Home Blog Page 1441

सुरक्षित वाहतूकीसाठी स्कूल बस नियमावलीचे काटेकोर पालन व्हावे- पोलीस आयुक्त रितेश कुमार

पुणे, दि. १८: शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस यांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले.

पोलीस आयुक्तालयात आयोजित शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. मितेश घट्टे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, अतुल आदे आदी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त श्री. कुमार यावेळी म्हणाले. विद्यार्थ्यांची घर ते शाळेदरम्यानच्या वाहतुकीदरम्यान अपघात किंवा इतर प्रकारे जीवितास, शारीरिक, मानसिक धोक्याच्या घटनांना प्रतिबंध व्हावा यासाठी स्कूल बस नियमावलींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. स्कूल बसमध्ये मदतनीस (अटेंडन्ट), मुलींची वाहतूक होणाऱ्या स्कूल बसमध्ये महिला मदतनीस असणे बंधनकारक आहे. या बसेसचे वाहनचालक चांगले प्रशिक्षित, नैतिकदृष्ट्या सक्षम, पूर्वेतिहास चांगला असणारे असावेत. या बाबींची खात्री शालेय परिवहन समितीने करणे आवश्यक आहे.

रात्री प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम
पुणे शहरात माहिती तंत्रज्ञान कंपन्या व आदी ठिकाणी रात्रपाळीत काम करणाऱ्या महिला तसेच एकूणच रात्री प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ऑटोरिक्षा, टॅक्सी आदींच्या तपासणीसाठी पोलीस विभाग, वाहतूक शाखा तसेच परिवहन विभागाने संयुक्त विशेष मोहीम हाती घ्यावी, अशा सूचनाही रितेश कुमार यांनी दिल्या.

रात्रीच्या वेळी अडवून अव्वाच्या सव्वा प्रवासभाडे मागणे, चोऱ्या, प्रवाशांना मारहाण तसेच अन्य गैरप्रकार घडल्याचे लक्षात घेऊन रात्री नाकाबंदीच्यावेळी सर्व वाहनांची कसून तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या वाहनांवर, चालकांवर कठोर कारवाई करावी. फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहनांच्या नंबरप्लेट जप्त करणे व वाहने अटकावून ठेवणे आदी कठोर पावले उचलावीत, असेही निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले.

श्री. कर्णिक म्हणाले, सर्व संबंधित यंत्रणांनी बैठक घेऊन तसेच शालेय परिवहन समितीने स्कूल बस नियमावलीनुसार काम होत असल्याची खात्री करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असेही ते म्हणाले.

यावेळी श्री. मगर म्हणाले, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपरिषदांनी आपल्या क्षेत्रातील शासकीय, खासगी शाळात शालेय परिवहन समिती स्थापन झाल्याची खात्री करावी. दर तीन महिन्याला बैठका आयोजित करुन या विषयाबाबत संवेदनशीलता, जागरुकता निर्माण करावी. कोणतीही अनुचित घटना घडणार नाही यासाठी पूर्वीपासूनच सतर्क असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. शिंदे म्हणाले, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसचा शाळेबरोबर सामंजस्य करार करणे शाळांची जबाबदारी आहे. या वाहनांचे वैध योग्यता प्रमाणपत्र असणे व वाहनाच्या रचनेत स्कूल बस नियमावलीनुसार आवश्यक त्या सुधारणा केलेल्या असणे आवश्यक आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने याकडे विशेष लक्ष द्यावे. शाळेसोबत करार नसलेल्या खासगी प्रवासी वाहनांतून विद्यार्थ्यांची वाहतूक होणार नाही हे पाहणे शाळेची तसेच शालेय परिवहन समितीची जबाबदारी आहे. विनापरवानगी वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास परिवहन विभाग तसेच पोलीसांच्या निदर्शनास तात्काळ आणून द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.

श्री. भोर यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. जिल्ह्यात स्कूल बस विद्यार्थी वाहतूक समितीचे काम सुलभपणे आणि प्रभावी पद्धतीने होण्यासाठी https://schoolbussafetypune.org हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात ९ हजार ६६३ हजार स्कूल बस असून ५ हजार ७३१ शाळांनी या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. उर्वरित सर्व शाळांनी त्यावर नोंदणी करावी यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा. शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने जानेवारी ते १० जुलै २०२३ दरम्यान ७०९ स्कूल बस तसेच ४१७ इतर वाहनांची तपासणी केली. यामध्ये १७८ स्कूल बस व ८४ इतर वाहने दोषी आढळली व ३५ वाहने अटकावून ठेवण्यात आली. या कारवाईत नियमांच्या उल्लघनाबद्दल २९ लाख ७५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली.

विरोधी ऐक्याचे नाव ठरले:INDIA चा फुल फॉर्म खरगेंनी सांगितला, पुढची बैठक मुंबईत, तिथेच 11 जणांची समन्वय समिती ठरणार

बेंगलोर –

बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांच्या ऐक्याच्या दुसऱ्या दिवशीची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी विरोधी आघाडीला इंडिया असे नाव देण्यात आल्याचे सांगितले. या नावाचा फुल फॉर्मही त्यांनी सांगितला. त्यांच्यानुसार याचा फुल फॉर्म “इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स” असा आहे.

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला हरवण्यासाठी 26 विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाले- समन्वयासाठी 11 सदस्यांची एक समिती आणि एक कार्यालय लवकरच स्थापित केले जाईल. मुंबईत होणाऱ्या पुढील बैठकीत याची घोषणा केली जाईल असे खरगे म्हणाले.

भाजपने ईडी, सीबीआयसारख्या लोकशाही संस्था नष्ट केल्या आहेत. आमच्यात राजकीय मतभेद आहेत. मात्र आम्ही देश वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. यापूर्वी आम्ही पाटण्यात भेटलो होतो. तिथे 16 पक्ष उपस्थित होते. आजच्या बैठकीत 26 पक्ष सहभागी झाले आहेत. हे पाहून एनडीए 36 पक्षांसोबत बैठक घेत आहेत. मला माहिती नाही ते पक्ष कोणते आहेत. ते नोंदणीकृत आहेतही की नाहीत.

सर्व मीडियावर मोदींचा कब्जा आहे. असे आधी कुठेही बघितले गेले नाही की मीडिया आमच्या विरोधात इतकी शत्रूतापूर्ण झाला. आज आम्ही स्वतःच्या हितासाठी नव्हे तर देश वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. सरकारचे अपयश सर्वांसमोर आणणे हे आमचे ध्येय आहे. राहुल, ममतांसह सर्व सहमत असल्यावर मी आनंदी आहे. 2024 ला आम्ही एकत्र लढू आणि चांगले निकाल आणू.

आघाडीचे नेतृत्व कोण करेल, चेहरा कुणाचा असेल या प्रश्नाच्या उत्तरात खरगे म्हणाले- आम्ही समन्वय समिती बनवत आहोत. मुंबईच्या बैठकीत ही 11 नावे ठरतील. पुढील माहिती तेव्हाच मिळेल.

लढा एनडीए आणि इंडिया यांच्यात

राहुल गांधी म्हणाले आज देशाचा आवाज दाबला जात आहे. इंडिया हे नाव यामुळेच निवडण्यात आले, कारण लढा एनडीए आणि इंडिया यांच्यात आहे. मोदी आणि इंडिया यांच्यात आहे. कुणी इंडियाविरोधात उभा राहिल्यास तो कसा जिंकेल तुम्हाला माहिती आहे. भारताच्या विचारांवर हल्ला होत आहे. भाजप हा हल्ला करत आहे. बेरोजगारी वाढत आहे आणि मोदींच्या जवळ असलेल्या अब्जाधीशांना फायदा होत आहे.

देशात द्वेष पसरवला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले 9 वर्षांत केंद्राने प्रत्येक क्षेत्र उध्वस्त केले आहे. यांनी विमानतळ, जहाज, आकाश, जमीन, पाताळ सर्व काही विकले आहे. या सरकारवर शेतकरी, व्यापारी प्रत्येक घटक असमाधानी आहे. देशात द्वेष पसरवला जात आहे, त्यापासून देशाला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.

जातीय ऐक्य धोक्यात आणले

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या देशात दलित, हिंदू, मुस्लीम प्रत्येकाचे जीवन धोक्यात आहे. दिल्ली, बंगाल, मणिपूर असो, सरकारांची खरेदी-विक्री हेच त्यांचे काम आहे. आमच्या आघाडीचे नाव इंडिया आहे. बीजेपी तुम्ही इंडियाला चॅलेंज करणार का?

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “आजची बैठक चांगली झाली. आजपासून खरं आव्हान सुरू झालं आहे. आमच्या २६ पक्षांच्या बैठकीत आघाडीला INDIA नाव देण्याचं ठरलं आहे. तुम्ही आधी युपीए नाव ऐकलं. एनडीए आताही आहे. पण प्रत्यक्षात हे अस्तित्वात नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात अनेकांचं जीवन धोक्यात आहे. अल्पसंख्याक, बहुसंख्याक, मुस्लिम, शीख, ईसाई, दिल्ली, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगाल, महाराष्ट्र सर्वच धोक्यात आहेत. सरकार विकणं आणि सरकार खरेदी करणं हेच सरकारचं काम आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी खरं आव्हान स्वीकारलं आहे”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.आम्ही आमच्या देशावर प्रम करतो. देशप्रेमींवर आम्ही प्रेम करतो. आम्ही विद्यार्थी, शेतकरी, दलित, अर्थव्यवस्थेसाठी काम करतो. आम्ही देशासाठी आणि जगासाठी आहोत. यापुढे सर्व कार्यक्रम, जाहिरात इंडिया या बॅनर अंतर्गत होणार. जर तुम्हाला आव्हान द्यायचंय तर द्या”, असा एल्गारही ममता बॅनर्जी यांनी पुकारला.“आपत्कालीन घटनेपासून देशाला वाचवा. देशातील जनतेला वाचवा. आम्हाला इंडियाला वाचवायचं आहे, आम्हाला देशाला वाचवायचं आहे. भाजपा देश विकण्यासाठी सौदागिरी करतंय. लोकशाहीला खरेदी करण्याची सौदागिरी सुरू आहे. स्वतंत्र्य यंत्रणांनाही काम करू देत नाहीत”, असंही ममता बॅनर्जी म्हणाले.

मोदींच्या NDA विरोधात INDIA उभी ठाकली; उद्धव ठाकरेंचा एल्गार, म्हणाले, ‘घाबरु नका, आम्ही आहोत!’

बेंगलोर – जनता आता भाजपच्या हुकूमशाहीविरोधात एकटवू लागली आहे. यापूर्वी देशात स्वातंत्र्यलढा झाला. आतादेखील देशातील स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. त्यामुळे देशातील विरोधी पक्ष एकत्र येऊन लढा देतील. या आघाडीला इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लूझिव्ह अलायन्स अर्थात INDIA असे नाव देण्यात आले आहे. आम्ही भाजपविरोधातील लढाईत नक्की यशस्वी होऊ, असे वक्तव्य ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ते मंगळवारी बंगळुरुत आयोजित करण्यात आलेल्या विरोधकांच्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंगळुरुतील विरोधकांची आजची बैठक यशस्वी ठरल्याचा दावा केला. आम्ही वेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र कसे येणार, असा प्रश्न विचारला जातो. पण राजकारणात वेगळ्या विचारधारा असल्या पाहिजेत. यालाच तर लोकशाही म्हणतात. हा फक्त आमच्या पक्षाचा प्रश्न नाही. काहींना वाटतं की, आम्ही कुटुंबासाठी लढत आहोत. होय, हा देश आमचं कुटुंब आहे, आमची लढाई ही देशातील हुकूमशाहीविरोधात आहे. देशातील स्वातंत्र्य धोक्यात आल्याने आम्ही लढत आहत. ही लढाई एखादा पक्ष किंवा व्यक्तीविरोधात नाही तर निती आणि हुकूमशाहीविरोधात आहे. एक व्यक्ती किंवा एक पक्ष हा देश होऊ शकत नाही. या लढाईत आम्ही नक्की यशस्वी होऊ, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. सध्याच्या वातावरणामुळे देशातील जनता घाबरली आहे. मात्र, मी त्यांना विश्वास देऊ इच्छितो की, ‘तुम्ही घाबरु नका, आम्ही आहोत’, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

राज्यात  बर्ड फ्लू H५N१ विषाणूचा प्रादुर्भाव नाही – अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे

मुंबई, दि. 18 : बर्ड फ्लू (H5N1) या नवीन रोग प्रादुर्भावाचा धोका वाढला असल्याच्या आशयाचे वृत्त प्रसारित होत आहे. मात्र सन २०२३ मध्ये सद्यस्थितीत राज्यात कुठेही H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव नाही असे अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

अंडी व कुक्कुट मांस ७० अंश सेंटीग्रेड तापमानावर ३० मिनीटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे. बर्ड फ्ल्यू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत. उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे  पूर्णपणे सुरक्षित असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

राज्यामध्ये बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव प्रथम सन २००६ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर येथे झाला होता. त्यावेळी या विषाणूचा स्ट्रेन हा H5N1 हा होता. त्यानंतर २०२१ आणि २०२२ मध्ये राज्यात आढळून आलेल्या बर्ड फ्लू रोग प्रादुर्भावातही विषाणूचा स्ट्रेन H5N1 होता. सन २०२३ मध्ये सद्यस्थितीत राज्यात कुठेही H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव झालेला नाही.

केंद्र शासनाच्या बर्ड फ्लूच्या कृती आराखड्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांकडून बर्ड फ्लू सर्वेक्षणाकरिता नमुने प्रामुख्याने परसातील कुक्कुट पक्षी, व्यापारीतत्वावर पाळण्यात येणारे पक्षी, पक्षाचे बाजार, स्थलांतरित पक्षांचे मार्ग, पानवठ्याच्या जागा जिथे स्थलांतरित पक्षी पाणी पिण्यासाठी एकत्रित येतात, प्राणीसंग्रहालये, जंगल याही ठिकाणाहून पक्ष्यांचे नमुने गोळा करून त्याची तपासणी केली जाते. गतवर्षी राज्यामध्ये एकूण २३,३९३ इतके नमुने यादृच्छिक (Randorm); पद्धतीने गोळा करून त्याची तपासणी केलेली आहे. ज्यामध्ये एकाही पक्ष्याचे नमुने H5N1 विषाणूसाठी होकारार्थी आढळून आलेले नाहीत.

बर्ड फ्लू रोगाचा प्रतिबंध विनाविलंब करण्याच्या उद्देशाने प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अधिनियमान्वये राज्य शासनाला असलेले सर्व अधिकार शासन अधिसूचना दि. १२.०१.२०२१ नुसार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान केले आहेत. कुक्कुट पक्षामध्ये मरतूक झालेल्या संवेदनशील भागास सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले जाण्याची प्रक्रिया करून आवश्यक त्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाय योजना स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येतात.

राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणाऱ्या पक्षांमध्ये मर्तुक झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायीक पोल्ट्री फार्ममधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मर्तुक झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यामध्ये याची माहिती द्यावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १९६२ किंवा १८००२३३०४१८ ह्या टोल फ्री क्रमांकावर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची माहिती द्यावी.

प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ च्या कलम ४(५) अन्वये राज्यातील प्रत्येक पशुपालक अथवा इतर कोणतीही व्यक्ती शासनेतर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत पशुपालक ज्यांना नमूद कायद्याशी संलग्न असणाऱ्या अनुसूचितील रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्या वस्तुस्थितीची माहिती नजिकच्या ग्राम अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे व त्यांनी ही माहिती नजिकच्या उपलब्ध पशुवैद्यकाला लेखी स्वरुपात कळविणे बंधनकारक आहे.

अलिबाग जिल्हा रुग्णालयासाठी नवीन अद्ययावत इमारत उभारणार– रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. १८ : अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सन १९८०-८१ मध्ये करण्यात आले आहे. या इमारतीचे संरचनात्मक परीक्षण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले असून त्याची दुरूस्ती आणि पुनर्बांधणी आवश्यक आहे. यामुळे रूग्णालयाची सहा मजल्यांची नवीन इमारत उभारण्याचे शासनाचे धोरण असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, जिल्हा रुग्णालयाच्या जागेतच नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे. महाविद्यालय प्रशासन आणि जिल्हा रुग्णालयात झालेल्या करारानुसार तीन वर्षापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाला रुग्णालयातील रुग्णसेवा, पायाभूत सुविधा उपयोगात आणता येणार आहेत. कराराच्या तीन वर्षानंतर वैद्यकीय महाविद्यालय उसर येथे होईल. तोपर्यंत रूग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

संरचनात्मक परीक्षणानुसार इमारतीचे डागडुजीचे काम सध्या सुरू आहे. इमारतीच्या 58 खांबांपैकी 17 खांब काढून पूर्णपणे नवीन करण्यात आले आहेत. इतर खांबांचे काम पुढील काळात करण्यात येणार आहे. दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सहा मजल्यांची इमारत बांधण्यात येईल, अशी माहितीही मंत्री श्री. चव्हाण यांनी दिली.

या चर्चेत सदस्य जयंत पाटील, प्रवीण दरेकर, डॉ.मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.

सीबीआय, ईडीची भिती दाखवून लोकांना ब्लॅकमेल करण्याचे भाजपाचे षडयंत्र.

शिक्षकांची रिक्त पदे न भरता निवृत्त शिक्षकांना मानधनावर घेण्याचा जीआर अन्यायकारक.

मुंबई, दि. १८ जुलै
भाजपाने मागील ९ वर्षात महाराष्ट्राला कलंक लावण्याचे पाप केले आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबद्दलचा जो आक्षेपार्ह व्हिडिओ एका खाजगी वृत्तवाहिनीने दाखवलेला आहे, तो बघितल्यानंतरच या विषयावर जास्त बोलणे योग्य होईल. परंतु दुसऱ्याचे वस्त्रहरण करनाऱ्याचेच आज वस्त्रहरण झाले आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
किरीट सोमय्या यांच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, २०१४ पासून राज्यात सीबीआय, ईडी. आयकर विभाग यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची भिती दाखवून ब्लॅकमेल करण्याचे वातावरण सुरु आहे. भाजपाने, कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा? असा परिस्थिती झाली आहे. जी व्यक्ती दुसऱ्यांचे वस्त्रहरण करत होती त्याच व्यक्तीचे आता वस्त्रहरण झालेले आहे. या मुद्दा काँग्रेस पक्षासाठी महत्वाचा नाही तर काँग्रेससाठी जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत. महागाई, शेतकरी, महिला, कायदा सुव्यवस्था, तरुणांचे प्रश्न आहेत. महागाई गगनाला भिडली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, सरकार विधानसभेत घोषणा करते पण मदत मात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही, हे प्रश्न मार्गी लावण्याचे काम काँग्रेस पक्षासाठी महत्वाचे आहे.
बेरोजगारीचा प्रश्न मोठा गंभीर आहे, सरकारी नोकर भरती करण्यात राज्य सरकार टाळाटाळ करत आहे. राज्यात ५० ते ६० हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत परंतु ती भरली जात नाहीत आणि निवृत्त शिक्षकांना मानधनावर घेण्याचा अफलातून शासन आदेश जारी केलेला आहे. हा शासन आदेश शिक्षक होऊ पाहणाऱ्या तरुण-तरुणींचा घोर अपमान करणारा आहे. या शासन आदेशाविरोधात पुण्यात बेरोजगार तरुण आंदोलनही करत आहेत. सरकारने या प्रश्नात लक्ष घालून तरुणांना न्याय दिला पाहिजे असेही पटोले म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांचे फायर ऑडिट करणार -; उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 18 : मुंबई महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयांचे लवकरच फायर ऑडिट करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

मुंबई महानगरपालिका रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याने धोका निर्माण झाल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सर्वश्री सुनील राऊत, अमित देशमुख, सुनील प्रभू, अमिन पटेल, आशिष शेलार, राम कदम, राजेश टोपे, अजय चौधरी, रवी राणा यांनी उपस्थित केला होता.

मंत्री श्री. सामंत म्हणाले, मुंबई महानगरपालिका अंतर्गत असलेल्या विविध रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात आले आहे. ज्या रुग्णालयांचे फायर ऑडिट राहिले आहे. किंवा काही त्रुटी राहिल्या आहेत, त्या लवकर पूर्ण करून अग्नि सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना आणि फायर ऑडिट प्रक्रिया ९० दिवसात करण्याच्या सूचना देण्यात येतील. तसेच रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल,असेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी निधी देणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 18 : पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून या परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्याबाबतचा प्रश्न सदस्य रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला होता.

मंत्री श्री. सामंत  म्हणाले की, नांदेड किरकीटवाडी व नांदोशी या गावांना 3 हजार मी.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून ग्रामपंचायत काळात अस्तित्वात असलेल्या नांदेड विहीर येथे पाणी आणून या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडरचे द्रावण टाकून या गावांमध्ये अस्तित्वात असलेल्या वितरण व्यवस्थेमधून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

तसेच पुणे महानगरपालिकेमार्फत नव्याने समाविष्ट ११ व २३ गावांकरीता पाणीपुरवठा करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यवाही महानगरपालिकेमार्फत सुरू आहे.

या गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

ही घाण महाराष्ट्राबाहेर काढा:सोमय्याच्या कथित कृत्या विरोधात शिवसेना महिला आघाडीची निदर्शने


पुणे :- भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओ वरून कथित कृत्याचा निषेध शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या पुणे महिला आघाडीच्या वतीने करण्यात आला. यावेळी सोमय्याच्या पोस्टरच्या तोंडाला शेण लावून महिलांनी जोड्याने मारले तसेच पोस्टर पायाखाली तुडवून निषेध व्यक्त करण्यात आला. “असली विकृत घाण महाराष्ट्रातून बाहेर काढा”, अशी मागणी महिला पदाधिकाऱ्यांनी केली.

यावेळी बोलताना शहर संघटीका सविताताई मते म्हणाल्या की, त्या व्हिडिओ संदर्भात भाजपा किरीट सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करावी तसेच गृहमंत्री या प्रकरणाची चौकशी करून काय कारवाई करणार आहेत ते स्पष्ट करावे.

नगरसेविका पल्लवीताई जावळे म्हणाल्या, भाजप महिला नेत्या चित्रा वाघ आता का शांत बसल्या आहेत?, या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट होते की किरीट हा विक्षिप्त माणूस आहे त्यावर कारवाई व्हावी .

यावेळी शिवसेना महिला आघाडीच्यावतीने आंदोलनास शहर संघटीका सविता मते, माजी नगरसेविका व संघटीका पल्लवी जावळे, विद्या होडे,करूणा घाडगे, प्रज्ञा लोणकर, स्नेहल पाटोळे, गौरी चव्हाण,पद्मा सोरटे, रोहिणी कोल्हाल, भारती भोपळे, दिपाली राऊत, संगीता भिलारे, मीनाक्षी हरिशंद्रे, नमिता चव्हाण, अमृत पठारे, सुलभा तळेकर, स्वाती ठकार, शितल जाधव, अनुपमा मांगडे ,विजया मोहिते, शिल्पा पवार ,वत्सला घुले ,अनिता जांभूळकर ,स्नेहल आल्हट, वासंती शिरसाट, आशुताई शिरसाट, भारती दामजी, पल्लवी नागपुरे, वैशाली दिघे, विमल परदेसी, लता गुंजाळ, प्रियांका जव्हेरी, स्मिता पवार, दिपा भंडारी, नीलू गड्डम, बेबी म्हेत्रे इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या .

कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणी ब्रिजभूषण सिंह यांना अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली- भाजपा खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतल्या राऊज अव्हेन्यू कोर्टाने कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात त्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यांच्या सर्वसाधारण जामिनावर २० जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सहा महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी कुस्तीपटूंनी अनेक दिवस दिल्लीत आंदोलन केलं. मोठ्या लढाईनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात राऊज अवेन्यू कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी आता कोर्टाने ब्रिजभूषण यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आता बुधवारी त्यांच्या सर्वसाधारण जामिनावर सुनावणी होईल. त्यांना २५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर २ दिवसांचा जामीन मिळाला आहे. यासह कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांचा जामीनही मंजूर करण्यात आला आहे. २० जुलै रोजी त्यांच्या नियमित जामिनावर सुनावणी होईल. यावर निकाल येईपर्यंत ब्रिजभूषण सिंह अंतरिम जामिनावर असतील.

कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांच्याविरोधातही दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, विनोद तोमर हे ब्रिजभूषण सिंह यांना सर्व प्रकारची मदत करत होते. एखादी महिला कुस्तीपटू ब्रिजभूषण सिंह यांना भेटायला गेली असेल तर ती तिथे एकटीच असेल याची काळजी विनोद तोमर घेत होते. ब्रिजभूषण आणि कुस्तीपटूंची एकांतात भेट होईल याची काळजी तोमर घेत होते.

दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, तक्रारदार महिला कुस्तीपटू या वेगवेगळ्या वेळी दिल्लीतल्या ब्रिजभूषण सिंह यांच्या कार्यालयात गेल्या होत्या. त्यांच्याबरोबर कोणीही असलं तरी विनोद तोमर तिथे केवळ महिला कुस्तीपटू आणि ब्रिजभूषण यांची भेट घडवून आणत होते. तोमर यांनी या कुस्तीपटूंचे पती आणि प्रशिक्षकांना ब्रिजभूषण यांच्या कार्यालयापासून लांब बसवलं होतं. तर दुसऱ्या बाजूला ब्रिजभूषण यांनी त्यांच्या कार्यालयात या महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार कुस्तीपटूंनी केली आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेचा शतकोत्तर महोत्सव संस्मरणीय व्हावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई दि १८: “महाराष्ट्र विधानपरिषदेचा शतकोत्तर महोत्सव परिसंवाद, प्रदर्शने, संदर्भसमृद्ध प्रकाशने याद्वारे संस्मरणीय ठरेल, अशा पद्धतीने साजरा करण्यात यावा. माजी ज्येष्ठ सदस्यांनाही या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होता यावे यासाठी विभागस्तरावर देखील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे,” अशी सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

विधानपरिषदेचा शतकोत्तर महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यासंदर्भात विचार – विनिमय आणि नियोजनासाठी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी विधानपरिषदेतील गटनेते आणि सदस्यांची बैठक विधानभवनात बैठक घेतली.

यावेळी, माजी सदस्यांना विनंती पत्रे पाठवून त्यांच्याकडून विधानपरिषदेसंदर्भातील महत्त्वपूर्ण घटना आणि छायाचित्रे मागविणे, देशातील अन्य राज्यांमधील विधानपरिषद सदस्यांना चर्चा – परिसंवादासाठी निमंत्रित करणे, कायदानिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा, संदर्भांचे संकलन पुस्तक स्वरूपात करणे, वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि योगदान यासंदर्भातील मान्यवरांचे लेख, सभागृहातील चर्चा इत्यादींचे संदर्भ संकलित आणि संपादित करणे, या शतकोत्तर महोत्सव उपक्रमांमध्ये समाजातील विविध घटकांना सहभागी करून घेणे, निवृत्त सदस्यांना निरोप देतानाच्या छायाचित्रांचे पुस्तक स्वरूपात संकलन करणे, माहितीपट निर्मिती इत्यादी सूचना याबैठकीत गटनेते आणि सदस्यांनी मांडल्या. या सूचना स्वीकारण्यात येऊन विषयांनुसार समिती नेमण्यात येऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निश्चित केले.

या बैठकीस, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, सर्वश्री प्रवीण दरेकर, सतेज ऊर्फ बंटी पाटील, शशिकांत शिंदे, विजय ऊर्फ भाई गिरकर, जयंत पाटील, कपिल पाटील, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, सुरेश धस, प्रा. मनिषा कायंदे, सत्यजित तांबे, अरुण लाड, अमोल मिटकरी, नरेंद्र दराडे, रामराजे नाईक निंबाळकर (दूरदृष्यप्रणालीद्वारे), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (२) विलास आठवले, उपसचिव राजेश तारवी, ऋतुराज कुडतरकर, सायली कांबळी, पुष्पा दळवी, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, उपग्रंथपाल शत्रुघ्न मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

भाजपा युवा मोर्चाच्या ‘एक सही भविष्यासाठी’ अभियानाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई दि- १८ जुलै २०२३

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या ‘एक सही भविष्यासाठी’ अभियानाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज वरळी, सांताक्रुज, सायन कोळीवाडा, अंधेरी (पश्चिम), चांदीवली, दहिसर, मालाड येथील महाविद्यालयात ‘एक सही भविष्यासाठी’ अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले.

सायन कोळीवाडा येथील विद्यालंकार कॉलेज, डी एन नगर अंधेरी (पश्चिम) वालिया कॉलेज, सांताक्रुज वाकोला ब्रिज जवळील पटक हायस्कूल आणि महाविद्यालय, वरळीतील लाला लजपत राय कॉलेज, चांदिवलीतील शिंघर कॉलेज, दहिसरमधील मातृछाया कॉलेज तर मालाड येथील एमडी महिला कॉलेजमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभाग नोंदवला.

देशाची युवा पिढी हीच खरी संपत्ती असून ‘एक सही भविष्यासाठी’ अभियानाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने तरुण जोडले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांचे भविष्य घडवण्याच्या दृष्टीने राबवलेल्या अनेक योजना तसेच मुंबईत होणाऱ्या आयआयएम आदी निर्णयांची माहिती महाविद्यालयीन तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान सुरू आहे अशी प्रतिक्रिया मुंबई भाजयुमो अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी दिली.

नवी राजवट ही काळजी करण्यासारखी: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट तर्फे भूषण पुरस्कार प्रदान सोहळा
पुणे : आम्ही भारतीय आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. भारत देश हा घटनेप्रमाणे चालला पाहिजे. मुलगी-मुलगा हे सारखेच असे आपण म्हणतो. मात्र, घरामध्ये त्यांच्यात भेदभाव करुन विषमता सुरु होते. देशात देखील जोरात भांडण सुरु आहे. सध्याची नवी राजवट ही काळजी करण्यासारखी आहे. त्यामुळे आता घरी बसून चालणार नाही, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव यांनी व्यक्त केले. 
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, अ‍ॅड.सुषमा अंधारे, बाळासाहेब अमराळे, वैशाली गाडगीळ, पराग गाडगीळ, अ‍ॅड.प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, सपना लालचंदानी, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव आदी उपस्थित होते. वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले आहे. 
यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संचालक सौरभ गाडगीळ,  उद्योग भूषण पुरस्कार युवराज ढमाले कॉर्प चे संचालक युवराज ढमाले, कला भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे, संगीत भूषण पुरस्कार प्रख्यात संगीतकार कौशल इनामदार, धार्मिक भूषण पुरस्कार श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट शिरगाव चे प्रमुख विश्वस्त प्रकाश देवळे आणि पत्रकारिता भूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांना प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,फळांची करंडी, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. 
अ‍ॅड. सुषमा अंधारे म्हणाल्या, कुटुंबाला उभे करण्यात महिलांचा मोठा वाटा असतो. प्रत्येक महिला आपल्या कुटुंबासाठी उर्जेचा स्त्रोत असते. मी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले नाही. इच्छा असेल तर प्रतिकूलतेवर मात करता येते आणि आपण राजकारणासह कोणत्याही क्षेत्रात यशस्वीपणे काम करु शकतो. 
पुरस्काराला उत्तर देताना प्रिया बेर्डे म्हणाल्या, कला क्षेत्र म्हणजे ग्लॅमर, पैसा या गोष्टी दिसतात. मात्र, त्यामागे मोठे कष्ट असतात. घरातील परिस्थिती, आलेली संकटे यांना तोंड देत आम्ही रसिकांचे मनोरंजन करीत असतो. जेव्हा रसिकांची कौतुकाची थाप पडते, तेव्हा कलाकारामधील उत्साह व उमेद वाढते, असेही त्यांनी सांगितले. रामदास फुटाणे यांनी मनोगत व्यक्त केले. निवृत्ती जाधव यांनी प्रास्ताविक केले. अबोली सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले.

नीलम गोऱ्हेंनी पक्ष बदललेला नाहीच,देवेंद्र फडणवीस म्हणाले,शिवसेना कायद्याप्रमाणे शिंदेंचीच ..तिकडचे इकडे आले नाहीत तर ते अपात्र …

नीलम गोऱ्हे अपात्र प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा मोठा इशारा

मुनगुंंटीवार म्हणाले सचिन अहिर , एक दिवस तुम्हालाही भाजपात यावे लागेल …अनिल परबाची अवस्था महाभारतातल्या अश्वथामा सारखी नाही झाली तर मला सांगा …

मुंबई-आज विधानपरिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अपात्रातेचा विषय चर्चेला आला तेव्हा ..विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या पदावरच आक्षेप घेत शेकापचे जयंत पाटील यांनी त्यांचं पदावर बसणंच कसं गैर आहे हे सांगितलं आणि गोंधळ घातला. सोमवारी हे घडल्यानंतर मंगळवारीही पुन्हा विधान परिषदेत हाच मुद्दा उपस्थित झाला. मात्र नीलम गोऱ्हे यांनी देवेंद्र फडणवीस हे यावर बोलतील हे स्पष्ट केलं. त्यानुसार नीलम गोऱ्हे यांना पदावरुन हटवता येणार नाही असं आता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.“सदस्यपदी निवडून आल्यापासून आत्तापर्यंत नीलम गोऱ्हे या शिवसेना या पक्षाच्या सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकरणात पक्षांतराचा प्रश्न कुठेही निर्माण झालेला नाही. ज्याचा उल्लेख सन्माननीय मुनगंटीवार यांनी केला. त्याबद्दलही सांगतो, निवडणूक आयोगाने हे स्पष्ट केलं आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्वाखालील शिवसेनेला दिलं आहे. एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे प्रमुख आहेत. त्यांच्याकडे चिन्हही आहे.”“आत्ता सुनावणी कुठली सुरु आहे? हा जो निवडणूक आयोगाचा निर्णय आला त्याआधी १६ जणांना जे अपात्र ठरवण्यात आलं त्यांना हा निर्णय लागू होतो की नाही. त्याचेही अधिकार सर्वोच्च न्यायालयाने ओरिजनल पार्टी कुठली हे ठरवण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. आता नीलमताई या एकनाथ शिंदेंसह आल्या याला मी प्रवेश म्हणणार नाही. लौकिक अर्थाने समजावं म्हणून आपण काहीही म्हणू पण हा प्रवेश नाही. उलट मला वाटतं की जे उरलेले शिवसैनिक आहेत त्यांनाही ओरिजनल पॉलिटिकल पार्टीकडे आलं पाहिजे. अर्थात मी हे मेरिटवर बोलतो आहे. नाहीतर त्यांच्याबद्दलही प्रश्न निर्माण होणार आहे. ओरिजनल पॉलिटिकल पार्टी एकनाथ शिंदेकडेच आहेत. नीलम गोऱ्हे या कायदा मानणाऱ्या आहेत. त्यांना हे माहित आहे की आपण ज्या शिवसेना पक्षात निवडून आलो जो अर्ज आपण भरला होता तो शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेंकडे निवडणूक आयोगाने दिली आहे.”

किरीट सोमय्या यांना क्लिनचीट देणार का? ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांचा DCM देवेंद्र फडणवीस यांना सवाल

मुंबई-भाजप नेते किरीट सोमय्या यांना देवेंद्र फडणवीस क्लिनचीट देणार का? असा कडा सवाल ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी करुणा शर्मा ते पुजा चव्हाण असो की सोलापुरातील देशमुख प्रकरण असो कुणालाच न्याय दिला नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. त्यातच भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मोठा गजहब माजला आहे. यावर बोलताना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी अनेक सवाल उपस्थित केलेत.

ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव म्हणाले की, किरीट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे आपली चौकशी करण्याची मागणी केली आहे. जे किरीट सोमय्या लोकांचया चौकशी करा म्हणते त्यांची सीबीआयमार्फत किंवा अन्य कुठल्या उच्च एजेन्सीकडे चौकशी देणार का असा सवाल उपस्थित केला आहे. भाजपने संपूर्ण देशामध्ये कोणी कुठले कपडे घालावे, भाजपने मांडलेली भूमिकेविरोधात जर आपले मत मांडले तर तो राष्ट्रविरोधी आहे, म्हणत त्यांच्यावर देशद्राहाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. त्याला पाकिस्तानला घालवा असे काही मापदंड घालून दिले आहेत.किरीट सोमय्या एक भाजपचा मापदंड आहे का? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांची कृती ही त्याचा मापदंड आहे का?, ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंच्या बाबतीत करुणा शर्मांना देवेंद्र फडणवीसांकडून न्याय मिळाला नाही, संजय राठोड यांना तर पुजा चव्हाण प्रकरण होऊन देखील मंत्रीपद देण्यात आले. राहुल शेवाळे प्रकरण असो की सोलापुरातील देशमुख प्रकरणात महिलांना न्याय मिळाला नाही. महायुतीकडून किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या कोणत्याच प्रकरणात महिलांना न्याय मिळाला नाही. मग आता देवेंद्र फडणवीस किरीट सोमय्यांना क्लिनचीट देतील का?,असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.