचा आदर्श घ्यावा.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,“ स्वामी विवेकांनद या शब्दाचे विस्तृतीकरण खूप सुंदर आहे. त्यात स्वामी म्हणजे स्वतःला जिंकणे, विवेक म्हणजे विवेका बरोबर जगणे आणि आंनद म्हणजे स्वतःमध्ये आनंद शोधणे असा अर्थ होतो.”
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी उद्घाटन पर भाषण सांगितले की देशातील तरूणांना स्वामींच्या विचारांनी प्रेरित करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. २१ व्या शतकात भारत जगाचा नेता म्हणून उदयास येईल. तरुणांची जबाबदारी असल्याने त्यांनी स्वामीजींनी दाखवलेल्या मार्गावर चालावे.
यानिमित्तान घेण्यात आलेल्या फोटोग्राफी प्रदर्शनी, बुद्धिबळ स्पर्धा, स्ट्रीट प्ले, मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी चैतन्य कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित एक स्ट्रीट प्ले विद्यार्थ्यांनी सादर केले. विविध समस्यांचा सामना करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. निरज खेडकर या विद्यार्थ्यांने स्वामी विवेकानंद यांची भूमिका सादर केली.
त्याच प्रमाणे स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर नंदिनी, श्रेयका व अन्य विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले.
स्टूडेंट कॉन्सिलच्या स्पोर्टस सेक्रेटरी श्रृती देशमुख यांनी आभार मानले.