Home Blog Page 1424

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 27 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करणारच. याप्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारांकित प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विधानसभेत दिली.  ज्या ट्विटर हॅंडलवरुन हा बदनामीकारक मजकूर प्रसारित झाला, त्याच्या चालकाची माहिती मिळण्यासंदर्भात ट्विटर इंडियाशी तीन वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. संबंधिताची माहिती मिळवून त्याला अटक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

सदस्य डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे आपल्या सर्वांचेच श्रद्धास्थान आहे. त्यामुळे अशा प्रकारची बदनामी कदापीही खपवून घेतली जाणार नाही. राज्य शासनाने याबाबत तत्काळ पावले उचलत असा मजकूर टाकणाऱ्या ट्विटर हॅंडल चालकाचा पत्ता मिळण्यासंदर्भात ट्विटरला पत्रव्यवहार केला आहे.

याबाबत सदस्य बाळासाहेब थोरात, नाना पटोले आदींनी प्रश्न विचारले.

लोकशाही मानसिकता निर्माण होण्याची गरज : प्रा. अविनाश कोल्हे

पुणे :

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने २७ जुलै २०२३ रोजी पुण्यात संविधान अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास वर्गामध्ये ‘ पहिली घटनादुरुस्ती(१९५१)’ या विषयावर राज्यशास्त्राचे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक प्रा.अविनाश कोल्हे मार्गदर्शन केले .हा अभ्यास वर्ग गुरुवार २७ जुलै २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता गांधी भवन,कोथरूड येथे पार पडला. हा चौथा ‘संविधान अभ्यासवर्ग ‘ होता.

दुर्गा शुक्रे यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले. सुदर्शन चखाले यांनी प्रास्ताविक केले. जांबुवंत मनोहर यांनी प्रा. कोल्हे यांचे स्वागत केले. संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.डॉ.कुमार सप्तर्षी, डॉ.उर्मिला सप्तर्षी, अन्वर राजन, अरुणा तिवारी, इत्यादी उपस्थित होते.

प्रा.अविनाश कोल्हे म्हणाले, ‘ जगातील ६० घटनांचा तौलनिक अभ्यास करून ही घटना तयार झाली. स्वातंत्र्यानंतर समानतेसाठी हे प्रयत्न होते.

समाजवादी समाजरचनेसाठी खासगी मालमत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार पहिल्या घटनादुरुस्तिने सरकारला मिळाला. जमीनदारांच्या जमिनी सरकारला ताब्यात घेता आल्या. मात्र, न्यायालयात आव्हान दिले गेले. त्यानंतर सरकारला घटनादुरुस्ती करावी लागली. त्यानंतर कोणत्या कारणासाठी घटना दुरुस्ती करावी, आणि किती वेळा करावी, यावर चर्चा सुरू झाली. आणि घटनेचे मूलभूत रचना बदलता येणार नाही, इथपर्यंत हा प्रवास आला आहे.हा लोकशाहीचा आणि प्रगल्भतेचा प्रवास आहे.तो सजगपणे सुरू राहावा, यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे.आपल्याकडे लोकशाही आहे पण, लोकशाही मानसिकता निर्माण झाली पाहिजे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा समावेश करणार- आरोग्य मंत्री तानाजी सावंत

मुंबई, दि. 27 : महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा समावेश करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली.

सदस्य दीपक चव्हाण यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत आजारांची संख्या वाढविण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. सावंत म्हणाले, राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सार्वत्रिक केली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रात 5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या योजनेअंतर्गत सध्या ९९६ आजारांचा समावेश असून त्याची संख्या १ हजार ३५६ केली जाणार आहे. तसेच या योजनेत समावेश करावयाच्या आजारांच्या निवडीसाठी एक विशेष समिती गठित करण्यात येईल असेही मंत्री श्री.सावंत यांनी सांगितले.

मोदींना टिळक पुरस्कार देणे म्हणजे ‘काँग्रेसने मोदीं- विरोधात देशभर उभारलेला लढ्याची थट्टा करणे होय -काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी

टिळक कुटुंब यास विरोध करणार कि नाही ?

मोदींना पुरस्कार हा लोकमान्यांच्या मुल्यांचा अवमान

स्वातंत्र्य संग्रामाची खिल्ली ऊडवणाऱ्यांना पुरस्कार… हा विरोधाभास दर्शवणारा यंदाचा टिळक पुरस्कार…!!

पुणे दिनांक २७
लोकशाही रुपी ‘स्वराज्याची सिंहगर्जना’ करणऱ्या व स्वातंत्र्य लढ्यात ‘केसरी वृत्तपत्र व पत्रकारीतेचे’ महत्व अधोरेखीत करणाऱ्या ‘टिळकांची लोकशाही प्रणीत भुमिका’ व ‘मोदींची हुकुमशाही प्रणीत वाटचाल’ हा परस्पर विरोघाभास असून, संविधानिक लोकशाही मुल्यांचा अवमान करणाऱ्या पंतप्रधन मोदींना टिळक पुरस्काराने सन्मानित करणे हा लोकमान्यांच्या (स्वातंत्र्य, स्वराज्य, निधर्मी राष्ट्रवाद व लोकशाही) मुल्यांचा अवमान असल्याची टिका प्रदेश काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.
ते म्हणाले,’ एकीकडे मोदी सरकार ‘स्वातंत्र्य भिकेत मिळाल्याची’ विधाने करणाऱ्यांना पदमश्री देऊन गौरव करते, सतत पाठीशी घालते, हीच मुळात टिळकांच्या स्वातंत्र्य _लढ्याच्या प्रेरणेची थट्टा आहे. टिळकांच्या ध्येयास लोकमान्यता होती, त्यांचे राष्ट्रभक्ति’चे कार्य लोकांप्रती समर्पित होते, म्हणुनच त्यांना लोकमान्य पदवी बहाल केली गेली.
काँग्रेसनेते लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेतून, महात्मा गांधींच्या नेतृत्वातील स्वातंत्र्याचा लढ़ा सलग पुढे चालवणारा हा काँग्रेस पक्षच आहे व त्यांचे नेते पं नेहरूं सह पटेल, मौलाना आझाद, बोस सह अनेकांनी त्याग, यातना व ब्रिटीशांकडुन वेळोवेळी कैदे’ची शिक्षा भोगली. मात्र स्वातंत्र्य सेनानी राहीलेल्या नेहरू – गांधी परीवाराची, काँग्रेस’च्या शहीद पंतप्रधानांची द्वेष व तिरस्कार भावनेने, मोदीजी वारंवार ऊपेक्षा करत आले आहेत.
देशाचे पंतप्रधानजनतेने निवडुन दिलेल्या पर्यायी पक्षांच्या खासदारांवर भ्रष्टाचाराचे व देशद्रोहाचे तथ्यहिन व बेजबाबदार आरोप करतात, त्यांचे प्रश्नांना कस्पटा समान समजतात अशा पंप्र मोदी जीं ना त्यांच्या ‘कोणत्या लोकशाही प्रणीत देश हिताच्या कार्या बद्दल’ हा पुरस्कार दिला जात आहे(?) हा खेदजनक सवाल देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.
भाजपा विरोधात देशभर काँग्रेस’सह २५ पक्ष मोदींच्या ‘दमनशाही व हुकुमशाही’ विरोधात निकराची लढाई देत आहेत. मोदींच्या मनमानी कारभारामुळे, ऊद्योगपती मित्रांकरवी होत असलेल्या राष्ट्रीय संपत्तीच्या व बँकांच्या लुटीप्रती ‘त्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे’ देशाचे अपरिमित नुक़सान होत आहें. जाचक करवाढीने, जीवनावश्यक वस्तुंवर जीएसटी रुपी जिझीया कर लावून, जनतेस जीवघेण्या महागाईच्या खाईत ढकलून सर्वसामान्य, शेतकरी व गरीब जनतेचे जगणे कठीण केले जात आहे.
अशा वादग्रस्त व आरोपग्रस्त मोदींना टिळक पुरस्कार देणे, हा ‘काँग्रेसने मोदीं- विरोधात देशभर उभारलेला लढ्याची थट्टा व उपहास’ आहे, अशी टिका देखील प्रदेश काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.
आज देशात व राज्यात काँग्रेसजन ‘मोदींच्या अपयशाच्या विरोधात, चुकीच्या व देश-विधातक गैरकारभाराच्या विरोधात’ जिल्हा, तालुका ते गाव पातळीवर काँग्रेस चा कार्यकर्ता रस्त्यावर येऊन संघर्ष करीत आहे. काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांना जाणीव पुर्वक अडचणीत आणण्याची कट कारस्थाने मोदी-शहां कडुन वारंवार होत आहे, मात्र याचा यत्किंचित ही विचार डॅा रोहित टिळक परिवार व ‘बहु काँग्रेसजन’ असलेल्या ट्रस्टींनी’ केला नाही, ही काँग्रेसजनां करीता वेदनादायक बाब आहे, अशी पुस्ती ही त्यांनी जोडली.
लोकमान्य टिळकांनी “ब्रिटीश हुकमशाही व गुलामगिरी विरोधात, ‘स्वराज्य माझा जन्म सिध्द अधिकार’ असल्याची सिंहगर्जना केली. पत्रकारीतेचा धर्म स्विकारुन दै केसरी’चे माध्यमातुन इंग्रजांचे विरोधात, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातु भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ऊभी केली. मात्र त्यावेळी मोदींच्या विचारधारेचे पुर्वज मात्र प्रत्यक्षात कुठे होते(?) असा ही प्रश्न त्यांनी केला..!
राज्य सरकारें पाडापाडी करीत, विरोधी पक्षांच्या आमदारांची फोडापोडी करीत संविधानिक लोकशाहीची कुचेष्टा करण्याचे कार्य सत्ताधीश भाजप नेतृत्वा कडून सातत्याने होत आहे अशी टिका देखील काँग्रेस ने केली.
गेल्या ७० वर्षात, “सर्वोच्च न्यायालयाने संविधानिक कर्तव्यां विषयी, राजधर्मा विंषयी ताशेरे मारलेल्या सरकारचे प्रमुख” म्हणुन मोदीजी हे ‘एकमेव टिळक पुरस्कारार्थी’ आहेत.. हे यादी पाहून स्पष्ट होते अशी पुस्ती ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी जोडली.

खडकवासला धरण १०० टक्के भरले

पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वरसगाव, पानशेत,टेमघर आणि खडकवासला या चारही धरणात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण साठ्यात झपाट्याने वाढ असून सद्यस्थितीला खडकवासला धरण साखळीत गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७०.०६ टक्के,तर २०.४२ टीएमसी इतका पाणी साठा जमा झाला आहे.

तर चार धरणापैकी खडकवासला धरण हे १०० टक्के भरले आहे. तर गतवर्षी आजच्या तारखेला ७३.१८ टक्के,तर २१.३३ टीएमसी इतका पाणी साठा जमा होता.

धरणटीएमसीटक्के
खडकवासला१.९७१००
पानशेत७.९३७४.४९
वरसगाव८.६५६७.४६
टेमघर१.८७५०.३९

आचार्य अत्रे यांच्या जन्मशताब्दीत्तोतर रौप्य महोत्सवी वर्षपुणे महानगरपालिकेने साजरे करावे .

पुणे-साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या जन्मशताब्दीतोत्तर जन्म रौप्य महोत्सवी वर्ष यंदा १३ ऑगस्ट रोजी सुरु होत आहे.त्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन पुणे महानगरपालिकेच्या वतीने करावे अशी विनंती संवादचे सुनील महाजन आणि समर्थ युवा फौंडेशनचे राजेश पांडे यांनी आज पुणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन केली.
या संदर्भात त्यांनी सांगितले की आचार्य अत्रे १९३८ ते १९४१ या काळात पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते तसेच स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.पुण्यात विविध शाळांमध्ये शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पडली. नाटक,चित्रपट ,साहित्य ,शैक्षणिक,पत्रकार,वक्ते म्हणून असा बहुअंगी त्यांचा वावर होता. संवाद आणि समर्थ युवा फौंडेशन तर्फे संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. पुणे महानगरपालिकेने देखील या संदर्भात विविध उपक्रम राबवावे अशी विनंती त्यांनी आयुक्तांना केली.
पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत आचार्य अत्रे यांचे तैल चित्र लावावे ,कसबा पेठेतील निवासस्थानी नील फलक लावावा ,सावरकर भवन येथील आचार्य अत्रे यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करावे, आचार्य अत्रे यांची नाटके व चित्रपटांचा महोत्सव साजरा करावा आणि आचार्य अत्रे यांचे उचित स्मारक उभारावे अशा विविध मागण्या त्यांनी आयुक्तांकडे केल्या.

कामावरून काढून देण्याची धमकी देत बँक अधिकाऱ्याने केला महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग

पुणे-

उशिरा पर्यंत थांबवून कामावरून काढून देण्याची धमकी देत अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग केल्याचा लष्कर भागातील एका नामांकित बँकेत घडला आहे. याप्रकरणी एका 38 वर्षीय महिलेने लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बुद्धभूषण गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जानेवारी 2023 ते 7 जून 2023 दरम्यान लष्कर भागातील अतुर चेंबूर येथील बँक ऑफ बडोदा येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, बुद्धभूषण गायकवाड हे बँक ऑफ बडोदा शाखा लष्कर क्रेडिट कार्ड विभागात आहेत. ते या विभागातील कर्मचारी महिलांना उशिरा पर्यंत थांबवून ठेवत आणि कामावरून काढून टाकण्याची धमकी देत होते. तसेच फिर्यादी यांना शिवीगाळ करून प्रमोशन हवे असेल तर अधिकाऱ्यांशी संबंध ठवावे लागतील असे म्हणाले. फिर्यादी यांच्या बरोबर असणाऱ्या दुसऱ्या महिला कर्मचाऱ्यांना सुद्धा अश्लील भाषेत बोलत असल्याचे सांगितले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गायकवाड करत आहेत.

साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता एका क्लिकद्वारे जमा

महाराष्ट्रातील ८५ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना लाभ

मुंबई, दि. २७ :- राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे असे एकूण १८ हजार कोटी रुपये थेट जमा केले. तसेच देशातील सव्वा लाख ‘पी एम किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण केले. ही केंद्र शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त करतील, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याचा महाराष्ट्रातील ८५ लाख ६६ हजार पात्र शेतकऱ्यांना लाभ होणार असून सुमारे १ हजार ८६६ कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सीकर (राजस्थान) येथे आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याचे वितरण आणि सव्वा लाख पीएम किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कृषिमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांच्यासह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील शेतकरी दूरदृश्यप्रणालीद्वारे या कार्यक्रमास उपस्थित होते.

शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे लागत होते. आता बियाण्यांपासून शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि योजनांची माहिती एकाच ठिकाणी या समृद्धी केंद्रांमध्ये उपलब्ध होईल. शेतकऱ्यांसाठी हे समृद्धी केंद्र ‘वन स्टॉप सेंटर’ सारखे काम करेल. तसेच वर्षाअखेरीस देशात अशी पावणे दोन लाख केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचेही प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले.

केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव आहे. म्हणूनच शासनाने ९ वर्षात शेतक-यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतलेत. बियाण्यांपासून बाजारपेठपर्यंत नवीन व्यवस्था निर्माण केली. पीएम किसान योजनेत आतापर्यंत २ लाख ६० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थेट जमा करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभ देणारी ही जगातील एकमेव योजना आहे. सोबतच युरियाच्या किमतीसुद्धा शासनाने कमी केल्या आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदानही देण्यात येते. भारताताच्या तुलनेत इतर विकसनशील देशात युरियाचे दर चौपट आहेत तर विकसित देशात ते १० ते १२ पट आहेत. शेतकऱ्यांसाठी सल्फर कोटेट युरिया गोल्ड तयार केले आहे. पिकांसाठी आवश्यक असणारे सल्फर युरियासोबतच पिकांना मिळेल आणि त्यामुळे पिकांची चांगली वाढ होऊन उत्पादनात वाढ होईल, असा विश्वासही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

देशातील पौष्टिक तृणधान्य आता जगातील मोठ्या बाजारपेठेत पाठविण्यात येत आहेत. ‘श्री अन्न’ म्हणून त्याला विकसित देशातही मागणी आहे. देशात पौष्टिक तृणधान्याचे उत्पादन, त्यावर प्रक्रिया आणि त्याची निर्यात या सर्वच बाबीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा लाभ देशातील लहान शेतकऱ्यांना होतोय, असेही प्रधानमंत्री मोदी म्हणाले.

राज्यातील ८५.६६ लाख शेतकऱ्यांना लाभ; १ हजार ८६६ कोटी रुपये होणार जमा

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याचे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले असून राज्यातील ८५.६६ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे, त्या लाभापोटी सुमारे १ हजार ८६६ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना ही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करणारी ऐतिहासिक योजना असून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचे ६ हजार व राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे ६ हजार असे वर्षाला एकूण १२ हजार शेतकऱ्याला मिळणार आहेत. शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या योजनेचा शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी कृषी विभाग काम करत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

आश्रम शाळांमध्ये कला उपक्रमांना प्राधान्य देणार- नयना गुंडे

पुणे -आदिवासी मुलांचा स्वाभिमान, आत्मसन्मान आणि क्षमतांची जाणीव करून देणाऱ्या कला उपक्रमांचे आश्रम शाळांमध्ये आयोजन करण्यास प्राधान्य देणार असल्याची माहिती, आदिवासी विकास विभागाच्या राज्याच्या आयुक्त नयना गुंडे यांनी दिली.

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘आर्ट इंडिया फाउंडेशन’च्या वतीने ‘खुला आसमान’ या उपक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत २० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

गुंडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या मार्गदर्शन करीत होत्या. विभागाच्या सहायक आयुक्त हेमलता गव्हाणे, आर्ट इंडियाच्या विश्वस्त डॉ. प्राची साठे, चित्रा वैद्य, वनवासी कल्याण आश्रमाचे सुहास पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.

गुंडे म्हणाल्या, ‘आश्रम शाळेतील कला, संगणक आदी विषयांच्या शिक्षकांचे काही प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहोत. आश्रम शाळांमध्ये करिअर मार्गदर्शन सारखे उपक्रम लवकरच सुरू केले जातील.’

गुंडे पुढे म्हणाल्या, ‘मुलांच्या मुक्त अभिव्यक्तीला वाव देणारे ‘खुला आसमान’ सारखे कला उपक्रम महत्वाचे आहेत. त्यातून आत्मसन्मान आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. या उपक्रमाची व्याप्ती मोठी आहे. आश्रम शाळांतील मुलांच्या सृजनशीलता आणि कल्पकतेला वाव देण्यासाठी कला शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी आर्ट इंडियाचे संस्थापक मिलिंद साठे यांचे योगदान महत्त्वाचे आहे.’

चौकट

आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन

विद्यार्थ्यांनी काढलेल्या निवडक चित्रांचे प्रदर्शन घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात सुरू झाले आहे. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारी चित्रे प्रदर्शनात पाहायला मिळतील. 29 जुलैपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

नवले ब्रीज ते कात्रज चौकापर्यंतच्या खोदकामात भूमिगत वीजवाहिन्या तोडण्याचे प्रकार सुरूच

महावितरणसह हजारो वीजग्राहकांना नाहक मनस्ताप

पुणे, दि. २७ जुलै २०२३:राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणाच्या वतीने नवले ब्रिज ते कात्रज चौक दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गाच्या आजूबाजूला असलेली महावितरणची वीजयंत्रणा स्थलांतरीत करण्याचे काम मात्र ऑक्टोबर २०२२ पासून रखडलेले आहे. तर दुसऱ्या बाजूला प्राधीकरणासह महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड व इतर यंत्रणांकडून विविध कामांसाठी जेसीबीद्वारे खोदकाम करण्यात येत आहे. यामध्ये महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या सर्रास तोडण्यात येत असल्याने वीजग्राहकांसह महावितरणला खंडित वीजपुरवठ्याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे तसेच दोहोंचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

दरम्यान, खोदकामात दिवसा किंवा रात्रीच्या सुमारास भूमिगत वीजवाहिन्या तोडण्याचे प्रकार सतत सुरु असल्याने कात्रज, आंबेगाव, संतोषनगर, दत्तनगर, जांभूळवाडी, गुजरवाडी, मांगडेवाडी, भारती विद्यापीठाच्या परिसरातील सुमारे ४५ ते ५० हजार वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे.

गेल्या पंधरवड्यात ‘एमएनजीएल’ व इतर यंत्रणेच्या खोदकामात जेसीबीद्वारे तब्बल १४ ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आल्या. २२ केव्ही क्षमतेची एक वीजवाहिनी तोडल्यामुळे हजारो ग्राहकांचा वीजपुरवठा एकाचवेळी खंडित होतो. त्यामुळे महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांना सातत्याने युद्धपातळीवर काम करावे लागत आहे. ‘एमएनजीएल’च्या खोदकामात गेल्या १५ दिवसांत ८ ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आल्या. त्यामुळे ४० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. या वाहिन्या पुन्हा जोडण्यासाठी महावितरणला सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागला. तसेच खंडित वीजपुरवठ्यामुळे १२ लाख युनिटचे म्हणजे सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचे नुकसाना झाले. याप्रकरणी कात्रज पोलीस ठाण्यात महावितरणकडून फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.   

राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणाकडून (नॅशनल हायवेज अॅथोरिटी ऑफ इंडिया) रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. हे काम सुरु होण्यापूर्वी महावितरणकडून रस्त्यालगतच्या भूमिगत वीजवाहिन्या व संबंधित यंत्रणा स्थलांतरीत करण्याबाबत अंदाजपत्रक मंजूर करून देण्यात आले आहे. वीजयंत्रणा स्थलांतरीत करण्याच्या कामाची जबाबदारी प्राधीकरणावर आहे. मात्र हे काम ऑक्टोबर २०२२ पासून रखडलेले आहे. विशेष म्हणजे वीजयंत्रणा स्थलांतरीत न करता रस्ता रूंदीकरणाचे काम करण्यात आल्याने महावितरणच्या रोड क्रॉस २२ केव्ही क्षमतेच्या सहा उच्चदाब वीजवाहिन्या १५ ते २० फूट खोल दबल्या गेल्या आहेत. या वाहिन्यांमध्ये काही बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती करणे अत्यंत खडतर आहे व त्यासाठी मोठा वेळ लागणार आहे.  

महावितरणकडून वीजयंत्रणा वेगाने स्थलांतरीत करण्यासाठी प्राधीकरणाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र या कामास अद्याप गती आलेली नाही. तोडलेल्या वीजवाहिन्यांमुळे पर्यायी व्यवस्थेतून त्वरीत वीजपुरवठा सुरू करणे. वीजवाहिन्यांची दुरुस्ती करणे यासाठी महावितरणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस धावपळ करावी लागत आहे. यासोबतच वीजग्राहकांचा नाहक रोष सहन तसेच दुरुस्तीचा आर्थिक भार, वीजविक्रीचे नुकसान महावितरणला सहन करावे लागत आहे.

कला केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करणे आवश्यक – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई :- राज्यातील कला केंद्रामध्ये मागील काही दिवसात अल्पवयीन मुली सापडल्या आहेत. त्यामुळे कला केंद्रांना मान्यता देण्यासंदर्भात कठोर नियमावली तयार करण्याची गरज आहे. तसेच कला केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी  जिल्हास्तरीय समिती गठित करण्यासाठी मसुदा तयार करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

कला केंद्रामध्ये अल्पवयीन मुली सापडल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे पुनर्वसन, उपाययोजना आणि अपहरणातील अल्पवयीन मुली व महिलांचा शोध यासंदर्भात आज उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी विधानभवनातून पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, औरंगाबादचे (छत्रपती संभाजीनगर) विभागीय उपायुक्त संजय सक्सेना,  नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी शेखर पाटील, औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानदेव चव्हाण, अहमदनगर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, परभणीच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर, नाशिकचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, नंदुरबार, बीड, पुणे, सातारा, परभणी, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आदी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, राज्यात कला केंद्रामध्ये अल्पवयीन मुली सापडणे ही अतिशय गंभीर बाब आहे. या मुलींची सुटका आणि त्यानंतर त्यांचे शिक्षण होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर  अशा कला केंद्रांना मान्यता देताना आणि ते चालविण्यासाठी धोरणात्मक बदल करण्यासाठी शासनाला एक मसुदा सादर करण्यात येईल. त्यासाठी पोलीस विभागाने मसुदा तयार करावा. त्यात अशा कला केंद्रांच्या नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर एक समिती गठित करण्याच्या सूचना शासनाला देण्यात यतील. या समितीमध्ये तहसीलदार, जिल्हा कामगार अधिकारी, पोलीस अधिकारी आणि मानव तस्करीवर काम करणाऱ्या सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी यांचा या समितीमध्ये समावेश करण्यासंदर्भात शासनाला मसुदा देण्यात येईल. तसेच अपहरण झालेल्या अल्पवयीन मुली व महिला सापडल्यानंतर त्या पुन्हा वाईट मार्गाला लागणार नाहीत यासाठी एक निश्चित कार्यक्रम आखणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण आणि सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी निश्चित करुन  देण्याची गरजही त्यांनी यावेळी प्रतिपादित केली.

पुण्यात दक्षिण कमांडने साजरा केला 24 वा कारगिल विजय दिवस

पुणे, 26 जुलै 2023

पुण्यातील दक्षिण कमांड युद्ध स्मारक येथे 26 जुलै 2023 रोजी आयोजित समारंभात कारगिल विजय दिवस मोठ्या अभिमानाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला पुण्यातील लष्करी जवान तसेच दक्षिण विभाग परिसरातील माजी सैनिक उपस्थित होते. या सोहळ्यात कारगिल युद्धातील शूरवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दक्षिण कमांड मुख्यालयाचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल ए. के. सिंग यांनी स्मारकात वीर जवानांना पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले.
ऑपरेशन विजयच्या यशानंतर आजच्या दिवसाला कारगिल विजय दिवस असे नाव देण्यात आले आहे., पाकिस्तानी सैनिकांनी कडक हिवाळ्यात विश्वासघातकीपणे ताब्यात घेतलेल्या अति उंच ठिकाणच्या चौक्यांचा ताबा, भारतीय सशस्त्र दलांनी आजच्याच दिवशी यशस्वीरीत्या परत मिळवला होता. कारगिल युद्ध 60 दिवसांपेक्षा जास्त काळ लढले गेले. भारतीय सैनिकांनी असीम शौर्याचे प्रदर्शन करुन 26 जुलै 1999 रोजी या युद्धात विजय मिळवला होता.
हा दिवस आपल्याला जम्मू आणि काश्मीर राज्याच्या बर्फाळ प्रदेशात अति उंचीवर पाकिस्तानशी कारगिलची लढाई लढणाऱ्या आपल्या सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. त्या भव्य विजयाचा हा चोवीसावा वर्धापन दिन आहे.

मणिपूरच्या भीषण ‘नग्न ‘ सत्याच्या विरोधात आप चा आक्रोश मार्च

पुणे: ‘ मणिपूर भारतात आहे की नाही, असा प्रश्न मागील अनेक दिवसापासून देशवासीयांना पडला आहे. दोन स्त्रियांना विवस्त्र करून धिंड काढून त्यांच्या देहाची विटंबना केली गेली. सामूहिक बलात्कार केला गेला. मानवतेला काळिमा फासणारी आणि क्रौर्याची परिसीमा गाठणारी मे महिन्यातील ही घटना उशिरा व्हिडीओ मार्गे उघड झाली असली, तरीही आपल्या देशातील भाजपा सत्ताधारी आपल्या गुर्मीत आणि मुद्द्याला बगल देणारी भडकाऊ विधाने करण्यात मग्न आहेत.’ असा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूर जळत आहे, परंतु केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार उलट आगीत तेल टाकण्याचे काम करीत असल्याने जनतेत तीव्र संताप आहे.

भारतीयांना शरमेने मान खाली घालावी अशी परिस्थिती निर्माण करणाऱ्या , शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलेल्या मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करीत आम आदमी पार्टी तर्फे आक्रोश कँडल मार्च काढण्यात आला.

मंगळवारी संध्याकाळी १५ऑगस्ट चौक, कँटोन्मेंट ते डॉ आंबेडकर पुतळा असा महात्मा गांधी रोड मार्गे हा आक्रोश कँडल मार्च काढण्यात आला. त्यास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने महिला व मणिपुरी लोक यात सामील झाले होते. यावेळी कार्यकर्त्यानी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

कोळसा खाण घोटाळा:विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा

कोळसा खाण घोटाळा प्रकरणात आज सीबीआय विशेष कोर्टाने राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांच्यासह इतर आरोपींना शिक्षा सुनावली. आज सुनावण्यात आलेल्या शिक्षेनंतर विजय दर्डा यांची राजकीय वाटचाला खडतर झाली आहे. विजय दर्डा यांना कोर्टाने चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे आता दर्डांना 6 वर्ष निवडणूक लढवता येणार नाही. दर्डा यांनी कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिल्यास आणि कोर्टाने या निकालावर स्थगिती दिल्यास त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. कोळसा खाण घोटाळा प्रकरणात सीबीआय विशेष कोर्टाने काही दिवसांपूर्वीच दोषी ठरवले होते. त्यानंतर आज दोषींना शिक्षा सुनावण्यात आली. राज्यसभेचे माजी खासदार असलेले विजय दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्याशिवाय, 15 लाखांचा दंडही ठोठावला आहे. तर, विजय दर्डा यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा आणि 15 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक मनोजकुमार जयस्वाल यांनादेखील कोर्टाने चार वर्षांची शिक्षा आणि 15 लाखांचा दंड ठोठावला आहे. जेएलडी कंपनी ही दर्डा यांच्याशी संबंधित आहे. त्याशिवाय, कोळसा खात्याचे माजी सचिव एच.सी. गुप्ता यांना तीन वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.तत्कालीन मनमोहन सिंग सरकारला हादरवून सोडणाऱ्या कोळसा घोटाळा प्रकरणात न्यायालयाने 13 जुलै रोजी सात आरोपींना भादंवि कलम 120-ब (गुन्हेगारी कट) आणि भादंवि 420 (फसवणूक) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार दोषी ठरवले होते.सीबीआयने कोर्टात दोषींना अधिकाधिक शिक्षा सुनावण्याची मागणी केली होती. तर, गेल्या नऊ वर्षात आम्ही देखील अनेक वेदना भोगल्या आहेत, त्यामुळे आमची शिक्षा कमी करण्यात यावी असा युक्तिवाद दर्डाच्या वतीने करण्यात आला होता.
विजय दर्डा काँग्रेसकडून राज्यसभेवर खासदार होते. गेल्या पाच दशकांपासून दर्डा कुटुंब राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात सक्रिय आहे. विजय दर्डा हे 1998 ते 2016 या कालावधीत काँग्रेसकडून राज्यसभेचे खासदार होते. 2016 नंतर विजय दर्डा राजकीय वर्तुळात फारसे सक्रिय नसले तरी समाजकारणात विविध उपक्रमांच्या माध्यमातून सक्रिय आहेत. आता, कोर्टाने त्यांना चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याने लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, त्यांना सहा वर्ष कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही.

छत्तीसगडच्या कोळसा घोटाळ्यात अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. या प्रकरणात अनेक बडे अधिकारी आणि राजकारण्याशी संबंध असलेले अनेक जण रायपूर तुरुंगात कैद आहेत. यात आयएएस अधिकारी समीर बिश्नोई, सौम्या चौरसिया, मुख्यमंत्र्यांचे उपसचिव, सूर्यकांत तिवारी, कोळसा घोटाळ्यात सिंडिकेट म्हणून काम करणारे सुनील अग्रवाल यांचा समावेश आहे.

पूरस्थितीत पाणीप्रवाह सुरु राहण्यासाठी नदी, नाल्यांमधील अतिक्रमण काढावे

मुंबई, दि २६ :- अतिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांचा जीव वाचविणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे हे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी नियमाचा बाऊ न करता, वेळ पडली तर प्रसंगी, ‘आऊट ऑफ वे’ जाऊन हे काम करावे लागले तर त्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घ्यावा. जनहिताच्या प्रत्येक कार्यात शासन तुमच्यासोबत आहे. आपत्ती निवारण, पुरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यस्तरीय विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत दिली. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पूर परिस्थितीबाबत सतर्क राहून काम करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

राज्यातील अतिवृष्टी, पुरस्थिती व अवर्षण परिस्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यानी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडुन दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकऱ्यांना सूचना दिल्या. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव , वित्त विभागाचे अपर मुख्य मुख्य सचिव नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, आपत्ती नियंत्रण कक्षाचे संचालक आप्पासो धुळाज, आपत्ती नियंत्रण कक्षाचे उपसचिव डॉ. श्रीनिवास कोतवाल आमदार संजय कुटे उपस्थित होते.
पूरामुळे ज्या गावात घरात, रस्त्यावर गाळ साचला असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी ‘राज्य आपत्ती प्रतिसाद मदत निधी’ तसेच जिल्हा परिषदेतील निधीचा उपयोग करावा. प्रत्येक जिल्ह्याला दिलेला ३० लक्ष रुपयांचा आगाऊ निधी वापरावा. निधी कमी पडल्यास तातडीने निधीची मागणी करण्याची सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, राज्यात अनेक भागात नदी, नाले, ओढ्यात अतिक्रमण झाले आहे. नदी, नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह अडल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते. अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी नदी, नाल्यातील अतिक्रमण काढण्याचे काम प्राधान्याने व कठोर भूमिका घेऊन पार पडावे. नदी, नाल्यातील गाळ काढण्याचे काम कंत्राटदारांची यंत्रसामुग्री वापरून प्रशासनाने डिझेलची व्यवस्था करावी. १५ सप्टेंबरपर्यंत ही मोहीम पूर्ण करावी. तसेच गाळ काढल्यानंतर तो पुन्हा नदी, नाल्यात जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

दरडप्रवण भागात ईरशाळवाडी, तळीये सारख्या घटना घडू नयेत यासाठी अशा डोंगरी-दुर्गम भागातील दरडप्रवण आदिवासी तांडे, पाडे यांचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अशा धोकादायक गावांची माहिती सर्वेक्षणाद्वारे एकत्रित करावी. पुनर्वसन करण्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था, गावकऱ्यांची उपजिविका या सर्व बाबींचा विचार करून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना सुध्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.

पूर परिस्थितीवेळी धोकादायक परिस्थिती असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. पुरस्थितीमूळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तातडीने द्यावी. शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत. ज्या ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या असतील त्या ठिकाणी देखिल पंचनामे त्वरित सुरु करावेत. खरडून गेलेल्या जमिनी पुन्हा वहितीयोग्य करण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा आराखडा तयार करावा, बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप तातडीने त्याच दिवशी होईल याकरीता प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानांना पुरेसा धान्याचा पुरवठा करावा. ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते त्यांना तातडीने सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी. रोगराई पसरु नये याकरीता स्वच्छता करणे, औषध फवारणी करणे यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात. ज्या ठिकाणी पाणी दुषीत झाले आहे, त्याठिकाणी स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यकतेनुसार विहिरी अधिग्रहित कराव्यात. गरज असेल त्या ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. ज्याठिकाणी अतिवृष्टीमुळे रस्त्यांची हानी झाल्याने गावांचा संपर्क तुटलेला आहे, अशा रस्त्यांची बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी. पुरामूळे ज्या शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य खराब झाले आहे त्यांना शिक्षण विभागाने शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन द्यावे, आदी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना दिल्या.

यावेळी सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.