Home Blog Page 1428

महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाची विजय सलामी; बिहारवर सहा गुणांनी मात

महाराष्ट्र महिला संघ सलामीला पराभूत
अजितचे विजयामध्ये मोलाचे योगदान

जबलपूर
राष्ट्रीय खेळाडू वैभव रबाडेच्या कुशल नेतृत्वात गत कांस्य पदक विजेत्या महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाने रविवारी पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स मधील किताबाच्या आपल्या मोहिमेला दमदार सुरुवात केली. रेडर अजित चौहान (१३गुण), जयेश महाजन (५ टॅकल पॉईंट्स) आणि अनुज गाढवे (५ टॅकल पॉईंट्स) यांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र संघाने सलामी सामन्यात बिहारचा पराभव केला. महाराष्ट्र संघाने ३८-३२ अशा सहा गुणांचे आघाडीने गटातील पहिला सामना जिंकला. पृथ्वीराज, अजित यांच्या सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र पुरुष संघाने स्पर्धेत दमदार विजय सलामी दिली. यादरम्यान निकिता लंगोटेच्या नेतृत्वात महाराष्ट्र महिला संघाला गटातील पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. हरियाणा संघाने सलामी सामन्यात महाराष्ट्रावर ४१-२५ अशाप्रकारे मात केली. त्यामुळे महाराष्ट्र संघाचा दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न अपुरा ठरला.
राष्ट्रीय खेळाडू वैभव याने कुशल नेतृत्वाची उत्तम चढाई आणि अचूक पकडीच्या बळावर महाराष्ट्र संघाला दमदार सुरुवात करून दिली. यादरम्यान चढाई पटू अजित याची कामगिरी लक्षवेधी ठरली. त्याने सर्वोत्तम कामगिरीतून बिहार संघाविरुद्ध सर्वाधिक तेरा गुणांची कमाई केली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला दमदार विजय सलामी देता आली.

मध्यंतरानंतर सामन्याला कलाटणी
बिहार आणि महाराष्ट्र पुरुष गटातील सलामी सामना पहिल्या हाफ मध्ये रंगतदार झाला. या अटीतटीच्या लढतीत बिहार संघाने मध्यंतरापूर्वी चार गुणांची आघाडी घेतली होती. मात्र प्रशिक्षक दादासो आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने खास डावपेच आखले. त्यानंतर अचूक कौशल्याने वेळेवर महाराष्ट्र संघाने मध्यंतरानंतर सामन्याला कलाटणी देत विजयी पताका फडकवली. आपल्या ६ फूट उंचीचा पुरेपूर फायदा घेत अजितने बोनस गुणासह गडी मारत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

हाराष्ट्र संघाला दुसऱ्या विजयाची संधी
सलामीला दणदणीत विजय संपादन करणारा महाराष्ट्र पुरुष संघ आता गटातील दुसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. महाराष्ट्राचा स्पर्धेतील दुसरा सामना सोमवारी राजस्थान विरुद्ध रंगणार आहे. या सामन्यात महाराष्ट्राला विजयाचा दावेदार मानले जात आहे. तसेच सलामीच्या पराभवातून सावरलेल्या महाराष्ट्र महिला संघाला गटातील दुसऱ्या सामन्यात विजयाची संधी आहे. सोमवारी महिला गटाच्या दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्र आणि तेलंगणा संघ समोरासमोर असतील.

युवा खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पद; किताबाचा दावा मजबूत :कोच दादासो
महाराष्ट्र पुरुष संघाने गटातील सलामीच्या लढतीत कौतुकास्पद कामगिरी केली. प्रचंड गुणवत्ता आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर महाराष्ट्राचे खेळाडू मैदानावर विजयाचे मानकरी ठरले. त्यामुळे सलामीच्या सर्वोत्तम खेळीमुळे महाराष्ट्र संघाचा यंदाच्या सत्रातील किताब जिंकण्याचा दावा मजबूत झाला आहे. सोनेरी यश संपादन करण्याची प्रचंड क्षमता संघातील खेळाडूंमध्ये आहे, अशा शब्दात मुख्य प्रशिक्षक दादासो आव्हाड यांनी पुरुष संघावर कौतुकाचा वर्षाव केला.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

पुणे: २१५-कसबा पेठ मतदारसंघ पोटनिवडणुकीचे २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार असून त्या अनुषंगाने मतदार जनजागृतीबाबत विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन मतदान प्रक्रीया, मतदान ओळखपत्रासोबत आधार ओळखपत्र जोडणी, टपाली मतदान याबाबत माहिती देत आहेत. राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवरील मतदारांसाठी असलेल्या सुविधेबाबत तसेच ऑनलाईन मतदान प्रकियेबाबतही माहिती यावेळी देण्यात येत आहेत. ८० वर्षापेक्षा अधिक वय असणारे मतदार तसेच दिव्यांग मतदार यांना प्रथमच घरामधून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करता येणार आहे. याकरीता अशा पात्र मतदारांकडून ‘नमुना १२ डी’ हा अर्ज भरून घेण्यात येत आहे.

शाळा व महाविद्यालयीनस्तरावर विद्यार्थ्यांच्या मतदान जागृतीबाबत स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून रॅली आणि गृहभेटीद्वारे मतदान प्रक्रीयेत सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. विविध शाळांमधूनदेखील मतदानाच्या महत्वाविषयी शिक्षकांना माहिती देण्यात येत आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा दिवसे- देवकाते यांनी दिली आहे.

‘मेक इन इंडिया’ ऐवजी ‘जोक इन इंडिया’ झाला

भाजप आणि काॅंग्रेसने 70 वर्षे सत्ता भोगली. देशाच्या समस्यांसाठी हे दोन पक्ष जबाबदार

नांदेड-स्वातंत्र्यानंतर काॅंग्रेसने 54 वर्षे, तर भाजपने 16 वर्षे सत्ता भोगली. देशातील बजबजपुरीला काॅंग्रेस – भाजप जबाबदार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मेक इन इंडिया’ बनवणार होते पण ‘जोक इन इंडिया’ झाला. कुठे गेला ‘मेक इन इंडिया’ देशातील प्रत्येक शहरात चायना बाजार भरला. दीपावलीचे दिवे, गणेशमूर्ती, राष्ट्रीय ध्वज, फटाके, होळीचे रंगही चीनमधून येतात असे टीकास्त्र सोडत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी अबकी बार किसान सरकार असा नारा दिला.बीआरएस पक्षाची सभा आज नांदेडमध्ये झाली. या सभेला संबोधित करताना तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सीआर बोलत होते.

के. चंद्रशेखर राव म्हणाले, देशाच्या विचारधारेला बदलण्याचे राष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा आम्ही निश्चय केला. त्यामुळे आम्ही बीआरएसचे उद्घाटन केले. देशात समर्थन मिळत आहे. मी विनम्रतेने पार्थना करतो की, माझे भाषण येथेच विसरू नका. गाव, शहरात गेल्यानंतर या माझ्या भाषणावर चर्चा करा. देशाला चालवण्यासाठी मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. अनेक नेते स्वातंत्र्यानंतर देशाने पाहीले. अनेक मुख्यमंत्री, पंतप्रधान बनले. परंतु भाषण मोठे मोठे येते.

केसीआर म्हणाले, साधी गोष्ट आहे. मी जे सांगतोय ती सोपी गोष्ट आहे. ते राॅकेट सायन्स नाही. आज देशात पिण्याला पाणी मिळते ना..? सिंचनाला पाणी मिळते का? या गोष्टी देशात नाहीत का? सरकार का देत नाही, गौडबंगाल काय आहे ते समजून घ्या. ते समजले तर एकजूट व्हाल.

केसीआर म्हणाले, महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या करीत आहेत. काय कारण असावे विचार करा. आत्महत्या कोणताही शेतकरी केव्हा करतो? देशात शेतकऱ्यांची संख्या सोळा कोटी शेतकरी परिवार आहे. मजुरांची संख्याही तेवढीच आहे. त्यामुळे सरकार बनवण्यासाठी मोठे कष्ट उपसण्याची गरज पडणार नाही. या गोष्टीला लोकांमध्ये पोहचवा.

केसीआर म्हणाले, भारत बुद्धीजीवींचा देश आहे. मुर्खांचा देश नाही. देशात आणीबाणी लागली तेव्हा लोकनायक जयप्रकाश नेत्यांच्या एका आवाजाने लोक एकत्रित झाले आणि बलाढ्य नेत्यांना नेस्तनाबूत केले. शेतकऱ्यांना केवळ शेतात नांगर चालवणे नव्हे तर कायदा बनवायलाही शिकायला हवे.केसीआर म्हणाले, स्वतः आमदार, खासदार बना तेव्हाच शेतकऱ्यांचे सरकार येईल. निवडणुका लागल्यावर कोणता न कोणता पक्ष जिंकतोच पण जनतेचा पराभव होतो. आता निवडणुका झाल्यास जनतेने, शेतकऱ्यांनी जिंकायला हवे.

केसीआर म्हणाले, भारत गरीब देश नाही. मला राजकीय जीवनाचा पन्नास वर्षांचा अनुभव आहे. आपला देश अमेरिकेपेक्षाही बलवान आहे. नेत्याचे काम दमदार असेल तर आपण अमेरिकेपेक्षाही बलशाली आर्थिक शक्ती बनवू शकतो. भारतात संपत्ती आहे पण संपत्तीपासून जनता वंचित आहे. निसर्गाने पाणी, जमीन, कोळसा आणि काम करणारी जनता आपल्याकडे आहे. अमेरिका, चीन भारतापेक्षा मोठे देश आहे पण त्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन भारताच्या तुलनेत कमी आहे.

केसीआर म्हणाले, भारताकडे 83 करोड एकर शेती असून 41 कोटीएकरजमीन शेती योग्य आहे. पाण्याचा अपव्यय होतो नेते तमाशा बघतात. महाराष्ट्र नद्यांनी संपन्न असून पाणी का नाही..? देशात सरकार काॅंग्रेसने 54 वर्षे चालवले. त्यानंतर भाजपने सोळा वर्ष तर अन्य काही तुरळक लोकांनी सरकार चालवले. भाजप आणि काॅंग्रेसने 70 वर्षे सत्ता भोगली. देशाच्या समस्यांसाठी हे दोन पक्ष जबाबदार आहे.

पत्रकारितेतील राजा : राजा माने यांची एकसष्ठी मोठ्या उत्साहात साजरी…

बार्शी,दि.४- पत्रकारितेच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्यकर्तुत्वाची ओळख निर्माण करणारे सर्व समावेशक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे राजा माने होय. बार्शी सारख्या ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटुंबातील गिरणी कामगाराचा मुलगा ते महाराष्ट्र राज्याचा राजकीय विश्लेषक म्हणून तर जिल्हा प्रतिनिधी पदा पासून महाराष्ट्रातील अवल दर्जाच्या दैनिकाच्या संपादकापर्यंत तसेच, डिजिटल मीडियाच्या माध्यमातून एका पोर्टल पासून डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या संस्थापक अध्यक्षांपर्यंत ज्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण करून महाराष्ट्रातील पत्रकारितेमध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला, असे पत्रकारितेतील महागुरू राजा माने यांचा 61 वा अभिष्टचिंतन सोहळा, भाग्यकांता ग्रुप व राजा माने मित्र परिवाराच्या वतीने बार्शी येथील आर. के. क्लब मध्ये मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

सन्मान सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली तर अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त केक कापतेवेळी सूर्यकांत वायकर दादांच्या सुमधुर गाण्याने सोहळ्याची रंगत आणखीनच वाढली. याचवेळी बार्शीचे सुपुत्र, राष्ट्रपती पदक विजेते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांचा देखील सहकुटुंब सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी धाराशिव मतदार संघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, बार्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार राजाभाऊ राऊत, माजी मंत्री दिलीपराव सोपल, माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, माजी नगराध्यक्ष रमेशआण्णा पाटील, माजी नगराध्यक्ष ऍड असिफभाई तांबोळी, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोषकाका ठोंबरे यांच्या समवेत बार्शी शहर आणि तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, प्रशासकीय, वैद्यकीय, शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतीक, सामाजिक, औद्योगिक, कृषी, व्यवसाय, बँकिंग अशा विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर तसेच दैनिक, साप्ताहिक व डिजिटल मीडियाचे पत्रकार, नातेवाईक, माने कुटुंबीय व राजा माने यांच्यावर प्रेम करणारी अनेक मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

याप्रसंगी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत व माजी मंत्री दिलीप सोपल यांनी आपल्या अभिष्टचिंतन मनोगतातून राजा माने यांनी पत्रकारीता क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याचे कौतुक करत, त्यांचे कार्य येणाऱ्या पिढीसाठी आदर्शवत आणि राज्याला दिशा देणारे ठरेल असेही व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी राजा माने यांना 61 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत अराजकीय व्यासपीठ असल्यामुळे मनमोकळेपणाने विनोदात्मक फटकेबाजी करत हास्यांचे फवारे उडविले.

सत्काराला उत्तर देताना राजा माने यांनी म्हटले की, बार्शी सारख्या ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटुंबातील मी मुलगा असून, माझ्यावर असलेले आक्का आणि बापूंचे संस्कार, माझ्या मित्र परिवाराचे अनमोल सहकार्य, माझ्या कुटुंबाची साथ, माझ्याकडे असलेला प्रामाणिकपणा, जिद्द आणि सातत्य यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातील प्रवासामध्ये अनेक व्यक्तिमत्त्वांनी मला कळत नकळतपणे सहकार्य केलं, अनेकांनी जीवापाड प्रेम केलं त्याची उतराई मी कधीही करू शकत नाही. माझ्या मातृभूमीमध्ये झालेला माझा हा सन्मान माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असून, तो कायमस्वरूपी अविस्मरणीय राहील. येणाऱ्या काळात देखील याच उमेदीने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्यासाठी एक प्रेरणादायी कार्य करत राहील असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजिनीयर अमित इंगोले यांनी केले, सूत्रसंचालन नीता देव यांनी केले तर उपस्थितांचे आभार भाग्यकांता ग्रुपचे मुरलीधर चव्हाण व रोहन नलावडे यांनी मानले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत सात महिन्यांत ३ हजार ६०० रुग्णांना २८ कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत

मुंबई, दि. 5 – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे.  सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या सात महिन्यांत  3 हजार 600 रुग्णांना 28 कोटी रुपयांपेक्षा अधिकची वैद्यकीय मदत केली आहे.

जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत, ऑगस्ट – 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर – 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर – 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर – 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाख,डिसेंबर -1013 रुग्णांना 8 कोटी 52 लाख, जानेवारी 2023 मध्ये 1060 रुग्णांना विक्रमी 8 कोटी 89 लाख रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या निकषात बदल करुन काही खर्चिक उपचार असणाऱ्या आजारांचा समावेश नव्याने करण्यात आला आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांना सहाय्यता करता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार नवीन आजारांचा समावेश करण्यात आला. याचा सकारात्मक परिणाम म्हणून नव्याने समाविष्ट या आजारांच्या अनेक रुग्णांना मदत उपलब्ध झाली आहे. यामुळे निधीच्या वितरणात वाढ झाली आहे, अशी माहिती  मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.

निवडणुका बिनविरोध होतील हे डोक्यातून काढावे- अजित पवार

0

पुणे -चिंचवड आणि कसबा निवडणूक बिनविरोध होण्याचे काही कारण नाही. त्यांनी पंढरपूर, कोल्हापूर आणि देगलूरची निवडणूक बिनविरोध होऊ दिली नव्हती. एक मुंबईच्या बाबतीत त्यांनी बिनविरोध करण्याबाबत निर्णय घेतला म्हणजे बाकीच्या निवडणुका बिनविरोध होतील हे त्यांनी डोक्यातून काढावे. लोकशाही आहे त्यामुळे जनतेला ज्यांना मतदान द्यायचे त्यांना देतील अशी स्पष्ट भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला आज दिला. ते पुण्यात आज माध्यमांशी बोलत होते.

पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील बिनविरोध होणार नाहीत, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपकडून बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तरी मुंबई वगळता कुठलीही निवडणूक बिनविरोध झालेली नाही त्यामुळे या दोन्ही जागेवर निवडणूक होणारच.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर देखील अजित पवार यांनी भाष्य केले. ‘राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबच चालल्या आहेत. निवडणुका आणखी लांबू शकतात. मात्र निवडणुका कधी घ्यायचा हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, असे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सांगितले.

चांगली स्पर्धा भविष्यातील खेळाडू बनविण्याचे काम करते-क्रीडा आयुक्त सुहास दिवसे 

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या काउंट डाउन कार्यक्रमात ॲपचे अनावरण
पुणे : खेळ कुठलाही असो, त्यातील स्पर्धा ही महत्त्वाची असते. अशा स्पर्धेतून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंना खेळताना पाहून नवोदित मुला-मुलींना खेळण्याची प्रेरणा मिळत असते. यातूनच त्या खेळासाठी भविष्यात चांगले खेळाडू मिळू शकतात, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त सुहास दिवसे यांनी केले.

पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने होणाऱ्या ८४ व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम काउंटडाउनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा २३ फेब्रुवारीपासून म्हाळुंगे-बालेवाडी येथे होणार आहे. त्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम अमनोरा पार्क टाउनमधील छत्रभूज नरसी विद्यालयात झाला. यावेळी भारतीय बॅडमिंटन महासंघाचे सहसचिव ओमर रशीद, महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर गाडगीळ, पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, सचिव रणजित नातू आदी उपस्थित होते. उपसंचालक सुहास पाटील आणि सिरम फाऊंडेशनचे जसविंदर नारंग यांच्या हस्ते स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण झाले.

सुहास दिवसे म्हणाले, राज्य सरकार या स्पर्धेला शक्य ती सर्व मदत करीन आणि त्यात सहभागही नोंदवेल. कारण ही आपल्या सर्वांची स्पर्धा आहे. स्पर्धा ही महत्त्वाची असते. कारण अशा मोठ्या स्पर्धांमुळे मुला-मुलींना खेळण्याची प्रेरणा मिळत असते. त्यामुळे आपण या स्पर्धेत सर्व शाळांना सहभागी करून घ्यायला हवे. विशेष करून ज्या शाळेत बॅडमिंटनच्या चांगल्या सुविधा आहेत, तेथील विद्यार्थ्यांना स्पर्धा बघण्यासाठी आवर्जून निमंत्रित करावे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ विद्यार्थ्यांना बघायला मिळेल आणि भविष्यात यातूनच चांगले खेळाडू मिळतील.

पूना गेम ॲपचे कौतुक
दिवसे यांनी या वेळी अनावरण करण्यात आलेल्या पूना गेम ॲपचे कौतुक केले. ते म्हणाले, एखाद्या स्पर्धेची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणारे ॲप ही संकल्पनाच भारी आहे. हे ॲप गेम चेंजर ठरणार आहे. कारण अशा गोष्टी तयार करण्यासाठी कार्यकुशलता महत्त्वाची असते. एखाद्या खेळाचे नियोजन करणे ही सोपी गोष्ट नाही. यासाठी खूप मोठे मनुष्यबळ लागत असते. यात व्यवस्थित सुसंवाद आणि नियोजन आवश्यक असते. त्यामुळे या अपचा निश्चितच या खेळासाठी उपयोग होईल. हा स्त्युत्य उपक्रम राबविला, त्याबद्दल आयोजकांचे कौतुक करायला हवे.  हे अॅप महाराष्ट्र शासनाला उपलब्ध करुन देण्याची विनंती केली ज्‍यामुळे सर्व शासकीय स्पर्धांसाठी अॅपचा वापर करता येईल, अशी विनंती ही त्यांनी यावेळी केली. 

सुहास दिवसे म्हणाले, या संघटनेचे हे ७५ वे वर्षे आहे. या इतक्या वर्षात या संघटनेने शिस्तीने काम केले आहे. कारण फारच थोड्या अशा संघटना देशात, राज्यात आहे जे अशा शिस्तीत काम करतात. त्या खेळाबद्दलची समर्पितता, पॅशन असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. मी इतर संघटनांनाही बॅडमिंटन संघटनेचे उदाहरण देत असतो. तुमचा कारभार पारदर्शक असला पाहिजे, तुम्ही कोणाला तरी जबाबदार आहात याची जाणीव असली पाहिजे. पीडीएमबीएकडे हे गुण आहेत म्हणूनच त्यांनी राज्यात खेळाडूंच्या मनात चांगली जागा निर्माण केली आहे. राज्यात आपल्याकडे ९४ क्रीडा प्रकार आहेत. यातील केवळ १० ते १२ टक्के खेळाच्या संघटना अशा असतील, ते त्यांचे काम चोखपण बजावत असतील. याकडे लक्ष दिले नाहीत, तर मग घराणेशाही आणि इतर समस्या निर्माण होत असतात.
ओमर रशीद यांनी पी. व्ही. सिंधू आणि साईना नेहवालसारखे अव्वल खेळाडू या खेळात सहभागी होतील, अशी आशा व्यक्त केली. पुणे आयोजनात कधीच कमी पडत नाही, असा आमचा मागील इतिहास आहे. तेव्हा त्यांना आवश्यक ती सर्व मदत आम्ही करणार आहोत.
अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, वरिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेच्या निमित्तानाने आणलेले हे  अॅप क्रीडा जगतातील पहिले अॅप आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो. या अॅपच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा एका क्लिकवर असेल. स्पर्धा संस्मरणीय आणि चांगल्या पद्धतीने पार पडण्यासाठी आमच्याकडे १५०  हून अधिक स्वयंसेवकांची टीम अहोरात्र काम करत आहे. 

रणजित नातू म्हणाले, १९९७मध्ये वरिष्ठ गटाची राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा पुण्यात झाली होती. २५ वर्षांनी हा मान पुन्हा पुण्याला मिळत आहे. तेव्हा सर्वच अव्वल खेळाडू यात भाग घेतील, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जेणेकरून एक वेगळी उंची या स्पर्धेला मिळेल. स्पर्धेच्या आयोजनात आम्ही कुठलीच उणीव राहू देणार नाही.

कर्करोगमुक्त नागरिकांचा अभिनव पद्धतीने जागतिक कर्करोग दिन साजरा

प्रोलाइफ कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूटचा उपक्रम

पुणे- कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ४ फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन जगभरात साजरा केला जातो. पुण्यातील प्रोलाइफ कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूटने यावर्षी हा अभिनव पद्धतीने साजरा केला. १०० हून अधिक कर्करोगमुक्त झालेल्या व्यक्तींसोबत हॉस्पिटलने हा दिवस साजरा केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ब्रेस्ट कॅन्सर सर्व्हायर होते. यावेळी माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले, प्रवीण चोरबेले, वसंत मोरे उपस्थित होते. धन्वंतरी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रोलाइफच्या एमडी डॉ. नेहा शाह यांनी प्रास्ताविक केले. कॅन्सर सर्जन डॉ.सुमित शहा यांनी आभार मानले.

अनेक कॅन्सरग्रस्तांनी त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितले, त्यापैकी अनेकजण हे ५ वर्षांपेक्षा अधिक चांगले आहेत तर काही 10 वर्षांपेक्षा अधिक चांगले आहेत.डॉ. सुमित शहा म्हणाले की आमचा उद्देश हा सर्व कर्करोग रुग्णांना न्याय्य उपचार देणे आणि त्यांच्या जीवनात आशा निर्माण करणे आहे.स्तनाच्या कर्करोगातून बरे झालेल्या डॉ. रीमा मेनन म्हणाल्या की, आपण सर्वजण कर्करोगावर निश्चितच विजय मिळवू शकतो.स्तनाच्या कर्करोगातून बरे झालेल्या कुसुम कुलकर्णी म्हणाल्या की, कर्करोगाची लक्षणे आढळल्यास वेळ वाया घालवू नका.तोंडाचा कर्करोगाचा सामना करणारे अनंत घुले म्हणाले की, कर्करोगमुक्त जीवनाचा आनंद घेणे म्हणजे पुनर्जन्म आहे१० वर्षांपासून तोंडाचा कर्करोगाचा सामना करणारे सचिन नलावडे म्हणाले की, आयुष्य खूप सुंदर आहे मला आपल्या शरीराचे ऐकणे आवश्यक आहे.

टिळकांच्या कुटुंबात उमेदवारी न दिल्याने बिनविरोध निवडणुकीचा आग्रह करणे नैतिकतेत बसत नाही-पटोलेंचा टोला

पुणे : आजपर्यंत एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यावर ती निवडणूक बिनविरोध होण्याची प्रथा होती. मात्र, कसबा आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती भाजपाच्या नेत्याकडून करण्यात आली होती. याबाबत कालच मुख्यमंत्री यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली. आपण एकत्रित बसून यावर सविस्तर चर्चा करूया, मात्र माझा फोन होताच पुढील अर्ध्या तासात टिळक कुटुंबीयांऐवजी दुसर्‍याच उमेदवाराला भाजपकडून संधी देण्यात आली. त्यातून भाजपाची नीती दिसून येते. मुक्ता टिळक यांनी आजारी असताना देखील विधिमंडळात येऊन मतदानाचा हक्क बजावला होता. यातून भाजपाने कशा प्रकारे टिळक कुटुंबाला न्याय दिला,हे दिसले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही जागेबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा झाली आहे. त्यानुसार कसबा पेठ विधानसभेचा आज रात्री काँग्रेस पक्षाचा उमेदवार जाहीर होईल. तर, चिंचवडच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते भूमिका मांडतील”, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच, आम्ही उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्या निवडणुकीकरिता भाजपाकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर हेमंत रासने यांनी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांची केसरीवाडा येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी शैलेश टिळक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना उघड उघड नाराजी देखील व्यक्त केली. या सर्व घडामोडीदरम्यान आज पुण्यातील काँग्रेस भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आमदार संग्राम जगताप, शहराध्यक्ष अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांसोबत बैठक घेण्यात आली.

कोकण लोककला महामंडळ स्थापन करण्यासाठी शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी, दि. ०५:- कोकणात लोककलेची समृद्ध  परंपरा आहे. कोकणात पर्यटनाच्या अमर्याद संधी आहेत. यासाठीच कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण  स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या माध्यमातून संपूर्ण कोकणाचा कायापालट कालबद्ध रितीने होऊ शकतो. मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत ग्रीनफिल्ड रस्ता  तयार झाल्यास पर्यटन वाढीस चालना मिळेल. कोकणातील लोककला वृद्धिंगत करण्यासाठी लोककला महामंडळ स्थापन करण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

चिपळूण येथील श्रीजुना कालभैरव मैदानावर ५ ते ८ फेबुवारीदरम्यान पर्यटन, लोककला, सांस्कृतिक, खाद्य महोत्सव रंगणार आहे.या महोत्सवाचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी कार्यक्रमस्थळी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, ज्येष्ठ साहित्यिक तथा संयोजन समिती अध्यक्ष तानाजी चोरगे, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, आमदार शेखर निकम, आमदार प्रसाद लाड, आमदार योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी,  लोककलावंत प्रभाकर मोरे, ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत होऊन गेलेल्या रत्नांचे लोककला प्रदर्शनात लावलेल्या तैलचित्रांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या तैलचित्रांमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या तैलचित्राचा समावेश करण्यात आला आहे.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, लोककला महोत्सवामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल,गेल्या सहा महिन्यांत या शासनाने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोकण भूमीतील गडकिल्ले,सागरी किनारे,निसर्गसंपन्न वातावरण हे कोकणचे वैभव आहे. मुंबई ते गोवा जुना महामार्गदेखील वेगाने तयार होत आहे.

कोकणची वैशिष्ट्ये अधोरेखित करणाऱ्या पर्यटन, लोककला, सांस्कृतिक आणि कोकणी खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्राला किंबहुना भारताला कोकणचा सर्वांगीण परिचय व्हावा, हा या महोत्सवामागचा मुख्य उद्देश आहे.  वाढत्या मोबाईल वापराने लोककला महोत्सवामुळे तरुण पिढी याकडे वळेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील विविध लोककला सादर होणार आहेत.

पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत तारपा, घोळनृत्य, दशावतार, चित्रकृती यांसह विविध कला एकत्र आणल्या जाणार आहेत. रोजची संध्याकाळ विविध लोककलांच्या दर्शनाने सुरू होणार आहे.

खाद्य महोत्सवांतर्गत विविध कोकणी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचे स्टॉल असतील. श्री जुना कालभैरव मंदिर अंतर्गत कै. बापू बाबाजी सागावकर मैदानावर उभारण्यात आलेल्या सह्याद्रीनगरात हा महोत्सव होणार आहे.

अशा महोत्सवांमुळे गोवा आणि केरळकडे असणारा पर्यटकांचा ओघ तितक्‍याच निसर्गसंपन्न आणि सांस्कृतिक संपन्नता असणाऱ्या आणि परंपरा जपणाऱ्या कोकणाकडे वळण्यास  मदत होईल. कोकणचे निसर्गसौंदर्य, खाद्यपदार्थ, सामाजिक,सांस्कृतिक परंपरा आणि मुख्यत: कोकणची लोककला ठळकपणाने जगासमोर यावी, अपरिचित कोकणची ओळख व्हावी आणि पर्यटकांचे पाय कोकणाकडे वळावेत, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये कोकणाच्या मातीतील अनेक अस्सल लोककला सादर केल्या जाणार आहेत. सिंधुदुर्गातील दशावतार/चित्रकथी, रत्नागिरी जिल्ह्यातील नमन, जाखडी, काटखेळ, गजो, संकासूर रायगड जिल्ह्यातील कोळी नृत्य, ठाणे जिल्ह्यातील तारपा नृत्य अशा ४० पेक्षा अधिक लोककला त्यांच्या मूळ रूपात सादर केल्या जाणार आहेत. दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत लोककलांचे सादरीकरण होणार आहे. दररोज सायंकाळी साडेचार ते सहा या वेळेत खुला लोककला कट्टा स्थानिक कलाकारांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय संदर्भपूर्ण माहिती देणारे परिसंवाद दिवसभरात होणार आहेत. कोकणी पदार्थांच्या वैशिष्ट्यपूर्ण चवींचे ३० पेक्षा अधिक स्टॉल्स असणारी खाऊगल्ली ही चोखंदळ खवैय्यांसाठी पर्वणी असणार आहे. हा सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे.

प्रथमच एकत्र आल्या अलका आणि निर्मिती…

अलकाच्या इमोशन्स व निर्मितीच्या कॅामेडीचा आलंय माझ्या राशीला मध्ये सुरेख संगम

राशी आणि भविष्य जाणून घेणं हे मानवी स्वभावाचं नेहमीच आकर्षण राहिलं आहे. यामुळेच वर्तमानपत्रात, मासिकात किंवा कॅलेंडरमध्ये मागच्या पानावर असो, प्रत्येकालाच आपल्या राशीत काय लिहिलंय हे जाणण्याचा मोह असतो. राशींच्या याच अनोख्या विश्वात गाजलेलं नाव म्हणजे आनंद पिंपळकर… प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ असलेले ज्योतिर्विद आनंद पिंपळकर मागील काही दिवसांपासून चित्रपट निर्मितीमुळे प्रकाशझोतात आहेत. आलंय माझ्या राशीला  हा त्यांचा मराठीतील मल्टिस्टारर चित्रपट खऱ्या अर्थानं वेगळेपण जपणारा असून, उत्सुकता वाढवणारा आहे. आलंय माझ्या राशीला या चित्रपटातून आनंद पिंपळकर बारा राशींच्या अनोख्या गोष्टी घेऊन आले आहेत. हा चित्रपट १० फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आनंदीवास्तू आणि साईकमल प्रोडक्शन निर्मित आणि फिल्मास्त्र स्टुडिओ प्रस्तुत आलंय माझ्या राशीला या चित्रपटाचे निर्माते आनंद पिंपळकर आणि अश्विनी पिंपळकर आहेत. दिलीप जाधव सहनिर्माते असून, दिग्दर्शन अजित शिरोळे यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं अलका कुबल आणि निर्मिती सावंत या मनोरंजन विश्वातील महाराण्या एकत्र आल्या आहेत.

निर्मिती सावंत आणि अलका कुबल यांचं मनोरंजन विश्वात मोठं नाव आहे. दोघींनीही अॅक्टींगपासून प्रोडक्शनपर्यंत विविध विभागांमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. या दोघींचं पडद्यापलीकडे एक अनोखं नातं आहे. अलका नेहमी निर्मिती यांना ‘वहिनी’ म्हणून संबोधतात. त्यामागील रहस्य त्यांनी आलंय माझ्या राशीला या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उलगडलं. आपल्या निर्मिती वहिनीबाबत अलका म्हणाल्या की, निर्मिती वहिनींसोबत पहिल्यांदाच सिनेमात काम करत आहे. यापूर्वी मी त्यांच्यासोबत कधी काम केलं नाही, पण त्यांच्या प्रोडक्शनच्या ‘आपलं माणूस’ या नाटकात काम केलं आहे. आलंय माझ्या राशीला या चित्रपटाच्या निमित्तानं निर्मिती वहिनींसोबत काम करण्याचा योग जुळून आला. आमचं पडद्यापलीकडचं बाँडींग खूप छान आहे. मी महेश सावंत यांना ‘महेशभैय्या’ म्हणायचे, त्यामुळे ती ‘माझी वहिनी’ आहे. ती सर्वांची ‘निर्मितीताई’ असली तरी मी तिला ‘वहिनीच’ म्हणते. असं आमचं खरंच वेगळं नातं आहे.

या चित्रपटात एंट्री करण्याबाबत सांगायचं तर, आनंद पिंपळकर हे वास्तुतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या राशी काय सांगतात ते अत्यंत नेमकेपणाने सांगत असल्यानं ते काय सांगतात याबद्दल उत्सुकता असते. आपल्या राशीत काय आहे हे वाचायला सर्वांनाच आवडतं. या चित्रपटासाठी दिलीप जाधवांनी कॅाल करून सांगितलं की आलंय माझ्या राशीलामध्ये एका राशीचं कॅरेक्टर तुला करायचं आहे. कॅरेक्टर ऐकल्यावर खूप आवडलं. मी जरी मेलोड्रामा खूप केला असला तरी असं काही वेगळं येतं तेव्हा वेगळा हुरूप येतो. हि कथा आताच्या काळातील आहे. माझी कथा पाहताना प्रेक्षकांच्या डोळ्यांत टचकन पाणी येईल. यात सर्व राशींचे सर्व गुण आहेतच, पण हा एक परिपूर्ण मनोरंजक चित्रपट आहे. अजित शिरोळेंसोबत प्रथमच काम करतेय.

ज्योतिष आणि भविष्याबद्दल सांगणाऱ्या आलंय माझ्या राशीला या चित्रपटाचं लेखन हेमंत एदलाबादकर यांनी केलं आहे. यात चिन्मय मांडलेकर, मोहन जोशी, अतुल परचुरे, प्रसाद ओक, मंगेश देसाई, उषा नाईक, भार्गवी चिरमुले, अश्विनी कुलकर्णी, पौर्णिमा अहिरे, दिगंबर नाईक, संग्राम चौगुले, स्वप्निल राजशेखर‌, प्रणव पिंपळकर, सिद्धार्थ खिरीड आदी मराठीतील आघाडीची स्टारकास्ट आहे. ओंकार माने, प्रणव पिंपळकर या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. गीतरचना गुरु ठाकूर, अभय इनामदार, कौतुक शिरोडकर यांनी लिहिल्या असून, पार्श्वसंगीत मिलिंद मोरे यांनी दिले आहे. छायांकन कृष्णा सोरेन यांचे तर संकलन विजय खोचीकर यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन सुजितकुमार, नरेंद्र पंडित, प्रितम पाटील यांनी केलं आहे. अकबर शरीफ यांनी साहसदृश्ये, वासू पाटील यांनी कलादिग्दर्शन, तर श्रेयस केदारी, रितेश पवार यांनी व्हीएफएक्सची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे.

आलंय माझ्या राशीला‘  हा चित्रपट १० फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

सराईत नऊ गुन्हेगार केले तडीपार

पुणे-पोलिस उपायुक्त परिमंडळ दाेन मधील पोलिस स्टेशनचे गुन्हे अभिलेखावर खुनाचा प्रयत्न, दंगा, दुखापत, जबरी चाेरी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, अवैध दारु विक्री करणे अशाप्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत नऊ गुन्हेगारांना एकाचवेळी तडीपार करण्यात आल्याची माहिती परिमंडळ दाेनचे पोलिस उपआयुक्त स्मार्तना पाटील यांनी शनिवारी दिली आहे.

तडीपार करण्यात आलेल्या आराेपी मध्ये स्वारगेट पोलिस स्टेशन हद्दीतील महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 55 प्रमाणे हिऱ्या ऊर्फ अजीज सलामत शेख (रा.गुलटेकडी,पुणे), शंकर नागप्पा निकले (32,रा.गुलटेकडी,पुणे) व राेशन मिठ्ठु घाेरपडे (19,रा.गुलटेकडी,पुणे) , सहकारनगर पोलिस स्टेशन हद्दीतील महेश अनिल साळुंखे (वय-25,रा.धनकवडी,पुणे), शुभम सिताराम शिंदे (20,रा.धनकवडी,पुणे) , भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीतील विशाल बालाजी साेमवंशी (21,रा.आंबेगाव खु.पुणे), सुजित दत्तात्र्य पवार (20,रा.आंबेगाव,पुणे), आकाश रविंद्र उणेचा (20,रा.काेंढवा) आणि सुजित सुरेश सरपाले (26,रा.कात्रज,पुणे) या आराेपींचा समावेश आहे.

सदर आराेपींवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असून पोलिसांचे रेकाॅर्डवरील गुन्हेगारांवर कायद्याचा दबाव रहावा म्हणून संबंधित पोलिस स्टेशन कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी पाठविलेल्या तडीपार प्रस्तावावरुन पोलिस उपआयुक्त परिमंडळ दाेनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी यांनी सदर प्रस्तावाची चाैकशी पूर्ण करुन नऊ गुन्हेगारा विरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 55 व 56 प्रमाणे पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्हयातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहे.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक,अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. यापुढील काळात देखील रेकाॅर्डवरील क्रीयाशील गुन्हेगारांवर अशाचप्रकारची ठाेस कारवाई करुन गुन्हेगारास प्रतिबंधक करणेकामी भर देण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे.

आळंदी येथे ८ फेब्रुवारी रोजी होणारा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार सोहळा’ पुढे ढकलला – सांस्कृतिक कार्य संचालनालयाची माहिती

मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने ८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणारा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दिली आहे. वर्ष २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षाचे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार विविध मान्यवरांना प्रदान करण्याचा कार्यक्रम आळंदी येथे प्रस्तावित करण्यात आला होता.

पुरस्कार प्राप्त सन्माननीय बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नीचे दुःखद निधन झाल्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाहीत तर श्री बद्रीनाथ तनपुरे महाराज हे प्रकृती अस्वस्थपणामुळे व बाबा महाराज सातारकर यांच्यावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगराचा विचार करून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी कळवले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्री बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नीच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून या अपरिहार्य कारणामुळे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने हा कार्यक्रम पुढे ढकलला असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. पुरस्कार सोहळ्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

मुष्टीयुध्दामध्ये सोनेरी हॅट्ट्रिकसह महाराष्ट्राचा पदकांचा षटकार,तीन सुवर्ण, एक रौप्य, दोन कांस्य

मुलांच्या सांघिक विभागात महाराष्ट्राला तिसरे स्थान

भोपाळ-
कुणाल घोरपडे, उमर अन्वर शेख, देविका घोरपडे यांनी मिळविलेल्या सुवर्णपदकांसह महाराष्ट्राने मुष्टीयुद्धाच्या शेवटच्या दिवशी चार पदकांची कमाई करीत या खेळातील पदकांचा षटकार पूर्ण केला. महाराष्ट्राच्या उस्मान अन्सारी याला मात्र रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राला मुलांच्या सांघिक विभागात तिसरे स्थान मिळाले.

पुण्याची जागतिक युवा सुवर्णपदक विजेती खेळाडू देविका हिने ५२ किलो गटाच्या अंतिम फेरीत मध्य प्रदेश काफीकुमारी हिचा सहज पराभव केला. या लढतीच्या वेळी मध्य प्रदेशच्या खेळाडूला प्रेक्षकांचा सातत्याने पाठिंबा मिळत होता. ते ओरडून देविकाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु देविका हिने शांतपणे ही लढत खेळली आणि विजयश्री संपादन केली. ही लढत जिंकण्याचे मनोधैर्य देविका हिने उपांत्य फेरी जिंकल्यानंतरच व्यक्त केले होते.
मुलांच्या ४८ किलो गटात उमर शेख याने पंजाबच्या गोपी कुमार याचा दणदणीत पराभव केला. आक्रमक ठोसेबाजी व भक्कम बचाव असा दुहेरी तंत्राचा उपयोग करीत त्याने गोपी याला निष्प्रभ केले. ७१ किलो गटात कुणाल याच्यापुढे हरियाणाच्या साहिल चौहान याचे कडवे आव्हान होते. तथापि कुणाल याने सुरुवातीपासूनच कल्पकतेने ठोसेबाजी केली आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला रोखून धरले. उमर, कुणाल, देविका व कांस्यपदक विजेती वैष्णवी वाघमारे हे पुण्याचे चारही खेळाडू ऑलिंपिकपटू मनोज पिंगळे यांच्या अकादमीचे खेळाडू आहेत.‌
मुलांच्या ५१ किलो गटात उस्मान अन्सारी या मुंबईच्या खेळाडूला मणिपूरच्या एम जादूमनी सिंग यांच्याविरुद्ध निसटता पराभव स्वीकारावा लागला. उस्मान याने शेवटपर्यंत चांगली लढत दिली.‌

‘सुवर्णपदक जिंकण्याचा आत्मविश्वास होता’
या स्पर्धेमध्ये चिवट आव्हान असले तरी जिद्दीच्या जोरावर सुवर्णपदक जिंकण्याची आम्हाला खात्री होती असे देविका, कुणाल व उमर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले,” आमच्या प्रतिस्पर्ध्यांना चाहत्यांकडून सातत्याने प्रोत्साहन मिळत होते तरीही आम्ही शेवटपर्यंत संयम ठेवल्यामुळे ही सोनेरी कामगिरी करू शकलो. आमच्या या यशामध्ये राज्याचे क्रीडा संचालनालय, आमचे प्रशिक्षक व पालक यांनी दिलेल्या सहकार्याचा मोठा वाटा आहे. “
महाराष्ट्राच्या सर्व खेळाडूंना विजय दुबाळे व सनी गेहलावत यांचे मार्गदर्शन मिळाले होते.

निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा

पुणे, दि.४ :- निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नागरिकांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील २०५- चिंचवड व २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन, अवैध जाहिरात फलक, मतदारांना पैसे वाटप, दारु वाटप, भेट वस्तू किंवा आमिष दाखवणे, कोणत्याही प्रकारचे शस्त्र दाखवून धमकावणे आदी प्रकारच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने करता येतील. यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन ‘सी-व्हिजिल’ (cVIGIL) ॲप मोफत डाऊनलोड करता येते.

ॲप सुरु करुन त्यामध्ये छायाचित्र, व्हिडीओ किंवा ऑडिओ तयार करुन पोस्ट केल्यांनतर तक्रारीची नोंद होते. तक्रार नोंदवल्यानंतर पाच मिनीटामध्ये ही माहिती भरारी पथकाला पाठवली जाते. भरारी पथकाकडून तातडीने याबाबत चौकशी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांना अहवाल सादर केला जातो आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तातडीने त्याच्यावर कारवाई करतात तक्रारीचे स्वरुप व संख्येनुसार हा वेळ कमी-अधिक होतो.

तक्रारीचे निरसन झाल्यानंतर तक्रारदारास ॲपद्वारे संदेश जातो. याशिवाय आचारसंहिता कक्षाकडे देखील आचारसंहिता भंगा बाबत तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात, अशी माहिती उप जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली

पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून नोंद झालेल्या ५२ तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे, अशी माहितीही श्री. इथापे यांनी दिली.
0000