Home Blog Page 1448

डिजिटल इंडिया सप्ताह २५ जुलैपासून नागरिकांना मिळणार केंद्रीय योजनांची माहिती

पुणे दि. १४: भारत सरकारतर्फे २५ ते ३१ जुलै दरम्यान ‘डिजिटल इंडिया’ सप्ताह साजरा
करण्यात येणार असून र्व नागरिकांना ई-गव्हर्नन्स सेवांबद्दल माहिती देण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाचा अधिक
वापर व्हावा यासाठी हा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी नोंदणी केल्यास
नागरिकांना विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेता येईल.

भारताचे तंत्रज्ञान क्षेत्रातील काम जगासमोर आणणे, टेक स्टार्टअप साठी सहयोग व व्यवसायाच्या
नवीन संधी शोधणे, नवीन पिढीला प्रेरणा देणे, नागरिकांना ई-गव्हर्नन्स सेवांची माहिती देणे
आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे यासाठी या सप्ताहाचे आयोजन होत आहे. याअंतर्गत राष्ट्रीय स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यात सहभागी होण्यासाठी http://www.nic.in/diw2023-reg ह्या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

माहिती तंत्रज्ञान विषयाच्या विद्यार्थ्यांनाही या क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान विषयांवरील
व्याख्याने व चर्चा यामध्ये सहभागी होण्याची विनामूल्य संधी याद्वारे उपलब्ध होईल. अधिकाधिक नागरिकांनी नोंदणी करून ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रमोद
बोरोले यांनी केले आहे.

४ हजार २७७ खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसवर कारवाई; १ कोटी ८३ लक्ष रुपयांची दंड वसुली

मुंबई, दि. 14 : राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांतील ‘वायुवेग’ पथकांमार्फत 14 हजार 161 खाजगी बसेसची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 4 हजार 277 खाजगी बसेस नियम मोडत असल्याचे निदर्शनास आल्याने या बसेसना तपासणी प्रतिवेदने जारी करुन प्रकरणे नोंदवित कारवाई करण्यात आली आहे. विविध कार्यालयांमार्फत 1 कोटी 83 लक्ष तडजोड शुल्काचा दंड वसूल करण्यात आला आहे.

तपासणी दरम्यान रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर इत्यादी गुन्ह्यांसाठी सर्वात जास्त 1702 बसेस वर कारवाई करण्यात आली. विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणाऱ्या 890 बसेसवर; योग्यता प्रमाणपत्र वैध नसलेली 570 खाजगी बसेसवर, तर 514 बसेसमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे आढळून आले असून त्यावर कारवाई करण्यात आली.

शासनाने विहित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसची व इतर गुन्ह्यांबाबत तपासणी करण्यासाठी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी  16 मे  ते 30 जून 2023 दरम्यान विशेष मोहीम राबविली. सदर तपासणी माहिमेमध्ये बसेसची तपासणी करताना विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणे, टप्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरित्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र वैध नसणे, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर इत्यादींमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, मोटार वाहन कर भरल्याची खात्री करणे, जादा भाडे आकरणे, अग्निशमन यंत्रणा कार्यरत असणे, आपत्कालीन परिस्थितीत निर्गमन दर आणि इतर दरवाजे कार्यरत स्थितीत आहेत काय आदी बाबींची राज्यभर व्यापक तपासणी करण्यात आली. त्यानंतर उक्त नमूद विविध गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्या बसेसवर कारवाई करण्यात आली.

विविध गुन्ह्यांसाठी कारवाई

मोटार वाहन कर न भरणाऱ्या 485 बसेस, आपत्कालीन दरवाजा कार्यरत स्थितीत नसणाऱ्या 293 बसेस,  अवैधरित्या व्यवसायिक पद्धतीने माल वाहतूक करणाऱ्या 227 बसेस,  आसन क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतुक करणाऱ्या 147 बसेस, वेग नियंत्रक बसविणे व ते कार्यरत असणे आवश्यक असतांना वेग नियंत्रक नसणारी 72 बसेस, जादा भाडे आकारणी  करणाऱ्या 40 बसेस व इतर गुन्ह्यांमध्येसुद्धा विशेष तपासणी मोहिमेच्या कालावधीत खाजगी बसेसवर परिवहन विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा या दृष्टीकोनातून सदर व्यापक मोहीम राबविण्यात आली.

राज्यात शिक्षक भरतीचा जीआर आजच; दोन टप्पात 50 हजार शिक्षक भरती होणार, दीपक केसरकरांची मोठी घोषणा

मुंबई-राज्यात शिक्षण भरतीचा आजच जीआर काढणार असून पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. तर राज्यात एकूण 50 हजार शिक्षकांची भरती होणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे. औरंगाबाद हायकोर्टाने स्थगिती दिल्याने शिक्षक भरतीचे काम रखडले होते, असे मंत्री दीपक केसकरांनी सांगितले आहे.दरम्यान दीपक केसरकर पुढे बोलताना म्हणाले की, आगामी नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच ही शिक्षकांची भरती करण्याचा आमचा मानस आहे. यात पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल. त्यासाठी जीआर काढण्याची प्रक्रियाही आजच केली जाईल. शंभर टक्के शिक्षक भरती करण्यासाठी संच मान्यता झाली पाहिजे. कारण आरक्षणानुसार ही पद भरती होईल. अशा उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची भरती करण्यात येईल.

दीपक केसरकर म्हणाले की, रिटायर होणाऱ्या शिक्षकांकडून काम करून घेतले जाणार आहे. जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळा शिक्षक भरती होणार असल्याचे ते म्हणाले. शिक्षणाचा दर्जा खालावल्याचे ट्विट शरद पवार यांनी केले होते. याची गांभीर्याने दखल घेतली जाईल, असेही यावेळी केसरकर म्हणाले. 70 वर्षाच्या इतिहासात आम्ही एवढे मोठे निर्णय घेतले. त्यामुळे शिक्षण दर्जा वाढवला असल्याचेही ते म्हणाले. शरद पवार यांच्या सोबत बैठक घेऊन त्यांना माहिती दिली जाईल.

दीपक केसरकर म्हणाले की, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन आम्ही शिक्षकांच्या बदलीसंदर्भात सविस्तर चर्चा करु. तसेच, शिक्षक एकाच ठिकाणी स्थिर होण्यासाठी माध्यमिक शिक्षकांप्रमाणेच प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यादेखील रद्द करता येतील का, याबाबत महाजन यांच्यासोबत चर्चा करण्याच आश्वासन त्यांनी दिले. प्रत्येक शिक्षकाला आपल्या गावातच पोस्टिंग मिळेल असे नाही, मात्र जवळच्या गावात पोस्टिंग देता येईल का, यासाठी प्रयत्न करु, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिवशंकरांच्या पुष्पप्रतिकृतीमध्ये मंडईतील म्हसोबाराया विराजमान 

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव ; धार्मिक कार्यक्रमांनी प्रारंभ
पुणे : मंडईतील म्हसोबा मंदिरात विविधरंगी फुलांनी साकारलेल्या २५ फूट उंचीच्या शिवशंकरांच्या आकर्षक पुष्पसजावटीमध्ये म्हसोबाराया विराजमान झाले आहेत. प्रारंभी श्रीं चा रुद्राभिषेक व होमहवन, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रमांनी उत्सवाला थाटात प्रारंभ झाला. मंडई म्हसोबा मंदिराच्या परिसरात पुष्पसजावटीसोबतच विविधरंगी विद्युतरोषणाई देखील करण्यात आली असून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी पुरंदरमधील श्री क्षेत्र वीर श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानचे विश्वस्त सचिव अभिजीत धुमाळ व प्रतिभा धुमाळ  यांच्या श्रीं चा रुद्राभिषेक व होमहवन पार पडले. तर, दुपारी भिंताडे उद्योग समूहाच्या शालन भिंताडे, पृथ्वीराज भिंताडे यांच्या हस्ते श्रीं ची महाआरती झाला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सरपाले फ्लॉवर्सचे सुभाष सरपाले यांनी पुष्पसजावट केली. दीपक जोशी गुरुजी यांसह ६ ब्रह्मवृंदांनी पौरोहित्य केले. 
मंदिर परिसरात साकारण्यात आलेल्या २५ फूट उंचीच्या भगवान शिवशंकरांच्या पुष्पप्रतिकृतीसोबतच अग्रभागी २ नंदी आणि २ त्रिशुळाच्या पुष्पप्रतिकृती देखील साकारण्यात आल्या आहेत. याकरिता सुमारे ६० बंडल पर्पल आॅर्किड, ८० किलो शेवंती, ६० किलो झेंडू, १०० बंडल गुलाब यांसह अनेक फुले वापरण्यात आली आहेत. सुभाष सरपाले यांच्या मार्गदर्शनाखाली १५ कारागिरांनी ३ दिवस व १ रात्र या कालावधीत ही आरास साकारली आहे. 
धार्मिक उत्सवासोबतच विधायक उपक्रम हे उत्सवाचे वैशिष्टय असणार आहे. त्यामध्ये तृतीयपंथीयांना आर्थिक मदत, गरजू विद्यार्थ्यांना फुलस्केप वह्या प्रदान करण्याचा उपक्रम, विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत देण्याचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. तसेच, दीप अमावस्येनिमित्त दीप पूजन व दीपोत्सव करुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने होणार आहे. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे या ट्रस्टच्या फेसबुक पेजवरुन हा उत्सव भाविकांना पाहता येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.  

वीज बिलातील सवलतींचा लाभ घ्या,महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचे ग्राहकांना आवाहन

 मुंबई, दिनांक १४ जुलै २०२३: महावितरणच्या ग्राहकांनी तत्पर बिल भरणा, ऑनलाईन पेमेंट व गो ग्रीनच्या सुविधेमुळे वीजबिलात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.

 उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार अधिकाधिक ग्राहकांना वीज बिलातील सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे.

वीज ग्राहकांनी मुदतीपूर्वी वीजबिलाचा भरणा केला तर त्यांना प्रॉम्प्ट पेमेंटसाठी अर्थात तत्पर बिल भरणा केल्याबद्दल एक टक्का सवलत मिळते. हे बिल भीम ॲप, गुगल पे, पेटीएम किंवा बँकेच्या ॲपवरून किंवा महावितरणच्या वेबसाईटवरून असे ऑनलाईन पद्धतीने भरले तर पाव टक्का सवलत मिळते. याखेरीज ग्राहकांनी छापील कागदी बिलाच्या ऐवजी ईमेलने बिल स्वीकारण्याचा गो ग्रीनचा पर्यावरण पूरक पर्याय निवडला तर प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळते.

शंभर युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकाने तत्पर भरणा, ऑनलाईन पेमेंट आणि गो ग्रीन या तिन्हीचा वापर केला तर दरमहा किमान वीस रुपयांची म्हणजे वर्षाला २४० रुपयांची सूट मिळते. दोनशे युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकाने या तीनही उपायांचा अवलंब केला तर दरमहा ३५ रुपये म्हणजे वर्षाला ४२० रुपयांची सवलत मिळते. महिना तीनशे युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकाला तत्पर भरणा, ऑनलाईन पेमेंट आणि गो ग्रीन या तिन्हीचा वापर करून दरमहा ५१ रुपयांची म्हणजेच वर्षाला ६१२ रुपयांची सवलत मिळू शकते.

विजेची बिले ऑनलाईन भरणे आणि ती दिलेल्या मुदतीच्या आधी भरणे हे वीज ग्राहकांना सहज शक्य आहे. त्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाचतात आणि बिलातही सवलत मिळते. त्यासोबत महावितरणच्या वेबसाईटवरून अथवा ॲपवरून एकदा गो ग्रीनसाठी नोंदणी केली तर प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळत राहते. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांनी या सवलतींचा लाभ घ्यावा.

अजित पवार कागदपत्रात फेरफार करू शकतात, लवासा प्रकरणाची याचिका लवकर निकाली काढण्याची मागणी

पुणे-शरद पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबियांच्या अडचणीत वाढ करणाऱ्या लवासा प्रकरणी लवकर सुनावणी घेण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याने ते पुण्यातील लवासा प्रकरणात फेरफार करू शकत असल्याचे यात म्हटले आहे. लवासा प्रकरणाची सुनावणी तातडीनं घेण्याची विनंती कोर्टानं मान्य केली आहे. लवासा प्रकरणी पुढची सुनावणी 21 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याने ते लवासा प्रकरणातील कागदपत्रात फेरफार करू शकतात त्यामुळे लवकरात लवकर या प्रकरणाची सुनावणी घेण्याची विनंती याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांनी केली होती.

अजित पवार उपमुख्यमंत्री झल्याने राज्यातील राजकारण बदलले आहे. त्याच प्रमाणे लवासा प्रकरणानेही नवे वळण घेतले आहे. अजित पवार हे लवासा प्रकरणातील कागदपत्रात फेरफार करू शकतात, फायलींना आगही लागू शकते, तपास प्रक्रियेवर प्रभाव टाकू शकतात, त्यामुळे तत्काळ सुनावणी घ्या. अशी विनंती याचिकाकर्तांनी न्यायालयाला केली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य करून 21 जुलैला पुढील सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या समोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती. मात्र, गेल्या वर्षभरात यात सुनावणीच झाली नाही. आता तत्काळ सुनावणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मुळे मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अजित पवार यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. अजित पवार पोलिसांवर दबाव वाढवण्याची शक्यता या याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे.

याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांनी सांगितले की, कॅग आणि लोकायुक्तांनी लवासाप्रकरणी दिलेल्या अहवालाकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले असून लोकायुक्तांनी दाखल केलेल्या अहवालानुसार या प्रकल्पामुळे सरकारी तिजोरीला पाच ते दहा हजार कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा केला होता. या प्रकरणी 2018 मध्ये पुणे पोलिस आयुक्तांकडे केलेली तक्रार आयुक्तांनी पौड पोलिस ठाण्याकडे पाठवली. मात्र पौड पोलिसांनी पुन्हा ही तक्रार पोलिस आयुक्तांकडे पाठवली.

साल 2019 मध्ये पोलिस आयुक्तांनी ही तक्रार पुणे ग्रामीण पोलिस उपायुक्तांकडे वर्ग केली होती. मात्र या तक्रारीवर पौड पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाल्यामुळे मे 2022 मध्ये पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षकांकडे याबाबत तक्रार केली. मात्र, त्यावरही काहीही कारवाई न झाल्याने शेवटी आपण ही जनहित याचिका दाखल केल्याचे याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांनी याचिकेत नमूद केलेलं आहे.

क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांचे भव्य आणि प्रेरणादायी स्मारक बनविण्यात येणार- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि. १४: क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथे समाजाला प्रेरणादायी आणि भव्य असे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीच्या सूचना विचारात घेऊन तातडीने आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीस आमदार सुनील कांबळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, समाजकल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे, उपाध्यक्ष शिवाजी राजगुरू आणि समितीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी या स्मारकाच्या अनुषंगाने कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. हे स्मारक लवकरात लवकर उभे रहावे अशी शासनाची भूमिका आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, त्यासाठी स्मारकात समाविष्ट करावयाचे संग्रहालय, त्यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन, शारीरिक शिक्षणाच्या प्रशिक्षणाची व्यवस्था आदी तपशीलाबाबत समितीने चर्चा करुन निर्णय घ्यावा. स्मारकाचा आराखडा समितीच्या सूचनेनुसार तयार करण्यात यावा. स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे श्री. पाटील यावेळी म्हणाले.

यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी या स्मारक, संग्रहालयासाठी सुमारे साडेपाच एकर जागा संपादित केली असून ती पूर्णता महापालिकेच्या ताब्यात असल्याचे सांगितले. जमीन संपादनासाठी सुमारे १०१ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित वास्तूविशारदांनी स्मारकाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे सादरीकरण केले. त्यावर मंत्रीमहोदय तसेच समिती सदस्यांनी काही सूचना दिल्या.

राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन योजनेच्या लाभार्थींना आवाहन

मुंबई दि. १४ : राज्यातील राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या काही जुन्या लाभार्थींची परिपूर्ण माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी लाभार्थींनी आपले आधार कार्ड, भ्रमणध्वनी क्रमांक, हयातीचा दाखला व मानधन जमा होत असलेल्या बँक खात्याच्या पासबुकच्या छायांकित प्रती तालुक्याच्या ठिकाणी गटविकास अधिकारी, पंचायत समिती या ठिकाणी जाऊन जमा कराव्यात, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

मुंबई शहर व मुंबई उपनगरमधील लाभार्थींनी आपली माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालय जुने सचिवालय, पहिला मजला, विस्तार भवन, मुंबई -32 या ठिकाणी द्यावी किंवा dcamandhan@gmail.com या ईमेलवर पाठवावी, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

वित्त व नियोजन विभागाची जबाबदारी,अजित पवार यांच्याकडून कामकाजाला सुरुवात

वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन घेतला कामकाजाचा आढावा

मुंबई, दि.14:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याच्या वित्त व नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे तत्पूर्वी सकाळी त्यांनी दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेऊन वित्त व नियोजन विभागाच्या सद्यस्थितीची माहिती तसेच कामकाजाचा आढावा घेतला. अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनातून कामकाजाला सुरुवात केली. सकाळी लवकर मंत्रालयात आलेल्या अजित पवार यांनी वित्त व नियोजन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ते अभ्यागत नागरिकांना भेटले.

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे कार्यालय मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरील 503 क्रमांकाचे दालनात असून या दालनातूनच ते आपल्या विभागांचे तसेच उपमुख्यमंत्रीपदाचे कामकाज पाहणार आहेत.

अजित पवारांकडे अर्थ, धनंजय मुंडेंकडे कृषी, तर मुश्रीफांना ‘वैद्यकीय शिक्षणा’चे मानाचे पान

भाजप,एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या महायुतीच्या सरकारचे बहुचर्चित खातेवाटप अखेर शुक्रवारी जाहीर झाले. त्यानुसार अजित पवार यांनी अपेक्षेप्रमाणे अर्थखाते पटकावले. तर धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपण्यात आली. ईडीच्या कारवाईमुळे चर्चेत राहिलेले हसन मुश्रीफ यांच्या गळ्यात वैद्यकीय शिक्षण खात्याची माळ पडली आहे.

विशेष म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेनेचे मातब्बर मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडचे कृषी खाती धनंजय मुंडे यांना देण्यात आले. आता सत्तारांकडे अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन खाते सोपण्यात आले आहे. तर संजय राठोड यांच्याकडील अन्न व औषध प्रशासन विभाग हे खाते राष्ट्रवादीच्या धर्मरावबाबा आत्राम यांना मिळाले. त्यामुळे राठोड यांच्याकडे मृद व जलसंधारण हे कमी महत्त्वाचे खाते आले आहे.

छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्रालय, तर दिलीप वळसे पाटील यांना सहकार खाते देण्यात आले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल, पशू संवर्धन खाते देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाच्या जबाबदारी देण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते कायम ठेवण्यात आले आहे.

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

पहा महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ

1) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – 
सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग.
2) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार.
3) उपमुख्यमंत्री अजित पवार – अर्थ व नियोजन

भाजपचे मंत्री

  1. राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
  2. सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
  3. चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
  4. गिरीश महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
  5. रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
  6. विजयकुमार गावित- आदिवासी विकास
  7. अतुल सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
  8. मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
  9. सुरेशभाऊ खाडे- कामगार

शिंदे गट शिवसेनेचे मंत्री

  1. गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
  2. दादाजी भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
  3. संजय राठोड- मृद व जलसंधारण
  4. संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
  5. उदय सामंत- उद्योग
  6. प्रा. तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
  7. अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
  8. दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
  9. शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क

अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’चे मंत्री

  1. अजित पवार – उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री
  2. धनंजय मुंडे – कृषी
  3. छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
  4. दिलीप वळसे-पाटील – सहकार
  5. हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
  6. अदिती तटकरे – महिला व बालविकास
  7. अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन
  8. संजय बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
  9. धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन

आनंद सगळ्यांकडे मात्र तो भोगण्याची कुवत नाही- ह.भ.प.चिन्मय महाराज सातारकर

पुणे : जीवनाच्या परिपूर्णत्वाचे दर्शन ज्यांच्या चरित्रातून घडले, ते जगद्गुरु तुकाराम महाराज. पूर्ण असणे आणि परिपूर्ण असणे वेगळे आहे. परिपूर्णतेमध्ये संपूर्ण आनंद भोगण्याची प्रक्रिया सुरु होते. हल्ली जीवन असे आहे की आनंद सगळ्यांकडे आहे, परंतु आनंद भोगण्याची कुवत कोणाकडे उरलेली नाही, असे ह.भ.प. चिन्मय महाराज सातारकर यांनी सांगितले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित महोत्सवात प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले. तब्बल ३५ वर्षांहून अधिक काळ ट्रस्टतर्फे हा कार्यक्रम सुरु आहे. प्रवचनमालेत धाराशिव येथील संत गोरोबाकाका मंदिराचे ह.भ.प.पद्मनाभ महाराज व्यास, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे, सुतारवाडीचे ह.भ.प. राजेंद्र महाराज दहिभाते, श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील भाषाप्रभू ह.भ.प.डॉ.पंकज महाराज गावडे, पुण्याचे ह.भ.प. अभय महाराज टिळक, मुंबईचे ह.भ.प.चिन्मय महाराज सातारकर, ह.भ.प.भगवतीताई सातारकर यांचे प्रवचन झाले.

चिन्मय महाराज सातारकर म्हणाले, पूर्णत्वामध्ये कुठेतरी अभिमान आहे. दुस-याला दाखविणे आहे. मात्र, परिपूर्णतेमध्ये जगाला दाखविण्याची गरज नाही. ज्या स्थितीत आहे, त्याच स्थितीत परिपूर्ण. ताठ राहण्याकरिता, जगाला दाखविण्याकरिता आणि वाकण्यामध्ये जीवनाची सांगता होते.

ते पुढे म्हणाले, कर्माने, कृतीने, पैशाने, सत्तेने कितीही मोठा असो, जो वाकायला शिकला नाही. तो सगळे असून काहीतरी कमी असतो. परिपूर्णता ती, ज्यामध्ये मागायची गरज नाही. जीवनात पैसा कितीही कमविला, तरी सवय तशीच की आता अजून कुठून कमवू शकतो. तुकाराम महाराजांकडे काहीच नाही, परंतु अंत:करणाची परिपूर्णता आहे. तुकाराम महाराज परिपूर्ण म्हणूनच जन्माला आले, म्हणूनच ते कळस आहेत.

ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, गणेश कला क्रीडा मंच येथे दिनांक १९ जुलै पर्यंत दररोज सायंकाळी ५.३० ते ८ यावेळेत चातुर्मासामिनित्त कीर्तन महोत्सव असून त्यामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार कीर्तन सादर करणार आहेत. कीर्तन महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि. १४: ‘करिअर कट्टा’ च्या माध्यमातून राज्यातील महाविद्यालयात अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून युवकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

सर परशुराम महाविद्यालयात आयोजित ‘करिअर कट्टा’ अंतर्गत करिअर संसद कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, शिक्षण प्रसारक नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, सेंटर ऑफ एक्सलन्स समिती करिअर कट्टाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, स.प. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुनील गायकवाड, चॉइस ग्रुपचे फिरोदिया गाडिया आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, ‘करिअर कट्टा’च्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना राज्य पातळीवरील स्पर्धा परीक्षा, महाराष्ट्र व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा, उद्योजकता व्यक्तिमत्व विकास, व्यवस्थापकीय कौशल्य व प्रत्यक्ष उद्योजकांचे मार्गदर्शन, वित्त व्यवस्थापन पोलीस भरती, बँकींग सेवा, कमिशन अशा विविध अभ्यासक्रमाचे ३६५ रुपयांमध्ये मार्गदर्शन करण्यात येत असून त्यातून विद्यार्थ्यांना यश मिळत आहे, ही समाधानाची बाब आहे. विद्यार्थ्यांना फक्त मार्गदर्शन करुन चालणार नाही त्यांना सर्वदृष्टीने
पाठबळ मिळणे आवश्यक आहे. महाविद्यालयांनी औद्योगिक कंपन्याशी समन्वय करुन विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणचे ज्ञान मिळण्याच्यादृष्टिने प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांन यावेळी दिले.

केंद्र शासनाने सन २०२० साली नवीन शैक्षणिक धोरणाची घोषणा केली असून आज त्याला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. नवीन शैक्षणिक धोरणात पारंपरिक कला, वाणिज्य या सारख्या शिक्षण पद्धतीत बदल करून कौशल्य विकास, मातृभाषेतून शिक्षण, नैतिक बहुमुखी शिक्षण आणि आपल्या परंपरेचा अभिमान असणाऱ्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात येणार आहे. मातृभाषेतील शिक्षणामूळे विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान चांगल्याप्रकारे होऊन संशोधनाची वृत्ती वाढेल. अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम मराठीतून करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

श्री. देवळाणकर म्हणाले, स्पर्धा परीक्षेत मराठी टक्का वाढविण्याच्या दष्टिने ‘करिअर कट्टा’ चा उपक्रम अत्यंत महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आणि त्यांची संवेदनक्षमता वाढवणारा हा उपक्रम असून केंद्रीय लोकसेवेमध्ये मराठी प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. फक्त पुणे, मुंबई पुरताच हा उपक्रम न राहता राज्यातील ग्रामीण भागात हा उपक्रम राबविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांना कौशल्य युक्त बनविण्यासाठी करिअर कट्टाने सहभाग घेतला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील २० हजार गृहनिर्माण संस्थांमध्ये विशेष मतदार नोंदणी अभियान’-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांना सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्राद्वारे आवाहन

पुणे दि. १४- जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या मतदारांची १०० टक्के मतदार नोंदणी करण्यासाठी येत्या २२ व २३ जुलै २०२३ रोजी जिल्ह्यातील २० हजार ९३६ गृहनिर्माण संस्थांमध्ये ‘गृहनिर्माण सोसायटी मतदार नोंदणी अभियान’ राबविण्यात येणार असून गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांनी या अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

अभियानाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आणि दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व मतदार नोंदणी अधिकारी , सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

डॉ.देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करावे. अभियानाची माहिती सोसायटीतील सदस्यांपर्यंत पोहोचवावी. तेथील अपेक्षित मतदार संख्या, झालेली मतदार नोंदणी याबाबत माहिती घेऊन अभियानाचे सूक्ष्म नियोजन करावे. अभियानाशी संबंधीत घटकांना सहभागी करून घेतल्यास मतदार नोंदणीस चांगला प्रतिसाद लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

छावणी क्षेत्रातील लष्कराच्या अधिकाऱ्यांशी अभियानाबाबत चर्चा करावी. हिंजवडीसारख्या भागातील मोठ्या गृहनिर्माण संस्थांवर विशेष लक्ष केंद्रीत करावे. औद्योगिक क्षेत्रातील आस्थापनांच्या प्रमुखांचे अभियानासाठी सहकार्य घेण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

पुणे जिल्ह्यात साधारणपणे २० हजार ९३६ इतक्या नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आहेत. संस्थांमधील प्रत्येक पात्र व्यक्तीची नोंद मतदार यादीमध्ये व्हावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक कार्यालया तर्फे हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व इतर कर्मचारी २२ व २३ जुलै रोजी गृहनिर्माण संस्थांना भेट देऊन मतदार नोंदणी करणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी स्वत: गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींना पत्र लिहून यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रीयेची माहिती दिली आहे आणि त्यांना सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

गृहनिर्माण संस्थांच्या चेअरमनची या अभियानात महत्वाची भूमिका आहे. त्यांनी सर्व सभासदांना अवगत करावे, ज्यांची मतदार नोंदणी झालेली नाही त्यांची पुराव्यांच्या कागदपत्रासह यादी करून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे सादर करावी. मयत व स्थलांतरीत मतदारांची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावी आणि आपली सोसायटी १०० मतदार नोंदणी असलेली सोसायटी करावी. मतदार यादी शुद्धीकरण मोहीमेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहनी डॉ.देशमुख यांनी पत्राद्वारे केले आहे.

जिल्ह्याची अंतिम मतदार ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार २१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्ये विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून नवमतदारांची नोंदणी वाढविण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांना वर्षातुन चार वेळा म्हणजेच १ जानेवारी १ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर मतदार नोंदणी करता येणार आहे.

मतदार नोंदणीसाठी अर्जासोबत रहिवास पुरावा म्हणून विद्युत देयक, पाणी पट्टी, आधार कार्ड, बँकेचे किंवा पोस्टाचे पास बुक, भारतीय पारपत्र, नोदणीकृत विक्रीखत, नोंदणीकृत भाडेकरार इत्यादी तर वयाचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, आधारकार्ड, राज्यशिक्षण मंडळाने निर्गमित – केलेले १० वी किंवा १२ वी चे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. पात्र नागरिकांनी अभियानात सहभागी होवून मतदार नोंदणी करावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

प्रागतिक पक्ष भाजपसोबत जाणार नाहीत: शेकाप सरचिटणीस भाई जयंत पाटील 

पुणे :प्रागतिक विचारसरणीच्या राज्यातील १३ घटक पक्षांच्या पुण्यात झालेल्या दोन दिवसीय सत्ता परिवर्तन शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. शेतकरी कामगार पक्ष,स्वाभिमानी पक्ष व शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,भारतीय कम्युनिस्ट पार्टी, जनता दल सेक्युलर महाराष्ट्र, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, बहुजन विकास आघाडी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, भाकपा लिब्रेशन पार्टी, रिपाई सेक्युलर पार्टी, श्रमिक मुक्ती दल यांच्या वतीने दोन दिवसीय सत्ता परिवर्तन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील अल्पबचत भवन येथे हे शिबीर उत्साहात पार पडले.शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील,समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी,डॉ राम पुनयानी,डॉ. भालचंद्र कांगो,कॉ.अशोक ढवळे,आमदार हितेंद्र ठाकूर,श्रीपतराव शिंदे,भारत पाटणकर,डॉ.सुरेश माने,संजीव चांदोरकर,एड.असीम सरोदे,मेराज सिद्दिकी,विजय कुलकर्णी ,दत्ता देसाई,स्मिता पानसरे यांच्यासह मान्यवर नेत्यांनी,विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले. शिबिराचे  स्वागतअध्यक्ष जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी स्वागत केले.              यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील म्हणाले की, ‘सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी गेल्या एक वर्षापासून राज्यातील छोटे पक्ष तसेच संघटना एकत्र आले आहे. जरी आमचे विचार वेगळे असले, मतभेद असले तरी आम्ही भाजपला रोखण्यासाठी एकत्र आलो आहे. आमची ताकद कमी आहे. पण आम्ही विचारांचे पक्के आहोत. आम्ही महाविकास आघाडी सोबतच आहोत. आमच्या विचारांचे जे पक्ष आहेत त्यांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत.  शरद पवार हतबल झाले आहेत असे   मला वाटत नाही,   शरद पवार हे शरद पवार आहेत, असे यावेळी भाई जयंत पाटील यांनी आलेल्या कार्यकर्ते यांना संबोधित करताना सांगितले.  
स्वागतअध्यक्ष जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे व शिबिरार्थी यांचे आभार मानले.’भविष्यात प्रागतिक पक्ष एकत्र येउन महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडवणार असून संपूर्ण महाराष्ट्रात या प्रागतिक पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यानुसार मोर्चा,आंदोलन,शिबीर,तसेच विविध प्रकारचे राजकीय मेळावे घेऊन विरोधी पक्षाला आपली ताकद दाखवू,’ असे नाथाभाऊ शेवाळे  म्हणाले.                                                                                                तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी  म्हणाले, ‘जेलमध्ये चक्की पिसायला लावू म्हणणारे आज सत्तेत आहेत. आज देशात महात्मा गांधी यांच्या आरोपीची मूर्ती बनविली जात आहे. तसेच हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील सरकार हे ईडीचे सरकार आहे. आज सत्तेच्या लालसेपोटी आणि भीतीपोटी विचार बदलत आहेत. येत्या 2024 ला राज्यात ईडी सरकार दिसणार नाही.  शरद पवार हे देशातील एक मोठे नेते आहेत. एखादा मोर्चा जर भाजप विरोधी होणार असेल, तर आम्ही त्याला नक्की पाठिंबा देणार आहोत’                                                                                                  या कार्यक्रमात  विविध विषयांवर आलेल्या मान्यवर व प्रमुख पाहुणे व्यक्ते यांनी शिबिरर्थी यांना मार्गदर्शन केले.या यामध्ये ‘भारतीय संविधान व भाजपा आरएसएस यांचे षडयंत्र’ याविषयी एड. असीम सरोदे तसेच बी आर एस पी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष एड.डॉ. सुरेश माने यांनी मार्गदर्शन केले. तर ‘धर्मनिष्ठ राष्ट्रवाद आणि नफरत की राजनीति’ याविषयी डॉ. राम पुणयानी  व समाजवादी पार्टीचे प्रवक्ता मेराज सिद्दिकी यांनी मार्गदर्शन केले. तर ‘कृषी क्षेत्रावर आरिष्टे आणि उपाय’ याविषयी कॉ.अशोक ढवळे, मासवादी कम्युनिस्ट पार्टी यांनी मार्गदर्शन केले.  तर ‘आर्थिक औद्योगिक धोरणाची समीक्षा आणि उपाय’ याविषयी संजीव चांदोरकर व लाल निशाण  पक्षाचे विजय कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. ‘ दलित आदिवासी ओबीसी अल्पसंख्यांक समुदायावरील आव्हाने -उपाय’ याविषयी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. किशोर ढमाले यांनी मार्गदर्शन केले. तसेच ‘प्रकल्प विस्थापित व गायरान जमीन व जमीन धारकांच्या पुनरसंरचनेचा प्रश्न’ याविषयी कॉ. भारत पाटणकर श्रम मुक्ती दल व ऍड. डॉ.सुरेश माने बी आर एस पी संस्थापक अध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले.  ‘वर्ग जाती स्त्रियांकरिता राजकीय सांस्कृतिक चळवळ’ याविषयी दत्ता देसाई व कॉम्रेड स्मिता पानसरे भारतीय  कम्युनिस्ट पक्ष यांनी मार्गदर्शन केले.  ‘शिक्षण रोजगार आणि आरोग्य क्षेत्रातील आव्हाने’ याविषयी कॉ. डॉ. भालचंद्र कांगो भाकपा यांनी मार्गदर्शन केले. 
 ‘प्रागतिक पक्षाची आगामी वाटचाल आणि दिशा’ याविषयी आमदार शेकापचे पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील, कॉ. अशोक ढवळे भाकप, आमदार हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडी, डॉ. भालचंद्र कांगो भाकपा,डॉ. सुरेश माने बी आर एस पी,  माजी आमदार श्रीपतराव शिंदे जनता दल सेक्युलर,  श्रमिक मुक्ती दलाचे काँ.भारत पाटणकर यांनी आलेल्या कार्यकर्त्यांना व शिबिरार्थी यांना मार्गदर्शन केले.  

सह्याद्रि हॉस्पिटल्सने भारतातील पहिली सक्शन कॅथेटर प्रोसिजर केली

0

कोरोनरी थ्रॉम्बस रिमूव्हलमध्ये घडवून आणली क्रांती

पुणे, १४ जुलै, २०२३:  महाराष्ट्रातील हॉस्पिटल्सची सर्वात मोठी शृंखला असणाऱ्या सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये सक्शन कॅथेटर वापरून ब्लॉक्ड कोरोनरी आर्टरीमधून क्लॉट काढून टाकण्याची प्रोसिजर यशस्वीपणे केली आहे. ही अशाप्रकारची भारतातील पहिली डॉक्युमेंटेड केस आहे. धमन्यांमध्ये निर्माण झालेला अडथळा काढून टाकण्यासाठी सक्शन कॅथेटरचा वापर पहिल्यांदाच करण्यात आल्यामुळे ही प्रक्रिया म्हणजे हृदयाच्या आजारांवरील उपचारांमध्ये लक्षणीय प्रगतीदर्शक ठरली आहे. नुकतीच पुण्यातील एका ६२ वर्षांच्या रुग्णावर ही प्रक्रिया करण्यात आली. प्रक्रिया करण्यात आल्याच्या तिसऱ्या दिवशी रुग्णाला घरी पाठवण्यात आले आणि आता त्यांची प्रकृती पूर्णपणे सुधारली आहे.

या रुग्णाला सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये भरती केले तेव्हा त्यांच्या छातीमध्ये गंभीर वेदना होत होत्या आणि प्रचंड प्रमाणात घाम येत होता. तपासण्या केल्यावर याची खात्री पटली की त्यांना हार्ट अटॅक आलेला होता, रक्तामधील एका गुठळीमुळे त्यांच्या धमनीमध्ये (आर्टरी) अडथळा निर्माण झालेला होता. डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कार्डिओलॉजी संचालक, डॉ. अभिजित पळशीकर आणि तेथील तज्ञ वैद्यकीय टीमने मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी ही प्रक्रिया करण्यासाठी सक्शन कॅथेटरचा वापर केला.

प्रक्रियेदरम्यान धमनीमध्ये जिथे अडथळा निर्माण झालेला होता त्या भागात कॅथेटर अतिशय काळजीपूर्वक पोहोचवला गेला व एका स्पेशल व्हॅक्युम पंपच्या साहाय्याने सक्शन लावून गुठळी बाहेर काढण्यात आली. यामुळे हृदय स्नायूमधील रक्तप्रवाहामध्ये लक्षणीय सुधारणा झाली. मायोकार्डियल ब्लश ग्रेड (एमबीजी) मध्ये हे दर्शवण्यात आले. ही नाविन्यपूर्ण सिस्टिम आणि सक्शन इंजिन या दोन्हींचा वापर करून हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधून गुठळी प्रभावीपणे बाहेर काढली गेली, रक्तप्रवाहामध्ये सुधारणा झाली आणि रुग्णाच्या प्रकृतीमध्ये अजून जास्त गुंतागुंत होण्याचा धोका कमी झाला. कॅथेटर आत सरकवण्यापासून गुठळी काढून टाकण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रिया फक्त १० मिनिटात पूर्ण झाली. भविष्यात अजून जास्त गुठळ्या निर्माण होऊ नयेत आणि उपचारांमधून जास्तीत जास्त अनुकूल परिणाम मिळावेत यासाठी रुग्णाला औषधे देखील देण्यात आली.

या प्रक्रियेनंतर रुग्णाला छातीमधील वेदनांपासून आराम मिळाला आणि तपासण्यांमधून दिसून आले की, हृदयाला होणारा रक्तपुरवठा पुन्हा सुरळीतपणे सुरु झाला आहे. रुग्णाच्या हृदयाच्या कार्यात सुधारणा झाली, त्यामुळे त्यांची प्रकृती वेगाने सुधारली व तब्येतीमध्ये अजून काही गुंतागुंत होण्याचा धोका कमी झाला. २४ तास रुग्णाला इंटेन्सिव केयर युनिटमध्ये ठेवण्यात आले आणि त्यादरम्यान काहीही समस्या उद्भवली नाही. यानंतर आता पुढे कोणतीही इन्व्हेसिव्ह (ज्यामध्ये शरीरावर चिरा देऊन शस्त्रक्रिया करावी लागेल अशी) प्रक्रिया करण्याचे ठरवण्यात आलेले नाही पण रुग्णाची फॉलो-अप काळजी घेतली जाईल व त्यांची औषधे सुरु राहतील.

या अनोख्या प्रक्रियेबद्दल डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कार्डिओलॉजी संचालक, डॉ. अभिजित पळशीकर यांनी सांगितले, या केसमध्ये सक्शन सक्शन कॅथेटरचा वापर करण्यात आला, हृदयाच्या आजारांवरील उपचारांमध्ये मिळवण्यात आलेले हे एक लक्षणीय यश आहे. मेकॅनिकल ऍस्पिरेशन वापरून धमनीमधील अडथळे काढून टाकण्याची क्षमता हा एक सुरक्षित व प्रभावी उपाय आहे, खासकरून जेव्हा अडथळे जास्त असतात अशा केसेसमध्ये हे खूप उपयोगी आहे.”

त्यांनी पुढे सांगितले, “कोरोनरी एम्बोलिजमवरील उपचारांसाठी सक्शन कॅथेटरचा वापर पहिल्यांदाच करण्यात आला. याआधी पल्मनरी एम्बोलिजम, पेरिफेरल एम्बोलिजम आणि सेरेब्रल एम्बोलिजमवरील उपचारांसाठी या साधनाचा यशस्वीपणे वापर करण्यात आला होता. पण सक्शन कॅथेटर हे कोरोनरी आर्टरीजसाठी डिझाईन करण्यात आले आहे कारण त्या नाजूक, मऊ व लवचिक असतात. सक्शन कॅथेटरमध्ये प्रगत सक्शन क्षमता आहे. याला एफडीएने मान्यता दिली आहे आणि त्यामुळे रुग्णांना त्यांच्या संपूर्ण जीवनकाळात मेटॅलिक स्टेंट्सचा वापर टाळता येतो.”

बऱ्याच वर्षांपासून, हळूहळू जमा होत गेलेले कोलेस्टेरॉल आणि धमन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने, वयस्क रुग्णांना हार्ट अटॅक येतात, त्याबरोबरीनेच छातीमध्ये वेदना होणे, श्वास घ्यायला त्रास होणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. युवा रुग्णांच्या बाबतीत आधीच्या निरोगी धमनीमध्ये रक्ताची गुठळी निर्माण झाल्याने हार्ट अटॅक येतात. जेव्हा धमनीच्या भिंतीला चिरा पडतात व आतील मटेरियल बाहेर येते व रक्त त्यामध्ये मिसळते तेव्हा असे होते. अगदी थोड्याच काळात गुठळी तयार होते व ती धमनीला संपूर्णपणे ब्लॉक करून टाकते, यामुळे अचानक हार्ट अटॅक येतो.

म्हणूनच या दोन्ही प्रकारच्या हार्ट अटॅकवरील उपचारांचे दृष्टिकोन वेगवेगळे असतात. गुठळी जर असेल तर ती काढून टाकल्यानंतर स्टेंटची गरज नसते. परंतु याआधीच्या काळात काही मर्यादांमुळे डॉक्टर्स गुठळी पूर्णपणे काढून टाकू शकत नव्हते. गुठळी काढून टाकण्याच्या पारंपरिक पद्धतीमध्ये सिरिंज व कॅथेटरचा वापर केला जातो पण सिरिंजमधील दाब हळूहळू कमी होतो. ही मर्यादा दूर करण्यासाठी सक्शन कॅथेटर हे पंप जोडलेले मेकॅनिकल थ्रोम्बो-सक्शन साधन प्रस्तुत करण्यात आले. या पंपमधून सातत्याने निगेटिव्ह दाब निर्माण केला जातो, त्यामुळे क्लॉट एम्बोलायझेशनला प्रतिबंध घातला जातो आणि संपूर्ण गुठळी अगदी कमी वेळात काढून टाकता येते. यामुळे स्टेंट्सची गरज भासत नाही, रुग्णाला याचे लाभ मिळतात. या प्रक्रियेमध्ये रक्त वाहून जाण्याचे प्रमाण कमी असते. गुठळी काढून टाकणे १००% प्रभावी असल्याने रुग्णाची प्रकृती अधिक वेगाने सुधारते, गुठळीची अधिक हालचाल होण्याचा प्रश्न नसतो त्यामुळे तब्येतीमध्ये अधिक गुंतागुंत होत नाही.

अशाप्रकारची प्रगत प्रक्रिया करून आपल्या रुग्णांना अभिनव व उत्कृष्ट देखभाल सेवा पुरवण्यासाठी सह्याद्रि हॉस्पिटल्स वचनबद्ध आहे. या प्रक्रियेमध्ये मिळालेले यश वैद्यकीय उपचारांमध्ये प्रगती व आमच्या रुग्णांना उपचारांमधून मिळणाऱ्या परिणामांमध्ये सुधारणा घडवून आणण्याप्रती आमची निष्ठा दर्शवते.