संकल्प 2023-24 सह तुमचा कायदेशीर प्रवास पूर्ण करा! संकल्प हा एक अनोखा आणि मोफत कायदा प्रवेश प्रशिक्षण कार्यक्रम आहे जो अनेकांना त्यांच्या व्यावसायिक कायदेशीर शिक्षण घेण्यास आणि राष्ट्रीय कायदा विद्यापीठांमध्ये (NLUs) एक प्रतिष्ठित स्थान मिळवण्यासाठी सक्षम करणार आहे.
‘संकल्प’बद्दल बोलताना सोनू सूद म्हणतो ” ज्या लोकांना कायद्याची करिअर म्हणून निवड करायची आहे त्यांना गाईड करण्यासाठी देवाने माझी निवड केली आहे हे पाहून मला खूप आनंद होतो. मला खात्री आहे की आपला देश नक्कीच सुरक्षित आणि सक्षम हातात असेल.” ज्यांना कोविड मध्ये नुकसान सहन करावे लागले आहे किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (EWS) आले आहे अश्या विद्यार्थ्यांना यात प्राधान्य दिले जाणार आहे. या अनोख्या संधीचा फायदा सर्व 11वी, 12वी वर्गातील विद्यार्थी आणि अलीकडील पदवीधरांना होऊ शकतो. अभिनयाच्या पलिकडे जाऊन नेहमीच सोनू अशी अनेक काम करून पुन्हा प्रेक्षकांची मन जिंकत आहे.
पुणे: जीवघेण्या विद्युत अपघातांचे प्रकार अत्यंत क्लेशदायी असतात. यापुढे घरगुती किंवा सार्वजनिक ठिकाणच्या वीजयंत्रणेमुळे कोणत्याही प्रकारचा विद्युत अपघात होणार नाही यासाठी शून्य विद्युत अपघाताचे ध्येय कायम ठेवा. विद्युत सुरक्षेचा जागर करण्यासाठी सातत्याने स्थानिक उपक्रम राबवा व नागरिकांशी संवाद साधा. सोबतच धोकादायक यंत्रणेबाबत प्राप्त तक्रारींचे निराकरण तत्परतेने होण्यासाठी पर्यवेक्षण करा असे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी मंगळवारी (दि. १८) दिले.
रास्तापेठ येथील प्रशासकीय कार्यालयात पुणे परिमंडलातील विद्युत सुरक्षेसंदर्भात जनजागरण व उपाययोजनांबाबत आढावा बैठक झाली. यावेळी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार बोलत होते. कार्यकारी अभियंता (प्रशासन व सुरक्षा) सर्वश्री धनराज बिक्कड, भागवत थेटे, अमित कुलकर्णी, शेखर मुरकुटे तसेच सर्वच १२ विभाग कार्यालयांतील अतिरिक्त कार्यकारी अभियंता (प्रशासन व सुरक्षा) बैठकीला उपस्थित होते.
मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले, की विद्युत सुरक्षेसाठी नागरिकांना ‘वीजसाक्षर’ करण्याची गरज आहे. लहानांपासून आबालवृद्धांनी जाणता अजाणता घरगुती किंवा सार्वजनिक वीजयंत्रणेपासून नेहमीच सतर्क व सजग राहावे यासाठी त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. पुणे परिमंडल अंतर्गत प्रत्येक शाखा कार्यालयस्तरावर व प्रामुख्याने दाट लोकवस्तीच्या ठिकाणी विद्युत सुरक्षेच्या जनजागरासाठी सातत्याने उपक्रम आखावेत. तसेच धोकादायक वीजयंत्रणेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींचे शाखा किंवा उपविभागस्तरावर तत्परतेने निवारण होते किंवा नाही यासंदर्भात पर्यवेक्षण करावे असे निर्देश श्री. पवार यांनी दिले. धोकादायक वीजयंत्रणेच्या दुरुस्तीकडे हेतुपुरस्सर हयगय खपवून घेतली जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘व्हॉटस् अॅप’ क्रमांक- धोकादायक वीजयंत्रणेची माहिती देण्यासाठी पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांसाठी ७८७५७६७१२३ हा व्हॉटस् अॅप मोबाईल क्रमांक उपलब्ध आहे. या क्रमांकावर महावितरणच्या धोकादायक वीजयंत्रणेचा फोटो व पत्ता किंवा लोकेशनसह माहिती / तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. कॉल करण्याऐवजी फक्त धोकादायक वीजयंत्रणेची माहिती व्हॉटस् अॅप किंवा ‘एसएमएस’द्वारे द्यावी.
फ्यूज पेट्या किंवा फिडर पिलरचे झाकणे उघडे किंवा तुटलेले आहे. रोहित्रांचे कुंपण उघडे आहे. वीजतार तुटलेली आहे. झोल पडलेला किंवा जमिनीवर लोंबळकत आहे. भूमिगत वाहिनी उघड्यावर आहे. मुसळधार व संततधार पावसामुळे माती वाहून गेल्याने किंवा अन्य कारणांमुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण झाला आहे इत्यादी स्वरुपाची माहिती/तक्रारी शक्य असल्यास छायाचित्रांसह संबंधीत स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून किंवा लोकेशन शेअर करून व्हॉटस् अॅपद्वारे पाठवता येतील. यासह महावितरणच्या १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर देखील संपर्क साधून धोकादायक यंत्रणेची माहिती देण्याची सेवा उपलब्ध आहे.
मुंबई : धर्मादाय रूग्णालय योजनेच्या अनुषंगाने रुग्णालयांकडून पुरविण्यात येत असलेल्या रुग्णसेवेच्या संदर्भात वारंवार शासनास तक्रारी प्राप्त होत असतात. या तक्रारींच्या अनुषंगाने धर्मादाय रुग्णालयांवर शासनाचे नियंत्रण ठेवून योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली 27 एप्रिल 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये धर्मादाय रूग्णालय आदर्श कार्यप्रणाली व समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात आली असून धर्मादाय रुग्णालयांच्या तपासणीसाठी ‘तपासणी समिती’ स्थापन करण्यात आली आहे. ही समिती धर्मादाय रुग्णालयांमधून दर्जेदार रूग्ण सेवा देण्यासाठी रूग्णालयांची तपासणी करणार आहे.
या समितीबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. धर्मादाय रूग्णालयांमधून आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात येतात. मुंबई विश्वस्त कायद्यांतर्गत नोंदणीकृत धर्मादाय रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येत आहे. मुंबई शहर व उपनगर क्षेत्रातील तपासणी समितीमध्ये सहायक धर्मादाय आयुक्त अध्यक्ष राहणार असून सहायक संचालक, आरोग्य सेवा सदस्य सचिव असणार आहे. तसेच महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी/ प्रतिनिधी, सहायक वस्तू व सेवा कर आयुक्त, सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिनस्थ कोणत्याही कार्यालयातील कार्यरत लेखाधिकारी सदस्य असणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबई शहर व उपनगर वगळता उर्वरित कार्यक्षेत्रातील जिल्हास्तरातील तपासणी समितीमध्ये सहायक धर्मादाय आयुक्त अध्यक्ष, सबंधित जिल्हा सोडून इतर जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक / अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सदस्य सचिव असणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्थ कोणत्याही कार्यालयातील कार्यरत लेखाधिकारी, सहाय्यक वस्तू व सेवा कर आयुक्त सदस्य असणार आहेत.
ही समिती धर्मादाय रुग्णालय योजनेंतर्गत उपचार केलेल्या अभिलेख्यांची त्रैमासिक तपासणी करणार आहे. समिती रुग्णांचे केस पेपर, रूग्णांवर केलेल्या संबंधित चाचण्यांची आवश्यकता पडताळणी, चाचण्यांसाठी आकारलेला खर्च, रुग्ण आर्थिकदृष्ट्या कमकुवत किंवा गरीब असल्याबाबतचे प्रमाणपत्र आदींची तपशीलवार तपासणी करेल. तसेच रुग्णालयांचा आयपीएफ फंड व त्यातून झालेला खर्चही समिती तपासणार आहे. ही समिती आपला अहवाल आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव अथवा प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या उच्चस्तरीय समितीस सादर करणार आहे.
मुंबई : दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वेची वाहतूक काही ठिकाणी खंडित झाली होती, तर काही ठिकाणी संथपणे सुरू होती. अशावेळी कार्यालयातून अथवा आपल्या कामावरुन घरी निघालेल्या मुंबईच्या चाकरमान्यांना लवकरात लवकर सुरक्षित घरी पोहोचता यावे, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी एसटीला मुख्य रेल्वे स्थानकाजवळ आपल्या बसेस तैनात करण्यास सांगितले.
तसेच त्या बसेस द्वारे रेल्वेस्थानकात अडकलेल्या प्रवाशांची मोफत सोय करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ‘एसटी’च्या मुंबई आणि ठाणे विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला ठाणे, कल्याण इत्यादी महत्त्वाच्या रेल्वेस्थानकावर आपल्या १०० पेक्षा जास्त बसेस लावून तेथून प्रवाशांची त्यांच्या निवासी क्षेत्रापर्यंत मोफत वाहतूक करण्याचे नियोजन केले आहे.
मुंबई : मुंबई महानगरात यंदा नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे चोखपणे पार पडली आहेत. त्याचा प्रत्यय जोरदार पावसावेळी पाण्याचा वेगाने निचरा होवून आला आहे. त्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे कौतुक केले पाहिजे, असे उद्गार काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पावसाळापूर्व कामे योग्यरितीने पार पडल्याची पोचपावती दिली.
मुंबईत पाऊस कोसळत असताना महानगरपालिका आयुक्तांसह सर्व विभागांचे सहायक आयुक्त व सर्व यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहेत, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. पावसाची परिस्थिती व अंदाज लक्षात घेवून स्थानिक प्रशासनाने योग्य ते निर्णय घेण्याचे निर्देश राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुंबईत सतत कोसळत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल यांच्या निर्देशानुसार, मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना (नर्सरी ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या) उद्या गुरुवार 20 जुलै 2023 रोजी महानगरपालिकेने सुटी जाहीर केली आहे.
भारतीय हवामान खात्याने मुंबईतील पावसाच्या शक्यतेसाठी दिलेल्या ‘ऑरेंज अलर्ट‘ च्या पार्श्वभूमीवर नागरी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालिन व्यवस्थापन विभागाला आज भेट दिली. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घराबाहेर जावू नये, सुरक्षितस्थळी राहावे, पर्यटकांनी अकारण समुद्र किनारी जावू नये, असे आवाहन करतानाच घराकडे परतीचा प्रवास करत असणाऱ्या चाकरमान्यांची आवश्यकता असेल तेथे तात्पुरता निवारा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्याचे निर्देशही यावळी मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले.
यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (शहर) श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुधाकर शिंदे, सहआयुक्त (शिक्षण) अजीत कुंभार, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलीन सावंत, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडळकर, संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर आदींनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने माहिती दिली.
मुंबईतील जनजीवन, महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजना, वाहतूक व्यवस्था तसेच पाणी साचणाऱ्या सखल ठिकाणांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षातून घेतला. बेस्ट आणि एसटी प्रशासनालाही नागरिकांसाठी वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. हिंदमाता, परळ, गांधी मार्केट, मिलन भुयारी मार्ग, अंधेरी भुयारी मार्ग या सखल भागातील स्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. कोणत्याही ठिकाणी पाणी साचले नाही. महानगरपालिकेची यंत्रणा पूर्णपणे कार्यरत असल्याचा हा परिणाम आहे. संपूर्ण मुंबईत मिळून सुमारे ४५० ठिकाणी पावसाचे पाणी उपसा करणारे पंप लावल्याचा परिणाम म्हणून पाण्याचा वेगाने निचरा झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
मुंबईत पर्जन्य जलवाहिन्या, मलनिसारण वाहिन्या आदींच्या प्रवेश मार्गांवर (मॅनहोल) असलेल्या झाकणाखाली जाळ्या लावण्याच्या सूचना महानगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार आतापर्यंत सखल भागातील सुमारे ३ हजार मॅनहोल कव्हरखाली जाळ्या लावण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. उर्वरीत ठिकाणच्या मॅनहोल जाळ्या लावण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करावी. ज्याठिकाणी मॅनहोल चोरीचे प्रकार निदर्शनास येत आहेत, अशा ठिकाणी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
विभागीय पातळीवर खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत. कोणत्याही नागरिकाच्या तक्रारीवर तातडीने कार्यवाही करावी. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे बुजवून सर्व रस्त्यांवर वाहतूक तत्काळ सुरू होईल, असे पहावे, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत असून कोणतीही दुर्घटना अथवा अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत, त्यानुसार सर्व यंत्रणा दक्ष आहे, असेही मुख्यमंत्री महोदयांनी नमूद केले.
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ११ सप्टेंबर २०२२ (पेपर क्रमांक १) व दिनांक २५ सप्टेंबर २०२२ (पेपर क्रमांक २) रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा २०२० मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या एकूण ६५० पदांपैकी आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गाच्या ६५ पदांचा निकाल उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राखीव ठेवून उर्वरित ५८३ पदांचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.
परीक्षेच्या जाहिरातीत अनाथ प्रवर्गासाठी ०६ पदे राखीव होती. तथापि, अंतिम निकालात केवळ ०४ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले असल्यामुळे अनाथ प्रवर्गाची ०२ पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.
या परीक्षेच्या जाहीर केलेल्या निकालानुसार वाशिम जिल्ह्यातील श्री. खचकड सुनिल भगवान, हे राज्यातून तसेच मागासवर्गातून प्रथम आले आहेत. तसेच महिला वर्गवारीतून अहमदनगर जिल्हयातील श्रीमती बिडगर सुरेखा रमेश, ह्या राज्यात प्रथम आल्या आहेत.
आयोगाच्या संकेतस्थळावर कट ऑफ मार्क्स प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या ५८३ उमेदवारांचा गुणवत्ताक्रम आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गासाठी राखीव ६५ पदांचा निकाल जाहीर झाल्यानंतर अंतिम करण्यात येईल.
अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे लोकसेवा आयोगाने कळविले आहे.
जोरदार पावसामुळे रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर डोंगराचा काही भाग कोसळून अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना घडली.ढिगाऱ्याखालून 75 जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. तर, आतापर्यंत 5 जणांचे मृतदेहही बाहेर काढण्यात आले आहेत. आणखी 60 हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.खालापूर येथील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर दरड कोसळली आहे. वसाहतीत आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. खालापूरमधील चौक गावापासून 6 किलोमीटर अंतरावर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासी वाडी आहे.
रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरड कोसळलेल्या इर्शाळवाडी गावात 50 ते 60 घरे असून गावात जवळपास 200 ते 300 मतदार म्हणजेच 18 वयापुढील नागरिक आहेत. जवळपास 30 ते 40 घरातील लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. यातील जवळपास 60 जणांचा मृत्यू झाल्याची भीती रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक व एनडीआरएफच्या पथकाने बचावकार्याला सुरूवात केली आहे. काही जणांना वाचवण्यात यश आले आहे.
25 जणांना वाचवण्यात यश
कॅबिनेट मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे घटनास्थळी पोहोचले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही थोड्याच वेळात घटनास्थळी पोहोचणार आहेत. आतापर्यंत सुमारे 25 जणांना वाचवण्यात यश आले आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाजवळच हे गाव असून धरण परिसरातील घरांवरच दरड कोसळल्याची माहिती आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, इर्शाळवाडीपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही. पावसामुळे जी पायवाट आहे, ती पूर्ण चिखलात गेली आहे. बचावपथकांनाही पायीच तेथे जावे लागत आहे. जेसीबी, पोकलेनही घटनास्थळी नेणे शक्य होत नाहीये. त्यामुळे बचाव पथकाचे सदस्य अक्षरश: हातानेच ढिगारे उपसत आहेत. गावापर्यंत मदतीचे साहित्य कसे न्यावे, हा आमच्यासमोर मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ढिगाऱ्याखाली सापडलेल्या मृतदेहांचे गावातच शवविच्छेदन करण्याचा विचारही आम्ही करत आहोत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेत वाचलेल्या ग्रामस्थांना भेटून त्याना धीर दिला. त्याना लागेल ती सर्व मदत सरकारकडून केली जाईल असे सांगून त्याना आशवस्त केले. तसेच घटनास्थळी मदतकार्य वेगाने व्हावे यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, दादा भुसे घटनास्थळी उपस्थित आहेत. दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबांना शासन पाच लाखांची मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
दरड कोसून जखमी झालेल्या नागरिकांवर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी रुग्णांची भेट घेत विचारपूस केली. रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावे आणि या दुर्घटनेतील अजून जखमी नागरिक रुग्णालयात आल्यास प्रशासनाने सज्ज असावे, अशा सूचना आदिती तटकरे यांना दिल्या आहेत.
मदतीसाठी इर्शाळवाडी गावातच पोलिस कंट्रोल रुम बनवण्यात आले आहे. मदतीसाठी 8108195554 या क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत. एनडीआरएफच्या 2 चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षात पोहचले आहेत. गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याबाबत ते माहिती घेत असून अधिकाऱ्यांना सूचनाही देत आहेत.
पुणे-कोथरूड परिसरात राहणाऱ्या एका इसमाला परदेशात चांगल्या कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी मिळवून देतो असे सांगून त्यांना वेगवेगळी कारणे सांगत ऑनलाइन अकरा लाख ९२ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एम .ए मोरे (वय -53 ,राहणार – कोथरूड, पुणे) यांनी आरोपीं विरोधात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .
पोलिसांनी याबाबत शालिनी शर्मा ,करण सिंग या आरोपींवर आर्थिक फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.सदरचा प्रकार ४/६/२०२२ ते आत्तापर्यंत घडलेला आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,संबंधित आरोपी शालिनी शर्मा आणि करण सिंग यांनी तक्रारदार मोरे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला.
संबंधित आरोपींनी ते टॉप करिअर कन्सल्टन्सी या सल्लागार कंपनीमध्ये काम करत असल्याचे तक्रारदार यांना सांगितले. तसेच त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना कॅनडा या देशामध्ये नामांकित कंपनीत सीनियर जनरल मॅनेजर या पदावर नोकरी मिळवून देतो असे सांगितले.त्यानुसार वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून तब्बल 11 लाख 92 हजार रुपये आरोपींनी स्वतःच्या बँक खात्यावर घेऊन आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील पुढील तपास करत आहे.
पार्ट टाइम नोकरीचे आमिष, 7 लाखांची फसवणूक
कॅम्प परिसरात राहणाऱ्या आवेश अब्दुल सत्तार शेख( वय- 32) या तरुणाला पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवून त्याला टेलिग्राम ग्रुपवर जॉईन करण्यास भाग पाडून त्याला विविध प्रकारचे टास्क पूर्ण करण्यास सांगून त्यावर परतावा मिळेल असे सांगत तब्बल सहा लाख 92 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनोळखी आरोपी विरोधात लष्कर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ब्लॅकमेल करत महिलेवर बलात्कार; गुन्हा दाखल
एका कार्यक्रमाच्या माध्यमातून ओळख निर्माण झालेल्या 50 वर्षीय महिलेसोबत एकाने मैत्री केली. मात्र, संबंधित मैत्री बाबत महिलेच्या कुटुंबीयांना सांगेन अशी धमकी देऊन, तिला ब्लॅकमेल करत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिचे काढलेले आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्रास देणाऱ्या आरोपीवर चतुर्शिंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेश कुमार लोढा (राहणार- मार्केटयार्ड ,पुणे )असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ५० वर्षीय पीडित महिलेने आरोपी विरोधात चतुर्शिंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार सन 2015 पासून जानेवारी 2023 पर्यंत घडलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र लोढा आणि संबंधित तक्रारदार पीडित महिला यांची ओळख एका कार्यक्रमात सन 2015 मध्ये झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री होऊन आरोपीने आपल्या मैत्रीबद्दल मी तुझ्या घरच्यांना सांगेल अशी धमकी महिलेला दिली होती.
त्यानंतर त्याने महिलेस एका लॉजवर नेऊन जबरदस्तीने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले.त्यानंतर आरोपींनी महिलेस वारंवार भेटण्यास बोलवले असता तिने नकार दिल्याने, आरोपीने तिचे काढलेले आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच संबंधित फोटो डिलीट करायचे असतील तर मुंबईला यावे लागेल असे सांगून, तिचे फोटो डिलीट न करता तिच्यावर जबरदस्तीने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याने सततच्या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस शानमे पुढील तपास करत आहे.
लग्नाचे आमिष देत महिलेवर बलात्कार
कोथरूड परिसरात राहणाऱ्या एका 32 वर्षीय महिलेसोबत आरोपी जयेश दत्तात्रय गवळी ( वय -37 ,राहणार- नरे ,जिल्हा -पुणे) या आरोपींनी ओळख करून मैत्री वाढवली. त्यानंतर गोड, गोड बोलून महिलेचा विश्वास संपादन करून तिच्यासोबत लग्न करण्याचे आमिष आरोपीने दाखवले. तसेच तिच्या संमतीविना तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून महिलेने लग्नाबाबत आरोपीकडे विचारणा केली असता, तिला धमकी देऊन लग्न करण्यास टाळताळ केल्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी पीडित महिलेने आरोपी विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पुणे: राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने (एनआयए) प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केलेल्या दोन फरारी दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली. एप्रिल २०२२ पासून ते पुण्यातील कोंढवा परिसरात लपून बसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी वाहन चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतल्यानंतर तपासात ही बाब उघड झाली. न्यायालयाने दोघा आरोपींना २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
इम्रान खान आणि महम्मद युनूस साकी (मूळ रा. मध्यप्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी पहाटे पावणेतीनच्या सुमारास कोथरूड पोलिस ठाण्यातील बीट मार्शल प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन हे गस्तीवर होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी चोरी करताना तीन संशयितांना ताब्यात घेतले.
आरोपींना घरझडतीसाठी नेले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिस पथकाने पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. परंतु अन्य एकजण पसार झाला.
पोलिसांनी कोंढव्यातील त्यांच्या घराची झडती घेतली. त्यात एक जिवंत काडतूस, दुचाकी चोरीचे साहित्य, चार मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला. पोलिसांना आरोपींच्या लॅपटॉपमध्ये काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आली. त्यावरून त्यांचा देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचा संशय आला.
पोलिसांनी ही बाब दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) कळविली. एटीएसचे पथक कोथरूड पोलिस ठाण्यात आले. त्यानंतर दोघांना शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेत नेण्यात आले. पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यांची चौकशी केली. तेव्हा आरोपी हे मूळ मध्यप्रदेश येथील असून, त्यांचा राजस्थानच्या चितौढगडमधील एका गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.
सुमारे एक वर्षापूर्वी त्याठिकाणी स्फोटके सापडली होती. त्या गुन्ह्यात दोघा संशयितांना एनआयएने फरार घोषित केले होते. याबाबत कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहशतवाद्यांकडून घातपाताचा संशय?
दहशतवादी कोणत्या उद्देशाने पुण्यात थांबले होते, त्यांचा कोठे घातपात करण्याचा विचार होता का, याबाबत पुणे पोलिस तपास करीत आहेत. हे प्रकरण एनआयएकडे सोपविण्यात येईल. दहशतवाद्यांना पकडणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना एनआयएकडून जाहीर केलेले प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस मिळेल.
शिवाय, पुणे शहर पोलिस दलाकडूनही दोन पोलिसांसह पथकातील कर्मचाऱ्यांनाही रिवॉर्ड देण्यात येणार आहे. या गुन्ह्यातील एका फरारी आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. शहरात सध्या नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. त्यामुळे हे दहशतवादी पोलिसांच्या हाती लागल्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.
असे पकडले गेले दहशतवादी
पोलिस बीट मार्शल प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन हे पहाटे शास्त्रीनगर चौकीच्या हद्दीत गस्तीवर होते. त्यांना दुचाकी चोरताना तिघे संशयित आढळून आले. त्यांनी ही बाब पोलिस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी यांना कळवली.
त्यानंतर पोलिस अंमलदार बाला रफी शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ, वैभव शितकाल यांच्या पथकाने आरोपींच्या घराची झडती घेतली. त्यात दोघे संशयित दहशतवादी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक आणि परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांच्या हस्ते पोलिस कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
मुंबई- सांगली, मीरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील वीज देयक भरणा गैरव्यवहार आणि अनियमितता प्रकरणी 15 दिवसांत एसआयटी (विशेष चौकशी समिती) गठित करून चौकशी करण्यात येईल. या चौकशीअंती दोषींवर कारवाई केली जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, या अनियमिततेप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वीज देयके तयार करणाऱ्या महानगरपालिकेच्या तीन विभागातील जबाबदार एकूण ११ कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसेच २०१० पासून त्रयस्थ पद्धतीने याप्रकरणी सांगली महानगरपालिकेचे लेखा परीक्षण केले जाणार आहे.
कोविड काळात तपासणी न करता वीज देयके देण्यात आली आहेत. या देयकांबाबत ही तपासणी करावी, अशी सूचना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चर्चेदरम्यान केली.
माजी उपमहापौर आबा बागुल यांचे पालिका प्रशासनाला आवाहन
पुणे -पावसाळा सुरु झाला नाही, तोच शहर आणि उपनगरातील सर्वच रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. खड्डे चुकवताना छोटे – मोठ्या अपघातांनाही पुणेकरांना सामोरे जावे लागत आहे. जीव मुठीत घेऊन दररोजचा प्रवास करताना तारेवरची कसरत करणाऱ्या नागरिकांसाठी आता अनुभवी ज्येष्ठ लोकप्रतिनिधी सरसावले आहेत. पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पालिका प्रशासनाकडे ‘ फक्त पथ विभागाची यंत्रणा ताब्यात द्या मग पहा आमच्या मार्गदर्शनाने खड्डेमुक्त रस्ते ‘ अशी मागणी केली आहे. यासंदर्भात माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पुणे महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विक्रम कुमार यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, दरवर्षी करदात्या पुणेकरांचे कोट्यवधी रुपये पालिकेच्या पथ विभागाकडून रस्त्यांच्या निर्मितीसह दुरुस्ती देखभाल यावर खर्च केले जातात.अभियंते आणि कुशल कामगार वर्ग तसेच सर्व यंत्रणा असतानाही सल्लागारांची नियुक्ती करून त्यांच्यावरही कोट्यवधी रुपये पालिका खर्च करत आहे; पण पुणेकरांना चांगले रस्ते मिळणे आजही दुरापास्त झाले आहे.आता पावसाळा सुरू झाला आहे.पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.मात्र त्या अगोदरच शहरातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते खड्डेमय झाल्याने पुणेकरांचे हाल होत आहे ; पण त्याचे सोयरसुतक प्रशासनाला नाही हे वास्तव आहे. मग कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यांची अशी अवस्था का आणि कुणामुळे झाली ? हे प्रश्न जितके महत्वाचे आहेत, त्याहीपेक्षा प्रशासनाची कार्यक्षमता आहे की नाही हा मुद्दा महत्वाचा ठरला आहे.याकडेही आबा बागुल यांनी लक्ष वेधले आहे. पुणेकरांना चांगले रस्ते मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.विशेष म्हणजे पावसाळ्यात त्यांना खड्डेमुक्त रस्ते आवश्यक आहेत.ही बाब लक्षात घेवून ३० वर्षांच्या लोकप्रतिनिधी पदाचा अनुभव असणाऱ्या माझ्यासारख्या ज्येष्ठ लोकप्रतिनिधीच्या ताब्यात फक्त आपण पथ विभागाची यंत्रणा द्या. शहरातील सर्वच रस्ते खड्डेमुक्त रस्ते करून दाखवतो.इतकेच नाही तर त्याची जबाबदारीही स्वीकारतो.अनेक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी आहेत, तेही या कामासाठी पुढाकार घेतील अशी ग्वाहीही आबा बागुल यांनी दिली आहे. पावसाळ्यात पुणेकरांचे खड्डेमय रस्त्यांमुळे हाल अपेष्टा टाळण्यासाठी ,त्यांच्या सुरक्षिततेसाठी ज्येष्ठ लोकप्रतिनिधींना आता खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी कार्य करण्याची संधी द्यावी.फक्त पालिकेच्या पथ विभागाची सर्व यंत्रणा ताब्यात द्या ,अनुभवी ज्येष्ठ लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन घ्या, मग पहा शहरातील सर्वच रस्ते खड्डेमुक्त कसे होतात.असेही आबा बागुल यांनी म्हटले आहे.
पुणे दि. १९: राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला प्रस्तावित पुणे चक्राकार महामार्ग प्रकल्पाला जिल्हा प्रशासनाच्या गतीमान कार्यवाहीमुळे वेग आला असून आज या प्रकल्पासाठी संमतीकरारनाम्याद्वारे जमीन दिलेल्या १४ शेतकऱ्यांना भूमिसंपादनाच्या मोबदल्याचे सुमारे १३ कोटी ८२ लाख ९० हजार रुपये इतक्या रकमेचे धनादेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) अधीक्षक अभियंता राहूल वसईकर, अपर जिल्हाधिकारी हणुमंत अरगुंडे, भूसंपादन (समन्वय) उपजिल्हाधिकारी प्रविण साळुंखे, एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता अजित पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, आजचा दिवस पुणे जिल्ह्यासाठी, राज्यासाठी महत्त्वाचा आहे. एक प्रकारे खऱ्या अर्थाने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आज सुरूवात झाली आहे. हा प्रकल्प राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पुण्यामध्ये वाहतूक कोंडीचा सर्वांनाच त्रास होतो. त्यावर मात करण्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. कोविड काळातही या प्रकल्पासाठी सर्वेक्षण, जमीन मोजणी आदी प्रक्रियेत राज्य रस्ते विकास महामंडळ, महसूल विभाग, भूमि अभिलेख व मूल्यनिर्धारण विभाग यांनी अतिशय सक्षमपणे काम केले आहे.
या प्रकल्पासाठी मोबदल्याची रक्कमही पारदर्शक व वाजवी निश्चित करण्यात आलेली आहे. ही सर्व प्रक्रिया सर्व खातेदारांना विश्वासात घेत अत्यंत पारदर्शकतेने राबविल्याने जमीन देणाऱ्यांना प्रचलित दरापेक्षा कमी मोबदला मिळणार नाही याकडे विशेष लक्ष दिले आहे. शिवाय संमती करारनाम्याद्वारे प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना एकूण मोबदल्याच्या २५ टक्के अतिरिक्त वाढीव मोबदला दिला जात आहे. शासनाने सुमारे १ हजार कोटी रुपये भूसंपादनासाठी दिले असून त्यामुळै संमती करारनामे करणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला देणे शक्य होत आहे. जसजशी अधिक शेतकऱ्यांची संमती मिळेल तसे शासनाकडून अधिकचा निधी उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले.
पैशाचे योग्य नियोजन करा भूसंपादनातून मिळालेल्या पैशाचे योग्य नियोजन करण्याचा सल्लाही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिला. मोठ्या प्रमाणात मिळालेल्या रकमेचा भविष्यासाठी चांगल्याप्रकारे उपयोग करा, शाश्वत गुंतवणूक करा, अनावश्यक बाबींवर खर्च करु नका, असेही ते म्हणाले. रकमेच्या गुंतवणुकीसाठी चांगल्या पर्यायांची माहिती खातेदारांना होण्यासाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबीर आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पुणे (पश्चिम) रिंगरोडसाठी हवेली तालुक्यातील कल्याण गावातील एकाच कुटुंबातील ९ शेतकरी, मावळ तालुक्यातील ऊर्से गावातील दोन शेतकरी, पाचाणे गावातील शेतजमिनीचा मोबदल्याचा धनादेश, मुळशी तालुक्यातील घोटावडे गावातील दोन शेतकरी असे एकूण सुमारे ३ हेक्टर १७ आर संपादित क्षेत्रासाठी १३ कोटी ८२ लाख ९० हजार रुपयांचे धनादेश शेतकऱ्यांना देण्यात आले.
शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त या प्रकल्पाला जमीन दिल्याबद्दल मिळालेल्या मोबदल्यावर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करुन प्रकल्पाचा भविष्यातही पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
रामचंद्र रघुनाथ चव्हाण, मौजे कल्याण (ता. हवेली): अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले. अडचणी सोडविण्यासाठी तलाठी ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत सर्वांनीच सहकार्य केले. शासन ज्या ज्या योजना करत आहे त्या लोकांसाठीच करत आहे. त्यामध्ये सहभाग देता आला याचा आनंद आहे. दिलेल्या मोबदल्यामध्ये आम्ही समाधानी आहोत. त्याचा योग्य उपयोग, पुनर्गुंतवणूक चांगल्याप्रकारे करण्यासाठी प्रयत्न करू.
मिलिंद अण्णासाहेब शेलार, मौजे ऊर्से (ता. मावळ): रिंग रोडच्या संदर्भात अतिशय चांगला, आम्ही अपेक्षाही केली नव्हती इतका मोबदला मिळाला आहे. आम्ही स्वत:हून सहमती दिल्यामुळे २५ टक्के अधिक मोबदला मिळाला आहे. आम्ही या पैशाचे चांगले नियोजन करणार आहोत. सर्वांनीच संमती देऊन अधिकचा मोबदला मिळवावा. 0000
पुणे – औंध परिसरातील वीर भगतसिंग चौकात एका टोळक्याने हातात कोयते घेऊन राडा घालत ,रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करत नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी दहा जणांवर खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे. याप्रकरणी आदित्य भारती शेडगे, तेजस अर्जुन गायकवाड या आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांचा एक 17 वर्षाच्या साथीदार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तर गणेश बावधने, विक्रांत देवकुळे, रोहित सहगळे व त्याचे चार साथीदार यांच्यावर याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संबंधित आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात आरोपीं विरोधात ओंकार युवराज सोकटे( वय- 25, राहणार -औंध रोड, पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी हे तक्रारदार यांच्या पूर्वीच्या वस्तीत राहण्यास असून संबंधित ठिकाणी येऊन दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी तेथे रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या गाड्यांवर दगडाने ,हातातील लाकडी दांडक्याने व कोयतेने तोडफोड करून नुकसान केले आहे.
यामध्ये एक रिक्षा ,तीन दुचाकी या गाड्यांवर दगड व लाकडी दांडके मारून तीन हजार रुपयांचे नुकसान करण्यात आलेले आहे. तसेच तक्रारदार यांच्या वस्तीतील लोकांचे घराचे दरवाजास बाहेरून कडी घालून हातातील लोखंडी कोयता, लाकडी दांडकयाने ,लोखंडी रॉड असे हत्यारे हवेत फिरवून ‘आम्ही इथले भाई आहेत ,आमच्या नादाला कोणी लागेल तर बघून घेईल असे म्हणून आरोपींनी दहशत निर्माण करून सदर ठिकाणावरून ते निघून गेले आहे. पोलिस उपनिरीक्षक एस पाटील पुढील तपास करत आहे.l
पुणे, दि. १९ : दूधात होणारी भेसळ रोखण्यासाठी तसेच दूध भेसळीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले. दूध भेसळ केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण डॉ. मितेश घट्टे, सहायक आयुक्त अन्न व औषध एस. ए. गवते, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी एस. के. डोईफोडे, उपनियंत्रक वैध मापन शास्त्र बी. जी. महाजन आदी उपस्थित होते.
बैठकीत श्री. मोरे म्हणाले, दूध आपल्या दैनंदिन आहाराचा एक अविभाज्य भाग व महत्त्वपूर्ण पोषक तत्वांचा स्रोत असून चांगलं आरोग्य राखण्यास महत्वपुर्ण भूमिका बजावते. हानीकारक पदार्थासह दुधात भेसळ केल्याने ग्राहकाच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण होतो. काही समाजकंटक व्यक्ती दूध भेसळ करण्यासाठी आणि नफा वाढविण्यासाठी त्याची गुणवत्ता आणि सुरक्षेशी तडजोड करुन विविध फसव्या पद्धतींचा वापर करत आहेत, ही बाब चिंतेची असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
दूध भेसळीमध्ये सामान्यपणे पाणी, क्रीम मिल्क पावडर, वनस्पती तेल, स्टार्च, युरिया, डिटर्जंटस आणि इतर रसायनांचा समावेश करतात. दूध भेसळीमुळे मानवी शारीरिक समस्या, पचन, अॅलर्जी आणि दीर्घकालीन अवयवाचे नुकसान या सारख्या गंभीर आरोग्य समस्या होऊ शकतात. या समस्यांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी ग्राहक, सरकारी संस्था, दुग्ध उद्योगाचे भागधारक आणि नियामक संस्था यांनी एकत्रपणे काम करावे.
पुणे जिल्ह्यातील दूध संकलन स्वीकृती केंद्र, जिल्ह्यातील/ जिल्ह्याबाहेरील व परराज्यातून येणाऱ्या दूधाचे नमुने तसेच तसेच सहकारी व खाजगी क्षेत्रातील दूध संकलन व प्रक्रिया केंद्रावरील (डेअरी) नमुने यांची तपासणी अन्न औषध प्रशासन विभागाने दरमहा करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
दूध भेसळीबाबत समाजामध्ये जागरुकता निर्माण होणे आवश्यक आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थ भेसळीत सहभागी असणाऱ्या व्यक्ती व डेअरी विरोधात प्रथम खबरी अहवाल नोंदवून भेसळीबाबत आढळून आलेल्या कसूरदारांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे डॉ. घट्टे यावेळी म्हणाले.
नागरिकांना दूध भेसळ आढळल्यास अन्न व औषध विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ किंवा fdapune2019@gmail.com या ईमेलवर संपर्क करुन माहिती द्यावी. तक्रार देणाऱ्या व्यक्तीची माहिती गोपनीय ठेवली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. 000
पुणे, दि. १९ : दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे व सांगली जिल्हा परिषद अधिनस्त कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह मिरज येथे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षणासाठी दिव्यांगानी अर्ज करण्याचे आवाहन, संस्थेच्या अधीक्षकांनी केले आहे.
शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, मिरज ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था असून या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाची शासन मान्यता आहे. या संस्थेत सुरू होणाऱ्या सर्टिफिकेट इन कॉम्युटर ऑपरेशन वुईथ एम.एस. ऑफिस या संगणक कोर्ससाठी शैक्षणिक अर्हता इयत्ता ८ वी पास व मोटार अॅन्ड आर्मेचर वायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज या इलेक्ट्रीक कोर्ससाठी शैक्षणिक अर्हता ९ वी पास अशी आहे. उमेदवाराची वयोमर्यादा १६ ते ४० वर्ष इतकी असावी. प्रशिक्षण कालावधी १ वर्षाचा असून फक्त फक्त दिव्यांगांनाच या संस्थेत प्रवेश दिला जातो.
प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय केली जाणार आहे. प्रशिक्षणासाठी अद्यावत व परीपूर्ण अशी संगणक कार्यशाळा असून भरपूर प्रात्यक्षिके व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कींग व इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहेत. अनुभवी व तज्ज्ञ निदेशक यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी बीज भांडवल योजना राबविली जाणार आहे.
प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरुन छायाचित्रासह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरुन द्यावेत. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ज्ञ समिती द्वारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, एसएससी गुणपत्रक, प्रमाणपत्र, अपंगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला यांच्या छायांकित प्रती जोडाव्यात.
प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधीक्षक शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज, जि. सांगली-४१६४१० या पत्यावर पोस्टाद्वारे किंवा समक्ष मोफत मिळतील. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२३३-२२२२९०८ व भ्रमणध्वनी क्रमांक ९९२२५७७५६१, ९५९५६६७९३६ वर संपर्क साधावा.
प्रवेशासाठी माफक जागा असल्याने ग्रामीण व शहरी भागातील गरजू दिव्यांगानी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 0000