Home Blog Page 1436

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे कलावंतांसाठी डिजिटल व्यासपीठ तयार करणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 31 : राज्यातील विविध भागात अनेक कलाकार आपली कला वेगवेगळ्या स्वरुपात प्रेक्षकांसमोर सादर करत असतात. या सर्व कलाकारांना कला सादरीकरणासाठी व्यासपीठ असावे म्हणून सांस्कृतिक कार्य विभाग कलावंतांसाठी डिजिटल व्यासपीठ तयार करणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

चित्रकार मिलिंद लिंबेकर यांचे “द वॉन्डरिंग शॅडो” या चित्रप्रदर्शनाचे जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजन करण्यात आले आहे. 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान सुरु राहणाऱ्या या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन आज सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चित्रकार मिलिंद लिंबेकर यांच्यासह आशा महाकाले, महेश सरमळकर, चित्रकार विजय बोधनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, विदर्भातील चित्रकाराच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळणे हा मी माझा बहुमान समजतो. आगामी काळात मिलिंद लिंबेकर यांची कला फक्त विदर्भात, मुंबईत न पोहोचवता भारतभर पोहोचवेल, अशी खात्री आहे.

भारतामध्ये कला, संस्कृती यांची विविधता आहे. महाराष्ट्रात कला, साहित्य, संस्कृती यामध्ये विविधता आहेच. आज राज्यात प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना आपले हक्काचे व्यासपीठ मिळावे, आपली कला सादर करण्याची संधी मिळावी यासाठी एक डिजिटल व्यासपीठ तयार करण्यात येत आहे. या डिजिटल व्यासपीठावर महाराष्ट्रातील प्रत्येक कलाकाराला आपली कला प्रदर्शित करण्याची संधी मिळणार असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

श्री. मिलिंद यांची आतापर्यंत पाच एकल चित्र प्रदर्शनी झाली आहेत. त्याचबरोबर देशभरातील अनेक चित्रप्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे. “द वॉन्डरिंग शॅडो” या चित्रप्रदर्शनात त्यांनी मानवी आणि प्राण्यांच्या स्वरुपात मोठ्या खुबीने नाट्यमयता आणली आहे. या चित्रप्रदर्शनात बहुतांश चित्रे ही ऍक्रेलिक माध्यमातील आहेत.

‘सीडीएस’ परीक्षा पूर्व तयारीसाठी इच्छुक उमेदवारांना आवाहन

मुंबई, दि. ३१ : कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे १ फेब्रुवारी ते ९ एप्रिल २०२३ या कालावधीत सीडीएस अभ्यासक्रम – (क्र. ६०) चे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी १ व २ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत मुलाखतीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारांसाठी १६ एप्रिल २०२३ रोजी घेण्यात येणाऱ्या सीडीएस या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत १० जानेवारी २०२३ अशी होती. या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीसाठी येताना त्यांनी फेसबुक/वेब पेजवर डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे (डीएसडब्ल्यू) सर्च करून त्यातील सीडीएस- ६० कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेल्या परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक (दूरध्वनी क्रमांक ०२५३- २४५०३२) येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवरून संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

भाजपच्या शर्यतीत बिडकर, घाटे,आणि स्वरदा बापट

पुणे- कसबा विधानसभा मतदार संघात मुक्ता टिळकांच्या निधनामुळे पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आज पासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवातही झाली असली तरी वरिष्ठ राजकीय पातळीवर मात्र याबाबत अद्याप म्हणाव्या तशा वेगवान हालचालींना प्रारंभ झालेला दिसत नाही,तरीही स्थानिक पातळीवर मात्र भाजपा आणि मविआ कोणाला उमेदवारी देणार आणि द्यायला हवी यावर मोठ्या प्रमाणात उत्सुकता आणि चर्चेला तोंड मात्र फुटलेले आहे. टिळक यांच्या घराण्याला कसब्याने बरीच वर्षे सातत्याने कॉंग्रेस आणि भाजप या राजकीय पक्षाच्या स्तरावर साथ दिली आहे,आता मात्र इथे कार्यकर्ते आणि मतदार यांना बदल हवा असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.बिगर ब्राम्हण उमेदवार भाजपने दिला तर मविआची प्रचारात गोची होईल असे सांगून बिडकर यांच्या नावाला प्राधान्य दिले जात असले तरी कसबा हा बालेकिल्ला आहे असे सांगून टिळक नकोत तसे स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले रासने हि नकोत असा मोठा सूर आहे.स्थायी समितीची कारकीर्द सारी निवडणुकीत चव्हाट्यावर येईल असे कार्यकर्त्यांचे आणि भाजपाच्या मतदारांचेही म्हणणे आहे. बिडकर यांनी सभागृहनेता म्हणून आपली कारकीर्द गाजविली आहे. अनेक प्रकरणात विरोधकांचा खुले आम सामना केला आहे,पण या मतदार संघात सातत्याने ब्राम्हण उमेदवार दिला गेला आहे याकडे लक्ष वेधून कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळख असलेल्या धीरज घाटे यांचे नाव पुढे येते आहे. घाटे यांनी अल्प काल सभागृहनेता म्हणून काम केले आहे मात्र कुठल्याही प्रकरणात त्यांच्यावर बोट रोखले गेलेले नाही.नगरसेवक पदावर असताना त्यांनी विरोधकांना केलेला खंबीर विरोध लक्षात राहील असाच राहिला आहे.पक्षांच्या विविध कामात,कार्यक्रमात त्यांचा सहभाग याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.तर खासदार गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांच्याकडेही मोठ्या आशेने येथील भाजपचा मतदार पाहत आहे. बापटांची कारकीर्द निव्वळ कसब्यालाच नाही तर पूर्ण पुण्याला ठाऊक आहे. मतदार कोणत्याही पक्षाकडे कल असणारा असू देत पण सर्व स्तरावर घरोघरी संपर्क असलेला नेता म्हणून बापटांची ओळख आहे,आणि तीच शिदोरी त्यांच्या सुनबाई स्वरदा यांच्याकडे आहे.त्यांना आताच गेल्या आठवड्यात कन्यारत्न झाले.आणि बापटांची तब्बेत हि बरी नाही..या बाबी त्यांच्या मायनस बाबी सांगितल्या जात असल्या तरी या निवडणुकीतून आणि त्याद्वारे किमान मध्यम स्तरावरील राजकारणातूनसुद्धा बापट बाहेर असणे हे बापटांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना कितपत रुचेल हा प्रश्नच आहे. त्या दृष्टीने स्वरदा यांच्या बाबत सहानुभूती निश्चित आहे. त्यांच्या विजयाची लोक खात्री देतात.

स्वीकृत सदस्य बनवून नंतर सभागृहनेता केलेल्या गणेश बिडकरांनी आपल्या नेतृत्वाला आणि मतदारांना कायम समाधानी ठेवण्यासाठी केलेली अडीच वर्षातील धडपड देखील लक्षणीय आहे. ब्राम्हण उमेदवार नकोच हि परंपरा मोडायची असेल तर बिडकरच उजवे ठरतात, मविआ च्या प्रचार यंत्रणेची नाकाबंदी करू शकतात.अशा स्थितीत भाजपमध्ये घाटे,बिडकर आणि स्वरदा बापट अशी कसब्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच असल्याचे मानले जाते आहे. हेच तीनही उमेदवार प्रशासनावर पकड ठेऊ शकणारे आहेत असेही मानले जाते.आजही भाजपच्या आणि संघाच्या राजकीय वर्तुळात टिळक,रासने हि नावे मागे पडल्याचेच चित्र आहे.

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे जळगावात आयोजन

विविध क्रीडा प्रकारात एक हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी होणार

मुंबई, दि. 31 जानेवारी 2023 : महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन 2 ते 5 फेब्रुवारी 2023 दरम्यान जळगाव येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत महावितरणच्या सर्व 16 परिमंडलांतील 1 हजार 83 अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. यात 353 महिला तर 730 पुरुष खेळाडूंचा समावेश आहे.

महावितरणमधील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. 2022-23 या वर्षाकरिता या स्पर्धेचे यजमानपद जळगाव परिमंडलाकडे आहे. स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी (2 फेब्रुवारी) सकाळी साडेनऊ वाजता जळगाव येथील एकलव्य क्रीडा संकुलात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय ‍सिंघल यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण प्रादे‍शिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक (संचालन) संजय ताकसांडे, संचालक (वित्त) रवींद्र सावंत, संचालक (प्रकल्प/मानव संसाधन) प्रसाद रेशमे, संचालक (वाणिज्य) तथा कार्यकारी संचालक (देयके व महसूल) योगेश गडकरी, औरंगाबाद प्रादे‍शिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले कार्यकारी संचालक (मानव संसाधन) अरविंद भादीकर, कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) प्रमोद शेवाळे, कार्यकारी संचालक (‍वित्त व लेखा) स्वाती व्यवहारे, प्रादे‍शिक संचालक (नागपूर) सुहास रंगारी, प्रादे‍शिक संचालक (पुणे) अंकुश नाळे उपस्थित राहणार आहेत.

या  स्पर्धेचा  समारोप व पारितोषिक वितरण रविवारी (5 फेब्रुवारी) दुपारी 4 वाजता एकलव्य क्रीडा संकुलावरच संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांच्या शुभहस्ते होणार असून कोकण प्रादे‍शिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून संचालक (वित्त) रवींद्र सावंत, संचालक (प्रकल्प/मानव संसाधन) प्रसाद रेशमे, संचालक (वाणिज्य) तथा कार्यकारी संचालक (देयके व महसूल) योगेश गडकरी, औरंगाबाद प्रादे‍शिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले, कार्यकारी संचालक (मानव संसाधन) अरविंद भादीकर, कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) प्रमोद शेवाळे, कार्यकारी संचालक (‍वित्त व लेखा) स्वाती व्यवहारे, प्रादे‍शिक संचालक (नागपूर) सुहास रंगारी, प्रादे‍शिक संचालक (पुणे) अंकुश नाळे, स्पर्धेचे मुख्य समन्व्यक तथा मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेत खो-खो, ॲथलेटिक्स, क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिक्वाईट, कॅरम, कबड्डी, व्हॉलीबॉल, कुस्ती, बुद्धिबळ आणि ब्रिज या खेळांचा समावेश आहे.

येरवड्यातील रिमांड होम मधून ७ मुले पळविली, कात्रजमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार तर वडारवाडीत दहावीतील मुलीवर अ‍ॅसीड फेकण्याचा प्रयत्न

पुणे- पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या बदली नंतर पुण्यातील गीन्हेगारीत वेगाने वाढ होताना दिसत असून कोयत्याने दहशत पसरविण्याची हौस एकीकडे आता क्रेझ बनत चाललेली असताना, मटका, जुगार , आणि दारू अड्डे या सारख्या आणि इतर अन्य स्वरूपांच्या गुन्ह्यातही मोठी वाढ होते आहे, विशेष म्हणजे यात अल्पवयीन मुले भरडली जात असल्याने हा प्रश्न सामाजिक दृष्ट्या गंभीर बनत चालल्याचे स्पष्ट दिसत आहे. येरवड्यातील बाल निरीक्षण गृहातून ७ मुले पळवून नेल्याचा गुन्हा येवडा पोलिसांनी दाखल केला आहे तर कात्रज मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराची आणि वडारवाडी येथे दहावीतील मुलीवर अ‍ॅसीड फेकण्याचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा हि पोलिसांनी नोंदविला आहे.

येरवडा पोलिसात पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राच्या बाल निरीक्षण गृहातून ७ मुलांना अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार या बाल निरीक्षण गृहाचे सेवक संतोष कुंभार यांनी पोलिसात दाखल केली आहे.अज्ञात इसमाने पश्चिम बाजूच्या संरक्षण भिंतीला शिडी लावून विधीसंघार्षित ७ मुले पळवून नेम्याचे त्यांनी या फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास पीआय काटे (मोबाईल -८८०५१७९७७५ ) हे करत आहेत .

एका शाळकरी अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तरुणाने तिचा विनयभंग करून तिच्यावर अ‍ॅसीड सारखे काहीतरी ज्वलनशील पदार्थ फेकून तिला जखमी करण्याचा धक्कादायक प्रयत्न केल्याने याबाबत चतुःश्रृंगी पोलिसांनी एका आरोपीस गजाआड केले आहे.

अक्षय राजु चव्हाण (24, रा. मारूती मंदिराजवळ, वडारवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय चव्हाण हा बिगारी कामगार असून अल्पवयीन पिडीत मुलगी शाळेत दहावीचे शिक्षण घेते आहे. 29 जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी ही चतुःश्रृंगी परिसरात राहत्या घराजवळ एका ठिकाणी उभी होती. त्यावेळी आरोपीने तिच्याशी जवळीक साधत अश्लिल चाळे केले. त्यानंतर आरोपीने तिला आपण फिरायला जाऊ म्हणत तिच्याकडे शरिर संबंधाची मागणी केली.या प्रकारास मुलीने विरोध केल्यानंतर, आरोपीने त्याच्याजवळील अ‍ॅसीड सदृश्य पदार्थ तरूणीवर फेकले व तिला जखमी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरापी अक्षय चव्हाण याला चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे.आरोपी अक्षय चव्हाण विवाहित असताना ही त्याने पिडीत अल्पवयीन मुलीला त्रास दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. संशयीत आरोपीने केलेल्या अ‍ॅसीड हल्ल्या तरूणी जखमी झाली नसल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रत्नदिप गायकवाड करत आहेत.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल

पुणे शहरात राहणाऱ्या एका १६ वर्षाच्या मुलीवर कात्रज येथील घरी नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी तरुणावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात आरोपीने मुलीचे तिच्या शाळेतून तिला बोलवून तिला कात्रज येथे नेऊन, लैंगिक अत्याचार केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अशोक माणिक काळे (21, रा. कात्रज,पुणे) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी 2022 पासून हा प्रकार 28 जानेवारी 2023 दरम्यान घडला आहे. आरोपीने झालेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास मुलीस जीवे मारण्याची धमकी दिली होती.

संवेदनशील दादा..आणि त्यांची सातत्यपूर्ण सुरु असलेली आरोग्य सेवा…

मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून लहान बालकाची कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण
कोल्हापूर दि.३१ कुमार शिवांश प्रकाश बुणे, (वय वर्ष ४, राहणार- वाडी रत्नागिरी (जोतिबा देवस्थान डोंगर) या लहान बाळाला जन्मत:च ऐकू दोन्ही कानांनी ऐकू नव्हते. प्रकाश बुणे हे मुलाचे वडील श्री जोतिबा देवस्थान येथे गुरव असून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण परिस्थिती बेताची असल्यामुळे जबाबदारीने काळजीपूर्वक करतात.मुलगा शिवांश याच्या आजारावर उपचार होऊन तो लवकरात लवकर बरा झाला पाहिजे यासाठी प्रकाश बुणे प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते.आपल्या मुलाच्या वैद्यकीय सहकार्यासाठी त्यांनी मुंबई येथे चंद्रकांतदादा पाटील यांच्या आरोग्य सेवकांच्या टीम शी संपर्क केला. वैद्यकीय समन्वयकांमार्फत बुणे कुटुंबाची पार्श्वभूमी तसेच उपचारासाठी कुटुंबाची चालेलेली धडपड लक्षात घेऊन हा विषय दादांच्या समोर मांडण्यात आला आणि त्यानंतर दादांच्या मार्गदर्शनाखाली कुमार शिवांशवर पुढील उपचाराची मोहीम सुरु झाली.
दादांची समर्थ साथ असल्याने वैद्यकीय टीम कामाला लागली प्रकाश बुणे यांनीही आपली सर्व ताकद पणाला लावून चौफेर प्रयत्न सुरु केले. मुंबई मधील प्रसिद्ध कोकिलाबेन रुग्णालयात उपचार घ्यायचे निश्चित झाले. शास्त्रक्रियेसाठी एकूण १५ लाख रुपये खर्च येणार होता. चंद्रकांतदादांच्या मार्गदर्शनात सुरु असलेल्या प्रयत्नांना यश आले. आणि आज दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी कुमार शिवांश यांच्या दोन्ही कानाची कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली. लवकरच शिवांश सामान्य मुलांप्रमाणे ऐकू शकेल.
समाजातील सज्जनशक्तीच्या सामूहिक प्रयत्नातून दादांनी कुमार शिवांश वरील उपचाराचा मार्ग सोपा केला. असे अनेक शिवांश समाजामध्ये आहेत ज्यांना मदतीची गरज आहे आणि महाराष्ट्राचे संवेदनशील नेतृत्व मदत करण्यासाठी सज्ज आहे.

अबब,कॉंग्रेसच्या १६ इच्छुकांनी दिल्या उमेदवारीसाठी मुलाखती .

 पुणे-    पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथ कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी ईच्छुक उमेदवारांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीचे निरीक्षक आ. संग्राम थोपटे यांनी मुलाखती घेतल्या. या मुलाखती मध्ये अनेक विद्यमान व माजी नगरसेवकांनी मुलाखती दिल्या. या मुलाखती दरम्यान प्रत्येक ईच्छुक उमेदवाराने आपापल्या पध्दतीने निवडणुक कशा पध्दतीने लढविली पाहिजे याबाबत आपले मत व्यक्त केले.

     यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, नगरसेवक रविंद्र धंगेकर, बाळासाहेब दाभेकर, कमल व्‍यवहारे, नीता रजपूत, संगीता तिवारी, विजय तिकोणे, आरीफ कांचवाला, संजय कांबळे, भोलेनाथ वांजळे, योगेश भोकरे, ‌ऋषीकेश वीरकर, गौरव बाळंदे, अस्लम बागवान, शिवाजीराव आढाव, गोपाळ तिवारी आदी ईच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या.

महाराष्ट्राने उघडले विजयाचे खाते

जबलपूर-
राष्ट्रीय खेळाडू नरेंद्र आणि जानव्ही पेठे यांच्या कुशल नेतृत्वाखाली चॅम्पियन महाराष्ट्र खो-खो संघांनी पाचव्या किताबाच्या आपल्या मोहिमेला दमदार सुरुवात केली. चार वेळच्या पदक विजेत्या महाराष्ट्र खो खो संघांनी सोमवारी पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये डावाने विजय सलामी दिली. यासह या दोन्ही संघांनी महाराष्ट्राला स्पर्धेत विजयाचे खाते उघडून दिले. सोमवारी मोठ्या जल्लोषात पाचव्या सत्रातील खेलो इंडिया स्पर्धेला सुरुवात झाली.

सुहानी, प्रीतीने गाजविले जबलपूरचे मैदान
सुहानी धोत्रे प्रीती काळे संपदा मोरे आणि अश्विनी यांनी सर्वोत्तम कामगिरी करत जबलपूर चे खो-खो मैदान गाजवले. त्यामुळे जानवी च्या नेतृत्वात महाराष्ट्र संघाला पहिल्याच दिवशी डावाने विजय साजरा करता आला. महाराष्ट्र महिला संघाने सलामी सामन्यात तामिळनाडू वर एक डाव नऊ गुणांनी विजय संपादन केला. यादरम्यान सुहानी धोत्रेचे संघाचे विजयातील योगदान मोलाचे ठरले.. तिने सात विकेट घेत दीड मिनिट खेळी केली. तसेच प्रीती काळेने अडीच मिनिटे संरक्षण करत मैदानावर लक्षवेधी कामगिरी केली.. यादरम्यान डिफेन्स मध्ये अश्विनी ची कामगिरी उल्लेखनीय ठरली.

नरेंद्रच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विजय
गत चॅम्पियन महाराष्ट्र पुरुष खो-खो संघाने सलामी सामन्यात तेलंगणा टीमला डावाने पराभूत केले. कर्णधार नरेंद्रने अष्टपैलू कामगिरी करताना संघाला विजय मिळवून दिला. त्याने पाच गडी बाद करत अडीच मिनिटे संरक्षण केले. याशिवाय औरंगाबादच्या सचिन पवारने संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले त्यामुळे महाराष्ट्र संघाला एकतर्फी विजय साजरा करता आला.

यजमान मध्य प्रदेश समोर आज महाराष्ट्राचे आव्हान
डावाने विजय सलामी देणारा महाराष्ट्र संघ आता सलग दुसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. यजमान मध्य प्रदेश संघाला मंगळवारी गटातील दुसऱ्या लढतीत महाराष्ट्राच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्र महिला आणि पुरुष खो-खो संघाचा गटातील दुसरा सामना आज मध्य प्रदेश टीमशी होणार आहे. त्यामुळे यजमान संघाला घरच्या मैदानावर विजय मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र दिसते.

१० ठिकाणी शोध मोहिमेनंतर अमर मूलचंदानीना अटक

पुणे : पिंपरीतील सेवा विकास बँकेचे माजी संचालक अमर मूलचंदानी यांच्या निवासस्थानावर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकल्यानंतर मूलचंदानी यांनी तपासात असहकार्य तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी त्यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली.भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रदेश उपाध्यक्षावर ईडीने कारवाई केल्याने पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बँकेच्या फसवणुकीशी संबंधित पीएमएलए 2002 अंतर्गत सुरू असलेल्या तपासात ईडीने 27.01.2023 रोजी पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील सेवा विकास सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाच्या परिसरात 10 ठिकाणी शोध मोहीम राबवली.आणि झडती दरम्यान 2.72 कोटी रुपये किमतीचे सोने आणि हिऱ्याचे दागिने, सुमारे 41 लाख रुपयांची रोकड, 4 हाय एंड कार, डिजिटल उपकरणे आणि विविध गुन्हे दाखले इत्यादी जप्त/जप्त केले आहेत,अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. 

तपासात असहकार्य तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अमर साधूराम मूलचंदानी यांच्यासह अशोक साधुराम मूलचंदानी, मनोहर साधुराम मूलचंदानी, दया अशोक मूलचंदानी, साधना मूलचंदानी, सागर मनोहर मूलचंदानी (सर्व रा. मिस्ट्री पॅलेस, तपोवन मंदिराजवळ, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ईडीचे अधिकारी सुधांशू श्रीवास्तव यांनी या संदर्भात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अमर मूलचंदानी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शुक्रवारी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीची पूर्तता करुन मूलचंदानी यांना सोमवारी (३० जानेवारी) अटक करण्यात आली, अशी माहिती पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकरराव अवताडे यांनी दिली.पिंपरीतील दी सेवा विकास सहकारी बँकेत बेकायदा कर्जवाटप आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कारवाई केली होती. आरबीआयने दोन महिन्यांपूर्वी सेवा बँकेचा परवाना रद्द केला होता. बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने कारवाई करण्याची मागणी ठेवीदारांकडून करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी (२८ जानेवारी) ईडीच्या पथकाने पिंपरीतील अमर मूलचंदानींचे गणेश हाॅटेल तसेच तपोवन मंदिराजवळील मिस्ट्री पॅलेस या इमारतीतील मूलचंदानी यांच्या निवासस्थानी कारवाई केली. ईडीचे अधिकारी आणि पथक सकाळी साडेसहाच्या सुमारास मूलचंदानी यांच्या निवासस्थानी पाेहोचले, तेव्हा सदनिकेचा दरवाजाबंद होता. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दरवाजा वाजविला. तेव्हा सदनिकेतून प्रतिसाद देण्यात आला नाही. दरवाजा वाजविण्यात आल्यानंतर उघडण्यात आला नाही. अखेर सकाळी सव्वा आठच्या सुमारास पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्याशी ईडीच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधला. तेव्हा पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. त्यानंतर मूलचंदानी कुटुंबीयांनी दरवाजा उघडला. ईडीचे अधिकारी तसेच पथक दोन तास मूलचंदानी यांच्या निवासस्थानसमोर थांबले होते. या काळात मूलचंदानी कुटुंबीयांनी पुरावे नष्ट करून तपासात असहकार्य केल्याचे ईडीचे अधिकारी श्रीवास्तव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली, दि. ३० : 74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावरील पथसंचलनात महारष्ट्राच्यावतीने सादर करण्यात आलेल्या ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ या द्वितीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार जाहीर आज झाला आहे. उत्तराखंड राज्याला प्रथम क्रमांक, तर उत्तर प्रदेश राज्याला तिसरा क्रमांक जाहीर झाला.

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्यावतीने उत्कृष्ट चित्ररथाची निवड करण्यात आली असून मंगळवारी दुपारी निवड झालेल्या राज्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावर्षी चित्ररथाची संकल्पना ‘नारी शक्ती’ वर आधारित होती.

महाराष्ट्राने ‘नारी शक्ती व साडे तीन शक्तिपीठा’चा महिमा चित्ररथाच्या माध्यमातून सादर केला होता. त्यात कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता ही तीन पूर्ण शक्तीपीठे, तर वणीची सप्तश्रृंगी या अर्ध्या शक्तिपीठांचे दर्शन पथसंचलनात उपस्थितांना घेता आले. या चित्ररथात संबळ वाजविणारे गोंधळी, पोतराज, हलगी वाजवून देवीची आराधना करणारा भक्त, असे भक्त‍िमय  वातावरण कर्तव्यपथावर चित्ररथाच्या माध्यमातून दर्शविले गेले.

 चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची होती. शुभ ॲड या संस्थेने चित्ररथाचे काम प्रत्यक्षात उतरविले होते. साडेतीन शक्तिपीठाची महिमा सांगणाऱ्या गीताला संगीत संगीतकार कौशल इनामदार यांनी दिले. तर, हे गीत प्राची गडकरी यांनी लिहिले आहे. यासह चित्ररथावर दिसणारे कलाकार हे विजनरी परफॉर्मिंग कला समूह, ठाणे येथील होते.

बर्फवृष्टीत राहुल गांधींचे भावुक भाषण अन बहिण भावाच्या प्रेमाचे दर्शन : भारत जोडो चा समारोप

श्रीनगर : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टीमध्ये संपली. याची सुरुवात 145 दिवसांपूर्वी कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी झाली होती. शेर-ए-काश्मीर स्टेडियममध्ये समारोप समारंभात राहुल यांनी 35 मिनिटांचे भाषण केले. सकाळपासून येथे जोरदार बर्फवृष्टी होत आहे. तरीही कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. सकाळपासूनच कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली. तर दुसरीकडे राहुल इथेही वेगळ्याच रंगात दिसले. बहीण प्रियंका यांच्यासोबत त्यांनी हिमवर्षावाचा आनंद लुटला. दोघेही एकमेकांवर बर्फ फेकताना दिसले.

रविवारी, 29 जानेवारी रोजी राहुल गांधींनी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवला. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या गाडीत ते तेथे पोहोचले. त्यांच्यासोबत बहीण प्रियंका गांधीही उपस्थित होत्या. तिरंगा फडकवल्यानंतर राहुल यांची भारत जोडो यात्रा संपली मात्र 30 जानेवारीला यात्रा संपणार होती.

ते म्हणाले, ‘मला आता जम्मू-काश्मीरच्या लोकांना आणि लष्कर-सुरक्षा दलांना काही सांगायचे आहे. मला हिंसा समजते. मी हिंसा बरोबर पाहिली आहे. ज्याने हिंसा पाहिली नाही त्यांना हे समजणार नाही. मोदीजी, अमित शहाजी, संघाच्या लोकांनी हिंसा पाहिली नाही. घाबरतात इथे आम्ही 4 दिवस फिरलो. भाजपचा कोणताही नेता असे वागू शकणार नाही याची मी खात्री देतो. जम्मू-काश्मीरचे लोक त्याला फिरू देणार नाहीत म्हणून नाही, तर त्यांना भीती वाटते म्हणून. काश्मिरी आणि सैनिकांप्रमाणेच मी माझ्या प्रियजनांना गमावल्याचे दुःख सहन केले आहे. ही वेदना मोदी-शहा समजू शकत नाहीत.

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीकरीता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. ३०: राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी – २०२२ परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत.

या परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधी याबाबतची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी दिली आहे.

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.५ दौंड येथील सशस्त्र पोलीस भरती लेखी परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध

आक्षेप नोंदवण्यास ३१ जानेवारीपर्यंतची मुदत

पुणे, दि. ३०: राज्य राखीव पोलीस बल गट क्र.५, दौंड या गटाच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेकरीता प्रवर्गनिहाय निवड झालेल्या उमेदवारांची यादी https://www.maharashtrasrpf.gov.in संकेतस्थळावर २७ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

रिक्त असलेल्या ७१ पदांकरीता मैदानी चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या गुणाच्याआधारे १:१० या प्रमाणात ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांना याबाबत काही हरकती किंवा आक्षेप असल्यास कार्यालयाच्या srpfgr5@rediffmail.com ई-मेल आयडीवर लेखी स्वरुपात किंवा समादेशक कार्यालयातील नियंत्रण कक्ष येथे प्रत्यक्षरित्या हजर राहून ३१ जानेवारी २०२३ रोजी ५ वाजेपर्यंत सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्या हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०२११७-२६२३४७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ दौंडच्या समादेशक विनीता साहू यांनी दिली आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्‍ली, 30 जानेवारी 2023

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने “भारतात टेलिव्हिजन वाहिन्यांचे अपलिंकींग आणि डाऊनलिंकिंग, 2022” विषयी 09.11.2022 रोजी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्वांनुसार खाजगी वाहिन्यांना दररोज 30 मिनिटांसाठी सार्वजनिक सेवा प्रसारण करावे लागेल. खाजगी सॅटेलाईट टीव्ही वाहिन्या प्रसारणकर्ते आणि त्यांच्या संघटनांसोबत मंत्रालयाने या संदर्भात अतिशय विस्तृत चर्चा केली आणि त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या अभिप्रायांच्या आधारे 30-1-2023 रोजी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

या सूचनेनुसार मंत्रालयाने हे स्पष्ट केले आहे की प्रसारण करण्यात आलेल्या कार्यक्रमात समाविष्ट असलेला संबंधित आशय हा सार्वजनिक सेवा प्रसारण म्हणून समजण्यात येईल. तसेच हे देखील स्पष्ट करण्यात येत आहे की एकाच वेळी 30 मिनिटे कालावधीमध्ये या आशयाचे प्रसारण करण्याची गरज नाही त्याऐवजी तितक्या कालावधीची लहान लहान भागात विभागणी करून त्याचे प्रसारण करता येऊ शकेल आणि प्रसारकाने याबाबत प्रसारण सेवा पोर्टलवर मासिक अहवाल ऑनलाईन सादर करण्याची गरज आहे. प्रसारणाच्या विषयामध्ये राष्ट्रीय महत्त्वाचा आणि सामाजिक संदर्भाचा खालील विषयांसह आशय समाविष्ट असला पाहिजे. हे विषय आहेत..

  1. शिक्षण आणि साक्षरतेचा प्रसार;
  2. कृषी आणि ग्रामीण विकास;
  3. आरोग्य आणि कुटुंब कल्याण;
  4. विज्ञान आणि तंत्रज्ञान;
  5. महिला कल्याण;
  6. समाजातील दुर्बल घटकांचे कल्याण;
  7. पर्यावरण आणि सांस्कृतिक वारशाचे संरक्षण आणि
  8. राष्ट्रीय एकात्मता

खाजगी सॅटेलाईट टीव्ही वाहिन्यांकडून ऐच्छिक अनुपालन आणि स्वयं प्रमाणनाच्या माध्यमातून सार्वजनिक सेवा प्रसारण साध्य करण्याचा या मार्गदर्शक सूचनेचा उद्देश आहे.

या मार्गदर्शक सूचनेची प्रत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेबसाईटवर

https://mib.gov.in/sites/default/files/Advisory%20on%20Obligation%20of%20PSB_1.pdf

आणि या ब्रॉडकास्ट सेवा पोर्टलवर उपलब्ध आहे.

मी कुणाचा अवमान अथवा तुलना केलेली नाही ,पराचा कावळा करून अर्थाचा अनर्थ करणाऱ्यांनी सुधरावे – चित्रा वाघ

मुंबई-: ‘जशी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्योतिबा फुले यांनी रोवली तसचं, स्त्री कर्तृत्वाचा पुरस्कार करण्याच्या नव्या परंपरेचा पायंडा चंद्रकांत दादांच्या माध्यमातून पाडला गेला. उगा पराचा कावळा करून,अर्थाचा अनर्थ करण्याचे काम काही जण करत असतील तर त्यांनी वेळीच स्वतःला सावरुन लवकरच सुधारावे, ही विनंती!!!’ असं लिहीत भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या पुणे भाजपच्या वतीने सन्मान स्त्री शक्तीचा हा मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित कार्यक्रमाला गेल्या होत्या. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महिलाच नेहमी पुरूषांचं औक्षण करतात पण पुरूषांनी ही महिलांचं औक्षण करायला, त्यांच अभिष्टचिंतन करायला हवं म्हणत ५ बंधूना चित्रा वाघ यांच औक्षण करायला सांगितलं. या पुढे आपण हे केले पाहीजे हेही सांगितलं. यावेळी बोलत असताना चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘कदाचित राज्यातील ही पहिली घटना असावी. पुणे हे स्त्रीमुक्ती चळवळीचे केंद्र राहिलेलं आहे तिथेच आज चंद्रकांतदादांनी या नवीन महिला सन्मानाच्या पायंड्याची सुरूवात केली आहे. त्यानंतर त्या म्हणाल्या की, ‘सावूमाईने आम्हाला शिक्षित सक्षम केले त्यामुळे सावित्री तर आता घरोघरी दिसत आहेच. पण स्त्रीशक्तीला नवीन आयाम/सन्मान देणारे चंद्रकांतदादा, हेमंत रासने सारख्या ज्योतीबांचा शोध जारी आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही’

चित्रा वाघ यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तूळातुन संमिश्र भावना व्यक्त केल्या जावू लागल्या. यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करत आपल्या वक्तव्याच स्पष्टीकरण देत म्हटलं आहे की, ‘समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलणारे हे महापुरुषांनाच आदर्श मानतात! काल पुण्यनगरीमध्ये हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला गेले असता केवळ स्त्रियांनीच पुरुषांचे औक्षण करायचं ही जुनी रूढी मोडत स्त्री सक्षमीकरणासाठी अग्रणी असणाऱ्या माझ्या भावांनी माझे औक्षण केले. जशी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्योतिबा फुले यांनी रोवली तसचं, स्त्री कर्तृत्वाचा पुरस्कार करण्याच्या नव्या परंपरेचा पायंडा दादांच्या हातून पाडला गेला. उगा पराचा कावळा करून,अर्थाचा अनर्थ करण्याचे काम काही जण करत असतील तर त्यांनी वेळीच स्वतःला सावरुन लवकरच सुधारावे,ही विनंती!!!