Home Blog Page 1440

चिपळूण परिसर वाशिष्ठी नदीच्या पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

खबरदारी, मदतकार्याच्या उपाययोजना करण्याच्या
रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरुन सूचना

मुंबई, दि. 19 :- कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या पाण्याने धोकापातळी गाठली आहे. चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधत चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. हवामान खात्याने येत्या चार दिवसात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना तातडीने कराव्यात, मदतकार्य तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम तैनात ठेवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आमदार शेखर निकम हे देखिल उपस्थित होते.

राज्यात पावासाचा जोर गेल्या दोन दिवसांपासून वाढला आहे. हवामान खात्याने येत्या चार दिवसात कोकणासह राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे, तसेच वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. वाशिष्ठीचे पाणी धोकापातळीपर्यंत वाढले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत खबरदारीच्या उपाययोजना म्हणून आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पूरामुळे बाधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. दोन वर्षापूर्वी वाशिष्ठी नदीला आलेल्या पूरामुळे चिपळूणमध्ये मोठी वित्तहानी झाली होती. त्यावेळी वाशिष्ठी नदीच्या पात्रातील गाळ काढण्यासाठी विशेष निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाची माहिती सुध्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या.
००००००००

महाबळेश्वर:आंबेनळी घाटात दरड कोसळली..मार्ग पूर्णपणे बंद

महाबळेश्वर -कोकणात व सह्याद्रीच्या घाटात महाबळेश्वर येथे जोरदार पाऊस सुरू असल्याने आंबेनळी घाटात पुन्हा एकदा दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. मंगळवारी रात्री उशिरा या घाटात दरड कोसळली आहे.सकाळी काही वेळापूर्वी याच घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. दरम्यान, हा कोसळलेला भाग रस्त्यावरून हटवण्यात वेळ लागणार असून तोवर वाहतूक बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी उपल्बध नसेल.

पर्यटनच्या दृष्टीने हा घाट अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर या घाटात अनेकदा दरड कोसळण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. हा घाट अलीकडेच वाहतुकीसाठी पूर्णपणे बंदही ठेवण्यात आला होता. त्यामुळे या घाटातून प्रवाशांनी, पर्यटकांनी वाहतूक करू नये यासाठी हा घाट पूर्णपणे सध्या बंद ठेवण्यात आला आहे.हा घाट पावसाळ्यात वाहतुकीसाठी पूर्णपणे तीन महिने बंद ठेवावा, अशा स्वरूपाचा प्रस्ताव महाड प्रशासनाकडून रायगड जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून आंबेनळी घाटाबाबत कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. सह्याद्री खोऱ्यात तसेच रायगड आणि रत्नागिरी येथे मुसळधार पाऊस सुरू आहे. महाड पोलादपूर रस्ताही पाण्याखाली गेला आहे. त्यानंतर रायगड जिल्हा प्रशासनाकडून नियंत्रित पद्धतीने हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा मोठी दरड कोसळल्याने घाटाच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

गोगावलेंचा ‘व्हीप’च अवैध, मग आमच्यावर कारवाई होणार कशी? ठाकरे गटाचे विधानसभा अध्यक्षांच्या नोटिसीला उत्तर

२६२ पानी उत्तरात ठाकरे गटाचा युक्तिवाद, आम्हीच शिवसेना

मुंबई-शिंदे- ठाकरे गटाच्या प्रतोदांनी परस्परविरोधी गटातील आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांना नोटिसा पाठवून लेखी उत्तर मागवले होते. त्यापैकी ठाकरे गटाच्या १४ आमदारांनी मंगळवारी २६२ पानी लेखी उत्तर सादर केले आहे.

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्तीच सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवली आहेे, त्यामुळे त्यांचा व्हीप आम्हाला लागूच होत नाही. त्यामुळे कारवाईचा प्रश्नच येत नाही, असा युक्तिवाद पत्राद्वारे करण्यात आला. उलट आम्हीच खरी शिवसेना आहोत, त्यामुळे शिंदेंसह १६ आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधानसभा अध्यक्षांच्या नोटिसीला उत्तर दिल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले. मात्र २ महिन्यात अध्यक्षांनी कारवाई केली नव्हती. ठाकरे गट न्यायालयात गेल्यावर आतापर्यंत काय कारवाई केली याची माहिती २ आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश कोर्टाने अध्यक्षांना दिले होते.

ठाकरे गटाचे म्हणणे आहे की, ३ जुलै २०२२ रोजी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी उद्धव यांच्याविरोधात बंड करणाऱ्या एकनाथ शिंदे, भरत गोगावलेंसह १६ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती.

या मागणीनंतर शिंदे गटाने ४ जुलै २०२२ रोजी भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली. हा निर्णय गुवाहाटीत घेण्यात आला. त्याला ३४ आमदारांचे समर्थन असल्याचा दावा. पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत, आम्ही आम्ही १४ जण हेच खरी शिवसेना आहोत.

नवीन प्रतोदाची गुवाहाटीत बसून निवड करणाऱ्यांपैकी काही आमदारांवर आधीच शिवसेना पक्षाने अपात्रतेची कारवाई करण्यासाठी पत्र दिले होते.

विशेष म्हणजे ११ मे २०२३ च्या सत्तासंघर्षाच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने प्रतोद ठरवण्याचे अधिकार पक्षप्रमुखांना असल्याचे स्पष्ट आहे. शिंदे हे काही तेव्हा पक्षाचे प्रमुख नव्हते, त्यामुळे गोगावले यांची नियुक्तीच बेकायदा ठरते. ज्यांची निवडच बेकायदा आहे त्या गोगावलेंच्या मागणीवरून ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही.

शिंदे गटाच्या ४० आमदारांनाही अध्यक्षांनी नोटीस पाठवली होती. त्यांची भूमिका अद्याप समोर आली नाही. यापूर्वीच शिंदे सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी बाजू मांडण्यासाठी मुदत वाढवून मागितली. अध्यक्ष नार्वेकर यांनीही मुदतवाढ देण्यास आपण सकारात्मक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता शिंदे गट कधी व काय बाजू मांडतो याकडे लक्ष लागले आहे.

देशविघातक कट रचणारे दोन संशयित नाकेबंदी दरम्यान पुणे पोलिसांच्या ताब्यात,तिसरा फरार

मध्य प्रदेशातील देशविघातक कृत्यांत सहभागाचा संशय

पुणे- पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री नाकेबंदीदरम्यान दोन संशयित ३० ते ३५ वयोगटातील तरुणांना वाहन चोरी करताना पकडले आहे, परंतु त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे. मात्र, संबंधित आरोपींकडे घर झडतीत मिळून आलेल्या लॅपटॉप मध्ये देशविरोधी महत्त्वपूर्ण माहिती मिळून आल्याने यासंदर्भात सदर दोघांची सखोल चौकशी सुरू आहे.

मंगळवारी दिवसभर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कडून संबंधित आरोपींची चौकशी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी रात्री कोथरूड पोलिस ठाण्यात पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दाखल होत संबंधित गुन्हेगारांची चौकशी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पोलिसांचा नाइट राउंड सुरू असताना, कोथरूड परिसरात दोन गाडी चोरताना दोन आरोपी मिळून आले तर त्यांचा तिसरा साथीदार पळून गेला आहे.त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता ते मूळचे मध्य प्रदेशचे रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहेत. पोलिसांनी संबंधित व्यक्तीची कोंढव्यात भाड्याने राहत असलेल्या घरी जाऊन तपासणी केली असता, पोलिसांना आरोपींच्या घरात काडतुसे आणि लॅपटॉप मिळून आलेला आहे. संबंधित लॅपटॉपमध्ये काही इस्लामिक लिटरेचर पोलिसांना मिळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लॅपटॅापमध्ये देशविघातक कृत्यांसंदर्भात काही माहिती पोलिसांच्या हाती लागल्याने खळबळ उडाली आहे. त्यानुसार सदर आरोपींचा नेमका कट काय होता, त्यांना कोणी पाठवले, त्यांचे अन्य साथीदार कोण आहेत, याबाबत तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी केली जात आहे. नाकाबंदीदरम्यान दोघा संशयितांचा तिसरा साथीदार पळून गेला असून त्याचा शोध सुरू आहे. मध्य प्रदेशातील काही देशविघातक कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे, असे सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.

धीरज घाटे भाजपच्या पुणे शहर अध्यक्षपदी..शंकर जगताप पिंपरी चिंचवड भाजपचे अध्यक्ष

पुणे- आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने भाजपने पुणे शहर अध्यक्षपदावरून जगदीश मुलीक यांना दूर करून धीरज रामचंद्र घाटे यांची नियुक्ती केली आहे . त्यांची हि नियुक्ती प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी जाहीर केली आहे.   घाटे हे महापालिकेत माजी सभागृह नेते देखील होते. तसेच पार्टी मध्ये विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणापासून स्वयंसेवक राहिले असून काही काळ त्यांनी पूर्णवेळ प्रचारक म्हणून देखील काम केलं आहे,कट्टर हिंदुत्ववादी असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.महाराष्ट्रातील ७० अध्यक्षांच्या नियुक्त्या बावनकुळे यांनी केल्या आहेत त्यात

पुणे शहर-धिरज रामचंद्र घाटे,
पुणे ग्रामीण (बारामती) -वासुदेव नाना शंकरराव काळे
पुणे – मावळ:शरद आनंदराव बुट्टे पाटील
पिंपरी चिंचवड-शंकर पांडुरंग जगताप

यांचा समावेश आहे .आज सकाळी या संदर्भात बावनकुळे यांनी असे म्हटले आहे कि,भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करत आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. मला खात्री आहे, माझे नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील. या सर्वच सहकाऱ्यांच्या सोबतीने 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत. भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबध्द आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. नवनियुक्त सर्व जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे.

किरीट सोमय्या: व्हायरल व्हिडिओ: महिला आयोगाने मुंबई पोलिसांना दिले आदेश

मुंबई:

भाजप खासदार (BJP MP) किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल (Kirit Somaiya Viral Video) झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओचे पडसाद पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) उमटले. आता या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने (State Women’s Commission) घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी किरीट सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओवर (Kirit Somaiya Viral Video) प्रतिक्रिया दिली आहे. त्या मंगळवारी (दि.18) माध्यमांशी बोलत होत्या.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा जो आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल (Kirit Somaiya Viral Video) झाला तेव्हा महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी राज्य महिला आयोगाकडे विचारणा केली. राज्य महिला आयोगाने याची दखल घेऊन मुंबई पोलीस आयुक्तांना (Mumbai Police Commissioner) या संपूर्ण घटनेचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय या प्रकरणी वस्तूस्थितीदर्शक अहवाल लवकरात लवकर आयोगाला सादर करण्यास सांगितले आहे.

रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या, आतापर्यंत पीडित महिला आपल्याकडे तक्रार घेऊन आली तर आपण कारवाई करतोच. त्याहीपुढे जाऊन सामूहिक बलात्कार (Gang Rape) किंवा इतर गुन्ह्यांमध्ये आपण स्वत: दखल घेतो. त्यामुळे पीडित महिलांची तक्रार आली, तर त्याची नक्कीच दखल घेतली जाते. आतापर्यंत या प्रकरणी आयोगाकडे कोणतीही माहिती आली नाही. पोलिसांचा अहवाल आम्हाला येईल तेव्हा त्यावर आम्ही कारवाई करु, असंही चाकणकर यांनी सांगितलं.

भोपाळमध्ये सोनिया-राहुल यांच्या फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग;बंगळुरूहून परतताना तांत्रिक बिघाड, दीड तास थांबून दिल्लीकडे रवाना

0

भोपाळ:काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या चार्टर्ड विमानाचे भोपाळमधील राजा भोज विमानतळावर इर्मजन्सी लँडिंग करण्यात आले आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. या विमानाने सोनिया-राहुल बंगळुरूहून दिल्लीला जात होते. भोपाळ विमानतळावर सुमारे दीड तास थांबल्यानंतर दोघेही रात्री 9.35 वाजता इंडिगोच्या विमानाने दिल्लीकडे रवाना झाले.

राहुल-सोनिया भोपाळ विमानतळाच्या व्हीआयपी लाउंजमध्ये थांबले होते. यादरम्यान भोपाळचे काँग्रेस नेते तेथे पोहोचले आणि त्यांची भेट घेतली. माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी, काँग्रेसचे आमदार पीसी शर्मा, कुणाल चौधरी, आरिफ मसूद आणि शोभा ओझा यांच्यासह अनेक काँग्रेस नेते विमानतळावर पोहोचले.

राष्ट्रवादीच्या ‘ज्या’ आमदाराला ईडी कारवाईचा इशारा दिला, त्याच आमदाराने किरीट सोमय्यांची केली पाठराखण

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओबाबत (Kirit Somaiya Viral Video) नाराजी व्यक्त केली आहे. एका व्यक्तीबद्दल जे काही फिरत आहे आणि लोक ज्याच्याबद्दल टाळ्या देत आहेत, हे योग्य नाही. एखाद्याचे वैयक्तीक जीवन उध्वस्त करण्याचा अधिकार कोणालाच नाही, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. आव्हाड यांच्या ट्विटची राजकीय (Maharashtra Political News) वर्तुळात चर्चा होत आहे

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला आहे. वैयक्तीक हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे ह्या प्रकाराचा मी निषेध करतो. त्याचं वैयक्तीक जीवन जेव्हा तुम्ही संपवता; तेव्हा त्याचं घर, दार, त्याची पत्नी, मुले, सुना ह्या सगळ्यांवर त्याचा परीणाम होतो. आपला तो राजकीय शत्रू जरी असेल तरी तो विचारांचा शत्रू आहे. वैयक्तीकरीत्या त्याच्यावर हल्ला करुन त्याचे वैयक्तीक जीवन उध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही.

त्यामुळे आता एका व्यक्तीबद्दल जे काही फिरत आहे आणि लोक ज्याच्याबद्दल टाळ्या देत आहेत; हे काही योग्य नाही असं मला वाटतं. थोडीशी संवेदनशीलता राजकारण्यांनी बाळगायला हवी. समाज जीवनामध्ये एखाद्याला उध्वस्त करणं हे फार सोप्प आहे. पण, 30-40 वर्षे देऊन ह्या स्तरावर आलेला असतांना एखाद्याला 5 मिनिटांत उध्वस्त करणं हे मला तरी काही पटत नाही.

मी 1995 साली शरद पवार (Sharad Pawar) साहेबांकडे बीजेपीच्या एका मोठ्या नेत्याचा सातबारा घेऊन गेलो होतो.
तो सातबारा एका भलत्याच महिलेच्या नावावर होता. शरद पवार साहेबांना मी सांगितले की,
साहेब ह्या सातबाऱ्याचा मोठा उपयोग होऊ शकतो.
साहेबांनी सातबारा माझ्या हातातून घेतला आणि ड्रॉवरमध्ये टाकला आणि मला म्हणाले
‘जितेंद्र राजकारणामध्ये राजकीय विचारांचे मतभेद असतात,
त्याच्या वैयक्तीक जीवनामध्ये तो काय करतो याच्याशी आपल्याला काहीएक देणंघेणं नाही.
असा विचार पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये कधीच करत जाऊ नकोस. आपण एवढं खाली घसरायचं नाही.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू व्हावी:आमदार सिद्धार्थ शिरोळे

मुंबई – राज्य सरकारने महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्धारे (पॉइंट ऑफ इन्फर्मेशन) आज (मंगळवारी) केली.

वैद्यकीय शाखेतील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी घेतलेल्या ‘नीट २०२३’ परीक्षेचा निकाल जाहीर होऊन महिना उलटला असून, महाराष्ट्रामध्ये अद्याप प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढलेली आहे याकडे आमदार शिरोळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

देशातील इतर राज्यांमध्ये प्रवेशप्रक्रियेने गती घेतली असून, अनेक ठिकाणी अर्ज प्रक्रिया पूर्णत्वाकडे देखील गेलेली आहे. गुजरातमध्ये अर्जासाठी २४ जुलै, कर्नाटकला २१ जुलै, पंजाबला २१ जुलै, अरुणाचल प्रदेश येथे १८ जुलै आणि तमिळनाडू येथे अर्जाची मुदत १० जुलै अशी ठेवण्यात आली, अशी माहितीही आमदार शिरोळे यांनी सभागृहासमोर ठेवली.

राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांतील महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

मुंबई, दि. 18 : सावित्रीदेवी फुले महिला वसतिगृहातील विद्यार्थीनीवर झालेला अत्याचार आणि हत्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय महिला वसतिगृहांची सुरक्षा तपासणी करून जिथे त्रुटी आहेत त्याची पूर्तता करून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.मरीन ड्राईव्ह, मुंबई येथे सावित्रीदेवी फुले महिला वसतिगृहातील विद्यार्थीनीवर झालेला अत्याचार आणि हत्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर कोणकोणत्या उपायोजना केल्या जात आहेत याबाबत विधानपरिषद सदस्य विलास पोतनीस यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. मंत्री श्री.पाटील म्हणाले की, सावित्रीदेवी फुले महिला वसतिगृहातील विद्यार्थीनीना शासकीय वसतिगृह वांद्रे येथे स्थलांतरित केले जाईल. राज्यातील सर्व शासकीय महिला वसतिगृहांची सुरक्षा तपासणी करून डिसेंबर २०२३ पर्यंत सर्व सदस्यांकडून आलेल्या सूचनांवर कार्यवाही केली जाईल.महिला वसतिगृहात महिला वॉर्डन नेमणे, सुरक्षा मंडळातील व सैन्यदलातील निवृत्त सैनिकांनादेखील सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्त करणे याबाबत निर्णय घेण्यात येईल. सर्वत्र सीसीटीव्ही यंत्रणा सर्वत्र बसवण्यात येईल. मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीदेवी फुले वसतिगृहात ही घटना घडली, तेथील वसतिगृह अधिक्षिका यांना कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने या घटनेची चौकशी करण्यासाठी समितीदेखील नेमण्यात आली आहे. महिला वसतिगृहाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आलेल्या सर्व सूचनांवर कार्यवाही करून लवकरात लवकर त्रुटी दूर करण्यात येतील, असे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले या लक्षवेधीच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री विक्रम काळे, सचिन अहिर, अनिकेत तटकरे, धीरज लिंगाडे, डॉ.मनीषा कांयदे यांनी सहभाग घेतला. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील सर्व शासकीय महिला वसतिगृहांच्या सुरक्षेच्यादृष्टीने महिला दक्षता समिती स्थापन करण्याची सूचना केली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या चौकशीनंतर प्रकरण राज्यपालांना सादर

0

– उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 18 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कामकाजाबाबत चौकशी करण्यासाठी शासनस्तरावरून चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने दिलेल्या अहवालातील शिफारशी विचारात घेऊन कुलगुरूंना खुलासा सादर करण्यास कळविण्यात आले होते. त्यानुसार आलेल्या खुलाशाच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्यासाठी सदर प्रकरण कुलपती म्हणून मा.राज्यपाल यांच्याकडे सादर करण्यात आले असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य प्रवीण दटके यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.

यासंदर्भात अधिक माहिती देताना मंत्री श्री.पाटील म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिक्षांचे निकाल उशिरा लावणे तसेच अन्य अनियमित कामकाजाबाबत चौकशी करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली होती. एमकेसीएलला निविदा प्रक्रियेशिवाय दिलेल्या कामाचा अहवाल देखील राज्यपालांकडे देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त अन्य बाबी असल्यास समिती नेमण्यात येईल आणि त्याची चौकशी करून राज्यपालांना अवगत करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले. याअनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, सतीश चव्हाण यांनी सहभाग घेतला.

अण्णाभाऊ साठेंच्या फकीरावर लवकरच चित्रपट करणार – प्रविण तरडे

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृत्ती दिनानिम्मित अभिवादन व व्याख्यानाचे आयोजन –
पुणे -साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची अजरामर ,साहित्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरणारी साहित्य कृती फकीरा या कादंबरीवर लवकरच चित्रपट निर्माण करणार असल्याची घोषणा निर्माता,दिग्दर्शक व सुप्रसिद्ध अभिनेते प्रविण तरडे यांनी आज केली. अण्णा भाऊ साठे यांचा आज स्मृत्ती दिन होता त्यानिमित मातंग एकता आंदोलनाच्या वतीने नेहरू स्टेडियम येथे आज अभिवादन व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी तरडे बोलत होते .
पुढे ते म्हणाले की ,अण्णा भाऊ अतिशय प्रतिभावान साहित्यिक होते समाजातील उपेक्षित माणसाला त्यांनी साहित्यात नायक बनविले. एवढ्या मोठ्या साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही तो मिळाला असता तर ज्ञानपीठ पुरस्काराची उंची वाढली असती असे परखड मत तरडे यांनी मांडले . यावेळी आतिशय गरीब आणि हालाखीच्या परिस्थितीत दहावी व बारावी मध्ये चांगले यश मिळवले अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि रोख परितोषक देऊन प्रविण तरडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सभेच्या अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष रमेश बागवे यांनी साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांचे कार्य सांगितले, तसेच आजच्या तरुण पिढीने फकिरा चा स्वाभिमान शिकला पाहिजे तसेच अण्णा भाऊ साठे यांचा विचार आत्मसात केला पाहिजे, असे ते म्हणाले .
यावेळी मातंग एकता आंदोलनाचे
कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक अविनाश बागवे , मातंग समाजाचे जेष्ठ नेते अंकल सोनवणे ,अनिल हतागळे,विठ्ठल थोरात ,सुरेखा खंडागळे, ॲड. राजश्रीताई अडसूळ ,रवी पाटोळे यासह मातंग एकता आंदोलनांचे राज्य व शहर पदाधिकारी ,कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विठ्ठल थोरात यांनी केले, आभार संजय साठे यांनी मांडले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन अरुण गायकवाड यांनी केले.

सुरक्षित वाहतूकीसाठी स्कूल बस नियमावलीचे काटेकोर पालन व्हावे- पोलीस आयुक्त रितेश कुमार

पुणे, दि. १८: शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस यांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले.

पोलीस आयुक्तालयात आयोजित शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. मितेश घट्टे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, अतुल आदे आदी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त श्री. कुमार यावेळी म्हणाले. विद्यार्थ्यांची घर ते शाळेदरम्यानच्या वाहतुकीदरम्यान अपघात किंवा इतर प्रकारे जीवितास, शारीरिक, मानसिक धोक्याच्या घटनांना प्रतिबंध व्हावा यासाठी स्कूल बस नियमावलींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. स्कूल बसमध्ये मदतनीस (अटेंडन्ट), मुलींची वाहतूक होणाऱ्या स्कूल बसमध्ये महिला मदतनीस असणे बंधनकारक आहे. या बसेसचे वाहनचालक चांगले प्रशिक्षित, नैतिकदृष्ट्या सक्षम, पूर्वेतिहास चांगला असणारे असावेत. या बाबींची खात्री शालेय परिवहन समितीने करणे आवश्यक आहे.

रात्री प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम
पुणे शहरात माहिती तंत्रज्ञान कंपन्या व आदी ठिकाणी रात्रपाळीत काम करणाऱ्या महिला तसेच एकूणच रात्री प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ऑटोरिक्षा, टॅक्सी आदींच्या तपासणीसाठी पोलीस विभाग, वाहतूक शाखा तसेच परिवहन विभागाने संयुक्त विशेष मोहीम हाती घ्यावी, अशा सूचनाही रितेश कुमार यांनी दिल्या.

रात्रीच्या वेळी अडवून अव्वाच्या सव्वा प्रवासभाडे मागणे, चोऱ्या, प्रवाशांना मारहाण तसेच अन्य गैरप्रकार घडल्याचे लक्षात घेऊन रात्री नाकाबंदीच्यावेळी सर्व वाहनांची कसून तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या वाहनांवर, चालकांवर कठोर कारवाई करावी. फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहनांच्या नंबरप्लेट जप्त करणे व वाहने अटकावून ठेवणे आदी कठोर पावले उचलावीत, असेही निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले.

श्री. कर्णिक म्हणाले, सर्व संबंधित यंत्रणांनी बैठक घेऊन तसेच शालेय परिवहन समितीने स्कूल बस नियमावलीनुसार काम होत असल्याची खात्री करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असेही ते म्हणाले.

यावेळी श्री. मगर म्हणाले, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपरिषदांनी आपल्या क्षेत्रातील शासकीय, खासगी शाळात शालेय परिवहन समिती स्थापन झाल्याची खात्री करावी. दर तीन महिन्याला बैठका आयोजित करुन या विषयाबाबत संवेदनशीलता, जागरुकता निर्माण करावी. कोणतीही अनुचित घटना घडणार नाही यासाठी पूर्वीपासूनच सतर्क असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. शिंदे म्हणाले, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसचा शाळेबरोबर सामंजस्य करार करणे शाळांची जबाबदारी आहे. या वाहनांचे वैध योग्यता प्रमाणपत्र असणे व वाहनाच्या रचनेत स्कूल बस नियमावलीनुसार आवश्यक त्या सुधारणा केलेल्या असणे आवश्यक आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने याकडे विशेष लक्ष द्यावे. शाळेसोबत करार नसलेल्या खासगी प्रवासी वाहनांतून विद्यार्थ्यांची वाहतूक होणार नाही हे पाहणे शाळेची तसेच शालेय परिवहन समितीची जबाबदारी आहे. विनापरवानगी वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास परिवहन विभाग तसेच पोलीसांच्या निदर्शनास तात्काळ आणून द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.

श्री. भोर यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. जिल्ह्यात स्कूल बस विद्यार्थी वाहतूक समितीचे काम सुलभपणे आणि प्रभावी पद्धतीने होण्यासाठी https://schoolbussafetypune.org हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात ९ हजार ६६३ हजार स्कूल बस असून ५ हजार ७३१ शाळांनी या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. उर्वरित सर्व शाळांनी त्यावर नोंदणी करावी यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा. शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने जानेवारी ते १० जुलै २०२३ दरम्यान ७०९ स्कूल बस तसेच ४१७ इतर वाहनांची तपासणी केली. यामध्ये १७८ स्कूल बस व ८४ इतर वाहने दोषी आढळली व ३५ वाहने अटकावून ठेवण्यात आली. या कारवाईत नियमांच्या उल्लघनाबद्दल २९ लाख ७५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली.

विरोधी ऐक्याचे नाव ठरले:INDIA चा फुल फॉर्म खरगेंनी सांगितला, पुढची बैठक मुंबईत, तिथेच 11 जणांची समन्वय समिती ठरणार

बेंगलोर –

बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांच्या ऐक्याच्या दुसऱ्या दिवशीची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी विरोधी आघाडीला इंडिया असे नाव देण्यात आल्याचे सांगितले. या नावाचा फुल फॉर्मही त्यांनी सांगितला. त्यांच्यानुसार याचा फुल फॉर्म “इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स” असा आहे.

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला हरवण्यासाठी 26 विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाले- समन्वयासाठी 11 सदस्यांची एक समिती आणि एक कार्यालय लवकरच स्थापित केले जाईल. मुंबईत होणाऱ्या पुढील बैठकीत याची घोषणा केली जाईल असे खरगे म्हणाले.

भाजपने ईडी, सीबीआयसारख्या लोकशाही संस्था नष्ट केल्या आहेत. आमच्यात राजकीय मतभेद आहेत. मात्र आम्ही देश वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. यापूर्वी आम्ही पाटण्यात भेटलो होतो. तिथे 16 पक्ष उपस्थित होते. आजच्या बैठकीत 26 पक्ष सहभागी झाले आहेत. हे पाहून एनडीए 36 पक्षांसोबत बैठक घेत आहेत. मला माहिती नाही ते पक्ष कोणते आहेत. ते नोंदणीकृत आहेतही की नाहीत.

सर्व मीडियावर मोदींचा कब्जा आहे. असे आधी कुठेही बघितले गेले नाही की मीडिया आमच्या विरोधात इतकी शत्रूतापूर्ण झाला. आज आम्ही स्वतःच्या हितासाठी नव्हे तर देश वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. सरकारचे अपयश सर्वांसमोर आणणे हे आमचे ध्येय आहे. राहुल, ममतांसह सर्व सहमत असल्यावर मी आनंदी आहे. 2024 ला आम्ही एकत्र लढू आणि चांगले निकाल आणू.

आघाडीचे नेतृत्व कोण करेल, चेहरा कुणाचा असेल या प्रश्नाच्या उत्तरात खरगे म्हणाले- आम्ही समन्वय समिती बनवत आहोत. मुंबईच्या बैठकीत ही 11 नावे ठरतील. पुढील माहिती तेव्हाच मिळेल.

लढा एनडीए आणि इंडिया यांच्यात

राहुल गांधी म्हणाले आज देशाचा आवाज दाबला जात आहे. इंडिया हे नाव यामुळेच निवडण्यात आले, कारण लढा एनडीए आणि इंडिया यांच्यात आहे. मोदी आणि इंडिया यांच्यात आहे. कुणी इंडियाविरोधात उभा राहिल्यास तो कसा जिंकेल तुम्हाला माहिती आहे. भारताच्या विचारांवर हल्ला होत आहे. भाजप हा हल्ला करत आहे. बेरोजगारी वाढत आहे आणि मोदींच्या जवळ असलेल्या अब्जाधीशांना फायदा होत आहे.

देशात द्वेष पसरवला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले 9 वर्षांत केंद्राने प्रत्येक क्षेत्र उध्वस्त केले आहे. यांनी विमानतळ, जहाज, आकाश, जमीन, पाताळ सर्व काही विकले आहे. या सरकारवर शेतकरी, व्यापारी प्रत्येक घटक असमाधानी आहे. देशात द्वेष पसरवला जात आहे, त्यापासून देशाला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.

जातीय ऐक्य धोक्यात आणले

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या देशात दलित, हिंदू, मुस्लीम प्रत्येकाचे जीवन धोक्यात आहे. दिल्ली, बंगाल, मणिपूर असो, सरकारांची खरेदी-विक्री हेच त्यांचे काम आहे. आमच्या आघाडीचे नाव इंडिया आहे. बीजेपी तुम्ही इंडियाला चॅलेंज करणार का?

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “आजची बैठक चांगली झाली. आजपासून खरं आव्हान सुरू झालं आहे. आमच्या २६ पक्षांच्या बैठकीत आघाडीला INDIA नाव देण्याचं ठरलं आहे. तुम्ही आधी युपीए नाव ऐकलं. एनडीए आताही आहे. पण प्रत्यक्षात हे अस्तित्वात नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात अनेकांचं जीवन धोक्यात आहे. अल्पसंख्याक, बहुसंख्याक, मुस्लिम, शीख, ईसाई, दिल्ली, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगाल, महाराष्ट्र सर्वच धोक्यात आहेत. सरकार विकणं आणि सरकार खरेदी करणं हेच सरकारचं काम आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी खरं आव्हान स्वीकारलं आहे”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.आम्ही आमच्या देशावर प्रम करतो. देशप्रेमींवर आम्ही प्रेम करतो. आम्ही विद्यार्थी, शेतकरी, दलित, अर्थव्यवस्थेसाठी काम करतो. आम्ही देशासाठी आणि जगासाठी आहोत. यापुढे सर्व कार्यक्रम, जाहिरात इंडिया या बॅनर अंतर्गत होणार. जर तुम्हाला आव्हान द्यायचंय तर द्या”, असा एल्गारही ममता बॅनर्जी यांनी पुकारला.“आपत्कालीन घटनेपासून देशाला वाचवा. देशातील जनतेला वाचवा. आम्हाला इंडियाला वाचवायचं आहे, आम्हाला देशाला वाचवायचं आहे. भाजपा देश विकण्यासाठी सौदागिरी करतंय. लोकशाहीला खरेदी करण्याची सौदागिरी सुरू आहे. स्वतंत्र्य यंत्रणांनाही काम करू देत नाहीत”, असंही ममता बॅनर्जी म्हणाले.

मोदींच्या NDA विरोधात INDIA उभी ठाकली; उद्धव ठाकरेंचा एल्गार, म्हणाले, ‘घाबरु नका, आम्ही आहोत!’

बेंगलोर – जनता आता भाजपच्या हुकूमशाहीविरोधात एकटवू लागली आहे. यापूर्वी देशात स्वातंत्र्यलढा झाला. आतादेखील देशातील स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. त्यामुळे देशातील विरोधी पक्ष एकत्र येऊन लढा देतील. या आघाडीला इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लूझिव्ह अलायन्स अर्थात INDIA असे नाव देण्यात आले आहे. आम्ही भाजपविरोधातील लढाईत नक्की यशस्वी होऊ, असे वक्तव्य ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ते मंगळवारी बंगळुरुत आयोजित करण्यात आलेल्या विरोधकांच्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंगळुरुतील विरोधकांची आजची बैठक यशस्वी ठरल्याचा दावा केला. आम्ही वेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र कसे येणार, असा प्रश्न विचारला जातो. पण राजकारणात वेगळ्या विचारधारा असल्या पाहिजेत. यालाच तर लोकशाही म्हणतात. हा फक्त आमच्या पक्षाचा प्रश्न नाही. काहींना वाटतं की, आम्ही कुटुंबासाठी लढत आहोत. होय, हा देश आमचं कुटुंब आहे, आमची लढाई ही देशातील हुकूमशाहीविरोधात आहे. देशातील स्वातंत्र्य धोक्यात आल्याने आम्ही लढत आहत. ही लढाई एखादा पक्ष किंवा व्यक्तीविरोधात नाही तर निती आणि हुकूमशाहीविरोधात आहे. एक व्यक्ती किंवा एक पक्ष हा देश होऊ शकत नाही. या लढाईत आम्ही नक्की यशस्वी होऊ, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. सध्याच्या वातावरणामुळे देशातील जनता घाबरली आहे. मात्र, मी त्यांना विश्वास देऊ इच्छितो की, ‘तुम्ही घाबरु नका, आम्ही आहोत’, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.