Home Blog Page 1434

मुख्यमंत्री शिंदेंनी सहकुटुंब घेतली PM मोदींची भेट, म्हणाले- राजकीय नव्हे तर केवळ विकासकामांबाबत चर्चा

नवी दिल्ली, दि. २२ :  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यातील पायाभूत सुविधांबाबत चर्चा करण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. धारावी पुनर्वसन प्रकल्प तसेच राज्यातील इतर प्रकल्पांवरही मोदींशी चर्चा केली.

राज्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ असल्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली.आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रधानमंत्री श्री. मोदी यांची त्यांच्या 7 लोककल्याण मार्ग स्थित शासकीय निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. श्री. शिंदे यांनी त्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व त्यांची पत्नी वृषाली शिंदे, नातु रूद्रांश यांच्या समवेत भेट घेतली.

मुख्यमंत्री यांनी सांगितले, भेटी दरम्यान कुटुंबियांची प्रधानमंत्री यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. यासोबतच राज्याच्या सर्वंकष विषयांवर चर्चा करून राज्यात सुरू असलेल्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पाठबळ असल्याचे आश्वासक आश्वासनही यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दिले.

प्रधानमंत्री यांनी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी दुर्घटनेबाबत सहवेदना करून या दुःखाच्या समयी केंद्र सरकार खंबीरपणे पाठिशी उभे असल्याचे सांगितले. तसेच या ठिकाणी सुरू असलेले बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबतची माहिती जाणून घेतली.

धारावी प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प असून यामुळे मुंबईचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. या प्रकल्पामुळे येथील लोकांचे जीवनमान उंचावेल त्यासाठी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा अशी अपेक्षा प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडे व्यक्त केली. प्रत्येक कुटुबांला हक्काचे घर मिळावे, असे केंद्र शासनाचे धोरण असून राज्य त्या दिशेनेही काम करीत असल्याचे समाधान प्रधानमंत्री यांनी व्यक्त केले असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

राज्यातील रखडलेले पुनर्विकासाचे प्रकल्प मार्गी लावावेत. पायाभूत सुविधांना बळ मिळाले की राज्याच्या समृद्धीचा मार्ग सुकर होतो. त्यामुळे राज्यातील असे सर्व प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत, अशाही सूचना प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी केल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यासह राज्यात वांरवार होणारी अतिवृष्टी त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचे होणारे नुकसान याबाबतही प्रधानमंत्री यांनी विचारपूस केली. कोकणात पडणाऱ्या पावसाचे पाणी समुद्राला मिळते. हे पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळविता येईल, यावर भविष्यात काही उपाययोजना आखता येतील का? याबाबतही चर्चा करण्यात आली.  मराठवाडा वॉटर ग्रीड या राज्य सरकारच्या योजनेबाबतची माहिती प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी  घेतली. यासह राज्यातील आरोग्य व्यवस्था, उपलब्ध शैक्षणिक सुविधा याबाबतही विचारणा केली असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

लोककलावंतांना न्याय देण्यासाठी राज्य सांस्कृतिक धोरणावर विधिमंडळाच्या अधिवेशनात व्यापक. चर्चा व्हावी….!

मुंबई – नवीन फेरआढावा घेणाऱ्या “सांस्कृतिक धोरणा”वर विधिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषदेच्या दोन्ही सभागृहात व्यापक आणि सखोल चर्चा करावी . तरच ग्रामीण भागातील लोककलावंतांना न्याय मिळेल. अशी मागणी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांच्याकडे लोककलावंतांनी एका लेखी निवेदनामार्फत करण्यात आली.

सदर निवेदन विधानभवनात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे 2010 साली नवीन सांस्कृतिक धोरण घोषित झाले. परंतु त्या धोरणाची किती अंमलबजावणी झाली, यामुळे सांस्कृतिक क्षेत्रात किती प्रगती झाली. याबाबत आजच्या घडीला कला क्षेत्रातील कोणतेही मान्यवर याचे अनुमान काढू शकणार नाही. हे निश्चित कटुसत्य आहे.म्हणूनच आपण “महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण 2010” चा अंमलबजावणीचा फेराआढावा घेण्यासाठी विविध कला क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असलेली उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे.ही बाब निश्चित योग्य अन स्वागतार्ह आहे.
विविध कला -साहित्य,भाषा,संगीत, नाटक, चित्रपट, शिल्पकला, नृत्य, लोककला, भक्ती अशा अनेक विषयाचा समावेश असलेल्या कला संस्कृतीचा विद्यमान समितीकडून सखोल अभ्यास होणार आहे . हा सरकारचा उद्देश नवीन सांस्कृतिक क्षेत्राला चालना देणारा राहणार आहे.याबद्दल कोणाचेही दुमत नाही.

परंतु महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर येथील लोक संस्कृती व्यापक आहे. अगदी चंद्रपूर -गडचिरोली पासून ते तळ कोकणापर्यत आपण बघितले तर अनेक बोली भाषा आणि विविध संस्कृती जपणाऱ्या स्थानिक लोककलेच्या नोंदी सांस्कृतिक विभागाने यापूर्वी कधीच नोंदविल्या नाहीत.त्यामुळे परंपरागत ह्या लोककलेवर अन्याय झाला आहे. त्या कलेचे संवर्धन होवू शकले नाही. कालारूपानुसार अनेक वयोवृद्ध लोककलावंत आपल्याला सोडून गेले . अन त्यांच्या अंगीकृत असलेल्या कला तेथेच थांबल्या, पुढच्या पिढीपर्यत त्या कला पोहचल्याच नाहीत. ही सरकारच्या अनास्थेमुळे आपल्या सांस्कृतिक वैभवाची मोठी हानी झालेली आहे. अशा व्यथा निवेदनात नमूद कारण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्राच्या विधिमंडळात सर्व भागातील लोकप्रतिनिधी प्रतिधित्व करीत असतात. त्यांना आपल्या भागातील बोली भाषांची आणि स्थानिक संस्कृतीची पूर्ण जाण असते. म्हणूनच लोसंस्कृतीची परंपरा असलेल्या “महाराष्ट्राचा सांस्कृतिक दैदीप्यमान भूतकाळ आणि येणाऱ्या उज्ज्वल भविष्यकाळा”वर सर्वसमावेशक आणि सर्वसमन्वयी सखोल अभ्यास करण्यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनात चर्चा घडवून आणावी. अन चर्चेत भाग घेणाऱ्या विधासभा आणि विधानपरिषद सदस्यांकडून हरकती /सूचना घ्यावा. अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री महोद्यांकडे लेखी निवेदनामार्फत करण्यात आली आहे.

सरकारचे अहमदाबादवर प्रेम आणि महाराष्ट्रावर मात्र वक्रदृष्टी: अशोक चव्हाणांचा यशस्वी प्रहार ,अंबानीवर कारवाईचे फडणवीसांचे निर्देश

मुंबई ८वर्षाच्या अंबानीच्या कारभाराचा पर्दाफाश करत ,मुंबई ते अहमदाबाद अवघ्या १ हजार ९९१ रुपये भाडे दरात १८ विमाने उपलब्ध आहेत .मात्र महाराष्ट्रात ल्या महाराष्ट्रात मात्र अवघी १५ विमाने असून सर्वातकमी भाडे ३ हजार ८४ रुपये आहे असे का ? असा सवाल करत विमानाच्या संदर्भातील कारभाराचा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पर्दाफाश केला .

अशोक चव्हाण म्हणाले,’ राज्यात जेमतेम ११ विमानतळे वापरण्यायोग्य असून, त्यांपैकी अनेक विमानतळांवर नियमित विमानसेवा ठप्प आहे. याबाबत मी केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे. त्यांचा प्रतिसाद सकारात्मक राहिला असून, ‘उडाण’ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील विविध विमानसेवा सुरू करण्यासाठी अनेक विमान कंपन्यांनी बोली लावली आहे. मात्र, अनेक प्रमुख शहरातील विमानतळेच बंद असतील तर विमानसेवा कशी सुरू होणार? महाराष्ट्राच्या सर्व विभागात किमान एक-दोन शहरात तरी विमानसेवा सुरू असायला हवी. नांदेडसह राज्यातील अनेक विमानतळांचे संचालन करणारी रिलायन्स कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने नांदेड टर्मिनलवर साधा झाडू मारायला कोणी नाही, धावपट्ट्या खराब होत आहेत, नाईटलँडिंग बंद पडली आहे, डीजीसीएसारख्या संबंधित यंत्रणांना देय असलेले शुल्क देखील रिलायन्सकडे थकित झाले आहे. मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी रोज १८ विमानसेवा उपलब्ध आहेत. मात्र, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात प्रवास करण्यासाठी सर्व मिळून जेमतेम १५ विमानसेवा का? मुंबईहून अहमदाबादसाठी १ हजार ९९१ रूपये इतक्या स्वस्त दरात विमानाचे तिकीट उपलब्ध होते. मात्र त्यापेक्षा कमी अंतर व प्रवासाचा कमी कालावधी असलेल्या औरंगाबादचे सर्वात स्वस्त भाडे ३ हजार ८४ रूपये तर कसे? अंतर व प्रवासाचा कालावधी जवळपास सारखेच असलेल्या नागपूरचे विमान तिकीट किमान ३ हजार ४०८ रूपये आहे.

अनिल अंबानींकडून राज्यातील नऊ विमानतळ ताब्यात घेणार, फडणवीस यांचा विधानसभेत दावा

 मुंबई-२००८-२००९ मध्ये राज्यातील नऊ विमानतळ तत्कालीन सरकारने अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीला ३० वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिले. पण अंबानी यांनी लंडन येथील कोर्टात त्यांचे दिवाळे वाजल्याची कबुली दिली. त्यामुळे त्यांच्याकडून हे विमानतळ ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. गरज पडल्यास अंबानींच्या कंपनीकडून नंतर रक्कम वसूलीच्या हमीवर राज्य सरकार विमान प्राधिकरणाकडे रकमेचा भरणा करेल, शिर्डी विमानतळावर नाइट लँडिंगची कायमस्वरूपी परवानगी मिळवू, असेही त्यांनी सांगितले.

विधानसभेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लक्षवेधीद्वारे राज्यातील विमानसेवेसंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले की, अंबानींकडून थकबाकीही वसूल केली जाईल. नांदेडसह काही विमानतळ सुरू करणार आहोत. मुंबईत सिंगल रनवेवर ७०० विमाने ये-जा करतात. त्यामुळे राज्यातील विमानसेवेसाठी आवश्यक असलेली सकाळची वेळ मुंबई विमानतळावर मिळत नाही. सकाळचा स्लाॅट मिळण्याची क्षमता मुंबई विमानतळावर नाही. काहींना काही स्लाॅट मिळतील यासाठी लवकरच बैठक घेऊ. मात्र नवी मुंबईत नवीन विमानतळ सुरू झाल्यानंतर पुढील आॅगस्टमध्ये सेवा सुरू होईल तेव्हा मात्र हा प्रश्न सुटेल. असे फडणवीस यांनी सांगितले.

एवढे दर कशासाठी : चव्हाण

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अतिशय तपशीलासह विमानसेवेवर चर्चा घडवून आणली, असे वारंवार निदर्शनास येत होते. ते म्हणाले की, मुंबईतून अहमदाबादला विमानाने जायचे असेल तर फक्त १९०० रुपये तिकीट आहे. आणि तेच महाराष्ट्रातील एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी ३००० रुपये मोजावे लागतात. एवढे दर कशासाठी, याचाही राज्य शासनाने विचार केला पाहिजे. विमानतळाच्या नाईट लँडिंगचा मुद्दा खूप अवघड, किचकट नाही. महिनाभरात तो एका अधिकाऱ्याकडूनही सुटू शकतो, असे त्यांनी सांगितले.

सोलापूरवर ठरवून अन्याय : प्रणिती शिंदे

या विषयावरील चर्चेत भाग घेताना आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या विमानसेवेचा प्रश्न उपस्थित केला. त्या म्हणाल्या, सोलापूरला आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी २००८ मध्ये परवानगी दिली. ५७५ हेक्टर जमीन संपादित झाली. ३३ हेक्टर जागा माळढोक असल्याचे कारण देऊन नाकारली गेली. मात्र त्याच वेळी सुरत-चेन्नई या महामार्गासाठी जागा दिली गेली. त्याचे काम सुरू झाले आहे. पण केवळ राजकारण करून बोरामणीचे विमानतळाचे काम रखडवले गेले. हे राजकारण लोकांना कळत नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्य सरकारने ५० कोटी देण्याचे ठरवले होते, तेही थांबविले गेले अशा शब्दांत त्यांना सरकारवर शरसंधान साधले. सोलापूरच्या विमानसेवेबाबत तातडीची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

राज्यातील ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, तुकाराम मुंढेंची दीड महिन्यात पुन्हा बदली, संपूर्ण यादी

मुंबई: राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप पार पडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासकीय पातळीवर भाकरी फिरवली आहे. त्यामध्ये राज्य सरकारने ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारकडून संबंधित सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याची यादी शुक्रवारी संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये राज्यातील अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत. तसेच कायम चर्चेत असणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या दीड महिन्यात पुन्हा बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढे यांची मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता तुकाराम मुंढे यांना थेट मंत्रालयात बसवण्यात आले आहे. तुकाराम मुंढे हे आता कृषी आणि पशूसंवर्धन विभागाचे सचिव म्हणून काम पाहतील. तुकाराम मुंढे यांची गेल्या १६ वर्षांत २० वेळा बदली झाली आहे. महिन्याभरापूर्वीच त्यांना कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी खालीलप्रमाणे
1. राजेंद्र शंकर क्षीरसागर यांची मुंबई शहर कार्यालयात जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

2. वर्षा ठाकुर-घुगे यांची लातूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

3. संजय चव्हाण यांची अतिरिक्त कंट्रोलर ऑफ स्टॅम्प, मुंबई कार्यालयात बदली करण्यात आली आहे. ते यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेत विशेष कार्यकारी अधिकारी होते.

4. आयुष प्रसाद यांनी जळगावच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

5. श्रीमती भुवनेश्वरी एस. यांची वाशिमच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

6. अजित कुंभार यांची अकोल्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली

7. श्रीकृष्णकांत पांचाळ यांची जालन्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

8. डॉ. पंकज अशिया यांची यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

9. कुमार आशीर्वाद यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

10. अभिनव गोयल यांची धुळ्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

11. सौरभ कटियार यांची झेडपी अकोला मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरुन अमरावती कार्यालयात जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

12. तृप्ती धोडमिसे यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अहेरी, गडचिरोली पदावरुन सांगली झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

13. अंकित यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अहेरी, गडचिरोली पदावरुन मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, जळगाव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

14. शुभम गुप्ता यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अटापली SDO, पो.भारमरागड, ITDP, गडचिरोली पदावरुन मुख्य कार्यकारी अधिकारी, ZP, धुळे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

15. मीनल करनवाल यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, नंदुरबार पदावरून मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., नांदेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

16. डॉ.मैनाक घोष यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली -सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली पदावरून मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

17. मनीषा माणिकराव आव्हाळे यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, सोलापूर पदावरून मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., सोलापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

18. सावन कुमार यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, धारणी, ITDP, अमरावती पदावरून मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., नंदुरबार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

19. अनमोल सागर यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, देवरी उपविभाग, गोंदिया पदावरून मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२०. आयुषी सिंग यांची पालघरच्या जवाहर येथील आयटीडीपी प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी आणि सहायक जिल्हाधिकारी पदावरुन गडचिरोलीच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती

२१. वैष्णवी बी यांची भंडारा येथील तुमसर उपविभागाच्या सहायक जिल्हाधिकारी पदावरुन अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली

२२. पवनीत कौर यांची अमरावतीच्या जिल्हाधिकारी पदावरुन पुण्याच्या जीएसडीए संचालक पदी बदली

२३. गंगाथरण डी. यांची नाशिकच्या जिल्हाधिकारीपदावरुन मुंबई महापालिकेच्या सह आय़ुक्तपदी बदली

२४. अमोल जगन्नाथ येडगे यांची यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदावररुन महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण येथे बदली

२५. शानमुगराजन एस. यांची वाशिम जिल्हाधिकारी पदावरुन अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) मुंबई येथे बदली

२६. विजय चंद्रकांत राठोड यांची जालना जिल्हाधिकारी पदावरुन महाराष्ट्र उद्योजक विकास महामंडळ मुंबईचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली

२७. निमा अरोरा यांची अकोला जिल्हाधिकारीपदावरुन माहिती तंत्रज्ञान विभाग येथे संचालक म्हणून बदली

२८. वैभव दासू वाघमारे यांची गडचिरोलीतील अहेरी येथे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती

२९. संतोष सी. पाटील यांची उपमुख्यमंत्र्यांचे सह सचिव पदावरुन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली

30. आर.के.गावडे यांची झेडपी नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून जिल्हाधिकारी, परभणी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आहे.

31. आंचल गोयल यांची जिल्हाधिकारी, परभणी पदावरून अतिरिक्त महापालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

32. संजय खंदारे, यांची मुख्य सचिव, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

33. तुकाराम मुंढे, सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई पदावरून सचिव (AD), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

34. जलज शर्मा. जिल्हाधिकारी धुळे पदावरून यांची जिल्हाधिकारी नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

35. डॉ.ए.एन.करंजकर आयुक्त, ESIS, मुंबई पदावरून यांची महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

36. आर.एस.चव्हाण, सहसचिव, महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

37. पृथ्वीराज बी.पी. जिल्हाधिकारी, लातूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

38. रुचेश जयवंशी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, NRLM, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

39. मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जन आरोग्य योजना सोसायटी, राज्य आरोग्य विमा संस्था, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

40. मकरंद देशमुख उपायुक्त (महसूल), कोकण विभाग, मुंबई यांची सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

41. डॉ.बी.एन.बस्तेवाड मुख्य महाव्यवस्थापक (L&S), MSRDC, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., रायगड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तळजाई टेकडीची बेसुमार लचकेतोड धोकादायी

पुणे– पुण्यातील हिंगणे भागातील तळजाई टेकडीचा मागचा भाग अनधिकृतपणे फोडून भूमाफियांकडून या परिसराचे सपाटीकरण जोरात सुरु आहे. यामध्ये हा भाग धोकादायक झालेला असून येथे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पुणे महानगरपालिका व वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. माळीण, इर्शाळवाडीसारखी दुर्घटना याठिकाणी घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली असून यासंदर्भात शिवसेनेचे प्रसिद्धीप्रमुख व पर्यावरणप्रेमी अनंत घरत यांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आले आहे.

अनंत घरत म्हणाले की, पुण्यातील टेकड्यांवर बीडीपी आरक्षण असताना अनाधिकृतपणे प्लॉटिंग करून सामान्य जनतेची व प्रशासनाची मोठी फसवणूक भूमाफिया करत आहेत. हिंगणे खुर्दमधील अथर्व नगर जवळील सर्वे नंबर ५ मध्ये विकास आराखड्यात असलेला नैसर्गिक ४० फुटी नाला भूमाफियांनी बुजविला आहे. त्यावर प्रशासनाकडून कोणतेही कारवाई केली जात नाही. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार टेकड्यांवर अनधिकृत बांधकाम व प्लॉटिंगची माहिती महापालिकेला देण्यासाठी बीट ऑफिसर नेमले आहेत, परंतु ते त्यांची जबाबदारी निभावताना दिसत नाहीत. अशा टेकड्या फोडून बेकायदेशीर प्लॉटिंग केली जात आहे. सदर प्लॉटिंग करत असताना जागा मालक व विकसक यांनी तळजाई टेकडीच्या वन विभागाच्या भिंतीपासून फक्त एक ते दीड फूट जागा सोडून टेकडी फोडून पूर्णपणे सपाटिकरण केले जात आहे, यामुळे जास्त पाऊस झाला तर फॉरेस्टची भिंत कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही वर्षांपूर्वी माळीण गाव जसे उत्खननामुळे पूर्ण गाव दरड कोसळल्यावर दरड खाली झाकून गेले होते तशी परिस्थिती हिंगण्यामध्ये होईल. तसेच काही वर्षांपूर्वी कात्रज घाटा पलीकडील शिंदेवाडी मध्ये अशीच प्लॉटिंग केली असता तिथे मोठा अपघात झाला होता. त्या अपघातात निष्पापांचे बळी गेले होते. आजची रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटना ह्याप्रकारे पुण्यामध्ये हिंगणे खुर्द येथे होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे घरत म्हणाले.

ही बाब अतिशय गंभीर आहे. स्थानिक नागरिकांशी चर्चा केल्यानंतर महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून देत तक्रार केली आहे.त्यामुळे महापालिकेने या प्रकराची गंभीर दखल घेऊन तातडीनं कारवाई करावी.
– अनंत घरत ( प्रसिध्दी प्रमुख, शिवसेना)

मणिपूर मधे घडलेल्या महिला अत्याचाराच्या विरोधात पुणे शिवसेना महिला आघाडीचे निषेध आंदोलन .

पुणे : मणिपूर मधे महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात पुणे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज अभिनव कॉलेज , टिळक रोड येथे भाजप केंद्र व मणिपूर राज्य सरकारच्या विरोधात निषेधार्थ आंदोलन करण्यात आले .
यावेळी भाजपच्या स्वयंघोषित नेत्या स्मृती इराणी , चित्रा वाघ , ह्याना आता महिलांवर होणारे अत्याचार दिसत नाही का ? ५६ इंच वाल्याना देशातील महिलांची अवस्था दिसत नाही का ? असा सवाल शिवसेना महिला आघाडीच्या वतीने विचारण्यात आला .

यावेळी बोलताना शहर संघटीका सविता मते म्हणाल्या
भाजपा सरकार मध्ये महिला असुरक्षित आहे महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहे , गृहखात सक्षम नाही मणिपूर मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा .
नगरसेविका पल्लवी जावळे म्हणल्या
केंद्र सरकार सक्षम नाही कारवाई करण्यास 70 उलटून दिवस गेले मणिपुरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा राष्ट्रपती राजवट लागु करावी.
नगरसेविका संगीता ठोसर म्हणल्या
लवकरात लवकर दोषींवर कारवाई करावी कडक शिक्षा करण्यात यावी.
सदर आंदोलनाला शहर संघटीका सविता मते , शहर संघटीका मा. नगरसेविका पल्लवी जावळे ,संगीता ठोसर उपशहर संघटीका पदमा सोरटे, प्रज्ञा लोणकर ,करूणा घाडगे , विद्या होडे, सुलभा तळेकर ,रोहिणी कोल्हाल, दिपाली राऊत , वैशाली दारवटकर, अनुपमा मांगडे , भारती भोपळे, अश्विनी म्हलारे, स्वाती रणपिसे ,माया भोसले, सुनिता रानवडे ,सुरेखा शेळके, दिपाली शिगवण, भाग्यश्री सागवेकर, गौरी चव्हाण, नमिता चव्हान, प्रियांका जव्हेरी भारती जाधव ,भारती दामजी ,संगीता भिलारे ,सविता गोसावी ,सविता परदेशी ,अरुणा पवार ,अश्विनी शिंदे ,मनीषा गरुड, उज्वला भालके ,
युवती अधिकारी निकिता मारटकर मृण्मयी लिमये ,पुजा चांदगुडे, नेहा गुरव, देविका घोसरे, रोहिणी मडोळे ई उपस्थीत होते.

महाराष्ट्राच्या राजकारणातले कर्तृत्त्ववान नेते

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे अभ्यासू,कर्तृत्त्ववान आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व होय. आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल थोडंसं सांगावं वाटतं.माझा आणि त्यांचा परिचय ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वी झाला.स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्यामुळं फडणवीस साहेबांशी ओळख झाली.आमच्यातली मैत्री निखळ आणि स्वच्छ आहे. जसं आहोत तसं आम्ही एकमेकांना स्वीकारलं आहे.
२०१४ व २०१९ च्या पुणे लोकसभा व शहरातील आठ विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयासाठी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मला महत्वाची भूमिका बजावता आली. विशेषतः २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कोथरुड विधानसभा मतदार संघात भाजपाच्या विजयासाठी मी काम केले व विजय मिळवून दिला.फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत जिथं भाजपाची ताकद नाही त्याठिकाणी भाजपाचे नगरसेवक निवडून आणण्याची फडणवीस साहेबांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम देखील मी फत्ते केली आणि सर्वाधिक ९८ नगरसेवक जिंकून आणले.इतिहासात पहिल्यांदाच पुणे महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे (भाजयुमो) वार्ड अध्यक्ष ते उपमुख्यमंत्री,मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ते नगरसेवक आणि पुढे नागपूरचे महापौर झाले. १९९९ ला पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर सलग पाचवेळा ते निवडून आले. अभ्यासूपणामुळं त्यांनी विरोधकांना सळो की पळो करून सोडलं आहे. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ अशी घोषणा झाल्यानंतर २०१४ मध्ये महाराष्ट्राचे भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी शपथ घेतली.
फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग,मुंबईतील कोस्टल रोड,जलयुक्त शिवार योजना व वृक्ष संवर्धन,मुंबई,पुणे,नागपूर याठिकाणी मेट्रोचं जाळं,समान पाणी पुरवठा योजना,पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळ,चांदणी चौकातील उड्डाणपूल,कात्रज-कोंढवा रस्ता,स्मार्ट सिटी अशा अनेक योजना गतिशीलपणे राबवल्या गेल्या.
फडणवीस साहेबांच्या या तळमळीनं काम करण्याच्या वृत्तीचा आणि अभ्यासूपणाचा उपयोग महाराष्ट्राच्या कल्याणासाठी होवो.त्यांच्या हातून राष्ट्राची महाराष्ट्राची सेवा घडो आणि यासाठी त्यांना निरोगी उदंड आयुष्य मिळो ! साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

महराष्ट्राच्या राजकारणात अजितदादा पवार यांच्या इतका प्रशासनावर पकड असणारा व मैत्रीला जागणारा दुसरा नेता नाही.वाढदिवसानिमित्त अजितदादांच्या स्वभावाविषयी आणि आमच्यातील मैत्रीविषयी थोडक्यात सांगतो….
अजितदादा म्हणजे कुशल नेतृत्व, चांगला वक्तृत्व असणारे आणि स्पष्टवक्ता नेता…काटेकोर काम आणि प्रशासनावर पकड ही त्यांच्या कार्यपद्धतीची खास वैशिष्ठ्ये आहेत.यामुळे महाराष्ट्रात त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.
अजितदादा आणि माझी ओळख १९९७ साली झाली.प्रा. रामकृष्ण मोरे सरांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. माझ्या सोन्याच्या दुकानाचं उद्घाटन करण्यासंदर्भात अजितदादांना निमंत्रित करण्यासाठी मी त्यांना पहिल्यांदा भेटलो होतो.तेव्हापासून आमची मैत्री सुरु झाली.मला विशेष आनंद याचा आहे की आजही आमची मैत्री कायम आहे.
अजितदादांचा एक गुण खूप खास आहे.ते मित्रांना विसरत नाहीत.त्यांच्या कार्यकर्त्यांच्या व त्यांच्या मित्रांच्या पाठीशी ते कायम उभे राहतात.कार्यकर्त्यांना ताकद देतात.आमच्या दोघांच्या मैत्रीतही त्यांनी कधीच अंतर पडू दिले नाही.ज्या ज्यावेळी मला मदत लागली तेव्हा ते आमच्या मैत्रीला जागले आणि माझ्या मदतीला आले.आणि मी देखील त्यांच्या मैत्रीला कधी अंतर दिले नाही.
गेली ३२ वर्षे ते महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय •असून बारामती विधानसभा मतदार संघातून सलग सातवेळा ते जिंकून आले आहेत.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री,अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री,ऊर्जा मंत्री आदी विविध खात्यांचे मंत्रिपद म्हणून काम करताना त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागाची,शेती, सहकारसह उद्योग,व्यापार अशा बहुतांश सर्वच क्षेत्राची अजितदादांना बारकाईनं माहिती आहे.त्यामुळं निर्णय घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याची हातोटी त्यांच्यामध्ये दिसते.
अजितदादा म्हणजे वक्तशीरपणा.सकाळी सात वाजता ते लोकांना भेटतात व कामाला लागतात.सर्वसामान्य माणसाला देखील ते सहज उपलब्ध असतात.
अजितदादांच्या याच गुणांचा उपयोग महाराष्ट्राच्या भल्यासाठी होवो. त्यांच्या हातून राष्ट्राची महाराष्ट्राची सेवा घडो आणि यासाठी त्यांना निरोगी उदंड आयुष्य मिळो ! आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत ही सदिच्छा! दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

(लेखक:माजी खासदार संजय काकडे )

धारावी पोलीस ठाणे येथे महिला समुपदेशन केंद्रासाठी स्वयंसेवी संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 21 : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी धारावी पोलीस ठाणे येथे महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. हे केंद्र चालविण्यासाठी इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी पुढील दहा दिवसांच्या आत अर्ज करण्याचे माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

अर्जदार संस्था ही नोंदणीकृत तसेच मुंबई शहर जिल्ह्यातील (स्थानिक) महिला पदाधिकारी असलेली असायला हवी. संस्थेस किमान ३ वर्षांचा महिला समुपदेश क्षेत्रातील अनुभव आवश्यक जास्त अनुभव असल्यास प्राधान्य, समुपदेशनासाठी MSW उत्तीर्ण दोन समुपदेशक कर्मचारी यांची यादी व कागपत्रे जोडणे आवश्यक आहे. संस्थेची घटना व नियमावली आवश्यक ज्यामध्ये महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे हा उद्देश असावा. संस्थेचे मागील तीन महिन्यांचे महिनानिहाय बँक स्टेटमेंट जोडावे. अर्ज करताना संस्थेने कार्यरत पदाधिकारी यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक यादी जोडावी.  संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सदस्य एकमेकांचे नातेवाईक नाहीत, तसेच कोणाही सदस्य शासकीय सेवेत नाहीत, याबाबतचे हमीपत्र जोडावे. संस्थेने सार्वजनिक संपत्तीचा अपहार केलेला नाही, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जोडावे. संस्थेच्या पदाधिकारी (अध्यक्ष व सचिव) यांचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे स्वाक्षरीचे चारित्र्य प्रमाणपत्र जोडावे. तसेच ज्या स्वयंसेवी  संस्थांनी समुपदेशन केंद्रासाठी यापूर्वी प्रस्ताव सादर केले होते, त्यांनीही पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय मुंबई शहर, १९७ बी.डी.डी. चाळ, पहिला मजला, वरळी मुंबई ४०००१८ येथे संपर्क साधावा.

अन् मदतीसाठी सरसावले अनेक हात….!

नैसर्गिक आपत्ती होते तेव्हा त्याला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसतो. हवामानासबंधी नैसर्गिक आपत्तींमध्ये उष्णकटिबंधीय चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, वन्य अग्नी, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा आणि शीतलहरी यांचा समावेश आहे, नैसर्गिक आपत्ती या अनिश्चित असतात.

नैसर्गिक आपत्तीत धोकादायक घटना घडतात की, ज्यात मालमत्ता व वस्तूंचे नुकसान तसेच जीवितहानी व मनुष्यहानी होऊन जनजीवन विस्कळीत होते.

कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा आणि डोंगररांगांमुळे कोकणात सर्वाधिक पावसाची नोंद होते. त्यामुळे कोकणाला मोठया प्रमाणात नैसर्गिक आपत्तीचा सामना ही करावा लागतो. कोकण विभागात एकूण 7 जिल्हे असून 50 तालुके आणि 6 हजार 353 गावे आहेत. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक म्हणजे सरासरी 2 हजार ते 3 हजार 368 मि.मी. पाऊस हा कोकणात पडतो. विशेषत: मुंबई व ठाणे जिल्ह्यात कमी कालावधीत जास्त पाऊस आणि भरतीची वेळ एकच असल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. कोकण विभागात गेल्या सहा वर्षात सरासरी 2 हजार 701.40 मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. विभागात एकूण 371 पूरप्रवण व 223 दरडग्रस्त गावे आहेत.

कोकणात वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने 3 हजार 200 कोटी रुपये विविध आपत्ती निवारण कामे करण्यासाठी मंजूर केले आहेत. यामध्ये भूमिगत वाहिन्या, धूप प्रतिबंधक बंधारे, बांध घालणे, बहुउद्देशीय चक्रीवादळात आसरे बांधणे, दरडी प्रवण क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाय, वीज अटकाव यंत्रणा यांचा समावेश आहे. राज्यभरातील 20 पूरप्रवण जिल्ह्यांमध्ये एकूण 7 हजार 900 आपदा मित्रांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

असे असताना दरडप्रवण क्षेत्रात न मोडणाऱ्या रायगड जिल्हयातील इशाळगड येथे परवा दि.19 जुलै 2023 रोजी रात्रीच्या वेळी इशाळगडाच्या पोटात वसलेल्या आणि कलावंतीण दुर्गाच्या शेजारी असलेल्या प्रसिध्द ट्रेकर्स पॉईंट असलेल्या इशाळवाडीवर बुधवारी रात्री दु:खाचा डोंगर कोसळला. शांत निजलेल्या इशाळवाडीत अवघ्या काही क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि सारा महाराष्ट्र हादरुन गेला. रायगड जिल्हयातील माथेरान आणि आसपासच्या परिसरात गेल्या तीन- चार दिवसापासून मुसळधार पाऊस झाला. त्यामुसळधार पावसामुळे इशाळवाडीतील 48 पैकी 17 घरे गाडली गेली. या दुर्घटनेत जवळपास वीस घरांचे गंभीर नुकसान झाल असून उर्वरीत दहा घरे वाचली आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथक अवघ्या तासभरातच घटनास्थळी दाखल झाले. गुरुवारी दिवसभरातही पाऊस आणि जोरदारात वाऱ्यामुळे बचाव पथकांची निसर्गाने जणू परीक्षच घेतली. पाऊसामुळे माती निसरडी झाल्याने वाडीपर्यत पोहचण्यास बचाव पथकाला खूप कष्ट घ्यावे लागत होते. त्यामुळे रात्रीच्यावेळी घटनास्थळी तातडीने बचाव आणि मदतकार्यास सुरु करण्यास अडचणी उद्भवल्या. अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी ही वाडी असल्याने मदतीसाठी कोणतेही यांत्रिकी साधने आणणे शक्य नव्हते. त्यामुळे फक्त माणसाच्या मदतीने येथे मदत पोहाचविणे शक्य होते.

एनडीआरएफ , एसडीआरएफ, टिडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रत्यक्ष मदतकार्यास सुरुवात झाली. या शिवाय ट्रकेर्स ग्रुप, स्वंयसेवी संस्था, देखील मदतीसाठी सरसावल्या.

या दुर्घटनेची माहिती मिळताच गुरुवारी पहाटे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी अतिशय कठीण वाट पायाखाली तुडवत दरड दुर्घटनास्थळी जाण्याचा निर्णय घेतला. तब्बल दीड ते दोन तास पायी दगडधोंडयाचा निसरडा चिखलमय निसरडा रस्ता तुडवत प्रसंगी प्रतिकुल परिस्थितीत मुख्यमंत्री श्री. शिंदे इशाळगडावर पोहचले. वाटेत दुर्घटनाग्रस्त कुटूंबियांशी आस्थेवाईकपणे चौकशी करत जणू त्यांचे दु:खअश्रू पुसण्याचे काम ते करत होते. एवढयावर न थांबता वेळप्रसंगी हवाई मदतीसाठी सूचना देत अन्न, पाणी, निवाराची सोय आहे की नाही याची जातीणं पाहणी करत होते.

या त्यांच्या तत्परतेमुळे अनेक जाणते अजाणते हातामध्ये हत्तीच बळ संचारले होते. यात ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन वहाने तातडीने रवाना करण्यात आल्या. तात्पुरते राहण्यासाठी सोय व्हावी यासाठी आठ कंटेनर देखील पाठविण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून रायगड जिल्याहयातील उद्योग व संस्था देखील पुढे आल्या आहेत. रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुविधा निर्माण करण्यासाठी साहित्य, घटनास्थळाकडे पाठविण्यात येत होते. यामध्ये मदत साहित्य व निवाऱ्यासाठी घटनास्थळाच्या बेस कॅम्पकडे 20 X 10 आकाराचे चार कंटेनर पाठविण्यात येत आहेत. 40 X 10चे दोन कंटेनर पाठविण्यात आल्या आहेत. सदर कंटेनर उरण, जेएनपीटी , रत्नागिरी एमआयडीसी, जेएसडब्ल्यू समूह येथून रवाना झाले आहे. घटनास्थळ उंचावर असल्याने मशिनरी साहित्य पोहोचत नसल्याने दरड कोसळून निर्माण झालेले मातीचे ढिगाऱ्या करण्यासाठी दूर करण्यासाठी पनवेल येथून एैशी अनुभवी कारागिराचे पथक औजारासह दाखल झाले आहेत. येथील विद्युतपुरवठा सुरळीत सुरु होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत अभियंता , महावितरण यांचे पथक पाठविण्यात आले आहेत.

या सह यंत्रणेसाठी तात्पुरती निवारा व्यवस्था, अन्न व पिण्याचे पाण्याची व्यवस्था या दुष्‍टीने महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिषदाचे पाणीपुरवठा अभियंता व त्यांची यंत्रणाकाम करत आहेत. तेथे साहित्यसामुग्री व अतिमहत्वाच्या व्यक्तींचा समन्वय , हॅलीपॅड आदि सुविधा तयार केले जात आहेत. जिल्हा शलयचिकित्सक अलिबाग यांच्याकडून जखमीवर उपचार केले जातात. विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी योगेश म्हसे, पोलिस अधिक्षक सोमनाथ घारगे, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील मदतकार्यवर लक्ष्य ठेवून आहेत.
स्वत: विभागीय आयुक्त डॉ.कल्याणकर, जिल्हाधिकारी श्री.म्हसे दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर तातडीने रात्री दीड वाजता घटनास्थळी प्रत्यक्ष पोहचले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय अधिकारी अजित नराळे

यांनी खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी यांनी रात्री परिस्थितीचा अंदाज घेत बचाव कार्यासाठी आवश्यक साधन सामुग्री, मनुष्यबळ उपाययोजनांची तयारी केली. महसूल, जिल्हापरिषद व पोलीस विभागाच्या अधिकारी कर्मचारीसह नागरी संरक्षणदल मुंबई येथून दोन पथके, एनडीआरएफची चार पथके दीडशे मनुष्यबळासह घटनास्थळी पोहचले आहेत. याच बरोबर इतर विभागाच्या अधिकारी व कर्मचारी, ट्रेकर्स, मंडळे जवळपास सातशे जण मदतकार्यास पोहचले आहेत. नवीमुंबई महानगरपालिका अग्निशामकदलाचे पथकात 44 अधिकारी कर्मचारी दोन जेसीबीसह काम करत आहेत. सहाय्यक अग्निशमन केंद्राअधिकारी शिवराम ढुमणे यांचा हदयविकाराने मृत्यू झाला. एरव्ही शासकीय अधिकारी कर्मचारी कायम टिकेचे धनी होत असतात. भले काम करत असतांन वेळ प्रसंगी मृत्यूला सामोरे जावे लागते. ही नित्याची बाब झाली आहे. परंतू त्यांच्या कामाची साधी दखल कुठे घेतली जात नाही. हे अतिशय दुदैवी बाब आहे.

आजही भर पावसात मदत कार्य सुरु असून काल सर्वाधिक 198 मि.मी. पावसाची नोंद रायगड जिल्ह्यात झाली. यावेळी कोकण विभागाच्या सरासरी 136.7 मि.मी. पाऊस झाला आहे. अशावेळी दुर्घटनास्थळी वाहने पोहोचण्यात अडचण असल्याने मदत कार्य थांबू नये यासाठी माहिती असलेल्या स्थानिकांची व संस्थांची मदत घेतली जात आहे. यामध्ये युवा संघटना, महाराष्ट्र सह्याद्री ट्रेकर ग्रुप्स, यशवंती हॅकर्स, विविध ट्रेकर्सचा देखील सहभाग आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर ३००० फूड पॅकेटस उपलब्ध करण्यात आले आहेत. यासह घटनास्थळावर पाणी बॉटल्स, ब्लॅंकेट्स, टॉर्च, मदत साहित्य, चादरी, बिस्कीट तसेच इतर प्रथम उपचार साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या दुर्घटनाग्रस्त आदिवासी पा़ड्यावर बचाव व मदत कार्यात स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आहे. मदतीसाठी शासकीय विभागांची, संघटना व स्वयंसेवी संस्थांची मदत पथके रवाना झाली. यामध्ये पुणे, अलिबाग, खोपोली, कर्जत, लोणावळा, पनवेल, वाशी, मुंबई व येथील सहभाग आहे.

या दुर्घटनेत मदत कार्यात पशुधनाची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत.

पथकामार्फत गुरुवारी 11 शेळ्या व 10 गोवर्गीय जनांवरावर उपचार करण्यात आले. तसेच या ठिकाणी एकूण 3 बैल व एक शेळी मृत आढळून आलेली असून, त्यांचे फोटो व पंचनामे करण्यात आले आहे. या पथकांमार्फत जखमी पशुधनास उपचार करणे, मृत पशुधनाचे फोटो व पंचनामे करणे, शास्त्रोक्त पद्धतीने मृत जनावरांची विल्हेवाट लावणे व जखमी पशुधनास खाद्याचे नियोजन करणे इत्यादी कामे करण्यात आली.

एकूणच काय तर जेव्हा एखादी आपत्ती उद्भवते तेव्हा त्या घटनेमागे अनेक कारणे असतात. परंतू दुर्घटनाग्रस्तांना मदतीसाठी अनेक जाणते अजाणते हात तेथे सिंहाचा वाटा उचलत असतात. हे काम करत असतांना मदतकर्त्याना अनेक संकटाना तोंड देत अहोरात्र मदतीचा ओघ सुरु असतो.

  • संजीवनी जाधव-पाटील
    सहायक संचालक (माहिती)
    विभागीय माहिती कार्यालय,
    नवी मुंबई

पालकमंत्री मंगलप्रभात लोढांनी मुंबई महापालिकेत नागरी सुविधा कक्ष सुरू केल्यावर ते म्हणाले ..विरोधकांना पोटशूळ

मुंबई-तुम्ही मविआ सरकार घरात बसून फेसबुक लाईव्हवर चालवले. शिंदे-फडणवीस सरकार जनतेत उतरून त्यांचे प्रश्न सोडवत आहे. मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्याच्या हेतूने मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेत नागरिक सुविधा कक्ष सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सोडवले तर शिवसेना ,काँग्रेसच्या पोटात दुखायचे कारणच काय ? अशा शब्दांत मुंबई भाजपाने ट्विट करत आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. मुंबईकरांना न्याय मिळू नये अशी तुमची इच्छा आहे का ? असाही सवालही उपस्थित करण्यात आला.
पर्यटन, कौशल्य, रोजगार मंत्री व उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ६ जून २०२३ रोजी महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांना पत्र पाठवून नागरी समस्या निवारणासंदर्भात नागरिक कक्षाची स्थापना करण्याच्या दृष्टीने मुख्यालयात कार्यालय उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्या दृष्टीकोनातून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून दिली. महापालिकेकडे नागरी समस्या सोडवण्यासाठी व नागरिकांचे म्हणणे ऐकण्यासाठी हे दालन उपनगराचे पालकमंत्री लोढा यांना उपलब्ध करून दिले आहे. सरकार आपल्या दारी या संकल्पनेद्वारे पालकमंत्री हे महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांमध्ये जाऊन जनता दरबार घेत आहेत, या कामांचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने तसेच समस्या मांडणाऱ्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यालयात हे कार्यालय सुरू करून एक प्रकारे जनतेला न्याय देण्याचाही प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

युवा पर्यटन मंडळ स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

पुणे, दि. २१ : केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व विद्यालयामध्ये ७ वीपासून पुढील वर्गातील विद्यार्थ्यांसाठी युवा पर्यटन मंडळाची स्थापना करावयाची आहे. त्यासाठी प्रोत्साहन स्वरुपात ‘प्रथम येईल त्यास प्राधान्य’ या तत्वावर अनुदान देण्यात येणार असून शाळा, महाविद्यालयांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन पुणे पर्यटन संचालनालयाने केले आहे.

युवा पर्यटन मंडळ स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन स्वरुप अनुदान म्हणून सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षांत शाळांमध्ये स्थापन केलेल्या प्रत्येकी एका क्लबसाठी १० हजार रुपये तर महाविद्यालयांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येकी एका क्लबसाठी २५ हजार रुपये असे अनुदान ‘प्रथम येईल त्यास प्राधान्य’ या तत्त्वावर देण्यात येणार आहे.

देशातील, राज्यातील पर्यटन, समृद्ध वारसा व संस्कृती यांचे माहितीगार म्हणून जागतिक स्तरावर देशाची प्रसिद्धी करण्यासाठी व भारतीय पर्यटनाचे युवा राजदूत घडविण्यासाठी राज्यातील मान्यता प्राप्त शाळांमध्ये युवा पर्यटन मंडळाची स्थापना करावयाची आहे. यातून विद्यार्थी व तरुणांमध्ये संघभावना, व्यवस्थापन नेतृत्व आणि सेवा यासारखी महत्त्वाची कौशल्ये आत्मसात करण्याची वृत्ती तसेच शाश्वत व जबाबदार पर्यटनाची जाणीव जागृती निर्माण करण्यास सहाय्य होईल.

युवा पर्यटन मंडळाची स्थापना करण्याबाबत अधिक माहितीसाठी पर्यटन संचालनालय पुणे विभागीय कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक- ०२०-२९९००२८९ व भ्रमणध्वनी क्रमांक ८०८००३५१३४ वर तसेच केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाचे संकेतस्थळ https://tourism.gov.in/whats-new/yuva-tourism-club या संकेतस्थळावरुन माहिती घेण्यात यावी, असे आवाहन पर्यटन संचालनालय पुणे विभागीय सहायक संचालक सुप्रिया करमरकर-दातार यांनी केले आहे.

सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ पदभरतीसाठी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई, दि. २१-  महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या आस्थापनेवरील सहायक सरकारी अभियोक्ता, गट अ या संवर्गातील ५४७ पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयेागामार्फत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतून मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आयोगामार्फत घेण्यात आल्या होत्या, त्यातील पात्र उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयेागाच्या संकेतस्थळावर आज, दि. २१ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या संवर्गाची इतक्या मोठ्या प्रमाणात पदभरती आयोगाने अत्यंत कमी वेळेत पूर्ण केली आहे. आज जाहीर करण्यात आलेली सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची आहे, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने २० हजारावर वृक्ष लागवडीचा २२ जुलै रोजी शुभारंभ

पुणे, दि. २१: ‘पर्यावरणाप्रती कृतज्ञता-वृक्षारोपण व संवर्धन’ या अभियानाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्यावतीने २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मोरगाव येथे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या हस्ते २० हजाराहून अधिक वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन सा. बां. (वैद्यकीय) उपविभाग बारामतीच्यावतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने श्री. चव्हाण यांनी माहिती दिली. ते म्हणाले, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सर्व अभियंते व कर्मचारी यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूस आणि शासकीय इमारत परिसरात किमान १० फूट उंचीचे २० हजारापेक्षा अधिक वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. स्वदेशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करणे या वृक्षारोपणाचा मुख्य हेतू आहे.

वृक्षारोपणासाठी १० ते १२ फूट उंचीच्या वैशिष्टपूर्ण झाडांची निवड आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथील नर्सरीमधून करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, कडुलिंब, सोनचाफा, कदंब, बहावा, आंबा, मोहोगणी, कैलासपती आदी वृक्षांची लागवड करुन शाश्वत आणि हरित पर्यावरण करण्याचा संकल्प केला आहे. यामुळे परिसर सुशोभीकरण, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा, जैवविविधता संवर्धन आणि हवामान बदलाचे परिणामावर उपाययोजना यासारखे पर्यावरणीय फायदे होण्यास मदत होणार आहे.

प्रादेशिक विभागातील ५ जिल्ह्याअंतर्गत असलेल्या १७ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिनस्त असलेली पर्यटन स्थळे, तीर्थक्षेत्रे तसेच नागरिकांच्यी गर्दी असलेल्या ठिकाणी किमान ५ कि.मी. लांबीमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूस वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अभियंता श्री. चव्हाण यांनी दिली.

श्री. चव्हाण यांनी या अभियानात सक्रीय सहभाग नोंदवत स्वतः १ हजार झाडे देण्याचा व त्यांचे वृक्षारोपण करुन १३ वर्ष जगविण्याचा संकल्प केला आहे. सर्व अभियंत्यांनी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार व्यक्त करुन पर्यावरणाप्रती जागरुकता निर्माण केली आहे.

मनिषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन: निसर्गाचे आपण देणे लागतो आणि आपण निसर्गास काही तरी दिले पाहिजे या उदात्त हेतूने रस्त्याच्या कडेला आणि शासकीय इमारती परिसरात झाडे लावून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या सूचना विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
0000

24 तासांत मुंबई महापालिकेतील कार्यालय खाली करा, अन्यथा मुंबईकर संताप दाखवतील, आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

मुंबई

मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे महापालिकेतील कार्यालय 24 तासांत खाली केले नाही, तर मुंबईकर आपला संताप दाखवतील, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. पालकमंत्र्यांना महापालिकेत कशासाठी दालन हवे? त्यांचा महापालिकेशी काय संबंध? असे विविध प्रश्न त्यांनी यासंबंधी उपस्थित केलेत.

आदित्य ठाकरे याप्रकरणी म्हणाले की, आम्ही मंत्री असताना महापालिकेत बैठका घेतल्या. पण कोणतेही दालन हडपले नाही. हे थांबले पाहिजे किंवा मंत्रालयत सर्वच शहरांच्या महापौरांना दालन दिले पाहिजे. मला मुंबईचा आमदार म्हणून महापालिकेत केबिन दिली पाहिजे.

प्रशासनाने पालिकेतील नगरसेवकांची कार्यालये बंद केली. पण आता हे मंत्री महापालिकेत घुसखोरी करून दादागिरी करत आहेत. त्यांचा हुकूमशाही चालवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे 24 तासात थांबले नाही. केबिन खाली केली नाही, तर कधी ना कधी तरी मुंबईकर आपला राग व्यक्त करतील. त्याला जबाबदार कोण असेल हे मला माहीत नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.यावेळी त्यांनी विधानसभेत विरोधकांची मुस्कटदाबी सुरू असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले की, आम्हाला मणिपूरच्या मुद्यावर बोलू दिले नाही. ज्या महिलांची नग्न धिंड काढली त्यातील एक महिला कारगिलमध्ये लढलेल्या जवानाची पत्नी आहे. तिच्यावर असा अत्याचार होत असेल तर कुठे गेली तुमची देशभक्ती? कुठे गेले तुमचे देशप्रेम? तुम्ही महिला असणे गरजेचं नाही. तुम्ही कुणाचा तरी भाऊ, बहीण व आई असणे गरजेचे नाही. या देशातील नागरिक म्हणून असे कुणासोबत घडले तर तुम्हाला राग आलाच पाहिजे. संताप आलाच पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.