भारताच्या फुटसाल संघाला ‘फेअर प्ले’चा पुरस्कार; आंतरराष्ट्रीय फेडरेशन फॉर कॅथलिक स्कूलकडून आयोजन
पुणे : भारतीय संघाला एफआयएसईसी-एफआयएसईपी गेम्समध्ये मुलींच्या व्हॉलिबॉलमध्ये रौप्यपदक मिळाले. त्याचबरोबर मुलांच्या फुटसाल संघाला ‘फेअर-प्ले’ संघाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आंतरराष्ट्रीय फेडरेशन फॉर कॅथलिक स्कूल (एफआयएसईसी) यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑलिम्पिक खेळाचे महत्त्व वाढावे, या दृष्टीने एफआयएसईसी काम करीत असते. त्यासाठी वर्षाला १५ ते १७ वयोगटातील मुला-मुलींसाठी शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यंदा ही स्पर्धा फ्रान्समधील डुंकिर्क येथे झाली. यात व्हॉलिबॉल, फुटसाल, बास्केटबॉल, हँडबॉल, टेबल टेनिस, ॲथलेटिक्स, जलतरणच्या स्पर्धा झाल्या. यात भारतीय संघ व्हॉलीबॉल आणि फुटसाल स्पर्धेत सहभागी झाला होता. मिलेनियम नॅशनल स्कूलच्या मुलींच्या संघाने या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले.
मुलींच्या व्हॉलिबॉलमध्ये भारतीय संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रियावर २५-२२, २५-२१, १५-२५, २५-१८ अशी मात केली होती. यात श्रीया गोथोस्कर, संस्कृती आपटे, नंदिनी भागवत, रिया एदलाबादकर यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. अंतिम फेरीत मात्र बेल्जियमने भारताला २५-२२, २५-२१, १५-२५, २५-१८ असे पराभूत केले. त्यामुळे भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अर्थात, ही कामगिरी देखील ऐतिहासिक ठरली. तत्पूर्वी, उपांत्यपूर्व फेरीत भारताने चिलीला नमविले होते. रौप्यपदक विजेत्या संघाचे मिलेनियम स्कूलचे संचालक अन्वित फाटक, अंचीता भोसले, प्राचार्या राधिका वैद्य, प्रा. सचिन घायवळ, क्रीडा प्रमुख रामदास लेकावळे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
भारतीय संघातील मुली – समृद्धी कोंढरे, तन्वी जोशी, वरद तिलय, श्रीया गोथोस्कर, संस्कृती आपटे, रिया एदलाबादकर, ओजस्वी बाचुटे, नंदिनी भागवत, स्वरा व्यवहारे, अनहिता मोकाशी, अनन्या गोसावी, ईरा ढेकणे. प्रशिक्षक – कुलदीप कोंडे. संघ व्यवस्थापक – मुग्धा भागवत, श्वेता आपटे.