Home Blog Page 1443

सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी २३ जुलै रोजी लेखी परीक्षा

पुणे दि १७ : राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ दौंड यांच्यामार्फत सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१ शारीरिक चाचणीमधील १ हजार ९४४ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले असून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता मेरी मेमोरीयल स्कूल दौंड व वंदनीय राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज विद्यालय दौंड येथे घेण्यात येणार असल्याची माहिती दौंड राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ च्या समादेशक विनीता साहू यांनी दिली आहे.

लेखी परिक्षेसाठी पात्र उमेदवारांनी २३ जुलै रोजी सकाळी ८ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. उशीरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेला येताना उमेदवारांनी महाआयटी यांनी ई-मेलद्वारे दिलेले शारिरीक चाचणी व लेखी परीक्षेचे ओळखपत्र डाऊनलोड करुन त्याची रंगीत प्रिंट आणि आवेदन अर्जावरील दोन रंगीत पासपोर्ट साईज फोटो आणणे आवश्यक आहे. तसेच मैदानी चाचणीसाठी पुरविण्यात आलेले ओळखपत्र घेऊन येणे अनिवार्य आहे.

परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी मोबाईल फोन, डिजीटल घड्याळ, इलेक्ट्रॉनिक वस्तु किंवा इतर तत्सम वस्तू तसेच शक्यतो कोणत्याही प्रकारच्या बॅग आणू नयेत. बॅग व त्यातील वस्तू गहाळ अथवा चोरीस गेल्यास त्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, काळा पेन तसेच पॅड बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी पुरविण्यात येणार आहे.लेखी परीक्षेत उमेदवारांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करु नये, अशी बाब निदर्शनास आल्यास तात्काळ भरती प्रमुखांशी संपर्क साधावा.

पोलीस भरतीमध्ये कोणत्याही अमिषाला अथवा भूलथापांना बळी पडू नये. लाच देणे अथवा घेणे कायद्याने गुन्हा असून असे आढळून आल्यास लाचलुचपत विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा. परीक्षेबाबतच्या अधिक माहितीसाठी राज्य राखीव पोलीस बल गट क्र.५, दौंड यांच्या ०२११७- २६२३४७ किंवा ७२७६७६८३४७ या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा www.mahapolic.gov.in व www.maharashtrasrpf.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही कळविण्यात आले आहे.
0000

पीएमपीएमएलच्या पुण्यदशम ५० बसेस आठवडाभर होत्या बंद..आता होत आहेत टप्प्याटप्प्याने सुरु …

पुणे-पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या स्वारगेट डेपोमधून ५० पुण्यदशम बसेस संचलनात होत्या मात्र दि. ०८जुलै ला यांच्या प्रमाणपत्रांची मुदत संपली आणि या बसेस फिटनेस प्रमाणपत्र मिळेपर्यंत रस्त्यावर येणे बंद झाले .दरम्यान आता कालच ९ बसेस ला फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्याने त्या रस्त्यावर धावू लागल्या आहेत.आणि आणखी ११ बसेस १९ तारखेपासून फिटनेस प्रमाणपत्र घेऊन धावू लागतील असे pmpml च्या व्यवस्थापनाने कळविले आहे .
या संदर्भात pmpml ने कळविले आहे कि,’ बसेसचे फिटनेस संपल्यामुळे आर.टी.ओ. फिटनेसकामीकारणाने तात्पुरत्या स्वरूपात या बसेस मार्गावर संचलनात नव्हत्या. तथापिशनिवार, दि. १५/०७/२०२३ रोजी ९ बसेसचे फिटनेस सर्टिफिकेट प्राप्त झाल्यामुळे सदर ९ बसेस आता संचलनात आहेत.
बुधवार, दि. १९/०७/२०२३ रोजी ११ बसेसचे फिटनेस सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर या ११ बसेस आणखी संचलनात येणार
आहेत. उर्वरीत बसेस टप्प्याटप्प्याने दि. २२/०७/२०२३ पासून फिटनेस सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर संचलनात येणार
आहेत. पुण्यदशम बसेस फिटनेस अभावी संचलनात येणार नसल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरीता त्याच्या जागी
साध्या बसेसची व्यवस्था करणेत आलेली आहे.
पुण्यदशम बसेसचे आर.टी.ओ. फिटनेसची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रथम संबंधित कंपनी (आयशर) त्यांच्या
पोर्टलवरून सदर बसेसची ऑनलाईन के.वाय.सी. व ऑनलाईन व्ही.एल.टी.डी. सर्टिफिकेट प्राप्त करून देते. सदरची दोन्ही
सर्टिफिकेट कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर सदर बसेस पीएमपीएमएल कडून आर.टी.ओ. फिटनेससाठी उपलब्ध करून
दिल्या जातात. सदरची प्रक्रिया पीएमपीएमएल मध्ये नवीन असल्यामुळे व प्रथमतःच करणेत येत असल्याने ऑनलाईन
सर्व्हरच्या अडचणीमुळे फिटनेस सर्टिफिकेट प्राप्त करून घेण्यास विलंब होत आहे. सदर कारणास जबाबदार असलेल्या
आयशर बसेसची देखभाल दुरूस्ती करणाऱ्या ठेकेदारावर जबाबदारी निश्चित करणेत आलेली आहे. तरी प्रवाशांच्या काही
प्रमाणात होत असलेल्या गैरसोयी बद्दल पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.

जयंत पाटील म्हणाले,’शरद पवार विरोधकांच्या बैठकीला उद्या जातील

मुंबई-अजित पवार यांच्यासह त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या 30 आमदारांनी आज पुन्हा शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर चर्चांना उधाण सुरू आहे. त्यावर प्रफुल्ल पटेल यांनी भेटीचे कारण देखील स्पष्ट केले होते. त्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची भूमिका माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली.

शरद पवार हे युपीएचा भाग आहेत. त्यामुळे बंगळुरू येथे आयोजित बैठकीला उद्या जातील, असा मला विश्वास आहे. त्यांनी त्यांची भूमिका अगदी स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणतेही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे काम नाही. विरोधकांच्या बैठकीला का गेले नाही. या प्रश्नावर जयंत पाटील यांनी उत्तर दिले.

ज्या लोकांनी पवार साहेबांसोबत अनेक वर्षे काम केले. ते लोक येऊन भेटत असेल तर त्यात गैर काहीच नाही. काही लोकांनी पक्षविरोधी कृती केली आहे. त्यामुळे या ओढावलेल्या परिस्थितीतून मार्ग काढावा, अशी आग्रहाची विनंती अजित दादांसह अन्य सहकाऱ्यांनी पवार साहेबांकडे केली आहे. परंतू शरद पवार साहेबांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांची भूमिका अगदी स्पष्ट आहे. असे प्रतिपादन जयंत पाटील यांनी केले.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, आपल्या घरात कोणी आले तर विश्लेषणात्मक टिप्पणी करणे योग्य नाही. ते शरद पवारांना भेटायला आले तेव्हा ते कसे दिसत होते, ते नाराज होते का. याच्याशी काहीही संबंध नाही. पवार साहेबांनी आपली भूमिका येवल्याला जाऊन अगदी स्पष्ट केली आहे. त्यामुळे प्रत्येक भेटीनंतर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे मला अजिबात वाटत नाही.जी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यातून मार्ग दाखवावा, अशी मागणी अजित पवारांसह मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या लोकांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. शरद पवार साहेबांना कोणीही कधीही भेटू शकते. त्यामुळे कोणी भेटायला आले तर त्यांना साहेब नाकारत नाही, असे जयंत पाटील म्हणाले.जयंत पाटील म्हणाले की, काही लोक संवाद साधण्यासाठी येत असतील तर राजकारणात तो संवाद चालू ठेवावा लागतो. जे लोक त्यांच्यासोबत वर्षानुवर्षे काम करत आहेत, त्यांना भेटण्याचा मार्गदर्शन घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे राजकारणात संवाद कायम ठेवावा लागत असतो, तो कायम चालूच राहणार आहे.

पवार साहेब मोदींसोबत जाऊ शकत नाही,पुन्हा-पुन्हा भेटणे म्हणजे त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेणे बरोबर नाही : विद्या चव्हाण

मुंबई- शरद पवारांना अशाप्रकारे त्रास देणे बरोबर नाही. तुमच्या हृदयात पवार साहेब असते तर तुम्ही असा मार्ग निवडलाच नसता. कारण, पवार साहेबांच्या नावावर सगळे आमदार निवडून आले आहेत. त्यांनी आपल्या हृदयातून पवार साहेबांना काढून टाकले आणि आता मोदींची प्रतिमा तयार केली आहे. मोदींसोबत पवारांना जाता येत नाही. सर्वधर्म समभाव मानणारे पवार मोदींसोबत जाऊ शकत नाही हे माहीत असताना त्यांना भेटायला जाणं हे बरोबर नाही,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिली.

अजित पवार गटाच्या आमदारांनी आज पुन्हा शरद पवारांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांनी आज पुन्हा भेट घेतल्याने राजकीय तर्क वितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, यावरून विद्या चव्हाण म्हणाल्या की, शरद पवारांनी याचा खुलासा केला आहे की, त्यांना भाजपासोबत जाता येणार नाही. जयंत पाटलांनीही याबाबत खुलासा केला आहे. आता सगळं संपलेलं असताना पवार साहेबांना पुन्हा पुन्हा भेटायचं म्हणजे पवार साहेबांच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायचा हे बरोबर नाही.

साधने खुंटतात तिथे भक्ती व प्रेमाचा उदयह.भ.प.भगवती ताई सातारकर-दांडेकर

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे चातुर्मासानिमित्त आयोजित कीर्तनमालेला प्रारंभ

पुणे : आपल्या प्रवृत्तीची गंगा सागरामध्ये जावून स्थिर होते. खरे तर, भक्ती आणि प्रेमरुपी सागरामध्ये स्थिर होत असते. वारकरी संप्रदाय किंवा भागवत धर्म हा पचायला खूप अवघड आहे. ज्या वेळेला आपली दृष्टी विठ्ठलाने भरेल, त्यावेळी आपल्याला काहीच कमी वाटणार नाही. सर्व साधने जिथे खुंटून जातात, तिथे भक्ती व प्रेमाचा उदय होतो, असे ह.भ.प.भगवती ताई सातारकर- दांडेकर यांनी सांगितले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल ३५ वर्षांहून अधिक काळ ट्रस्टतर्फे हा कार्यक्रम सुरु आहे. कीर्तनमालेत ह.भ.प.भगवती ताई सातारकर- दांडेकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

भगवती ताई सातारकर – दांडेकर म्हणाल्या, ईश्वरी सत्तेची प्रतिती संतांना दिसली. संतांना ज्या प्रतितीमध्ये परमेश्वर दिसला, त्यामध्ये विरुन जाणे हे आपले काम आहे. परमेश्वराचे नाम घेतल्याशिवाय विश्वात असलेले ज्ञान, भक्ती, आनंद सामान्यांना मिळणार नाही. नाम हे अमृत आहे, त्यामुळे आपण नामस्मरण करायला हवे.

ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, गणेश कला क्रीडा मंच येथे दिनांक १९ जुलै पर्यंत दररोज सायंकाळी ५.३० ते ८ यावेळेत चातुर्मासानिमित्त कीर्तन महोत्सव असून त्यामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार कीर्तन सादर करणार आहेत. कीर्तन महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

हॉटेल चालक सुसाट ..पोलीस ठाण्यात जाऊन केली इन्स्पेक्टरला अरेरावी आणि हवालदाराला धक्काबुक्की

पुणे : डेक्कन जिमखाना नदीपात्रातील चौपाटी परिसरात मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेले हाॅटेल बंद करण्यास सांगितल्याने हाॅटेलचालकाने पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाशी अरेरावी केल्याची घटना घडली. पोलीस निरीक्षकाशी(PI) वाद घालून एका पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी हाॅटेलचालकास पोलिसांनी अटक केली.

सचिन हरिभाऊ भगरे (वय ३३, रा. कबीर बाग परिसर, नारायण पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नदीपात्रातील चौपाटी परिसरातील हाॅटेल सदगुरू मध्यरात्री दीड वाजेपर्यंत सुरू होते. रात्रपाळीत गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत होते. पोलिसांनी हाॅटेल बंद करणास सांगितले. त्या वेळी हाॅटेल चालक भगरेने पोलिसांशी वाद घातला. पोलिसांनी कारवाई करण्यासाठी त्याला डेक्कन पोलीस ठाण्यात नेले. तेव्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्याशी भगरे याने पोलीस ठाण्यात वाद घालण्यास सुरुवात केली.‘तुला काय करायचे ते कर’, असे भगरे त्यांना म्हणाला. पोलीस निरीक्षक बहिरट यांच्याशी वाद घातला. एका पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी भगरे याला अटक करण्यात आली असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक साळुंखे तपास करत आहेत.

2 लाखाची लाच घेताना दैनिकाच्या संपादकासह दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

  धाराशिव –शासनाने पाझर तलाव व साठवण तलावासाठी संपादीत केलेल्या जमीनाचा मोबदल्याचे चेक काढून देण्यासाठी एका वृद्ध शेतकऱ्याकडून 2 लाखाची लाच घेताना धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील एका दैनिकाच्या संपादकासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. एसीबीच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.    तक्रारदार यांचे पत्नीच्या नावे असलेली शेत जमीन शासनाने पाझरतलाव व साठवण तलावा करिता संपादीत केलेली आहे. या जमिनीचा न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे अधिकचा मोबदला प्रांत कार्यालय, उस्मानाबाद येथील अधिकारी व कर्मचारी यांना सांगुन, तुमचे संपादित जमीनीचा मोबदला 26 लाख 56 हजार 017 रुपये व 4 लाख 31 हजार 798 रुपयांचे दोन चेक काढुन देण्याकरिता 2 लाख रुपये लाच रकमेची मागणी केली.

याबाबत वृद्ध शेतकऱ्याने उस्मानाबाद एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने शनिवारी पडताळणी केली असता अनिरुद्ध कावळे आणि बाबासाहेब अंधारे यांनी दोन लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना दोघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर आनंदनगर पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे ),

पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास राठोड
पोलीस अंमलदार इफतीकार शेख, दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, सचिन शेवाळे, आशिष पाटील, विष्णू बेळे,
विशाल डोके,सिद्धेशर तावस्कर, अविनाश आचार्य, नागेश शेरकर, जाकेर काझी, चालक करडे यांच्या पथकाने केली.

डॉ. शर्वरी इनामदार यांना दुहेरी मुकुट

क्लासिक व इक्वीप्ड दोन्हीही प्रकारात जिंकले  “स्ट्रॉंग वुमन ऑफ इंडिया” टायटल

राष्ट्रीय पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये मायलेकींचे यश
पुणे : जी. एम. आर. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी राजम आंध्र प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये ५७ किलो महिला गटात डॉ. शर्वरी इनामदार यांनी क्लासिक पाॅवरलिफ्टिंग व इक्वीप्ड पाॅवर लिफ्टिंग अशा दोन्ही प्रकारांमध्ये सुवर्णपदक पटकावले, तर त्यांच्या आई डॉ. पूर्णा भारदे यांनी  ६९ किलो  मास्टर ३  वजनी गटामध्ये चुरशीच्या स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली. 
स्पर्धेत केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, गोवा, ओडिसा, राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आदी २२ राज्यांचा सहभाग होता.
 सर्व वजनी गटांमधून जास्तीत जास्त वजन उचलणाऱ्या खेळाडूचा “बेस्ट लिफ्टर ऑफ इंडिया” म्हणजेच “स्ट्रॉंग वुमन ऑफ इंडिया” हा मानाचा किताब डॉ. शर्वरी इनामदार यांनी क्लासिक व इक्वीप्ड अशा दोन्ही स्पर्धांमध्ये खेचून आणला. ऑक्टोबर महिन्यात मंगोलिया येथे होणाऱ्या जागतिक पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी दोघी मायलेकींची निवड झाली आहे.

PMPL प्रवासी दिन :अवघ्या ३७ तक्रारी आणि १४ सूचना


डेपो निहाय नेमलेल्या पालक अधिकारी यांनी जाणून घेतल्या प्रवाशांच्या अडी – अडचणी.
पुणे-पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या संचलन कार्यक्षेत्रातील विविध मार्गांवर, स्थानकांवर प्रवाशी वर्गास
चांगली, तत्पर व विश्वसनीय बससेवा देण्याच्या दृष्टीने व बससेवेबाबत प्रवाशांना येणाऱ्या अडचणी/तक्रारींची तातडीने
दखल घेणे आवश्यक असल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या
संकल्पनेतून बससेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी, प्रवाशी सेवा लोकाभिमुख होण्यासाठी व प्रवाशांचे मोलाचे मार्गदर्शन
परिवहन महामंडळास मिळावे याकरीता प्रत्येक आगारामध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी दुपारी
०३.०० ते सायंकाळी ०५.०० या वेळेत प्रवासी दिन हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
शुक्रवार, दि. १४ जुलै २०२३ रोजी प्रवासी दिना निमित्त महामंडळाचे मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
यांच्यासह प्रत्येक डेपोसाठी नेमणूक केलेले पालक अधिकारी यावेळी प्रत्येक डेपो मध्ये उपस्थित होते. प्रवासी दिन या
उपक्रमाच्या माध्यमातून प्रवाशी नागरिकांच्या ३७ तक्रारी व १४ सुचना प्राप्त झाल्या असून सदरच्या तक्रारी संबंधित
विभागास पाठवून तक्रारींचे निराकरण करण्यात येत आहे.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्यासह पालक अधिकारी यांनी साधला प्रवाशांशी संवाद.
शनिवार, दि. १५ जुलै २०२३ रोजी पहाटे ०५:०० ते सकाळी ०८:०० पर्यंत अध्यक्ष व व्यवस्थापकीय
संचालक यांच्यासह प्रत्येक डेपोचे पालक अधिकारी यांनी प्रत्येक डेपोमध्ये उपस्थित राहून पाहणी केली. तसेच सकाळी
०८:०० ते सकाळी ११:०० पर्यंत मार्गावरील बसेसमधून प्रवास करत प्रवाशी नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या
अडी-अडचणी समजून घेतल्या.

‘बार्टी’मार्फत आयोजित यूपीएससी पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी १४ ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षेसाठी निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंग) राबविण्यात येणार आहे. त्याकरिता १४ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

२७ ऑगस्ट २०२३ रोजी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) आयोजित करण्यात आली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी www.siac.org.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे यांनी केले  आहे.

राज्यातील अनुसूचित जातीतील ३०० उमेदवारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेमध्ये संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षेच्या ( पूर्व व मुख्य) पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी पुरस्कृत (Sponsor) करण्यात येणार आहे.

यूपीएससी परीक्षेच्या पूर्व तयारी प्रशिक्षणासाठी दिल्लीतील केंद्रासाठी अनुसूचित जातीच्या ३०० उमेदवारांची निवड करण्यात येईल. त्यामध्ये ३० टक्के जागा महिलांसाठी, ४ टक्के जागा दिव्यांग व्यक्तीसाठी (Person With Disability), ५ टक्के जागा अनुसूचित जाती अंतर्गत वंचित जातीमधील (वाल्मिकी व तत्सम जाती- होलार, बेरड, मातंग, मांग, मादगी इ.) विद्यार्थ्यांकरिता आरक्षित असतील, एकूण जागांच्या ५% जागा विशेष बाब म्हणून राखीव ठेवण्यात येतील.

उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा,उमेदवाराचे वय संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षेच्या अटी व शर्ती नुसार असावे,

संघ लोकसेवा आयोगामार्फत सन २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसाठी पात्र असावा, रुपये ८ लाखापर्यंत कौटुंबिक उत्पन्न मर्यादा असलेले उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असतील.

बार्टी संस्थेमार्फत दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षण शुल्क देण्यात येते, हे प्रशिक्षण अनिवासी असल्याने उमेदवारांना दिल्ली येथील निवास व भोजनाची व्यवस्थेकरिता प्रती माह कमाल रक्कम १३ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते. विद्यावेतन करिता विद्यार्थ्यांची उपस्थिती ग्राह्य धरण्यात येईल, प्रशिक्षणाच्या सुरवातीस दिल्ली येथे जाण्याकरिता पाच हजार रुपये (एकदा) व प्रशिक्षण संपल्यानंतर परतीच्या प्रवासाकरिता पाच हजार रुपये (एकदा) प्रवास खर्च देण्यात येतो, पहिल्या महिन्यातील आर्थिक सहाय्य तीन हजार रुपये (एकरकमी) देण्यात येते, अशी माहिती महासंचालक श्री. वारे यांनी दिली.

नरेंद्र मोदी अन् शरद पवार चांगले मित्र, महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी दोघांनी एकत्र यावे ही इच्छा – दीपक केसरकर

मुंबई-शरद पवार जेष्ठ नेते आहेत. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आमदार गेले असतील तर त्यात वाईट काय आहे. राष्ट्रवादीचं मनोमिलन व्हावं ही आमची इच्छा आहे. मोदी साहेब आणि पवार साहेब चांगले मित्र आहेत, महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी दोघांनी एकत्र यावे ही इच्छा आहे, असे मत शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.

अजित पवार गटाने शरद पवारांची आज सोमवारी पुन्हा भेट घेतली. या भेटीत सर्व अजित गटातील सर्व आमदारांनी शरद पवारांना एकत्रित काम करण्यासंदर्भात मनधरणी केली. मात्र शरद पवारांनी अद्याप मौन बाळगलेले आहे. राष्ट्रवादीतल्या या घडामोडीवर शिंदेगटातील मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रविवारी अचानक अजित पवार गटाचे मंत्री आणि काही नेते शरद पवारांच्या भेटीसाठी वायबी सेंटरमध्ये पोहोचले होते. या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांना सोबत काम करण्याची विनंती केल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर जयंत पाटील यांनीही फुटीर गटाने दिलगिरी व्यक्त केल्याचं सांगून ते पक्षात परत आले तर आनंदच होईल, अशी भूमिका मांडली.मात्र पवार काहीही बोलले नव्हते. त्यानंतर झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात शरद पवारांनी पुरोगामी विचारांसोबत पुढे जाण्यासंदर्भात भाष्य केलं. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं काय सुरुय, हे अद्याप स्पष्ट होत नाहीये.

राष्ट्रवादीच्या 24 आमदारांचा हाथ दोन्ही डगरीवर ..

जो जितेगा वोही सिकंदर कहलायेगा

मुंबई- विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विधानसभा सभागृहात राष्ट्रवादीतील फूट दिसून आली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे 53 पैकी 24 आमदाराच विधानसभेत हजर होते. यातील काही आमदार विरोधी बाकांवर बसले, तर अजित पवारांना पाठिंबा देणारे आमदार सत्ताधारी बाकांवर बसले.24 आमदार आज गैरहजर होते यांचा हाथ दोन्ही डगरीवर असल्याचे दिसून आले आहे.

विरोधी बाकांवर बसलेले आमदार

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बहुसंख्य आमदारांनी अजित पवारांच्या गटात प्रवेश केला. तर काही आमदार शरद पवारांसोबत आहेत. हे आमदार आज विरोधी बाकांवर बसलेले होते. त्या आमदारांची नावे खालील प्रमाणे…

1) जयंत पाटील 2) अनिल देशमुख 3) बाळासाहेब पाटील 4) सुनिल भूसारा 5) राजेश टोपे 6) प्राजक्त तनपुरे 7) सुमन पाटील 8) रोहित पवार 9) मानसिंग नाईक

सत्ताधारी बाकांवर बसलेले आमदार

1) अजित पवार 2) छगन भुजबळ 3) दिलीप वळसे-पाटील 4) हसन मुश्रीफ 5) धनंजय मुंडे 6) धर्मराज आत्राम 7) संजय बनसोडे 8) अनिल पाटील 9) आदिती तटकरे 10) बबन शिंदे 11) इंद्रनील नाईक 12) प्रकाश सोळंके 13) किरण लहमाते 14) सुनील शेळके 15) सरोज अहिरे

जितेंद्र आव्हाडांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र

दरम्यान, राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांनी पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष, गटनेता आणि मुख्य प्रतोद यांची नियुक्ती केली आहे. तर, शरद पवार गटानेही आमदार जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रतोदपदी निवड केली आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी गटनेते जयंत पाटील यांच्या आदेशाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिले. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आसन व्यवस्थेबद्दल हे पत्र होते.

पत्रात जितेंद्र आव्हाडांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्र विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते जयंत पाटील यांच्या आदेशानुसार आपणास कळवण्यात येत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 सदस्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. या 9 सदस्यांना वगळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उर्वरित सर्व सदस्यांची विधानसभा सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची विरोधी पक्षासाठी असणाऱ्या आसनावर बसण्याची व्यवस्था करण्यात यावी”

जर आहे बहुमत तर का पुन्हा पुन्हा साहेबांची मनधरणी …

मुंबई- अजित पवार व त्यांच्या समर्थकांनी सलग दुसऱ्या दिवशी शरद पवारांची भेट घेतली.अजित पवारांनी स्वतःसह सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांवरील अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी ही भेट घेतल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.यावेळी शरद पवार, अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांच्यात जवळपास तासभर बंद दरवाज्याआड चर्चा झाली. या चर्चेचा तपशील अद्याप बाहेर आला नाही. पण मंत्र्यांवरील अपात्रतेच्या संभाव्य कारवाईच्या भीतीपोटीच अजित पवारांनी सलग दुसऱ्या दिवशी पवारांची भेट घेतल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. बैठकीत बंडखोर आमदारांनी शरद पवारांकडे पक्षाच्या 9 मंत्र्यांना अपात्र न करता त्यावर एखादा सर्वमान्य तोडगा काढावा, असा आग्रह धरल्याची माहिती आहे.

अजित पवार आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली होती. त्यानंतर त्यांनी स्वतः शिंदे – फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री, तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आदी 8 नेत्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनाक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाली. तसेच राज्यातही खळबळ माजली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा अध्यक्षांकडे एका पत्राद्वारे अजित पवारांसह 9 जणांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली. आता हेच पत्र अजित पवार व त्यांच्या समर्थकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचा दावा केला जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांनी सलग दोन पवारांच्या घेतलेल्या भेटीमागेही हेच प्रमुख कारण आहे. शरद पवार व अजित पवार गटातील सोमवारची बैठक रविवारसारखीच पूर्वनियोजित नव्हती. पण ते आल्याचे कळताच शरद पवार सिल्व्हर ओक या आपल्या निवासस्थानाहून थेट यशवंतराव चव्हाण सेंटरवर आले. त्यांनी तिथे त्यांची भेट घेतली.

फ्लेक्स काढण्यासाठी वीजखांबावर चढल्यामुळे विद्युत अपघात

पुणे, दि. १७ जुलै २०२३: वडगाव शेरी उपविभाग अंतर्गत आनंद पार्क बसथांब्यानजिक लावलेला एक फ्लेक्स काढण्यासाठी रोहित्राच्या वीज खांबावर चढल्याने १५ वर्षीय मुलाला ११ केव्ही वाहिनीचा धक्का बसला व विद्युत अपघात झाल्याचे महावितरणच्या प्राथमिक पाहणीत आढळून आले होते. ही घटना दि. २४ एप्रिल रोजी दुपारी १.४५ वाजता घडली होती. दरम्यान विद्युत अपघातात जखमी झालेला अंकुश खंडू बनसोडे याचा रविवारी (दि. १६) उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

या विद्युत अपघातप्रकरणी राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षक विभागाने त्याचवेळी घटनास्थळाची पाहणी केलेली आहे. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर महावितरणकडून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

बोगस खते आणि बियाणे विक्रीसंदर्भात लवकरच कडक कायदा आणणार

मुंबई, दि. 17- राज्यात विविध भागांत मागील वर्षीच्या तुलनेत 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र पुणे विभाग आणि नाशिक विभागातील काही भागात पेरणी झालेल्या क्षेत्राचे प्रमाण कमी आहे. पावसाने ओढ दिल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी आपत्कालिन आराखडा तयार करण्यात आला आहे, असे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. याशिवाय, बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यासंदर्भातील कायदा तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

हवामान विभागाने येत्या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. कालच यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना 10 हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली नाही त्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांनाही लवकरच मदत मिळेल, असे त्यांनी सांगितले.

बीटी बियाण्यांप्रमाणेच इतर बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई राज्य शासन करेल. त्या अनुषंगाने विधिमंडळात कायदा आणला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.