Home Blog Page 1439

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दिनांक 19:
राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.
ते आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते.
नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन त्यांनी केले.
सकाळपासूनच आपण मुख्य सचिव तसेच काही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असून नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कुठलीही आपत्ती आल्यास तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत असे ते म्हणाले.
एनडीआरएफ तसेच एसडीआरएफ च्या तुकड्या तैनात आहेत. तसेच मुंबई व परिसरातील मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकर सोडले आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले

रेल्वे रुळावरून चालताना 4 महिन्यांचे तान्हुले हातातून निसटले अन् थेट नाल्यात पडलं,आईचा टाहो..अन बाळ

मुंबई-मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण – ठाकुर्ली दरम्यान एक 4 महिन्यांचे तान्हुले वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पीडित महिला आपल्या काकांसोबत लोकलमधून उतरून रेल्वे रुळावरून चालत जात होती. बाळ तिच्या काकांच्या हातात होते. ते त्यांच्या हातातून निसटले अन् थेट वाहत्या नाल्यात पडून वाहून गेले. या घटनेप्रकरणी हळहळ व्यक्त केली जात आहे.यासंबंधीच्या वृत्तानुसार, अंबरनाथ लोकल ठाकुर्ली ते कल्याण या दरम्यान सुमारे 2 तास उभी होती. त्यामुळे काही प्रवाशी गाडीतून उतरून कल्याणच्या दिशेने चालत जात होते. त्यात एक छोटेसे बाळ घेऊन एक महिला व तिचे काका चालत होते. त्यावेळी अचानक त्या काकांच्या हातून 4 महिन्यांचे बाळ निसटले आणि थेट नाल्याच्या पाण्यात जाऊन पडले. काही क्षणांतच हे बाळ नाल्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेले. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास घडली.काही तरुणांनी लगेचच नाल्याच्या दुसऱ्या बाजूने धाव घेत बाळाचा शोध घेतला. पण ते सापडले नाही. दुसरीकडे, पीडित मातेच्या आक्रोशाने अनेकांच्या डोळे पाणावले. रेल्वे पोलिस वाहून गेलेल्या बाळाचा शोध घेत आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. 4 महिन्यांचे बाळ वाहून गेल्याची घटना अत्यंत दुखद आहे. राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. विशेषतः कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये, असे ते म्हणाले.दुसरीकडे, दिवा स्थानकाच्या पुढे लोकल 2 तासांपेक्षा अधिक वेळ थांबल्या आहेत. यामुळे येथीही प्रवाशी खाली उतरून रुळांवरून चालत जात आहेत. मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळ पाण्याखाली गेलेत. यामुळे रेल्वे सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. अबंरनाथ-बदलापूर दरम्यान काही ठिकाणी रुळाखालील खडी वाहून गेली आहे. त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.

अजित पवारांनी मोदी :शहांची भेट घेतली, अजितदादांना पुन्हा भेटीचे निमंत्रण

मुंबई -राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली , प्रफुल्ल पटेल यावेळी त्यांच्या समवेत होते .यावेळी अजित पवार यांना मोदी-शहा यांनी पुन्हा भेटीचे निमंत्रण दिल्याचे वृत्त आहे . महाराष्ट्रात भाजपाबरोबर आल्याचा निश्चित फायदा दोन्ही बाजूनी होईल असे यावेळी बोलले गेल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

केंद्र सरकार नफेखोरी करतेय; तुम्ही कबूल करायला का घाबरता?

  • बाळासाहेब थोरात यांच्या आक्रमक पवित्र्यापुढे सत्ताधाऱ्यांची भंबेरी
  • काँग्रेस नेत्यांनी एकजुटीने केली सरकारची घेरेबंदी

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किंमती कमी झालेल्या असतानाही केंद्र सरकारकडून खतांच्या बाबतीमध्ये नफेखोरी सुरू आहे, शेतकऱ्याला मदत करायची सोडून हा कसला प्रकार सुरू आहे आणि कृषिमंत्री केंद्र सरकारची ही नफेखोरी कबूल करायला का तयार नाही? आपण कोणाला घाबरता? असा सवाल करून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना चांगलेच कोंडीत पकडले.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस होता. प्रश्नोत्तराच्या तासात बोगस बी बियाणे आणि खतांच्या वाढलेल्या किंमतीवरून काँग्रेस नेत्यांनी कृषीमंत्र्यांना अक्षरशः घेरले. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी खतांच्या वाढलेल्या किंमतीवर बोट ठेवत धनंजय मुंडे यांच्याकडून उत्तराची अपेक्षा केली. त्यावर धनंजय मुंडे यांनी खतांच्या किंमती वाढलेल्या नसून त्या स्थिर आहे अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यावर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या वाढलेल्या किमतीला केंद्र सरकार जबाबदार आहे हे कबूल करायला तुम्ही का घाबरता असा घनाघात केला.

थोरात यांनी, ‘बियाण्यांचा काळाबाजार होत असल्यामुळे आणि बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणे आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, हा मुद्दा सलग तिसऱ्या दिवशीही सभागृहात उपस्थित केला. ‘बोगस बियाण्यांवर कारवाईच्या नावाखाली ज्या सरकारी टोळ्या राज्यभर फिरत होत्या ज्याच्यामध्ये काही मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक सहभागी होते, त्या बोगस डोळ्यांवर सरकारने नेमकी काय कारवाई केली त्याची सभागृहाला माहिती द्यावी, असाही आग्रह कृषी मंत्र्यांकडे धरला.

शिक्षक भरतीमध्ये सरकारी गोंधळ; तातडीने हस्तक्षेप करून आंदोलकांना न्याय द्या.

मुंबई, दि. १९ जुलै
राज्यातील भाजपाप्रणित ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. सरकार कर्ज वाटप व बियाणांसंदर्भात चुकीची माहिती देत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने निर्देश जारी केल्याने अनेक सहकारी बँकांनी कर्ज वाटपच केले नाही, राष्ट्रीयकृत बँका तर शेतकऱ्यांना दारातही उभे करत नाहीत आणि सरकार सांगते कर्जवाटप झाले. सरकार चुकीचे उत्तर देत असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे, असा संताप प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

विधानसभेतील चर्चेत भाग घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकार तोफ डागली. ते पुढे म्हणाले की, बियाणे व खतांच्या किंमती वाढल्याने शेतकरी संकटात आहे का? बँका कर्ज देत नसल्याने शेतकऱ्यांना सावकाराकडे जावे लागते का? असे प्रश्न विचारण्यात आले असता, हे खरे नाही, असे धादांत खोटे व चुकीचे उत्तर सरकारकडून देण्यात आले आहे. अनेक सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलेले नाही. बियाणे खतांच्या किमती वाढलेल्या आहेत, बोगस बियाणांचा सुळसुळाट आहे. मंत्र्यांच्या नावाने धाडी टाकून व्यापाऱ्याकडून वसुली करण्यात आली, त्यावर सरकारने काय कारवाई केली, असे प्रश्न पटोले यांनी उपस्थित केले.

शिक्षक भरतीमध्ये सरकारी सावळा गोंधळा..
राज्यात लाखोंच्या संख्येने बीएड, डीएड व सीईटी परिक्षा पास झालेले विद्यार्थी आहेत. शिक्षक भरतीसाठी त्यांचा विचार करण्यापेक्षा सरकारने मात्र निवृत्त शिक्षकांना २० हजार रुपये मानधनावर नियुक्त करणार असल्याचा अफलातून जीआर काढला आहे. पुणे, मुंबईसह अनेक शहरात सरकारच्या या अन्यायी जीआर विरोधात तरुण मुले भर पावसात आंदोलन करत आहेत. राज्यात जिल्हा परिषदांच्या शाळांची स्थिती अत्यंत वाईट आहे, भंडारा जिल्ह्यात फंडातून शाळा चालू ठेवावी लागली. सर्व सामान्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. या विषयाची सरकारने तातडीने दखल घ्यावी तसेच सरकारने या विषयावर निवेदन करावे, अशी मागणी पटोले यांनी केली.

दुबार पेरणीची वेळ आल्यास मोफत बियाणे उपलब्ध करून देणार-कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 19 : राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होत असला, तरी मराठवाड्यासह ज्या भागात अपेक्षित पाऊस नसल्याने दुबार पेरणीची वेळ आली, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करुन दिले जाईल. शेतक-यांना आवश्यक ते सर्व सहाय्य करण्याची शासनाची भूमिका असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज सांगितले.मराठवाडा व राज्यातील इतर जिल्ह्यांत जून महिन्यात सरासरी पेक्षा खुपच कमी प्रमाणात पाऊस पडला असल्याने खरिपाच्या पेरण्या झाल्या नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीसंदर्भात सदस्य हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना कृषी मंत्री श्री.मुंडे बोलत होते. मराठवाडा विभागातील पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे नियोजन असल्याचे सांगून कृषी मंत्री श्री.मुंडे म्हणाले की, मराठवाडा ग्रीड आणि नार पार प्रकल्प मराठवाड्याच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. ते लवकर पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असून ‘मागेल त्याला शेततळे’ आणि ‘मागेल त्याला ठिबक’ या योजनांच्या माध्यमातून ही जलसाठा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच सध्या सर्वत्र चांगल्या प्रमाणात पाऊस होत असून दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही. कमी पाण्यात चांगले उत्पादन देणाऱ्या बियाणांच्या वाणांची निर्मिती करण्यासाठी कृषी विद्यापीठांना सूचित करण्यात आले आहे. तसेच किसान योजनेत पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, याची कटाक्षाने खबरदारी घेण्यात येईल. शेतकऱ्यांचे अशा प्रकारे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान नये म्हणून त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी शासनामार्फत एक रुपयात पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. 18 जुलै अखेर एकूण 72.17 लाख शेतकरी या योजनेत सहभागी झाले असून ४६.३२ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. त्याचसोबत विमा संरक्षण क्षेत्राची व्याप्ती वाढविण्याबाबत कृषि विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत. जिरायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाच्या अनियमितपणास बऱ्याच वेळेस सामोरे जावे लागते, अवर्षण प्रवण क्षेत्रात पावसास बऱ्याच वेळा उशिरा सुरुवात होते. खरीप हंगामात उशिरा पेरणीसाठी पिकांचे नियोजन करणे आवश्यक असते. खरीप हंगामामध्ये कडधान्य, गळित धान्य तसेच तृणधान्य इ. पिकांचे उत्पादन स्थिर करण्यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी पिकांच्या नियोजनाबाबत शिफारशी केलेल्या आहेत. नियमित मोसमी पाऊस उशिरा सुरु झाल्यास, अशा परिस्थितीत पिकांचे नियोजनामध्ये पिकांचे वाण, खत व्यवस्थापन तसेच रोपांच्या प्रती हेक्टर संख्येमध्ये बदल करावा लागतो, अन्यथा प्रती हेक्टरी उत्पादन कमी येते. यासाठी जिल्हास्तरावर कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्रे व कृषि विज्ञान केंद्रांच्या सल्ल्याने जिल्ह्याचा पीक आपत्कालीन पीक आराखडा सुद्धा तयार करण्यात आलेला आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अशोक चव्हाण, बबनराव लोणीकर, राजेश टोपे, विजय वडेट्टीवार, नारायण कुचेकर, देवयानी फरांदे यांनी सहभाग घेतला

पोलीस भरतीची २३ जुलै रोजी लेखी परीक्षा

मुंबई, दि. १९ : सशस्त्र पोलीस शिपाई भरती -२०२१ शारीरिक चाचणी मधील २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता रॉयल गोल्ड स्टुडिओ, रॉयल पाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई या ठिकाणी घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर येण्याकरीता गोरेगाव रेल्वे स्टेशन येथून बस क्रमांक ४५२ असून स्टॉपचे नाव मयूर नगर बस स्टॉप आहे. या लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांनी  २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ८  वाजेपर्यंत या परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होईल. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही.

या लेखी परीक्षेसाठी येताना उमेदवारांनी महाआयटीने ई-मेलद्वारे पुरविलेले शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेचे ओळखपत्र डाऊनलोड करुन त्याची कलर प्रिंट आणि आवेदन अर्जावरील दोन कलर पासपोर्ट साईज छायाचित्र, तसेच या कार्यालयाकडून मैदानी चाचणी करीता पुरविण्यात आलेले ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी मोबाईल फोन, डिजीटल घड्याळ, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इतर तत्सम वस्तू तसेच शक्यतो कोणत्याही प्रकारच्या बॅगा आणू नयेत. जर उमेदवारांनी बॅगा आणल्यास त्या परीक्षा केंद्राच्या बाहेर स्वत:च्या जबाबदारीवर ठेवण्यात याव्यात. या बॅगा व त्यातील मौल्यवान व इतर वस्तू गहाळ किंवा चोरीस गेल्यास त्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, काळा पेन तसेच पॅड बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी पुरविण्यात येणार आहे, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. ही लेखी परीक्षा नि:पक्षपातीपणे व पारदर्शकपणे घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करु नये. तसेच ही बाब निदर्शनास आल्यास तत्काळ भरती प्रमुखांशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 चे समादेशक प्रणय अशोक यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

अजित पवार-उद्धव ठाकरे भेट:अजित पवारांकडून जनतेला योग्य न्याय मिळेल; सत्तेच्या साठमारीत सर्वसामान्यांची परवड होऊ नये – ठाकरे

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातात राज्याच्या आर्थिक चाव्या आल्या आहेत. त्यांच्या कामाची पद्धत माहिती असल्याने जनतेना योग्य न्याय मिळेल असे मत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.त्यांनीउपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधीमंडळात ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक घेतल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते.

बंगरुळूत देशप्रेमी पक्षाची एक बैठक झाली. आमची लढाई ही कुणा एका व्यक्तीविरोधात किंवा पक्षाविरोधात नसून आमची लढाईही हुकुमशाहीविरोधात आहे. कारण पक्ष येत असतात, नेते येत असताता जात असतात, तर पंतप्रधान, मुख्यमंत्री ही पदे येतात आणि जातात असेही त्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, अजित पवारांनी राज्यासाठी चांगले काम करावे, कारण सत्तेसाठी साठमारी सध्या राज्यात सुरू आहे. राज्यातील प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न असो असे सर्व विषयावर मी अजित पवार यांच्याशी चर्चा केली. अजित पवारांनी अडीच वर्षे माझ्यासोबत काम केले असून त्यांचा स्वभाग आणि काम करण्याची पद्धत मला माहिती असल्याने मी खात्रीने सांगतो ते जनतेसाठी काम करतील. कारण राज्याच्या तिजारीच्या चाव्या त्यांना देण्यात आल्या आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले की, अजित पवार फंड देत नाही म्हणून भाजपसोबत जाणारा शिंदे गट आज अजित पवारांसोबत काम करत आहे. महाराष्ट्रातील जनता हुशार आहे, त्यांना माहिती आहे यांनी पक्ष सोडत भाजपला साथ का दिली असे त्यांनी म्हटले आहे. आपला धृतराष्ट्र नाही तर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

असे व्हिडिओ बघत नाही

उद्धव ठाकरे म्हणाले की, किरीट सोमय्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी राज्यभरातील महिलांनी आपली संतप्त भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता सरकारने कारवाई करावी. तसेच, उद्धव ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली. या भेटीबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले, अजित पवार व आम्ही पूर्वी एकत्र काम केले आहे. त्यांच्याकडे पुन्हा आता तिजोरीच्या चाव्या गेल्या आहेत. ते जनतेला मदत करतील अशी अपेक्षा आहे. विरोधी गोटात असूनही अजितदादांबद्ल उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या या वक्तव्याचे आता राजकीय अर्थ काढले जात आहेत.

लम्पी आजाराने मृत जनावरांच्या पशुपालकांना अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू – मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील

मुंबई-

लम्पी आजाराने मृत झालेल्या जनावरांच्या शेतकरी, पशुपालकांना अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या शेतकरी, पशुपालकांना ही मदत मिळाली नाही, त्यांनाही लवकरच मदत देण्यात येईल, असे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

राज्यात लम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे मृत झालेल्या जनावरांच्या पालकांना अर्थसहाय्य  न मिळाल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य  सर्वश्री अमित देशमुख, नाना पटोले, हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित केला होता.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले,  केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात लसीकरण सुरू  आहे. पशुधनाचा मृत्यू दर कमी राहिल यासाठी राज्य शासन उपाययोजना करत आहे.  याकरिता आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टरांची संख्या वाढविण्यात येत आहे. ही भरती प्रक्रियासुद्धा अंतिम टप्प्यात असून लवकरच डॉक्टरांची यासाठी नियुक्ती करण्यात येईल.

दुभत्या जनावरांच्या पशुपालकांना ३० हजार रुपये, ओढकाम करणाऱ्या जनावरांच्या पशुपालकांना २५ हजार रुपये आणि वासरांच्या पशुपालकांना १६ हजार रुपये अशी मदत दिली जाते. या मदतीत वाढ करावी अशी मागणी होत आहे. याबाबतही शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

निवडणुकीदरम्यान दूरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रचारासाठी राष्ट्रीय प्रादेशिक पक्षांना डिजिटल टाइम व्हाउचर जारी करणार – भारत निवडणूक आयोग

नवी दिल्ली, दि. १९ : निवडणुकीदरम्यान आकाशवाणी आणि दूरदर्शनवर राजकीय पक्षांना दिली जाणारी वेळ आता ऑनलाईन होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने, राजकीय पक्षांद्वारे सरकारी मालकीच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या वापरासाठी विद्यमान योजनेत सुधारणा केली आहे. माहिती तंत्रज्ञान (IT) प्लॅटफॉर्मद्वारे डिजिटल टाइम व्हाउचर जारी करण्याची तरतूद सादर करून हे केले गेले आहे. या सुविधेमुळे, राजकीय पक्षांना निवडणुकीदरम्यान वेळेचे व्हाउचर मिळवण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी ECI/CEO कार्यालयात पाठवण्याची आवश्यकता भासणार नाही. निवडणूक प्रक्रियेच्या सुधारणा, सर्व भागधारकांच्या सुलभतेसाठी, तसेच तंत्रज्ञानाची सुविधा घेण्यासाठी आयोगाने महत्त्वाचे पाऊल उचलेले आहे.

तंत्रज्ञानातील प्रगती ओळखुन आयोग राजकीय पक्षांशी संवाद साधण्यासाठी आयटी आधारित पर्याय उपलब्ध करून देत आहे. अलीकडेच, आयोगाने निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षांकडून आर्थिक खाती ऑनलाईन भरण्यासाठी एक वेब पोर्टलही सुरू केले आहे.

सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक ला भेट द्यावी. ऑर्डरची लिंक:

https://eci.gov.in/files/file/15138-scheme-for-use-of-govt-owned-electronic-media-by-political-parties-during-elections-modification-of-scheme-%E2%80%93-para-6-sub-clause-iv-%E2%80%93-provision-to-provide-time-vouchers-through-it-platform-%E2%80%93-regarding/

राष्ट्रीय/प्रादेशिक  राजकीय पक्षांना पाठवलेल्या पत्राची लिंक:

https://eci.gov.in/files/file/15140-letter-to-political-parties-digitization-of-time-vouchers-in-respect-of-broadcasttelecast-time-allotted-to-nationalstate-political-parties-during-election/

पीएमपीएमएल प्रवाशांच्या सोयीसाठी ३०० बसशेल्टर्स लवकरच उभारणार

पुणे-

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) कडून निविदा प्रक्रियेद्वारे लवकरच ३०० बस शेल्टर्स
उभारण्यात येणार आहेत. सध्या प्रवाशांच्या सोयीसाठी साधे, पुणे पॅटर्न, स्टेनलेस स्टील व बी.आर.टी. बस शेल्टर्स असे
एकूण मिळून ११३० आच्छादित बसशेल्टर्स आहेत.
तसेच ज्या ठिकाणी बसशेल्टर्स नाहीत अशा ठिकाणी बी.ओ.टी. तत्वावर बसशेल्टर्स उभारण्याच्या निविदा
प्रक्रियेचे काम पूर्ण झाले असून नव्याने ३०० बसशेल्टर्स उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे ऊन, वारा, पाऊस
यापासून संरक्षण होणार आहे.

कारगिल विजय दिवस २६ जुलै रोजी होणार साजरा

पुणे दि १९: शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी राज्यात २६ जुलै हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षीही २४ वा ‘कारगिल विजय दिवस’ सैनिक कल्याण विभागाच्या कार्यालयातील हिरकणी हॉल मध्ये २६ जुलै रोजी सायं. ४ वाजता साजरा करण्यात येणार असल्याची माहिती सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडियर राजेश गायकवाड यांनी दिली आहे.

या कार्यक्रमास पुणे जिल्ह्यातील कारगिल युद्धातील शहीद सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व अपंगत्व प्राप्त जवान यांना ‘एस. के. एफ. लिमीटेड’ व ‘बोनीसा वर्ल्ड’ या नामांकित संस्थेकडून ‘भेटवस्तू’ आणि ‘एक इंडिया मिशन रिंग’ देण्यात येणार असून सैनिक कल्याण विभागामार्फत त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.

या राष्ट्रीय कार्यक्रमास पुणे जिल्ह्यातील माजी सैनिक विधवा व माजी सैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही सैनिक कल्याण विभागाने केले आहे.
000

‘हरवलेले संस्कार’ पुन्हा रुजवण्यासाठी संस्कार माला ही लोकचळवळ बनली पाहिजे

पुणे-रोग होण्याआधी घेतलेले औषध म्हणजे संस्कार होय. संस्कार ही निरंतर प्रक्रिया असून कुसंस्कार आणि सुसंस्कार असे दोन्ही संस्कार समाजात घडतांना दिसतात. त्यामुळेच तरुण पिढीला कुसंस्कारांपासून दूर ठेवून सुसंस्कार त्यांच्या मनात रुजवणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टीने ‘हरवलेले संस्कार’ ही संस्कारमाला अतिशय उपयुक्त ठरेल. समाजात स्तुत्य उपक्रम सुरु केल्याबद्दल संयोजक आबा बागुल यांचे मी अभिनंदन करतो. अशा भावना ज्येष्ठ विचारवंत व ‘आदर्श शिक्षक’ सन्मानाने पुरस्कृत न.म. जोशी यांनी आज व्यक्त केल्या. पुणे महानगरपालिकेच्यी राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंग आणि पुणे नवरात्रौ महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हरवलेले संस्कार’ या संस्कारमालिकेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत माजी आमदार उल्हास पवार होते.  

प्रारंभी द्वारका पीठाच्या शंकराचार्यचे पुणे प्रतिनिधी कै. शंकरदत्त ज. महाशब्दे गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने या संस्कार मालेच्या पहिल्या पुष्पाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाचे संयोजक माजी उपमहापौर आबा बागुल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

न.म. जोशी पुढे म्हणाले की, हल्ली पालक व मुले यांच्यात संवाद कमी पडत आहे. पूर्वी जेवण घरी व्हायचे आणि चित्रपट बाहेर जाऊन बघितला जाईचा. आता मात्र चित्रपट घरी टी.व्ही.वर बघितला जातो आणि जेवण बाहेर केले जाते. त्यामुळे कुटुंबांमध्ये जेवताना पालक व मुले यांच्यात घडणारा संवाद संपला आहे. त्यातून सुसंस्कार ही कमी होत राहिले. औपचारिक संस्कारांचे ठिकाण म्हणजे शाळा व महाविद्यालय असूनही तेथे ही सुसंस्कारांचे शिक्षण अपवादानेच दिले जाते. यामुळेच तरुणांमध्ये गुन्हेगारी वाढत असून समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळेच आबा बागुल यांनी सुरु केलेल्या या संस्कार मालेचे महत्व अनन्यसाधारण आहे. पुणे शहरात सर्व ठिकाणी हा उपक्रम राबवला जावा असे सांगून त्यांनी या विधायक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

या उपक्रमाचे संयोजक माजी उपमहापौर आबा बागुल आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, माणसे हरवतात, पैसे हरवतात आणि आता संस्कारही हरवत चालले आहे ही चिंतेची बाब बनली आहे. तरुणांमध्ये संस्कार कमी पडत आहे आणि गुन्हेगारी वाढत आहे. गाड्यांच्या काचा फोडणे, मोटारसायकली जाळणे, कोयता गँगचे गुन्हे अशा बातम्या ऐकून चिंता वाढते.  पोलिसांनी अशांवर गुन्हे दाखल केल्याने प्रश्न सुटणार आहे काय?  असा प्रश्न विचारून आबा बागुल म्हणाले की, तरुणांवर चांगले संस्कार रुजावेत यासाठी ही संस्कारमाला आयोजित केली आहे. दर १५ दिवसांनी अशा व्याख्यानांचे आयोजन होईल. हा उपक्रम सार्वत्रिक होण्यासाठी पोलीस व सामाजिक संस्थाने व पुणे महानगरपालिकेने देखील यात सहभागी व्हावे असे आवाहन करून हे लोक चळवळ बनवली पाहिजे असे ते म्हणाले. 

अध्यक्षीय भाषणात उल्हास पवार यांनी आबा बागुल यांच्या या संकल्पनेचे कौतुक करून म्हंटले की, समाजात चांगले संस्कार रुजण्यासाठी ही चळवळ बनवली पाहिजे ही आबा बागुलांची कल्पना अतिशय योग्य आहे. मातृ पितृ देवो भव, गुरु देवो भव, अतिथी देवो भव यातून चांगले संस्कार रुजत असतात. पूर्वी घरी पाहुणे आले की सारे कुटुंब गप्पांमध्ये रंगून जाईचे. आता मात्र टी.व्ही. आणि मोबाईल याचे वेड लागल्यामुळे घरी आलेले पाहुणे कधी जातील याची वाट बघितली जाते. कुटुंब आणि शाळा यांमध्ये संस्कार रुजायला सुरुवात होते. चांगल्या संस्कारांमुळे उत्तम नागरिक बनतो. सध्याची समाजातील परिस्थिती पाहून अशे हरवलेले संस्कार सर्वत्र रुजवण्यासाठी आबा बागुलांप्रमाणेच प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे असे ते म्हणाले.

पुणे नवरात्रौ महोत्सवाचे सचिव घनश्याम सावंत यांनी सूत्रसंचालन केले तर राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंगचे प्रिन्सिपल जांबुवंत मसलकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास तरुण विद्यार्थी व पालकांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे ट्रस्टी नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर,रमेश भंडारी,अश्विनी ताटे, संभाजी कोळी आदी उपस्थित होते.

बोगस बियाणे आणि खतांची विक्री करणाऱ्यांना चाप बसविण्यासाठी नवीन कायदा करणार

खताच्या किंमती स्थिर राखण्यासाठी केंद्र सरकारने दिले एक लाख तीस हजार कोटींचे अनुदान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभागृहात माहिती

मुंबई, दि. 19 : देशात खताच्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 1 लाख 30 हजार कोटी अनुदान दिलेले आहे. राज्यात बोगस बियाणे आणि खतांची विक्री करणाऱ्यांना चाप बसविण्यासाठी राज्य सरकार कडक कायदा तयार करणार आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा सभागृहात दिली.

बोगस बियाणे आणि खतांच्या संबंधी विधानसभा सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, देशात खतांच्या किंमती स्थिर राखण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करते. खतांच्या किंमती स्थिर राखण्यासाठी केंद्र सरकारने 1 लाख 30 हजार कोटी अनुदान दिलेले आहे. तसेच बोगस बियाणे आणि खातांच्या विक्रीला चाप बसविण्यासाठी सरकार गंभीर आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच बोगस बियाणे आणि खतांची विक्री करणाऱ्यांवर जरब बसविण्यासाठी राज्य सरकार कठोर कायदा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली.


कृषीमंत्री धनंजय मुंडेच्या तोंडाला आला फेस.. खतांच्या किंमती वाढल्या कशा ?

0

मुंबई-खते आणि बोगस बियाणांच्या मुद्यांवरुन आज विधानसभेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नाना पटोले आदींनी राज्याच्या कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. खतांच्या किंमती वाढवून शेतकऱ्यांची केंद्राकडून होणाऱ्या लुटीच्या संदर्भात विधिमंडळात उत्तरे देताना कृषिमंत्री धनंजय मुंडेंच्या तोंडाला फेस आला ..अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडेंच्या बचावासाठी उभे राहीले आणि विरोधकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

आज विधानसभेत बोगस बियाणे विक्रीप्रकरणी किती जणांवर कारवाई झाली, असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी केला. बोगस बियाणे प्रकरणी राज्यभरात हप्तेखोरांच्या टोळ्या फिरत आहे, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला. खतांमध्ये केंद्र सरकारकडून नफेखोरी होत असल्याचा आरोपही बाळासाहेब थोरात यांनी केला.

बोगस बियाणांच्या संदर्भात अशोक चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक होते हे मी मान्य करतो. बोगस बियाणांच्या संदर्भात यापूर्वी 1966 चा बीटी कॉटनचा कायदा आहे. तरीही हे प्रकार थांबत नसल्यामुळे आपण आता त्यासाठी आणखी कडक कायदे आणत आहोत. 1966 च्या कायद्यात असा गुन्हा केला तर 500 रुपयांचा दंड आहे. दुसऱ्यांदा गुन्हा केला तर एक हजार रुपयांचा दंड आणि त्यानंतरही गुन्हा केला तर परवाना रद्द अशी तुटपुंजी तरतुद आहे. त्यामुळे हा कायदा आणखी कडक करण्यासाठी सरकारने समिती गठीत केली आहे. बीटी कॉटनप्रमाणे बोगस बियाणे विक्रीप्रकरणी कारवाई केली जाईल. आम्ही सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचेही मुंडे म्हणाले.

आतापर्यंत राज्य सरकारने बोगस बियाणे व खते विक्रीप्रकरणी किती जणांवर कारवाई केली, असा प्रश्न काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला. मात्र, धनंजय मुंडे यावर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. बोगस बियाणांची विक्री रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कंपन्यांना नोटीस पाठवली जात आहे, अशी उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला. त्यावर स्वत: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी धनंजय मुंडेंना मधेच रोखत विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांचीच उत्तरे द्या, असे धनंजय मुंडेंना सांगितले. मात्र, धनंजय मुंडे समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्यामुळे अखेर त्यांनी सभात्याग केला.

विरोधकांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या प्रश्नांची सरबत्ती पाहून भाजप नेते आशिष शेलार उभे राहीले. तसेच, आधी विरोधी पक्षनेता ठरवा, म्हणजे तुमचा गदारोळ कमी होईल, असा टोलाही आशिष शेलारांनी लगावला. यावर तुम्ही केवळ तुमचा प्रश्न विचारा, अनावश्यक चर्चा करू नका, अशी समज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. यानंतर अशोक चव्हाणांनीही आशिष शेलारांना चांगलेच खडसावले. आम्ही मंत्र्यांना प्रश्न विचारत असताना आशिष शेलारांना मधेच बोलण्याची गरजच काय? असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला. त्यानंतर आशिष शेलार शांत झाले.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. अजित पवार म्हणाले, केंद्र सरकारने यावर्षी खताच्या किमती मर्यादित रहाव्यात यासाठी १ लाख ३० हजार कोटी रुपयांची सबसिडी दिली आहे. कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना बोगस बियाणे व खते विक्री संदर्भात कारवाई सुरू केली आहे. १६४ मेट्रीक टन साठा बियाणांचा जप्त केला आहे. २२ पोलिस केसेस दाखल करण्यात आल्या आहेत.