Home Blog Page 1436

इरशाळगड दुर्घटनेतील बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

नवी मुंबई, दि.21:- रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ दूर्गम भागात असलेल्या इरशाळगडाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत अनेक कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. ही घटना घडल्याचे कळताच कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणांना बचाव कार्यासाठी आदेश दिले. डॉ. महेंद्र कल्याणकर हे स्वत: १९ जुलै रोजी रात्री दीड वाजता घटना स्थळी प्रत्यक्षात पोहोचले. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, खालापूर तहसिलदार अयुब तांबोळी यांनी रात्री परिस्थितीचा अंदाज घेत, बचावकार्यासाठी आवश्यक साधन सामग्री, मनुष्यबळाची तयारी केली.

डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी तातडीने सर्व प्रशासकीय यंत्रणांना आदेश दिल्याने बचाव कार्य त्वरीत व वेगाने सुरु झाले. एनडीआरएफचे जवान घटनास्थळी पोहचले. इरशाळवाडी पर्यंत पोहचण्याचा मार्ग सोपा नाही. निमुळता रस्ता तोही धड मातीचा नाही की धड दगडाचा नाही. डोंगरमाथ्यावरुन वेगाने येणारे पावसाचे पाणी, पायवाटेच्या खाली उतार अशा परिस्थितीत आयुक्त कल्याणकर स्वत: घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बचाव कार्याचे नेतृत्व केले. 24 तासाहून अधिक काळा आयुक्त डॉ. कल्याणकर आणि महसूल यंत्रणेसह इतर खात्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी कार्यरत आहेत. दुर्घटनास्थळी वाहने पोहोचण्यात अडचण असल्याने मदत कार्य थांबू नये यासाठी माहिती असलेल्या स्थानिकांची व संस्थांची मदत घेतली जात आहे. यामध्ये युवा संघटना, महाराष्ट्र सह्याद्री ट्रेकर ग्रुप्स, यशवंती हॅकर्स, विविध ट्रेकर्सचा देखील सहभाग आहे.
आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी प्रशासन आणि खासगी यंत्रणांमार्फत युध्दपातळीवर बचावकार्य सुरु आहे. एनडीआरएफ च्या 4 तुकड्या एकूण 100 जवान , टीडीआरएफ चे 80 जवान, इमॅजीका कंपनीचे 82 कामगार तर सिडकोचे 460 कामगार बाचाव कार्यात सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर चौक, वरोसे, खोपोली येथील ग्रामस्थ, वेगवेगळ्या एनजीओ, ट्रेकर ग्रूप मधून एकूण 900 पेक्षा अधिक लोक बचावकार्यात सहभागी झाले आहेत. रात्रीच्यावेळी बचावकार्य चालू ठेवण्यासाठी फ्लूड लाईट्स लावण्यात आले आहेत. 5000 फूड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले आहे. या दूर्घटनेत वाचलेल्या लोकांच्या निवाऱ्यासाठी 60 कंटेनर मागविण्यात आले असून त्यापैकी 30 ते 40 कंटेनर आज घटनास्थळी पोहचले आहेत. त्यांच्या राहण्याची तात्पूरती व्यवस्था या कंटेनर मध्ये करण्यात आली आहे. तसेच 20 तात्पूरती शौचालये आणि 20 तात्पूरती स्नानगृहे तयार करण्यात आली आहेत. वेगवेगळया माध्यमांतून बचावकार्यासाठी लागणाऱ्या आधुनिक यंत्रसामग्री मागविण्यात आल्या आहेत. मात्र घटनास्थ्ळ डोंगर माथ्यावर असल्याने या यंत्रसामग्री घटनास्थळापर्यंत नेण्यास अडचणी येत आहेत. आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर हे स्वत: संपूर्ण बचावकार्यावर लक्ष देत आहेत.
या दरड प्रलयात इरशाळावाडीतील रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत होवून पशुधनाची व खाजगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. अशावेळी त्यांना आधार देवून आयुष्यात पुन्हा उभारी घेण्यासाठी समाजातील सामाजिक संस्था/ट्रस्ट/फाँऊंडेशन्स/सीएसआर/दानशूर व्यक्ती यांच्याकडून आर्थिक मदत व साहित्याच्या स्वरुपात मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुढील खाते नंबर व पत्ता उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

ज्यांना आर्थिक स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी खात्याचे नाव :- जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी (District Disaster Response Fund), • बँकचे नाव :- स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा,अलिबाग (State Bank of India, Alibag), बँक खात्याचा नंबर:-38222872300, IFSC Code:-SBIN0000308या बँक खात्यामध्ये निधी जमा करावा.

ज्यांना साहित्य स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी उपविभागीय अधिकारी, कर्जत श्री.अजित नैराळे,मो.8390090040, खालापूर तहसिलदार श्री.आयुब तांबोळी, मो.क्र.9975751076 यांच्याशी संपर्क करुन ठिकाणी मदत पोहोच करावी. लोकप्रतीनिधी, नागरिकांनी पुढे येऊन मोठया संख्येने मदत करावी असे आवाहन कोकण विभागीय आयुक्‍त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

केळी विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत दोन महिन्यात निर्णय घेणार – फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे

0

मुंबई, दि. 21 – स्मार्ट प्रकल्पांतर्गत स्थापन करण्यात येत असलेल्या केळी पीक परिषदेचे उद्देश व त्याअंतर्गत समाविष्ट बाबी विचारात घेऊन केळी विकास महामंडळाचा प्रस्ताव अंतिम करण्याची कार्यवाही कृषी आयुक्तस्तरावर सुरू आहे. केळी पिकाच्या सर्वंकष विकासासाठी महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या दोन महिन्यात निर्णय घेण्यात येईल, असे फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री.भुमरे म्हणाले की, केळी विकास महामंडळासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच सोलापूर येथे संशोधन केंद्र सुरू करण्याबाबत प्रस्ताव आल्यास त्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल.

या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेबाबत चौकशी समितीला एक महिन्याची मुदतवाढ-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 21 – रायगड जिल्ह्यातील खारघर येथे आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमादरम्यान झालेली घटना ही दुर्देवी आहे. या घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची एक सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. समितीच्या विनंतीनुसार, शासनाने समितीला एक महिन्याकरिता मुदतवाढ दिली असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य अशोक ऊर्फ भाई जगताप यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले की, हा कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी येथील व्यवस्थेबाबत श्री सदस्यांसोबत तसेच संबंधित यंत्रणांसोबत चर्चा करून वेळेच्या निश्चितीसह सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली होती. येथील व्यवस्थेमध्ये 3500 श्री सदस्य सहभागी झाले होते. व्यवस्थेबाबत सर्व नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली होती. कार्यक्रमासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित अनुयायांसाठी पाणी, वैद्यकीय सेवा, प्रथमोपचार किट, रूग्णवाहिका, सुलभ शौचालय, दळणवळण व्यवस्था, वाहनतळ, मैदान साफसफाई, कार्यक्रम सुकरपणे पाहता यावा यासाठी 30 मोठ्या एलईडी स्क्रीनची व्यवस्था आदी आवश्यक सोयीसुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. लाखो नागरिक उपस्थित राहणार असल्याने आणि 306 एकर क्षेत्रामध्ये हा कार्यक्रम आयोजित होणार असल्याने मंडप टाकल्यास हवा खेळती राहण्यास समस्या निर्माण होईल, यामुळे तो निर्णय घेण्यात आला नाही. हवामान विभागामार्फत वर्तविण्यात आलेल्या तापमानाच्या अंदाजापेक्षा प्रत्यक्षात तापमान आणि आर्द्रता अधिक वाढल्याने समस्या निर्माण झाली. तथापि, आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती उद्भवल्यास त्यासाठी चार हजार खाटांची व्यवस्था ठेवण्यात आली होती असे श्री.मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

दुर्घटना घडल्यानंतर शासनामार्फत जिल्हाधिकारी, तहसीलदार घटनास्थळी गेले होते. मृत्यू झालेल्या 14 व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनामार्फत प्रत्येकी पाच लाख रूपयांचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून एक विशेष बाब म्हणून करण्यात आल्याचे मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले. धर्माधिकारी कुटुंबियांकडून देखील प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत केल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत करार करण्यात आलेल्या कंपनीने करारानुसार काम केले किंवा नाही याचा खुलासा तपासणी अहवालानंतर होईल असे ते म्हणाले. भविष्यात अशी दुर्घटना घडू नये यासाठी शासन दक्षता घेत आहे. लोकप्रतिनिधींनी याबाबत सूचना केल्यास त्यांचाही विचार केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सदस्य सर्वश्री कपिल पाटील, शशिकांत शिंदे, ॲड.अनिल परब यांनी सहभाग घेतला.

00000

ऊर्जा क्षेत्रात जर्मनीशी सहकार्य वाढवणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि 21:- पर्यावरणपूरक आणि पर्यावरणसंवर्धक ऊर्जा ही काळाची गरज बनली असून या पार्श्वभूमीवर ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात जर्मनीशी सहकार्य वाढवणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जर्मन व्हाईस चान्सलर डॉ रॉबर्ट हॅबेक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उद्योग, व्यापार, आर्थिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्य यासंदर्भात चर्चा झाली.

यावेळी जर्मनीचे राजदूत डॉ फिलिप अॅकरमन, कौन्सुल जनरल अॅकिम फॅबिग,  राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, संचालक पी अन्बलगन, उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी तसेच 20 जर्मन कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जर्मनीतील माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र आणि जर्मनी यांच्यात ऊर्जा क्षेत्रात असलेले सहकार्य स्थैर्य देणारे ठरले आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणावर जर्मन कंपन्या आहेत. अर्थव्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी हे सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. उद्योग आणि इतर क्षेत्रातही राज्य अग्रेसर आहे.

देश आणि राज्य झपाट्याने विकसित होत आहे. राज्याची अर्थव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी रोड मॅप तयार करण्यात आला आहे. स्पीड ऑफ डेटा आणि स्पीड ऑफ ट्रॅव्हल यापुढील काळात महत्त्चाचे ठरणार असून या दोन्ही क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे. तसेच स्टार्ट अप आणि युनिकॉर्न मध्येही महाराष्ट्र अग्रेसर आहे. ग्रीन हायड्रोजन पॉलिसी, सौर कृषी वाहिनी यासारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प व धोरणे राज्यात राबविण्यात येत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक पद्धतीवर सुरू असून चार्जिंग सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

जर्मन व्हाईस चान्सलर डॉ. रॉबर्ट हॅबेक म्हणाले, उद्योग आणि आर्थिक क्षेत्रासह अनेक क्षेत्रांत सहकार्याच्या मोठ्या संधी आहेत. शैक्षणिक क्षेत्रातही दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आदानप्रदान होत असल्याचे डॉ. हॅबेक यांनी सांगितले.

000

मराठी भाषेच्या सौंदर्याचे मनोहारी दर्शन:’शृंगार मराठीचा’

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेतर्फे कवयित्री संगीता झिंजुरके यांचा सत्कार
पुणे : “बंधुतेचा परिसस्पर्श लाभलेल्या प्रतिभावंत कवयित्री संगीता झिंजुरके यांची ‘शृंगार मराठीचा’ ही काव्यरचना मराठी भाषेच्या अलौकिक सौंदर्याचे मनोहारी दर्शन घडवते. शब्दालंकाराची गुंफण असलेली ही रचना रसिकांच्या मनाला स्पर्शून जाते. विद्यापीठाच्या मराठी पुस्तकात या कवितेचा समावेश होणे हा त्यांच्या प्रतिभेचा सन्मान आहे,” अशी भावना बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठीच्या पुस्तकात झिंजुरके यांच्या ‘शृंगार मराठीचा’ ही कविता समाविष्ट झाल्याबद्दल त्यांचा सत्कार, तसेच कवितेवर चर्चासत्राचे आयोजिले होते. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रितम प्रकाश महाविद्यालय भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. यावेळी भगवान महावीर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, बंधुता परिषदेचे सचिव प्रा. शंकर आथरे, डॉ. बंडोपंत कांबळे, पत्रकार पीतांबर लोहार, प्रा. पांडुरंग भास्कर, प्राचार्य सदाशिव कांबळे आदी उपस्थित होते.

प्रकाश रोकडे म्हणाले, “प्रत्येक नाते जपत योग्य शिक्षण आणि संस्कार यातून आपले आयुष्य घडते. आपण नात्यावर प्रेम करतो; तसेच आपल्या भाषेवरही प्रेम करणे गरजेचे आहे. त्यातूनच आपली भाषा अधिक समृद्ध होईल. मराठी भाषेच्या सौंदर्याची व्याप्ती अधोरेखित करणारी ही कविता मनामनात, घराघरात पोहोचली पाहिजे.”

डॉ. अशोककुमार पगारिया म्हणाले, “प्रतिभाशक्ती आणि सौंदर्यदृष्टी याचा संगम साधणारी ही कविता आहे. मराठी भाषेच्या सौंदर्याचा उलगडा समर्पक शब्दांत केला आहे. कल्पना शक्ती आणि विरामचिन्हाच्या अलंकाराने मराठी भाषेला सौंदर्याचा साज दिला आहे. त्यांच्या काव्य प्रतिभेची दखल घेतल्याचा विशेष आनंद आहे.”

संगीता झिंजुरके म्हणाल्या, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात माझ्या कवितेचा समावेश होणे हा खूप मोठा सन्मान आहे. विविध टप्प्यावर मला सहकार्य करणाऱ्यांना हा सन्मान समर्पित करते. बंधुतेच्या परिवारात माझी कविता बहरत, फुलत आणि निखळ झऱ्यासारखी वाहत गेली. बंधुतेच्या परिसस्पर्शाने माझ्या कवितेचे आणि माझ्या आयुष्याचे सोने झाले आहे.”
प्राचार्य सदाशिव कांबळे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. डॉ. विजय निकम यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. पांडुरंग भास्कर यांनी आभार मानले.

कोविड सेंटरमध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही, हा उद्धव ठाकरेंच्या कामाला डाग लावण्याचा प्रयत्न – खासदार संजय राऊत

मुंबई-

कोरोनाच्या वेळी उद्धव ठाकरेंनी उत्तम काम केले आहे. त्या काळात कोविड सेंटरमध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही. मात्र, ठाकरेंनी कोरोना काळात केलेल्या कामाला डाग लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. आगामी महानगर पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे केले जात असल्याचा आरोप देखील खासदार राऊत यांनी केला.

खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधल पंतप्रधान नरेंद्र मादी आणि भारतीज जनता पक्षावर निशाणा साधला. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी उत्तम काम केले आहे. मात्र, मुंबई महानगर पालिका निवडणुकीत त्यांना याचा फायदा होऊ नये, यासाठी त्यांच्या कामावर डाग लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे संजय राऊत म्हणाले.

अजित पवार मुख्यमंत्री होणार
अजित पवार लवकारात लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा पुन्हा एकदा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. शिंदे गटाने हे सत्य स्वीकारले पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी दिला. अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाबाबतचे बॅनर लागले आहेत, या संदर्भात ते माध्यमांशी बोलत होते.

इरशाळवाडी दुर्घटनेतील बाधितांचे कायमचे पुनर्वसन करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अजूनही 100 हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

अलिबाग :-रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडीवर दरड कोसळून 25 घरे ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 ग्रामस्थांचे मृतदेह सापडले आहेत. तर, 98 जणांना वाचवण्यात यश आले आहे. गुरुवारी (ता. 20) संध्याकाळी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. त्यामुळे बचावकार्य थांबवण्यात आले होतं. आज सकाळी 6.30 वाजता हे बचावकार्य पुन्हा सुरु करण्यात आले आहे.खालापूरजवळील दुर्गम इरशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इरशाळवाडी या छोट्याशा वस्तीवर बुधवारी रात्रीदरड कोसळली. या वाडीतील 48 पैकी 40 घरांवर ही दरड कोसळली. त्यात गाढ झोपेत असलेले 200 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. एनडीआरएफ टीम, पोलिस, नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका यांच्या टीम बचावासाठी पहाटे पहाटे घटनास्थळी पोचल्या. पण घरावर वीस फूट मलबा असल्याने बचावकार्य करता येत नव्हते. एनडीआरएफच्या चार टीमने युद्धपातळीवर प्रयत्न करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 98 जणांचे प्राण वाचवले. मात्र या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह हाती लागले आहेत, तर अजून 100 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असलेले बचावकार्य नंतर अंधार पडल्याने थांबवावे लागले. आज शुक्रवारी सकाळी 6 वाजेपासून हे बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आले.

 बचाव कार्य करणे व वाचलेल्या व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवणे यास प्राधान्य दिले जात असून नियोजन झाले आहे. कायमचे पुनर्वसन करण्यासंदर्भात देखील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इरशाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याला मार्गदर्शन व गती देण्याचे काम त्यांनी केले.

बचाव कार्यात येणाऱ्या अडथळ्यांबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सतत पाऊस होत असल्याने मदत कार्यात अडथळे येत आहेत. अवजड यंत्रसामुग्री व अवजारे पोहोचण्यात अडचणी येत आहेत.  दोन हेलिकॉप्टर तैनात केले होते, परंतु ते खराब हवामानामुळे येथे पोहोचू शकलेले नाहीत, असे यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन येथे रात्रीपासून उपस्थित असून अधिकारी, रेस्क्यू टीम ही यांच्या संपर्कात रात्रीपासून होती, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले .

ते म्हणाले, बचाव कार्य करताना  स्वतःचे जीव धोक्यात घालून या ठिकाणी काम करत आहेत.  इथे मदत आणि बचावकार्य अवघड आहे, यात सहभागी स्वयंसेवी संस्थांचे त्यांनी यावेळी आभार मानले. तरीसुद्धा पाऊस असताना जे लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत त्यांना बाहेर सुरक्षित काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

भविष्यात इरशाळवाडी सारख्या दुर्घटना टाळण्यासाठीअत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 20 :- रायगड जिल्ह्यातल्या इरशाळवाडीवर (ता. खालापूर) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेच्या सभागृहात निवेदनाद्वारे दिली.

‘एनडीआरएफ’च्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या पथकासह स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्यामदतीने मदत व बचाव कार्य वेगाने सुरु आहे. दुर्घटनास्थळ दुर्गम असल्याने मदत आणि बचाव कार्यासाठी आवश्यक असणारी जेसीबीसारख्या मशनरी पोहोचविण्यासाठी हॅलिकॉप्टरची आवश्यकता असून, दोन हॅलिकॉप्टर तयार ठेवण्यात आले आहेत. मात्र, खराब हवामानामुळे हवाई आणि यांत्रिक मदतीसाठी मर्यादा येत आहेत. त्यामुळे मनुष्यबळाकडूनच मदत व बचाव कार्य करावे लागत आहे. राज्य शासन प्रत्येक बाबींवर बारकाईने नजर ठेऊन आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे, तर जखमींवर शासनाच्यावतीने मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,  रायगड जिल्ह्यातल्या मौजे चौक-मानिवली (ता. खालापूर) या महसूली गावाच्या हद्दीतील इरशाळवाडी या आदिवासी बांधवांच्या वस्तीवर दरड कोसळल्याची घटना दि. 19 जुलै 2023 रोजी रात्री घडली. या दुर्घटनेत इरशाळवाडी या गावातली घरे मातीच्या ढिगाऱ्या खाली गेली आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळं आणि दुर्घटना घडलेले ठिकाण दुर्गम भागात असल्यानं त्याठिकाणी संपर्क साधतानासुद्धा अनेक अडथळे येत होते.

एनडीआरएफ पथकाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाच्या मदतीला यशवंती हाइकर्स, निसर्ग ग्रुप पनवेल या स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, मौजे चौक आणि मौजे वरोसे येथील ग्रामस्थ, विविध विभागाचे शासकीय कर्मचाऱ्यांसह पाचशेहून अधिक मजूरांचा सहभाग आहे. इरशाळवाडीच्या पायथ्याला वैद्यकीय पथके, अॅम्ब्युलन्ससह आवश्यक अशा वैद्यकीय सुविधा व इतर साहित्य तात्काळ उपलब्ध करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सकाळीच घटनास्थळी रवाना झाले आहेत. प्रत्यक्ष घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह स्थानिक आमदार महेश बालदी तर रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, मंत्री दादाजी भुसे, मंत्री आदिती तटकरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. सकाळपासूनच मंत्रालयातल्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून मी स्वत: सर्व बाबींवर लक्ष ठेऊन आहे.

इरशाळवाडीमध्ये एकुण 48 कुटुंब आहेत, तेथील लोकसंख्या 228 असली तरी अनेक लोक नोकरीच्या आणि रोजगाराच्या निमित्ताने बाहेर गावी असतात त्यामुळे दुर्घटनेच्यावेळी नक्की किती लोक गावात होते हे समजू शकत नाही. इरशाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण (जीएसआय) विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडप्रवण ठिकाणाच्या यादीत नव्हते. तसेच या ठिकाणी यापुर्वी दरड कोसळणे, भूस्खलन होणे अशा प्रकारच्या घटना घडलेल्या नव्हत्या. खालापूर तालुक्यात  दि.17 जुलै दि.19 जुलै 2023 या तीन दिवसात एकुण 499 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. दुर्घटना घडलेले ठिकाण हे अत्यंत दुर्गम भागात असून, सद्यःस्थितीत घटनास्थळाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने बचावकार्यात अडथळा येत असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवेदनाद्वारे सांगितले.

धारावी: मानवी चेहऱ्याचे पुनर्निर्माण (लेखक-गौतम अदाणी)

माजी जागतिक हेवी वेट मुष्टियुद्ध विजेता माईक टायसन याने आपल्या बकेट लिस्ट मध्ये भारतातील ताजमहाल आणि धारावी हि दोन ठिकाणे असल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते.

माझी धारावीची पहिली ओळख ही  १९७० च्या दशकाच्या अखेरीस झाली. त्यावेळी मी मुंबईत नवीनच दाखल झालो होतो आणि मी मुंबईत एक अनाम युवक होतो, ज्याला या शहरातील संधींनी आणि हिरा व्यापारात आपले नशीब आजमावून पाहण्याच्या ओढीने खेचून आणले होते. त्यावेळी सुद्धा धारावी अनेक धर्म, संस्कृती, भाषा यांचा मिलाफ घडवणारे केंद्र होते, जिथे भारतातील कानाकोपऱ्यातून पोटापाण्याच्या उद्दोगासाठी आली होती. त्यावेळी मी धारावीतील औद्योगिक  कोलाहलाने मंत्रमुग्ध झालो होतो. धारावीच्या गल्ल्यातून भारतात बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक भाषेचे प्रतिध्वनी सारख्याच त्रीव्रतेने ऐकू येत असत पण या साऱ्या कोलाहलाहि स्वतःची अशी एक लय होती.  मला त्या लयीची व्याख्या करता आली नाही, पण तिचे अस्तिस्त्व मला प्रखर पणे जाणवले होते. 

धारावीची भेट हि एकाच एकाच वेळी विनम्र आणि अस्वस्थ करणारा अनुभव होता. धारावीतील लोकांचा रोजचा जगण्याचा संघर्ष पण त्याचवेळी आलेल्या परिस्थितीला शांतपणे आणि आनंदाने सामोरे जाण्याच्या वृत्तीने मला प्रेरित केले पण त्याचवेळी माझ्या मनात एक प्रश्न घर करून बसला, कधीतरी इथल्या लोकांची परिस्थिती बदलेल का?

आजही हा प्रश्न मला सतावत असतो.  मुंबई विमानतळावर  जेंव्हा जेंव्हा मी मुंबईत विमानातून उतरतो तेंव्हा धारावी एखाद्या  मानवी  गोधडी सारखी भासते.  या दर्शनाने  एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे भिन्न पार्श्वभूमीच्या स्थलांतरितांना उदारपणे सामावून घेण्याची मुंबईची क्षमता पण त्याचवेळी धारावी या गोष्टीची ही आठवण करून देते कि या वस्तीत राहणारे लोक अजूनही आपल्या पुनर्वसनाची वाट पाहत आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर जेंव्हा धारावीच्या पुन्नराजीवनाची संधी चालून आली त्यावेळी मी ती दोन्ही हातानी घट्ट पकडली. मला काहीही करून हि संधी हातातून जाऊ द्याची नव्हती आणि या अतिउत्साहात आम्ही जी बोली लावली ती दुसऱ्या बोलीपेक्षा २.५ पट अधिक होती. कदाचित या साऱ्याचा संबंध मुंबईच्या पहिल्या दर्शनाने माझ्यावर जी अमीट अशी छाप सोडली याच्याशी असावा. 

आता मात्र एक नवीन अभिनास्पद आणि उद्देशपूर्ण सुरवात होत आहे. हि एक नवीन धारावी निर्माण करण्याची संधी आहे जी सर्वसमावेशक असेल आणि त्याच बरोबर इथल्या रहिवाश्याना सन्मान आणि सुरक्षा पुरवेल. 

आम्ही अशा एका प्रवासाला सुरवात करत आहोत कि जो आज पर्यंतच्या इतिहासात कोणीच हाती घेतलेला नाही, मला या प्रवासातील पर्वतावेढ्या आव्हानांची कल्पना आहे. आपण जरी सिंगापूरने  घरांचे संकट सोडवण्यासाठी १९६० च्या दशकात जो पथदर्शी प्रकल्प हाती घेतला होता त्याच्याशी जरी आपण तुलना केली तरी, धारावी प्रकल्प हा तीन कारणांसाठी एक आगळावेगळा प्रकल्प आहे.

सर्वप्रथम हा जगातील सर्वात मोठा शहरी पुनर्वसन आणि पुनरुत्थानचा प्रकल्प आहे. जवळपास १० लाख लोकांचे या प्रकल्पांतर्गत पुनर्वसन होणार आहे.

धारावी प्रकल्पात फक्त रहिवास्यांचेच पुनर्वसन होणार आहे असे नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि विभिन्न आकाराच्या औद्योगिक आणि व्यापारी संस्थांच्या पुनर्वसनाचा हि यात समावेश आहे. आणि या सर्वांचे सुयोग्य पुनर्वसनसाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे यात दोन्ही पात्र आणि अपात्र गाळेधारकांचे समग्र आणि सर्वसमववेषक पुनर्वसन या प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहे  

माझ्या मनात धारावी पुनर्विकासाच्या संदर्भात कोणत्याही साचेबद्ध कल्पना वा धारणा नाहीत. मात्र माझ्याकडे आहे ती धारावीकरांचे आयुष्य बदलण्याची सदिच्छा आणि हा प्रकल्प यशस्वी करण्याचा दृढ निश्चय. हे निशिचीत आहे धारावीच्या पुनर्निर्माण हे मानवी चेहऱ्याचे असेल. हा एक सर्वसमावेशक प्रकल्प असेल ज्यात जास्तीत जास्त लोकांच्या मतांचा समावेश पुनर्विकास धोरणात केला जाईल. आम्ही एक संस्थमक प्रक्रिया राबवू ज्यात आम्ही फक्त धारावीकरांशीच सल्लामसलत करू असे नाही तर सर्व बुद्धीमंत मुंबईकर ज्यांना या प्रकल्पाबद्दल आस्था आहे त्यांच्याशी सल्लामसलत करायला आम्ही तयार आहोत कारण आम्हाला असे वाटते कि धारावीच्या पुनर्निर्माणात  सर्वच मुंबईकरांचा सहभाग असला पाहिजे. धारावीच्या पुनर्निर्माणात मुंबईचे स्वतःचे असे एक जे चरित्र आहे त्याचे प्रतिबिंब पडलेले दिसेल. मुंबईचे चारित्र्य म्हणजे तिचे चैतन्य, हिम्मत, विविधतेतील एकात्मता, तिचे विविध रंग आणि निर्धार याचे दर्शन नव्या धारावीत होईल पण त्याचवेळी धारावीचा कालजयी  आत्मा हरवणार नाही याची ही आम्ही काळजी घेऊ. 

आम्ही असे एक शहर निर्माण करू इच्छीतो जे अत्याधुनिक असेल आणि ज्यात २१ व्या  शतकातील भारताचे प्रतिबिंब पडेल, असा भारत जो  पुनरुत्थानाच्या मार्गावर वेगाने मार्गक्रमणा करत आहे , असा भारत जो स्वतःबद्दल आश्वस्त आहे आणि असा भारत ज्याने जागतिक पातळीवर स्वतःचे स्थान निर्माण केले आहे कारण २१ वे शतक हे भारताचे आहे. 

सर्व पात्र गाळे धारकांना मी आश्वस्त करू इच्छीतो कि त्यांचे प्रकल्प निर्मितीच्या काळात कुठेही विस्थापन होणार नाही. त्यांना फक्त एकदाच त्यांच्या राहत्या घरातून बाहेर पडावे लागेल ते म्हणजे नवीन घरात प्रवेश करण्यासाठी. त्यांच्या नवीन घराची निर्मिती ही फक्त त्यांच्या डोळ्यासमोर होणार असे नाही तर त्या निर्मिती प्रक्रियेत त्यांना हि घरे कशी असावीत हे ठरवण्यात त्यांचा सहभाग असेल. सध्या त्यांच्या घरात ज्या सुविधांची वानवा आहे जसे कि गॅस, पाणी, वीज, स्वछता आणि सांडपाणी निर्मूलन, आरोग्य सुविधा, विरंगुळ्यासाठी सुविधा, आणि मोकळ्या जागा यांनी हि घरे युक्त असतील.  तसेच धारावीकरांना जागतिक दर्जाच्या शैक्षिणक आणि वैद्यकीय सुविधाही उपलब्द करून दिल्या जातील. अभावग्रस्ततेचे दिवस आता जाणार आणि एका नवीन धारावीचे निर्माण होणार जिच्या रहिवास्यांचा उर आम्ही धारावीचे रहिवासी आहोत हे सांगताना अभिमानाने भरून येईल.

रहिवास्यांच्या पुनर्वसनानंतर सर्वात मोठे आव्हान असेल ते इथल्या रोजगार निर्मिती केंद्रांचे पुनर्निर्माण. मला धारावीचा कायाकल्प एका आधुनिक  उद्दोग केंद्रात करायचे आहे ज्याद्वारे इथल्या सूक्ष्म आणि लघु उद्दोगांचे पुनर्वसन तर होईलच पण त्याच बरोबर धारावी हे नवीन युगातील रोजगाराचे केंद्र होईल आणि या उपक्रमाचे विशेष लक्ष्य हे महिला आणि युवक असतील. यासाठी बहुपेढी व्युव्हरचना अंमलात आणली जाईल आणि त्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि नगरी गट यांची मदत घेतली जाईल.  यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारली जातील ज्यांचा भर हा कौशल्य विकासावर असेल,  सामायिक सुविधा केंद्र उभारली जातील ज्यात सेवा आणि उत्पादन या दोन्ही क्षेत्रांचा समावेश असेल. तसेच संशोधन केंद्र, डेटा सेन्टर (विदा केंद्र) सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्द्योग सुविधा केंद्र यांचाही समावेश असेल. या पुनर्विकासाचा अजून एक महत्वपूर्ण घटक असेल तो म्हणजे ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स  वर आधारित एका संघटित आणि योजनाबद्ध बाजारपेठेचा विकास.

धारावी पुनर्विकासाचे प्रयत्न हे गेली अनेक वर्ष केली जात आहेत, याला  जवळपास ५० वर्षांचा इतिहास आहे परंतू यावेळी काही महत्वपूर्ण बदल निविदा प्रकियेत करण्यात आले आहेत जसे की अपात्र गाळेधारकांचे पुनर्वसन, रेल्वेच्या ४५ एकर जागेचा समावेश ज्यामुळे गाळेधारक जिथे राहतात तिथेच त्यांचे पुनर्वसन शक्य झाले आहे आणि यासर्वांमुळे धारावीचा विकास हा विनालंब सुरु होऊ शकतो.

मी याठिकाणी हे जरूर नमूद करू इच्छीतो  कि आज जे या प्रकल्पाला मूर्त स्वरूप येत आहे त्यासाठी  महाराष्ट्रातल्या सर्वच सरकारांनी प्रयत्न केले आणि बांधिलकी दाखवली आणि राज्यातल्या  सर्व राजकीय पक्षांचा  ही पाठिंबा मिळाला.  तसेच या सर्व प्रयत्नांना केंद्र सरकारची हि मोलाची साथ लाभली ज्यांनी या प्रकल्पासाठी रेल्वे ची जमीन उपलब्ध करून दिली. 

मी आणि माझे सहकारी याना या  प्रकल्पाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या हिमालय एवढ्या मोठ्या आव्हानांची कल्पना आहे. आकस्मीक परिस्थीला हाताळण्याची आमची क्षमता, कार्यक्षमता आणि प्रकल्प अंमलबजावणीचे आमचे कौशल्य याची कसोटी या प्रकल्पात लागणार आहे.  गेल्या काही वर्षात अदाणी समूहाने प्रश्नांची उत्तरे शोधणारी कार्यसंस्कृती विकसित केली आहे जिला आमच्या प्रेरित, अनुभवी आणि उत्साही टीमचा आधार आहे. मला विश्वास आहे कि सर्व भागधारकांच्या पाठिंब्याच्या बळावर आम्ही इतिहास घडवू आणि धारावी, मुंबई आणि भारताला गौरवास्पद कामगिरी करू.

आमचे हे कार्य पूर्ण झाल्यावर माईक टायसनने जर  धारावीला परत भेट दिली तर ती त्याला ओळखू येणार नाही पण त्याला हे पण दिसून येईल कि धारावीचा आत्मा ह्या पुनर्निर्माणच्या प्रक्रियेत हरवलेला नाही आहे. मला हा ही विश्वास आहे की दैवकृपेने, डॅनी बॉयल सारख्याना धारावीत अनेक मिलेनियर सापडतील पण त्यांच्यामागे स्लमडॉग हि उपाधी नसेल.   

(लेखक हे अदाणी समूहाचे अध्यक्ष आहेत)

खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान अनुयायांच्या मृत्यू प्रकरणी गठित समितीला मुदतवाढ – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. २० : नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा शासकीय यंत्रणेने पूर्णतः नियोजन करून आयोजित केला होता. या पुरस्कार प्रदान सोहळ्या दरम्यान अनुयायांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांची एक सदस्य समिती गठित करण्यात  आली आहे. या समितीला मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली.

नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात उष्माघाताने नागरिकांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी विधानसभा सदस्य सुनिल प्रभू, जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्या दरम्यान १४ श्री अनुयायांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी  समिती गठीत केली होती. या समितीच्या विनंती वरून  समितीला दि.१३ जुलै, २०२३  च्या शासन निर्णयानुसार एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.

या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याची कार्यवाही एक सदस्य समितीमार्फत सुरू आहे. मृत्यू झालेल्या १४ व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख याप्रमाणे ७० लाख रूपये इतके अर्थसाह्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक विशेष बाब म्हणून करण्यात आले आहे, अशीही माहिती मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

ग्रंथालय चळवळ अत्यंत गरजेची -विजय कोलते

पुणे-नवीन पिढीला घडवण्यासाठी त्यांना काय द्यायचे असेल तर त्यासाठी सेवाभावी वृत्तीने ग्रंथालय चालवली पाहिजेत ग्रंथालय चळवळ अत्यंत गरजेचे असून त्यासाठी समाजाचा सहभाग वाढवून ग्रंथालय चालवावी असे प्रतिपादन पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजय कोलते यांनी केले पुणे येथील शिक्षक भवनाच्या सभागृहात पुणे जिल्हा ग्रंथालय संघ पुणे पिंपरी चिंचवड हवेली व मुळशी तालुका ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन महिला व डिजिटल वाचन दिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध प्रवीण मसालेवाले ट्रस्ट यांच्या उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय हुकमीचंद चोरडिया यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ ट्रस्ट च्या वतीने जिल्ह्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालयांना ग्रंथ संच प्रदान करण्यात आले या सोहळ्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते ग्रंथालयासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले वाचनासाठी प्रेरणा देण्याचे काम ग्रंथालय करतात त्यामुळे केवळ वाचन प्रेरणा दिन साजरा न करता रोज वाचन केले पाहिजे असे असे प्रतिपादन प्रवीण मसालेवाले ट्रस्टचे समन्वयक पोपटराव काळे यांनी सदर प्रसंगी केले यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले म्हणाल्या यापुढे सर्व ग्रंथालय ऑनलाइन होणार असून प्रत्येक ग्रंथालयाने त्वरित आपले ई-मेल आयडी बनवून त्याचे व्हेरिफिकेशन करून घ्यावे अन्यथा अनुदानाचा पहिला हप्ता मिळणार नाही असा शासन निर्णय आहे अधिक मास हा पुरुषोत्तम असून या पवित्र महिन्यात प्रवीण मसालेवाले यांनी राबवलेले या ग्रंथदान उपक्रमाचे कौतुक करून वाचन संस्कृती वृद्धिंगत होईल असे मत त्यांनी व्यक्त केले पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे मुख्य कार्यवाह सोपानराव पवार मला लय प्रवीण मसालेवाले ट्रस्टच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात हा ग्रंथदान उपक्रम राबविण्यात आला ग्रामीण भागा त याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला पुढील काळाचे हे ग्रंथालयांना मदत करेल त्यासाठी प्रथम बंद पडलेली ग्रंथालय चालू करून कार्य अन्वयेत करावी सर्व ग्रंथालयांना पुणे जिल्हा संघाचे सदस्य व्हावे शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे अक्षांश रेखांश करून ईमेल आयडी अद्यावत करावे यावेळी पुणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले प्रवीण मसाले ट्रस्टचे समन्वयक पोपटराव काळे प्रमोद ढगे पुणे जिल्हा ग्रंथालय संघ पुणे अध्यक्ष विजय कोलते प्रमुख कार्यवाहक सोपानराव पवार सहकार्य वाह राजेंद्र ढमाले विलास चोंधे उपाध्यक्ष मार्कंडेय मीठापल्ली राजू घाटोळे कोषाध्यक्ष संतोष गोपने संचालक अरुण दांगट रमेश सुतार हनुमंत देवकर ग्रंथालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते शंकर गावाने यांनी सूत्रसंचालन केले

देश, धर्म, परमेश्वराप्रती माणसाने समर्पित असायला हवे -कीर्तनकार ह.भ.प.संजय महाराज पाचपोर

पुणे : आपण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत कबीर, संत चोखामेळा यांना का विसरत नाही? आपण आपल्याला का विसरतो? याचे कारण, जी माणसे आपल्याच रक्ताचा विचार करतात, त्यांचे रक्त एक दिवस त्यांनाच विसरल्याशिवाय रहात नाही. जी माणसे देश, धर्म, परमार्थ, गरीबाचा विचार करतात, आज हजार वर्ष झाली तरी लोक त्यांना विसरायला तयार नाहीत. त्यामुळे माणसाने देश, धर्म, परमेश्वरासाठी समर्पित असायला हवे. समर्पणाशिवाय आपण टिकू शकणार नाही, असे नागपूरचे ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.संजय महाराज पाचपोर यांनी सांगितले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल ३५ वर्षांहून अधिक काळ ट्रस्टतर्फे हा कार्यक्रम सुरु आहे. कीर्तनमालेत नागपूरचे ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.संजय महाराज पाचपोर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, टाळवादक माऊली टाकळकर, ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संजय महाराज पाचपोर म्हणाले, ज्या ठिकाणी गरज असेल, त्याठिकाणी धार्मिकता पोहोचली पाहिजे. ज्याला आधार नसेल, त्यांना आधार देण्याचे काम या देशातील धार्मिकतेने केले पाहिजे. ज्याला गरज असेल, त्यालाच दान द्यायला हवे. ज्याला गरज नाही, त्याला दान मिळाले तर तो व्यक्ती विलासी होईल. त्यामुळे अनाथ, गरीब, रुग्ण, गोशाळेपर्यंत पोहोचणा-या महाराष्ट्रात अनेक विश्वस्त संस्था आहेत. त्यामध्ये धार्मिकतेसोबत उत्तम सामाजिक कार्य दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट कार्य करीत आहे. त्याचे अनुकरण सर्वांनी करायला हवे.

पालिकेने शुल्क वेळेत न दिल्याने डायलिसिस सेवेवर परिणाम ,केंद्र बंद करण्याची अथवा करार रद्द करण्याची आवश्यकता नाही : लायन्स क्लब

पुणे :पालिकेकडून शुल्क वेळेत येत नसल्यानेच डायलिसिस सेवेवर परिणाम होत असून कमला नेहरू रुग्णालयातील डायलिसिस सेवा केंद्रबंद करण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्टीकरण लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टने दिले आहे.लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामदास पन्हाळे यांनी आज पत्रकाद्वारे संस्थेची बाजू मांडली आहे.

५, ६ महिन्यांची देयके प्रलंबित राहत होती.क्लबने शुल्कांच्या देयकांबाबत वारंवार आरोग्य विभागाशी संपर्क साधलेला आहे. तरीही दखल घेतली जात नव्हती.थकीत बिले आल्याबरोबर योग्य ती पावले उचलून सेंटर पूर्ववत करण्यात आले आहे व तसे महानगरपालिकेला कळविण्यात आले आहे.

सेवा पूर्ववत झाल्याने रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा तसेच महानगर पालिकेनेही या योजनेअंतर्गत येणारे रुग्ण पाठवावे अशी विनंती संस्थेतर्फे करण्यात आली आहे.२०१६ पासून हे केंद्र पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत पालिकेसमवेत स्वयंसेवी संस्था या नात्याने चालवले जाते. शहरी गरीब योजनेअंतर्गत रुग्ण येथे डायलिसिस सेवा घ्यायला येतात. त्याचे शुल्काची देयके पालिका नंतर लायन्स क्लबला देते. रुग्णांकडून हे केंद्र पैसे घेत नाही. त्यामुळे पालिकेकडून येणारे पैसे लांबले की सेवेवर परिणाम होण्याची शक्यता वाढते.

जी मशिन्स काही तांत्रिक कारणाने बंद होती ती सुद्धा चालु केलेली आहे. आताही ६ मशिन्स चालु असून दरमहा ४५० पेक्षा जास्त डायलिसिस सेशन करण्याची केंद्राची क्षमता आहे. पुढील १५ दिवसात उर्वरित मशिन्स चालू होऊन ही क्षमता ८५० पेक्षा जास्त होत आहे. मात्र, कोविड पश्चात दरमहा ३५० देखील डायलिसिस सेशन होत नाहीत. त्यामुळे सर्व डायलिसिस यंत्रे वापरली जात नाहीत. तशी आवश्यकता भासत नाही.या प्रकल्पातील डायलिसिस यंत्रे व संबंधित यंत्रणा लायन्स क्लबने उभी केली आहे.

कमला नेहरू रुणालयातील डायलिसिस सेंटर बंद ठेवल्याप्रकरणी लायन्स क्लबला महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या सेंटरमधील १२ डायलिसिस मशिनपैकी १० बंद आहेत. केवळ दोन मशीन सुरू असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे, असे पालिकेने बजावलेल्या नोटीशीत म्हटले होते.

गेल्या चार-पाच महिन्यांपासून प्रलंबित असलेले पेमेंट फक्त दोन आठवड्यांपूर्वी करण्यात आले आहे. आमचा करार रद्द करण्याची गरज नाही. कारण, थकीत बिले आल्याबरोबर योग्य ती पावले उचलून सेंटर पूर्ववत करण्यात आले आहे व तसे महानगरपालिकेला कळविण्यात आले आहे.

सेवा पूर्ववत झाल्याने रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा तसेच महानगर पालिकेनेही या योजनेअंतर्गत येणारे रुग्ण पाठवावे अशी विनंती संस्थेतर्फे करण्यात आली आहे.

या सेंटर मधील तीन मशीन वगळता सर्व पायाभूत सुविधा पूर्णपणे लायन्स क्लब ऑफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीच्या आहेत,’ असे लायन्स क्लब ऑफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामदास पन्हाळे यांनी म्हटले आहे.

दरड कोसळून शेकडो लोक रस्त्यावर आले असताना वाढदिवसाच्या पार्ट्या कशा करता ? : नाना पटोले

दरडी कोसळून दुर्घटना होण्याची सरकार वाट पहात असते का ?

माधवराव गाडगीळ समितीची अंमलबजावणी आजपर्यंत का झाली नाही?

मुंबई, दि. २० जुलै
रायगडमधील इरसाळवाडीत दरड कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. अशा घटना घडल्यानंतर सरकार जागे होते व उपाय योजनांच्या घोषणा करते पण अशा घटना घडू नयेत म्हणून आधीच काही उपयायोजना का केल्या जात नाहीत. कोकणात याआधीही अशा दुर्घटना घडल्या पण त्यातून बोध काहीच घेतलेला दिसत नाही. इरसाळवाडी दुर्घटनेने राज्यावर शोककळा पसरली आहे, शेकडो लोकांची कुटुंबं रस्त्यावर आली आहेत आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या पार्ट्या झोडल्या जात आहेत, एवढे आपण असंवेदनशील कसे? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

इरसाळवाडी दरड दुर्घटनेवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सत्ताधाऱ्यांमध्ये जरा तरी संवेदना उरल्या आहेत का? समृद्धी महामार्गावर अपघात होऊन २६ लोक मृत्यूमुखी पडलेले असताना हेच सत्ताधारी दुसऱ्याचा पक्ष फोडून राजभवनवर थाटात शपथविधी सोहळा करत होते आणि आता इरसाळवाडी येथे गरिब, नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असताना वाढदिवसाच्या पार्ट्या करत आहेत. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सगळी लाजलज्जा सोडून दिली आहे का? विरोधी पक्ष या नैसर्गिक अपघाताचे राजकारण करत नाही पण सत्ताधारी पक्षाला जनाची नाही तर मनाची तरी असायला हवी, पण या लोकांनी सर्वच सोडून दिली आहे. लोक मत्युमुखी पडले आहेत, अनेक जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. ज्या घरातील लोक मरण पावले त्यांचे डोळे पुसण्याचे, त्यांना आधार देण्याचे काम सरकारने केले पाहिजे पण हे सरकारच उफराट्या काळजाचे आहे, असा संताप पटोले यांनी व्यक्त केला.
डॉ. मनमोहनसिंह सरकार असताना पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी माधवराव गाडगीळ समिती स्थापन केली होती. माधवराव गाडगीळ समितीने दिलेल्या अहवालाचा विचार झाला पाहिजे होता, त्याची अंमलबजावणी व्हायला हवी होती पण ती झालेली नाही. सरकार तज्ञांची समिती गठीत करते त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केला जातो पण त्याची अंमलबजावणी केली जात नाही. इरसाळवाडी सारख्या घटनांमधून आपण काही बोध घेतला पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही हे दुर्दैवी आहे, असेही पटोले म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रायगडच्या खालापूर तालुक्यातील इरसाळवाडी दुर्घटना स्थळाला भेट देऊन माहिती घेतली व मदत कार्याची पाहणीही केली.

अनुसूचित जातीच्या युवक –युवतींच्या कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी बार्टी आणि आयजीटीआरमध्ये सामंजस्य करार

पुणे, दि.२०: राज्यातील अनुसूचित जातीच्या एक हजार उमेदवारांना दरवर्षी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योग तंत्रज्ञान केंद्र, इंडो जर्मन टूल रूम (आयजीटीआर) औरंगाबाद यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार व आयजीटीआरचे महाव्यवस्थापक आर.डी.पाटील यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. उपजिल्हाधिकारी तथा बार्टी कौशल्य विकास विभागाचे विभाग प्रमुख अनिल कारंडे, आयजीटीआरचे कौशल्य विकास वरिष्ठ प्रशिक्षण व्यवस्थापक जे.डी.बागुल, बार्टीचे प्रकल्प व्यवस्थापक महेश गवई, आयजीटीआरच्या पुणे प्रकल्प अधिकारी मेघा सौंदणकर आदी यावेळी उपस्थितीत होते.

राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांमधील कौशल्य विकास, त्यांना तांत्रिक ज्ञान देऊन कौशल्याच्यादृष्टीने सक्षम करणे, त्यांची रोजगारक्षमता वाढविणे आणि उद्योजकतेला चालना देणे हा या कराराचा उद्देश आहे. या भागीदारीद्वारे बार्टी व आयजीटीआर संयुक्तपणे अनुसूचित जाती समुदायाच्या गरजा आणि आकांक्षेनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांना सी.एन.सी टर्निंग, टूल ॲन्ड डायमेकिंग, मशिन मेंटेनन्स, वेल्डिंग, कॅड/कॅम आदी विषयाचे ६ ते १२ महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

बार्टीच्या निबंधक श्रीमती अस्वार यांनी या सामंजस्य कराराबद्दल आनंद व्यक्त करुन राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांच्या सक्षमीकरण्याच्या दिशेने हे एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगितले.

आयजीटीआरचे महाव्यवस्थापक श्री. पाटील म्हणाले, अनुसूचित जातीच्या उमेदवारांना तांत्रिक प्रशिक्षण आणि नोकरीसाठी सहाय्यता प्रदान करण्यासाठी बार्टीसोबत भागीदारी करण्यात आली आहे. उमेदवारांना दर्जेदार कौशल्य विकास प्रशिक्षण आणि चांगल्या भविष्यासाठी नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी दोन्ही संस्था कायम प्रयत्नशील राहतील.

कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये उमेदवारांच्या नावनोंदणीसाठी जाहिरात आणि नोंदणी प्रक्रिया ऑगस्ट २०२३ मध्ये सुरू करण्यात येईल. नाव नोंदणी प्रक्रिया आणि कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी, इच्छुक उमेदवारांनी https://barti.in व https://www.igtr-aur.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

सुनिल वारे, महासंचालक, बार्टी: बार्टी आणि आयजीटीआर यामध्ये झालेला सामंजस्य करार राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी कौशल्य विकास आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे. अनुसूचित जातीतील अधिकाधिक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेऊन रोजगारक्षम व्हावे.