Home Blog Page 1409

रासने तुमच्यासारखा गणपती मंडळाचा कार्यकर्ता त्याच्या पाठीशी रहा:गिरीश महाजन

पुणे :कसब्याची पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची असून कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकण्यासाठी भाजपचे संकटमोचक अर्थात गिरीश महाजन आज मैदानात उतरले. त्यांनी कसबा विधानसभा मतदार संघातील विविध गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना हेमंत रासने तुमच्यासारखाच कार्यकर्ता असल्याने त्याला आपण आमदार करू या..त्याचे हात बळकट म्हणजे गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याचे हाथ बळकट होतील असे सांगून मंडळा; मंडळा मध्ये भेद ठेऊ नका,वेळेवर एकमेकांच्या उपयोगी या असा सल्ला हि दिला.

कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारासह इतर अनेक जण लढणार असल्यानं भाजपला मोठं आव्हान निर्माण झालं आहे. यापार्श्वभूमीवर कसब्याचा गड राखण्यासाठी भाजपच्या पुणे शहराच्या कोअर कमिटीला महाजन यांनी मार्गदर्शन केल्याचे वृत्त आहे.यावेळी निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती कशी असेल यावरच प्रामुख्यानं चर्चा झाली.आणि प्रत्यक्षात महाजन यांनीही काही जबाबदारी घेऊन कामाला प्रारंभ केला आहे. माजी नगरसेवक दीपक पोटे त्यांच्या समवेत होते.

‘स्वच्छ धारा, संपन्‍न किनारा’हा संदेश नागरिकांच्या मनावर बिंबवायला हवा- गृहनिर्माण आणि नगर विकास राज्यमंत्री कौशल किशोर

पुणे , 14 फेब्रुवारी  2023
 गृहनिर्माण आणि नगर विकास राज्यमंत्री, कौशल किशोर यांनी ‘स्वच्छ धारा, संपन्‍न किनारा’हा संदेश देशातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्‍यावर भर दिला आहे. ते आज पुणे इथे आयोजित धारा (DHARA)2023 च्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, रिव्हर सिटीज अलायन्स (आरसीए), अर्थात नदी किनाऱ्यावरील शहरांच्या आघाडीमध्ये सध्या 107 शहरे असून, यामध्ये देशभरातील 72 नद्या जोडणाऱ्या 16 स्मार्ट शहरांचा समावेश आहे. या 107 शहरांपैकी सुमारे 70 शहरांमध्ये सांडपाणी प्रक्रिया सुविधा केंद्रे आहेत. जलस्रोतांची सुरक्षा, ही सामायिक जबाबदारी आहे. दोन्ही मंत्रालयांच्या सहयोगामुळे जल स्रोतांचे संरक्षण आणि शाश्वत शहरी विकासामध्ये झालेल्या लक्षणीय प्रगतीवर, आरसीए आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांनी  भर दिला. पुढील वर्षी होणाऱ्या बैठकीपर्यंत, धारा (DHARA) परिवारात आणखी 150 शहरांचा समावेश करण्यात यश  मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे कौशल किशोर यावेळी म्हणाले.

आरसीए सदस्य शहरांचे आयुक्त, कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना चर्चा करण्यासाठी आणि शहरी नद्यांच्या व्यवस्थापनासाठी चांगल्या पद्धती एकत्रितपणे शिकण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालया अंतर्गत, पुण्यामध्ये नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा (NMCG) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स (NIUA) यांनी एकत्र येऊन, धारा 2023 (ड्रायव्हिंग होलिस्टिक ऍक्शन फॉर अर्बन रिव्हर्स), ही आरसीए सदस्यांची दोन दिवसीय वार्षिक बैठक आयोजित केली होती.धारा 2023 च्या दुसऱ्या दिवशी पुणे महानगरपालिका आयुक्त (पीएमसी) विक्रम कुमार यांनी पुण्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सहा कलमी उपाय सादर केला. पीएमसी आयुक्तांनी मुळा, मुठा आणि मुळा-मुठा (दोन्ही नद्यांचा संगम) नद्यांच्या स्थितीवर परिणाम करणाऱ्या सहा प्रमुख समस्यांवर प्रकाश टाकला आणि पुढील उपाय सुचविले: 1) नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी स्वच्छ करणे, 2) पुराचा धोका कमी करणे, 3) नदीकाठ जनतेसाठी प्रवेश सुलभ बनवणे, 4) पाणी राखून ठेवणे आणि त्याचा पुनर्वापर करणे, 5) शहराची दळणवळण व्यवस्था आणि नदी किनार्‍यासाठीच्या सुविधा सुधारणे, आणि 6) विद्यमान वारसा संरचना, मनोरंजनात्मक, धार्मिक, सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम आणि पर्यावरण यामध्ये सुधारणा करणे.

आशियाई विकास बँकेचे भारतातील उप संचालक हो युन जेओंग म्हणाले, भारताला एडीबी द्वारे,  पुढील 5 वर्षांसाठी (2023-2027) 20-25 अब्ज डॉलरचा अर्थपुरवठा करण्याची योजना विचाराधीन आहे. हवामान वित्तपुरवठ्यासाठी किमान 40% ($8-10 अब्ज) वितरित करण्यात आले असून, यामध्ये हवामानाशी जुळवून घेणे आणि आपत्तीसाठीची लवचिकता समाविष्ट आहे. या योजनेत सार्वभौम वित्तपुरवठ्याद्वारे वितरणासाठीचे धोरण समाविष्ट आहे. ज्यामध्ये कर्ज आणि हमी समाविष्ट आहे, तर बिगर-सार्वभौम वित्तपुरवठ्यामध्ये समभाग गुंतवणूक आणि रोखे यांचा समावेश आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स (NIUA) चे संचालक हितेश वैद्य म्हणाले, “आपल्या 107 नदी शहरांसाठी जल संवर्धन आणि जलसुरक्षा वाढवण्याच्या सामूहिक उद्दिष्टासाठी, दोन मंत्रालयांचे सामर्थ्य एकत्र येणे, म्हणजे, आरसीए गटाचाच एक भाग आहे. या नद्यांच्या भविष्यातील व्यवस्थापनासाठी, हवामान अनुकूलता आणि लवचिकता महत्वाची आहे. आता भविष्यातील धोरणांवर विचार करण्याची वेळ आली आहे, ज्यामुळे हवामान वित्तपुरवठा, डेटा वितरण, कृती संशोधन आणि क्षमता बांधणी सुनिश्चित होईल, आणि यामुळे सर्वांगीण भागीदारी हा संभाव्य मिशन धाराचा आधारस्तंभ बनेल.”

मंगळवारी संध्याकाळी संपलेल्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बैठकीत भारतातील नदी शहरांमधील  300 प्रतिनिधींनी उपस्थिती नोंदवली. या बैठकीत नद्या शहरांचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, मुख्य अभियंता, वरिष्ठ नियोजक, शिक्षणतज्ञ, जल सुरक्षा तज्ञ, आर्थिक तज्ञ आणि इतर प्रतिनिधी त्यांच्या शहरांमधील नदीच्या पट्ट्यांचे व्यवस्थापन करण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र आले.

पुढील आरसीए आंतरराष्ट्रीय बैठक, धारा (DHARA)2024साठी ग्वाल्हेर शहराची निवड करण्यात आल्याची घोषणा एनएमसीजी (NMCG)चे महासंचालक जी असोक यांनी केली.

राज्यातील ८४६ शाळांचा पीएम श्री योजनेत सर्वांगीण विकास करणार

पुणे-

            राज्यातील ८४६ शाळांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पीएम श्री योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

देशभरात पहिल्या टप्प्यात १५ हजाराहून अधिक शाळा उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून विकसित करण्यात येणार असून यात राज्यातील ८४६ शाळांचा समावेश करण्यात येईल.

पीएम श्री योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाने केंद्रासमवेत सामंजस्य करार केला आहे.  या करारानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० राज्यात लागू करण्यात येईल. पीएम श्री योजनेत केंद्राचा ६० टक्के हिस्सा असेल.  प्रत्येक शाळेसाठी १ कोटी ८८ लाख एवढी तरतूद ५ वर्षांसाठी करण्यात येईल.  या शाळांसाठी ५ वर्षांकरिता केंद्राचा हिस्सा ९५५ कोटी ९८ लाख राहणार असून राज्याचा ४० टक्के हिस्सा प्रती शाळा ७५ लाख प्रमाणे ६३४ कोटी ५० लाख खर्च अपेक्षित आहे. या योजनेतील दुसऱ्या टप्प्यात ४०८ गट, २८ महानगरपालिका आणि ३८३ नगरपालिका व नगरपरिषदा यामधून पीएम श्री शाळांची निवड केली जाईल.

या शाळांमधून अनुभवात्मक पद्धतीने आनंददायी शिक्षण देण्यात येईल. विद्यार्थ्यांची वैचारिक समज आणि वास्तविक जीवनातील त्याचा ज्ञानाचा वापर आणि योग्यतेवर आधारित मुल्यांकन करण्यात येईल.  या शाळांमध्ये माजी विद्यार्थ्यांना देखील सहभागी करून घेऊन विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व शैक्षणिक मदत करण्यात येईल. काही कारणांमुळे विद्यार्थ्यांची शाळेतून गळती झाल्यास त्यांना पुन्हा प्रवेश देऊन अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यात येईल.

या शाळांचा विकास प्रामुख्याने पुढील ६ प्रमुख आधार स्तंभांवर केला जाईल. अभ्यासक्रम, अध्यापन शास्त्र व मुल्यमापन; प्रवेश आणि पायाभूत सुविधा; मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व; समावेशक पद्धती आणि लाभार्थी समाधान; व्यवस्थापन, देखरेख आणि प्रशासन.

या योजनेची अंमलबजावणी राज्य स्तरावरून शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती, जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती आणि महापालिका स्तरावर महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समित्यांमार्फत केली जाईल. राज्य प्रकल्प संचालक हे राज्य अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष असतील.

राज्याच्या विकासात माध्यमांचे मोठे योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई, दि. १४ : प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. राज्याच्या विकासात माध्यमांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

दैनिक लोकसत्ताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नरीमन पॅाईंट येथील एक्सप्रेस टॅावर इमारतीत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकसत्ता समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद गोयंका, संपादक गिरीश कुबेर आदी मान्यवर उपस्थित होते.

काळ, समाजकारण, राजकारण बदलले तरीसुद्धा गेल्या ७५ वर्षांपासून लोकसत्ताने आपली प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता कायम ठेवल्याबद्दल कौतुक व्यक्त करुन मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यात चांगले काम करणाऱ्या विविध संस्थांना पुढे आणण्याचे काम आणि महिला, युवकांसाठी लोकसत्ता समूहामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. राज्याच्या विकासात माध्यमांचे योगदान मोठे आहे. आम्हीही राज्यात लोकसत्ता आणली आहे. गेल्या सात महिन्यात राज्य शासनाने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. त्यांना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम माध्यमे करीत असून ही माध्यमे विकासाची वाट दाखविणारे आहेत. त्याचबरोबर राज्य शासन करीत असलेल्या कामांचे मूल्यमापन देखील माध्यमे करीत असतात, असे मत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन असून महाराष्ट्रानेही एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यासाठी राज्य शासन विविध महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प राबवित असून या प्रकल्पांना गती दिली जात आहे. यात राज्यातील रस्त्यांना एकमेकांशी जोडण्यासाठी व्यवस्था उभी करण्यासाठी गेमचेंजर असलेला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत, नागपूर-गोवा महामार्ग, मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड रस्ता प्रस्तावित आहे. याचबरोबर राज्यात मेट्रो प्रकल्प सुरु आहेत. अशा विविध प्रकल्पांमुळे वाहनांची संख्या कमी होऊन पर्यायाने प्रवाशांची वेळेची बचत होईल, असेही श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुंबई ही आर्थिक राजधानी असून कोस्टल रोडसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरु असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबईच्या विकासासाठी राज्य शासनाने अनेक प्रकल्प हाती घेतले आहे. राज्याचा सर्वांगीण विकास हेच राज्य शासनाचे ध्येय असून त्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. राज्याची आर्थिक व्यवस्था बळकट करण्यासाठी राज्य शासनाने पहिल्यांदाच आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली आहे. राज्याच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. उद्योगवाढीसाठी नुकतेच दावोस येथे कोट्यवधींचे सामंजस्य करार करण्यात आले. यातून राज्याच्या उद्योगवाढीला चालना मिळणार आहे. राज्याच्या विकास आणि लोकहितासाठी प्रसारमाध्यमांनी सूचना केल्यास त्यांच्या सूचनांवर राज्य शासनाकडून नक्कीच कार्यवाही केली जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी आश्वस्त केले.

यावेळी ‘लोकसत्ता वर्षवेध २०२२’ या वार्षिकांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

देशात उष्माघातामुळे जाणाऱ्या बळींची संख्या शून्यावर आणण्याचे ध्येय – कुणाल सत्यार्थी

0

मुंबई, दि. १४ : जगात उष्माघाताचे सर्वात जास्त प्रमाण भारतात आहे. यावरील उपाययोजनांबाबत दोन दिवसीय कार्यशाळेत सखोल चर्चा झाली. यंदा भारतात उष्माघातामुळे होणाऱ्या बळींची संख्या शून्यावर आणण्यासाठी शासन, संस्था, तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, सामाजिक घटक सर्वांनी मिळून काम करू, असे आवाहन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सहसचिव कुणाल सत्यार्थी यांनी केले.

‘उष्णतेच्या लाटा – आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’ या विषयावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि महाराष्ट्र शासनाचे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आयआयटी पवई येथे करण्यात आले होते. त्याच्या समारोपाच्या चर्चासत्रात श्री. सत्यार्थी बोलत होते.

देशातील विविध राज्यांतील व महाराष्ट्रातील विविध शासकीय अधिकारी आणि तज्ज्ञ यांनी उष्णतेच्या लाटांविषयी संशोधन, अभ्यास आणि उपाययोजनांबाबत कार्यशाळेत आपले मत मांडले.

उष्ण लहरींच्या वाढत्या प्रभावाने मनुष्यजातीचे शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा विविध पद्धतीने नुकसान होताना दिसत आहे.  उष्णतेच्या बचावासाठी असलेल्या कृती आराखड्याबरोबरच माहितीचा प्रसार, पायाभूत सुविधा, वर्तणूक, संस्थापक क्षमता निर्माण करणे, तांत्रिक, नैसर्गिक घटकांचा वापर करुन उष्माघातापासून बचाव कसा करता येऊ शकेल, यावर चर्चा करण्यात आली.

उष्ण लहरी शमविण्यासाठी राज्य शासनाच्या कृती आराखड्याची पुनर्रचना आणि प्रभावी अंमलबजावणी व्हावी, ग्रामीण भागात उष्ण लहरींमुळे प्रभावित होणाऱ्या पिकांसाठी उपाययोजना सांगाव्यात, शेती, जनावरे आणि कामगार वर्गामध्ये जातील जास्त माहिती पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत, शहरांमध्ये ‘उष्ण लहरींबाबत सर्व माहिती संकलन आणि नियंत्रणासाठी ‘हिट अधिकारी’ यांची नेमणूक करावी, आंतर – संस्था समन्वय साधण्याचे प्रयत्न व्हावेत, उष्ण लहरींचे निरीक्षण करण्यासाठी संशोधन आणि माहिती संकलित करावी, उष्णतेच्या आरोग्यावरील होणाऱ्या परिणामांसंदर्भात संशोधनाला चालना दिली जावी, असे मत प्राधिकरणाच्या डॉ. कृष्णा वत्सा यांनी मांडले.

उष्ण लहरींबाबत आणि त्यावरील उपाययोजनांबाबत प्रसिद्धी करण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागांसाठी स्वतंत्र आराखडा असावा, तेथील लोकांच्या गरजेनुसार आणि त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत प्रसिद्धी करावी, असे पत्रसूचना कार्यालयाचे अमनदीप यादव यांनी सांगितले.

देशातील प्रत्येक भागात वेगवेगळे तापमान असते. तसेच दोन्हीकडे एकसारख्या तापमानातही लोकांची जीवनपद्धती वेगळी असू शकते, याचा अभ्यास करून त्याप्रमाणे उपाययोजना आखणे गरजेचे आहे. झोपडपट्टी भागात दाटीवाटीत राहणाऱ्या वस्तीत जास्त तापमान असते, आग लागण्याची शक्यता असते, अशा परिस्थितीत कमी खर्चात योग्य उपाययोजना कशा कराव्यात यासाठी संशोधन होणे गरजेचे असून, उष्माघाताने होणारे बळी हे नैसर्गिक आपत्तीत गणले जावे, असे मत तज्ज्ञांनी मांडले.

आज झालेल्या समारोपीय चर्चासत्रात ‘उष्ण लहरींवर उपाय’ यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेंद्र सिंग, सहसचिव कुणाल सव्यार्थी, डॉ. कृष्ण वात्सा, सचिव अलोक, महिला हाऊसिंग ट्रस्टचे संचालक बिजल ब्रह्यभट्ट, सीडस् चे संचालक मनु गुप्ता, NRDC चे डॉ. अभियंत तिवारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, प्राधिकरणाचे सदस्य सचिव कमल किशोर, प्रो. रवी सिन्हा यांसह शैक्षणिक संस्थातील तज्ज्ञ, शासकीय अधिकारी उपस्थित होते.

सर्व क्षेत्रांच्या समृद्धीसाठी विकासाच्या रोडमॅपद्वारे कामे सुरू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई, दि. १४ : सर्व क्षेत्रांच्या आणि समाजाच्या समृद्धीसाठी विकासाचा रोडमॅप तयार करण्यात आला असून त्याद्वारेच राज्यातील विविध विकासकामे वेगाने प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दादर येथे टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीच्या वतीने ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या विषयावरील आयोजित राज्यस्तरीय परिषदे ते बोलत होते. यावेळी टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी बरूण दास, संपादक उमेश कुमावत  उपस्थित होते.

महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन आहे. १५ टक्के जीडीपी महाराष्ट्र तयार करतो. २० टक्क्यांपेक्षा जास्त निर्यात महाराष्ट्रातून होते. सर्वच क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. ३८ टक्के थेट विदेशी गुंतवणूक (‘एफडीआय’) महाराष्ट्रात येते. ५ ट्रिलियन इकॉनॉमीचा देश बनविण्याचे उद्दिष्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आहे. त्यासाठी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आपल्याला वन ट्रिलियनची करावी लागेल. महाराष्ट्राची लवकरात लवकर ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे वाटचाल सुरू आहे. तंत्रज्ञानात सुधारणा करण्यात येत आहेत. यातून वेगवान विकास घडत असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर

पायाभूत सुविधांचा विकास हा विकासाचा मूलमंत्र आहे हे जाणून पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. सेवा, उद्योग आणि कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येत आहे. समृद्धी महामार्ग हा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. याद्वारे १४ जिल्हे थेट ‘जेएनपीटी’ बंदराशी जोडले जात आहेत.  हजार किलोमीटरचे अॅक्सेस कंट्रोल हायवे तयार करण्यात येत आहेत. समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत नेण्यात येत आहे. २५ हजार कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक तेथे येत असून भविष्यातील स्टील हब म्हणून गडचिरोलीची नवी ओळख निर्माण होईल. नागपूर-गोवा हायवेमुळे मराठवाड्यातील पाच जिल्हे इकॉनॉमिक कॉरिडॉरचा भाग होतील यामुळे शेती व उद्योगालाही चालना मिळेल. विरार-अलिबाग कॉरिडॉर तयार करण्यात येत आहे. पहिली इंटिग्रेटेड स्मार्ट सिटी ऑरिक सिटी आकारास येत आहे. एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. मेट्रोमुळे नागरिकांना सुविधा मिळत आहे.

नवी मुंबईचे विमानतळ आणि ट्रान्स हार्बर लिंकची उभारणी याद्वारे तिसरी मुंबई आकाराला येत आहे. मच्छीमारांचे हित जोपासत वाढवण बंदराची उभारणी करण्यात येत आहे. या बंदरामुळे निर्यात क्षमता वाढणार आहे. ग्लोबल सप्लाय चेनचा भाग आपण आता झालो आहोत असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

इनोव्हेशनच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे स्टार्टअप आणि ‘इनोवेशन’चे कॅपिटल आहे. देशातील ८० हजार स्टार्टअप्स पैकी पंधरा हजार स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत. देशातील शंभर युनिकॉर्न पैकी २५ युनिकॉर्न महाराष्ट्रात आहेत. इनोव्हेशनच्या माध्यमातून इकोसिस्टीम तयार करून रोजगार निर्मितीला चालना देण्यात येत आहे.  डेटा सेंटरमध्ये महाराष्ट्राची क्षमता देशात ६० टक्के झाली आहे.

जलयुक्त शिवार-  च्या माध्यमातून कृषी क्षेत्राला अधिक चालना

जलयुक्त शिवार – १ द्वारे ३९ लाख हेक्टर जमीन रब्बीच्या पिकाखाली आली. जलयुक्त शिवार- २ च्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करत कृषी क्षेत्राला अधिक चालना देण्यात येत आहे.  समुद्रात वाहून जाणारे पाणी वळण बंधाऱ्यांच्या माध्यमातून, ‘टनेल टेक्नॉलॉजी’ च्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यातील भागात आणत आहोत. याद्वारे मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचे काम करण्यात येत आहे. गोसेखुर्दच्या वाहून जाणाऱ्या पाण्याद्वारे पश्चिम विदर्भातील दुष्काळी जिल्हे दुष्काळमुक्त करण्यात येणार आहेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून कृषी आणि ग्रामविकासाला अधिक बळकट करण्यात येत आहे. आधुनिक पद्धतीने शेती कशी करता येईल या दृष्टीने अधिक विचार करण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने ॲग्री बिजनेसद्वारे गावातील प्राथमिक कृषी सोसायटी बहुउद्देशीय बनविण्यात येत आहेत. त्यांना ॲग्री बिझनेस सोसायटी करण्यात येत आहे. याद्वारे कृषी क्षेत्रात मूल्यसंवर्धन होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

आरोग्य क्षेत्रातही आमूलाग्र बदल

शालेय आणि उच्च शिक्षणातही दर्जा वाढ करण्यात येत आहे. आरोग्य क्षेत्रातील सुविधांमध्येही आमूलाग्र बदल घडवून आणण्यात येत आहे. समाजातील सर्व वंचित घटकांपर्यंत पिण्याचे शुद्ध पाणी व त्यांना घरांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

राज्याला सर्वांगीण विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी क्रांतिकारक पाऊल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई, दि. 13 : सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेली आर्थिक सल्लागार परिषद ही महाराष्ट्राच्या दृष्टीने क्रांतीकारक पाऊल असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेची पहिली बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बैठकीबाबत माहिती देताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, टाटा सन्सचे अध्यक्ष तथा m

ही बैठक महाराष्ट्राला सर्वांगीण विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत मुख्यमंत्री पुढे म्हणाले, महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. राज्याच्या विकासासाठी ही बैठक क्रांतीकारक ठरेल. राज्यातील सर्व विभागांचा समतोल विकास होण्यासाठी या परिषदेत महत्त्वाची चर्चा करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  भारताची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत पाच लाख कोटी डॉलर पर्यंत विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ह्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका निर्णायक आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारे राज्य असून महाराष्ट्राच्या सहभागाने पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यास मोठी मदत होणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ही परिषद महत्त्वपूर्ण आहे.

आर्थिक विकासाबरोबरच,  शेती, शेतकरी त्यातील प्रत्येकाच्या राहणीमानाचा विचार ही परिषद करणार आहे. सामान्य माणूस हाच विकासाच्या प्रक्रियेत केंद्रस्थानी असणार आहे. शेती क्षेत्रातील उत्पादन वाढ, तंत्रज्ञानाचा वापर, वित्तपुरवठा याबाबत परिषद अभ्यास करून सूचना, शिफारशी करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

विकासाचा रोडमॅप तयार करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेच्या बैठकीत राज्याच्या विकासासाठीचे व्हिजन या संदर्भात सादरीकरण केले असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते पुढे म्हणाले, या बैठकीत कृषी क्षेत्र, कौशल्य विकास, आर्थिक समावेशन आणि विभागीय असमतोल दूर करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या परिषदेत वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले सदस्य आहेत. त्यांनी आपली मतं मांडली तर परिषदेचे अध्यक्ष यांनी परिषद सदस्यांच्या सूचना असलेले सादरीकरण केले. या बैठकीत परिषद सदस्यांनी केलेल्या सूचनांवर आधारित विकासाचा रोड मॅप तयार करण्यात येईल आणि कालबद्ध पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

राज्यातील संधींना गतीमानता प्रदान करण्यासाठी परिषदेतील सदस्य आपले योगदान देण्यास उत्सुक  असून आर्थिक विकासाच्या विविध कल्पना या परिषदेच्या माध्यमातून मांडण्यात आल्या असल्याची माहिती , परिषदेचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन यांनी दिली. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र हे देशासाठी महत्त्वपूर्ण राज्य आहे. राज्याचे (जीडीपी) सकल देशांतर्गत उत्पादन सर्वात जास्त आहे. इथे पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ आहे. राज्याच्या आर्थिक विकासासह प्रत्येकाचे जीवनमान उंचावण्यासाठी, दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी, चर्चा करण्यात आली. यासोबतच कृषी, कृत्रिम बुद्धीमत्ता, हरित मार्ग, या सारख्या अनेक विषयांवर चर्चा झाली. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात या परिषदेच्या माध्यमातून सोबत काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत असे एन.चंद्रशेखरन यांनी यावेळी सांगितले.

००००

विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या कामाला गती द्यावी-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

0

मुंबई, दि. 14 : राज्यातील विद्यापीठांत शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची त्याच परिसरात राहण्याची सोय व्हावी, यासाठी विद्यापीठांमध्ये विशेष वसतीगृह उभारण्यात येणार आहेत. या वसतिगृहाच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारणीबाबत मंत्रालयात आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सर्व विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी कमीत कमी 500 क्षमतेचे व जास्तीत जास्त 1000 विद्यार्थी क्षमतेचे विद्यापीठाच्या परिसरात वसतीगृह उभारण्यात येणार आहेत. स्थानिक पातळीवरची क्षमता लक्षात घेऊन त्या त्या विद्यापीठांनी तातडीने प्रस्ताव तयार करून आदिवासी विकास विभागाकडे पाठवावा, असे निर्देश संबंधितांना दिले.

कसबा पेठ मतदार संघातील मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संपन्न

पुणे,दि.१४: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी असलेल्या सर्व मतदान यंत्रांची निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल आणि पोलीस निवडणूक निरीक्षक अश्विनी कुमार यांच्या उपस्थितीत संगणकीय पद्धतीने मतदान केंद्रनिहाय द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात आली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राधिका हावळ-बारटक्के, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हा निवडणूक अधिकारी स्तरावर मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय सरमिसळनंतर (रँडमायझेशन) कसबा पेठ विधानसभा मतदार संघासाठी ७५६ बॅलेट युनिट, ३७८ कंट्रोल युनिट आणि ४०५ व्हीव्हीपॅट यंत्र वितरित करण्यात आले आहेत. ही यंत्रे भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) कोरेगाव पार्क येथील गोदामात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. गोदाम परिसरात पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट एकूण सरासरीच्या १४० टक्के आणि व्हीव्हीपॅट यंत्र १५० टक्के उपलब्ध झाली आहेत.

सरमिसळ करण्यापूर्वी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना माहिती देऊन प्रत्यक्षिकही करून दाखविण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित करण्यात आलेल्या शंकांचे निरसन श्री.बोरोले यांनी केले. सरमिसळ झालेल्या यंत्रांच्या माहितीची प्रत उमेदवारांना देण्यात आली, अशी माहिती श्रीमती किसवे-देवकाते यांनी दिली आहे.

धान उत्पादकांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम-मंत्रिमंडळ बैठकीत १ हजार कोटी रुपये खर्चास मान्यता

0

मुंबई-

            राज्यातील धान उत्पादकांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यासाठी १ हजार कोटी रुपये इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  याचा लाभ अंदाजे ५ लाख शेतकऱ्यांना होईल.

या संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती.  २०२२-२३ या खरीप पणन हंगामात केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी भावाव्यतिरिक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान लागवडीखालील जमिनीनुसार प्रती हेक्टरी १५ हजार रुपये या प्रमाणे प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल.  ही रक्कम २ हेक्टर मर्यादेत देण्यात येईल.

मागील म्हणजे २०२१-२२ खरीप हंगामात १ कोटी ३३ लाख ७९ हजार ८९२ क्विंटल धान खरेदी झाली होती.  पण या हंगामात धानाकरिता प्रोत्साहनपर रक्कम जाहीर करण्यात आली नव्हती.  या पूर्वीच्या खरीप हंगामामध्ये धान उत्पादकांना प्रती क्विंटल ७०० रुपये अशी रक्कम प्रोत्साहनपर म्हणून देण्यात आली आहे. मात्र ही रक्कम प्रती क्विंटल देण्यात येत असल्यामुळे काही अडचणी येत होत्या.  ज्या शेतकऱ्यांकडे ५० क्विंटलपेक्षा कमी धान उत्पादन आहे अशांच्या नावे ५० क्विंटल मर्यादेपर्यंत जास्तीची धान खरेदी करण्याचे प्रसंग घडले.  तसेच शेजारील राज्याचे धान महाराष्ट्रात विक्री करिता आणल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या.

यंदा २०२२-२३ योजनेकरिता सुमारे ५ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून एकूण ६ लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर धान उत्पादन झाले आहे.

मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ अभियान

शून्य ते अठरा वर्षांपर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाची सुरूवात करण्यात आली. या अभियानांतर्गत राज्यातील सुमारे १८०० शाळांमधील १८ वर्षांखालील जवळपास दोन कोटी ९२ लाख मुलांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ९ हजार तपासणी पथकांमार्फत ही अभिनव योजना राबविली जात आहे. अगदी अभिनव आणि काळाची गरज ओळखून बालकांना संदर्भसेवा, रोग निदान, औषधोपचार यासाठी नियोजित केलेले अभियान म्हणजे “जागरूक पालक, सुदृढ बालक” होय. या अभियानात सहभागी होऊन प्रत्येकाने आपल्या बालकांची तपासणी करून आपण जागरुक पालक असल्याचे दाखवून द्यावे.

अभियानाची रूपरेषा आणि उद्दिष्ट

राज्यातील ० ते १८ वर्षापर्यंतची बालके तसेच किशोरवर्यीन मुला-मुलींच्या  सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, आदिवासी विभाग व समाजकल्याण विभाग यांच्या समन्वयाने हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे.

उद्दिष्ट :

  • ० ते १८ वर्षापर्यंतच्या बालकांची / किशोरवयीन मुला-मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे.
  • आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे.
  • गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे. (उदा. औषधोपचार,शस्त्रक्रिया इ.)
  • प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे.
  • सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे.

राज्यातील शाळा/अगंणवाडी, शासकीय व निमशासकीय शाळा, खासगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, बालगृहे, अनाथालये, अंध, दिव्यांग शाळामधील विद्यार्थ्यांसह शाळाबाह्य विद्यार्थ्यांची तपासणी या मोहिमेअंतर्गत होणार आहे.

अशी असतील तपासणी पथके

  1. ग्रामीण भागात- उपकेंद्राच्या संख्येनुसार (प्रती उपकेंद्र एक पथक).
  2. शहरी व महानगरपालिका विभाग- शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या संख्येनुसार (प्रती प्राथमिक आरोग्य केंद्रात एक)

तपासणीची ठिकाणे

1) शासकीय निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालये.

2) खाजगी शाळा,

3) आश्रमशाळा

4) अंध शाळा, दिव्यांग शाळा

5) अंगणवाडया,

6) खाजगी  नर्सरी, बालवाड्या

7) बालगृहे, बालसुधार गृहे

8) अनाथ आश्रम,

९) समाज कल्याण व आदिवासी विभाग वस्तीगृहे (मुले/मुली),

१०) शाळा बाह्य (यांचे उपरोक्त दिलेल्या नजीकच्या शासकीय शाळा व अंगणवाडीच्या ठिकाणी) मुले-मुली.

या अभियानांतर्गत बालकांच्या  तपासणीसाठी स्थानिक पातळीवर  बाल आरोग्य तपासणी पथक स्थापन करण्यात आले आहे.

प्राथमिक तपासणी पथक –

प्राथमिक स्तरावर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे (आरबीएसके) आरोग्य पथक असेल यामध्ये वैद्यकीय अधिकारी पुरुष/महिला, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी यांचा समावेश आहे. दुसरे भरारी पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक/ सेविका यांचा समावेश असणार आहे. तिसरे पथक हे बाल आरोग्य तपासणी पथक असणार आहे. या सर्वपथकांसोबत स्थानिक आशा व अंगणवाडी सेविका काम पाहणार आहेत.

या पथकामार्फत प्रतिदिन १५० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच शासकीय व खाजगी शाळा, अंगणवाडी यांच्या तपासणीचा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. ही पथके कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व अंगणवाडीला दररोज (सार्वजनिक सुट्टी दिवस वगळून) भेटी देणार असून तपासणीनंतर आवश्यकतेनुसार बालकांना  प्रथम, द्वितीय, तृतीय स्तरावर उपचाराकरिता संदर्भित करणार आहेत.

प्रथम स्तर तपासणी

शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र/प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपग्रामीण रुग्णालये, सीएचसी, महापालिका रुग्णालये, प्रसुतीगृहांमध्ये ही प्रथमस्तर तपासणी होणार आहे. याअंतर्गत प्रा. आ. केंद्रामध्ये, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय/ उपजिल्हा रुग्णालये/सामुदायिक आरोग्य केंद्रे/महापालिका रुग्णालये/प्रसुतीगृहे येथे आठवड्यातून दोन वेळा (दर मंगळवारी व शुक्रवारी) तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार बालकांना पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा देणार आहे.

द्वितीय स्तर तपासणी/संदर्भ सेवा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालये/महापालिका वैद्यकीय महाविद्यालये/दंत रुग्णालये/महिला रुग्णालये आदीमध्ये द्वितीय स्तर तपासणी होणार आहे. यामध्ये शल्य चिकित्सक, बालरोगतज्ञ, भिषक, स्त्रीरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, नेत्र चिकित्सा अधिकारी, त्वचारोग तज्ञ, दंतरोगतज्ञ, मानसिक रोग तज्ञ, जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महानगरपालिका रुग्णालय येथील सर्व विशेषतज्ञ सहभागी असणार आहेत. यामध्ये आठड्यातून  एकदा (दर शनिवारी) तपासणी होणार आहे. सर्व स्तर व तपासणीमध्ये उच्चस्तरीय उपचार व शस्त्रक्रियेची आश्यकता  असलेल्या बालकांना येथे संदर्भित करण्यात येणार आहे. तसेच अशा बालकांना पुढील उपचारासाठी करारबद्ध करण्यात आलेली खाजगी रुग्णालये, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्ययोजना/प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालये व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये पाठविण्यात येणार आहे. 

अभियानाची पूर्व तयारी

अभियानाचे नियोजन, अंमलबाजावणी व  आढावा घेण्यासाठी ग्रामीण व शहरी भागासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दल  व महानगरपालिका स्तरावर आयुक्त (महानगरपालिका) यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका कृती दल स्थापन करण्यात आले आहे.

असे असेल अभियानाचे नियोजन

  • हे अभियान कालबध्द पध्दतीने ८ आठड्यात पूर्ण करण्यात येणार आहे.
  • त्यादृष्टीने सर्व ग्रामीण,शहरी व मनपा भागातील संस्थांचा / अधिकाऱ्यांचा आढावा घेवून वेळेत तपासणी पूर्ण होईल याकरिता सूक्ष्मकृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
  • यासाठी मनपा,नगरपालिका, जिल्हा, तालुका, आरोग्य संस्थास्तरावर नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे.

तपासणीचा सूक्ष्म कृती आराखडा

  • विविध स्तरावर प्रथम/द्वितीय स्तर पथके व“बाल आरोग्य तपासणी पथक” स्थापन करणे.
  • पथकनिहाय त्यांच्या कार्यक्षेत्रानुसार तपासणी करिता सूक्ष्म कृती आराखडा तयार करणे.
  • प्रत्येक तपासणी पथकाने पूर्ण दिवसामध्ये किमान १५० विद्यार्थी तपासणीचे नियोजन करणे.
  • राष्ट्रीय बाल स्वास्थ्य केंद्राच्या पथकांमार्फत त्यांच्या नियोजनातील तपासणी करण्यात येणाऱ्या शाळा व अंगणवाडी वगळून कार्यक्षेत्रातील इतर सर्व उर्वरित शाळा अंगणवाडीच्या तपासणीचे गठित“बालआरोग्य तपासणी पथक”   नियोजन करत आहे.
  • जिल्ह्यातील अंध-दिव्यांग शाळा,बालगृहे, अनाथ आश्रम, समाज कल्याण व आदिवासी विभाग वस्तीगृहे (मुले/मुली) यातील विद्यार्थ्यांची तपासणी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या पथकामार्फत करण्यात येणार आहेत.  

रुपरेषा

तपासणी :

  • डोक्यापासून ते पायापर्यंतसविस्तर तपासणी
  • वजन व उंची घेवून सॅम/मॅम/बीएमआय(६ वर्षावरील बालकांमध्ये) काढणे
  • पद्धतशीर वैद्यकिय तपासणी करणे.
  • आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे रक्तदाब व तापमान मोजणे व गरजू विद्यार्थ्यांना त्वरित उपचार वा संदर्भित करणे.
  • नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखणे.
  • रक्तक्षय,डोळ्यांचे आजार, गलगंड, स्वच्छ मुख अभियान, दंतविकार, हृदयरोग, क्षयरोग,
  • कुष्ठरोग, कॅन्सर, अस्थमा, एपिलेप्सी ई. आजारांच्या संशयित रुग्णांना ओळखून  त्वरित संदर्भित  करणे.
  • ऑटीझम, विकासात्मक विलंब, शिकण्याची अक्षमता (Learning Disability) इ. च्या संशयित रुग्णांना ओळखून त्वरित डीईआयसी येथे संदर्भित करणे.
  • किशोरवयीन मुला-मुलींमधील शारिरिक/मानसिक आजार शोधून त्यांना आवश्यकतेनुसार संदर्भित करावे. 

ब. उपाययोजना व औषधोपचार :

  • प्रत्येक आजारी बालकांवर औषधोपचार.
  • तपासण्या – नजीकच्या आरोग्य संस्थेमध्ये उपलब्ध सर्व रक्त-लघवी-थुंकी, एक्सरे/यूएसजी आदी तपासण्या आवश्यकतेनुसार करण्यात येणार आहेत.
  • डीईआयसी अंतर्गत आवश्यकतेनुसार बालकांना थेरपी,शस्त्रक्रिया.
  • न्युमोनिया,जंतुसंसर्ग, अतिसार, रक्तक्षय, दृष्टिदोष, दंतविकार, क्षयरोग, कुष्ठरोग, इ. व्याधींने आजारी असलेल्या बालकांना राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपचार होणार आहेत.
  • समुपदेशन (नवजात बालकासोबत आलेल्या मातेस स्तनपान,पोषण, बीएमआय (६ ते १८ वयोगटाककरिता) (१८.५ ते २५ च्या दरम्यान ठेवण्याबाबत), मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती संदर्भात समुपदेशन करण्यात येणार आहे.)

संदर्भ सेवा :

अंगणवाडी व शाळा स्तरावरील बालके/विद्यार्थ्यांच्या तपासणी दरम्यान आढळून येणाऱ्या आजाराच्या तीव्रतेनुसार पुढील योग्य ते उपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय/उपजिल्हा रुग्णालय/जिल्हा रुग्णालय/डीईआयसी व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे.

राज्य शासनाने अगदी अभिनव आणि काळाची गरज ओळखून बालकांना संदर्भसेवा, रोग निदान, औषधोपचार यासाठी ही योजना सुरू केली आहे. प्रत्येक जागरूक पालकाने आपल्या पाल्याची तपासणी करून तो सुदृढ कसा राहिल यासंदर्भात सजग रहावे. बालके सुदृढ राहिले तरच आपला राज्य, देश सुदृढ राहिल… 

नंदकुमार ब. वाघमारे

प्र. जिल्हा माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे

कचरा पेटवल्याने महावितरणच्या वीजवाहिन्या जळाल्या

नांदेड गाव, किरकटवाडी, खडकवासला परिसराला फटका

पुणे, दि. १४ फेब्रुवारी २०२३: सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी गेटजवळ असलेल्या एका ओढ्याच्या पुलावरील कचरा अज्ञाताने पेटवल्यामुळे महावितरणच्या २२ केव्ही क्षमतेच्या तीन वीजवाहिन्या जळाल्या. यामध्ये दोन उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने नांदेड गाव, खडकवासला, किरकटवाडी, वडगाव खुर्द, धायरीचा काही भाग या परिसरामध्ये मंगळवारी (दि. १४) सकाळी दीड तास वीजपुरवठा खंडित झाला होता.

याबाबत माहिती अशी की, नांदेड सिटी गेटजवळील ओढ्यावरील पुलाच्या कठड्यावर कचरा टाकण्यात येत आहे. हा कचरा आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून पेटविण्यात आला. मात्र कठड्यावरून जाणाऱ्या महावितरणच्या २२ केव्ही क्षमतेच्या तीन वीजवाहिन्यांनी पेट घेतला. त्यामुळे खडकवासला व धायरेश्वर या दोन उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी नांदेड गाव, खडकवासला, किरकटवाडी, वडगाव खुर्द, धायरीचा काही भागातील सुमारे १८ हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. अग्निशामक दलाने ही आग विझवल्यानंतर महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. कल्याण गिरी, सहायक अभियंता श्री. सचिन आंबवले व सहकाऱ्यांनी तातडीने पर्यायी वीजपुरवठ्याची उपाययोजना केली. यानंतर दीड ते पावणेदोन तासांमध्ये टप्प्याटप्प्याने सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. या घटनेमध्ये महावितरणचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच पोलीस ठाण्यात कचरा पेटविणाऱ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे

शहरी व ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी किंवा घरे, इमारतींच्या परिसरात असलेल्या वीजयंत्रणेजवळ सुका व ओला कचरा टाकल्यामुळे किंवा कचऱ्याने पेट घेतल्यामुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होत आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहे. नागरिकांनी वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये किंवा जाळू नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेच्या परिसरात, रोहित्राच्या आजूबाजूला तसेच फिडर पिलरजवळ ओला व सुका कचरा टाकू नये. साठवलेला कचरा जाळू नये. कचरा पेटल्यामुळे वीजयंत्रणेला आगीचा धोका असल्याचे लक्षात येताच २४ तास सुरु असलेल्या महावितरणच्या १९१२ / १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी असे आवाहन महावितरणने केले आहे.

मुंबईतील पाणी टँकरधारकांचा संप मागे

0

मुंबई, दि. १४ : मुंबईत गेले काही दिवस वॉटर टँकर असोसिएशनच्या सुरू असलेल्या संपासंदर्भात  आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेत असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत, मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचे अध्यक्ष जसबिरसिंह बिरा, उपाध्यक्ष जितू शाह, सचिव राजेश ठाकूर, हरबनसिंह यांच्यासह असोसिएशनचे विविध प्रतिनिधी उपस्थित होते.

असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासमोर आपले विविध प्रश्न मांडले. टँकरधारकांचे प्रश्न नियमानुसार सोडविण्यात येतील. तथापि, लोकांची होणारी गैरसोय पाहता टँकरधारकांनी पाणीपुरवठा त्वरीत सुरु करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले. उपमुख्यमंत्र्यांच्या आवाहनास अनुसरुन संप मागे घेत असल्याचे तसेच गोरेगाव येथे आजच सर्व टँकरधारकांची बैठक घेऊन पाणीपुरवठा सुरु करण्यात येईल, असे असोसिएशनच्या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री श्री. लोढा म्हणाले की, वॉटर टँकर असोसिएशनच्या विविध मागण्या व त्यांना येत असलेल्या अडीअडचणी सोडविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. केंद्र शासनाशी तसेच केंद्रीय भूजल प्राधिकरणाशी संबंधीत मागण्यांबाबत त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात येईल. पाण्याचे टँकर अचानक बंद झाल्याने मुंबईत लोकांची मोठी गैरसोय होत आहे. अशा पद्धतीने पाण्यासारख्या मूलभूत गरजेशी संबंधीत बाबीवर लोकांची गैरसोय करणे चुकीचे आहे. त्यामुळे असोसिएशनने तातडीने टँकरचा पाणीपुरवठा सुरु करावा, असे त्यांनी सांगितले.

लोकशाही बळकटीसाठी कायद्याची भूमिका महत्त्वाची- रामराजे नाईक निंबाळकर

पुणे, १४ फेब्रुवारीः“लोकशाहीच्या बळकटीसाठी कायद्याची भूमिका महत्वाची आहे. या देशात कायदा सर्वश्रेष्ठ आहे. अशा वेळेस कायदयाचे शिक्षण घेणार्‍या युवकांनी लोकशाहीच्या बळकटीसाठी चांगल्या उद्देशाने राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा.” असे विचार महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआईटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विधी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, कुलसचिव गणेश पोकळे, विधी महाविद्यालयाच्या प्रमुख डॉ. पौर्णिमा इनामदार, डॉ. अश्विनी पंत, डॉ. कल्पना जायस आणि विद्यार्थी प्रतिनिधी अनिश खडे उपस्थित होते.
रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले,“संविधानात्मक मूल्यांचा अंगीकार प्रत्येकाने स्वीकारावा. महाराष्ट्राची विधान परिषद ही सर्वोत्तम काम करणारी आहे. वर्तमान काळात लोकहिताचे कायदे व धोरण बनवून त्याचे पालन करावे. तंत्रज्ञान व मानव यांच्या परस्पर संबंधांचे कायदे तयार करणे व व्यवस्था राखणे हे कायदयाचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनसमोर मोठे आवाहन आहे. त्यामुळे नैतिकमूल्ये व विवेक जोपासणे आवश्यक आहे.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ या देशाापुढे जातीयता, गुन्हेगारी, सामुदाय कलह आणि भ्रष्टाचार हे सर्वात मोठे आवाहन आहे. त्यासाठी कडक कायदे व त्यावर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.”
प्रा.डॉ. चयनिका बासू यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अभिजित ढेरे यांनी आभार मानले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हेमंत रासने यांना पाठिंबा


ठाकरे यांचा कल हिंदुत्व आणि विकासाच्या बाजूने

पुणे-हिंदुत्व आणि विकास हे दोन्ही मुद्दे प्रभावशाली पद्धतीने पुढे नेणारा एकच घटक सध्या आहे, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. म्हणूनच पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला पूर्ण सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय मी घेत आहे, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली.
पुण्यातील मनसे नेत्यांनी आज राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी राज यांनी ही स्पष्टोक्ती केल्याचे समजते. त्यावेळी पुण्यातील कसबा विधानसभा पोट निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बाबू वागस्कर, अजय मोरे, किशोर शिंदे आदी मनसेचे पुण्यातील स्थानिक नेते उपस्थित होते.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई टिळक यांचे निधन झाल्यामुळे या मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना आणि मित्र पक्षाच्या युतीतर्फे हेमंत रासने हे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. या संदर्भात मनसेची भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर पुण्यातील स्थानिक नेत्यांनी राज यांची आज भेट घेतली. हिंदुत्व आणि विकास याच्या बाजूनेच आपला कल असल्याचे राज यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे कसबा विधानसभा निवडणुकीत भाजप युतीचे उमेदवार हेमंत रासने यांना आता मोठे बळ मिळाले आहे.
निवडणूक प्रमुख आमदार माधुरी मिसाळ आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी आज मनसेचे प्रवक्ते आणि नेते अनिल शिदोरे प्रदेश, नेते बाबू वागस्कर, उपाध्यक्ष बाळा शेंडगे, प्रदेश सरचिटणीस किशोर शिंदे, शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आणि कसबा विभागाचे अध्यक्ष गणेश भोकरे यांची भेट घेतली.यावेळी वागस्कर यांनी पाठिंबा दिल्याचे जाहीर केले.