कोलकाता- ढोल-ताशांमुळे होणारा त्रास नियंत्रित करण्याचे आदेश कलकत्ता हायकोर्टाने पश्चिम बंगाल पोलिस आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. मुख्य न्यायाधीश टी. एस. शिवगणनम आणि न्या. हिरण्मय भट्टाचार्य यांचे खंडपीठ म्हणाले, राज्य सरकारने घटनेच्या कलम २५(१) अंतर्गत धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कलम १९(१)(ए) अंतर्गत जीवनाच्या अधिकारासोबत संतुलित केला पाहिजे. कोर्टाने तोंडी सांगितले की, जे पसंत नाही किंवा ज्याची आवश्यकता नाही, असे काहीतरी ऐकण्यासाठी नागरिकास बाध्य केले जाऊ नये. पोलिसांनी ढोल आणि ताशे वाजवण्याची वेळ निश्चित करून त्याची सार्वजनिक सूचना द्यावी. ही वेळ सकाळी ८ वाजेपूर्वीची नसली पाहिजे. साधारणत: सकाळी २ तास आणि सायंकाळी २ तासांची परवानगी दिली जाते. सायंकाळी ७ वाजेनंतर असे होऊ नये, असे कोर्ट म्हणाले.
पुण्यातील बांगलादेशी घुसखोरांवर तातडीने कारवाई करावी-धीरज घाटे
पुणे -: पुणे शहरात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.पुणे पोलिसांनी गेल्या आठवड्यात कोथरूड येथून दोन दहशतवादी पकडले आहेत.ह्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आज पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात गेल्या काही दिवसात पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर अवैध रित्या पुण्यात वास्तव्यास असल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.हे घुसखोर पुणे शहराच्या विविध भागात वास्तव्य करत असल्याने पुणे पोलिसांनी तातडीने या बाबत कारवाई करून त्यांची पूर्ण माहिती घ्यावी तसेच बेकायदेशीर रित्या पुण्यात राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करावी अशी मागणी शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केली.
पुढील काही दिवसात मोठ्या प्रमाणावर सणवार सुरू होत असल्याने शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही माहिती खूप धक्कादायक आहे त्यामुळे ह्या बाबत तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.या प्रसंगी शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या समवेत प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ,प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर,माजी आमदार योगेश टिळेकर,माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले,माजी नगरसेवक सुशील मेंगडे, दीपक पोटे, अजय खेडेकर,राजेंद्र शिळीमकर धनराज घोगरे,बापू मानकर विकास लवटे आदी उपस्थित होते
आयटीआयच्या विद्यार्थ्यांना ५०० रूपये विद्यावेतन सप्टेंबर पर्यंत सुरु करणार- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. २७ : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी करिअरविषयक हेल्पलाईन लवकरच सुरू करणार आहोत, तसेच सर्व अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अल्पसंख्याक, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील प्रशिक्षणार्थी यांना ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखाच्या मर्यादेत आहे. त्यांना ५०० रूपये विद्यावेतन सप्टेंबर २०२३ पर्यंत सुरू करणार असल्याचे उत्तर कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानपरिषदेत दिले.
राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना करिअर विषयक संधीची माहिती देण्याकरिता कायमस्वरूपी हेल्पलाईन व ईमेल सुरू करण्याबाबत विधानपरिषद सदस्य उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना मंगल प्रभात लोढा बोलत होते.
कौशल्यविकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर मेळावे राज्यात २८८ मतदारसंघातील २६० ठिकाणी शिबीर पार पडले. यामध्ये १ लाख ७४ हजार युवक युवतींनी सहभाग घेतला, यामध्ये १५ हजार ४९३ पालकांनी सहभाग घेतला. तसेच ज्या आस्थापनांमध्ये नोकरभरती होणार आहे, त्यासाठीदेखील समन्वय साधून रोजगाराची संधी निर्माण व्हावी, यासाठी जॉब कार्डबाबतही माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल. पुणे व ठाणे येथे इंडस्ट्री मीट घेतली होती, अशी माहिती कौशल्यविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
या चर्चेत विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी, विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.
गृहप्रकल्पांमध्ये नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी महारेरा आणि महापालिका यांना डिजिटल पद्धतीने जोडणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 27 : घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी महारेरा, सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका यांची गृहनिर्माण प्रकल्पांबाबतची माहिती डिजिटल पद्धतीने लिंक करण्यात येईल. याशिवाय, अवैध बांधकामाला आळा घालण्यासाठी ज्या महानगरपालिकांची आर्थिक स्थिती चांगली आहे, अशा महानगरपालिकांनी सॅटेलाईटद्वारे छायाचित्रे मिळविण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारांकित प्रश्नोत्तरादरम्यान दिली.
सदस्य संजय पोतनीस यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, काही जणांकडून चुकीची अथवा खोटी कागदपत्रे दाखल करुन तसेच गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित शासकीय यंत्रणांची कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने तयार करुन नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार समोर येत आहेत. याशिवाय, बांधकाम क्षेत्रातील काही जणांकडून महारेरा प्रमाणित असे सांगून गृहप्रकल्पाच्या जाहिराती केल्या जात असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रत्येक गृहप्रकल्प हा मान्यताप्राप्त असल्याची खात्री करुनच घर खरेदीचा निर्णय घ्यावा, असेही सांगितले.
महारेरा आणि मुंबई महानगरपालिका सध्या डिजिटली एकमेकांशी जोडले गेले आहेत. पुणे, ठाणे महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथेही अशा प्रकारे डिजिटली जोडले जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत बनावट बांधकाम परवानगी घेऊन महारेराचे बनावट नोंदणी प्रमाणपत्र जोडून सदनिकांची विक्री करण्यात आल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. या महापालिका हद्दीत 655 बांधकाम परवानगी पत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले होते.
गृहविभागाच्या मार्फत हे प्रकरण विशेष तपास पथकाकडे दिले असून या एका गुन्ह्यात 42 तर अन्य गुन्ह्यात 66 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहितीही मंत्री श्री. सावे यांनी दिली.
सदस्य अजय चौधरी, अतुल भातखळकर, डॉ. जितेंद्र आव्हाड, रवींद्र वायकर, योगेश सागर, सुनील प्रभू, लहू कानडे आदींनी यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेतला.
ठाणे तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार वासुदेव पवार निलंबित – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाणे तहसीलदार कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार वासुदेव पवार यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतल्याप्रकऱणी गुन्हा दाखल केला असून त्यांच्याविरुद्धची चौकशी तीन महिन्यात पूर्ण करण्यात येईल तसेच त्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात विधानसभेत दिली.
सदस्य अमित साटम यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या मालमत्तेची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे. तसेच संबंधित विभागाकडून श्री. पवार यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाला असून तो मान्य करण्यात आला आहे.
नाशिक येथील शिक्षणाधिकारी लाच प्रकरण ‘ईडी’कडे सोपविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ते म्हणाले की, राज्यातील शालेय शिक्षण विभागातील ३२ वर्ग १ आणि वर्ग २ अधिकाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने चौकशी करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे.
शिक्षण क्षेत्रात बदलाची निश्चितपणे आवश्यकता आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, अनुदानित खाजगी शाळांतील पदभरती प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने करता येईल का याचा विचार केला जाईल. त्यामुळे या पदभरती मधील गैरप्रकाराला आळा बसू शकेल. खाजगी कोचिंग क्लासेसमुळे शाळा – महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे आगामी काळात किमान अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थितीबाबत निर्देश देण्यात येतील. विद्यार्थ्यांची आधार नोंदणी प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या निश्चित किती हे समजू शकेल, असे त्यांनी सांगितले.
सातारा येथील पदभरती संदर्भात अनियमितता झाली असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
सदस्य पृथ्वीराज चव्हाण, रोहित पवार, अबू आझमी, नाना पटोले, योगेश सागर, महेश शिंदे, अशोक पवार, सीमा हिरे आदींनी या विषयावर झालेल्या चर्चेत भाग घेतला.
000
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी तीन ट्रक कपडे, खाद्य साहित्य यवतमाळकडे रवाना
- ‘साडी चॅलेंज’ उपक्रमाला राज्यभरातून प्रतिसाद; १६ हजार साड्या, ब्लॅंकेट व धान्य साहित्याचे संकलन
पुणे : पूरग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस व दारवा तालुक्यातील बंधू-भगिनींसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुणेकरांनी सामाजिक बांधिलकी जपत संकलित केलेल्या तीन ट्रक कपडे, खाद्य व धान्य साहित्याची मदत गुरुवारी सायंकाळी यावंतांलाकडे रवाना करण्यात आली. जवळपास १६ हजार साड्या, हजारो ब्लँकेट्स, चादरी यासह बिस्किट्स, शिधा आदी साहित्याचा समावेश आहे.
वंदे मातरम संघटनेच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या ‘साडी चॅलेंज’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोशल मीडियावर ‘साडी चॅलेंज’ इतके व्हायरल झाले की, राज्याच्या विविध भागातून साड्या आणि कपड्यांचा ओघ सुरु झाला. अवघ्या दोनच दिवसात १६ हजारांपेक्षा अधिक साड्या, ब्लॅंकेट व चादरी संकलित झाले. पुण्यासह ठाणे, मुंबई, चिपळूण, नागपूर, वर्धा, लातूर, अकोला, बीड, नंदुरबार, शहादा, सुरत आदी ठिकाणाहून हे साहित्य संकलित झाले आहे.

यवतमाळ पूरग्रस्त सहकार्य अभियानात वंदे मातरम संघटना, युवा फिनिक्स सोसायटी, युवा वाद्य पथक, गुजर महिला विकास मंच, व्हीएसजीजीएम, रुद्रांग वाद्य पथक, केदारेश्वर प्रतिष्ठान, रोटरी क्लब, टीम सुभेदार, दि पुणे मर्चंट चेंबर, डीमार्फ, युवा स्पंदन, चांगुलपणाची चळवळ, स्वरूपवर्धिनी या संस्थांसह स्वयंसेवी ४०० ते ५०० कार्यकर्ते यामध्ये काम करत आहेत.
वंदे मातरम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वैभव वाघ म्हणाले, “गेल्या आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस आणि दारवा या तालुक्यांना पुराचा मोठा फटका बसला. अनेक गावांतील बंधू-भगिनींना रोजचे घालण्याचे कपडे, खाण्याचे साहित्य खराब झाले. ही बाब लक्षात घेऊन आम्ही ‘साडी चॅलेंज’ हा उपक्रम सोशल मीडियावर राबवत मदत करण्याची साद घातली. राज्यभरातील माताभगिनींनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत खऱ्या अर्थाने ‘बाई पण भारी देवा’ असल्याचे सिद्ध केले. या दोन दिवसांत माणुसकी आणि चांगुलपणाची भावना अनुभवायला मिळाली.”
सचिन जामगे म्हणाले, “कपडे, खाद्य साहित्य याचे व्यवस्थित पॅकिंग करण्यात आले असून, पूरग्रस्त भागातील गरजूंना नियोजनपूर्वक वितरित करण्यासाठी कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत. आज पुण्यातून हे तीन ट्रक पाठविण्यात येत असून, तिथे दोन्ही तालुक्यातील पूरग्रस्तांना स्थानिक प्रशासन व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ही मदत पुरविण्यात येणार आहे.”
पावसाने घरे पडलेल्या गरिबांना घरकुल योजनेतून घरे द्या.
मुंबई, दि. २७ जुलै
महाराष्ट्राचा अर्धा भागात अतिवृष्टीत बुडाला आहे आणि अर्ध्या भागात पाऊस पडलेला नाही. शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. सरकारने १० हजार रुपयांची मदत जाहीर केलेली आहे पण दुबार पेरणीसाठी बियाणे, खत, डिझेल लागते, पेरणीचा खर्च जास्त येते. त्यामुळे नुकसानीच्या प्रमाणात सरसकट मदत करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
विधान भवन परिसरात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, शेतकरी संकटात सापडलेला असताना सरकारने त्याला भरीव मदत करण्याची गरज आहे. पण सरकारने जाहीर केलेली मदत ही जखमेवर मीठ चोळणारी आहे. दुबार पेरणी केली तरी पीक येईलच याची शाश्वती नाही, पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांचे वर्षभराचे नुकसान झाले आहे. पावसाने नागपुरसह काही भागात गरिबांची घरे पडली आहेत तर काही घरे खचली आहेत. या गरिबांना घरकुल योजनेतून घरे दिली पाहिजेत. टपरी वाल्यांचेही मोठे नुकसान झाले आहे त्यांनाही मदत देण्याची गरज आहे. पावसामुळे बेघर झालेल्या लोकांना कॅम्पमध्ये जाऊन सर्व मदत दिली पाहिजे. सरकारने तातडीने मदत करण्याची गरज आहे पण हे सरकार गरिब व शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. सरकारच्या घोषणा या सुद्धा पावसासारख्या भरघोस आहेत पण प्रत्यक्षात मदत मिळेपर्यंत काही खरे नाही.
राज्यातील असंवैधानिक तिघाडी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. सरकार अपयशी असते तेंव्हा मोर्चांचे प्रमाणही जास्त असते. भर पावसातही यावेळी शेकडो मोर्चे आले आहेत. माझ्या ३० वर्षांच्या कालावधीत पावसाळी अधिवेशनात एवढे मोर्चे कधी पाहिले नाहीत. सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात महिलांचा अपमान व महिला बेपत्ता होणे दुर्दैवी आहे. राज्यातून १५ हजार महिला बेपत्ता झाल्या आहेत पण त्याबद्दलही सरकार उत्तर देण्यास तयार नाही. शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात दररोज महापुरुषांचा अपमान होत आहे पण सरकार काहीच करत नाही, असे चित्र असल्याचे नाना पटोले म्हणाले.
सेतू कार्यालयातून सामान्य जनतेची होणारी लूट थांबवा:-नाना पटोले
सेतू कार्यालये अद्ययावत करण्यासाठी शासनाचे धोरण काय?
मुंबई, दि. २७ जुलै
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दाखले सेतू कार्यालयातून घ्यावे लागतात. ही सेतू कार्यालये जनतेच्या सुविधांसाठी आहेत परंतु या सेतू कार्यालयातून सामान्य जनतेची सर्रास लूट केली जात आहे. १५ ते २० रुपयांच्या दाखल्यासाठी २०० ते ३०० रुपये घेतले जातात, जनतेची होणारी ही लूट सरकारने थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सेतू कार्यालयासंदर्भात विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सेतुचे कंत्राट गुजरातमधील एका कंपनीला दिल्याचे मंत्री महोदय यांनी सांगितले आहे. काही सेतू सुविधा केंद्र बंद पडल्याने किती लोकांचे नुकसान होत आहे याचा आपल्याला अंदाज नाही. जनतेच्या सेवेसाठी असणारी ही सेतू कार्यालये जनतेला लुटत आहेत. ही सेवा अद्ययावत करण्यासाठी सरकारचे धोरण काय आहे? लोकांना दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्यासाठी वणवण करावी लागते म्हणून सेतू सेवा अद्ययावत व जनतेच्या सोयीसाठी सुलभ कशी करता येईल याचे धोरण काय यावर शासनाने उत्तर द्यावे. तसेच गोरगरिबांच्या उत्पन्नाच्या दाखल्याची २१ हजार रुपयांची मर्यादा वाढवून ५१ हजार करावी.
या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, सोलापुर जिल्ह्यातील सेतू कार्यालये कंत्राट दिलेल्या कंपनीची मुदत संपल्याने बंद आहेत. ती पुन्हा सुरु करण्यासाठी ई टेंडर जाहीर केले असून लवकर सेतू कार्यालये सुरु होतील. उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याबाबतही सरकार लवकर निर्णय घेईल असे आश्वासन दिले.
राज्यात सर्पदंशावरील औषधांचा काळाबाजार
- काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचा सभागृहात गंभीर आरोप
- रायगडच्या पेणमध्ये झालेल्या दुर्घटनेचे विधानसभेत पडसाद
- प्रगत म्हणून घेण्याचा आपल्याला खरंच अधिकार आहे का?
मुंबई : पेण मधील बारा वर्षीय सारा ठाकूर या मुलीचा सर्पदंशामुळे झालेला दुर्दैवी अंत हा सरकारी अनास्थेचा बळी आहे, सर्पदंशावरील औषध उपजिल्हा रुग्णालयात सक्तीचे असतानाही, पेनच्या रूग्णालयात ते उपलब्यध का नव्हते याची चौकशी करून सरकार जबाबदारी निश्चित करणार आहे का दोषींवर कठोर कारवाई करणार आहे का? राज्यभर या औषधांचा काळाबाजार कुणाच्या आशिर्वादाने सुरु आहे? असे सवाल उपस्थित करून थोरात यांनी सरकारला धारेवर धरले
थोरात म्हणाले, ‘पेण मध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. या घटनेचा थेट संबंध शासन व शासकीय यंत्रणेशी आहे. आपण पुरोगामी राज्य असल्याची जाहिरात करतो पण सर्पदंशावरील साधे इंजेक्शन, जे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांना उपलब्ध ठेवण्याचे सक्तीचे आदेश असतात. पण सरकारच्या दुर्लक्षामुळे या रूग्णालयांना मिळालेला हा कोटा काळ्या बाजारात विक्री केला जातो आणि सामान्य जनतेच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे. या दुर्देवी घटनेतील मुलगी कु. सारा रमेश ठाकूर ही केवळ १२ वर्षाची होती, सातवीच्या वर्गात शिकत होती. सर्पदंशानंतर तिला तत्काळ पेण उप जिल्हा रुग्णालयात नेले असता उपचाराची साधने नसल्याचे कारण देत तिच्यावर उपचार न करता परत पाठवले. वास्तविक पेण रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने हे इंजेक्शन उपलब्ध करुन या मुलीचा जीव वाचविणे आवश्यक होते, पण तसे न करता त्यांनी उपचारास नकार दिला ही अक्षम्य चूक आहे. त्यानंतर तिला खासगी रुग्णालयात नेले तिथून तिला सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला देऊन उपचार नाकारला, इतकी भयंकर व लाजिरवाणी घटना घडलेली आहे. तिचा मृत्यू सर्पदंशामुळे नाही तर सरकारी अनास्थेमुळे, आरोग्य विभागाच्या गलथानपणामुळे झाला आहे.
थोरात पुढे म्हणाली, साराच्या शाळेतील मुले, शिक्षक व ग्रामस्थांनी तिच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली, पुन्हा ती सातवीच्या वर्गात दिसणार नाही, याची खंत व्यक्त केली. पण ढिम्म शासनावर त्याचा काहीच परिणाम दिसत नाही. या निष्पाप कोवळ्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणा-या बेजबाबदार व बेफिकीर आरोग्य अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई झाल्याशिवाय आजचे सभागृहाचे कामकाज पुढे घेऊ नये असे थोरात म्हणाले.
आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह !
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सांस्कृतिक कार्य विभागाकडून मोठा निर्णय
सर्व शासकीय कार्यालयांच्या दर्शनी भागातही झळकणार बोधचिन्ह
मुंबई,-
आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह लावण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सोमवारी निर्गमित करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागातही हे बोधचिन्ह झळकणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रम शौर्य आणि अतुलनीय कार्याच्या गौरवार्थ आणि स्मरणार्थ राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पकतेचे आणखी एक उदाहरण आता महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात सांस्कृतिक कार्य विभाग अनेक वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. त्यात आता शिवरायांचे शौर्य व पराक्रम अधोरेखित करणारे बोधचिन्ह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याच्या अतिशय कल्पक अशा प्रयत्नांना यश आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर पुन्हा एकदा मनामनांत व्हावा, जगभरातील प्रत्येक मराठी माणसापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती आणि पराक्रम पोहोचावा, या उद्देशातून हा निर्णय घेण्यात आल्याचे २४ जुलैच्या शासन निर्णयात नमूद केले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक शासकीय कार्यालयाला दर्शनी भागात बोधचिन्ह लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पकतेचे कायमच कौतुक होत आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त त्यांनी आयोजित केलेला प्रत्येक उपक्रम अनोखा ठरला. गेट वे ऑफ इंडियाला शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन असो वा रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा असो. प्रत्येक आयोजनातून सांस्कृतिक कार्य विभागाने आपले वेगळेपण सिद्ध केले. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी चंद्रपुरातील सागवान काष्ठ रवाना करण्याचा सोहळा तर अख्ख्या देशाने अनुभवला. तर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये एकमेकांना भेटल्यानंतर वा दूरध्वनीवरील संभाषण सुरू करताना हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणण्याचा सांस्कृतिक कार्य विभागाचा निर्णय पाळला जात आहे. आता शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या बोधचिन्हाच्या बाबतीत झालेला निर्णय ऐतिहासिक ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
आणखी एक अनोखा उपक्रम
महाराजांच्या काळांतील नाणी, गडकिल्ले, अष्टप्रधान मंडळ आदी प्रत्येक गोष्ट प्रेरणादायी आहेत. या प्रेरक गोष्टी सर्वांपर्यंत सहजपणे पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह सर्वदूर पोहोचविण्याच्या निर्णयाची भर पडली आहे.
शिवरायांचा पराक्रम शौर्य अधोरेखित करणारा निर्णय
सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य विभागाची धुरा सांभाळल्यापासून विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रत्येक निर्णयाला कल्पकतेची व संस्कृती रक्षणाची किनार असते. त्यामुळे कुठलाही निर्णय सर्वांचे लक्ष वेधून घेतो आणि कौतुकासही पात्र ठरतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आणि शौर्य अधोरेखित करणारा निर्णय म्हणून संपूर्ण महाराष्ट्र या निर्णयाकडे कौतुकाने बघत आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 27 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करणारच. याप्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारांकित प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विधानसभेत दिली. ज्या ट्विटर हॅंडलवरुन हा बदनामीकारक मजकूर प्रसारित झाला, त्याच्या चालकाची माहिती मिळण्यासंदर्भात ट्विटर इंडियाशी तीन वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. संबंधिताची माहिती मिळवून त्याला अटक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
सदस्य डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे आपल्या सर्वांचेच श्रद्धास्थान आहे. त्यामुळे अशा प्रकारची बदनामी कदापीही खपवून घेतली जाणार नाही. राज्य शासनाने याबाबत तत्काळ पावले उचलत असा मजकूर टाकणाऱ्या ट्विटर हॅंडल चालकाचा पत्ता मिळण्यासंदर्भात ट्विटरला पत्रव्यवहार केला आहे.
याबाबत सदस्य बाळासाहेब थोरात, नाना पटोले आदींनी प्रश्न विचारले.
लोकशाही मानसिकता निर्माण होण्याची गरज : प्रा. अविनाश कोल्हे
पुणे :
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने २७ जुलै २०२३ रोजी पुण्यात संविधान अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास वर्गामध्ये ‘ पहिली घटनादुरुस्ती(१९५१)’ या विषयावर राज्यशास्त्राचे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक प्रा.अविनाश कोल्हे मार्गदर्शन केले .हा अभ्यास वर्ग गुरुवार २७ जुलै २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता गांधी भवन,कोथरूड येथे पार पडला. हा चौथा ‘संविधान अभ्यासवर्ग ‘ होता.
दुर्गा शुक्रे यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले. सुदर्शन चखाले यांनी प्रास्ताविक केले. जांबुवंत मनोहर यांनी प्रा. कोल्हे यांचे स्वागत केले. संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.डॉ.कुमार सप्तर्षी, डॉ.उर्मिला सप्तर्षी, अन्वर राजन, अरुणा तिवारी, इत्यादी उपस्थित होते.
प्रा.अविनाश कोल्हे म्हणाले, ‘ जगातील ६० घटनांचा तौलनिक अभ्यास करून ही घटना तयार झाली. स्वातंत्र्यानंतर समानतेसाठी हे प्रयत्न होते.
समाजवादी समाजरचनेसाठी खासगी मालमत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार पहिल्या घटनादुरुस्तिने सरकारला मिळाला. जमीनदारांच्या जमिनी सरकारला ताब्यात घेता आल्या. मात्र, न्यायालयात आव्हान दिले गेले. त्यानंतर सरकारला घटनादुरुस्ती करावी लागली. त्यानंतर कोणत्या कारणासाठी घटना दुरुस्ती करावी, आणि किती वेळा करावी, यावर चर्चा सुरू झाली. आणि घटनेचे मूलभूत रचना बदलता येणार नाही, इथपर्यंत हा प्रवास आला आहे.हा लोकशाहीचा आणि प्रगल्भतेचा प्रवास आहे.तो सजगपणे सुरू राहावा, यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे.आपल्याकडे लोकशाही आहे पण, लोकशाही मानसिकता निर्माण झाली पाहिजे.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा समावेश करणार- आरोग्य मंत्री तानाजी सावंत
मुंबई, दि. 27 : महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा समावेश करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली.
सदस्य दीपक चव्हाण यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत आजारांची संख्या वाढविण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री. सावंत म्हणाले, राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सार्वत्रिक केली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रात 5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या योजनेअंतर्गत सध्या ९९६ आजारांचा समावेश असून त्याची संख्या १ हजार ३५६ केली जाणार आहे. तसेच या योजनेत समावेश करावयाच्या आजारांच्या निवडीसाठी एक विशेष समिती गठित करण्यात येईल असेही मंत्री श्री.सावंत यांनी सांगितले.
मोदींना टिळक पुरस्कार देणे म्हणजे ‘काँग्रेसने मोदीं- विरोधात देशभर उभारलेला लढ्याची थट्टा करणे होय -काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी
टिळक कुटुंब यास विरोध करणार कि नाही ?
मोदींना पुरस्कार हा लोकमान्यांच्या मुल्यांचा अवमान
स्वातंत्र्य संग्रामाची खिल्ली ऊडवणाऱ्यांना पुरस्कार… हा विरोधाभास दर्शवणारा यंदाचा टिळक पुरस्कार…!!
पुणे दिनांक २७–
लोकशाही रुपी ‘स्वराज्याची सिंहगर्जना’ करणऱ्या व स्वातंत्र्य लढ्यात ‘केसरी वृत्तपत्र व पत्रकारीतेचे’ महत्व अधोरेखीत करणाऱ्या ‘टिळकांची लोकशाही प्रणीत भुमिका’ व ‘मोदींची हुकुमशाही प्रणीत वाटचाल’ हा परस्पर विरोघाभास असून, संविधानिक लोकशाही मुल्यांचा अवमान करणाऱ्या पंतप्रधन मोदींना टिळक पुरस्काराने सन्मानित करणे हा लोकमान्यांच्या (स्वातंत्र्य, स्वराज्य, निधर्मी राष्ट्रवाद व लोकशाही) मुल्यांचा अवमान असल्याची टिका प्रदेश काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.
ते म्हणाले,’ एकीकडे मोदी सरकार ‘स्वातंत्र्य भिकेत मिळाल्याची’ विधाने करणाऱ्यांना पदमश्री देऊन गौरव करते, सतत पाठीशी घालते, हीच मुळात टिळकांच्या स्वातंत्र्य _लढ्याच्या प्रेरणेची थट्टा आहे. टिळकांच्या ध्येयास लोकमान्यता होती, त्यांचे राष्ट्रभक्ति’चे कार्य लोकांप्रती समर्पित होते, म्हणुनच त्यांना लोकमान्य पदवी बहाल केली गेली.
काँग्रेसनेते लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेतून, महात्मा गांधींच्या नेतृत्वातील स्वातंत्र्याचा लढ़ा सलग पुढे चालवणारा हा काँग्रेस पक्षच आहे व त्यांचे नेते पं नेहरूं सह पटेल, मौलाना आझाद, बोस सह अनेकांनी त्याग, यातना व ब्रिटीशांकडुन वेळोवेळी कैदे’ची शिक्षा भोगली. मात्र स्वातंत्र्य सेनानी राहीलेल्या नेहरू – गांधी परीवाराची, काँग्रेस’च्या शहीद पंतप्रधानांची द्वेष व तिरस्कार भावनेने, मोदीजी वारंवार ऊपेक्षा करत आले आहेत.
देशाचे पंतप्रधानजनतेने निवडुन दिलेल्या पर्यायी पक्षांच्या खासदारांवर भ्रष्टाचाराचे व देशद्रोहाचे तथ्यहिन व बेजबाबदार आरोप करतात, त्यांचे प्रश्नांना कस्पटा समान समजतात अशा पंप्र मोदी जीं ना त्यांच्या ‘कोणत्या लोकशाही प्रणीत देश हिताच्या कार्या बद्दल’ हा पुरस्कार दिला जात आहे(?) हा खेदजनक सवाल देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.
भाजपा विरोधात देशभर काँग्रेस’सह २५ पक्ष मोदींच्या ‘दमनशाही व हुकुमशाही’ विरोधात निकराची लढाई देत आहेत. मोदींच्या मनमानी कारभारामुळे, ऊद्योगपती मित्रांकरवी होत असलेल्या राष्ट्रीय संपत्तीच्या व बँकांच्या लुटीप्रती ‘त्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे’ देशाचे अपरिमित नुक़सान होत आहें. जाचक करवाढीने, जीवनावश्यक वस्तुंवर जीएसटी रुपी जिझीया कर लावून, जनतेस जीवघेण्या महागाईच्या खाईत ढकलून सर्वसामान्य, शेतकरी व गरीब जनतेचे जगणे कठीण केले जात आहे.
अशा वादग्रस्त व आरोपग्रस्त मोदींना टिळक पुरस्कार देणे, हा ‘काँग्रेसने मोदीं- विरोधात देशभर उभारलेला लढ्याची थट्टा व उपहास’ आहे, अशी टिका देखील प्रदेश काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.
आज देशात व राज्यात काँग्रेसजन ‘मोदींच्या अपयशाच्या विरोधात, चुकीच्या व देश-विधातक गैरकारभाराच्या विरोधात’ जिल्हा, तालुका ते गाव पातळीवर काँग्रेस चा कार्यकर्ता रस्त्यावर येऊन संघर्ष करीत आहे. काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांना जाणीव पुर्वक अडचणीत आणण्याची कट कारस्थाने मोदी-शहां कडुन वारंवार होत आहे, मात्र याचा यत्किंचित ही विचार डॅा रोहित टिळक परिवार व ‘बहु काँग्रेसजन’ असलेल्या ट्रस्टींनी’ केला नाही, ही काँग्रेसजनां करीता वेदनादायक बाब आहे, अशी पुस्ती ही त्यांनी जोडली.
लोकमान्य टिळकांनी “ब्रिटीश हुकमशाही व गुलामगिरी विरोधात, ‘स्वराज्य माझा जन्म सिध्द अधिकार’ असल्याची सिंहगर्जना केली. पत्रकारीतेचा धर्म स्विकारुन दै केसरी’चे माध्यमातुन इंग्रजांचे विरोधात, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातु भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ऊभी केली. मात्र त्यावेळी मोदींच्या विचारधारेचे पुर्वज मात्र प्रत्यक्षात कुठे होते(?) असा ही प्रश्न त्यांनी केला..!
राज्य सरकारें पाडापाडी करीत, विरोधी पक्षांच्या आमदारांची फोडापोडी करीत संविधानिक लोकशाहीची कुचेष्टा करण्याचे कार्य सत्ताधीश भाजप नेतृत्वा कडून सातत्याने होत आहे अशी टिका देखील काँग्रेस ने केली.
गेल्या ७० वर्षात, “सर्वोच्च न्यायालयाने संविधानिक कर्तव्यां विषयी, राजधर्मा विंषयी ताशेरे मारलेल्या सरकारचे प्रमुख” म्हणुन मोदीजी हे ‘एकमेव टिळक पुरस्कारार्थी’ आहेत.. हे यादी पाहून स्पष्ट होते अशी पुस्ती ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी जोडली.
खडकवासला धरण १०० टक्के भरले
पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या वरसगाव, पानशेत,टेमघर आणि खडकवासला या चारही धरणात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण साठ्यात झपाट्याने वाढ असून सद्यस्थितीला खडकवासला धरण साखळीत गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७०.०६ टक्के,तर २०.४२ टीएमसी इतका पाणी साठा जमा झाला आहे.
तर चार धरणापैकी खडकवासला धरण हे १०० टक्के भरले आहे. तर गतवर्षी आजच्या तारखेला ७३.१८ टक्के,तर २१.३३ टीएमसी इतका पाणी साठा जमा होता.
| धरण | टीएमसी | टक्के |
| खडकवासला | १.९७ | १०० |
| पानशेत | ७.९३ | ७४.४९ |
| वरसगाव | ८.६५ | ६७.४६ |
| टेमघर | १.८७ | ५०.३९ |
आचार्य अत्रे यांच्या जन्मशताब्दीत्तोतर रौप्य महोत्सवी वर्षपुणे महानगरपालिकेने साजरे करावे .
पुणे-साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या जन्मशताब्दीतोत्तर जन्म रौप्य महोत्सवी वर्ष यंदा १३ ऑगस्ट रोजी सुरु होत आहे.त्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन पुणे महानगरपालिकेच्या वतीने करावे अशी विनंती संवादचे सुनील महाजन आणि समर्थ युवा फौंडेशनचे राजेश पांडे यांनी आज पुणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन केली.
या संदर्भात त्यांनी सांगितले की आचार्य अत्रे १९३८ ते १९४१ या काळात पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते तसेच स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.पुण्यात विविध शाळांमध्ये शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पडली. नाटक,चित्रपट ,साहित्य ,शैक्षणिक,पत्रकार,वक्ते म्हणून असा बहुअंगी त्यांचा वावर होता. संवाद आणि समर्थ युवा फौंडेशन तर्फे संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. पुणे महानगरपालिकेने देखील या संदर्भात विविध उपक्रम राबवावे अशी विनंती त्यांनी आयुक्तांना केली.
पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत आचार्य अत्रे यांचे तैल चित्र लावावे ,कसबा पेठेतील निवासस्थानी नील फलक लावावा ,सावरकर भवन येथील आचार्य अत्रे यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करावे, आचार्य अत्रे यांची नाटके व चित्रपटांचा महोत्सव साजरा करावा आणि आचार्य अत्रे यांचे उचित स्मारक उभारावे अशा विविध मागण्या त्यांनी आयुक्तांकडे केल्या.
