Home Blog Page 1426

वाढत्या सायबर क्राईमची गांभीर्याने दखल घ्या-आमदार सिद्धार्थ शिरोळे

मुंबई – सायबर क्राईम चे प्रमाण वाढत असून नागरिकांची आर्थिक फसवणूक होत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी शासनाने तक्रारींची गंभीरपणे दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, असा औचित्याचा मुद्दा आमदार शिरोळे यांनी बुधवारी विधीमंडळ अधिवेशनात उपस्थित केला.

पोलीसांच्या सायबर विभागात चालू वर्षात सव्वाशेहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या, मात्र त्यातील फक्त २५ तक्रारी दाखल झाल्या आहेत, असे आमदार शिरोळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

याबाबत अधिक बोलताना आमदार शिरोळे यांनी सांगितले, पुण्यातील चतुःश्रृंगी परिसरात राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार दोन दिवसांपूर्वी अज्ञाताने फोन करून तुमच्या नावे आलेल्या पार्सल मध्ये ड्रग्ज (मादक द्रव्य) आहेत, तुम्ही तत्काळ पोलिसांना कळवा, असे सांगत फोन ट्रान्सफर करण्याचा बनाव केला. या नंतर तरुणीच्या फोन मध्ये स्काईप ॲप इंस्टॉल करून वैयक्तिक माहितीचा गैरवापर करत सात लाखांची फसवणूक केली. तर दुसऱ्या घटनेमध्ये, बाणेर परिसरातील ४२ वर्षीय महिलेसोबत मुंबईचे सायबर डीसीपी बोलत असल्याचे भासवून तिची एक लाखाची फसवणूक केली.

बालेवाडीमध्ये सुद्धा २८ वर्षीय तरुणीला कुरियर कंपनीकडून बोलत आहे, असा फोन आला. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज आहेत असे सांगितले. पार्सल तुमचे नसल्यास पोलिसांना तक्रार द्या असे सुचविले. पोलिसांशी कॉल जोडून देतो असे सांगत व्हेरिफिकेशन करून घेऊ, असे तिला सुचवले. प्रत्यक्षात तिच्या फोनचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि ४ लाख ८० हजार रु परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. ह्या केसमध्ये तर पोलिसांच्या गणवेशात व्हिडिओ कॉल करून, अटक वॉरंट दाखवून, महिलेची फसवणूक केली. अशा घटना सभागृहात सांगून. सायबर क्राईमचे गांभीर्य आमदार शिरोळे यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले.

‘स्वयंसेवक’ सामाजिक संस्थेच्या कार्याचा पाया : जावडेकर


वंचित विकास संस्थेतर्फे स्वर्गीय विलास चाफेकर लिखित ‘यशोमंदिराचा पाया’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे, ता. २६ : “जमवलेली माणसे हीच संपत्ती मानून रात्रंदिन वंचित घटकांच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या विलास चाफेकर यांनी स्वयंसेवकांचे मोठे जाळे तयार केले. निःस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या स्वयंसेवकांचा पाया भक्कम असेल, तर सामाजिक संस्थेचे कार्य चांगल्या पद्धतीने उभे राहते,” असे प्रतिपादन लेखिका कल्पना जावडेकर यांनी केले.
जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेचे संस्थापक स्वर्गीय विलास चाफेकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनी त्यांनी अखेरच्या दिवसांत लालबत्ती विभागातील दवाखाना व सल्ला, मार्गदर्शन केंद्राचे काम मांडण्याकरिता लिहिलेल्या ‘यशोमंदिराचा पाया-खऱ्या शिल्पकार स्वयंसेविका’ या पुस्तकाचे प्रकाशन जावडेकर व जनरल फिजीशिएन डॉ. हेमंत मांजरेकर यांच्या हस्ते झाले. 
नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या सोहळ्यावेळी वंचित विकासचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर आदी उपस्थित होते. कल्पना कांबळे, रेणुका कोडखणी, बी पन्ना, पार्वती अत्तुर यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. कार्यकर्त्या मीनाक्षी नवले आणि पुस्तकाचे काम पूर्णत्वास नेण्यात योगदान देणाऱ्या चैत्राली वाघ यांचा सत्कार करण्यात आला.
विविध संस्थांच्या माध्यमातून चाफेकरांनी उभारलेले कार्य आणि पुस्तकाविषयी हळव्या आठवणी सांगताना उपस्थितांच्या डोळ्यांतून अश्रू तरळत होते. संस्थेसाठी त्यांनी दिलेले योगदान कधीही न विसरणारे आहे, अशी भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली.
डॉ. हेमंत मांजरेकर यांनी चाफेकर सरांच्या आठवणींना उजाळा दिला. मीना कुर्लेकर यांनी सूत्रसंचालन केले. तृप्ती फाटक यांनी वंचित विकास संस्थेच्या कार्याची माहिती दिली.

अतिक्रमणे हटविणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर दहशत बसविण्याच्या प्रकारात मोठी वाढ,चंदननगर आणि मुंढव्यात गुन्हे दाखल


पुणे– शहरातील आणि उपनगरातील कोलमडून पडलेली वाहतूक व्यवस्था रस्तोरस्ती अगदी गरीबांपासून श्रीमंतानी केलेली अतिक्रमणे यामुळे शहर बकाल होत असताना अतिक्रमणांवर आणि बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास जाणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दादागिरी करण्याच्या प्रकारात गेल्या वर्षभरात मोठी वाढ झाली असून कारवाई पेक्षा चिरीमिरी घ्या आणि नुमुतपणे निघा असा प्रघात सर्वमान्यता पाऊ लागला आहे.यामुळे कोणीही वाली न उरल्याने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वर्गाची मोठी कुचंबना महापालिकेत होत असल्याचे दिसून येते आहे . दरम्यान काल अतिक्रमण कारवाई साठी गेलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ,मारहाण ,धक्काबुक्की आणि धमक्या दिल्याच्या कारणावरून चंदननगर आणि मुंढव्यात गुन्हे दाखल झाले आहेत .

चंदननगर पोलीस ठाण्यात भादविक ३५३,३३२,३५२, ३२४, ३२३, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला असून महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने तकरार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकार्याचे नाव गुप्त ठेवण्याचा प्रकार देखील पोलिसांनी केल्याने याप्रकारची तीव्रता लक्षात येते आहे.
मात्र पोलिसांनी सांगितले कि ,’स्विट इंडीया चौक, खराडी येथील फुटपाथवरील एक भाजी विक्रेता व इतर त्याचे पाच साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे (अटक नाही) दिनांक २५/७/२०२३ रोजी संध्याकाळी साडेसह वाजता हा प्रकार घडला .
यातील फिर्यादी हे पुणे महानगरपालीका अतिक्रमण विभागामार्फत त्यांचे सहकारी अतिक्रमण निरिक्षक व इतर स्टाफ या पथकासह नमुद ठिकाणी सार्वजनिक रोडचे कडेला फुटपाथवर कारवाई करीत असताना, सदर ठिकाणी फुटपाथवर असलेले भाजी विक्रेते हे फिर्यादी यांचे अंगावर धावुन येवुन, त्यातील एका विक्रेता याने त्यांची भाजी सार्वजनीक रोडवर विस्कटुन फिर्यादी सोबत वाद घालुन, त्याचे सोबत असलेले इतर भाजीविक्रेते याने फिर्यादीस धक्का-बुक्की करून, त्यांना अपशब्द वापरून, लाकडी फळी व लोखंडी खोरे दाडयांसहीत घेवुन फिर्यादी यांचे अंगावर मारण्यासाठी धावुन आले. तसेच फिर्यादी यांचे सहकारी याचे पाठीत लाकडी फळी मारून, हाताने मारहाण केली. तसेच तुम्ही अतिक्रमणवाले परत पुन्हा याठिकाणी आले तर, तुम्हा सर्वांना बघुन घेतो अशी धमकी देवुन, फिर्यादी हे करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला असे पोलिसांनी सांगितले .
पोलीस उपनिरीक्षक घोडके ७५८८१७००८०हे याप्रकरणी तपास करत आहेत.
तर कोंढवा पोलीस ठाण्यात एका महापालिका अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार भादविक ३५३,३२३, ५०४, ५०६ नुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथे हि तक्रारदार अधिकारी यांचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. दि. २५/०७/२०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता कोंढवा परिसरात भिमनगर येथील मनीष पार्क गेट नं. ०२, कोंढवा बुद्रुक येथे हा प्रकार घडला
पोलिसांनी सांगितले कि,’यातील फिर्यादी हे पुणे महानगरपालिकेमध्ये सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदावर आहेत. फिर्यादी हे कोंढवा परिसरात भिमनगर येथील मनीष पार्क गेट नं ०२, कोंढवा बुद्रुक, पुणे येथे हडपसर मुंढवा क्षेत्रिय कार्यालयाकडील मनपा अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करीत असताना, यातील नमुद इसमांनी पोलिस स्टाफ व फिर्यादी यांचे अन्य सहकारी यांना अतिक्रमण हटविण्यापासुन मज्जाव करुन, अपशब्द वापरून, त्यांना धक्का-बुक्की करुन, फिर्यादी हे करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड ९८५०२९९७७६ हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

भोर व वेल्हे तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया स्थगित

पुणे दि. २६: भोर उपविभागातील भोर व वेल्हे तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांसाठी १ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेली लेखी परीक्षा दोन्ही तालुक्यातील पावसाची स्थिती लक्षात घेऊन स्थगित करण्यात आली असल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी कळविले आहे.

जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार ३ जुलै २०२३ रोजी भरती प्रकियेबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. पोलीस पदासाठी प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेबाबत कालबद्ध कार्यक्रमानुसार मंगळवार १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता परीक्षा घेण्यात येणार होती.

भोर व वेल्हा तालुके हे दुर्गम व डोंगराळ व अतिवृष्टीप्रवण असून सद्यस्थितीमध्ये पावसाला मोठ्या प्रमाणात सुरवात झालेली आहे. तालुक्यामध्ये दरडग्रस्त गावे असून नैसर्गिक आपत्तीच्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत असून महसूल यंत्रणा आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात व्यस्त आहे. दोन्ही तालुक्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घाट प्रवण क्षेत्र असून घाट माथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक असल्याने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात उपविभागीय अधिकारी कार्यालयातील व तहसीलदार कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच क्षेत्रिय स्तरावरील कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.

ही परिस्थिती लक्षात घेता नियोजित लेखी परीक्षा घेणे प्रशासकीय कारणास्तव शक्य होणार नसल्याने १ ऑगस्ट रोजी नियोजित लेखी परीक्षा पुढील तारखेपर्यंत तूर्त स्थगित करण्यात आली आहे. भोर उपविभागीय कार्यालयाकडून लेखी परीक्षेचा दिनांक व स्थळ तसेच त्यापुढील कालबद्ध कार्यक्रमाबाबत अवगत करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.

पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे गुरुवारी वितरण

पुणे, दि.२६ : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत चौदाव्या हप्त्याचा एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीचा देय लाभ देशातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सीकर, राजस्थान येथून गुरुवार २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन समारंभाद्वारे वितरीत होणार आहे, अशी माहिती विस्तार व प्रशिक्षण कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने पीएम किसान योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये यांना २ हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी ६ हजार रुपये लाभ देण्यात येतो. २७ जुलै रोजी राज्यातील ८५ लाख ६६ हजार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना साधारणत: १ हजार ८६६ कोटी ४० लाख रुपये इतका लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. राज्यातील ८८ लाख ९२ हजार लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न लाभ अदायगीसाठी नोंदणीकृत झाले आहेत. उर्वरीत सर्व लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न करण्याकरीता संबंधित बँकेत अर्ज सादर करून आधार संलग्न करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन कृषी आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.

चौदाव्या हप्त्याची हस्तांतरित करावयाची रक्कम शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे, खते, औषधे सारख्या कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून राज्यात या योजनेंतर्गत २५ जुलै २०२३ अखेर २३ हजार ७३१ कोटी ८१ लाख रुपये रक्कमेचा लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे.

या समारंभास केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय रसायने आणि खते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया उपस्थित राहणार आहेत. या समारंभामध्ये कृषी विज्ञान केंद्रावर https://pmindiawebcast.nic.in या लिंकचा वापर करून परिसरातील शेतकऱ्यांना सहभागी होता येईल, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
0000

विवाहानंतर आठ दिवसांत कारागृहातील रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या; प्रेयसीसह सहाजणांवर गुन्हा

पुणे-विवाहानंतर आठवडभरात कारागृहातील रक्षकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या प्रकरणाचे कारण उघडकीस आले आहे. प्रेमप्रकरणातून रक्षकाने आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आले असून याप्रकरणी येरवडा पोलिसांनी प्रेयसीसह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अमोल मुरलीधर माने (वय २८) असे आत्महत्या केलेल्या कारागृह रक्षकाचे नाव आहे. माने याच्या आत्महत्येस जबाबदार असल्याप्रकरणी पल्लवी दिनकर धुमाळ (रा. येरवडा कारागृह वसाहत) दिनकर रंगोबा धुमाळ (वय ५७, रा. विजय पार्क, विद्यानगर), प्रतिक दिनकर धुमाळ, रोहिदास मुरलीधर निगडे (वय ५२), सोहम निगडे, रोहित साहु लॅबवाला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवडा कारागृहात २७ फेब्रुवारी रोजी कारागृह रक्षक अमोल माने याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल आणि पल्लवी यांचे प्रेमसंबंध होते. पल्लवीने त्याला विवाहास नकार दिला होता. त्यानंतर अमोलला पल्लवी आणि नातेवाईकांनी धमकावण्यास सुरुवात केली. तुझ्याविरुद्ध तक्रार केल्यास निलंबित होईल, अशी धमकी पल्लवीने त्याला दिली होती. दरम्यान, अमोलचा विवाह ठरला. तो विवाहासाठी मूळगावी अहमदनगरला गेला होता. जानेवारी महिन्यात त्याचा विवाह झाला. विवाहासाठी त्याने सुट्टी घेतली होती. विवाहानंतर तो पुन्हा कारागृहात रुजू झाला. तेव्हा पल्लवी आणि नातेवाईकांनी त्याला पुन्हा धमकावण्यास सुरुवात केली. तू विवाह कसा केला ?, अशी विचारणा त्याच्याकडे करण्यात आली. तुझी बदनामी करतो. पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची धमकी त्याला देण्यात आली होती. त्यानंतर २७ फेब्रुवारी कारागृहात पहाटे बंदोबस्तास असलेल्या अमोल मानेने स्वत:वर बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने मोबाइलवर संदेश लिहिला होता. पोलिसांनी याप्रकरणी तपास करुन सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक कांचन जाधव तपास करत आहेत.

व्हॉलीबॉलमध्ये भारतीय मुलींना ऐतिहासिक रौप्य

भारताच्या फुटसाल संघाला ‘फेअर प्ले’चा पुरस्कार; आंतरराष्ट्रीय फेडरेशन फॉर कॅथलिक स्कूलकडून आयोजन
पुणे : भारतीय संघाला एफआयएसईसी-एफआयएसईपी गेम्समध्ये मुलींच्या व्हॉलिबॉलमध्ये रौप्यपदक मिळाले. त्याचबरोबर मुलांच्या फुटसाल संघाला ‘फेअर-प्ले’ संघाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आंतरराष्ट्रीय फेडरेशन फॉर कॅथलिक स्कूल (एफआयएसईसी) यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑलिम्पिक खेळाचे महत्त्व वाढावे, या दृष्टीने एफआयएसईसी काम करीत असते. त्यासाठी वर्षाला १५ ते १७ वयोगटातील मुला-मुलींसाठी शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यंदा ही स्पर्धा फ्रान्समधील डुंकिर्क येथे  झाली. यात व्हॉलिबॉल, फुटसाल, बास्केटबॉल, हँडबॉल, टेबल टेनिस, ॲथलेटिक्स, जलतरणच्या स्पर्धा झाल्या. यात भारतीय संघ व्हॉलीबॉल आणि फुटसाल स्पर्धेत सहभागी झाला होता. मिलेनियम नॅशनल स्कूलच्या मुलींच्या संघाने या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले.
मुलींच्या व्हॉलिबॉलमध्ये भारतीय संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रियावर २५-२२, २५-२१, १५-२५, २५-१८ अशी मात केली होती. यात श्रीया गोथोस्कर, संस्कृती आपटे, नंदिनी भागवत, रिया एदलाबादकर यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. अंतिम फेरीत मात्र बेल्जियमने भारताला २५-२२, २५-२१, १५-२५, २५-१८ असे पराभूत केले. त्यामुळे भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अर्थात, ही कामगिरी देखील ऐतिहासिक ठरली. तत्पूर्वी, उपांत्यपूर्व फेरीत भारताने चिलीला नमविले होते. रौप्यपदक विजेत्या संघाचे मिलेनियम स्कूलचे संचालक अन्वित फाटक, अंचीता भोसले, प्राचार्या राधिका वैद्य, प्रा. सचिन घायवळ, क्रीडा प्रमुख रामदास लेकावळे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

भारतीय संघातील मुली – समृद्धी कोंढरे, तन्वी जोशी, वरद तिलय, श्रीया गोथोस्कर, संस्कृती आपटे, रिया एदलाबादकर, ओजस्वी बाचुटे, नंदिनी भागवत, स्वरा व्यवहारे, अनहिता मोकाशी, अनन्या गोसावी, ईरा ढेकणे. प्रशिक्षक – कुलदीप कोंडे. संघ व्यवस्थापक – मुग्धा भागवत, श्वेता आपटे.

२०४ कोटींची थकबाकी; १४ हजारांवर थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

थकीत वीजबिल भरा, सहकार्य करा: महावितरण

पुणे, दि. २६ जुलै २०२३:पुणे परिमंडलातील ७ लाख ८ हजार ८९२ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे २०४ कोटी ६७ लाख रुपयांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिलांचा भरणा केला नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरु आहे. यामध्ये गेल्या पंधरवड्यात पुणे परिमंडलातील १४ हजार १५५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २९) व रविवारी (दि. ३०) सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. सोबतच लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे.

सद्यस्थितीत पुणे शहरात एकूण ३ लाख १४ हजार ९२० वीजग्राहकांकडे ७६ कोटी ११ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती २ लाख ६८ हजार १२२ ग्राहकांकडे ५३ कोटी ९१ लाख रुपये, वाणिज्यिक ४३ हजार ६३८ ग्राहकांकडे २० कोटी ९ लाख रुपये, औद्योगिक ३ हजार १६० ग्राहकांकडे २ कोटी १२ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर ८ हजार ९१४ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

पिंपरी चिंचवड शहरात एकूण १ लाख ५१ हजार ४०९ वीजग्राहकांकडे ५४ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती १ लाख २५ हजार ८६९ ग्राहकांकडे ३१ कोटी ६३ लाख रुपये, वाणिज्यिक २१ हजार ३५ ग्राहकांकडे १३ कोटी ४ लाख रुपये, औद्योगिक ४ हजार ५०५ ग्राहकांकडे ९ कोटी ६१ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर ९५२ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

तसेच ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये एकूण २ लाख ४२ हजार ५६३ वीजग्राहकांकडे ७४ कोटी २७ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती २ लाख १६ हजार २६१ ग्राहकांकडे ५२ कोटी ५७ लाख रुपये, वाणिज्यिक २२ हजार ५९६ ग्राहकांकडे १४ कोटी ३५ लाख रुपये, औद्योगिक ३ हजार ७०६ ग्राहकांकडे ७ कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर ४ हजार २८९ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजग्राहकांनी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा, मुंबई पोलिसांच्या सूत्रांची माहिती; आता व्हिडिओ लिक करणाऱ्याचा शोध सुरू

मुंबई -भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ मॉर्फ नसून खरा असल्याचा दावा मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी बुधवारी केला. तपास पथकाने सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओचे विश्लेषण केले. त्यात तो व्हिडिओ खरा असल्याचे निष्पन्न झाले. आता पोलिस हा व्हिडिओ लिक करणाऱ्याचा शोध घेत आहेत, असे सूत्रांनी म्हटले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ एका मराठी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केला होता. राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या ऐन तोंडावर हा व्हिडिओ लिक झाला होता. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी भाजपला चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते.

गुन्हे शाखेच्या युनिट 10 कडून तपास

त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 10 कडे सोपवण्यात आला. गुन्हे शाखेने प्राथमिक आधारावर संबंधित वृत्तवाहिनीशी संपर्क साधून व्हिडिओची मागणी केली. त्यानंतर त्याचे विश्लेषण केले असता हा व्हिडिओ खरा असल्याचे निष्पन्न झाले, असे सूत्रांनी सांगितले.

व्हिडिओचा पेनड्राइव्ह सभागृहाच्या पटलावर

एका मराठी वृत्तवाहिनीने 17 जुलै रोजी किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा सभागृहात मांडत सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सोमय्या यांनी धमकावून काही मराठी महिलांचे शोषण केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यांनी सोमय्या यांच्या व्हिडिओचा समावेश असणारा पेनड्राइव्ह उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली.

अहवाल सादर करा – राज्य महिला आयोग

राज्य महिला आयोगाने यासंबंधी मुंबई पोलिसांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या प्रकरणी म्हणाल्या होत्या की, किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर अनेक सामाजिक संस्थांनी महिला आयोगाकडे तक्रार केली. त्यानुसार, महिला आयोगाने मुंबईच्या पोलिस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रकरणाचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.

किरीट सोमय्या यांना दाखविले काळे झेंडे.

pune-    भाजपा नेते किरीट सोमय्या आज पर्वती भागातील लक्ष्मीनगर येथील भाजप कार्यकर्त्याच्या घरी जेवायला येत असल्याचे कळाल्यानंतर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पर्वती ब्लॉक काँग्रेसच्या वतीने गजानन महाराज मठ चौक येथे किरीट सोमय्या यांच्या निषेधार्थ घोषणा देवून काळे झेंडे दाखवून महिला कार्यकर्त्यांनी गाडीवर बांगड्या फेकल्या. यावेळी काही कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांच्या गाडींवर काळे झेंडे फेकले.

     यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘भाजपाचे बेशरम नेते लज्जास्पद कृत्य करून त्याचे व्हिडीओ सोशल मिडियावर टाकतात आणि सरकार त्यांना सिक्युरिटी देते. त्यांना खरेतर ट्रिपल एक्स सिक्युरिटी दिली तरी काँग्रेसचे त्यांच्या विरोधातील आंदोलन सुरूच राहिल. घृणास्पद कृत्य करून निर्लज्जपणे जेवणावळी झोडायला पुण्यात आले. त्यांना ज्या ज्या ठिकाणी विरोध दर्शविता येईल त्या त्या ठिकाणी आक्रमकपणे विरोध दर्शविला जाईल.’’

     यावेळी त्यांच्या गाडीवर काळे झेंडे फेकणाऱ्या काँग्रेसच्या सद्दाम शेख, स्वप्निल नाईक, अक्षय माने, अक्षय सागर या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.

     यावेळी माजी महापौर कमल व्यवहारे, संगीता तिवारी, अजित दरेकर, रफिक शेख, सुजित यादव, द. स. पोळेकर, संतोष पाटोळे, हेमंत राजभोज, शिवा भोकरे, प्रकाश आरणे, ताई कसबे, मनिषा गायकवाड, ज्योती आरवेन, जया गांगुर्डे, गोरख मरळ, सुजित लाजुरकर, आशितोष शिंदे, मुन्ना खंडेलवाल, छाया जाधव, सुंदरा ओव्हाळ, उषा राजगुरू, सोनिया ओव्हाळ, पपीता सोनावणे, कविता गायकवाड, मनिषा ओव्हाळ, कर्वेताई, शब्बिर शेख, मनिषा शिंदे, छाया साळुंखे, अपर्णा तावरे, मनिषा शिंदे आदी सहभागी झाले होते. 

केंद्रीय निवडणूक आयोगाची NCP च्या शरद पवार गटाला नोटीस, राष्ट्रवादी काँग्रेस कुणाचा? यावर सुनावणी ?

मुंबई-नोटीसीद्वारे आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वातील बंडखोर गटाने गत 30 जून रोजी दाखल केलेल्या याचिकेवर आपली बाजू स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेत. या दोन्ही गटांनी आपलाच गट खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या नोटीसीद्वारे या गटांतील नेतृत्वाचे राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

मागील वर्षभरात महाराष्ट्रातील राजकारणात अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. अजित पवार यांनी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आदी ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या मदतीने राष्ट्रवादीत बंडखोरी केली. त्यानंतर त्यांनी थेट शिंदे – फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीवरही दावा सांगितला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला नोटीस बजावली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला नोटीस बजावली आहे. या नोटीसीद्वारे अजित पवार यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आपली भूमिका स्पष्ट करण्याची सूचना करण्यात आली आहे.अजित पवार यांनी 30 जून रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक याचिका दाखल केली होती. या याचिकेद्वारे त्यांनी आपणच पक्षाचे प्रमुख आहोत, त्यामुळे पक्षाचे नाव व चिन्ह आपल्याला देण्यात यावे, अशी मागणी केली होती. अजित पवार यांच्या या याचिकेवर आता शरद पवार गटाला आपली भूमिका स्पष्ट करावी लागले. यासाठी शरद पवार गटाला काही अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कुणाचा? यावर औपचारिक सुनावणी सुरू होईल.

सफाई कामगारांच्या आरोग्यविषयक समस्यांकडे गंभीर्याने पाहावे; तात्काळ बैठक घेण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश.

महापालिकेतील अधिकाऱ्यांची बदली होत नसल्याने कामगार सुविधेपासून वंचित राहतात.

मुंबई दि.२६: बृहन्मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांची दोन वेळा आरोग्याची चाचणी करून उपचार केले जातात मात्र त्यांना दिले जाणारे मास्क, मोजे हे फाटके असतात. ते किती वेळा दिले जातात, त्याचा दर्जा काय आहे हे बघण्याची जबाबदारी त्या संबंधित अधिकाऱ्यांची आहे. मात्र सातत्याने हा गोंधळ होत असून त्याच कारण म्हणजे या अधिकाऱ्यांच्या बदल्या न होणे हे आहे. यासंदर्भात तात्काळ बैठक घेण्याचे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये सदस्य श्री. विजय ऊर्फ भाई गिरकर यांनी बृहन्मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांच्या आरोग्यविषयक सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

या विषयाकडे गंभीरपणे पाहण्याची गरज असून या अधिकाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. मॅनहोल मध्ये जाऊन लोक दगावत आहेत तरीही त्याच्यावर उपाययोजना होत नसल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण विषयाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत आपण ज्यावेळी बैठक घेणार आहात त्यावेळी यापूर्वी याबाबत झालेल्या बैठकीतील मुद्दे विचारात घ्यावेत असे डॉ गोऱ्हे यांनी मंत्रीमहोदय श्री. उदय सामंत यांना सांगितले.

यावर मंत्रीमहोदय श्री. उदय सामंत म्हणाले की, सफाई कामगार हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. याविषयाबाबत तातडीने पूर्व तयारीचीबैठक घेतली जाईल आणि यापूर्वी झालेल्या बैठकीचे मुद्दे देखील विचारात घेतले जातील असे सांगितले.

 टोल वसूल करणारा म्हैसकर हा कोणाचा लाडका आहे?टोल मुक्त महाराष्ट्राचे झाले काय ? राज ठाकरे यांचे सवाल  

सगळीकडे ट्राफिक जाम , रस्ते खराब आणि टोल वसुली,पथ कर वसुली मात्र जोरात ..

मुंबई-गोवा रस्ता बावायला १७ वर्षे लागतात ?

पुणे-टोलमुक्त महाराष्ट्र करायची घोषणा भारतीय जनता पक्षाने केली होती, त्याचे काय झाले‌? असा प्रश्न मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थिती केला आहे. अमित ठाकरे यांना टोल नाक्यावर थांबवल्यानंतर टोल नाक्याची तोडफोड करण्यात आली होती. यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी भाजप आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला.रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. असे असताना टोल कसले वसूल करता? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अमित ठाकरे राजकारणात आहेत, त्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप होत असल्याचे ते म्हणाले. टोल नाक्याच्या मुद्यावर राज ठाकरे पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसून आले. टोलेच पैसे नेमके कोणाला मिळतात. टोल वसूल करणारा म्हैसकर हा कोणाचा लाडका आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अजित पवार ही पहिली टीम

शरद पवार यांचे राजकारण मी अनेक वर्षांपासून पाहतोय. ही सर्व मिलीभगत आहे. अजित पवार म्हणजे पहिली टीम आहे. लवकरच दुसरी टीम देखील सत्तेत सहभागी होईल, ते सर्व एकत्र असल्याचे देखील राज ठाकरे म्हणाले. अजित पवार आणि शरद पवार यांची सर्व मिलीभगत असल्याचे देखील राज ठाकरे यांनी सांगितले. अजित पवार यांना जेलमध्ये टाकणारे आज त्यांच्यासोबत एकत्र असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला.राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आणि भाजप यांच्यात युती होणार का? या प्रश्नाला त्यांनी फेटाळून लावले. कोणी कोणाला भेटले तर लगेचच त्यांच्यात युती होत नाही. असे म्हणत त्यांनी आगामी निवडणुकीत युतीच्या शक्यता फेटाळल्या आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे मनसेच्या विभाग अध्यक्षांची बैठक घेणार आहेत. ते पक्षाची पुर्नबांधणी करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

खासगी सावकाराचा पैशासाठी पतीपुढेच पत्नीवर बलात्कार, पुण्यातील खळबळजनक घटना; आरोपीला बेड्या

पुणे-हातऊसणे घेतलेले पैसे परत न केल्यामुळे खासगी सावकाराने एका व्यक्तीच्या पत्नीवर त्याच्यापुढेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. हा सावकार एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने या घटनेचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावरही व्हायरल केला. या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.पुण्याच्या हडपसर भागात गत फेब्रुवारी महिन्यात ही घटना घडली. पण ती 34 वर्षीय पीडित विवाहितेच्या तक्रारीनंतर आज उजेडात आली. तिच्या फिर्यादीनुसार आरोपी इम्तियाज हसीन शेख (47) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीला आरोपीने उसने पैसे दिले होते. काही कारणामुळे पीडित दाम्पत्याला हे पैसे परत करता आले नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादी व तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत हडपसर येथील म्हाडा कॉलनीत बोलावून घेतले. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या पतीला समोर बसवून त्याने चाकूचा धाक दाखवत पीडितेवर बलात्कार केला. यावेळी त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.

आरोपीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर त्याने तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडे शरीर सूख देण्याची मागणी केली. पण महिलेने त्यास नकार दिल्यामुळे अखेर त्याने तो व्हिडिओ व्हायरल केला. यामुळे महिलेने थेट हडपसर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी इम्तियाज हसीन शेखच्या मुसक्या आवळल्या.

लोकसभा अध्यक्षांनी अविश्वास स्वीकारला , म्हणाले- सर्व पक्षांशी चर्चा करून मणिपूरवर चर्चेची वेळ ठरवू

बुधवारी लोकसभेत काँग्रेसने सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तो स्वीकारला आहे. काँग्रेसला मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा हवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यावर सभागृहात उत्तर द्यावे, असे पक्षाचे म्हणणे आहे. सर्व पक्षांशी चर्चा करून चर्चेची वेळ ठरवली जाईल, असे सभापतींनी सांगितले.

विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी करत पंतप्रधान मोदींनी सभागृहात उपस्थित रहावे, असे सांगितले. या गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

तत्पूर्वी, मणिपूरच्या मुद्द्यावरून लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ झाला आणि दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी अविश्वास ठराव मांडला.