भारतरत्न स्वरसम्राज्ञी श्रीमती लता मंगेशकर यांच्या जाण्यानं एका युगाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त केली गेली, ते खरंच आहे. ‘लता मंगेशकर’ हे सात अक्षरी स्वरवलय लौकीकार्थानं एक वर्षापूर्वी अंतर्धान पावलं तेव्हा एका गायिकेचा नव्हे, ‘युगाचा अस्त’ झाल्याची सार्वत्रिक भावना प्रकट झाली. खरोखर एक युग समाप्त झाल्याचीच जाणीव होती ती. आज लता दीदींची पहिली पुण्यतिथी. त्यानिमित्तानं लतादिदि गेल्या तेव्हा टि.व्ही.वरची अंतयात्रा पहाताना लतादिदींबद्दल थोर व्यक्ती काय म्हणाल्या हे जाणून घेणारा प्रसाद मिरासदार यांनी लिहिलेला अनुभव ‘विश्वाचे आर्त लतादीदी’ या ऑडिओ कथानाद्वारे स्टोरीटेल मराठीवर प्रकाशित आहे. आज त्यांच्या स्मृती जागवताना ही भावांजली ऐकावी असे आवाहन स्टोरीटेल मराठीने केले आहे.
फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला आपल्या स्वरांनी व्यापून टाकणा-या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी समजली आणि नकळत टि.व्ही लावला गेला. संपूर्ण भारतावर शोककळा पसरली होती. जग जणू काही काळासाठी स्तब्ध झाल्यासारखे वाटत होते. लतादिदींच्या स्वरातील गाणी टि.व्ही. वर एका मागोमाग एक लावली जात होती. मधूनच त्यांच्या सुहृदांच्या आठवणी जागवल्या जात होत्या. संपूर्ण विश्वात व्यापून राहिलेला तो स्वर असा सातत्याने ऐकताना एकच भाव मनात येत होता तो म्हणजे आर्तता..! लतादिदींच्या जाण्याने निर्माण झालेल्या दुःखासोबतच त्यांच्या स्वरांनी मनात जागृत झालेल्या करूणेचा अनुभव विलक्षण होता आणि ही करूणा सर्वांच्या मनात सातत्याने राहो हीच प्रार्थना पुन्हा पुन्हा मनात येत होती. हा एक विलक्षण अनुभव होता!
‘विश्वाचे आर्त लतादीदी’ हे स्टोरीटेल मराठीवरील ऑडिओकथन रसिका कुलकर्णी यांच्या आवाजात असून ६ फेब्रुवारी २०२२ या दिवसातील आर्तता आपल्या समृद्ध लेखनातून प्रख्यात लेखक प्रसाद मिरासदार यांनी दीदींच्या चाहत्यांसाठी शब्दबद्ध केली आहे. ‘विश्वाचे आर्त मध्ये लतादिदींच्या स्मृतिदिनी त्यांच्या बद्दल भालजी पेंढारकरांपासून कुमार गंधर्वांपर्यत आणि पु.ल.देशपांडेंपासून नौशाद पर्यंत अनेकांनी काढलेले गौरवोद्गार ऐका फक्त स्टोरीटेलवर!
‘विश्वाचे आर्त लतादीदी’ हे स्टोरीटेल मराठीवरील ऑडिओकथन ऐकण्यासाठील लिंक https://www.storytel.com/in/en/books/vishwache-art-latadidi-1573231?appRedirect=true
पुणे-कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि पतित पावन संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांनी आज हजारो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. आज सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख नाना भानगिरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, शिवसंग्रामचे अध्यक्ष भारत लगड, शहर भाजप प्रभारी धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, शहर उपाध्यक्षा स्वरदा बापट, डॉ. सिद्धार्थ धेंडे, अजय भोसले, किरण साळी, बाळासाहेब जानराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळी ग्रामदैवत कसबा गणपतीची महाआरती करून पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रेत महायुतीचे हजारो कार्यकर्ते, गणपती मंडळ, संस्था-संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करण्यात आली. त्यापुर्वी रासने यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन केले. रासने यांनी निवडणूक निर्णय अधिकारी नेहा कितवे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
विक्रमी मताधिक्याने विजयी होऊ! हेमंत रासने यांचा विश्वास
गेल्या वीस वर्षांत कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेली विविध विकासकामे, सेवा कार्याच्या माध्यमातून प्रस्थापित केलेला जनसंपर्क, महायुतीच्या कार्यकर्त्यांची भक्कम संघटनात्मक फळी, गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा पाठींबा आणि कसब्यातील मतदारांचा दृढ विश्वास या बळावर विक्रमी मताधिक्याने ही निवडणूक जिंकू असा विश्वास हेमंत रासने यांनी व्यक्त केला.
रासने म्हणाले, मी भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात मोठी संघटना आहे. गेल्या तीस वर्षांपासून मी पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. आजपर्यंत पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. त्यामुळे पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना, पतित पावन संघटना आणि गणेश मंडळाच्या पूर्ण ताकदीसह ही निवडणूक मोठ्या मताधिक्क्याने जिंकू.
पुणे- बाळासाहेब थोरात ,माजी मंत्री बागवे व त्यांचे पुत्र अविनाश ,तसेच रोहित टिळक असे कोणीही नाराज नाही ,या तर वावड्या आहेत, थोरातांचे पत्र तुमच्याकडे आहे काय ? असेल तर दाखवा ,आम्हाला फॉर्म भरायला जाऊ द्यात असे सांगून पत्रकारांच्या प्रश्नांना कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सहज बगल दिली तर थोरात हे नाराज आहेत कि नाहीत ते त्यांनाच विचारा असे विधान आज माजी प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे केले .
कसबा मतदारसंघाचे मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेसतर्फे आज रॅली काढण्यात आली. रॅलीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश काकडे, शिवसेनेचे गजानन थरकुडे उपस्थित होते. पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर येथे दर्शन घेऊन रॅली काढण्यात आली. त्यावेळी अशोक चव्हाण बोलत होते.
बागवे ,टिळक गैरहजर
भाजप हेमंत रासने यांच्या रॅलीत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाला टिळक गैरहजर राहिले. त्याच सोबत खासदार गिरीश बापट, संजय काकडे देखील गैरहजर राहिल्याने नाराजीची चर्चा रंगली आहे. काँग्रेसमध्येही असाच प्रकार घडला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या रॅलीत काँग्रेसचे नेते रोहित टिळक, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि माजी मंत्री रमेश बागवे, त्यांचे पुत्र नगरसेवक अविनाश बागवे, शिवसेना नेते संजय मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली पाटील ठोंबरे गैरहजर राहिल्याने दोन्ही पक्षातील नाराजीची चर्चा चांगलीच रंगली आहे.
पुणे – कसबा विधानसभा मतदारसंघासाठी हिंदू महासंघ या संघटनेने उमेदवारी दाखल करण्याचे निश्चित केले आहे.हिंदुत्ववादी नेते आनंद दवे यांनी म्हटले आहे कि, आजच सायंकाळी साडेचार वाजता आम्ही शैलेशजी टीळकांच्या घरी त्यांच्या उपस्थितीत आम्ही स्वर्गीय मुक्ता ताईंच्या प्रतिमेला अभिवादन करणार आहोत.आणि उद्या मंगळवारी उमेदारी अर्ज दाखल करणार आहोत
यासंबंधी प्रसिद्ध केलेल्या संदेशात संघटनेने म्हटले आहे की,
होय आम्ही लढतोय… उद्या फॉर्म भरतोय
वंदनीय शिवप्रभू, संभाजी राजे आणि श्रद्धेय वीर सावरकर, पूजनिय हेडगेवारजी गुरुजी आणि गोळवळकरजी गुरुजी यांना स्मरून, स्वर्गीय मुक्तताईंचा आशीर्वाद घेऊन
हिंदु महासंघ ही निवडणुक लढवणार आहे… उद्या मंगळवारी दुपारी आम्ही अर्ज भरणार आहोत
खुल्या प्रवर्गाचा आवाज विधानसभेत पोहोचवण्या बरोबरच
पुण्येश्वराला मुक्त करण आणि स्वच्छ, सुरक्षित आणि सभ्य कसबा हेच आमचं ध्येय असणार आहे
हिंदू महासंघ
आर्थिक आरक्षणासाठी आग्रही असणारे एकमेव राजकीय संघटन
पुणे -कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार? असा सवाल विचारणारे बॅनर्स कसबा पेठेत लागले आहेत. कसबा, पिंपरी-चिंचवड मतदारसंघाच्या निवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी नाकारण्यात आली. तेव्हापासून भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले आहेत.
बहुचर्चित ठरणाऱ्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने शनिवारी उमेदवार जाहीर केले. कसबा पेठ येथून अपेक्षेप्रमाणे हेमंत रासने यांना तिकीट देण्यात आले, तर चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र रासणे यांच्या नावाला हिंदू महासभेने विरोध केला आहे. आनंद दवे यांनी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले.
एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी देण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. चिंचवडमध्ये भाजपने ही परंपरा पाळली. मात्र, कसबापेठेत ही परंपरा पाळली नाही. त्यामुळे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हिंदू महासभेनेही यावरुन टीका केली आहे.
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपला थेट प्रश्न विचारणारे बॅनर्स लागले आहेत. कुलकर्णींचा मतदारसंघ गेला. टिळकांचा मतदारसंघ गेला. आता नंबर बापटांचा का?, असा सवाल या बॅनर्समधून करण्यात आला आहे. त्यामुळे या बॅनर्सची पुण्यात जोरदार चर्चा सुरू आहे. या बॅनर्सवर एक जागरुक नागरिक असे लिहिण्यात आले आहे.
ब्राम्हण समाजात तीव्र नाराजी पसरल्याचे सांगितले जात आहे. भाजपकडून चिंचवडमध्ये न्याय तर कसब्यात अन्याय केल्याचा आरोप करण्यात येत आहे. आनंद दवे सोमवारी कसब्यातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे कसब्यात हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले. मुक्ता यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही उमेदवारी मागितली होती. पण भाजपने दिली नाही. हा मुक्ता यांच्या कामावर अन्याय आहे. पुण्यात एकही ब्राह्मण उमेदवार नाही ही अन्यायाची भावना समाजातही आहे. पण आम्ही भाजपसोबत राहू, असेही ते म्हणाले.
पुणे | कसबा विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने आज उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत. मात्र, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार संजय काकडे आणि खासदार गिरीश बापट यांना निमंत्रण नसल्याची जोरदार चर्चा आहे.
हेमंत रासने यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकावर संजय काकडे यांचा फोटो नाही. तसेच, अर्ज भरण्यासाठी भाजपकडून जो मेसेज व्हॉट्सॲप वर पाठवला आहे त्यातही संजय काकडे यांचा उल्लेख नाही. आणि विशेष म्हणजे खासदार गिरीश बापट यांचेही नाव त्या मेसेज मध्ये नाही.भाजपकडून या दोन्ही वरिष्ठ नेत्यांना का डावलण्यात आले याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. गिरीश बापट आजारी असल्याने ते अनुपस्थित असणे समजू शकते परंतु, भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संजय काकडेंच्या अनुपस्थितीची चांगलीच चर्चा रंगली आहे.
वास्तविक कसबा पेठ विधानसभा मतदार संघात माजी खासदार संजय काकडे यांना मानणारा मोठा मतदार आहे. काकडे यांचा जन्म घोरपडी पेठेतला आहे. वयाच्या 22 वर्षांपर्यंत काकडे यांचे घोरपडी पेठेत वास्तव्य होते. त्यामुळं घोरपडी पेठेबरोबरच 7 व 9 नंबर कॉलनी, गंज पेठ, शुक्रवार पेठ, कसबा पेठ, रविवार पेठ यामध्ये काकडेंना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. याशिवाय कसबा पेठेतील मुस्लिम व दलित समाज देखील काकडेंना मोठ्या प्रमाणात मानतो.
गिरीश बापट हे विद्यमान खासदार आहेत. शिवाय त्यांनी सलग पाच वेळा कसबा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळं त्यांना देखील मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत.असे असून देखील भाजपच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी या दोन ज्येष्ठ नेत्यांना का डावलण्यात आले असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला आहे. संजय काकडे आणि गिरीश बापट यांना डावलले तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो अशी चर्चादेखील होत आहे. हाथी आलेल्या वृत्ताने रासने यांनी उमेदवारी अर्ज दाखला करण्यापूर्वी गणपतीची आरती केली यावेळी खासदार बापट यांचे पुत्र गौरव आणि सुनबाई स्वरदा हे दोघेही उपस्थित होते.
पुणे- माझं नाना पटोलेंना आव्हान आहे, की निवडणुकीला अजूनही ४८ तास बाकी आहेत, आम्ही जर टिळकांच्या घरात उमेदवारी दिली, तर काँग्रेसने ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल हे घोषित करावं”, अशी प्रतिक्रिया आज भाजपचे कसबा उमेदवार हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करत निघालेल्या मिरवणुकीत माध्यमांशी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे .
कसबा मतदारसंघातून भाजपाने टिळक कुटुंबाला उमेदवारी न दिल्याने आम्ही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असं नाना पटोले म्हणाले या माध्यमांच्या प्रश्नावर ते म्हणाले,’“आम्ही जगताप यांच्या घरातही उमेदवारी दिली आहे. मग काँग्रेस तिथे ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार का? मुळात काँग्रेसला पुण्यातील दोन्ही जागांची पोटनिवडणूक बिनविरोध करायची नाही. त्यामुळेच नाना पटोले यांनी हे विधान केलं आहे. माझं नाना पटोलेंना आव्हान आहे, की निवडणुकीला अजूनही ४८ तास बाकी आहेत, आम्ही जर टिकळांच्या घरात उमेदवारी दिली, तर काँग्रेसने ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल हे घोषित करावं”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच “नाना पटोले जे म्हणत आहे, ते न समजण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. आम्ही या निवडणुकीसाठी तयारी केली आहे”, असा टोलाही त्यांनी लगावला.
नवी दिल्ली, 5 : पुणे -नाशिक या दोन शहरांना हाय स्पीड रेल्वेने जोडण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावास आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्वतः मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
श्री. फडणवीस यांनी आज श्री वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती दिली. श्री फडणवीस म्हणाले, रेल्वे मंत्र्यांसोबत आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल असून त्यासाठी मंत्र्यांचे आणि केंद्र शासनाचे त्यांनी आभार मानले. लवकरच राज्य शासनाचे संबंधित कंपनी आणि केंद्राचे अधिकारी यांच्यात बैठक घेऊन पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाबाबतच्या तांत्रिक बाबींना मूर्त स्वरूप देण्यात येईल असेही श्री फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्राची दोन ऐतिहासिक शहर जोडण्याने राज्याच्या विकासाला गती मिळेल – रेल्वेमंत्री
पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची शहरं आहेत. रेल्वेच्या माध्यमातून या शहराच्या आर्थिक स्थितीला गती मिळेल आणि महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुकही त्यांनी केले.
वर्धा, दि. ५ – वर्धेच्या ऐतिहासिक भूमीत झालेल्या साहित्य संमेलनाच्या ज्ञान यज्ञातून विचाराचे अमृत मिळाले आहे. या विचारातून समाजाला नवी दिशा देण्याचे काम होईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप श्री.गडकरी यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर तर पाहुणे म्हणून आ.पंकज भोयर, माजी खासदार तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष दत्ता मेघे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, कार्यवाह डॉ.उज्वला मेहेंदळे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष तथा संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा.प्रदीप दाते आदी उपस्थित होते.
साहित्यिकांनी समाजाला जोडण्याचे, चांगल्या दिशेने नेण्याचे काम केले आहे. जे त्रिकालाबाधित आहे ते जनतेपर्यंत नेण्याचे काम साहित्य करते. साहित्य, संस्कृतिचे समाजात फार मोठे योगदान आहे. साहित्य, काव्य, नाटक, संगीताचा समाज व्यवहारावर परिणाम होत असतो. समाज जीवन कशा पध्दतीने घडवायचे याचे प्रतिबिंब साहित्यातून उमटते. मराठीत पु.ल.देशपांडे, आचार्य अत्रे यांच्यासह संत मंडळींनी सामाज जिवनावर परिणाम करणारे साहित्य दिले, असे पुढे बोलतांना श्री.गडकरी यांनी सांगितले.
समाज बदलायचा असेल तर व्यक्तीला बदलले पाहिजे. व्यक्ती बदलासाठी संस्कार महत्त्वाचे असतात. संस्कार विचारातून येतात आणि सकस विचारासाठी सकस साहित्य महत्त्वाचे आहे. पुस्तके वाचनाचा परिणाम विचारांवर होतो. यातूनच नवी ज्ञान पिढी निर्माण होते. समाजाला ताकद देण्याची क्षमता साहित्यात आहे. साहित्याचा परिणाम समाजमनावर होत असतो, असे श्री.गडकरी म्हणाले.
आताच्या पिढीत फार झपाट्याने बदल होत आहे. पिढीतील या बदलाची नोंद आणि अंतर लक्षात घेता साहित्य, काव्य, सादरीकरणात बदल करण्याची गरज आहे. नवनवीन माध्यमे येत असली तरी पुस्तकांचा वाचक वर्ग कायम आहे. मात्र नवीन पिढी पाहिजे तेवढे स्वारस्य वाचनात दाखवत नाही, हे दुर्दैवी आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग नव्या पिढीला वाचकप्रिय बनविण्यासाठी केला पाहिजे. रामायण, महाभारत, भगवतगिता, कुराण, बायबल यातून समाजकल्याणाचा संदेश देण्यात आला आहे, असे सांगून ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, ग्रामगीता, गजानन महाराज यांची गाथा डिजिटल स्वरूपात करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. संमेलनाच्या आयोजनाठी प्रशासनाने केलेल्या चांगल्या सहयोगाबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर म्हणाले, राजकारण बाजूला ठेऊन साहित्य संमेलनात एकत्र येण्याची परंपरा आजवर टिकली आहे. कोणत्याही संमेलनाध्यक्षाला मिळाले नसेल इतके प्रेम मला मिळाले आहे. माणसे जोडली गेली पाहिजे हा संमेलनाचा उद्देश आहे. संमेलनात मनातला आवाज उमटला जातो, बुलंद होतो, असे न्यायमूर्ती चपळगावकर म्हणाले.
महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले. संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा.दाते यांनी प्रास्ताविकातून संमेलनात तीन दिवस राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राबणाऱ्या व्यक्तींसह महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी चरखा भेट देऊन सत्कार करण्यात आला. काही सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. समारोप समारंभास साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे- एकीकडे नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत हक्काची जागा आणि सत्यजित तांबे यांच्यासारखा युवा नेता कॉंग्रेसने गमावला असताना आता पुण्यातही कॉंग्रेस पक्ष अविनाश बागवे यांच्यासारखा महापालिकेच्या राजकारणात आणि रस्त्यावरच्या आंदोलनात वाघ म्हणून वावरलेला चेहरा गमावण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते आहे .गेल्या काही महिन्यांपासून अविनाश बागवे यांना प्रदेश अध्यक्ष यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची कुजबुज देखील पक्षात सुरू होती, आज त्यांच्या प्रभागातील रशीद शेख यांचा स्थानिक कुठल्याच पदाधिकारीशी चर्चा न करता काँग्रेस पक्षात झालेला प्रवेश कारणीभूत ठरल्याचे समजते.काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसचा एक ज्येष्ठ नगरसेवक आपल्या मुलांसह भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर असल्याच्या बातम्या आल्या होत्या ,त्यानंतर आता भाजपाने मास लीडर खेचून न्यायचे असे ठरवून आज कसबा निवडणुकीच्या तोंडावर ‘मास्टर स्ट्रोक’ देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते आहे.
शह आणि काटशह चे राजकारण–
कसबा विधानसभेच्या पोटनिवडणूकित आता राजकीय रंगांना उधाण येत असून भाजपाच्या उमेदवाराशी प्रमुख लढत देणाऱ्या कॉंग्रेस पक्षाने याच मतदार संघातील आपल्या भाजपात गेलेल्या एका माजी नगरसेवकाला आज पुन्हा कॉंग्रेसमध्ये खेचण्यात यश मिळविले असताना दुसरीकडे या ‘शहास काटशह’म्हणून भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज थेट कॉंग्रेसच्या युवा आणि अभ्यासू म्हणून लौकिक मिळविलेल्या माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्याशी त्यांच्या राहत्या घरी जावून संपर्क केला असून लवकरच ते उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत अविनाश बागवे भाजपात प्रवेश करतील असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते आहे.प्रत्यक्षात बागवे आणि भाजपा पदाधिकारी यांच्यातील बोलणी समजू शकली नसली तरी येत्या ४/५ दिवसात त्यांचा प्रवेश होईल असे सूत्रांकडून सांगितले जाते आहे. बागवे यांना मानणारा केवळ कसब्यातला ,पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रातला मातंग आणि दलित वर्ग मोठ्या संख्येने आहे. भ्रष्टाचारविरोधातील आणि अन्यायाविरोधातील त्यांची अभ्यासू आक्रमकता या त्यांच्या गुणामुळे ते लोकप्रिय आहेत . शहर आणि परिसरात त्यांनी केलेल्या आंदोलनांची संख्या सर्वात वरच्या क्रमांकाची राहिली आहे, पुणे महापालिकेत कॉंग्रेस पक्षाच्या अवघ्या ३ नगरसेवकांचाच दबदबा राहिला आहे . त्यातीलच 1भाजपच्या वाटेवर असल्याचा वृत्ताने खळबळ उडते आहे.कसब्यातील रोहित टिळक सारखा युवा नेतृत्व असलेला चेहरा देखील काँग्रेस च्या काही नेते मंडळींवर नाराज असल्याचे बोलले जात असून अनेक दिवस ते राजकीय कार्यक्रमातून अलिप्त असल्याचे दिसते आहे.
भोपाळ/जबलपूर/इंदौर : जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळेने मारलेल्या सुवर्ण चौकारामुळे महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा पदक तालिकेत आघाडी घेतली. महाराष्ट्राची आता २६ सुवर्ण, २९ रौप्य आणि २४ ब्रॉंझ अशी ७९ पदके झाली आहेत. *हरियाणा २२, १६, १५ अशा एकूण ५३ पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. मध्य प्रदेश २१, १३, १९ अशा एकूण ५३ पदकांसह तिसऱ्या स्थानी कायम आहे. महाराष्ट्राला आता उद्यापासून सुरु होणाऱ्या वेटलिफ्टिंग प्रकारातून चांगल्या यशाची अपेक्षा आहे. त्याचवेळी कुस्तीतही महाराष्ट्र यश मिळवेल अशी आशा आहे. मात्र, या दोन्हीत महाराष्ट्राला हरियाणाच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. या दोन खेळाबरोबरच जलतरण स्पर्धेतील पदकावर आता पदकतालिकेतील क्रमवारी अवलंबून राहणार असेल यात शंका नाही.
कबड्डीत मुलांचा विजय गेल्या स्पर्धेत ब्राँझपदक विजेत्या महाराष्ट्राने बिहारचा सुरशीच्या लढतीत ३८-३२ असा पराभव करून विजयी सलामी दिली. अजित चौहानच्या खोलवर चढाया आणि जयेश महाजन, अनुज गाढवेचा भक्कम बचाव यामुळे महाराष्ट्राचा विजय सुकर झाला. बिहारकडून विशाल कुमार आणि अंकित सिंगचा खेळ उल्लेखनीय ठरला. मुलांची गाठ आता राजस्थानशी पडणार आहे. मुलींच्या गटात मात्र महाराष्ट्राला हरियानाकडून २५-४१ असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला.
४ बाय ४०० मीटर रिलेत मुलींना सुवर्ण महाराष्ट्राच्या मुलींनी ४ बाय १०० मीटर पाठोपाठ ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीतही सुवर्ण कमाई केली. ॲथलेटिक्समध्ये महेश जाधवने लांब ऊडीत रौप्यपदकाची कमाई केसली. श्रावणी देसावळेचीही उंच उडी रुपेरी यशापर्यंत गेली. ईशा जाधव, वैष्णवी कस्तुरे, रिया पाटील, अनुष्का कुंभार या महाराष्ट्राच्या मुलींच्या चमूने ३ मिनिट ५२ सेकंद वेळ देत सुवर्णुपदक कमावले. श्रावणीने १.६३ मीटर, तर महेश जाधवने ७.११ मीटर उंची उडी मारली. दोघांचे प्रयत्न त्यांना रौप्यपदकापर्यंत घेऊन गेले. ८०० मीटर शर्यतीत रिया पाटीलने २ मिनिट १२.५६ सेकंद वेळ देताना ब्रॉंझपदक मिळविले. रिया कोल्हापूरला अभिजीत म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
जिम्नॅस्टिकमध्ये सुवर्णभरारी
महाराष्ट्राच्या संयुक्ता काळेने आपल्या जबरदस्त कामगिरीने महाराष्ट्राची पदकतालिकेतील बाजू भक्कम केली. संयुक्ताने तालबद्ध जिम्नॅस्टिक प्रकारात ४ सुवर्ण, १ रौप्य असी पाच पदकांची कमाई केली. किमयाने ३ ब्रॉंझपदके मिळविली. संयुक्ताने सुवर्णपदक पटकाविताना हूप प्रकारात २६.२५, बॉल मध्ये २६.१५, क्लबमध्ये २५.४५, रिबनमध्ये २४.५५ गुण पटकावले. तिची जोडीदार किमयाने बॉलमध्ये २२.३५, क्लबमध्ये १९.९५, रिबनमध्ये १९.६५ गुण मिळवून ब्रॉंझपदकाची कमाई केली. जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राचा दबदबा कायम राहिला असून, महाराष्ट्राने या क्रीडा प्रकारात ७ सुवर्ण, ५ रौप्य आणि ७ ब्रॉंझपदके मिळविली. जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी सर्वसाधारण विजेतेपद मिळविले, तर मुलांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
संयुक्ताची कामगिरी निश्चितच महाराष्ट्राचा लौकिक उंचावणारी आहे. तिची कामगिरी उल्लेखनीय ठरली. भविष्यात तिला नक्कीच या कामगिरीने प्रेरणा मिळेल आणि ती आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उंचावेल.
सुहास दिवसे, महाराष्ट्राचे क्रीडा आयुक्त
संयुक्ता गुणी खेळाडू आहे. त्यामुळेच या वयातही तिने राष्ट्रीय स्तराबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे. भविष्यात ती ऑलिम्पिकमध्ये निश्चितपणे नाव मिळवेल.
पूजा आणि मानसी सुर्वे, संयुक्ताच्या प्रशिक्षक
सलग दुसऱ्या वर्षी चार सुवर्णपदकांची मानकरी होताना खूप आनंद होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जिम्नॅस्टिकमध्ये भारताला अजून कुणी पदक मिळवून दिलेले नाही. मला ते करून दाखवायचे आहे आणि त्यासाठी खेलो इंडियाने मला मोठा आत्मविश्वास मिळवून दिला.
संयुक्ता काळे, महाराष्ट्राची सुवर्ण जिम्नॅस्ट
संघाच्या कामगिरीवर निश्चित समाधानी आहे. मुलांमध्ये उत्तर प्रदेशचे नेहमीच आव्हान राहते. मुलांकडून थोड्याशा चुका झाल्या. पण, शेवटी खेळ आहे. काही पदके थोड्याफार फरकाने हुकली. संयुक्ताने तर कमाल केली. सारा राऊळने मिळविलेले यश सर्वात महत्वाचे आहे. पदार्पणाच्या स्पर्धेत ऑल राऊंड प्रकारात सुवर्णपदक ही मोठी गोष्ट आहे. या स्पर्धेचे ती फाईंड आहे असे म्हणता येईल.
पुणे, ता. ५ : अनेकदा कायद्यांच्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी विधिमंडळात काम करावे लागते. कित्येक तालुक्यात स्वयंसेवी संस्था नाहीत. तेंव्हा शासनाला काम करावे लागते. चांगल्या अधिकाऱ्यांमुळे कामाला गती येते. सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा यामुळे येणार्या दबावाला झुगारून स्वयंसेवी संस्थांनी विधायक काम उभे केले ही पुण्यातील संस्थांच्या कामाची पावती आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला बालहक्कांची सनद जाहीर व्हावी. ज्ञानदेवी स्वयंसेवी संस्थेच्या चाइल्ड लाईनच्या माध्यमातून झालेल्या कामावर आधारित ‘पालकांशी हितगुज’ आणि ‘मुलांच्या जगाचे वास्तव’ या पुस्तकांतून प्रेरणादायक प्रयत्नांची दिशा मिळेल. समाजाने देखील अशा कामात पुढे यावे, अशी अपेक्षा विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे व्यक्त केली.मुलांच्या जगात गेली चाळीस वर्षे काम करताना आलेल्या अनुभवावर आधारित ज्ञानदेवी चाइल्ड लाइन संस्थेच्या संस्थापिका आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे यांनी लिहिलेल्या ‘पालकांशी हितगुज’ आणि ‘मुलांच्या जगाचे वास्तव’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन आज डॉ. नीलम गोर्हे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
पुण्यामध्ये सेवासदन इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून बालमानस शास्त्रज्ञ डॉक्टर भूषण शुक्ला, वंचित विकास या सामाजिक संस्थेच्या संचालिका मीना कुर्लेकर, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे आणि कार्यकर्ते गायत्री पाठक उपस्थित होत्या.
यावेळी संस्थेच्या माजी विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांचा सत्कार डॉ. गोर्हे यांनी केला.
त्या पुढे म्हणाल्या, ‘डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी लिहिलेली ओघवत्या भाषेतील ही दोन्ही वाचनीय पुस्तके आहेत. पुस्तक आणि वाचक या दोन्हींच्या भेटीचा हा अपूर्व योग आहे. विपरीत परिस्थितीतही सकारात्मक काम करणाऱ्या अनेकांना ऊर्जा कशी मिळते. ते आपले काम सातत्याने करतात यातच त्यांच्या यशाचे गमक आहे. समाजाने त्यांना विश्वासाने दिलेला पुरस्कार हा फार मोठा असतो. पुण्याच्या सुसंस्कृत भागात स्वयंसेवी संस्थांनी उभे केलेले काम अतिशय परिणामकारक आहे. अनेकांनी त्याला गौरवले आहे. आव्हानात्मक स्थितीमध्येही काम ज्ञानदेवी संस्थेने केले आहे. यामुळे अनेक गुन्हेगारांना शिक्षा देखील झाली आहे. अनेक कायद्यांमध्ये आजही काही मर्यादा आहेत. पण बदलत्या परिस्थितीनुसार समाजाची नजर मात्र प्रत्येक घडामोडींवर असते. न्याय व्यवस्थेतही अनेकदा न्यायाच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलली जातात. यामुळे लोकशाहीवर विश्वास निर्माण करण्याचे काम मुलांच्या मनावर केले, याबद्दल चाइल्ड लाईनच्या कामाचे कौतुक त्यांनी केले. या कामात आवश्यक ती मदत देण्याचे त्यांनी जाहीर केले.
महिलाविषयक कोणत्याही गुन्ह्यात पीडितांची नावे जाहीर न करण्याची सूचना विधिमंडळात डॉ. गोर्हे यांनी प्रथम केल्याची आठवण त्यांनी सांगितली. यामुळे महिला अत्याचाराच्या अनेक घटनांचा उल्लेख आणि आढावा विधीमंडळाकडे अधिक प्रमाणात होऊ लागल्याचे, त्या म्हणाल्या.
यावेळी वंचित विकास संस्थेच्या मीना कुर्लेकर आणि बालमानसशास्त्रज्ञ डॉ. भूषण शुक्ल यांनीही आपले विचार मांडले. डॉ. सहस्रबुद्धे यांनी संस्थेच्या कामाची माहिती दिली.
महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे १६ व्या करप्रणाली कायदा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा समारोप
पुणे : “जीवनात अमर्याद संधी व अनेक वाटा असतात. त्या संधी, वाटांवर चालताना आपण आत्मशोधाचा प्रवास केला पाहिजे. त्यातून यशाकडे जाण्याचा मार्ग सापडतो. यशापेक्षा पात्रता अंगिकारण्यावर आपण भर द्यायला हवा,” असे प्रतिपादन पुण्याचे प्राप्तिकर आयुक्त अभिनय कुंभार यांनी केले. महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या (एमटीपीए) वतीने १६ व्या करप्रणाली कायदा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या समारोपावेळी अभिनय कुंभार बोलत होते. या अभ्यासक्रमात नरेंद्र शहाने प्रथम, अमिताभ भावे यांनी द्वितीय, तर मनीषा तापडिया यांनी तृतीय क्रमांक मिळवला. प्रसंगी सिंहगड कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. मकरंद वाझल, जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष ॲड. सुनील खुशलानी, ‘एमटीपीए’चे अध्यक्ष सीएमए श्रीपाद बेदरकर, उपाध्यक्ष ॲड. अमोल शहा, सचिव प्रसाद देशपांडे, खजिनदार ज्ञानेश्वर नरवडे, सहसचिव ॲड. अनुरुद्र चव्हाण, अभ्यासक्रम चेअरमन मनोज चितळीकर, समन्वयक प्रणव सेठ, मिलिंद हेंद्रे, माजी अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, शरद सूर्यवंशी, विलास अहेरकर आदी उपस्थित होते. अभिनय कुंभार म्हणाले, “तज्ज्ञ सनदी लेखापाल, कर सल्लागार यांच्या मार्गदर्शनातून समर्पित भावनेने आपण ज्ञानार्जन करत आहात. बदलत्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे जगण्याचे आयामही बदलले आहेत. स्पर्धा परीक्षा, बँकांच्या, विविध आर्थिक संस्थांच्या परीक्षा देत त्यात यश मिळवण्याचा प्रयत्न करावा. तसेच सातत्याने स्वतःला अद्ययावत ठेवायला हवे.”
ॲड. सुनील खुशलानी म्हणाले, “उद्योग क्षेत्रात लेखापालांची, कर सल्लागारांची मोठी गरज आहे. कर कायदे, कर प्रणाली सातत्याने प्रगत होत आहे. सरकारकडून कर प्रणालीत कृत्रिम बुद्धिमत्तेसह नवनवीन तंत्रज्ञान आणत आहे. प्रक्रिया ऑनलाइन होत आहे. त्यामुळे या नव्या प्रणाली आत्मसात करायला हव्यात.”
डॉ. मकरंद वाझल म्हणाले, “ग्रामीण भागातील तरुणांना अशा अभ्यासक्रमाची संधी मिळायला हवी. करप्रणालीतील गुणवत्तापूर्ण शिक्षण ‘एमटीपीए’ देत आहे. असे अभ्यासक्रम शिकायला बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासाची सोय करावी.”
श्रीपाद बेदरकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. मनोज चितळीकर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. प्रणव शेठ यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. अमोल शहा यांनी आभार मानले.
भोपाळ- मुलींनी चार बाय चारशे मीटर रिले शर्यतीत मिळवलेल्या विजेते पदासह महाराष्ट्राने येथील ॲथलेटिक्स शेवटच्या दिवसाची सांगता केली. त्याखेरीज महाराष्ट्राला आज महेश जाधव याने लांब उडीत रौप्य पदक, श्रावणी देसावळे हिने उंच उडीत रौप्य पदक तर रिया पाटील तिने ८०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळवून दिले.
महिलांच्या रिले शर्यतीत ईशा जाधव, वैष्णवी कातुरे, रिया पाटील व अनुष्का कुंभार यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी सुरुवातीपासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली. त्यांनी बॅटन बदलताना देखील चांगला संयम दाखविला. हे अंतर त्यांनी तीन मिनिटे ५२ सेकंदात पार केले.
इस्लामपूर येथील खेळाडू श्रावणी हिने उंच उडीत १.६३ मीटर्स पर्यंत उडी घेतली. दुस-या प्रयत्नात तिने हे यश संपादन केले. ती सांगली जिल्ह्यातील खेळाडू असून इस्लामपूर येथे विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. खेलो इंडिया स्पर्धेतील तिचे हे पहिलेच पदक आहे. “पदक जिंकण्याचा मला आत्मविश्वास होता”, असे श्रावणी हिने सांगितले. आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदक तिला खुणावत आहे.
शेतकऱ्याचे पोर लई हुशार !! शेतकऱ्यांच्या मुलांकडे देखील खेळामध्ये नैपुण्य मिळवण्याची क्षमता असते, हे महाराष्ट्राच्या महेश जाधव याने दाखवून दिले. सातारा जिल्ह्यातील अबदरे या खेडेगावात जन्मलेल्या या खेळाडूने मुलांच्या लांब उडी मध्ये रुपेरी कामगिरी केली. त्याने ७.११ मीटर्स पर्यंत उडी मारली. खेलो इंडिया स्पर्धेतील त्याचे हे वैयक्तिक प्रकारात पहिलेच पदक आहे. त्याआधी त्याने महाराष्ट्रात चार बाय शंभर मीटर्स शर्यतीतही रौप्य पदक मिळवून दिले होते. यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर त्याने कनिष्ठ गटात ८० मीटर्स अडथळा शर्यत व लांब उडी या क्रीडा प्रकारात अनेक पदके जिंकली आहेत.
क्रीडा प्राधिकरणाच्या नैपुण्य चाचणीमध्ये त्याने दाखवलेल्या कौशल्यामुळे त्याची मैदानी स्पर्धांसाठी सांगली येथील क्रीडा प्रबोधिनीच्या प्रशिक्षण केंद्रात निवड झाली. तेथे ज्येष्ठ प्रशिक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची ॲथलेटिक्समधील कारकीर्द सुरू झाली. सांगली येथील प्रबोधिनीचे केंद्र बंद पडल्यानंतर तो पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनी मध्ये महेश पाटील यांच्याच मार्गदर्शनाखाली आता सराव करीत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा नावलौकिक उंचावण्याचे त्याचे ध्येय आहे आणि त्यासाठी कसून सराव करण्याची त्याची तयारी आहे.
पदकाची खात्री होती- रिया आठशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीत राज्यस्तरावर अनेक पदके मिळवली होती तसेच येथील स्पर्धेसाठी चांगला सराव केला होता त्यामुळे पदक मिळवण्याची मला खात्री होती असे या शर्यतीत कांस्यपदक मिळवणाऱ्या रिया पाटील हिने सांगितले. तिने हे अंतर दोन मिनिटे १२.५६ सेकंदात पार केले. या आधी या स्पर्धेत तिने महाराष्ट्रात चार बाय शंभर मीटर्स रिले शर्यतीत सोनेरी कामगिरी करून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. ती कोल्हापूर येथे अभिजीत म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.