Home Blog Page 1437

महाज्योतीकडून युपीएससी पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत चौकशीचे आदेश जारी

पुणे, दि. २०: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर मार्फत १६ जुलै रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आणि दिल्ली येथे घेण्यात आलेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्व प्रशिक्षणाच्या प्रवेश परीक्षेत गैरप्रकार केल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

महाज्योतीने ई-निविदा प्रक्रिया राबवून निवडलेल्या एजन्सीमार्फत परीक्षेचे आयोजन केले होते. यामध्ये १३ हजार १८४ उमेदवारांची १६ जुलै रोजी राज्यातील १०२ आणि दिल्लीतील २ केंद्रावर संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्व प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा झाल्यावर काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यानी गैरप्रकार केल्याच्या तक्रारी महाज्योती कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. तक्रारीच्या अनुषंगाने महाज्योती कार्यालयाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.

चौकशी अधिकारी यांनी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीकडून सीसीटिव्ही चित्रीकरण तपासून गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अहवाल मागविला असून परीक्षेदरम्यान गैरव्यवहार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी मनात कोणताही संभ्रम ठेवू नये तसेच कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही महाज्योतीचे प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांनी केले आहे.
0000

वरंधा घाट रस्ता पावसाळा कालावधीत अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद

पुणे, दि. २०: पंढरपूर- भोर- महाड राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डीडी वरील भोर तालुक्याच्या हद्दीतील वरंधा घाट रस्ता पावसाळा कालावधीत २२ जुलै ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत अवजड वाहतुकीकरीता संपूर्णपणे बंद करण्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केली आहे.

या घाटातील पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील रस्ता हा नागमोडी वळणाचा असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडतात. त्यामुळे संभाव्य जीवित व वित्त हानी टाळण्याच्या उद्देशाने हा घाट रस्ता अवजड वाहनांसाठी पावसाळा कालावधीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नारंगी आणि लाल इशाऱ्याच्या वेळी सर्व प्रकारच्या अवजड, मध्यम व हलक्या प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीकरीता रस्ता बंद राहील. नारंगी आणि लाल इशारा नसलेल्या कालावधीत सदर घाट रस्ता फक्त हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
000

राज्यात २० ऑगस्टपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन करणार मतदारांची पडताळणी-मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे मतदारांना आवाहन

पुणे दि.२०: राज्यात २० ऑगस्ट २०२३ पर्यंत संपूर्ण महिनाभराच्या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या नावांची पडताळणी करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि भारत निवडणूक आयोगाच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या या भेटींमध्ये मतदारांचे वैयक्तिक तपशील, पत्ता आणि छायाचित्रांची पडताळणी करतील. मृत आणि स्थलांतरीत मतदार, दुबार नोंदणी असलेले मतदार, मतदारांचाही शोध घेतील. तसेच मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया करतील. यासोबतच नव मतदार, तृतीयपंथी आणि विमुक्त जाती भटक्या जमातीतील मतदार, देहव्यवसाय करणाऱ्या महिला मतदारांचा शोध घेऊन त्यांची आणि मतदार यादीत नाव नसलेल्यांची नोंदणी करण्याचे कामही या काळात केले जाणार असल्याचेही श्री.देशपांडे यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे राज्यातल्या मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचे आणि अद्ययावतीकरणाचे काम सुलभ होऊ शकणार आहे. हा उपक्रम म्हणजे आपण आपल्या मताधिकारापासून वंचित राहू नये याची सुनिश्चिती करण्याची नागरिकांसाठी मोठी संधी आहे. त्यामुळे जेव्हा हे अधिकारी आपल्या घरी येतील तेव्हा नागरिकांनी आपले स्वतःचे, आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे मतदार यादीत आहेत की नाहीत हे तपासून घ्यावे. वयाची १८ वर्ष पूर्ण केली आहेत पण अजूनही मतदार नोंदणी केलेली नाही अशांची मतदार नोंदणी करून घ्यावी. मतदार यादीतील आपले वैयक्तिक तपशील, पत्ता यात काही दुरूस्त्या असतील तर त्यासाठीचे अर्ज भरून द्यावेत. लग्नानंतर नाव बदललेल्या स्त्री मतदारांनी आपली नावे बदलून घ्यावीत. स्थलांतरीत झालेल्यांनी नव्या पत्त्याची नोंद करून घ्यावी, असेही आवाहन श्री. देशपांडे यांनी केलं आहे.

मतदारांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी होणार असल्याने, सर्व मतदारांनी त्यांच्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे आणि विनासंकोच आवश्यक ती माहिती आणि दस्तऐवज द्यावेत, असे आवाहनही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.
0000

कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान जड वाहनांसाठी ४० कि.मी. प्रतितास वेगमर्यादा निश्चित

पुणे, दि. २० : मुंबई-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहनांकरिता ४० कि.मी. प्रतितास वेगमर्यादा निश्चित केल्याचे अंतिम आदेश पुणे शहर वाहतूक शाखेकडून जारी करण्यात आले आहेत.

राज्य शासन गृह विभागाच्या २७ सप्टेंबर १९९६ च्या अधिसूचनेनुसार अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांच्या सूचना व हरकतींवर विचार करुन हे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार टॅक्टर-ट्रेलर कॉम्बीनेशन, ट्रक-ट्रेलर, अर्टीक्युलेटेड व्हेइकल्स, मल्टी ॲक्सल वाहने, कंटेनर, मोठ्या आकाराच्या मालाची वाहतूक करणारी वाहने आदी जड, अवजड वाहनांसाठी ही वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, असेही पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0000

मढे घाट धबधबा परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

पुणे, दि. २०: वेल्हा तालुक्यातील केळद-भोर्डी गावाच्या हद्दीतील मढे घाट धबधबा परिसरात प्रवाहित होणाऱ्या धबधब्यामध्ये पर्यटकांना दोरखंडाद्वारे खाली सोडण्यास पुढील ६० दिवस प्रतिबंध घालण्याचे आदेश भोर उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र कचरे यांनी जारी केले आहे.

हा परिसर पर्जन्यमानाचा प्रदेश असल्याने प्रवाहित होणाऱ्या धबधब्यामध्ये काही संस्था, आयोजक हे पर्यटकांना प्रवाही धबधब्याच्या वरील भागातून खाली दरीमध्ये २०० ते ३०० फुटांपर्यंत दोरखंडाद्वारे सोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेता धबधब्याच्या ठिकाणी असे कार्य करण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे.

या आदेशाचा भंग करणाऱ्या आयोजक संस्था, सहभागी पर्यटकांवर भारतीय दंड. संहिता १९०८ कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि वन अधिनियमातील अनुषंगिक कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

इरशाळवाडी दुर्घटना : शोध आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू,मुख्यमंत्री घटनास्थळावर,

मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत

मुंबई, दि. २० : रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ इरशाळवाडी येथील वस्तीवर काल रात्री दरड कोसळल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मदत व बचावकार्याचा आढावा घेत मदतकार्याला गती देण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) मंत्री दादा भुसे, आमदार महेश थोरवे, आमदार महेश बालदी, विभागीय आयुक्त महेश कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे उपस्थित होते.प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचावकार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि स्थानिक प्रशासनासह बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील एमआयडीसीमधील कामगार एनडीआरएफच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इरशाळवाडी येथे मदत व बचावकार्याचा आढावा घेतल्यानंतर ग्रामस्थांना भेटून आस्थेने विचारपूस केली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपये तर जखमींवरील उपचाराचा सर्व खर्च शासनातर्फे केला जाईल, असे जाहीर केले. तसेच, शासनाकडून सर्व मदत करण्याचे आश्वासित केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून चौकशी, मदतीची ग्वाही

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दूरध्वनीवरून माहिती घेतली. त्यांनी बचाव कार्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. लोकांना घटनास्थळावरून बाहेर काढणे आणि जखमींवर तातडीने उपचार करणे, हे प्राधान्य असल्याचे केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली

“इरशाळगड दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत”, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

“घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता मदतकार्य गतीने होत आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत व बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत”, असे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

जखमींची मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून रुग्णालयात विचारपूस

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावे आणि या दुर्घटनेतील जखमींची संख्या वाढल्यास प्रशासनाने सज्ज असावे, अशा सूचना संबंधित रूग्णालयाला दिल्यात. यावेळी एमजीएमचे डॉ. सागर, पनवेल महापालिकेचे डॉ. गोसावी नायब तहसीलदार पनवेल श्री. लाचके उपस्थित होते.

शिवभोजन थाळी पॅकेटचे मोफत वितरण,अत्यावश्यक अन्नधान्यही देणार

शिवभोजन थाळीच्या पॅकेटचे मोफत वितरण दुर्घटनाग्रस्तांना करण्यात येणार आहे. शिवाय पाच लिटर रॉकेल, १० किलो तांदूळ, १० किलो गहू किंवा त्याचे पीठ, इतर शिधा देखील देण्यात येणार आहे. जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत पुरवठा सुरूच राहणार आहे.

संपर्कासाठी हेल्पलाईन क्रमांक

चौक दूरक्षेत्र येथे तात्पुरते कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे. पोलिस निरिक्षक काळसेकर यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांचा मोबाईल क्रमांक 8108195554 असा आहे.

नागरिकांना आवाहन

भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. इरशाळवाडी येथे नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. अति मुसळधार पावासाची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आवश्यक आणि अतिमहत्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा : वरिष्ठ गटात ठाणेकरांचेच वर्चस्व,दीपित पाटील व श्रृती अमृते अजिंक्य

कुपवाड (सांगली)-ठाण्याच्या दीपित पाटील व श्रृती अमृते यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटात अजिंक्यपद पटकावले आणि राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील वरिष्ठ गटात ठाणेकरांचे वर्चस्व राखले.
सूरज फाउंडेशन व सांगली जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या वतीने कृष्णा व्हॅली स्कूल कुपवाड येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने होत आहे. पुरुषांच्या अंतिम सामन्यात पाटील या चौथ्या मानांकित खेळाडूने द्वितीय मानांकित खेळाडू चिन्मय सोमय्या (टी एस टी मुंबई) याचा सरळ चार गेम्स मध्ये पराभव केला. टॉप स्पिनचे सुरेख फटके व चॉप्स असा अष्टपैलू खेळ करीत त्याने हा सामना ११-८,११-९,११-६,११-९ असा जिंकला. उपांत्य फेरीत त्याने मंदार हर्डीकर याचे आव्हान ४-१ अशा गेम्सने परतविले होते. उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत सोमय्या याने सिद्धांत देशपांडे याचा ४-२ अशा गेम्सने पराभव केला होता. 
महिलांच्या एकेरीत श्रृती हिला अंतिम फेरीत पृथा वर्टीकर या पुण्याच्या खेळाडूने शेवटपर्यंत चुरशीची लढत दिली. अतिशय उत्कंठापूर्ण झालेला हा सामना श्रृती हिने ७-११,११-५,११-७,९-११,१२-१०,११-८ असा जिंकला. दोन्ही खेळाडूंनी अतिशय अव्वल दर्जाचा खेळ केला. मात्र शेवटच्या गेममध्ये श्रृती हिने खेळावर नियंत्रण ठेवीत विजेतेपद खेचून आणले. चौथ्या मानांकित श्रृती हिने उपांत्य फेरीत श्रेया देशपांडे हिला ४-३ असे पराभूत केले होते. श्रेया हिने उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित समृद्धी कुलकर्णी हिला पराभवाचा धक्का दिला होता तथापि श्रृती हिच्या शानदार खेळापुढे तिचे आव्हान टिकले नाही. पृथा हिने उपांत्य फेरीत आपली सहकारी स्वप्नाली नरळे हिच्यावर ४-० असा सफाईदार विजय मिळवला होता. त्याआधी तिने उपांत्यपूर्व फेरीत द्वितीय मानांकित सेनहोरा डिसूझा हिच्यावर सनसनाटी विजय मिळविला होता. 

नवीन वीजजोडणी, नादुरुस्त मीटर बदलासाठी मीटरचा तुटवडा नाही

पुणे, दि. २० जुलै २०२३: पुणे परिमंडल अंतर्गत नवीन वीजजोडण्यांसाठी तसेच जळालेले व नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी पुरेशा प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये गेल्या दीड महिन्यांमध्ये नवीन वीजजोडण्यांसाठी २८ हजार ४९५ तर जळालेले व नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी ६ हजार ६०० असे एकूण ३५ हजार ९५ नवीन वीजमीटर सर्वच १२ विभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत.

दरम्यान पुणे परिमंडलामध्ये गुरुवारच्या (दि. २०) स्थितीनुसार सिंगल फेजच्या नवीन वीजजोडणीसाठी कोटेशनच्या रकमेचा भरणा केलेल्या ग्राहकांची संख्या ९ हजार ८१६ आहे. या तुलनेत नवीन वीजजोडण्यांसाठी क्षेत्रीय कार्यालयांकडे १० हजार ४४९ वीजमीटर उपलब्ध आहेत. तर  नादुरुस्त व जळालेले मीटर बदलण्यासाठी १२०० नवीन मीटर उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त थ्री फेजच्या वीजजोडणीसाठी १३९२ ग्राहकांनी कोटेशनचा भरणा केला असून त्या तुलनेत १७५० वीजमीटर उपलब्ध आहेत.

गेल्या जानेवारीपासून नवीन वीजमीटरच्या उपलब्धतेबाबत पुणे परिमंडलामध्ये सूक्ष्म नियोजन सुरु करण्यात आले आहे. यामध्ये दर आठवड्यामध्ये दोनदा नवीन वीजजोडण्यांसह विभागनिहाय वीजमीटरच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात येत आहे. त्यानुसार आवश्यकतेनुसार संबंधित कार्यालयांना नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात येत आहे. नवीन वीजजोडण्या देण्यासोबतच नादुरुस्त किंवा जळालेले मीटर बदलण्याची कार्यवाही तत्परतेने करण्याचे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिले आहेत. विभागनिहाय आढाव्यानंतर नवीन वीजजोडणी देण्यासोबतच नादुरुस्त मीटर बदलायचे आहेत त्या विभागात पुरेशा संख्येत व तातडीने नवीन मीटर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

या नियोजनामुळे कोटेशनची रक्कम भरलेल्या (पेडपेंडिंग) तसेच पायाभूत यंत्रणा अस्तित्वात असलेल्या ठिकाणी नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्याची प्रक्रिया आणखी गतीमान झाली आहे. त्यामुळे गेल्या १८ दिवसांमध्ये पुणे परिमंडलामध्ये तब्बल १३ हजार ६८७ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये घरगुती- ११ हजार ६६८, वाणिज्यिक- १४७३, औद्योगिक- २२३ तसेच कृषी व इतर ३२३ वीजजोडण्यांचा समावेश आहे.

नवीन वीजजोडणी तसेच जळालेले व नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी नवीन मीटर उपलब्ध होत नसल्यास महावितरणच्या संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी ग्राहकांनी थेट संपर्क साधावा. पुरेशा प्रमाणात वीजमीटर उपलब्ध होत असल्याने वीजग्राहकांना बाजारातून मीटर खरेदी करण्याची आवश्यकता नाही असेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मणिपूरच्या घटनेवर मोदी म्हणाले- मन संतापाने भरले, 140 कोटी भारतीयांसाठी लज्जास्पद, एकाही आरोपीला सोडणार नाही

नवी दिल्ली- संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. कामकाज सुरू होताच विरोधी खासदारांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून गदारोळ केला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्याचवेळी राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

तत्पूर्वी, मणिपूरमध्ये 2 महिलांची रस्त्यावर विवस्त्र अवस्थेत धिंड काढण्यात आल्याच्या घटनेवर पीएम मोदी म्हणाले, ‘आज माझे हृदय वेदनांनी भरले आहे, रागाने भरले आहे. मणिपूरची घटना ही कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी घटना आहे. पाप करणारे कोण आहेत आणि किती आहेत हे बाजूला राहू द्या.

ते म्हणाले, ‘हा अपमान संपूर्ण देशाचा आहे. 140 कोटी भारतीयांसाठी लाजिरवाणे आहे. मी सर्व मुख्यमंत्र्यांना कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यास सांगतो. माता-भगिनींच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचला.

पंतप्रधान म्हणाले की, या देशात, भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात किंवा कोणत्याही राज्य सरकारमध्ये, राजकीय वाद-विवादाच्या वर उठून कायदा आणि सुव्यवस्था आणि बहिणींचा सन्मान यांना प्राधान्य आहे. कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही. मणिपूरच्या मुलींचे जे झाले ते कधीही माफ केले जाऊ शकत नाही.

वास्तविक, मणिपूरमध्ये कुकी समाजाच्या दोन महिलांना विवस्त्र करून जमावाने रस्त्यावर धिंड काढली होतरी. ही बाब 4 मेची आहे. राजधानी इंफाळपासून 35 किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात ही घटना घडली. त्याचा व्हिडिओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. राज्यात अडीच महिन्यांहून अधिक काळ हिंसाचार सुरू आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं मंत्रालय नियंत्रण कक्षातून इर्शालवाडी दरड दुर्घटनेतील बचाव व मदतकार्याचं संनियंत्रण

मुंबई, दि. 20 :- रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शालवाडी परिसरात गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ बचाव व मदतकार्य सुरु केले. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच मंत्रालयात जावून आपत्कालिन नियंत्रण कक्षाची सूत्रे स्विकारत, बचाव व मदतकार्याचे संनियंत्रण केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार नियंत्रण कक्षातून दुर्घटनास्थळावर उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना बचाव, मदतकार्यासाठी हेलिकॉप्टरसह आदी यंत्रणा तात्काळ उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही पूर्ण केली. दुर्घटनास्थळी उपस्थित मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून त्यांनाही नियंत्रण कक्षास प्राप्त झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त, मृत्यु पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
दरम्यान, इर्शालवाडी परिसरात घडलेल्या या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून ही दुर्घटना मन पिळवटून टाकणारी, विषण्ण करणारी असल्याचे म्हटले आहे. बचाव पथकानं अनेकांना ढिगाऱ्याबाहेर काढून त्यांचा जीव वाचवला आहे, परंतू काही नागरिक अजूनही ढिगाऱ्याखाली असून त्यांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जखमी नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आवश्यक वैद्यकीय उपचार केले जात आहेत. सर्व जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या बांधवांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली असून त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केली आहे.
००००००००००

‘एक देश, एक करप्रणाली’ सूत्रानुसारजीएसटी कायद्यात संबंधीत दुरुस्ती

  • उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 20 :- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करणारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर (सुधारणा) विधेयक 2023 आज विधानसभेत मंजूर करण्यात आले.

उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी हे विधेयक मांडताना सभागृहात सांगितले की, ‘एक देश, एक करप्रणाली’ सूत्रानुसार हे विधेयक मांडण्यात आले आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कायद्यात सुधारणा केल्यानंतर सर्व राज्यांद्वारे संबंधित कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणा करणे अनिवार्य असते. त्यानुसार विधेयक मांडण्यात आले आहे. सदर विधेयकामध्ये महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मधील 22 कलमे व 1 अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये प्रामुख्याने न्यायाधिकरण, डेटा अर्कायव्हल पॉलिसी, गुन्ह्यांच्या तरतुदीचे सुलभीकरण (decriminalization व गुन्हयांच्या कंपाउंडीगचे सुलभीकरण), इनपुट टॅक्स क्रेडिट, नोंदणी व परतावा आदी विषयांच्या कलमांमध्ये सुधारणा प्रस्तावित आहे. सुचवण्यात आलेल्या सुधारणा ह्या कार्यपध्दतीचे सुलभीकरण व करदात्यांचे हित या बाबी लक्षात घेऊन प्रस्तावित केल्या असल्याचेही वित्तमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय वस्तू व सेवाकर परिषदेच्या शिफारशींनुसार, दिनांक 30 मार्च 2023 रोजी मंजूर केलेल्या वित्तीय कायदा 2023 अन्वये केंद्र सरकारने केंद्रीय वस्तू व सेवाकर अधिनियम 2017 यामध्ये सुधारणा केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय वस्तू व सेवाकर अधिनियम 2017 व महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ यातील तरतुदींमध्ये एकसूत्रता राखण्यासाठी, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करणे आवश्यक होते, त्यानुसार विधानसभेत विधेयक मंजूरीची ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावाढदिवसानिमित्त दिव्यांग सहाय्यता अभियान

  • आयोजक मुरलीधर मोहोळ यांची माहिती
  • दोन हजार दिव्यांगाना मिळणार सुसह्य उपकरणे

पुणे (प्रतिनिधी) : ‘महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग सहाय्यता अभियान आयोजित करण्यात आले असून या अभियानांतर्गत २ हजार दिव्यांगाना सुसह्य उपकरणे दिली जाणार आहेत’, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ यांनी एनएचआरडी, एनॅबलर आणि भारत विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत २२ जुलै, २०२३ दुपारी ४ वाजता डी.पी. रस्त्यावरील शुभारंभ लॅान्स येथे हा कार्यक्रम होणार आहे.

‘दिव्यांग सहाय्यता अभियानात दोन हजार दिव्यांगांसाठी सुसह्य उपकरणांचे वाटप, दिव्यांग रोजगार नोंदणी आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, कृत्रिम अवयव मोजमाप आणि नोंदणी देखील यावेळी करण्यात येणार आहे, असेही मोहोळ म्हणाले.

‘भारतीय जनता पक्षाचे कर्तृत्ववान आणि संवेदनशील नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांना दिव्यांगांच्या प्रश्नाविषयी नेहमीच विशेष आपुलकी राहिली आहे. नुकत्याच एका दौऱ्यात एका दिव्यांग भगिनीने त्यांना ओवाळले. हा प्रसंग एवढा भावनिक होता, की त्यातून आपल्याला या दिव्यांग सहाय्यता अभियानाची कल्पना सुचली. आम्हाला सहानुभुतीची नाही तर सहकार्याची गरज आहे, ही भावना दिव्यांगांची असते. म्हणूनच त्यांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न या अभियानाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले.

गेल्या २४०० दिवसांमध्ये पुणे मेट्रो किती इंच पुढे सरकली?- मोहन जोशींचा संतप्त सवाल

पुणे-पुण्याची मेट्रो हे पुणेकरांचे स्वप्न असले तरी आता पूर्ण मेट्रो सुरु होण्यासाठी अजून किती वर्षे अथवा दशके थांबावे लागेल? कारण आता पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल रुग्णालय दरम्यानच्या एकूण १२ किलोमीटरच्या विस्तारित मार्गाचे उद्घाटन १५ जुलै रोजी होणार होते. त्याचे काय झाले? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केला आहे. 

मोहन जोशी म्हणाले की, २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले भूमीपूजन आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईघाईने अवघ्या ५ किलोमीटर मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ६ मार्च २०२२ रोजी केलेले उद्घाटन म्हणजे निव्वळ धूळफेक होती. पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन होऊन आज २४०० दिवस होऊन गेले आहेत. या काळात अवघे ५ किलोमीटर मेट्रो मार्ग तयार झाले. आता पुढचे सुमारे २९-३० कि.मी. लांबीचे मेट्रो मार्ग पुरे होण्यास यापुढे किती वर्षे अथवा दशके लागतील हे भाजपाने जाहीर करावे.

ते म्हणाले की, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे मेट्रोबाबत असंख्य वायदे केले. यावर्षी तर दर महिना ते वायदा करीत आहे. या वर्षी जानेवारी, नंतर मार्च, नंतर 1 मे, त्यानंतर जून आणि १५ जुलै असे वायदे त्यांनी केले.  तरी मेट्रो काही केल्या पुढे सरकत नाही. याचे नक्की गौडबंगाल काय आहे? पुणे मेट्रो प्रकल्प का रखडत आहे? या बाबत पालकमंत्र्यांनी पुणेकरांना उत्तर द्यायलाच हवे असे ते म्हणाले.

टाटा हॉस्पिटल कर्मचाऱ्यांवरच कॅन्सरग्रस्तांच्या लुटीचा आरोप; ११ कर्मचाऱ्यांना अटक, डॉक्टरही सामील?

 मुंबई : टाटा कॅन्सर रुग्णालयात देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या गरीब रुग्णांना वैद्यकीय चाचण्यांसाठी खासगी लॅबमध्ये पाठवून त्यांची आर्थिक पिळवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी २३ आरोपींपैकी ११ जणांना अटक केली असून यामध्ये टाटा रुग्णालयाचे दहा कर्मचारी आहेत. खासगी लॅबसोबत हातमिळवणी करून तीन ते चार वर्षांपासून हे कर्मचारी गरीब रुग्णांची लूट करीत असल्याचे समोर आले आहे. इतर फरारी आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या रॅकेटमध्ये डॉक्टरांचाही समावेश असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लॅबमध्ये वैद्यकीय चाचणीसाठी एखाद्या रुग्णाला पाठविल्यास त्याचे बिल पाच हजार रुपयांपर्यंत झाल्यास कर्मचाऱ्यांना १० टक्के कमिशन दिले जात होते. पाच हजारपेक्षा अधिक बिल झाल्यास २० टक्के कमिशन देण्याचे ठरले होते. त्यानंतरच्या पाच हजार रुपयांच्या टप्प्यानुसार रुग्णांना पाठविण्यापूर्वी फोनवरून कमिशनबाबत ठरविले जात असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे. डॉक्टरने टाटा रुग्णालयाच्या केस पेपरवर वैद्यकीय चाचण्यांबाबत लिहून दिल्यानंतर कर्मचारी हा केसपेपर आपल्या ताब्यात घ्यायचे. एका साध्या कागदावर या चाचण्या लिहून त्या रुग्णाला इन्फिनिटी लॅबमध्ये पाठविण्यात यायचे. रुग्ण पाठवताना त्याला आपण पाठविले आहे हे कळावे यासाठी कर्मचारी लॅबमधील कर्मचाऱ्यांना फोन करून सांगत. त्यानुसार संबंधित रुग्णाच्या नावाची नोंद पाठविणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नावावर केली जायची.

किरीट सोमैय्यांंनी काढलेल्या कोविड घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे नातलग सुजित पाटकर यांना अटक

मुंबई-खासदार संजय राऊत यांच्या मित्र परिवाराने 100 कोटीचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता.संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागीदार सुजित पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण करून, मुंबईतील कोविड सेंटर्सचे कंत्राट मिळवले, असा आरोप त्यांनी केला होता.आता महापालिकेतील कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. अनेक छापेमारी आणि चौकशीनंतर अखेर ईडीने यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुजित पाटकर आणि डॉ. बिचुले यांना अटक केली आहे.

सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे पाटकर यांच्या अटकेमुळे राऊत यांना मोठा धक्का बसल्याचेही सांगितले जात आहे. ईडीने आज सकाळीच सुरज पाटकर यांना अटक केली आहे. त्यांना कोर्टात हजर करून त्यांच्या कोठडीत वाढ मागण्याची शक्यता आहे. महापालिकेतील कोव्हिड घोटाळ्यासंदर्भात पाटकर यांना अटक करण्यात आली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

बीएमसीच्या जंबो कोविड-19 केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचा आरोप ईडीने केला आहे. कोविड सेंटरचं कंत्राट घेतलेल्या लाईफलाईन कंपनीने पेपर्सवर दाखवलेले डॉक्टर्स आता अस्तित्वातच नव्हते,असे ईडी चौकशीतून समोर आल्याची माहिती मिळत आहे. बीएमसीच्या जंबो कोविड-19 केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचाही आरोप ईडीने केला आहे.

एकीकडे कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीची चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे आता एसआयटी देखील अ‍ॅक्शनमोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कोरोना काळात भ्रष्टाचाराचा आरोप होत असताना यामध्ये एसआयटी चौकशीमध्ये आणखी कोणती माहिती मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.