Home Blog Page 1457

मुंबईत हॉप ऑन – हॉप ऑफ बस सेवेचा शुभारंभ

पर्यटन विकास महामंडळाच्या ४८ व्या वर्धापन दिनी विविध पर्यटन उपक्रमांचे उद्घाटन

मुंबई : पर्यावरणपूरक पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुंबईत पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमटीडीसीने खासगी भागीदारी तत्वावर हॉप ऑन –  हॉप ऑफ बसची सुविधा आज सुरु केली आहे. दुमजली असलेल्या या एका बसचे लोकार्पण पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते  करण्यात आले.

पर्यटन विकास महामंडळाच्या ४८ व्या वर्धापन दिनी पर्यटनमंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते विविध पर्यटन उपक्रमांचे उद्घाटन मंत्रालयात करण्यात आले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महामंडळाच्या चित्रफित, छायाचित्र आणि दिनदिर्शिकेचे प्रकाशन, अजिंठा लेणी आकाश निरीक्षण उपक्रम, एमटीडीसी आणि एचआर कॉलेजच्या सहकार्याने युवा पर्यटन संघ उपक्रमांचा शुभारंभ  करण्यात आला. युवा पर्यटन संघ हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

या उद्घाटन कार्यक्रमाला पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, एच. आर. कॉलेजचे पर्यटन विषयक शिक्षण घेणारे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले, मुंबई हे देश विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. मुंबईत या पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमटीडीसीने खासगी भागीदारी तत्वावर हो हो बसची सुविधा सुरु करण्यात आली आहे. आगामी कालावधीत ११ हॉप ऑन – हॉप ऑफ बस राज्यभरात सुरू करण्यात येणार आहेत. आज एका बसचे लोकार्पण मंत्री श्री.लोढा यांनी केले.. या बसच्या आरक्षणासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. बुक माय शो या ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपनीची मदत घेतली जाणार आहे. या हॉप ऑन – हॉप ऑफ बसचे आरक्षण दर कमी असतील, अशी माहिती  मंत्री श्री.लोढा यांनी यावेळी दिली. यादरम्यान हो हो बसने श्री.लोढा यांनी मंत्रालय ते मरीन ड्राईव्ह असा प्रवास केला.

मंत्री श्री.लोढा म्हणाले, हॉप ऑन –  हॉप ऑफ बस मुंबईमध्ये प्रायोगिक‍ तत्वावर सुरू  केली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमार्फत मुंबईतील महत्वाच्या पर्यटन स्थळी ही बस जाईल. या बसचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमार्फत पर्यटकांना ऑनलाईन बुकिंग करता येणे शक्य होणार आहे.आगामी सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यात ११ होहो बसेस पर्यटनस्थळी देण्यात येतील, अशी माहितीही पर्यटन मंत्री श्री. लोढा यांनी दिली.

युवा पर्यटन संघाची स्थापना

मंत्री श्री. लोढा म्हणाले, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि एच आर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने युवा पर्यटन संघ स्थापन करण्यात आला आहे. या उपक्रमात  पर्यटन विषयक शिक्षण घेणारे २० विद्यार्थी आज सहभागी झाले होते. पर्यटनातील विविध संधी आणि पर्यटन स्थळांची या पर्यटन विषयक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाशी संलग्न झाल्यामुळे फायदा होईल, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

मंत्री श्री.लोढा म्हणाले, आगामी कालावधीत जबाबदार पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळ उपक्रम राबवत आहे. वसुंधरेला हानी न पोहोचता पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे.

यावेळी राज्यातील सर्वोत्कृष्ट ५०० पर्यटक रिसॉर्टचे फोटो लॉन्च करण्यात आले ही छायाचित्रे उत्कृष्ट दर्जाचे आहेत. पर्यटन पॅकेजेसमध्ये या छायाचित्रांचा वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पर्यटनविषयक व्हिडीओ देखील यावेळी लॉन्च करण्यात आले. अनुभवात्मक पर्यटन अंतर्गत अजिंठा केव्ह व्हयू पॉईंट या प्रकल्पाचाही शुभारंभ यावेळी करण्यात आला.

झी स्टुडिओज, आनंद एल. राय आणि भूषण कुमार निर्मित ‘आत्मपँफ्लेट’ची ७३ वा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

झी स्टुडिओज, आनंद एल. राय आणि भूषण कुमार या तीन दिग्गजांना एकत्र आणणारा पहिला मराठी चित्रपट म्हणजे ‘आत्मपँफ्लेट’. या चित्रपटाचे लेखन राष्ट्रीय पुरस्कार विजेते परेश मोकाशी यांनी केले असून नवोदित दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या चित्रपटांच्या विस्तीर्ण यादीत झी स्टुडिओजने आणखी एका चित्रपटाची भर घातली आहे. ७३ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘जनरेशन १४ प्लस’ स्पर्धा प्रकारात या चित्रपटाची निवड झाली आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी (२००९) आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘वाळवी’ (२०२३) यांसारख्या चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन करणाऱ्या परेश मोकाशी यांनी ‘आत्मपँफ्लेट’चे लेखन केले आहे. तेराव्या शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘वाळवी’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला असून ‘वाळवी’ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. थ्रिलकॅाम हा नवीन जॅानर प्रेक्षकांच्या भेटीला आणल्यानंतर झी स्टुडिओज, परेश मोकाशी आणि आशिष बेंडे हे ‘वाळवी’चे त्रिकुट पुन्हा एकदा एक दर्जेदार आशय घेऊन सज्ज झाले आहे. ‘आत्मपँफ्लेट’ हा चित्रपट एका तरुण मुलाभोवती फिरणारा आहे, जो त्याच्या क्लासमेटच्या प्रेमात पडतो. ही एकतर्फी प्रेमाची हृदयस्पर्शी कहाणी आहे, जी त्याच्या भोवतालच्या नाट्यमय सामाजिक-राजकीय बदलांच्या पलीकडे जाणारी आहे. ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

दिग्दर्शक आशिष अविनाश बेंडे म्हणतात, ” हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आहे. चित्रपट निर्मितीची आवड जोपासण्याचा माझा प्रवास कॉलेजमध्ये असतानाच सुरू झाला आणि जगातील सर्वात मोठ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये माझी निवड झाल्याने माझ्या दिग्दर्शनाच्या पहिल्या चळवळीने शिखर गाठले आहे. सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर, ही प्रक्रिया माझ्यासाठी रोलरकोस्टर राइड ठरली आहे. कोरोना महामारी, लॉकडाऊनसह अनेक आव्हाने असतानाही, माझ्या टीममधील प्रत्येकाने मनापासून काम केले आणि त्याचा परिणाम आता सर्वांनाच पाहायला मिळत आहे. जगात अनेक ठिकाणी युद्धं होत असतानाच हा चित्रपट प्रेम पसरवण्यावर भाष्य करणारा आहे.”

या अविश्वसनीय कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करताना निर्माते आनंद एल राय म्हणाले, “प्रादेशिक जागतिक स्तरावर जाणं आणि विशेषत: प्रतिष्ठेच्या बर्लिन चित्रपट महोत्सवात स्थान मिळवणं, हे खूप चांगलं आहे. ‘आत्मपँफ्लेट’चा भाग होणं, हा एक जबरदस्त अनुभव आहे. कलर यलो प्रॉडक्शनसाठी हा खास चित्रपट आहे.”

टी-सीरिजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि निर्माते भूषण कुमार म्हणतात, “‘आत्मपँफ्लेट’ ही एक प्रेमळ कथा आहे, जी भारताचं विशेषत: महाराष्ट्राचं मर्म योग्यरित्या टिपते. प्रादेशिक आशय जागतिक चित्रपटांच्या नकाशावर आणणे आश्चर्यकारक आहे आणि प्रतिष्ठित बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आशिष बेंडे दिग्दर्शित या शुद्ध मेक इन इंडिया चित्रपटाची निवड होणे, यातून हा चित्रपट किती दर्जेदार आहे, हे सिद्ध होते.”

झी स्टुडिओजचे सीबीओ शारिक पटेल म्हणाले, बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘आत्मपँफ्लेट’ची निवड मराठी चित्रपट जागतिक स्तरावर सादर करेल. मराठी चित्रपटसृष्टीतील अग्रगण्य स्टुडिओ आणि भागधारक या नात्याने स्थानिक कथाकथनाच्या सामर्थ्यावरचा आमचा विश्वास अधिक दृढ होतो. हा खास चित्रपट जागतिक स्तरावर कधी प्रदर्शित होणार, याची प्रचंड उत्सुकता लागली आहे.”

आयएफएफआर २०२३ मध्ये ‘जोरम’ची अधिकृत निवड, बर्लिनल मार्केट सिलेक्ट्स २०२३ मध्ये ‘ब्राऊन’ची निवड आणि शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘लॉस्ट’ प्रदर्शित झाल्यानंतर आणि गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा पुरस्कार मिळाल्यानंतर झी स्टुडिओज सातत्याने जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त होणारा आशय तयार करत आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन

मुंबई-ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते नाट्यचित्रपट निर्माते अंबर कोठारे (वय ९६) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. श्री. कोठारे यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी जेनमा, पुत्र आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे.

अंबर कोठारे यांचा जन्म १४ एप्रिल १९२६ रोजी मुंबईत झाला. त्यांचे बालपण अत्यंत कष्टात गेले. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे कोठारे यांना वेगवेगळी कामे करावी लागली. दिवाळीच्या काळात गिरगावात रस्त्यावर उटणे विकण्याचेही काम त्यांनी काही काळ केले होते. कालांतराने शिक्षण पूर्ण करून त्यांनी ‘ब्रिटिश बॅंक ऑफ दि मिडल इस्ट’ या बॅंकेत त्यांनी नोकरी केली. तब्बल चार दशके त्यांनी या बॅंकेत वेगवेगळ्या पदांवर काम केले. या बॅंकेचे भारतातर्फे प्रतिनिधीत्व करण्याचीही संधी त्यांना मिळाली होती. अंबर कोठारे म्हणजे बहुरंगी व्यक्तिमत्त्व. नोकरी सांभाळत त्यांनी आपली रंगभूमीची आवडदेखील जोपासली. प्रायोगिक रंगभूमीवर त्यांनी दीर्घ काळ काम केले. ‘इंडियन नॅशनल थिएटर’ (आयएनटी) या संस्थेच्या मराठी विभागाचे ते पहिले सचिव होते. या संस्थेतर्फे त्यांनी बरीच नाटके रंगभूमीवर सादर केली. ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकाचे त्यांनी शेकडो प्रयोग सादर केले होते. काही नाटकांमध्ये त्यांनी अभिनयदेखील केला होता.‘झुंजारराव’ नाटकामधील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. अंबर कोठारे यांनी उत्तम नाटकांची निर्मितीही केली होती. त्यापैकी एक प्रमुख नाटक म्हणजे ‘जेथे जातो तेथे’. या नाटकाच्या लेखनासाठी कोठारे यांनी प्रख्यात लेखक दत्ता भट यांना नाशिकवरून मुंबईत निमंत्रित केले होते. या नाटकामध्ये दत्ता भट यांच्यासोबतच अंबर कोठारे यांनीदेखील अभिनय केला होता.

प्रसिद्ध अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या बालकलाकार तसेच कालांतराने निर्माता दिग्दर्शक म्हणून झालेल्या जडणघडणीत अंबर कोठारे यांचे मोलाचे योगदान होते. महेश कोठारे यांची निर्मिती-दिग्दर्शन क्षेत्रामधील पदार्पण असलेला ‘धुमधडाका’ हा चित्रपट सर्वतोपरी चांगला होण्यासाठी अंबर कोठारे यांनी भरपूर कष्ट घेतले होते. त्यानंतर महेश कोठारे यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. ‘दे दणादण’ या चित्रपटामध्ये अंबर कोठारे यांनी खलनायकाची व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीने साकारली होती. त्यानंतर महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या काही महत्त्वाच्या कलाकृतींमध्येहीदेखील त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार वितरण

राज्य शासन अन्नदाता शेतकऱ्याच्या पाठीशी-मुख्यमंत्री

पुणे दि.२१: शेतकरी अन्नदाता असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यास शासनाचे प्राधान्य राहील. राज्यातील हार्वेस्टरची कमतरता दूर करण्याकरिता ९०० हार्वेस्टरसाठी शासन शेतकऱ्यांना सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. चा पुरस्कार वितरण कार्यक्रम व ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाला व्ही.एस.आय.चे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, व्ही.एस.आय.चे उपाध्यक्ष माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, माजी राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वजीत कदम आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, साखर कारखान्यांना शासनाने नेहमीच सहकार्य केले आहे. भविष्यातदेखील येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम शासन करेल. साखर उद्योगावर लाखो शेतकरी अवलंबून असल्याने हा उद्योग वाढणे आणि टिकणे गरजेचे आहे. शासनाने साखर उद्योगासोबत इतरही शेतकऱ्यांचे मुलभूत प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले आहेत.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविताना शेतकऱ्यांसाठी १८ सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात येत आहेत, त्यामुळे अडीच लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन ओलिताखाली येईल. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून ७ लाख १९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अडीच हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. ७ लाख २० हजार शेतकऱ्यांना १ हजार ७०० कोटींचेही वाटप करण्यात येत आहे. अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांनाही वाढीव मदत करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार योजना प्रभाविपणे सुरू करण्यात आली आहे.

कृषि क्षेत्रातील संशोधनाला चालना देणे गरजेचे
कृषि उत्पादनावर प्रक्रीया करणाऱ्या उद्योगात वस्त्रोद्योगानंतर साखर उद्योगाचा क्रमांक लागतो. ग्रामीण भागाच्या विकासात या उद्योगाचे मोठे योगदान आहे. नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी खर्चात अधिकचे उत्पादन करण्यासाठी व्हीएसआयचे सहकार्य मिळते आहे. संशोधन, विकास, प्रशिक्षण आणि विस्तार हे संस्थेचे उद्दीष्ट आहे. ऊस उत्पादनापासून साखर निर्मितीच्या तंत्रापर्यंत विविध टप्यांवर आधुनिकीकरण कसे करता येईल याबाबतचे संशोधन व्हीएसआय करत असल्याने सहकारी क्षेत्राला फायदा होत आहे. जागतिक स्पर्धेत पुढे जाण्यासाठी नवीन अद्ययावत तंत्रज्ञान वापरावे लागेल. कृषि संशोधनाला चालना मिळाली तर राज्याच्या प्रगतीला चालना मिळेल.

साखर उद्योग क्षेत्रातील संशोधनात व्हीएसआयचे मोठे योगदान
ऊस, शेती आणि साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असलेली आणि शेतकऱ्यांनी स्थापन केलेली वसंतदाद शुगर इन्स्टिट्यूट ही अशा स्वरुपाची जगातली एकमात्र संस्था आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, व्हीएसआयने जालना येथे विविध ऊसाची बेणे निर्माण केली. त्याचा मराठवाडा आणि खानदेशच्या शेतकऱ्यांना फायदा होत आहे. विदर्भातदेखील संस्थेचे केंद्र सुरू करण्यात येत आहे.

कृषि विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरणाचा शास्त्रीय विचार, अल्कोहल निर्मितीचे आधुनिक तंत्र अशा अनेक अंगांनी संस्था संशोधन करते आहे. ऊस लागवड, जमिनीची सुपीकता ऊसाच्या बेण्यातील बदल, जैविक तंत्रज्ञान अशा महत्वाच्या विषयावर संस्था शेतकऱ्यांना माहिती देते आणि संशोधन करते. आंबोली येथे विकसीत केलेल्या व्हीएसआय ८००५ आणि १२१२१ या जातीच्या ऊसाचे क्षेत्र वाढते आहे. अवर्षण परिस्थितीत ही जात शेतकऱ्यांना हे उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इथेनॉल निर्मितीला शासनाचे प्रोत्साहन
चालू गळीत हंगामात ५०८ लाख मे.टन ऊसाचे गाळप होऊन ४७ लाख मे.टन साखरेचे गाळप झाले आहे. जगात महाराष्ट्राचा साखर उत्पादनात तिसरा क्रमांक आहे, ही अभिमानाची बाब आहे. राज्यात गतवर्षी १३७.२० लाख मे.टन साखरेचे उत्पादन झाले. १२.६ लाख मे.टन साखरेचा वापर इथेनॉलच्या निर्मितीसाठी झाला आहे. इथेनॉलला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. यामुळे साखर कारखान्यांना नवसंजीवनी मिळते आहे. १०६ कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे. चालू हंगामातही मोठ्या प्रमाणत इथेनॉल निर्मिती होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

ऊसासोबत फळबागांचेही क्षेत्र वाढवावे
ऊसाचे वाढते उत्पादन, गाळपाशिवाय रहाणारा ऊस अशी आव्हाने साखर कारखान्यांसमोर आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात ऊस हा उत्तम पर्याय असला तरी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न व्हायला हवेत. राज्यात साखरेचे अतिरिक्त उत्पादन असल्याने साखर निर्यात व साखरेचे कमी उत्पादन होणाऱ्या अन्य राज्यात साखर विक्रीचे व्यवस्थापन करण्यावर कारखान्यांनी भर द्यावा. ऊस उत्पादनासोबत खरीपातील कापूस-सोयाबीनचाही पेरा शेतकऱ्यांनी वाढवावा. फळबाग क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. ऊस पीकासाठी ठिबक सिंचनाचा वापर वाढवा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील. त्यामुळे साखर कारखान्यांना आवश्यक असणारा ऊस कमी क्षेत्रात आणि कमी पाण्यात उपलब्ध करणे शक्य होईल. यादृष्टीने व्हीएसआयचे काम महत्वपूर्ण आहे, असे श्री.शिंदे म्हणाले.

केवळ नफा-तोटा यावर लक्ष केंद्रीत न करता साखर काराखान्यांनी आपत्तीच्यावेळी सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे नमूद करून साखर कारखान्यांनी असे उपक्रम वाढविण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

दावोसमध्ये उद्योगांशी मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातल्या विविध भागात उद्याग येणार असल्याने सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

हायड्रोजन इंधन निर्मितीकडे साखर उद्योगाने लक्ष द्यावे-शरद पवार
भारत सरकारने राष्ट्रीय हायड्रोजन धोरण जाहीर केले आहे. हायड्रोजन हे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा प्रभावी इंधन असल्याचे सिद्ध झाले आहे आणि भविष्यातील पर्यायी इंधन ठरणार आहे. हायड्रोजन हे स्वच्छ इंधन आहे. हायड्रोजनवर आधारित वाहने डिझेल इंजिनापेक्षा तिप्पट परिणाम देतात. साखर उद्योगाकडे भरपूर संसाधने असून त्यांचा वापर हायड्रोजनच्या उत्पादनासाठी केला जाऊ शकतो. साखर कारखान्यात आसवनींतील बायोगॅस आणि वीज निर्मिती प्रकल्प यापासून हायड्रोजन तयार केला जाऊ शकतो.

भविष्यात साखर कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी व सध्याच्या जागतिक स्पर्धेत टिकुन राहावयाचे असेल तर साखरेव्यतिरिक्त इतर उपपदार्थावर आधारित उत्पादने तयार करण्याची नितांत गरज आहे. साखर कारखान्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी भविष्यात साखर, इथेनॉल आणि सी.बी. जी., हायड्रोजन आदी उप उत्पादनांचे उत्पादन घेतले पाहिजे.

भारत सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आखला आहे. सरकारने फ्लेक्स इंधन वाहनांच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन दिलेले आहे. त्यामुळे इथेनॉलच्या मागणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असून त्याची पूर्तता करणे ही आजची गरज आहे. इथेनॉल व्यतिरिक्त, सी.बी. जी. कॉप्रेस्ड बायोगॅस आणि हायड्रोजन सारखे अक्षय ऊर्जा खोत देशाच्या ऊर्जेच्या गरजेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतील.

शेतकऱ्यांचे उसाचे उत्पादन वाढवायचे असेल तर शुद्ध बेण्याचा वापर झाला पाहिजे याकडे साखर कारखान्यांनी लक्ष देणे आवश्यक आणि गरजेचे आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विभागवार ऊस भूषण पुरस्कार, उत्कृष्ट शेती अधिकारी, उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी, उत्कृष्ट चीफ इंजिनिअर, उत्कृष्ट चिफ केमिस्ट, उत्कृष्ट फायनान्स मॅनेजर, उत्कृष्ट आसवनी व्यवस्थापक, उत्कृष्ट कार्यकारी संचालक, संस्थेत काम करणरे उत्कृष्ट कर्मचारी, विभागवार तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार, उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कै.वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखानाह पुरस्कार डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना वांगी ता.कडेगाव जि.सांगली या कारखान्याला प्रदान करण्यात आला. कै.रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार जयवंत शुगर्स लि.धावरवाडी ता.कराड जि.सातारा, कै.किसन महादेव ऊर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार क्रांती अग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखाना कडूस ता.पलूस जि.सांगली, कै.कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार डॉ.पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, कै.डॉ.आप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार दौंड शुगर प्रा.लि.पो.आलेगाव ता.दौंड, जि.पुणे, कै.विलासरावजी देशमुख उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना ता.कागल जि.कोल्हापूर या कारखान्याला प्रदान करण्यात आला.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या कार्यक्षमता पुरस्कारांचेही यावेळी वितरण करण्यात आले. संघाकडून देण्यात येणारा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि. कागल या कारखान्यास प्रदान करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. चा पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी आगमन. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या तांत्रिक कार्यक्षमता अहवाल, आर्थिक कार्यक्षमता अहवाल, आसवणी अहवाल अशा विविध अहवालांचे प्रकाशन करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना भारत निवडणूक आयोगाचा पुरस्कार

पुणे – भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा अवलंब केल्याबद्दल देण्यात येणारे देशपातळीवरील ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवॉर्ड’ आज घोषित केले. त्यात मतदार शिक्षण आणि सहभाग यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत वैशिष्यपूर्ण कामगिरीबद्दलचा पुरस्कार पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना जाहीर करण्यात आला आहे. येत्या २५ जानेवारी रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

जिल्ह्यामध्ये मतदार शिक्षण आणि मतदार शिक्षणासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी अनेक नावीन्यपूर्ण कल्पना राबवल्या. युवकांचा मतदार नोंदणीतील सहभाग वाढविणे, महिलांची मतदार नोंदणी याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. वंचित घटकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवताना तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार, देह विक्री व्यवसायातील महिला यांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये आयोजित शिबिरांनाही युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासह संयुक्त विद्यमाने शाळा व महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता संघांच्या बळकटीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

मतदार शिक्षण आणि सहभाग ही बाब निरंतर चालणारी प्रक्रिया आहे याची प्रशासनात जाणीव जागृती करत जिल्ह्यात मतदार शिक्षणाचे कार्यक्रम वर्षभर घेण्यात आले. राष्ट्रीय मतदार दिन, संविधान दिन, शिक्षक दिन, महिला दिन तसेच आंतरराष्ट्रीय युवा दिन आदी दिवशी शाळा-महाविद्यालयांमध्ये मतदार जागृतीचे कार्यक्रम घेत मतदार नोंदणी करण्यात आली. २५ नोव्हेंबर आणि ५ डिसेंबर या दोन दिवशी ४४२ महाविद्यालयात महाशिबिरांचे आयोजन करून मतदार नोंदणी करण्यात आली. यातून ४८ हजारावर युवकांची मतदार नोंदणी करण्यात आली.

विविध उपक्रमांच्या माध्यमातून ९४ हजारापेक्षा अधिक महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली. मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेअंतर्गत गेल्या दोन वर्षात सुमारे ७ लाख दुबार, छायाचित्र नसलेले आणि समान छायाचित्र असलेल्या मतदारांची नावे वगळण्यात आली.

जिल्हाधिकारी यांनी तृतीयपंथी मतदार नोंदणीसाठी तसेच दिव्यांग मतदारांसाठी घेतलेल्या पुढाकाराचा निवडणूक आयोगाने विशेष गौरव केला आहे. औद्योगिक क्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी विशेष पुढाकार जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील सुमारे अडीच हजार मोठे व लहान उद्योगांपर्यंत पोहोचून मतदार नोंदणी करण्यात आली. उद्योगांच्या ठिकाणी समन्वयक अधिकारी नेमून तसेच उद्योगांमध्ये मतदार जागृती संघ स्थापन करून मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांना यापूर्वीदेखील जिल्ह्यात पीएम किसान योजनेतील चांगल्या कामगिरीसाठी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर सातारा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना पीएम आवास योजना आणि स्वच्छ भारत अभियानातील चांगल्या कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला होता.

एअर इंडियामध्ये सेलची सुरुवात: देशांतर्गत विमानप्रवासावर मिळवा आकर्षक सूट

पुणे-(शरद लोणकर )२१ जानेवारी २०२३: एअर इंडियाने एक आकर्षक उपक्रम सुरु केला आहे. भारताच्या ७४व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त एअर इंडियाच्या संपूर्ण देशांतर्गत नेटवर्कमध्ये आकर्षक सूट दिली जात आहे. 

आज सकाळपासून सुरु करण्यात आलेली ही ऑफर २३ जानेवारी २०२३ पर्यंत सुरु राहील. एअर इंडियाच्या सर्व बुकिंग प्लॅटफॉर्म्सवर तसेच एअर इंडियाच्या अधिकृत ट्रॅव्हल एजंट्सकडे देखील या सेलचा लाभ घेता येईल.  डिस्काउंटेड तिकिटे इकॉनॉमी क्लासमध्ये उपलब्ध असतील आणि १ फेब्रुवारी ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत भारतामध्ये संपूर्ण देशांतर्गत नेटवर्कमध्ये प्रवासासाठी लागू असतील.

फक्त १७०५ रुपयांच्या अतिशय कमी वन-वे शुल्कापासून तब्बल ४९ पेक्षा जास्त देशांतर्गत ठिकाणच्या तिकिटांवर सूट दिली जात आहे.  कुटुंबासोबत सुट्टीवर जाणे असो किंवा कामासाठी प्रवास करणे असो, एअर इंडियाच्या विशाल देशांतर्गत नेटवर्कमध्ये आकर्षक सूट योजनेचा लाभ मिळवता येईल.

देशांतर्गत नेटवर्कमधील काही वन-वे डिस्काउंटेड तिकीट शुल्क पुढीलप्रमाणे आहेत:

सेक्टरसर्वसमावेशक तिकीट शुल्क (भारतीय रुपये)
दिल्ली ते मुंबई५०७५
चेन्नई ते दिल्ली५८९५
बेंगळुरू ते मुंबई२३१९
दिल्ली ते उदयपूर३६८०
दिल्ली ते गोवा५६५६
दिल्ली ते पोर्ट ब्लेअर८६९०
दिल्ली ते श्रीनगर३७३०
अहमदाबाद ते मुंबई१८०६
गोवा ते मुंबई२८३०
दिमापूर ते गुवाहाटी१७८३

अधिक माहितीसाठी कृपया वेबसाईटवर लॉग इन करा www.airindia.in किंवा वर कॉल सेंटरशी संपर्क साधा – १८६० २३३ १४०७

मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान

पुणे, दि. २१ जानेवारी २०२३: शहरातील विविध सेवाभावी संस्थांच्या सामाजिक कार्यात सहभागी होणारे व महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांना नुकताच राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वानवडी येथील राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींचा राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. मात्र मुंबई येथील महत्त्वाच्या कार्यालयीन कामामुळे मुख्य अभियंता श्री. पवार या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही. त्यानंतर शुक्रवारी (दि. २०) फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. नंदकिशोर बुटे पाटील यांच्याहस्ते मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी श्री. अनिल रोकडे, श्री. अनिल सावंत, ज्ञान फाउंडेशनचे श्री. मनोहर कोलते, श्री. शिवाजी शिंदे, श्री. दीपक मंचाळकर, श्री. महेश देशमुख, श्री. अमर परदेशी, श्री. निखिल टेकवडे, श्री. हेमंत शिंदे आदींची उपस्थिती होती.

महाराष्ट्रात राज्य कामगार विमा महामंडळाद्वारे उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांसाठी तातडीने जमीन उपलब्ध करून द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

र्यावरण संवेदनशील क्षेत्रअभयारण्यांतर्गत गावेसीआर झेड २ अंतर्गत एसआरए प्रकल्प याविषयी महत्त्वपूर्ण चर्चा

मुंबई, दि. २०: महाराष्ट्रात पालघर, सातारा, पेण, पनवेल, जळगाव, चाकण याठिकाणी राज्य कामगार विमा महामंडळाच्या माध्यमातून रुग्णालये उभारण्यात येणार असून त्यासाठी तातडीने शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय पर्यावरण, वने व कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासमवेत बैठक  झाली. यावेळी राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, कामगार मंत्री सुरेश खाडे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे, आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना, कामगार आयुक्त सुरेश जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्र्यांसमवेत झालेल्या या बैठकीत वन, कामगार, पर्यावरण, आरोग्य, कौशल्य विकास या विभागाशी संबंधीत विविध बाबींवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. कालबद्ध पद्धतीने त्यावर मार्ग काढण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

पश्चिम घाट, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र याबाबत प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे त्याबाबत श्री. रेड्डी यांनी सादरीकरण केले. राज्य शासन विभाग आणि केंद्रीय वन विभागाच्या तज्ज्ञ समिती सोबत बैठक घेऊन प्रस्ताव करण्याच्या सूचना देण्यात आल्या. व्याघ्रप्रकल्प, अभयारण्य अंतर्गत असलेली गावे पुनर्वसित करताना देण्यात येणारी मदत वाढविण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात होणारी मनुष्यहानी, पिकांची हानी यासंदर्भात केंद्र शासनाकडून मदत देण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

केंद्रीय कामगार विभागामार्फत महाराष्ट्रात राज्य कामगार विमा महामंडळाचे रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पालघर, सातारा, पेण, पनवेल, जळगाव, चाकण येथे ११०० खाटांचे रुग्णालय तयार करण्यात येणार असून त्यासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याबाबत तसेच काही ठिकाणी उच्चदाब वीज वाहिनी दूर करण्याबाबत चर्चा झाली. या रुग्णालयांसाठी तातडीने जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुलुंड येथे वैद्यकीय महाविद्यालय, तर ठाणे येथे नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात येईल, असे केंद्रीय कामगार मंत्री श्री. यादव यांनी यावेळी सांगितले. ठाणे येथील रुग्णालयाचे बळकटीकरण करतानाच तेथे कार्डधारक आणि विना कार्डधारक रुग्णांना सेवा देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना केली त्यामुळे जिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सीआरझेड २ अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणि मोडकळीस आलेल्या आणि उपकर प्राप्त इमारतींची पुनर्बांधणी करताना विशेष सवलत देण्याबाबत यावी चर्चा करण्यात आली. कांदळवनाच्या वाढीसाठी आणि संवर्धनासाठी महाराष्ट्रात कांदवळवन कक्ष आणि फाऊंडेशन असून कांदळवनाच्या वाढीसाठी  केलेल्या प्रयत्नाबद्दल महाराष्ट्राचे कौतुक यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी केले. माथाडी मंडळ अंतर्गत माथाडी कामगारांच्या कामगार भविष्य निर्वाह निधी भरण्यासंदर्भात येणाऱ्या समस्येबाबत चर्चा यावेळी झाली. संबंधित विभागाचे अधिकारी यांनी बैठक घेऊन त्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

शासनाच्या विविध विभागात ८१६९ पदांची भरती; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध

मुंबई, दि. २०  : महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील सुमारे ८ हजार पेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी आज, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लोकसेवा आयोगाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणातील पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून फक्त एकाच अर्जाद्वारे विविध संवर्गातील या भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी होता येणार आहे, असे आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले.

राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, वित्त, गृह, महसूल व वन आदी मंत्रालयीन प्रशासकीय विभाग आणि महाराष्ट्रातील विविध कार्यालयांमध्ये ८ हजार १६९ पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी आज आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांच्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी २५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन अध्यक्ष श्री. निंबाळकर यांनी केले आहे.

या पद भरतीसाठी ३० एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.  पद भरतीचा तपशील, अर्हता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, परीक्षा योजना, अभ्यासक्रम आदी तपशील आयोगाच्या www.mpsc.gov.in तसेच www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहनही अध्यक्ष श्री. निंबाळकर यांनी केले आहे.

‘या’ विभागांमध्ये होणार ८ हजार १६९ पदांची भरती

  • सामान्य प्रशासन विभाग – सहायक कक्ष अधिकारी – ७० पदे
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग- सहायक कक्ष अधिकारी – ८ पदे
  • वित्त विभाग – राज्य कर निरीक्षक – १५९ पदे
  • गृह विभाग- पोलीस उपनिरीक्षक – ३७४ पदे
  • महसूल व वन विभाग – दुय्यम निबंधक (श्रेणी -१)/मुद्रांक निरीक्षक – ४९ पदे
  • गृह विभाग- दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – ६ पदे
  • वित्त विभाग – तांत्रिक सहायक – १ पद
  • वित्त विभाग – कर सहायक – ४६८ पदे
  • मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये – लिपिक टंकलेखक – ७०३४ पदे

१४ तासात अपहरण झालेल्याची सुटका आणि अपहरण करणारे गजाआड

पुणे- आर्थिक व्यवहारांतून वानवडी भागांतून अपहरण झालेल्या व्यक्तीस सोडवून व अपहरण केलेल्या आरोपींना १२ ते १४
तासांत पोलसांनी गजाआड केले. वानवडी पोलीस स्टेशन व युनिट ४, पुणे शहर यांनी संयुक्तीकरित्या हि कामगिरी केली .

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’ वानवडी पोलीस स्टेशनला दि.२०/०१/२०२३ रोजी रात्रौ एक इसम यांनी समक्ष येवून माहिती दिली की, त्यांचे मेव्हणे यांना आर्थिक व्यवहारातून वानवडीतील फातिमानगर चौकांतील श्री सागर हॉटेल येथे बोलावून
घेवून मारहाण करुन जबरदस्तीने अपहरण करुन घेवून गेलेले आहे. सदरबाबत त्याची पत्नी यांचे मोबाईलवरवारंवार फोन करून नमूद अपहरणकर्ते हे ०८ लाख रुपये रोख रक्कमेची मागणी करीत आहेत.
आज दि.२०/०१/२०२३ रोजी पुन्हा वरील अपहरणकर्ते यांनी अपहरण झालेले व्यक्तींची सुटका हवी असलेस तळेगाव दाभाडे येथे ०८ लाख रुपये रोख रक्कम घेवून येणेबाबत अपहरणकर्ते यांचे घरचे लोकांना फोनवरुन धमकी दिलेने वानवडी पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व स्टाफ, तसेच पुणे शहर गुन्हे शाखे कडील युनिट-४ चे अधिकारी व स्टाफ यांनी संयुक्तिकरित्या अपहरणकर्ते यांना त्यांचे मागणी प्रमाणे ०८ लाख रोख रक्कम (बनावट चलनी नोटा सापळ्यांप्रमाणे) देतांना सापळा रचून अपहरणकर्ते आरोपी :- १) दत्तात्रय श्रीराम वारिंगे, वय ३९ वर्ष, धंदा- नोकरी रा. प्लॅट नं. ओ / २, वाघेला पार्क, नीडस मॉल, तळेगाव दाभाडे, पुणे २) महेश ब्रम्हदेव जाधव, वय ३२ वर्ष, धंदा- नोकरी रा.१८/१ वाघेला पार्क कॉलनी, भारत पेट्रोलपंपाजवळ, तळेगाव दाभाडे स्टेशन, पुणे ३) सुभाष गोपाळ सोनजारी, वय ४० वर्ष, धंदा- मजुरी रा नाचकेंड वस्ती, इगल समोर झोपडपटीतळेगाव दाभाडे,पुणे ४) रवि हनुमंत अंकुशी वय ३४ वर्ष रा सोनझरी वस्ती, तळेगाव स्टेशन, तळेगाव दाभाडे, पुणे यांना जेरबंद करणेत आलेले आहे. तसेच अपहरण झालेले व्यक्ती नामे प्रविण शशिकांत पाटील ऊर्फ मोहमंद परवेझ शेख, वय ३९ वर्षे, धंदा- मजुरी रा. प्लॅट नं. ३०१, चंद्रोदय निवास, साठे वस्ती, लेन नं. २, लोहगांव बस स्टॉप जवळ, पुणे यांस अपहरण झाले पासून अवघे १२ ते १४ तासांत सुखरुप सुटका करून ताब्यांत घेतलेले
आहे. सदरबाबत अधिक चौकशी व तपास करुन निष्पन्न होणारे बाबीं नुसार तक्रार नोंद पुढील कार्यवाही वानवडी
पोलीस स्टेशन कडील तपासी अधिकारी करीत आहेत सदर गुन्हयाचा अधिक तपास हे पोलीस उपनिरिक्षक
अजय भोसले हे स्वतः करीत आहेत.सदरची कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर रंजन कुमार
शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) पुणे रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर
विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त
वानवडी विभाग, पुणे शहर श्रीमती पौर्णिमा तावरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अतिरीक्त कार्यभार संदिप शिवले
वानवडी पो. स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक, जयवंत
जाधव, पोलीस उप निरिक्षक अजय भोसले, पोलीस उप-निरिक्षक अजय शितोळे, पोलीस अमंलदार संतोष नाईक,
अतुल गायकवाड, सचिन बोराटे, निळकंठ राठोड, अनिकेत वाबळे, अमोल जाधव व पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-४
कडील सपोनिरी. विकास जाधव, पोलीस अंमलदार हरिश मोरे, विठठ्ल वाव्हळ, अजय गायकवाड, नागेशसिंग
कुंवर, रमेश राठोड यांनी केली.तसेच सदर कारवाई बाबत पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा यांनी सुध्दा मदत केली आहे.

मोदींचा ‘मुंबई सरकारी दौरा खर्च’ निवडणुक आयोगाने, भाजपकडुन वसुल करावा.. काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी

मोदीं कडून, देशाच्या ‘पंतप्रधान – पदाशी’ प्रतारणा..!
मुंबई दि २०-“निवडणुक आयोगाकडे पंतप्रधानांना विचारण्याची क्षमता आहे काय..? या सर्वोच्च न्यायालयाने’ नुकत्याच व्यक्त केलेल्या अपेक्षे प्रमाणे, पंतप्रधान मोदींच्या सरकारी खर्चातील, मुंबई – दौऱ्यास आक्षेप घेणे गरजेचे असून, मुंबई-दौरा खर्च, भाजप कडुन वसुल करण्याचे आदेश निवडणुक आयोगाने भाजप’स द्यावेत.. अशी मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली..!देशाचे प्रधानसेवक मोदी, हे “पंतप्रधान पदाच्या (कोणालाही फेवर न करता, विकासाच्या धोरणात सर्वांशी समान बुध्दीने काम करण्याच्या) शपथेचा” सतत भंग करीत असल्याचा आरोप देखील काँग्रेसने केला..!
मोदी स्वतःस देशाचे प्रधानसेवक व चौकीदार म्हणवतात, मात्र ‘पंतप्रधान पदशपथेचा’ ते सतत भंग करीत, विकासात मात्र भाजप समर्थक भुमिका घेतात, जाहीर बोलतात हे त्यांचे वागणे असंवैधानिक आहे. केवळ निवडणुक काळातच नव्हे तर सतत सदा – सर्वकाळ पंतप्रधान ऐवजी ‘भाजप चे प्रधान प्रचारक’ म्हणूनच ते देशभर सरकारी खर्चाने वावरतात. सरकारी खर्चाने होणाऱ्या ‘विकास प्रकल्पांच्या ऊदधाटन प्रसंगी’ देखील केवळ स्वपक्षाच्या प्रचाराचे ढोल बडवत.. “राज्यात व स्थानिक मनपा”त देखील स्वपक्ष भाजप’ची सत्ता आली.. तरच विकास होईल हे प्रत्यक्ष सांगणे, एक प्रकारे जनतेस घमकावणे आहे..! पंतप्रधान पदावरील व्यक्तीने असे सतत ‘पक्षीय भुमिकेत राहणे, विकासा बाबत पक्षानुसार भेदभाव करणे या बाबी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पंतप्रधान पदाशी प्रतारणा करण्या जोग्या आहेत..असे वागणे देशाच्या प्रमुख घटनात्मक पदावरील व्यक्तिस अशोभनीय असल्याची टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.. पुर्वीच्या सरकारांनी देशांतील घटनात्मक संघराज्य पध्दतीस अनुसरून प्लॅनिंग कमिशन केले ते घटनेस धरूनच होते. पंच वार्षिक “योजना आयोग”द्वारे विकासांचा अनुशेष भरून निघत होता. केंद्रात वा राज्यात कोणत्याही पक्षाचे / विचारांचे सरकार असले तरी ही.. विकास निधी मिळत होता..!वास्तविक, २०१४ अखेर, देशात काँग्रेस प्रणीत युपीए सरकार काळांत, तत्कालीन गुजरात मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना गुजरात मॅाडेल तयार होतांना.. केंद्रात काय त्यांचे डबल इंजिन भाजप सरकार होते काय..? केंद्रातील काँग्रेस प्रणीत युपीए सरकारच्या, योजना आयोगाच्या ‘गुजरात विषयी विना अनुकुल भुमिकेमुळे वा विना सहकार्या शिवायच कां.. व्हायब्रंट गुजरात झाला.. हे मोदी साहेब सोईस्कर विसरले काय..? असा सवाल ही काँग्रेस प्रवक्त्यांनी विचारला..!
त्या वेळी देखील पुर्वीचे पंतप्रधान विकास प्रकल्पांच्या उदघाटनांस विविध राज्यात जात असत.. त्यावेळी केंद्राने काय मदत केली ते अभिमानाने सांगत असत.. परंतू राज्यात आमच्याच पक्षाचे डबल इंजिन सरकार आल्यासच विकास होईल.. असे तेथील राज्यातील जनतेस एक प्रकारे धमकावत नसत.. असे देखील ही काँग्रेस राज प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सांगितले..!

कुस्ती खेळाडूंचे लैंगिक शोषण प्रकरण:चौकशी समिती स्थापन करा; नीलम गोऱ्हे यांची केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे मागणी

पुणे-

जगभरात देशाचे नाव चमकवणार्‍या सुमारे 30 भारतीय महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांचे वारंवार लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.यात बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 30 कुस्तीपटूंनी जंतरमंतर मैदानावर 3 दिवसापासून निदर्शने देखील सुरू केली आहेत. या पार्श्वभूमीवर अशा घटना भविष्यात पुन्हा पुन्हा घडू नयेत या उद्देशाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना एक पत्र पाठवले आहे.

सदर पत्रानुसार, क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करून चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी केली आहे.

या घटनेच्या अनुषंगाने त्यांनी पुढील मागण्या केंद्रीय क्रीडा मंत्री यांच्याकडे केल्या आहेत.केंद्रीय क्रीडा व राज्याच्या क्रीडा विभागात लैंगिक शोषणाच्या घटना थांबविण्यासाठी विशाखा समिती स्थापन करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. महिला खेळाडूसाठी प्रत्येक ठिकाणी महिला प्रशिक्षकच नेमावेत, याबाबत दक्षता घेण्याबाबत निर्देशित करावे. प्रत्येक राज्याच्या स्तरावर एक समिती स्थापन करून क्रीडा प्रकारानुसार उपसमित्या स्थापन करून असे प्रकार राज्यात होणार नाहीत याबाबत खबरदारी घ्यावी.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही या सर्व सूचना लागू व्हाव्यात आणि असे प्रकार करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी मुंबईत ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ मुशायऱ्याचे आयोजन

मुंबई, दि. २० : राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ या अकराव्या अखिल भारतीय मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुशायऱ्यात देशभरातून १७ नामवंत शायर सहभागी होणार आहेत. कार्यक्रमास सर्वांना प्रवेश असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात नामवंत शायर सहभागी होणार असून वसीम बरेलवी, कलीम समर, मदन मोहन दानिश, शारीख कैफी, रणजीत चौहान, हमीद इक्बाल सिद्धीकी, शाहीद लतिफ, कैसर खालिद, कमर सिद्धीकी, डॉ. जाकीर खान जाकीर, समीर सावंत. डॉ. प्रज्ञा विकास, महशर फैजाबादी, नजर बिजनौरी, उबैद आझम आझमी हे शायर या कार्यक्रमात मुशायऱ्याचे सादरीकरण करणार आहेत. अतहर शकील हे सूत्रसंचालन करणार आहेत.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवर तसेच साहित्य क्षेत्रातील विविध नामवंत या कार्यक्रमास निमंत्रित आहेत. सन २०१३ पासून प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. दिल्ली येथे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या मुशायरा कार्यक्रमाच्या धरतीवर महाराष्ट्र शासनाद्वारे 2013 पासून गेटवे ऑफ इंडिया येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय मुशायऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या मुशायरा कार्यक्रमांमध्ये देशभरातील नामवंत शायर उर्दू साहित्य, शेरोशायरीचे सादरीकरण करतात.

पुढची सुनावणी 30 जानेवारीला..

नवी दिल्ली-मूळ शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कोणला द्यायचा? याबाबतचा सस्पेन्स कायम असून आज दोन्ही गटाची बाजू ऐकल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने काही म्हणणे असेल तर लेखी उत्तर द्या असे निर्देश दोन्ही गटाला दिले. सोमवारी (२३ जानेवारी रोजी) याबाबत लेखी उत्तर दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. दोन्ही गटांनी लेखी उत्तर दाखल केल्यानंतर ३० जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाल संपणार आहे. त्यामुळे मूळ शिवसेना नेमकी कुणाची हा पेच आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कामत – जेठमलानी यांच्यात खडाजंगी

युक्तिवाद सुरू असताना कामत यांना महेश जेठमलानी यांनी प्रतिनिधी सभा केवळ तुमचीच कशी असू शकते? प्रश्न विचारला. यादरम्यान ठाकरे गटाचे वकील कामत आणि महेश जेठमलानी यांच्यात निवडणूक आयोगासमोरच वाद झाला. कामत यांच्या प्रतिनिधी सभेच्या युक्तिवादावरुन महेश जेठमलानी यांनी आक्षेप घेतला. यानंतर निवडणूक आयुक्तांनी मध्यस्ती केली व देवदत्त कामत यांचा युक्तिवाद पूर्ण ऐकून घेऊ असे आयोगाने म्हटले.

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानींचा युक्तिवाद

उद्धव ठाकरेंनी मविआ कशी बनवली?
युतीचं आश्वासन देऊन मतं मिळवली अन् नंतर मतदारांना सोडून दिलं
आमच्या संख्येबाबत कोणताही वाद नाही
मुख्य नेतापद हे कायदेशीर आहे
पक्षघटनेचं आम्ही पालन केलं आहे. 
शिंदेंच्या बंडानं शिवसेनेत फूटच

शिवसेना पक्षाच्या घटनेचे आम्ही पालन केले.

शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत फूट. मुख्यनेतापद कायदेशीर.

लोकसभा, विधानसभा सदस्यसंख्या बघता चिन्ह आम्हालाच द्या.

प्रतिनिधी सभा नव्हे लोकप्रतिनिधी महत्वाचे.

दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्रं आयोगासमोर सादर

शिवसेनेच्या ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत 160 राष्ट्रीय कार्यकारणी प्रतिनिधी, 2,82,975 संघटनात्मक प्रतिनिधी, 19,21,815 प्राथमिक सदस्य अशा एकूण 22 लाख 24 हजार 950 पक्षसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे सादर केली आहे. तर शिंदे गटाने 12 खासदार, 40 आमदार, 711 संघटनात्मक प्रतिनिधी, 2046 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी आणि 4,48,318 प्राथमिक सदस्य अशा 4,51,127 पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आयोगाकडे सादर केली आहेत.

.. तरच कसबा भाजपाला बिनविरोध मिळण्याची शक्यता

पुणे-भाजपा ने जर स्वरदा बापट किंवा मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी दिली तरच कसब्यातील विधानसभेची निवडणूक बिनविरोध होईल असे म्हणणे काही राजकीय समीक्षकांनी मांडले आहे .पुण्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठ मतदारसंघाची पोटनिवडणूकित भाजपाला उमेदवारी देताना कसरत करावी लागेल असे दिसते आहे, हेमंत रासने यांना स्थायी समिती अध्यक्षपद सलग दिल्याने त्यांना उमेदवारी मिळेल याबाबत शक्यता नसल्याचे सांगितले जाते आहे.गणेश बिडकर यांना नियोजन मंडळात सामावून घेण्यात आले आहे ,धीरज घाटे कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांची शक्यता कमी वर्तविली जात असताना आता कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. आणि खासदार गिरीश बापट यांच्या घरातील त्यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांना ही उमेदवारी दिली पाहिजे असाही प्रवाह आहे. त्यांच्या उमेदवारीसाठी खासदारकीचे उमेदवार अशी गणना होणारे नेते प्रयत्नशील असल्याचे बोलले जाते आहे.

दरम्यान मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक यांनी घरातील एकाला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. त्यांचा निर्णय अंतिम असेल, असंही ते म्हणाले. कॉंग्रेसकडून शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र भाजपने मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांना तिकीट न दिल्यास कॉंग्रेस रोहित टिळक यांना उमेदवारी देऊ शकते.  माजी उपमहापौर दीपक मानकर यांची भूमिका निर्णयांक ठरणार आहे . राष्ट्रवादीच्या वतीने रुपाली पाटील यांनी आपण इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे.तर , शिवसेनेकडून विशाल धनवडे निवडणूक लढवू शकतात असे दिसते आहे.

तरच होईल हि निवडणूक बिनविरोध

मुक्ता टिळकांच्या निधनामुळे त्यांच्याच घरातील कोणाला उमेदवारी देऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न भाजपा राष्ट्रवादीने केल्यास तो यशस्वी होऊ द्यायचा नाही असा प्रयत्न होण्याची जास्त शक्यता आहे. बापटांच्या सुनबाई स्वरदा यांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादी ,शिवसेना आणि कदाचित कॉंग्रेस देखील हि निवडणूक बिनविरोध करण्यास फारसा विरोध करणार नाही असे सांगितले जाते आहे.हेच मत मेधा कुलकर्णी यांच्याबत देखील मांडले जाते आहे. मात्र अन्य कोणीही उमेदवार भाजपाने दिल्यास हि निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगिले जाते आहे.स्वरदा बापट यांना उमेदवारी मिळाल्यास राष्ट्रवादी सर्वात प्रथम हि निवडणूक बिनविरोध करण्यास पुढाकार घेऊ शकते असेही म्हटले जाते आहे. खासदार गिरीश बापट यांच्या सह योगेश गोगावले,सुहास कुलकर्णी,उज्वल केसकर,विकास मठकरी अशा अनेक नेत्यांची ,कार्यकर्त्यांची जुनी फळी भाजपात कायम आहे ,कसब्यातून बापटांचा पाठींबा मिळवूनच टिळक विजयी झाल्या होत्या. अलीकडच्या राजकारणात भाजपा जुनी फळी नामशेष करत असल्याची अधून मधून कुजबुज होते .भाजपाची जुनी फळी डावलणे आता यापुढील राजकारणात परवडणारे नाही असाही मतप्रवाह आहे.