Home Blog Page 1435

शहर काँग्रेसच्या वतीने मणिपूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन.

पुणे- शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज तुळशीबाग, जिलब्या गणपती जवळ कुकी व मैतयी या दोन समुदायातील संघर्षानंतर मणिपूरमध्ये कुकी समाजाच्या महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या विरोधात भरपावसात तीव्र आंदोलन करण्यात आहे. यावेळी केंद्र सरकार व मणिपूर सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी अक्षरश: महिला व पुरूष कार्यकर्ते पावसात रोडवर बसून आपला रोष व्यक्त करीत होते. यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘सदर घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी असून या घटनेने संपूर्ण भारताची मान शरमेने खाली गेली आहे. सदर घटनेच्या निषेधार्थ केवळ छत्तीस सेंकद आपले मौन सोडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही शेलक्या शब्दात शहराध्यक्षांनी आपला निषेध व्यक्त केला तसेच गेल्या अडिच महिन्यांपासून मणिपूर मधील दंगल थांबवू न शकलेल्या मणिपूरचे मुख्यमंत्री एन विरेन सिंह यांनी सदर घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारून त्वरीत राजीनामा द्यावा व देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्रम या आदीवासी समुदायाच्या असताना देखील आदीवासींवर जर देशात अन्याय होत असेल तर त्यांनी सदर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी तीव्र मागणी यावेळी करण्यात आली.’’

     यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, दिप्ती चवधरी, कमल व्यवहारे, अजित दरेकर, संगीता तिवारी, गोपाळ तिवारी, लता राजगुरू, रफिक शेख, नीता रजपूत, रजनी त्रिभुवन, सुजित यादव, सुनिल शिंदे, हनुमंत पवार, अक्षय माने, संतोष पाटोळे, हेमंत राजभोज, बळिराम डोळे, रविंद्र माझीरे, अजित जाधव, विशाल जाधव, राजेंद्र शिरसाट, बाळासाहेब अमराळे, रमेश सोनकांबळे, राजेंद्र भुतडा, राजश्री अडसूळ, सिमा महाडिक, सुंदरा ओव्हाळ, वैशाली रेड्डी, ज्योती चंदवेल, प्रियंका रणपिसे, छाया जाधव, मनिषा ओव्हाळ, रजिया बल्लारी, प्रदिप परदेशी, सतिश पवार, सचिन आडेकर, द. स. पोळेकर, अनिल पवार, भरत सुराणा, दिपक ओव्हाळ, अनिल अहिर, गुलाम खान, राहुल शिरसाट, शिलार रतनगिरी, अमित गोरे, विठ्ठल गायकवाड, स्वप्निल नाईक, सौरभ अमराळे, बाबा सय्यद, सचिन बहिरट, सचिन भोसले, राहुल तायडे, सद्दाम शेख, ॲड. फैय्याज, ॲड. गणेश काळे, ॲड. नंदलाल धिवार, राजू ठोंबरे, वाहिद निलगर, राहुल वंजारी, अविनाश अडसूळ, रवि पाटोळे, सचिन बहिरट, मुन्ना खंडेलवाल, रोहित घोडके, विनोद चौरे,   आदी उपस्थित होते.आंदोलनास उपस्थितांचे आभार ॲड. राजश्री अडसूळ यांनी मानले.

मुसळधार:शुक्रवार व शनिवारी रेड अलर्ट आणि पुढील ३ दिवस ऑरेंज अलर्ट

– हवामान विभागाने जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने (शुक्रवार व शनिवारी रेड अलर्ट आणि पुढील ३ दिवस ऑरेंज अलर्ट) जेजुरी येथे २३ जुलै रोजी होणारा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. जिल्ह्याच्या घाट क्षेत्रातील पावसाची स्थिती आणि पुढील काही दिवसाचा हवामान अंदाज लक्षात घेता लाभार्थ्यांना कार्यक्रम स्थळापर्यंत येण्यास कोणताही त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातर्फे कळविण्यात आले आहे.

मुंबईसह महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडतो आहे. आता मुंबई , ठाणे, रायगड आणि रत्निगिरीला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात पावसाची जोरदार हजेरी आहे. अशात आता पालघरसाठी आयएमडीने रेड अलर्ट दिला आहे.

हवामान खात्याने नागरिकांना खबरदारी बाळगण्याचा इशारा दिला आहे. धोक्याच्या ठिकाणी जाणं टाळा आणि सुरक्षित स्थळी पोहोचा, असं हवामान विभागाने सांगितलं आहे. हवामान खात्याचा इशारा पाहता खबरदारी घेत मुंबईतील काही ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना लवकर घरी सोडण्यात आलं आहे. पुढील तीन ते चार दिवस मुंबई आणि राज्यासह देशभरातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

किंग्ज सर्कल, सायन सर्कल, चुनाभट्टी, मालाड, घाटकोपर येथे पाणी साचले आहे. यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे. मुंबईची लाइफ लाइन असणाऱ्या लोकल सेवेलाही या पावसाचा फटका बसला आहे. हार्बर लाइनवरील लोकल सेवा अंशतः बंद झाली आहे. विशेषतः हार्बर रेल्वेच्या कुर्ला स्थानकात पाणी साचल्यामुळे वडाळा ते मानखुर्द लोकल सेवा बंद झाली आहे. मानखुर्द ते पनवेल सेवा सुरू आहे. मध्य व पश्चिम रेल्वेची लोकल सेवा सध्या सुरळीत सुरू आहे. यात मध्य रेल्वेची वाहतूक काही मिनिटे उशीराने सुरू आहे.

अंधेरी सबवे बंद

मरिन ड्राईव्ह, वांद्रे, मुंलुंड, भांडुप, अंधेरी या भागांतही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. एवढेच नाही तर कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांची घरी जाण्यासाठी धाकधूक वाढली आहे. अंधेरीत मागील तासभरापासून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पावसाचा जोर कमी झाला की लगेचच यातून पाण्याचा उपसा केला जात आहे. हा मार्ग लवकरच मोकळा करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत.

उपनगरांतही तुफान पाऊस

दुसरीकडे, मुंबई उपनगरांतही तुफान पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. या ठिकाणी 2 ते 3 फुट पाणी साचले आहे. त्यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पावसामुळे पश्चिम द्रूतगती महामार्गावरील वाहतूकही मंदावली आहे. बोरीवलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती आहे.

ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यास करा ‘व्हॉट्सॲपवर’ तक्रार

मुंबई, दि. 21 : शहर व उपनगरातील ऑटोरिक्षा अथवा टॅक्सी चालकाने भाडे नाकारले, जादा भाडे आकारले, गैरवर्तन केल्यास 9152240303 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय अहिरे यांनी केले आहे.

मुंबई व मुंबई उपनगरातील बहुतांशी प्रवाशांची वाहतूक ही काळी पिवळी टॅक्सी व ऑटोरिक्षा मधून होत असते. वाहतुकीदरम्यान प्रवाशांशी गैरवर्तन, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा दराने भाडे आकारणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांविरोधात तक्रारी प्राप्त होत असतात. प्रवाशांचा वेळ वाचावा आणि तक्रार करण्यास अडचणी येऊ नयेत यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वरील व्हॉट्सॲप क्रमांकावर मेसेज, फोटो किंवा ई-मेलद्वारे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. कॉल स्वीकारले जाणार नाहीत. तक्रारीमध्ये वाहन क्रमांक, ठिकाण, वेळ, थोडक्यात तक्रारीचे स्वरूप, तक्रारदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी नमूद करण्यात यावा. संबंधित दोषी चालकांवर मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सांगितले आहे.

रुबी हॉस्पिटल अवैध किडनी रॅकेटप्रकरणी चौकशी समितीची स्थापना

0
पुणे-मागील वर्षी पुण्यात किडनी रॅकेट सक्रिय असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये हे रॅकेट सक्रिय असल्याचे चर्चा होती. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची आता पुन्हा एकदा सखोल चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

या समितीच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रकांत भडंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर या समितीत पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकारी आणि अवयव प्रत्यारोपणातील तज्ञांचा समावेश असणार आहे.तीन महिन्यात ही समिती आपला अहवाल सादर करेल अशी अपेक्षा आहे.

रुबी हॉस्पिटल मधील किडनी रॅकेट प्रकरणी रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर परवेज ग्रांट यांच्यासह तज्ञ डॉक्टरांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान या सर्व आरोपांची सखोल चौकशी करून त्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल ही चौकशी समिती सादर करणार आहे.

तसेच चौकशी दरम्यान काही अनियमितता आढळून आल्यास त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे याची शिफारसही ही समिती करणार (Pune)  आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची मंत्री दादाजी भुसे यांनी केली पाहणी

नागपूर, दि. 21 : काळजी करू नका, तुमची सुरक्षितता आमची जबाबदारी आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) दादाजी भुसे यांनी आज समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसोबत संवाद साधत दिला.

समृद्धी महामार्गावर होणारे अपघात लक्षात घेता अपघात रोखण्यासाठी आखण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा आज श्री. भुसे यांनी प्रत्यक्ष समृद्धी महामार्गावर जाऊन घेतला. त्यानंतर त्यांनी प्रवाशांसोबत संवाद साधला.

समृद्धी महामार्ग हा नागपूर आणि मुंबई या शहरांना जोडणारा अत्यंत महत्वाचा महामार्ग आहे. मात्र, गेल्या काही दिवसात या महामार्गावर झालेले अपघात लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. यासाठी प्रवाशांनीही नियमांचे पालन करीत प्रवास करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

श्री. भुसे यांनी समृद्धी महामार्गाच्या झिरो पॅाईंट तसेच वायफळ टोलनाक्याची पाहणी करीत दौ-याला सुरुवात केली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी समृद्धी महामार्गाची माहिती मंत्री श्री. भुसे यांना दिली. यात कंट्रोल रुम, वाहनाला आग लागल्यास आग प्रतिबंधात्मक सयंत्र, शीघ्र कृती दल वाहन, वाहनांची टोलनाक्यावर करण्यात येणारी तपासणी, प्रवाशांसाठीचे समुपदेशन केंद्र, ॲम्ब्युल्सची पाहणी केली. यावेळी मंत्रीमहोदयांना आग्र प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे प्रात्याक्षिक दाखवण्यात आले. या महामार्गावर अपघात झाल्यास प्रतिसाद देणारी ॲम्बुलन्स 15 मिनिटाच्या आत पोहोचते. हा कमाल कालावधी आणखी 10 ते 12 मिनिटावर आणण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांसोबत मंत्री श्री. भुसे यांनी संवाद साधला. कोल्हापूर येथून आलेल्या बाजीराव गवळी व त्यांच्या कुटुंबीयांसोबत मंत्रिमहोदयांनी समृद्धी महामार्गावरील प्रवासाचा अनुभव जाणून घेतला. समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना निश्चित वेगमर्यादा पाळण्याची गरज आहे. नियम पाळणाऱ्यांना धोका नाही. नागपूरपर्यंतचा प्रवास सुखकर झाल्याची प्रतिक्रिया श्री. गवळी यांनी मंत्रिमहोदयांसमोर दिली.

परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहव्यवस्थापकीय संचालक ए.बी.गायकवाड, संजय यादव, एस.एस.मुरडे, महाव्यवस्थापक भारत बास्तेवाड यांच्यासह परिवहन व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

ओव्हरस्पीड’मध्ये जाणाऱ्या चालकाचे समुपदेशन

महामार्गावर 120 गतीमर्यादा निश्चित केली आहे. मात्र, ही गती ओलांडणाऱ्यांना थांबवून त्यांचे टोल नाक्यांवर समुपदेशन करण्यात येते. मंत्री महोदयांच्या दौऱ्यादरम्यान एका वाहन चालकाचे समुपदेशन सुरु होते. मंत्र्यांनी या चालकाला गती मर्यादा पाळण्याचे आवाहन केले.

पर्वती, शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदार नोंदणी अभियान

पुणे, दि. २१: मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत २१२ पर्वती विधानसभा मतदार संघ तसेच २०९ शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील सर्व गृहनिर्माण संस्थांमध्ये शनिवार २२ व रविवार २३ जुलै रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करणार आहेत. त्यामध्ये ज्या मतदारांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट नाहीत त्यांची नावे नमुना क्रमांक ६ मध्ये भरुन घेणे, कायमस्वरुपी स्थलांतरीत व मयत झालेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७ तर मतदार यादी किंवा मतदार ओळखपत्रातील त्रुटी दुर करण्यासाठी नमुना क्रमांक ८ भरुन घेतला जाणार आहे.

मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे: नमुना क्रमांक ६ भरण्यासाठी अर्हता दिनाकांला वय वर्षे १८ पूर्ण होत असावे. निवासाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, भारतीय पासपोर्ट किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत यापैकी एकाची आवश्यकता आहे. वयाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, भारतीय पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला किंवा पॅन कार्ड यापैकी एकाची आवश्यकता आहे. नजीकच्या काळातील एक रंगीत पासपोर्ट आकाराचे पांढऱ्या रंगाची पार्श्वभूमी (बॅकग्राऊंड) असलेले छायाचित्र, मतदार भाडेकरू असेल तर नोंदणीकृत भाडे करार आवश्यक आहे.

मतदार यादीतून नाव वगळणेबाबत नमुना क्रमांक ७ साठी- मयत मतदार असेल तर मयताचा दाखला, लग्न होऊन सासरी गेलेल्या महिला व इतर मतदार संघात कायमस्वरूपी वास्तव्यास गेले असल्यास त्याचा पुरावा आवश्यक आहे.

मतदार यादीतील दुरुस्त्यांबाबत नमुना क्रमांक ८ साठी आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, भारतीय पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत यापैकी एक की ज्यामध्ये बदल करावयाचा उल्लेख असेल असे कागदपत्र, तर एकाच मतदार संघात निवासाचे वास्तव्य बदलले असल्यास नमुना क्रमांक ८ अ भरण्यासाठी आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, भारतीय पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत यापैकी एक की ज्यामध्ये पत्ता बदल केल्याचा उल्लेख असेल अशा कागदपत्राची आवश्यकता आहे.

ज्या नवमतदारांना ऑनलाईन नावनोंदणी करावयाची असेल त्यांनी https://voters.eci.gov.in या वोटर्स सर्व्हिस पोर्टल व वोटर हेल्पलाईन ॲप या माध्यमांचा वापर करुन नवीन नाव नोंदणी करावी. या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा आणि नवमतदारांनी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहनही दोन्ही मतदार संघांच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी केले आहे.
0000

समृद्धी महामार्गावर शून्य अपघात उपाययोजना आखण्यात येईल- मंत्री दादाजी भुसे

नागपूर दि. 21 : हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अविकसित भागाच्या समतोल विकासाचा राजमार्ग आहे. जगातील उत्तमात उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून या महामार्गावर अपघात होणारच नाहीत, अशा पद्धतीच्या उपाययोजना करण्यात येतील, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले.

            सार्वजनिक बांधकाम विभागाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या नागपूर भेटीत त्यांनी समृद्धी महामार्गाच्या संदर्भातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दोन तास विचारमंथन केले. आज सकाळी नऊ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर येथील बैठकीमध्ये महामार्गाच्या निर्मितीपासून तर महामार्ग पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासात या रस्त्याचे महत्त्व त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाणून घेतले.

     या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव, ए.बी. गायकवाड, एस.एस मुराडे, मुख्य महाव्यवस्थापक भारत बास्तेवाड, मुख्य अभियंता एस.के. सुरवसे, निशिकांत सुके, सुरेश अभंग, भूषण मालखंडाळे आदींसह समृद्धी महामार्गाशी संबंधित सर्व जिल्ह्यांचे अभियंते, विविध कामांसाठी नियुक्त करण्यात आलेले कंत्राटदार, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

            विदर्भ, मराठवाडा आदी मागास भागांच्या विकासासाठी या मार्गाची निर्मिती करण्यात आली असून जगातील एक महत्त्वाचा महामार्ग महाराष्ट्रात आकाराला येत आहे. अद्याप हा महामार्ग मुंबईपर्यंत पूर्ण व्हायचा आहे. एकदा हा महामार्ग आपल्या पूर्ण क्षमतेने कार्यरत झाला की, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले परिश्रम, त्याची फलश्रृती व उभय नेते या रस्त्याबाबत का गंभीर आहेत हे दिसून येतील, असे त्यांनी सांगितले.

            विकासाचा समतोल साधणारा सेतू म्हणजे समृद्धी मार्ग आहे. पूर्णता कार्यप्रवण झालेल्या महामार्गामार्फत महाराष्ट्राच्या 15 जिल्ह्याच्या विकासाची दिशा ठरेल, प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी त्यांनी आतापर्यंत झालेल्या अपघाताचे विभागामार्फत करण्यात आलेले विश्लेषण जाणून घेतले. अन्य ठिकाणी याच काळात झालेल्या अपघातांची संख्या व या महामार्गावर झालेल्या अपघातांची संख्या याची तुलना योग्य ठरणार नाही. मात्र हा अद्यावतमार्ग अपघातापासून मुक्त असावा, यासाठी जागतिक दर्जाचे सर्व तंत्रज्ञान वापरण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जवळपास 20 हजार वाहने रोज या रस्त्याचा वापर करत आहे. या रस्त्याची सकारात्मक बाजूही जनतेपुढे आली पाहिजे. केवळ अफवांमुळे महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गालबोट लागतात कामा नये. त्यामुळे दीर्घकालीन व अल्पकालीन उपाययोजना उद्यापासून रस्त्यांवर अमलात आल्या पाहिजे असे त्यांनी सांगितले.

            या रस्त्याची आज पाहणी झाल्यानंतर काही धोरणे ठरविण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने करा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

            नियमाने चालणारे वाहन चालक, उद्योग व्यापार क्षेत्रातील दिग्गज रस्त्याचे कौतुक करतात. त्यामुळे प्रसंगी कडक शिस्त लावण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही. तपासण्याही आवश्यकतेनुसार वाढवण्यात येतील. मात्र यापुढे विभागाने अपघात शून्य महामार्ग ही संकल्पना घेऊन जोमाने कामाला लागावे, असेही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले. बैठकीनंतर त्यांनी वायफळ येथून समृद्धी महामार्गासाठी प्रवासाला सुरुवात केली.

राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा : एकोणीस वर्षाखालील गटात सागर कस्तुरे व संपदा भिवंडकर विजेते

कुपवाड (सांगली)
मुंबईच्या टी एस टी संघाच्या सागर कस्तुरे याने पुण्याच्या आदित्य जोरी याच्यावर मात करीत मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील १९ वर्षाखालील मुलांच्या गटात विजेतेपद पटकाविले. मुलींमध्ये टी एस टी संघाच्या संपदा भिवंडीकर हिला विजेतेपद मिळाले.

सूरज फाउंडेशन व सांगली जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या वतीने कृष्णा व्हॅली स्कूल कुपवाड येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने होत आहे.
मुलांच्या अंतिम फेरीत सागर याने आदित्य याचा ११-३,१३-११,११-५,१२-१० असा पराभव केला. त्याने काउंटर ॲटॅक पद्धतीचा सुरेख खेळ केला तसेच त्याने परतीच्या फटक्यांवर चांगले नियंत्रण ठेवले होते. आदित्य याने सागर याला दुसऱ्या व चौथ्या गेम मध्ये चिवट लढत दिली तथापि त्याचे प्रयत्न अपुरे ठरले. उपांत्य फेरीत सागर याने द्वितीय मानांकित कुशल चोपडा या नाशिकच्या खेळाडूवर ३-१ असा अनपेक्षित विजय मिळविला होता. उपांत्य फेरीत आदित्य याने टी एस टी संघाच्या अक्षत जैन याचे आव्हान ३-१ असे परतविले होते.

मुलींच्या अंतिम सामन्यात अग्रमानांकित खेळाडू संपदा हिने आपली सहकारी दिव्यांशी भौमिक हिला ११-६,११-९, ११-८,११-३ असे चार गेम्स मध्ये पराभूत केले. तिने टॉप स्पिन फटक्यांचा बहारदार खेळ केला. उपांत्य फेरीत तिने हार्दी पटेल हिचा ३-० असा दणदणीत पराभव केला होता. उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत भौमिक हिने सहाव्या मानांकित मिताली पुरकर हिच्यावर ३-० असा आश्चर्यजनक विजय नोंदविला होता.

अवैध गुटखा आणि तत्सम पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री मंत्री धर्मरावबाबा आत्राम

मुंबई, दि.२१ : राज्यात गुटखा, पान मसाला आणि तत्सम प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानसभेत सांगितले.

राज्यात तंबाखू मिश्रित पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचा प्रश्न सदस्य आशिष शेलार, अतुल भातखळकर, योगेश सागर यांनी उपस्थित केला होता.

मंत्री श्री. आत्राम म्हणाले की, गुटखा, पान मसाला व इतर तत्सम प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा वाहतुकीचा परवाना तसेच वाहन चालकाचा परवाना रद्द करणेबाबत संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात गुटखा उत्पादन करण्यास प्रतिबंध असून शेजारच्या राज्यामध्ये गुटख्याचे उत्पादन केले जाते. इतर राज्यातील उत्पादकांवर राज्य शासनाकडून थेट कारवाई करता येत नाही. परंतू राज्यात प्रतिबंधित पदार्थाच्या वाहतुकीसाठी वाहन, गोदाम वापरले तर ती वाहने, गोदाम सील करण्याबाबतचे संबंधितांना आदेश देण्यात आले आहेत.

अवैध गुटखा विक्री रोखण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 व नियम 2011 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येत असल्याचेही मंत्री श्री. आत्राम यांनी यावेळी सांगितले.

अनधिकृत ठरलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही-मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि.२१ : राज्यात शिक्षण विभागामार्फत विविध शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये खाजगी व्यवस्थापनाद्वारे 661 शाळा या अनधिकृतपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या शाळांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले.

राज्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सर्वश्री हरिभाऊ बागडे,आशिष शेलार, अतुल भातखळकर, रईस शेख, अबू आझमी, सुनील राणे, संजय केळकर, योगेश सागर, अशोक उईके, यामिनी जाधव यांनी उपस्थित केला होता.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, या अनधिकृत शाळांमध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शाळांना कागदपत्राची तातडीने पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुंबईतील अनधिकृत शाळाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी सोबत बैठक घेऊन यावर विद्यार्थी हितासाठी सहनुभूतीपूर्वक निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री केसरकर यांनी सांगितले.

या अनधिकृत शाळांमध्ये शासन मान्यतेनेविना शाळा सुरू करणे, राज्य मंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळाशी संलग्नतेकरिता आवश्यक असणारे शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र न घेणे, संबंधित परीक्षा मंडळाचे संलग्नता प्रमाणपत्र न घेणे या बाबी निदर्शनास आल्याने संबंधित शाळांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच सन 2022 मध्ये काही शाळांमध्ये शासन मान्यता आदेश हे बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे. या शाळांवर सुद्धा फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

मोफत गणवेश योजनेचा लाभ स्थानिक पातळीवरून देण्याचा विचार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि.21 :  सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीद्वारे देण्यात येत आहे. मात्र शालेय गणवेश उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक पातळीवर महिला बचत गटांना देण्याचा सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले.

शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेश वाटपाचे काम स्थानिक पातळीवर करण्याबाबतचा प्रश्न सदस्य सर्वश्री अनिल देशमुख, आशिष शेलार यांनी उपस्थित केला होता.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले, महिला बचतगटांना गणवेश तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेश वाटपाचे काम स्थानिक पातळीवर देण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

‘ये फास्ट सर्विस बहुत अच्छा लगा’

मुंबई दिनांक, २१ जुलै २०२३ : उल्हासनगरच्या श्यामप्रसाद यांनी महावितरणकडे नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज केला आणि सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन अर्ज केल्या दिवशीच सायंकाळपर्यंत त्यांना कनेक्शन मिळाले. महावितरणच्या तत्पर सेवेमुळे त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, ‘ये फास्ट सर्विस बहुत अच्छा लगा मेरे को’! श्यामप्रसाद यांच्यासह सहा वीज ग्राहकांना उल्हासनगरमध्ये गुरुवारी अर्ज केल्यानंतर एकाच दिवसात वीज कनेक्शन मिळाले. विशेष म्हणजे मुसळधार पाऊस आणि ठिकठिकाणी पाणी साचले असूनही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी नवीन कनेक्शन झटपट दिली.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि ग्राहकाभिमुख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी विविध पावले उचलली असून त्याचा एक भाग म्हणून ग्राहकांना वेगाने नवीन वीज कनेक्शन देण्याची सूचना केली आहे.

            कल्याण झोनचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी ग्राहकांना झटपट वीज कनेक्शन देण्यासाठी २४ – ४८ मोहीम सुरू करून श्यामप्रसाद यांच्यासारख्या ग्राहकांना तत्परतेने वीज कनेक्शन दिल्याबद्दल लोकेश चंद्र यांनी औंढेकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

            रिजन्सी लँडमार्कचे श्यामप्रसाद यांनी त्यांचा अनुभव सांगितला की, त्यांनी सकाळी मीटरसाठी अर्ज दिल्यानंतर महावितरणचा लाईनस्टाफ त्यांच्यासोबतच आला व त्याने पाहणी करून नव्या जोडणीसाठीचे शुल्क किती भरायचे ते दुपारपर्यंत सांगितले. त्यानुसार लगेच शुल्क भरल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासमोर मीटर बसविला व नवीन कनेक्शन दिले.

श्यामप्रसाद यांनी उल्हासनगरचे शाखा अभियंता गणेश रहाटे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा उल्लेख केला आणि महावितरणचे आभार मानले. त्यावेळी त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

          धनंजय औंढेकर यांनी सांगितले की, वीज ग्राहकांना नवीन कनेक्शन देण्यासाठी कल्याण झोनमध्ये २४ – ४८ ही मोहीम सुरू केली आहे. शहरी भागात २४ तासात तर ग्रामीण भागात ४८ तासात वीज कनेक्शन देण्यासाठी नियोजन केले आहे. ग्राहकाकडून अर्ज आल्यानंतर दोन ते तीन तासात सर्व्हे करून नवीन जोडणीसाठी नेमके किती पैसे भरायचे त्याची माहिती मोबाईलवर द्यायची, ग्राहकाने घरातूनच झटपट ऑनलाईन पेमेंट करून त्याची रिसिट व्हॉट्स अपवर पाठवायची व पावती मिळाली की तातडीने मीटर बसवून नवीन वीज जोडणी द्यायची अशी कार्यपद्धती आहे. त्यासाठी कल्याण झोनमधील सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. ठिकठिकाणी नव्या मीटरचा साठाही केला आहे. उल्हासनगरमध्ये एका दिवसात सहा ग्राहकांना या पद्धतीने कनेक्शन देऊन मोहीम सुरू झाली.

            मा. लोकेश चंद्र यांनी एक महिन्यापूर्वी महावितरणच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मा. उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार वीज ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर भर दिला आहे. त्यांनी नवीन वीज कनेक्शनचे अर्ज तातडीने निकाली काढण्याची स्पष्ट सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.

लोकेश चंद्र यांच्या आदेशानंतर महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दहा दिवसात एक लाख घरगुती वीज कनेक्शन दिली. वीज ग्राहकांना झटपट नवीन कनेक्शन देण्यावर अध्यक्षांनी भर दिला आहे. त्यानुसार प्रलंबित अर्ज निकाली काढणे आणि नव्या अर्जांनुसार झटपट कनेक्शन देणे असे दुहेरी काम महावितरणने संचालक संजय ताकसांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केले आहे.

बांधकाम कामगारांना सुरक्षिततेची साधने पुरविण्याचे कामगार विभागाचे निर्देशमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीचेही आवाहन

पुणे, दि. २१: सध्या अतिवृष्टीचे दिवस पाहता बांधकाम व्यवसायिक, कंत्राटदारांनी बांधकामाच्या ठिकाणी दुर्घटना घडू नयेत यासाठी बांधकाम कामगारांना सुरक्षिततेची साधने व उपकरणे पुरवावीत, असे निर्देश कामगार विभागाने दिले आहेत. तसेच नोंदणी न केलेल्या बांधकाम कामगारांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

बांधकाम व्यवसायिक, कंत्राटदार व नियोक्ता यांनीदेखील स्वतःची नियोक्ता म्हणून https://lms.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईनरित्या नोंदणी करून घ्यावी. सुरक्षिततेची सर्व साधने व उपकरणे बांधकाम कामगारांना पुरवून कोणतीही दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी. या दिवसात जमिन व संरक्षक भिंती खचणे आदी घटना घडण्याची शक्यता असल्यामुळे बांधकाम कामगार ज्या ठिकाणी रहातात ती जागा त्यामुळे बाधित होईल किंवा कसे याची खातरजमा करुन बांधकाम कामगारांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी. बांधकाम कामगारांच्या आरोग्याच्यादृष्टीने सर्व सोयी-सुविधा त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी पुरवाव्यात.

सर्व बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या अनोंदीत बांधकाम कामगारांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करुन त्यांना मंडळामार्फत देय असलेल्या सुरक्षा संच, अत्यावश्यक संच, वैद्यकिय तपासणी व मध्यान्ह भोजन आदी योजनांचे लाभ मिळवून देण्यास बांधकाम व्यवसायिक, कंत्राटदार, व नियोक्ता यांनी सहकार्य करावे.

बांधकाम कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या बाबतीत निष्काळजीपणा आढळल्यास किंवा दुर्देवी अपघात होवून मनुष्यहानी झाल्यास, त्यास सर्वस्वी संबंधित बांधकाम व्यवसायिक, कंत्राटदार व नियोक्ता जबाबदार राहतील, असेही पुणे विभागाचे अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी कळविले आहे.
0000

राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करून कायमस्वरुपी पुनर्वसनाचा निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती

मुंबई, दि. २१ : राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी दुर्घटनेबाबत आज झालेल्या मंत्रिमडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी ज्या ठिकाणी धोका आहे अशा दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

काल दिवसभर दुर्घटनास्थळी असलेले मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अनुभव कथन करताना त्या भागातील परिस्थिती किती बिकट आणि धोकायदायक होती याची माहिती दिली. इरशाळवाडी येथे दरड कोसळल्याने घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. त्यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य शासनाने जाहीर केली असल्याचे त्यांनी सांगितले. आज सकाळपासून इरशाळवाडी येथे शोधकार्यास सुरूवात झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणेमार्फत सर्व बचाव पथकांना तत्काळ पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री सर्वश्री गिरीष महाजन, दादाजी भुसे, उदय सामंत हे रात्रीच दुर्घटनास्थळाकडे रवाना झाले. मंत्री आदिती तटकरे, अनिल पाटील, आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकुर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. यंत्रणांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मी पायी चालत डोंगरावर जाण्याचा निर्णय घेतला. तेथील दृष्य विदारक होते, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

एवढ्या उंचावर साहित्य, साधनसामुग्री घेऊन जाणाऱ्या बचाव पथकातील कर्मचाऱ्यांना सलाम करतो, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीर असल्याची ग्वाही दिली. मात्र यंत्रणा, साधने असूनही प्रतिकुल परिस्थितीमुळे तिचा वापर करू शकलो नाही याची खंत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

बचाव कार्यास यशवंती हाइकर्स स्वयंसेवी संस्थेचे २५ स्वयंसेवक, ३० चौक ग्रामस्थ, वरोसे ग्रामस्थ २०, नगरपालिका खोपोली यांचेकडील २५ कर्मचारी, चौक ग्रा. पं. कडील १५ कर्मचारी, निसर्ग ग्रुप पनवेल यांचेकडील १५ स्वयंसेवक तसेच कोलाड रिव्हर राफटर्स इत्यादींचा सहभाग आहे. तसेच NDRF च्या ४ टिम एकूण १०० जवान TDRF चे ८० जवान स्थानिक बचाव पथकाच्या ०५ टीम यांनी बचाव कार्याच्या कामात मोलाची कामगिरी बजावित आहे.

इरशाळगडाच्या पायथ्याशी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिकेसह आवश्यक अशा वैद्यकीय सुविधा व इतर साहित्य तत्काळ उपलब्ध करण्यात आले. बचाव करण्यात आलेल्या नागरिकांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी आवश्यक सोयी-सुविधा युक्त कंटेनर्स व इतर मुलभूत सोयी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. शोध व बचाव कार्यासाठी आवश्यक साहित्य तातडीने बेस कॅम्प येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या तात्पुरत्या निवास व्यवस्थेसाठी ६० कंटेनर मागविण्यात आले आहेत. सिडकोच्या माध्यमातून या नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्थानिक माहितीवरून सदरील आदिवासी वाडीमध्ये एकूण ४८ कुटुंब वास्तव्यास असून लोकसंख्या २२८ इतकी आहे. त्यातील सुमारे १७ ते १८ घरांवर दरड कोसळी आहे. बचाव कार्यात ९८ व्यक्तींना सुरक्षित वाचविण्यास यश आले आहे. २२८ पैकी उर्वरित १०९ व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. इरशाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडग्रस्त ठिकाणाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सर्व यंत्रणा असूनही वापरता आल्या नाही, इरशाळवाडीला जाताना एकेक्षणी वाटले..! मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला स्वानुभव

मुंबई-

इरशाळवाडीतील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिवसभर घटनास्थळी डेरा टाकला होता. त्यांनी जातीने सर्व मदतकार्यावर नजर ठेवली. पीडितांची आस्थावाईकपणे चौकशी केली. एवढेच नाही तर ते स्वतः डोंगर चढून इरशाळवाडीत पोहोचले. त्यांनी शुक्रवारी विधानसभेत डोंगर चढण्याचा हा अनुभव कथन केला. त्यात त्यांनी स्वतःची झालेली दमछाक नमूद करत एवढ्या प्रतिकूल स्थितीत घटनास्थळी मदतसामग्री घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना सलाम ठोकला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहाला म्हणाले, घटनास्थळी सर्वप्रथम पोहोचणाऱ्या गिरीश महाजन व आमदार महेश बालदी यांचे कौतुक. कारण, इरशाळवाडी गाव प्रचंड उंचीवर होते. गावाकडे जाणारा रस्ता चढताना एका पॉईंटला मलाही या गोष्टीची जाणीव झाली. मी पहाटे इरशाळवाडी गावाच्या पायथ्याशी पोहोचलो. रात्रभर मी गिरीश महाजन यांच्या संपर्कात होतो.

गावाकडे जाणारा रस्ता अत्यंत अवघढ व चढणीचा

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, आपण गेल्यामुळे यंत्रणा हलते, अलर्ट होते. पण इर्शाळवाडी गावाकडे जाणारा रस्ता अत्यंत अवघड व चढणीचा आहे. तिकडे जाण्याची इच्छा असल्यामुळे मी डोंगर चढण्यास सुरुवात केली. पण एका स्टेजला जाऊन मलाही हे गाव किती उंचीवर आहे आणि रस्ता किती चढणीचा आहे याची जाणीव झाली. तेथील परिस्थिती भयंकर होती. मी रस्ता चढताना विचार केला की, जी लोकं वरती साहित्य घेऊन जात आहेत, त्यांना सलामच केला पाहिजे. कारण हा रस्ता चढणे अत्यंत कठीण होते.

नातेवाईकांचा आक्रोश पाहण्याचे धाडस होत नव्हते

घटनास्थळावरील मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहण्याचे धाडस होत नव्हते. हा अत्यंत दुर्दैवी प्रसंग होता. आपल्याकडे सर्व यंत्रणा असूनही त्या वापरु शकलो नाही, याची खंत वाटते. पण आपण वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे, असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या निवेदनात म्हटले.

विद्यार्थ्यांनी दिली घटनेची माहिती

इरशाळवाडी गावावर दरड कोसळली तेव्हा आश्रमशाळेतील काही विद्यार्थी खेळत होते. त्यांना आवाज आला आणि ते त्या दिशेने पळाले. त्यानंतर त्यांनी इतर लोकांना या घटनेची माहिती दिली. गावातील काही जण मासेमारीसाठी, काही जण भात शेतीसाठी बाहेर गेले होते. आणखी काही जण बाहेर असण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.

अत्यंत विदारक दृश्य होते

मुख्यमंत्री म्हणाले, आतापर्यंत 20 मृतदेह हाती लागलेत. मी मृतांच्या नातेवाईकांना भेटलो. त्यांचा आक्रोश सुरु होता. संपूर्ण परिस्थिती खूप अडचणीची होती. मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या मृतदेहांची विल्हेवाट लावणे जिकिरीचे काम होते. एकीकडे एनडीआरएफचे जवान ढिगारा उपसण्याचे काम करत होते. तर दुसऱ्या बाजुला मृतांच्या नातेवाईकांशी बोलून अंत्यविधी करण्याचे ठरत होते. त्यासाठी काही जण वरतीच खड्डे खोदत होते. हे दृश्य अत्यंत विदारक होते.

सिडकोमार्फत नवी घरे बांधून देणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील पीडितांचे पुनर्वसन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. आगामी काळात इरशाळवाडीतील गावकऱ्यांसाठी जागा निश्चित झाल्यानंतर सिडकोमार्फत तत्काळ घरे बांधून देण्यात येतील. जागा मिळाल्यानंतर लगेच कामाला सुरुवात करावी, अशा सूचना सिडकोला देण्यात आल्या आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले. तूर्त इरशाळवाडीच्या खालच्या भागात पायथ्याला उभ्या कंटेनर्समध्ये 47 कुटुंबांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी 60 कंटेनर्स येणार आहेत त्यापैकी 30 कंटेनर्स पोहोचलेत.